Skip to main content

ऋणनिर्देश

संकल्पना संसर्ग

ऋणनिर्देश

अजूनही २०२० साल सुरू आहे. अजूनही करोना विषाणू जगभर (बहुतांश देशांत) थैमान घालतो आहे. अजूनही त्यावर अक्सीर इलाज सापडलेला नाही. कोव्हिडवर लस अजूनही सर्वसामान्यांना उपलब्ध नाही. अजूनही २०२० सालच सुरू आहे. अनेक गोष्टी बदललेल्या मात्र आहेत.. 'न्यू नॉर्मल' हा शब्द वापरण्याची हीच ती जागा.

तरीही काही गोष्टी तशाच आहेत. ऐसीचा दिवाळी अंक प्रकाशित होत आहे. दर वर्षीप्रमाणे हा अंकही क्रमाक्रमाने प्रकाशित होईल. अंक कागदावर छापून आला तरच तो गांभीर्याने घेण्यासारखा असतो असे विसाव्या शतकातले पूर्वग्रह आम्ही अजूनही पाळत नाही. अंकाच्या कामासाठी अजूनही इमेल, गूगल डॉक वगैरे तंत्रज्ञान वापरलं जात आहे. बारका बदल म्हणजे ह्या वर्षी… नको तितके तांत्रिक तपशील लिहिण्याचा हा धागा नाही!

दिवाळी अंकासाठी काम करणारे जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांत राहणारे अनेक हौशी आणि हुशार लोक ह्या वर्षीही झडझडून काम करत आहेत. अंकाचा दर्जा सांभाळण्यासाठी आम्हाला त्यांची जी मदत होते ती खरं तर अशा ऋणनिर्देशात मावण्यासारखी नाही. अवंती, म्रिन, रोचना, शैलेन, नंदन, अबापट, राजन बापट, चिंतातुर जंतू, अमुक, संदीप देशपांडे, राजेश घासकडवी, सोफिया, उज्ज्वला, (बऱ्याच बायकांची नावं झाली की!) आदूबाळ, ३_१४ विक्षिप्त अदिती … (कुणाचं नाव राहिलं का?)

एका गोष्टीचा उल्लेख करण्यासाठी योग्य जागा कुठली हे माहीत नाही. अबापट आणि चिंतातुर जंतू यांनी अनेक मित्रमैत्रिणींच्या मदतीनं करोना विशेष विभाग गेले कित्येक महिने चालवला आहे. (त्यांना लाजवण्याची संधी कशी सोडणार!) अंकाच्या संकल्पनेशी संबंधित अनेक लेख तिथेही वाचायला मिळतील.

विशेषांक प्रकार

ऐसीअक्षरे Fri, 04/12/2020 - 10:07

दिवाळी अंकांचे स्वागत करणाऱ्या सदरात आज लोकसत्ताने ‘ऐसी अक्षरे’ दिवाळी अंकाची दखल घेतली आहे. त्यासाठी लोकसत्ताचे आभार.

ऐसीअक्षरे Tue, 12/01/2021 - 06:42

अंकाचं इबुक (epub) डाऊनलोड करण्याचा दुवा. किंडलवर हवं असल्यास ॲमेझनचा दुवा.