आनंदी असण्यासाठी जग बदलायलाच हवं का? - आलँ बादियु (भाग ३)

#संकल्पनाविषयक #मन्वंतर #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२१

"जिथं बदल हाच नियम आहे अशा जगाला आपण बदललं पाहिजे." - आलँ बादियु

- निवड आणि संपादन - वैभव आबनावे

- भाषांतर: हर्षवर्धन सुमंत, अनुश्का गोखले

फ्रेंच तत्त्वज्ञ आलँ बादियु यांच्या तीन लेखांचं भाषांतर

भाग ३ : आनंदी असण्यासाठी जग बदलायलाच हवं का?

प्रस्तुत संहिता आलँ बादियु लिखित, ए. जे. बार्टलेट आणि जस्टीन क्लेमो यांनी इंग्रजीत भाषांतर केलेल्या Happiness (London: Bloomsbury Academic, 2019) या पुस्तकातील 'To be happy, Must We Change the World?' ह्या प्रकरणाचे मराठी भाषांतर आहे.

(भाग १ आणि भाग २)

ज्ञानाच्या एका अतिप्राचीन, महान परंपरेत असं म्हणलंय की मानवानं वास्तवाला आपल्या इच्छांशी जुळवून घेण्याऐवजी, आपल्या इच्छा वास्तवाशी जुळवून घ्याव्यात. ह्या दृष्टीनुसार वास्तव हे एखाद्या विधिलिखितासारखं असतं, आणि मानवता प्राप्त करू शकेल असा सर्वोच्च आनंद1 हा, जे अपरिहार्य असतं त्याच्या प्रसन्न स्वीकारामध्ये सामावलेला असतो. आजही, ह्या अविरतपणे प्रचलित 'ज्ञानाला' स्टॉईक (stoic) दर्शन2 एक निश्चित रूप प्रदान करतं; ज्यात असा युक्तिवाद केला जातो की पश्चिमेकडील विशेषाधिकारप्राप्त नागरिकांना भांडवलशाही आणि तिची 'लोकशाही' जे छोटे-छोटे कौटुंबिक आनंद – उपभोग्य वस्तू, संपर्कयंत्रणा, पर्यटन – बहाल करते, त्यांची तीव्रता भलेही असामान्य नसेल, तरीही, ते सोडून इतर कशाची – उदाहरणार्थ कम्युनिझमची3 – इच्छा धरण्यानं मात्र निश्चितपणे सत्यानाश होईल. या प्रचारानुसार 'वास्तव' – मूलतः आर्थिक वास्तव – खाजगी मालमत्ता, भांडवलाची साठवण हीच 'नियती' असल्याचं आपल्यावर लादलं जातं; ज्याला आपण आपल्या इच्छा समर्पित करायलाच हव्यात.

फ्रेंच राज्यक्रांतीच्या ऐन भरात सँ ज्यूस्त लिहितो की 'आनंद ही युरोपामध्ये एक नवी कल्पना (idea) आहे'4. तेव्हा तो गोष्टींकडे बघण्याच्या एका पूर्णतः वेगळ्या दृष्टीला मानव5 असं नाव देतो. क्रांतीनं जुनं जग संपूर्णपणे उलथवून सदाचार (ज्याच्या विरुद्ध लाचखोरी, धनिकांचे अबाधित सत्तास्रोत असतात) आणि आनंद ह्यांच्यात एक अनिवार्य दुवा प्रस्थापित केला पाहिजे. म्हणजेच, जगाचा संपूर्ण बदल, प्राचीन गुलामगिरीपासून ते साम्राज्यवादी भांडवलशाहीपर्यंत सतत वर्चस्व गाजवत आलेल्या अत्यल्पलोकसत्तेच्या (oligarchy) विविध प्रारूपांच्या जोखडातून अवघ्या मानवतेची मुक्ती, ही खऱ्या आनंदाची पूर्वअट आहे आणि ही सर्वांना उपलब्ध असलेली एक जिवंत शक्यता आहे.

संपूर्ण एकोणिसाव्या शतकात आणि विसाव्या शतकाच्या काही भागात जागतिक स्तरावर, 'आनंदी असणं म्हणजे जग बदलणं' असा अर्थ प्रचलित होता. या थोपवता येऊ न शकणाऱ्या क्रांतिकारी प्रवाहामध्ये निकराचा प्रश्न हा होता की जग कसं बदलावं?

हा काही सोपा प्रश्न नाही हे लगेच लक्षात येतं, कारण या प्रश्नात अतिशय कठीण असे तीन शब्द आहेत : 'जग' हे नाम, 'बदलणं' हे क्रियापद आणि प्रश्नार्थक क्रियाविशेषण 'कसं'. थोडक्यात, सुरुवातीपासून एका अतिशय अवघड वाक्यरचनेशी आपला सामना होत आहे.

आपण 'जग' या नामापासून सुरुवात करूया. जग म्हणजे नक्की काय, किंवा आपण नेहमी म्हणतो तसं 'आपलं जग', आपलं समकालीन जग म्हणजे काय? आपल्याला जग म्हणजे काय अभिप्रेत आहे हे जर आपण लगेच स्पष्ट केलं नाही, तर या लेखाच्या शीर्षकात विचारलेला प्रश्न आपली स्पष्टता गमावून बसेल.

