फेसबुक फ्रेंडशिपचे निकष
गेले दोनेक आठवडे का कोण जाणे, पण फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट्स वाढल्या आहेत. अर्थात त्या माझ्या मानानेच, म्हणजे दिवसाला तीनचार. पण त्या निमित्ताने कोणाला स्वीकारायचं आणि कोणाला दूर ठेवायचं याबद्दल थोडा विचार केला.
रेड फ्लॅग्ज
- अभिव्यक्तीजुलाब - रोज चारपाच पोस्ट टाकणाऱ्या लोकांना मी दूर ठेवतो. महिन्याला दोनतीन पोस्ट टाकणारे ठीक.
- भडकभगवे (राजकारणी) - मोदीभक्तीत लीन झालेले लोक डोक्यात जातात. इतर पक्षांबाबतीतही तेच - प्रचारक, माझ्या पक्षाचा दांडू तुझ्या पक्षाच्या दांडूपेक्षा मोठा म्हणत राहाणारे.
- भडकभगवे (धार्मिक) - ज्यांनी स्वतःला कुठल्यातरी बाबा-बुवा-देव-गॉड-अल्लाच्या चरणी अर्पून केवळ त्यांचं नामस्मरण करणारे क्षमस्व.
- कंठाळी - अद्वातद्वा वाद घालणारे, मुद्दा सोडून चटकन ऍड होमिनिम करणारे, आणि शांत चर्चेपेक्षा भडक-भावनिकपणे उसळणारे आवडत नाहीत.
- उललेले/शुभप्रभाती - हे मानवी जीवन आपल्यालाच समजलेलं आहे अशी समजूत करून घेणारे आणि/किंवा जगाचं भलं करण्यासाठी स्फूर्तीदायी संदेश सतत टाकणारे. त्यांचा भाबडेपणा काही काळ आकर्षक वाटतो. पण आता बराच काळ उलटून गेला आहे.
- अतिस्वानंदी - मी, माझी कार, माझा बंगला, माझी व्हेकेशन यांचं प्रदर्शन करत राहाणारे लोक.
ग्रीन फ्लॅग्ज
मैत्रांचे मैत्र - मला ज्या पंधरावीसपंचवीसतीस लोकांबद्दल आदर, आत्मीयता, प्रेम, जिव्हाळा आहे असे तीनचार लोक त्यांच्या फ्रेंडलिस्टीत असणं.
- ज्ञानी/पॅशनेट - कला, शिक्षण, साहित्य, विचार या क्षेत्रांमध्ये काम करणारे किंवा आत्मीयता बाळगणारे.
- नास्तिक/उदारमतवादी - अधिक वर्णन करण्याची गरज नाही. अशांचे इतर रेड फ्लॅग्ज थोडे चालवून घेतो.
इतर
कुठचाच रेड किंवा ग्रीन फ्लॅग नसलेलेही अनेक असतात, त्यांना मी बहुतेक वेळा स्वीकारतो. सुदैवाने माझी मित्रयादी तशी फार मोठी नाही, आणि मीही कोणी फार मोठा नाही.
तुमचे काय निकष असतात?
लेबलं आवडली.
तीन संस्थळांंमुळे काही रिक्वेस्ट्स येतात त्या घेतो. ( Mutual friends **) अमुक यामुळे तिकडचे आहेत कळतं. पण ते नक्की कोण आइडी हे आइडी नावं तीच असल्यास समजतं. अन्यथा नोटिफिकेशन्स बंद.
भटकंती दरम्यान जी रिक्वेस्ट येतात ती घेतो. परत नोबंद. पण फेबु संपर्क माध्यम भारी आहे. (मीही कोणी फार मोठा नाही. प्रश्न मोठा/लहानचा नसतो, फोन नंबर न देता संपर्क करता/ठेवता येतो हेच भारी.)
काही छंदांचे ग्रुपस जॉईन करतो. मग leave group. कारण तोचतोचपणा येतो. फोटो टाकून "id please"? पोस्टी.
शाळा, ओफीस ग्रुप ठाम नाही.
-------
तीन वेगळ्या नावाने तीन अकाउंट्स 'खोलली' आहेत. पसारा आटोक्यात राहिलाय. वर्षभरात फार तर दोन पोस्टी टाकतो.
