सध्या अमेरिकेत आणि इतर काही देशांत फायझरच्या लशीचा तिसरा डोस बूस्टर म्हणून दिली जाण्याची चर्चा सुरू आहे.
एकीकडे जगातील अर्ध्या गरीब देशांतील जनता टंचाईमुळे लशीपासून वंचित आणि तिकडे अमेरिकेत तिसऱ्या बूस्टर डोसची चर्चा हा विरोधाभास!!!
यामुळे हा तिसरा डोस देण्याच्या निर्णयामागे काही शास्त्र आहे काय आणि असले तर ते नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही प्रसिद्ध इम्युनॉलॉजिस्ट शास्त्रज्ञ डॉ. विनीता बाळ यांना काही प्रश्न पाठविले.
त्यांनी या प्रश्नांची दिलेली उत्तरे आम्ही इथे देत आहोत. डॉ. विनीता बाळ यांचे पुन्हा एकदा आभार.
(प्रतिमा आंतरजालावरून साभार)
प्रश्न : सध्या अमेरिकेत आणि इतर काही देशांत फायझरच्या लशीचा तिसरा डोस बूस्टर म्हणून दिली जाण्याची मोठी शक्यता निर्माण झालेली दिसते. केवळ व्हायरसच्या 'एस' प्रथिनाविरोधी निर्मिलेल्या फायझरच्या सध्याच्या लशीच्या 'दोन डोसेस/नंतर दोन आठवड्यां'च्या प्रोटोकॉलनंतर बरीच 'ब्रेक-थ्रू' इन्फेक्शन्स दिसत आहेत.
इझ्राएलने सहा महिन्यानंतर तिसरा डोस देऊन ही इन्फेक्शन्स नव्वद टक्के कमी केली आहेत.
याचा एक अर्थ , या लशीमुळे दीर्घकाळ टिकणारी प्रतिकारक्षमता निर्माण होईल ही आशा काहीशी फोल ठरत आहे का? इतर जातीच्या लशींसाठीही सहा ते आठ महिन्यांनी तिसऱ्या डोसची गरज आहे का,असे प्रश्न सध्या आहेत.
डॉ. बाळ : होय, संपूर्ण लसीकरण झाल्यानंतरही काही लोकांना संसर्ग झाल्याचं दिसत आहे. पण सध्याची कुठलीच लस संसर्गरोधक (transmission blocking) प्रकारची नाही. त्यामुळे सातत्यानं संसर्ग झालेल्या लोकांच्या संपर्कात आल्यावर (उदा. आरोग्य सेवक) किंवा घरातही रुग्णांशी निकट संबंध आल्यामुळेही लस घेतल्यावर संसर्ग होऊ शकतो. सध्याच्या लशींचा उपयोग आजाराचं गांभीर्य आणि हॉस्पिटलवास कमी करण्यासाठी होत आहे; संपूर्णपणे संसर्ग टाळण्यासाठी नाही.
संपूर्ण जगातच डेल्टा व्हेरियंट सगळ्यात महत्त्वाचा झाला आहे. म्हणजे, ज्या ज्या देशांमध्ये पुरेसं आणि विश्वासार्ह सिक्वेन्सिंग होतंय त्यांच्याबद्दल हे खात्रीने म्हणता येईल. डेल्टाची संसर्गक्षमता मूळ वूहानच्या विषाणूपेक्षा जास्त आहे. 'सीरम' संस्थेच्या इन-व्हिट्रो चाचण्यांच्या बहुतेक निकालांनुसार लस घेतलेल्या किंवा संसर्ग-रोगानंतर बऱ्या झालेल्या लोकांत वूहान प्रकारच्या विषाणूविरोधातली प्रतिपिंडं (antibodies) आहेत; ती डेल्टाविरोधात थोडी कमी परिणामकारक आहेत. वूहान विषाणूवर बेतलेल्या लशीचा आणखी एक डोस देऊन थोडाफार फायदा झाला तरी तो काही सर्वोत्तम पर्याय ठरेलच असं नाही. डेल्टाविरोधी लशींचा अभाव असल्यामुळे, ज्या देशांना आणि लोकांना तिसरा डोस परवडत आहे, ते लोक तो घेत आहेत. इझ्रायलच्या या निर्णयात व्यक्तिकेंद्री विचार प्रबळ असल्याचे दिसते. उरलेल्या जगात अनेक लोकांना लसीचा एकही डोस मिळाला नसतांना तिसरा डोस धडधाकट माणसांनी सरसकट घेणं मला अनैतिक वाटतं.