एक समकालीन उदाहरण घेऊया, २०१२मधील प्रसिद्ध चळवळ, ज्यात अमेरिकेतील एकूण तरुणांपैकी एका छोट्या भागाने एक उठाव केला, जिला त्यांनी 'Occupy Wall Street' असं नाव दिलं. ही चळवळ किंवा हा उठाव ज्याला बदलू पाहात होतं ते जग कोणतं आहे? ते वॉल स्ट्रीट नामक आर्थिक भांडवलशाहीचं प्रतीक आहे का? निदर्शनकर्त्यांनी घोषणा दिल्या, 'आम्ही जगाच्या ९९% लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतो, वॉल स्ट्रीट मात्र केवळ १% लोकसंख्येचं'. याचा असा अर्थ होतो का, की ज्या जगाच्या विरोधात ते निदर्शन करत होते ते जग – निव्वळ अर्थकारणाच्या पलीकडचं – लोकशाहीचं राजकीय ढोंग होतं का, ज्यामध्ये सत्ताधारी आणि श्रीमंत लोकांचा एक छोटा समूह केवळ स्वतःच्या स्वार्थी आकांक्षांसाठी इतर लाखो-करोडो लोकांना नियंत्रित करत होता? का त्यांचा युक्तिवाद असा होता की, ज्या लोकशाहीमध्ये १% जनसमुदाय हा पश्चिमी जगापासून मैलो दूर असणाऱ्या म्हणजे आशियाई, आफ्रिकी देशांमधील लाखो करोडो लोकांवर दुर्दशा लादत आहे, अशा लोकशाहीच्या अंतावर सामूहिक आनंद अवलंबून आहे? अर्थात, आपण इथं असंही म्हणू शकतो की तत्त्वतः या निदर्शनकर्त्यांमध्ये मध्यमवर्गीय तरुण मुलं आणि मुली होत्या. बहुधा असंही म्हणता येईल की ते त्यांच्या दयनीय, डळमळीत (precarious) आयुष्याच्या, ज्याला स्पष्ट आणि उज्ज्वल भवितव्य नाही अशा आयुष्याच्या विरोधात निदर्शन करत होते, जे आयुष्य आज पश्चिमेकडील बहुतांश तरुणांच्या वाट्याला आलं आहे. असं असेल तर, त्यांचा प्रश्न जग 'बदलणं' हा नसून, आपल्या सामूहिक अस्तित्वातील खोट्या आणि दुःखद गोष्टींची, काही दिवसांसाठी किंवा आठवड्यांसाठी, सक्रियपणे केवळ ग्वाही देणं हा होता. आणि परिणामांकडे पाहता शेवटी असं म्हणता येईल की या हताश मनःस्थितीच्या मुळाशी वास्तविक जगाचं स्पष्ट चित्र नसावं, किंवा आनंदाच्या मुक्तीकडे नेणारी त्या जगाच्या बदलाची तत्त्वं नसावीत, आनंद नावाची नवी कल्पना नसावी . वास्तविक पाहता, जे होतं आणि जे अस्तित्वात यायला हवं होतं ते जग चळवळीच्या क्षणिक सुखाच्या चादरीनं झाकलं गेलं.

याचं कारण 'जग' हे नाम अजिबातच सोपं नाही. नेमक्या कुठल्या पातळीवर आपण जगाविषयी बोलायला सुरुवात करू शकतो? हे अगदी स्पष्ट आहे की जग समजून घेण्यासाठी आपल्याला साधारणतेच्या (generality) किंवा अस्तित्वाच्या विभिन्न पातळ्यांची व्याख्या करावीच लागेल. मी पाच पातळ्यांमध्ये फरक करू इच्छितो.

प्रथमतः, आपलं प्रतिमांचं (representation), भावावेगांचं, मतांचं, स्मृतींचं एक आंतरिक जग असतं : शरीर आणि मनासह व्यक्तींचं जग. दुसरं म्हणजे, आपण सामूहिक जगांची व्याख्या बंदिस्त गटांच्या स्वरूपात करू शकतो : ते गट म्हणजे माझं कुटुंब, माझा व्यवसाय, माझी भाषा, माझा धर्म, माझी संस्कृती किंवा माझा देश. ही विश्वं स्थिर ओळखींवर आधारित असतात. तसंच आपण असं मानू शकतो की मानवतेचा जागतिक इतिहासदेखील एक जग आहे. हे जग म्हणजे एक बंदिस्त गट किंवा एक ठरावीक ओळख नाही, तर अनेकविध आणि महत्त्वपूर्ण भेदांना सामावून घेणारी ती एक खुली प्रक्रिया आहे. तसंच आपल्याला आपला नैसर्गिक संदर्भदेखील लक्षात घ्यायला हवा, जिथं आपण निसर्गाचा भाग असण्याच्या नात्यानं दगड, माती, वनस्पती, प्राणी, महासागर ह्यांसोबत बरोबरीचे वाटेकरी आहोत. हे जग म्हणजे आपला छोटा पृथ्वीनामक ग्रह. आणि शेवटी, पाचव्या पातळीवर असतात अंतराळ, त्यातील तारे, विविध आकाशगंगा आणि कृष्णविवरं ... थोडक्यात, आपल्याकडे, व्यक्तींचं जग म्हणजे मानसशास्त्राचं जग; बंदिस्त गटांचं जग म्हणजे समाजशास्त्राचं जग; खुल्या प्रक्रियेचं जग म्हणजेच मानवतेच्या अस्तित्वाचं किंवा इतिहासाचं जग; आपलं नैसर्गिक जग, जीवशास्त्राचं आणि पर्यावरणशास्त्राचं; आणि शेवटी, विश्व, भौतिकशास्त्राचं आणि विश्वउत्पत्तीशास्त्राचं (cosmology) जग.

आता आपण दुसऱ्या अडचणीकडे वळू, ती म्हणजे 'बदलणं' हे क्रियापद. हे तर उघड आहे की आपली जग बदलण्याची क्षमता किंवा कुवत ही आपण जगाची व्याख्या कुठल्या पातळीवर करतो ह्यावर अवलंबून आहे. जर माझं लग्न झालेलं असेल आणि मी दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात पडलो तर ते पुढं जाऊन पहिल्या दोन पातळ्यांवरच्या जगांत होणारा अत्यंत महत्त्वपूर्ण बदल निश्चित करेल : एक माझ्या प्रतिमांचं, भावावेगांचं वैयक्तिक जग आणि दुसरं माझं बंदिस्त कौटुंबिक जग. आणि अर्थातच, ह्याचा माझ्या वैयक्तिक आनंदाच्या प्रतिमेवर नक्कीच परिणाम होतो. दुसऱ्या पातळीवर विविध प्रकारचे बदल असतात : क्रांती, समाजसुधारणा,यादवी युद्धं, नवीन राष्ट्राची निर्मिती, एखाद्या भाषेचं अस्तित्व नष्ट होणं, वसाहतवाद किंवा ज्याला नित्शे 'देवाचा मृत्यू' म्हणतो तो. ह्यातील प्रत्येक बदल आनंद आणि दुःख ह्यांच्यातील नव्या द्वंद्वात्मक नात्याची ओळख पटवून देतो.

