विद्यार्थ्याची चाचणी परीक्षेतील उत्तर व त्यावर परीक्षकाची टिप्पणी

ज्या दिवशी कुठल्याही प्रकारची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढील वर्गात ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हापासून शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या सर्व बाबींचे सुमारीकरण होत आहे, असे म्हणता येईल. विद्यार्थीकेंद्रित व्यवस्थेत विद्यार्थ्याची नाराजी पत्करून शिक्षणक्षेत्राशी संबंधित असलेल्या शिक्षक, पर्यवेक्षक, परीक्षक आदीना जगता येत नाही, हेही तितकेच खरे. विद्यार्थ्यांनी काहीही केले तरी त्यांचे कौतुक करणे गरजेचे ठरत आहे. म्हणून तर कोविडच्या साथीचे निमित्त साधून सर्व विद्यार्थ्यांना (नव्हे परीक्षार्थ्यांना!) कुठलीही परीक्षा न देता पुढील वर्गात ढकलण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्याच्या आकलनक्षमतेविषयी व शिक्षक-शिक्षिकांच्या शिक्षित करण्याच्या क्षमतेविषयी तेरी भी चुप व मेरी भी चुप ही स्थिती निर्माण झाली आहे.
xxx
मुळात परीक्षांचा सोपस्कार असतानासुद्धा परीक्षांच्या संबधातील सर्व घटक जरा बिचकूनच वागत होते, याबद्दल शंका नसावी. यानंतरच्या काळात चाचणीच विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरविणारी असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आकलनक्षमतेची शहानिशा करू पाहणारे शिक्षक, पर्यवेक्षक, परीक्षक इत्यादी प्रमुख घटक कुठल्याही प्रकारचा धोका पत्करण्यास तयार नाहीत. म्हणून सर्व जण safe राहण्यातच धन्यता मानत आहेत. कायद्याचा बडगा केव्हा, कसा कोसळेल याचा नेम नाही. तुम्ही दिलेल्या मार्क्सवरून विद्यार्थी (व त्यांचे पालक) तुमच्यावर खटला भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिडा टळो म्हणत पैकीच्या पैकी मार्क्स देण्याकडे कल वाढत आहे. चुकीचे उत्तर बरोबर कसे यासाठी थोडीशी कसरत करावी लागते. तेवढे कष्ट घेण्याची तयारी परीक्षकांच्याकडे आहे.

अशाच एका चाचणी परीक्षेत विद्यार्थ्याला उत्तीर्ण करण्याच्या दबावामुळे परीक्षकांना कुठल्या कुठल्या दिव्यातून जावे लागते याचे एक मजेशीर उदाहरण!

भौतशास्त्र: टेबलावरील चेंडू घरंगळत कडेला आल्यानंतर चेंडू वर जाईल की खाली पडेल?
विद्यार्थ्याचे उत्तर: वर जाईल.
परीक्षकाची टिप्पणी: वर - खाली, उजवे - डावे या गोष्टी सापेक्ष असल्यामुळे सैद्धांतिकरित्या उत्तर बरोबर असू शकेल. टेबलावरील चेंडू खाली पडून टप्पा घेतलेला चेंडू वर जाताना विद्यार्थ्यानी पाहिलेले असल्यास उत्तर बरोबर असेल. विद्यार्थ्याचे डोके खाली व पाय वर या स्थितीत असताना पडणाऱ्या चेंडूचे निरीक्षण केल्यास चेंडू वर जाताना दिसेल.
निर्णय: स्वीकारार्ह

रसायनशास्त्र: या जगात सर्वात जास्त प्रमाणात कुठल्या पदार्थाचा वापर पिण्यासाठी होतो?
विद्यार्थ्याचे उत्तर: कोका कोला
परीक्षकाची टिप्पणी: विद्यार्थी हेच पेय नेहमी घेत असल्यामुळे त्याचे उत्तर प्रत्यक्ष अनुभवातून आलेले आहे. (Evidence based...) त्यामुळे तीच वस्तुस्थिती असावी. शिवाय कोकोकोलात पाण्याचे प्रमाण आहेच की.
निर्णय: स्वीकारार्ह

जीवशास्त्र: तुम्ही हाताच्या बोटाने लिहिता की पायाच्या बोटाने?
विद्यार्थ्याचे उत्तर: दोन्ही
परीक्षकाची टिप्पणी: याचे प्रत्यक्ष पुरावे प्रसार माध्यमात उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्याच्या उत्तरात चूक नसावी.
निर्णय: स्वीकारार्ह
गणित:बीजगणिताचा फायदा काय?
विद्यार्थ्याचे उत्तर: बीजगणित शेतात पेरून गणिताचे पीक घेता येईल
परीक्षकाची टिप्पणी: उत्स्फूर्तपणे दिलेल्या या उत्तरातून विद्यार्थ्याला शेतीचे ज्ञान आहे हे कळेल. त्यासाठी पूर्ण मार्क्स द्यावेत.
निर्णय: स्वीकारार्ह

इतिहास: भूतकाळ वा वर्तमानकाळातील कुठल्या व्यक्तीबद्दल आपल्याला अतीव आदर आहे?
विद्यार्थ्याचे उत्तर: वीरप्पन. तो खराखुरा फायटर होता.
परीक्षकाची टिप्पणी: हीरो म्हणून योग्य व्यक्तीची निवड केली आहे. त्याच्याकडे भरपूर काही शिकण्यासारखे होते.
निर्णय: स्वीकारार्ह

