श्री कोरोनाविजय कथामृत (१) - जानेवारी २०२१
तर २०२१ उजाडलं.
सगळं मस्त सुरू होतं. इंडस्ट्री,ऑफिसेस, (अर्थव्यवस्था की काय ते पण) थिएटर्स (५० टक्के का होईना), बाजार, दुकानं, प्रवास, हॉटेलं, बार, सगळं सगळं. म्हणजे एकदम परत २०१९ सुरू झाल्यासारखं वाटत होतं.
अमेरिकेत ट्रम्पतात्या कृपेने (म्हणे) पहिल्या आठवड्यात तीन लाखाच्या आसपास रोज नवे बाधित येत होते.
बायडेन मामा सत्तेवर आल्यावर ते तर एकदम टीव्हीवर बोलतानाही मास्क लावायला लागले. कोरोना संकट जाणवले त्यांना अखेर. सगळ्यांना मास्क लावा, अंतर पाळा म्हणू लागले. लस घ्यायचाही आग्रह करू लागले.
आम्हाला हे आधीपासूनच सांगितलं जात होतं.
छोट्याश्या ब्रिटनमधेही साठ-सत्तर हजार माणसं दररोज नवीन बाधित होत आहेत असं दृश्य होतं.
बोरीसकुमार जॉन्सन यांनी ४ जानेवारीला लॉकडाऊन जाहीर केला. शाळा कॉलेज रेस्टॉरंट बार बंद करून टाकले, फक्त अत्यावश्यक सेवांची दुकानं सुरू ठेवली. एकदम कडक.
आम्ही हेही आधीच करून बसलो होतो.
त्यांच्या आजूबाजूला फ्रान्स, जर्मनी सगळीकडे अशीच रड सुरू होती.
आमच्या १३६ कोटीच्या, दाटीवाटीने राहणाऱ्या, गरीब लोक राहणाऱ्या देशात मात्र या काळात हाच आकडा केवळ पंधरा-वीस हजारात होता.
किरकोळ.
आम्ही कोरोनावर विजय मिळविला आहे हे जवळजवळ नक्की झालं होतं.
आमच्या आदरणीय पंतप्रधानांनी हे जगापुढे जाहीरही करून टाकलं होतं.
आम्ही कोरोना ॲप्रोप्रिएट बिहेवियर करत आहोत असंसुद्धा आमच्या पंतप्रधानांनीच सांगून टाकलं. कोरोनाकरता पुरेशी वैद्यकीय तयारी आम्ही केली आहे हेही त्यांनी ठासून जगाला सांगितलं.
शिवाय तीन जानेवारीला, भारतात उत्पादन होणाऱ्या दोन लसींना DCGI ने मान्यताही दिली होती.
१६ जानेवारीपासून तर गेल्या वर्षीच्या कोरोना काळात सर्वात पुढे राहून धैर्याने या विषाणूचा सामना करणाऱ्या डॉक्टर्स, पॅरामेडिक्स, सफाई कर्मचारी व पोलिसांसारख्या फ्रंटलाईनवर काम करणाऱ्यांकरता लसीकरणही सुरू झालं.
वाटलं, आता फक्त काहीच आठवडे-महिन्यांचा प्रश्न उरला आहे.
जानेवारी महिन्यातले आकडेही हीच स्टोरी सांगत होते.
ग्राफमध्ये बघा, कुठे त्यांचे आकडे आणि कुठे आमचे !!!

तिसरी लाट भारतात येवू नये
तिसरी लाट देवाच्या कृपेने (देव आहे की नाही माहीत नाही पण दुसरा कोणताच पर्याय भारतात तरी नाही)
येवू नये भारतात.नाही तर खूप केविलवाणी अवस्था होईल भारतीय जनतेची .
ना जनता हुशार,जबाबदारी समजणारी.
ना सत्तेवर बसलेले लायकीचे.ना उत्तम प्रशासन.
कोणतीच गोष्ट अनुकूल नाही.
तिसरी लाट जर भारतात आली तर भारताच्या इतिहास मधील तो परिवर्तन करणारा काळ असेल.
पुनर्जन्म च असेल भारताचा.
एक निटपिक
नाही म्हणजे, बाकी सर्व लेख, त्यातील उपहास, त्यामागील मर्म, सर्व ठीक आहे, त्याबाबत काहीही म्हणणे नाही. फक्त एकच गोष्ट खटकली.
काय राव! तुम्हीही 'पर कॅपिटा' गणनापद्धतीचे भोक्ते असाल, असे वाटले नव्हते. सकाळीसकाळी पिसाळलेले घासकडवी चावले काय?
नाही, इटलीच्या वगैरे तुलनेने भारतातला मृत्युदर खूपच कमी होता, हे म्हणणे ठीकच आहे. तशा तुलनेकरिता 'पर कॅपिटा' गणनापद्धतीचा तितपत उपयोग मीही समजू शकतो. परंतु... किरकोळ??? शब्द खटकला.
(अर्थात, अशा प्रकारचे जाहीर वक्तव्य कोणी जर केले असले (मला कल्पना नाही; चूभूद्याघ्या.), आणि ही जर केवळ त्याची उपहासात्मक पुनरोक्ती असली, तर मग मी माझा आक्षेप दिलगिरीसह मागे घेतो.)