तिसऱ्या पातळीवर, म्हणजेच इतिहासाच्या पातळीवर, प्रगतीच्या अनेक विरोधाभासी संकल्पना असतात, एका बाजूला आंतरराष्ट्रीयवाद, किंवा कम्युनिझम, आणि दुसऱ्या बाजूला इतिहासाचा अंत म्हणून भांडवलशाही, वैश्विक ध्येय म्हणून लोकशाही, आणि या सर्व प्रतिष्ठित नावांमागे वस्तुनिष्ठ साम्राज्यवाद आणि व्यक्तिनिष्ठ उच्छेदवाद (nihilism). मी आधी म्हणल्याप्रमाणं, आनंदाचं तत्त्वज्ञान मांडण्यासाठीच्या ह्या संभाव्य चौकटी आहेत, मग त्या स्टॉईक (stoic) आणि निष्क्रिय (resigned) असोत, किंवा क्रांतिकारी आणि लढाऊ असोत.

चौथ्या पातळीवर सद्यकालीन व्यामिश्र पर्यावरणीय समस्या, हवामानबदल आणि आपल्या ग्रहाच्या भवितव्याशी निगडित वादविवाद असतात. इथं मानवजातीच्या आनंदाच्या सहस्राब्दी संकल्पनेसाठीचा (millenarian conception) एक स्रोत आहे.

पाचव्या पातळीवर आपण फार काही करू शकत नाही. आपण या अंतराळ-विश्वाचा एक सूक्ष्म भाग, एक क्षुल्लक अंश आहोत. पण आपण आपल्या दयनीय ग्रहापलीकडे सजीव अस्तित्वाची चिन्हं शोधत असतो, आणि अशी आशा करत असतो की कदाचित एक दिवस परमानंदाच्या (Beatitude) नव्या रूपांशी आपली गाठ पडेल.

या सगळ्यात 'बदलणं' या क्रियापदाचं काय महत्त्व आहे? खरं तर मला असं वाटतं की आपण केलेल्या व्याख्या आणि फरक इतके धूसर आहेत, की ते 'जग बदलणं' या वाक्प्रयोगाचा स्पष्ट अर्थ पुरवण्याकरता अपुरे आहेत. शेवटी, जग बदलतं तेव्हा ते एक समग्रता (totality) म्हणून बदलू शकतं हे खरं नाही. जग ह्या नामाच्या अर्थनिर्णयनाच्या वेगवेगळ्या पातळ्यांशी असलेल्या संबंधानुसार गोष्टी कशा बदलतात हे पाहावं लागेल. एक व्यक्ती स्वतःचं आयुष्य बदलू शकते, परंतु तिच्या व्यक्तिसापेक्ष जगाचे काही भाग होते तसेच राहतात, जसं शरीराची ठरावीक गुणवैशिष्ट्यं किंवा काही मानसिक संरचना, ज्या बाल्यावस्थेतल्या अनुभवांवर निर्धारित असतात. आपण आपल्या बंदिस्त गटांच्या मर्यादांमधून निसटू शकतो परंतु आपण आपल्या उत्पत्तीवरून, भाषेवरून आणि राष्ट्रीयत्वाच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीवरून ज्या प्रकारे निर्धारित होतो, त्याला आपण टाळू शकत नाही. हेच खुल्या इतिहासातील आपल्या कृतींना किंवा नैसर्गिक पर्यावरणात फेरफार करण्याच्या किंवा त्याच्या संवर्धनाच्या आपल्या प्रयत्नांनाही लागू होतं.

या सर्व चरित्रनिष्ठ किंवा इतिहासनिष्ठ परिस्थितींमध्ये, एका ठरावीक जगात होणाऱ्या स्थानिक बदलाच्या शक्यतांचं निरीक्षण करणं शक्य असतं. तसेच, या स्थानिक बदलाचे असे काही परिणाम असू शकतात – कधी कधी दूरगामी परिणाम – जे आनंदाच्या प्रतिमांची आणि त्याच प्रमाणात अ-प्रतिम वास्तवाची6 (Real) पुनर्रचना करतात. एखादा बदल कधीच 'जग बदलणं' ह्या स्पष्ट स्वरूपात अवतरत नाही. तो बदल लहान की मोठा ह्याचं अनुमान या जगाला सापेक्ष असतं, आणि मागे वळून त्याचे परिणाम पाहिल्यानंतरच ते करता येतं.

ऑक्टोबर १९१७ मध्ये रशियात झालेल्या बोल्शेविक क्रांतीचं प्रसिद्ध उदाहरण घ्या. जॉन रीड ह्या महान अमेरिकन पत्रकारानं ह्या क्रांतीचा वृत्तांत लिहिला, त्याला त्यानं 'जगाला हादरवणारे दहा दिवस' ('Ten Days that shook the World') हे शीर्षक दिलं. परंतु हे काय जग आहे? मार्क्स आणि लेनिन यांनी जशी कल्पना केली होती तसा हा नक्कीच भांडवलशाही जगाचा पूर्ण बदल नव्हता (लेनिनला पटलं होतं की, रशियन क्रांती ही एका जागतिक प्रक्रियेची केवळ सुरुवात आहे, ज्याचा दुसरा टप्पा जर्मनीतील क्रांती असेल). तरीही या स्थानिक घटनेचे दूरगामी परिणाम झाले होते. ही क्रांती क्रांतिकारी कार्यकर्त्यांसाठी एक परिमाण होतं आणि ती 'विसाव्या शतकातील जगाच्या' एका निर्णायक भागाचं – सोविएत यूनियनपासून कम्युनिस्ट चीनपर्यंत, विएतनामचं युद्ध आणि क्युबामार्गे – प्रतिनिधित्व करत होती. परंतु याच शतकाच्या उत्तरार्धात आपल्याला १९१७ च्या बोल्शेविक क्रांतीच्या पार्श्वभूमीवर रचण्यात आलेल्या सर्व 'समाजवादी राज्यसंस्था' ढासळताना दिसतात. म्हणूनच आपल्याला आता जॉन रीड ह्यांच्या पुस्तकाच्या शीर्षकाचं आकलन होऊ शकतं. निश्चितच, जगाचा एक भाग रशियन क्रांतीनं हादरून गेला आहे. नक्कीच, तिच्या दूरगामी परिणामांमुळे ती खऱ्या आणि महत्त्वपूर्ण बदलाची घटना म्हणून पात्र ठरते. परंतु अंतिमतः आजही आपल्या जगावर ही घटना घडण्यापूर्वी होतं तसंच जागतिक भांडवलशाहीचं वर्चस्व आहे. आपण मग असा निष्कर्ष काढू शकतो की विसाव्या शतकातील अत्यंत महत्त्वाच्या राजकीय बदलानं 'जग बदललं' नाही.