भूगोल: आपला जास्तीत जास्त वेळ कुठल्या ठिकाणी जातो?
विद्यार्थ्याचे उत्तर: मॉलमध्ये
परीक्षकाची टिप्पणी: विद्यार्थ्याच्या दृष्टीने एक अत्यंत प्रामाणिक व समर्पक उत्तर.
निर्णय: स्वीकारार्ह
yyy
साहित्य: तुमचा आवडता लेखक कोण व का?
विद्यार्थ्याचे उत्तर: माझा पाच वर्षाचा भाचा. तुम्ही आमच्या घराच्या भिंती बघाच. भिंत पूर्ण भरलेली आहे.
परीक्षकाची टिप्पणी: लेखक म्हणजे लिहिणारा या अर्थाने विद्यार्थ्याचा भाचासुद्धा लेखकच. विद्यार्थ्याने त्याच्या कला व साहित्य गुणाचे कौतुक केले आहे.
निर्णय: स्वीकारार्ह

व्याकरण: दोन शब्दाच्या वाक्याची रचना करा.
विद्यार्थ्याचे उत्तर: माहित नाही.
परीक्षकाची टिप्पणी: तांत्रिकदृष्ट्या हे वाक्य अर्धवट वाटते. फक्त त्यातील 'मला' हा शब्द गाळलेला आहे. परंतु वाक्यातून अर्थबोध होत असल्यामुळे उत्तर बरोबर आहे.
निर्णय: स्वीकारार्ह

शब्दसंग्रह: खोका म्हणजे काय?
विद्यार्थ्याचे उत्तर: एक कोटी रुपये
परीक्षकाची टिप्पणी: प्रश्न विचारताना समानार्थी उत्तराची अपेक्षा नसल्यामुळे विद्यार्थ्याने या शब्दाला नवीन अर्थ प्राप्त करून दिला आहे. व तो जनसामान्यात रूढ आहे.
निर्णय: स्वीकारार्ह

सामाजिक अभ्यास: महात्मा गांधीजी कोण होते?
विद्यार्थ्याचे उत्तर: चौकातील पुतळ्याचे ते नाव आहे.
परीक्षकाची टिप्पणी: भोवतीच्या सूक्ष्म निरीक्षणातून दिलेले हे उत्तर आहे. त्याला प्रश्न कळला आहे. म्हणून उत्तर बरोबर आहे.
निर्णय: स्वीकारार्ह

अशा प्रकारे चाचणी परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवून इंजिनियरिंगमध्ये त्याला प्रवेश मिळाला.

अजून एका "दीड शहाण्या"ने दिलेली उत्तरं अशी होती:
• कुठल्या युद्धात नॅपोलियनचा मृत्यु झाला? शेवटच्या युद्धात.
• बांगला देशाच्या स्वातंत्र्यासाठीच्या सह्या कुठल्या ठिकाणी केल्या? कागदाच्या पानाच्या शेवटी.
• रावी नदी कुठल्या State मधून वाहते? Liquid state.
• घटस्फोटासाठीचे महत्वाचे कारण कोणते? लग्न....
• नापास होण्याचे महत्वाचे कारण कोणते? परीक्षा....zzz
• अर्धा कापलेला सफरचंद कसा दिसतो? उरलेल्या अर्ध्यासारखा...
• निळ्या समुद्रात तांबडा दगड टाकल्यास काय होईल? दगड ओला होईल.
• आठ दिवस झोपेविना माणूस कसा काय राहू शकतो? त्यात काय विशेष?. तो रात्री झोपत असेल.
• आठ मजूरांना एक भिंत बांधण्यासाठी चार दिवस लागतात. तर ती भिंत बांधण्यास चार मजूरांना किती दिवस लागतील? शून्य दिवस. कारण अगोदरच ही भिंत बांधलेली असते.

याबद्दल अधिक टिप्पणीची गरज नसावी!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

धागा आवडला आहे! Lol

बीजगणिताचं पीक कसं येईल याचा अन्दाज घेतोय.
वत्सपावर '' गण्या जोमात गुरुजी कोमात'' प्रकारचे पीजे वाहत असतात त्याचा संग्रह खूप कष्ट घेऊन् केलात हे जाणवते..!
या असल्या रिकामेगिरीत आपले भारतीय टॉपला असतील असे वाटते.

बाकी गंभीरपणे या समस्येचा विचार करता परिस्ठिती भीषण आहे. जे शाळेत नाही तर कॉलेजात कुठून येणार?
'दर दहा वर्षांनी शिक्षणाचा दर्जा अर्ध्यावर येतो' असा काहीतरी नियम मूरने लिहीला असावा, पण अप्रकाशित राहिला भौतेक!

२००० ते २०१० या काळात मी सुरुवातीस् अभियांत्रिकी प्राध्यापक आणि मग परिक्षक म्हणून काम करत असे. पुणे आणि अन्य कांही विद्यापीठांत विविध कंपनीतून परिक्षक आणतात. परिक्षेला गेल्यावर् ज्या प्रकारे गोड बोलून तेथील शिक्षक गुण द्यायला दबाव आणतात, ते पाहून गेली दहा वर्षे परिक्षकगिरीस नम्र नकार देणे सुरु केले आहे. हल्ली म्हणे प्रवेश घेतला की यश पक्के असते. जरा स्मार्ट असलात की काम झाले. सत्तर टक्क्याच्या खाली गुण द्यायची पद्धत नाही.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बीजगणिताचं पीक कसं येईल याचा अन्दाज घेतोय.

बीजगणिताच्या पिकाकरिता खते बहुधा सेंद्रिय लागतील, नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला ती 'दीड शहाणी' उत्तरं फार आवडली आहेत. कधी कधी लोक इतके फडतूस प्रश्न विचारतात, अगदी नोकरीच्या मुलाखतींसाठीसुद्धा, की म्हणावंसं वाटतं, "एवढे ढ प्रश्न विचारणाऱ्या लोकांकडे मला नोकरी नाही करायची!"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.