मी आता जीवाभावाच्या मैत्रिणी
मी आता जीवाभावाच्या मैत्रिणी किंवा मित्र शोधायला जात नाही. फेसबुककडे मी कट्टा म्हणून बघते. त्यामुळे ज्यांच्याबरोबर मला हास्य विनोद करता येतील अशा लोकांच्या विनंत्या मी स्वीकारते. त्यातही काही लोक खूप आवडतात मग आपोआपच व्हॉट्सॲप वगैरेवर गप्पा होतात.
पण मला फेसबुक किंवा मराठी संस्थळावर भेटलेल्या लोकांचे आपले आपले व्हॉट्सॲप ग्रूप असतात त्याची फार भीती वाटते. एकूणच अशा ओळखी मग खूप पर्सनल लेव्हलला जातात आणि कडवटपणा येतो. त्यामुळे जे बोलायचं ते वॉलवर किंवा फेसबुकवर असा नियम मी शक्यतो पाळते.
मित्र विनंती स्वीकारली की लगेच हाय डियर करून इनबॉक्स मध्ये येणाऱ्यांना मी पुन्हा अन्फ्रेंड करते. किंवा मी मोदी विरोधी लिहिलं की काही पुरुष इनबॉक्स व्हॉट्सॲपवर येऊन "तू अजून लहान आहेस. मी तुला संघाच्या कामाची ओळख करून देतो" म्हणत येतात त्यांना मी restricted मध्ये टाकते.
कधी कधी मित्र विनंती स्वीकारली की परत येऊन बघता ४५ नोटिफिकेशन असतात. नवीन मित्राने १० मिनिटात आपले ४५ फोटो लाईक केलेले असतात. मग त्यांनाही मी unfriend करते.
छान फोटो, पाककृती, फूड फोटोग्राफी, पुस्तकं वाचणारे आणि सिनेमे बघणारे लोक अशा सगळ्यांना मी स्वतः add करते.
.
(पुनरुक्तीचा दोष तथा धोका पत्करून:) फेसबुक हे "आज सकाळी मला पातळ शी झाली" हे शुभवर्तमान ('स्टेटस') अर्ध्या जगाला निमिषार्धात कळविण्याकरिता (आणि, उलटटपाली, अर्ध्या जगाने सगळे असलेले-नसलेले कामधंदे बाजूस टाकून त्या 'स्टेटसा'स क्षणार्धात 'लाईक' करण्याकरिता) एक अत्यंत प्रभावी असे साधन आहे.
हॅविंग सेड दॅट:
१. मी फेसबुकावर नाही, आणि येण्याचा इरादाही नाही. सबब, माझ्याकडून तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट येणार नाही. काळजी नसावी.
२. माझी बायको फेसबुकावर आहे. मात्र:
- तिचे निकष काय, ते तिचे तिलाच ठाऊक. मी त्यात लक्ष घालत नाही.
- तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्यात तिला स्वारस्य असेल, याबद्दल मी प्रचंड साशंक आहे. (मआंजा आणि त्यावरील व्यक्ती - युअर्स ट्रूली इन्क्लूडेड - यांबद्दलची तिची मते छापण्यालायक नाहीत.) सबब, तिच्याकडूनसुद्धा फ्रेंड रिक्वेस्ट येण्याचा धोका तुम्हाला नाही; तेव्हा, त्याही संदर्भात काळजी नसावी.
पूर्णविराम.
सहमत
१. मी फेसबुकावर नाही, आणि येण्याचा इरादाही नाही. सबब, माझ्याकडून तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट येणार नाही. काळजी नसावी.
असेच म्हणतो. मी फेसबुकावर नाही, आणि येण्याचा इरादाही नाही
२. माझी बायको फेसबुकावर आहे. मात्र:
- तिचे निकष काय, ते तिचे तिलाच ठाऊक. मी त्यात लक्ष घालत नाही.
- तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्यात तिला स्वारस्य असेल, याबद्दल मी प्रचंड साशंक आहे. (मआंजा आणि त्यावरील व्यक्ती - युअर्स ट्रूली इन्क्लूडेड - यांबद्दलची तिची मते छापण्यालायक नाहीत.) सबब, तिच्याकडूनसुद्धा फ्रेंड रिक्वेस्ट येण्याचा धोका तुम्हाला नाही; तेव्हा, त्याही संदर्भात काळजी नसावी.
अगदी असेच.
काका-काकू लोकांची भीती आणि अनफॉलोचं हत्यार.
मी फेसबुकवर जाणं टाळतो.
तिथे काका-काकू लोक प्रचंड सक्रीय असतात. नियमित पोस्टी टाकतात, त्यावर प्रतिसाद देतात (स्मायली) आणि हिरीरीने भांडतात.
मागे २०१६ मधे नोटाबंदीवर काहीतरी पोस्ट टाकली तेव्हा एक काकू प्रचंड भडकल्या आणि भांडल्या.
आता मी माझ्या मित्रांच्या पोस्टसवर काहीतरी प्रतिसाद दिला आणि ह्या काका लोकांच्या पोस्टस बघितल्या नाहीत तर त्यांना चक्क वाईट वगैरे वाटतं.
..........
फेसबुकवर चांगला मालही असतो - काही मित्रांच्या पोस्ट्स किंवा मग लाईक केलेलं पान (दवणीय अंडे, महागुरू इ.)
पण मुख्य प्रॉब्लेम असा आहे की फेसबुक स्वत: ठरवतं काय कसं दाखवायचं. त्याला कितेकदा ट्विक केलं (म्हणजे नको त्याला ३० दिवस स्नूझून टाकलं, किंवा अनफॉलॉ केलं इ.इ.) तरीही अधेमधे असा कचरा दिसत रहातो.
त्यापेक्षा ग्रुप्स हा प्रकार उत्तम आहे. ठराविक विषयावरची उत्तम माहिती आणि मर्यादित चर्चा इथे होते आणि त्यात चिक्कार माहिती मिळते -फालतू पोस्ट टाकल्या तर तिथले ॲडमिन्स कावतात.
सध्या फेसबुक ग्रुप्सपुरतं वापरतो, उरलेल्या फ्रेंड वगैरे स्वीकारून अन्फॉलो करतो.
फेबु
माझ्या अकाउंटवर मी काही टाकतच नाही. प्रायव्हसी इतकी स्ट्रीक्ट की माझ्याशिवाय कोणालाच पेज बघता येत नाही. मग कितीही फ्रेंड रिक्वेस्ट आल्या तरी चिंता कशाला? लोकांचे वाढदिवस कळण्यासाठी फेबु उपयुक्त आहे. तसेच चांगले ग्रुप जॉईन करण्यासाठी.
थोडक्यांत काय, स्वत:चं ठेवायचं झाकून आणि .......
माझं सध्याचं frd. वर्तन
Friend requests-बद्दल मी काही विचार केलेला नाही. पण माझं जे काही (फेबूवर) चालू असतं त्याबद्दल बोलतो.
काहीही म्हणा.., मी तिथे ‛शो’बाजी करतो. मला ते आवडतं. मला थोर लोकांना फ्रेंड request पाठवायला आवडतं. ते नुसते माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये असण्याणेच मी सुखावतो. मी मला आलेल्या friend requests उदार मनाने स्वीकारतो. काहींची निव्वळ नावे बघून त्या accept करतो. पण उर्दूत किंवा इंग्लिश वगळता इतर विदेशी भाषेतील नावं आली की मी जरा थबकतो. त्याचा त्रासही होतो. म्हणजे मी बांगलादेशातील कुणाची request accept केली तर लगेच मला सीरिया किंवा तत्सम देशातील request येणं चालू होतं. मग मला घाबरायला होतं.
मध्यंतरी बांगलादेशातील काहींची freind request accept केली तर तिथल्या एकाने परस्पर एका ग्रुपला मला add केले. एकाने त्यांच्याच भाषेतील नावाच्या कसल्या तरी ग्रुपला जॉईन व्हा म्हणून request पाठवली. माहितीत असलं काय नि नसलं काय असलं सगळं चालू असतं. त्यामुळे आता विदेशी टाळायचा प्रयत्न करतो.