ह्याचा परिणाम म्हणून, आणि 'कसं' हे क्रियाविशेषण समजून घेण्यासाठी, मी 'जग बदलणं' या कल्पनेच्या जागी एकमेकांशी संबंधित तीन संज्ञांचा, तीन संकल्पनांचा प्रस्ताव मांडतो, तो म्हणजे : घटना (event), अ-प्रतिम वास्तव आणि परिणाम. आणि मी आता आनंदाच्या सार्वत्रिक (generic) प्रश्नाची तत्त्वज्ञानात्मक संज्ञा शक्य तितकी स्पष्ट समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो.

'घटना' हे जगात स्थानिक पातळीवर उत्पन्न होणाऱ्या गोष्टीचं नाव असतं, आणि त्याचा तर्क हा त्याच जगाच्या नियमांच्या आधारे लावता येत नाही. ही घटना म्हणजे स्थानिक जगाच्या सामान्य घडण्यामधील एक खंड असतो. आपल्याला हे ठाऊक आहे की सामान्यतः जगाचे नियम हे एकाच प्रक्रियेची एका प्रकारे पुनरावृत्ती करत असतात. उदाहरणार्थ, पैशाची गुंतवणूक, तिचं मालामध्ये होणारं परिवर्तन आणि त्याची परत पैशात होणारी वापसी – या चक्राची जी पुनरावृत्ती भांडवलशाही जगात होते, तिच्या संपूर्ण स्पष्टीकरणाचा प्रस्ताव मार्क्स मांडतो. किंवा वेतन, किंमत आणि नफा यांच्यात जे पुनरावर्ती नातं असतं त्याच्याही संपूर्ण स्पष्टीकरणाचा प्रस्ताव मार्क्स मांडतो. ढोबळमानानं, भांडवलाच्या जागतिक प्रक्रियेचं चित्रण मार्क्स उत्पादन आणि अभिसरण ह्यातील नात्याच्या रूपात करतो. त्याचवेळी, चक्रीय संकटं ही भांडवलशाहीच्या घडण्यामधील खंड नसून तिच्या विकासातील तर्कसंगत भाग कशी असतात याच्याही स्पष्टीकरणाचा प्रस्ताव मार्क्स मांडतो. म्हणूनच, घटना ही कुठल्याही रूढ अर्थानी संकट नसते. उदाहरणार्थ, युरोपातील सध्याची आर्थिक आपत्ती ही घटना नाही : ती जागतिक भांडवलवादी जगाचा रचनात्मक भाग आहे. घटना ही भांडवलवादी जगात स्थानिक पातळीवर घडणारी असते, पण केवळ भांडवलाच्या चक्रीय युक्तिवादाचा वापर करून आपण तिला पूर्णपणे समजून घेऊ शकत नाही, कारण त्या युक्तिवादात संरचनात्मक संकटांचे नियम समाविष्ट असतात.

एखाद्या घटनेचा जोर त्या जगात लपलेल्या किंवा अदृश्य अशा काही गोष्टींना उघडं पाडण्यात असतो, कारण जगातील नियमांनी त्या गोष्टी झाकलेल्या असतात. घटना म्हणजे जगाच्या एका भागाचं प्रकटीकरण असतं, ज्याचं अस्तित्व त्या पूर्वी केवळ नकारात्मक निर्बंधाच्या स्वरूपात असतं. ह्या प्रकटीकरणाचा आणि आनंदाच्या प्रश्नाचा परस्परसंबंध स्पष्ट आहे : ते निर्बंध हटवले जाण्यामुळे, लगेचच, आतापर्यंत ह्या निर्बंधाला स्पष्टपणे न ओळखता जे तग धरून राहिले होते अशा लोकांसाठी आता विचार आणि कृतींच्या नवीन शक्यता प्रकट होतात. म्हणून आनंदाची अशी एक व्याख्या होऊ शकते : आपण अजाणतेपणे बाळगून असलेल्या क्षमता स्वतःमध्ये सक्रिय क्षमता म्हणून असल्याचा शोध लावणं.

मी दोन उदाहरणं देतो –

मे १९६८ ही फ्रान्समध्ये खरी घटना का होती? आणि एका निराशेला ओलांडून, जिला आपण सोयीनं क्रांतीचं 'अपयश' म्हणतो त्यालाही ओलांडून, या घटनेनं तिच्या कार्यकर्त्यांमध्ये – किमान १९८०च्या भ्रष्टाचारानं ज्यांची जिवंत मढी (zombie) झाली नाहीत अशा कार्यकर्त्यांमध्ये – त्या घटनेच्या अस्तित्वाची स्मृती, एका तीव्र, रूप-परिवर्तित, पूर्णपणे आनंदी क्षणाची स्मृती – मग ती चिंताग्रस्त करणारी का असेना – मागे का सोडली? याचं कारण असं : '१९६०च्या दशकातील फ्रान्स' या जगात एकाच वेळी घडलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रचंड उठावानं आणि त्यापूर्वी कधीही न पुकारलेल्या कारखाना-कामगारांच्या सार्वत्रिक संपानं हे दाखवून दिलं की तरुण अभ्यासकांमधील आणि तरुण कामगारांमधील काटेकोर विभाजन हा जगाचा नियम म्हणून ह्या घटनेपायी कालबाह्य झालेला आहे. ह्या घटनेनं उघड केलं की ह्या नियमाऐवजी त्याच्या विरोधार्थी नियम त्याच्या जागी ठेवला जाऊ शकतो – आणि अखेरीस ठेवावाच लागला – तो म्हणजे : तरुण अभ्यासक आणि कामगारांच्या थेट ऐक्यातून तयार झालेला नवा राजकीय प्रवाह. फ्रेंच कम्युनिस्ट पक्ष ह्या प्रकरणात सकारात्मक कर्त्याच्या भूमिकेत नव्हता, तर या आंदोलनानं त्याला आपला निशाणा केला होता; आणि ह्यामागचं कारण म्हणजे पक्षाचं संघटन विभाजनाच्या ह्या नियमानुसार झालेलं होतं : अभ्यासकांच्या आणि कामगारांच्या गटांना एकमेकांशी कुठलाही थेट संबंध ठेवण्याला सक्त मनाई होती. म्हणूनच तो पक्षही जुन्या जगाचाच एक भाग होता. नव्या जगाचं अ-प्रतिम वास्तव जे जुन्या जगाच्या चौकटीतल्या घटनेमुळं प्रकट होतं, ते म्हणजे राजकीय ऐक्याचं रूप शक्य आहे – ज्याला जुन्या जगाच्या सर्व घटकांनी निषिद्ध मानलं होतं –, ह्या शक्यतेला दिलेला तो होकार आहे. आणि अशा ऐक्याकडे नेणारा मार्ग समाजामध्ये घडवणं सहज शक्य आहे, सामाजिक अडथळे ओलांडणं शक्य आहे, अशा एका राजकारणाशी समतल होणं शक्य आहे ज्याचा शोध ते प्रत्यक्ष कृतीत आणतानाच लावला जातोय, ह्या शक्यता दिसणं म्हणजे वैयक्तिक प्रदीपनाचा अभूतपूर्व स्त्रोत होता.