माणसांना होणाऱ्या कोव्हिड-१९ या आजाराचा जेमतेम २१-२२ महिन्यांचा इतिहास आहे. सुरुवातीचं लसीकरण १६-१७ महिन्यांपूर्वी सुरू झालं. सुरुवातीच्या बहुतेकशा लशी व्यवस्थित काम करत आहेत. ह्या लशी घेतलेले लोक मोठ्या प्रमाणावर आजारी पडत नाहीयेत आणि ज्यांच्यातली प्रतिपिडांची मात्रा तपासली आहे त्यांच्यात कमी सापडली तरी प्रतिपिंडं सापडली आहेत. म्हणजे लशींपासून मिळणारी प्रतिकारक्षमता वर्षापेक्षा जास्त काळ टिकली आहे, आणि त्यातून चांगल्यापैकी संरक्षण मिळत आहे. आणखी काळ लोटल्यावर विषाणूशी काही संपर्क आला नाही तर प्रतिपिंडांची पातळी आणि पर्यायानं प्रतिकारक्षमता कमी होणं अपेक्षितच आहे. सार्स-कोव्ह प्रथम मानवात दिसला त्याला आता काही वर्षं झाली (२००३ मध्ये प्रथम सापडला). पूर्वी सार्स-कोव्हशी (लशीमुळे किंवा संसर्गामुळे) संपर्कात आलेल्या लोकांमध्ये सार्स-कोव्ह संसर्गाला प्रतिकार करण्यासाठी निर्माण झालेल्या टी पेशी आजही सापडल्याचे अहवाल आहेत (गेली १२+ वर्षं). आणि आता काही अहवालांनुसार सार्स-कोव्ह-२च्या संपर्कात आल्यामुळे (म्हणजेच, लशीमुळे किंवा संसर्गामुळे) माणसांच्या शरीरात निर्माण झालेल्या टी पेशी आणि प्रतिपिंडे बरेच महिने टिकल्याचे दिसून आले आहेत. यावरून निष्कर्ष काढायचा झाला तर एवढंच म्हणता येईल की लशींमुळे किंवा संसर्गामुळे तयार झालेली प्रतिकारक्षमता आणि तिची परिणामकारकता किती काळ टिकेल हे इतक्या लवकर खात्रीपूर्वकरीत्या सांगता येणार नाही.
प्रश्न : याला काही लोक आधार म्हणून 'नेचर'मधील हा लेख दाखवतात. ऐकीव माहिती अशी की (लसीकरणाच्या) सहा-आठ महिन्यांनंतर 'एस' प्रथिनविरोधी प्रतिपिंडांचे प्रमाण खूप कमी झालेले आढळले म्हणून बूस्टर डोसची गरज.
या बाबतीत प्रश्न असा :
लसीकरणानंतर प्रतिपिंडांचे प्रमाण (टायटर) कायमच उच्च पातळीला (एका विशिष्ट पातळीहून अधिक?) असणे हे नॉर्मल व आवश्यक असते का? की पुढच्या वेळी त्या अँटीजेनने शरीरात प्रवेश केल्यानंतर वेगाने प्रतिपिंड तयार होणे हे नॉर्मल व आवश्यक असते?
डॉ. बाळ : तुम्ही लिंक दिलेल्या ‘नेचर’मधल्या लेखातील बहुतेक सगळी विदा (data) प्रयोगशाळेतल्या (in vitro) संशोधनावर आधारित आहे. माणसांमध्ये प्रतिकारक्षमता येते ती प्रतिपिंडं आणि टी पेशींमार्फत. प्रयोगशाळेतल्या प्रतिपिंडावर आधारित प्राथमिक संशोधनावरून माणसांमधल्या लशींच्या परिणामकारकतेबद्दल एव्हढं खात्रीशीर भाष्य करणं योग्य नाही.
शिवाय, या पेपरात मांडलेल्या विदेनुसार पुन्हा झालेली लागण किंवा लसीकरणानंतर झालेले संसर्ग वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांचे आहेत. या लोकांचा विषाणूशी संपर्क जास्त येतो; त्यामुळे त्यांना लागण होण्याची शक्यताही जास्त असते.
लसीकरणानंतर किंवा संसर्गानंतर तयार झालेली प्रतिपिंडं काही आठवड्यात सर्वोच्च पातळीला पोहोचतात आणि नंतर कमी होऊन त्या सर्वोच्च पातळीच्या १५-२०%पर्यंत येतात. मात्र संसर्ग किंवा लशीच्या आधीच्या पातळीच्या वरच ही पातळी असते. कुठल्याही प्रकारच्या संसर्गविरोधातल्या प्रतिपिंड-प्रतिक्रिया (antibody response) अशाच प्रकारच्या असतात. बी पेशींपासून तयार होणाऱ्या प्लाझ्मा पेशी मरेस्तोवर, सातत्यानं प्रतिपिंडं स्रवत राहतात. अल्पायुषी प्लाझ्मा पेशी २-३ महिने टिकतात; आणि त्यामुळे प्रतिपिंडांची पातळी खालावते. दीर्घायुषी प्लाझ्मा पेशी आपलं काम करत राहतात. मात्र पुन्हा लशीमुळे किंवा संसर्गामुळे विषाणूशी संपर्क आला की आधीच्या संसर्गामुळे किंवा लसीकरणामुळे तयार झालेल्या स्मरणशक्तीनुसार बी पेशी नव्या प्लाझ्मा पेशी तयार करतील आणि प्रतिपिंडांची रक्तातली मात्रा वाढेल. सध्याच्या लसीकरणाच्या वेळापत्रकानुसार ज्या लोकांना संसर्गाचा फार मोठा धोका नाही अशांना गंभीर आजारापासून दणकट संरक्षण मिळेल, त्यामुळे बूस्टरची गरज आहे असं मला वाटत नाही. किमान जुन्या लशींच्या संदर्भात तर नाहीच.