अजून एका प्रकार दिसतो. तो म्हणजे sex worker किंवा call boy/girl. ह्यांच्या हमखास friend requests येऊन पडलेल्या दिसतात. त्यांचं काय करायचं ह्याचं कोडं असतं. त्यामुळे अजून तरी accept करायचं धाडस केलं नाही. पण ते तसं न दिसताही friend असल्याचा मला तरी अजून त्रास झालेला नाही.
मी आधी घरातल्या, परिवारातल्या कुठल्याही व्यक्तीची friend request accept करत नसे. आणि त्यामुळे माझा फायदाही होत असे. पण आता सरसकट सगळीकडे उदारपणे friend request accept करत जात असल्याने त्याना टाळणं माझ्या जीवावर येतं. पण त्यांचं friend असणं म्हणजे निव्वळ शोबाजी असते जी मला पटत नाही. म्हणजे थोर व्यक्ती वगळता चर्चाच घडत नाही त्या कुणाही समकालीनाशी मला तसलं नातं ठेवावंस वाटत नाही. माझ्या बाबतीत अशी सामाजिक/शैक्षणिक/वैचारिक चर्चा करतील अशी मुलं/तरुण/तरुणी सहसा आढळतच नाहीत. त्यामुळे मला थोर/ज्येष्ठ लोकांच्यात जास्त राहावंसं वाटतं. पर्यायाने कुटुंबकबिल्याला बाजूला सारायचं राह्यलं आहे. असो.
जरी मी उदारपणे friend request accept करत असलो तरी मी रिकाम्या वेळेत त्याना परत unfriend करत असतो.
तूर्त इतकंच. ह्यावर विचार केला व वेगळं सुचलं तर इथेच वेगळं लिहीन.
हल्ली फेसबुक फ्रेंड विनंत्या
हल्ली फेसबुक फ्रेंड विनंत्या वाढल्या? काय सांगता..
असं काय वेगळं झालंय? इंस्टा, ट्वीतर म्हणलं तर ठीक.
ऑर्कुट काळात असं असतं तरी ठीक, की लोकांना नावीन्य वाटत होते. पण २०२१ मध्ये फेसबुक?
असेल.. असेल म्हणतो!
आपल्या निकषां वरून उगाच शंका..ज्ञानी पॅशनेट वगैरे मनुष्य भडक भगवा असूच शकतो, ते तशी वेळ आली तरच कळेल. भगव्या शिवाय अन्य भडक रंगी लोकांस आपण आनंदाने स्वीकारता असे म्हणावे का?
माझ्यापुरते तरी केवळ वाढदिवसाची यादी आहे फेसबुक. कुणीही नवी रिक्वेस्ट पाठवत नाही, आणि मी कुणाला पाठवत नाही.. आलेले साजेशन फाट्यावर मारतो.
काही आवडीचे तांत्रिक विषय आहेत ती पाने मधेमधे जाऊन वाचतो. खरं म्हणजे हा उद्देश LinkedIn वर अधिक बरा साध्य होतो. ज्यांची फेबु प्रोफाईल उघडी आहेत किंवा पोस्ट वर कमेंट्स आहेत, त्यांचे खरे चेहरे कळायचा बरा मार्ग आहे. पण तशी गरज कधीतरी वर्ष दोन वर्षांनी पडते, तेंव्हा वेळ घालवून ते करायचं!
फेबुच्या तीनपट तरी मित्र LinkedIn वर आहेत.
(अर्थात दोहोंची तुलना नाहीच, आणि उद्देश वेगळे आणि मी एक रुक्ष इसम आहे हे मान्य.)
मिरवतोय तो!
राजेश मिरवतोय उगाच! त्याचं नाव-आडनाव बघूनच सहज समजतंय, त्याच्या आजूबाजूला फक्त भडक भगवेच असणार! बाकी रंगांचे भडक त्यांच्या-त्यांच्या नावांसारखी नावं बघून तिथे काय तो दंगा करणार! मलाही इतर रंगांचे भडक लोक त्रास द्यायला येत नाहीत. जो काय उपद्रव होतो तो भगव्यांचाच होतो.