एखाद्या घटनेतल्या खऱ्या शक्तीचं आणखी एक उदाहरण म्हणजे इजिप्तमधील प्रसिद्ध ताहरीर चौकात 'अरब स्प्रिंग'च्या काळात झालेलं आंदोलन. ख्रिस्ती आणि मुसलमान लोकांचं नातं तटस्थ असतं किंवा शत्रुत्वाचं असतं हा सांप्रदायिक नियम म्हणून 'इजिप्त'च्या राष्ट्रीय जगामध्ये सर्वमान्य होता. परंतु ताहरीर चौकातील लोकप्रिय ठिय्या-जनआंदोलनादरम्यान हे पाहायला मिळालं की ह्या दोन समुदायांमधील घट्ट ऐक्य हा ह्या जगाचा एक नवा नियम म्हणून शक्य आहे. उदाहरणार्थ, ख्रिस्ती लोकांनी मुसलमानांचं त्यांच्या प्रार्थनेदरम्यान रक्षण केलं, आणि सामान्यतः, ह्या दोन्ही समुदायांच्या राजकीय घोषणा सारख्याच होत्या. आणि पुन्हा, त्या आंदोलनाचा ऐतिहासिक प्रवास जरी एका दुष्टचक्रात अडकलेला असला तरी – कारण पेटी बूर्ज्वा आणि इस्लामवादी लोकांमध्ये पडलेल्या फुटीचा अंत लष्कर पुन्हा सत्तेत येण्यात झाला – तरी त्या ऐक्याच्या काळाचे वैयक्तिक अंश उरले आहेत, जे अपरिहार्यपणे भविष्याला उजळून टाकतील.

या दोन्ही उदाहरणांमध्ये घटनेनं प्रकाशात आणलेलं नवं अ-प्रतिम वास्तव पूर्वापार चालत आलेल्या भेदांच्या पलीकडे जाणाऱ्या एका नवीन ऐक्याचं रूप घेतं. परंतु हे भेद त्या जगात त्या जगाचेच नियम म्हणून प्रस्थापित केले होते. आणि हे नियम, कुठल्याही नियमांप्रमाणे, काय शक्य आहे आणि काय अशक्य आहे हे ठरवतात. उदाहरणार्थ, अभ्यासक आणि सामान्य कामगारांना दैनंदिन जीवनात तसेच सामूहिक कृतीत किंवा विचारांमध्येही एकमेकांपासून विलग केलं पाहिजे. पण मे १९६८ने ह्या दोन गटांमधील विचाराच्या, कृतीच्या आणि संघटनेच्या पातळीवरील थेट ऐक्याच्या राजकीय शक्यतेचा मार्ग खुला केला. हेच इजिप्तमधील ख्रिस्ती आणि मुसलमान लोकांमधील नात्यालादेखील लागू होतं.

ह्यामुळे मला एक महत्त्वाचं निरीक्षण करणं शक्य होतं : अशा घटनेच्या जोरामुळं जगातल्या अनेक लोकांना हा शोध लागला की जगाचं अ-प्रतिम वास्तव ज्यात स्थित केलं जाऊ शकतं, ते त्या जगातल्या वर्चस्वी दृष्टिकोनातून पाहिल्यास निव्वळ अशक्य असतं. 'वास्तववादी व्हा : अशक्याची मागणी करा'7 ह्या मे १९६८च्या घोषणेतील प्रगल्भ अर्थ आपल्यासमोर इथं उभा ठाकतो आणि आपण लाकाँची काहीशी गूढ वाक्यरचना, 'अ-प्रतिम वास्तव (Real) अशक्य असते', पूर्णतः समजू शकतो8.

हे नवं अनुमोदन, म्हणजेच एक प्रचंड मोठा 'होकार', जो घटनेच्या दबावाखाली जगाचं अ-प्रतिम वास्तव घोषित करतो, ते नेहमीच एका शक्यतेचं आश्वासन असतं की जे पूर्वी अशक्य होतं ते आता शक्य आहे. आणि म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की आनंद कायमच अशक्याचा उपभोग (jouissance) असतो9.

मी ज्याला 'घटनेचे परिणाम' म्हणतो ती जगातील एक मूर्त प्रक्रिया आहे, जी अशा शक्यतेला वेगवेगळी रूपं देते, जी त्यापूर्वी अशक्यप्राय होती. आणि जी आनंदाचं कार्यकारी बळदेखील दर्शवते. यालाच मी घटनेशी असलेली विचारनिष्ठता (fidelity)10 असं म्हणतो : किंवा सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, ज्याची अशक्यता हा जगाचा नियम होता, त्या नवीन आणि मूलगामी शक्यतेला मान्य करणाऱ्या कृती, नवनिर्मिती, संघटना आणि विचार. तेव्हा आपण असं म्हणू शकतो की खरा आनंद म्हणजे विचारनिष्ठता होय.