प्रतिपिंडांचं रक्तातलं प्रमाण मोजणं सोपं असतं. म्हणून बरेच संशोधक, लसतज्ज्ञ, सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातले तज्ज्ञ, औषध नियामक प्रतिपिंडांचं प्रमाण नियमन म्हणून आणि मोजणीसाठी वापरतात. प्रतिपिंडं हा प्रतिकारक्षमता मोजण्याचा थेट पर्याय नाही, त्यात त्रुटी असतात हे सैद्धान्तिक पातळीवर जाणकारांनी लक्षात ठेवले पाहिजे.
प्रश्न : या निर्णयाचे काही शास्त्रीय कारण असेल का? असल्यास ते कोणते? (व्यावसायिक कारणे खूप असू शकतात)
डॉ. बाळ : लघुदृष्टी बाळगणारे, श्रीमंत देश, माणसांच्या जिवाला खूप किंमत देणारे देश मृत्युदर कमी करण्यासाठी खूप आटापिटा करत आहेत. त्यात ते WHOच्या COVAX प्रकल्पाला बाजूला सारून आपल्या देशांतल्या लोकांसाठी लशी राखून ठेवत आहेत. भारतानंही लशींची निर्यात रोखल्यामुळे गरीब देशांतल्या (LMIC) लोकांना अत्यंत थोडे डोस मिळालेले आहेत
सार्वजनिक आरोग्याचा विचार करता आजमितीला सर्वसामान्य माणसांसाठी लशीचा वाढीव डोस घेण्यासाठी समर्थन देणं मला अयोग्य वाटतं. पण शास्त्रीयदृष्ट्याही जुन्याच लशीचा वाढीव डोस घेण्यामागे कुठलंही सबळ कारण नाही. इतर काही सहव्याधी असताना, तरुण लोकांपेक्षा रोगाला बळी पडण्याची अधिक शक्यता असणाऱ्या लोकांची प्रतिपिंडं मोजून त्यांना गरज पडल्यास वाढीव डोस देता येईल. वाढीव डोसमागचं हेच एकमेव शास्त्रीय कारण मला समजतं.
प्रश्न : जगातील गरीब देशांकडे (आणि काही प्रगत देशांमध्येही, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड) लसीकरण मंद वेगात असताना तिसरा डोस अमेरिकेतच (किंवा ६०-७०% हून अधिक लोकसंख्येचे जिथे लसीकरण झालेले आहे अशा इतरही काही देशांत) दिल्याने जागतिक साथनियंत्रण कामात अडथळा येईल असे वाटते का? (उदा. हा लेख पाहा)
डॉ. बाळ : हो, धनाढ्य लोकांना सरसकट लशीचा वाढीव डोस देण्यापेक्षा जगभरातल्या लोकांचं जास्तीत जास्त लशीकरण करण्याला प्राधान्य द्यावं असं माझं मत आहे.
प्रश्न : उद्या आंतरराष्ट्रीय प्रवास मोकळा झाल्यावर पुन्हा साथ भडकण्याची शक्यता नाकारता येते का?
डॉ. बाळ : आपण आता स्वतःला जगाचे नागरिक वगैरे समजतो, निरनिराळ्या देशांतल्या लोकांशी आपला संपर्क येणं नेहमीचं झालं आहे (निदान महामारीच्या आधीच्या काळात तरी); तेव्हा जगप्रवास पुन्हा आधीसारखा सुरू झाला की पुन्हा कोव्हिड-१९ पसरण्याची भीती आहेच. लसीकरणाचा प्रसार सगळीकडे सारखा नाही, आणि जिथे लसीकरण कमी झालेलं आहे तिथे तो रोग पसरण्याची शक्यता आहेच. जगभर सगळीकडेच लसीकरण मोठ्या प्रमाणावर झालं तर महामारीच्या जागी ही फक्त प्रादेशिक साथ म्हणून राहील, आणि विषाणूसह जगणं जरा जास्त सोपं होईल.
---
('करोनाव्हायरस आणि प्रतिकारशक्ती' या विषयावरील डॉ. विनीता बाळ यांची मुलाखत इथे वाचता येईल : )