कशाला हवेत फेसबुक फ्रेंड
फेसबुक वर फ्रेंड कशासाठी हवेत .ह्याचे उत्तर व्यक्ती नुसार, वया नुसार,वृत्ती नुसार, शिक्षणा नुसार,संस्कार नुसार प्रेतेकाचे वेगळे असते.
त्या मुळे एकच निकष सर्वांस लागू होत नाही.
1) फेस बुक स्वतःच सांगते ज्यांना तुम्ही ओळखता त्यांनाच रिक्वेस्ट पाठव त जा किंवाा त्यांच्याच फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारत जा.
२) काही फक्त स्त्रिया चेच प्रोफाइल चेक करतात आणि दिसली चांगली की पाठव रिक्वेस्ट हाच त्यांचा खाक्या असतो जणू काही fb वर स्त्रिया त्याच साठी आहेत.
३) अशा लोकांची गरज भागवण्यासाठी मग मग पुरुषच फेस बुक च्या बाजारात उतरतात आणि पुरुष असून सुद्धा स्त्री आयडी घेवून फेसबुक वावरत असतात.
आणि दोन नंबर पॉइंट मध्ये ज्यांचे वर्णन केले आहे त्यांचे मानसिक समाधान करतात ..
४)हे जरा सावध विचारी ,mature लोक असतात त्यांना बौद्धिक भूक असते .ही लोक चांगल्या बौध्दिक पोस्ट करणाऱ्या ,विज्ञान विषयी पोस्ट करणारे,विविध विषयावर छान लीहणारे ह्या लोकांना फॉलो करत असतात हे कोणाला request वैगेरे पाठवत नाहीत.
सभ्य लोक असतात .
५) ही जमात फक्त राजकीय उकळ्या पाकळ्या काढण्यासाठी एफबी वर असते.ह्यांचा आणि अक्कलेचा काडी चां संबंध नसतो.फक्त कोणत्या राजकीय पक्षाला बिनडोक पने खरे देशप्रेमी ठरवणे हाच ह्यांचा उद्दोग.
आणि आश्चर्य हे की ह्यांना देश म्हणजे काय,देशावर प्रेम करायचे म्हणजे नक्की काय करायचे.
हे पण माहीत नसते.
६) ही जमात पण वरील ५ नंबर मध्ये वर्णन केल्या प्रमाणेच बिनडोक असते. फक्त ह्यांचे क्षेत्र वेगळे असते.
धर्म
हे ह्यांचे क्षेत्र असते.
हा धर्म ह्या धर्मापेक्षा कसा थोर आहे.अमाका धर्म कसा धर्म नाही.
अमक्या तमक्या धर्माची शिकवण कशी वाईट आहे.
असल्या पोस्ट ह्यांच्या असतात.
त्यांचे म्हणणे पटवून देण्यासाठी कोणतेही बकवास प्रसंग,कुठला तरी उत्तर ह्याचा आधार घेतात.
आणि हे सर्व ह्यांचे काल्पनिक असते.
Fb वर ज्यांना ओळखत नाही त्यांना रिक्वेस्ट पाठवू नका आणि स्वीकारू पण नका.
आणि हे फक्त हीच लोक करू शकतात.
ज्यांच्या मनात स्त्रिया विषयी विकृत भावना नाहीत.
ज्यांच्या मनात धार्मिक द्वेष नाही.
ज्यांच्या कडे स्वतःची बुध्दी आहे चांगले वाईट समजायचे ती लोक आंधळे पने कोणत्याच राजकीय पक्षाची तळी उचलत नाहीत.
आणि असे बरेच प्रकारचे लोक.
माझ्या फक्त नातेवाईक आणि
माझ्या फक्त नातेवाईक आणि शाळेतल्या मैत्रिणी असतात. तोच निकष.
__________
सध्या शून्य मैत्रआहेत. सध्या फक्त ग्रुप्सची मेंबरशिप आहे.
- पक्षी
-परीकथा
-गोंदवलेकर महाराज
-फुले
बस्स. काय गोंडस पक्षी व फुले दिसतात, सुंदर सुंदर चित्रे दिसतात. गोंदवलेकर महाराजांचे सुविचार दिसतात. फार मजा येते.