निष्ठावान असणं म्हणजे घटनेच्या परिणामांना मान्य करत बदलाचा पाईक (subject)11 होणं होय. आपण असंही म्हणू शकतो की नावीन्य नेहमीच एका नवीन पाईकाच्या रूपात येतं. जुन्या जगानं जिच्यावर प्रतिबंध घातला आहे अशा शक्यतेचं, एका नव्या अ-प्रतिम वास्तवरूपानं जगात होणारं प्रकटीकरण हा या पाईकाचा नियम असतो. आपण असं म्हणूया : आनंद म्हणजे, एका व्यक्तीत होणारं पाईकाचं आगमन आणि व्यक्तीला आपण पाईक बनू शकतो ह्याचा शोध लागणं.

जेव्हा एखाद्या घटनेचे परिणाम सहन करू शकतील अशा संघटना, संस्था (stabilizations) आणि रचनांचा लोक स्वतःच भाग होतात, तेव्हा नवा पाईक अस्तित्वात येतो. तर दुसऱ्या बाजूला पाईक पूर्णपणे जगाच्या नियमांनी बद्ध नसतो कारण हे परिणाम त्या घटनेचेच असतात, आणि ती घटना म्हणजे जगाच्या सामान्य व्यवहारात होणारा एक खंड असतो. म्हणूनच नवा पाईक एकाचवेळी जुन्या जगाच्या आत आणि बाहेर असतो. आपण असंही म्हणू शकतो की तो जगात उपस्थित असतो, परंतु एका अपवादाच्या स्वरूपात. त्यामुळं, आपल्याला असे म्हणता येईल की आनंद म्हणजे पाईकाचा अंतःस्थ अपवाद असण्याचा भाव होय.

या नव्या पाईकाचे, ज्याला आपण आनंदाचा पाईक असंही म्हणू शकतो, तीन मूलभूत पैलू आपण नोंदवू शकतो.

प्रथमतः, या पाईकाचं स्वातंत्र्य या जगात काहीतरी निर्माण करण्यात असतं, परंतु ही निर्मिती एका अपवादाची असते. घटनेतून प्रकट झालेलं अ-प्रतिम वास्तव ह्या जगाच्या नकारात्मक मर्यादांच्या विरोधात आहे, या वस्तुस्थितीचे परिणाम या प्रकारची निर्मिती मान्य करते. म्हणूनच या पाईकासाठी स्वातंत्र्याचं मूलतत्त्व वाट्टेल ते करणं हे नसतं. किंबहुना, 'आपल्याला काय करावंसं वाटतं' हेच मुळात आपण स्वतःला ह्या जगाशी, ते जसं आहे त्यानुसार, जुळवून घेण्याचा भाग असतं. जर हे जग आपल्या मनाला येईल ते करण्याकरता साधनं पुरवत असेल, तर ते खचितच या कारणापोटी, की हे जग जसं आहे त्या स्वरूपात असलेले त्याचे नियम आपण पाळतो . खऱ्या निर्मितीच्या बाबतीत आपल्याला आपल्या निर्मितीचे निदान काही नियम तरी किंवा कधीकधी सगळीच साधनं निर्माण करावी लागतात. खरं स्वातंत्र्य म्हणजे नेहमीच अ-प्रतिम वास्तवानं जगात ज्या गोष्टी असामान्य परिणामांच्या स्वरूपात निर्धारित केलेल्या असतात, त्यांना कृतीत आणण्याची एक पद्धत असते. परिणामतः, स्वातंत्र्याचा खरा अर्क, खऱ्या आनंदाची मुख्य अट असते शिस्त. आपण नमुन्यादाखल इथं कलेतील निर्मितीकडे बघू शकतो. हे तर सगळ्यांना ठाऊकच आहे की कलाकार हा नवनिर्मितीची कडक शिस्त पाळतो. तो अ-प्रतिम वास्तव नव्यानं दर्शवणारी रूपं साधण्याकरता किंवा मिळवण्याकरता दिवसेंदिवस आणि चिकाटीनं प्रचंड कष्ट करतो. हे वैज्ञानिक नवनिर्मितीलादेखील लागू होतं. व्यापक अर्थानं, शिस्त आणि स्वातंत्र्य ह्यांना एकमेकांपासून जिथं वेगळं करता येऊ शकत नाही अशा बिंदूपाशी पाईक अस्तित्वात असतो, हे आपण लक्षात घ्यायला हवं . पराकोटीचा आनंद अशा बिंदूचा निदर्शक असतो, ज्याचा पुरावा विशेषतः काव्यात्मक अभिव्यक्तीमध्ये दिसून येतो. भाषेतील स्वातंत्र्य आणि रूपविषयक कडक शिस्त अशा अभिव्यक्तीत अविभाज्य असतात.

दुसरा पैलू म्हणजे, पाईकाला अस्मितेनं सीमित करता येऊ शकत नाही. मुक्तीची प्रक्रिया एक अंतःस्थ अपवाद असल्याकारणाने खुली आणि अमर्याद असते कारण पाईकाचं काम काही अंशी जगाच्या प्रतिबंधात्मक मर्यादांच्या बाहेर असल्यामुळं, ते नेहमीच सार्वत्रिक असतं, त्याला कुठल्याही अस्मितेच्या नियमांपुरतं सीमित करता येत नाही. ह्यामुळंच एखादी कलाकृती, वैज्ञानिक शोध, राजकीय क्रांती, खरं प्रेम संपूर्ण मानवतेला आकर्षित करू शकतात. म्हणूनच मार्क्सच्या दृष्टीनं, ज्यांच्याकडे काहीही नसतं आणि ज्यांचं अस्तित्व त्यांच्या शारीरिक क्षमतांवरच विसंबून असतं, असे कामगार मानवतेचा सार्वत्रिक भाग आहेत. अस्मितेच्या अशा अभावातून, अस्मितेला अशा व्यापक पातळीवर दिलेल्या नकारातून 'कम्युनिस्ट मॅनिफेस्टो'मधील प्रसिद्ध घोषणाही स्पष्ट होते : 'कामगारांना कुठलाही देश नसतो'. जगाच्या वस्तुनिष्ठ परिप्रेक्ष्यातून पाहिलं असता पाईक त्या जगाचा अंतर्भूत अपवाद असला तरीही कुठल्या तरी देशाचा असतोच. पण मुक्तीच्या प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास पाईक एक अंतःस्थ अपवाद म्हणून सार्वत्रिक असतो आणि कुठल्याही देशाचा नसतो. आणि आपल्याला माहीत आहे की आनंद त्याच्या व्यक्तिनिष्ठ ताकदीमुळं, कुठल्याही अस्मितेच्या मर्यादांना पुरून उरतो. 'प्रेमिक जगात एकटे असतात' या सूत्राचा अर्थ देखील हाच आहे; ते असं सुचवतं की प्रेमिकांचं काम – प्रेम – त्यांना एकमेकांपासून वेगळं करणाऱ्या किंवा तोडणाऱ्या कुठल्याही गोष्टीची अस्मिता पुसून टाकतं.

मी म्हणल्याप्रमाणं तिसरा पैलू म्हणजे, पाईकाचं आनंदी असणं. जे करायला तो समर्थ आहे ह्याची त्याला जाणीव नव्हती असं काहीतरी करण्याच्या क्षमतेचा त्याच्या अंतरंगात त्याला शोध लागतो, त्यात ते आनंदी असणं वसतं. इथं मुख्य मुद्दा आहे विधायक नकाराचा (sublation) – ज्याला हेगेल 'आउफहेबुंग' (Aufhebung) म्हणतो त्या अर्थी – म्हणजे, स्वतःमधील वरकरणी पाहता दिसणाऱ्या मर्यादेपलीकडे जाताना त्या मर्यादेला ओलांडण्यासाठी आवश्यक साधनांचा स्वतःतच शोध लागणं. थोडक्यात सांगायचं झालं तर आनंद कायमच मर्यादिततेवरील (finitude) विजय असतो.

इथं आनंद आणि समाधानामध्ये एक स्पष्ट भेद करणं गरजेचं आहे. जेव्हा माझे वैयक्तिक फायदे, जग जे समोर ठेवतं त्याच्याशी अनुरूप असतात, तेव्हा मी समाधानी असतो. त्यामुळं समाधान ह्या जगाच्या नियमांनुसार ठरतं, आणि ते नियम आणि मी ह्यांच्यातील सुसंगतीनुसार. शेवटी, ह्या जगात मी व्यवस्थितपणे अंतर्भूत झाल्याची मला खात्री पटते तेव्हा मी समाधानी असतो. परंतु आपण असा आक्षेप घेऊ शकतो की समाधान हा वास्तविकदृष्ट्या व्यक्तिनिष्ठ मृत्यूचंच एक रूप आहे, कारण एखादी व्यक्ती, जग आहे तसंच त्याच्याशी जुळवून घेण्यानं जर मर्यादित होत असेल, तर एक सार्वत्रिक पाईक ती बनूच शकत नाही, जरी ते बनण्याची तिच्यात क्षमता आहे.

मुक्तीच्या प्रक्रियेत आपण हे तथ्य अनुभवतो की आनंद समाधानाचा द्वंद्वात्मक नकार असतो. आनंद होकाराच्या बाजूनं, नवनिर्मितीमध्ये, नाविन्यामध्ये आणि सार्वत्रिकतेच्या बाजूनं असतो. समाधान फ्रॉइड ज्याला 'मृत्यूची ओढ' (death drive) म्हणतो त्याच्या बाजूनं असतं, व्यक्तिनिष्ठतेची वस्तुनिष्ठतेत झालेल्या अवनतीत ते असतं. समाधान म्हणजे जगानं व्यक्तीसाठी देऊ केलेलं मोक्याचं ठिकाण शोधण्याची आणि गवसण्याची आसक्ती आणि मग तिथंच थांबणं होय.

म्हणूनच हा संपूर्ण लेख घटनेनंतर घडणाऱ्या (राजकीय) मुक्ती, (कलात्मक) निर्मिती, (वैज्ञानिक) शोध किंवा बदलाच्या, म्हणजे (प्रेमात) स्वतःलाच परके होण्याच्या, प्रक्रियेतील पाईकत्व आणि आनंद ह्यातील घट्ट नात्याविषयी बोलतो.

इथं आपण परत माझ्या निबंधाच्या शीर्षकातल्या मूळ प्रश्नाकडे वळू शकतो: 'जग कसं बदलायचं?'

याचं उत्तर असं असू शकतं : एका स्थानिक घटनेच्या परिणामांचा व्यक्तिनिष्ठ भाग बनणं. आपण असंही म्हणू शकतो : एखाद्या घटनेशी निष्ठावान राहणं, स्वातंत्र्य आणि शिस्त यामध्ये एकतानता निर्माण करणं आणि जो समाधानाच्या हुकूमशाहीवरचा आणि मृत्यू-ओढीच्या ताकदीवरचा विजय असेल, अशा आनंदाच्या नव्या रूपाचा शोध लावणं. आपल्याला जगात काहीतरी बदलत आहे हे तेव्हाच कळते जेव्हा आनंद हा त्या बदलाच्या प्रक्रियेचं पूर्वनियोजित ध्येय नसून ती प्रक्रियाच एक पाईक होण्याची सृजनशील व्यक्तिनिष्ठ प्रक्रिया बनते. जग तेव्हाच बदलत असतं जेव्हा, साँ ज्यूस्तनं जाहीर केलं होतं त्याप्रमाणे, आपणही हे जाहीर करू शकतो, की 'आनंद ही नवीन कल्पना आहे.'

मार्क्सच्या क्रांतीच्या संकल्पनेमध्ये ही दृष्टी पायाभूत आहे. मार्क्सकरता, सामूहिक न्यायाच्या नव्या शक्यतेचं नाव 'कम्युनिझम' होतं, हे आपल्याला माहीत आहे. भांडवलशाहीची क्रांतीमुळे उघडकीस येणारी नकारात्मक मर्यादा स्पष्ट आहे, की भांडवलशाहीमध्ये समता अशक्य आहे. परिणामतः, कम्युनिझम हे नाव त्या अशक्यतेच्या राजकीय शक्यतेचं नाव आहे : समतेच्या शक्यतेचं. परंतु आपल्याला 'Manuscripts of 1844' ('१८४४च्या हस्तलिखितांमध्ये') आणि प्रसिद्ध 'Manifesto' मध्ये दिसून येतं की मार्क्सनं कधीच असा विचार केला नव्हता की कम्युनिझम हा नव्या समाजाचा आराखडा किंवा न्यायाची अमूर्त संकल्पना आहे. कम्युनिझम हे जुन्या समाजाच्या विनाशप्रक्रियेचं नाव आहे. म्हणूनच बदलणं म्हणजे ध्येयप्राप्ती नव्हे. बदलामध्येच ते ध्येय अनुस्यूत असतं.

निःसंशयपणे, मार्क्सच्या या दृष्टीचं सार्वत्रिक पातळीवर असंही स्पष्टीकरण देता येऊ शकतं की : आनंद म्हणजे सर्वांच्या समाधानाची शक्यता असं नाही. आनंद म्हणजे ज्याच्यात प्रत्येकजण समाधानी असतो अशा एका चांगल्या समाजाची अमूर्त संकल्पना नव्हे. आनंद म्हणजे कठीण कामाची व्यक्तिनिष्ठता : घटनेच्या परिणामांशी झुंजणं आणि आपल्या जगाच्या नीरस आणि कंटाळवाण्या अस्तित्वाखाली दडलेल्या होकारार्थी अ-प्रतिम वास्तवानं देऊ केलेल्या प्रकाशमान शक्यतांचा शोध लावणं, ज्या शक्यतांचा छुपा विरोध हेच त्या जगाचे नियम होते. आनंद म्हणजे जगाच्या दृष्टिकोनातून अशक्य असणाऱ्या शक्तिशाली आणि सर्जनशील गोष्टीचं अस्तित्व उपभोगणं होय.

जग कसं बदलायचं? याचं उत्तर खरोखरच उत्साहवर्धक आहे : आनंदी राहून. पण याची आपल्याला किंमत मोजावी लागते, ती म्हणजे, वेळोवेळी खरोखरच असमाधानी असणं. ही एक निवड आहे, आपल्या आयुष्यामधील खरी निवड. ही खरी निवड खरं आयुष्य जगण्याशी निगडित आहे.

फ्रेंच कवी आर्त्युर रॅम्बोनं लिहिलं आहे : 'खरं आयुष्य अनुपस्थित असतं.' मी जे काही म्हणू पाहतो आहे त्याचा सारांश हा आहे की खरं आयुष्य उपस्थित आहे हे ठरवणं तुमच्या हातात आहे. नव्या आनंदाची निवड करा आणि त्याची किंमतदेखील मोजा!

--

तळटिपा:

1. इथे 'Highest Happiness'चं भाषांतर 'परमानंद' असं न करता 'सर्वोच्च आनंद' असं केलं आहे, जेणेकरून 'परमानंद' या शब्दातून जागृत होणारे विशिष्ट धार्मिक आणि सांस्कृतिक संदर्भ टाळता येतील.

2. स्टॉइक दर्शनानुसार आनंद म्हणजे सदाचार आणि सदाचार म्हणजे मानवी इच्छा निसर्गाक्रमाशी जुळवून घेणं. स्टॉइक दर्शनाची तुलना भारतीय परंपरेतील उदासीन पंथाशी करता येईल. सुख-दुःखाविषयी उदासीनता बाळगणाऱ्या आत्मसंयमाविषयी बोलणारं हे तत्त्वज्ञान आहे.

3. 'कम्युनिझम'साठी 'साम्यवाद' हा पर्यायी मराठी शब्द उपलब्ध असताना तो न वापरण्याविषयीच्या चर्चेसाठी 'आजच्या राजकारणाविषयी' या लेखाची तळटीप क्र. २ पाहा.

4. Idea ह्या शब्दाच्या भाषांतरासंदर्भातील चर्चेसाठी 'बदलाचा प्रश्न' या लेखातील तळटीप क्र. ९ पाहा.

5.इथे 'Human-Subject'चं भाषांतर 'मानव' असं केलं असलं तरी 'मानव' हा शब्द केवळ जीवशास्त्रीय अर्थानं प्रजाती म्हणून अभिप्रेत नाही, तर ते बदलाच्या एका नव्या ऐतिहासिक शक्यतेचं 'नाव' आहे. बादियु यांच्या विचारातील 'subject' या तात्विक संकल्पनेच्या भाषांतरासंदर्भातल्या चर्चेसाठी 'बदलाचा प्रश्न' ह्या लेखाची तळटीप क्र. ४ पाहा.

6. इथे फ्रेंच सायकोअनॅलिस्ट जाक लाकाँ (१९०१-१९८१) यांच्या विचारातील symbolic (प्रतीकात्मक), imaginary (कल्पनात्मक) आणि real (अ-प्रतिम) ह्या वास्तवाच्या तीन पातळ्यांचा संदर्भ आहे. इथे अ-प्रतिम चा अर्थ non-symbolizable (ज्याचे प्रतिमाकरण शक्य नाही) असा घेता येईल. लाकाँ ह्यांच्या मांडणीतील वास्तवाच्या तीन पातळ्यांच्या विस्तृत चर्चेसाठी स्लाव्होय झिझेक यांचे How to Read Lacan (New York: W.W Norton, 2007) हे पुस्तक उपयोगी आहे.

7. मूळ फ्रेंच घोषणा 'Soyez réalistes, demandez l'impossible' (Be realistic, demand the impossible) अशी होती.

8. 'The Real is the Impossible', या लाकाँ यांच्या मूळ वाक्य रचनेच्या संदर्भासाठी पाहा The Other Side of Psychoanalysis: The Seminars of Jacques Lacan Book XVII, trans. R.Grigg, (New York: W.W. Norton, 2007), p. 123.

9. लाकाँ jouissance (ज्याचा फ्रेंच भाषेत शब्दशः अर्थ रतिसुख असा होतो) ह्या संकल्पनेची व्याख्या दोन प्रकारे करतात - 'jouissance as excess of life' (Seminar VIII) (jouissance म्हणजे अतिरिक्त आयुष्य) आणि 'jouissance as an enjoyment beyond the pleasure principle' (Seminar X) (jouissance म्हणजे सुख-तत्त्वा पलीकडचा उपभोग).

10. इथे fidelityचं भाषांतर केवळ 'निष्ठा' असं न करता 'विचारनिष्ठता' केलं आहे, ज्यायोगे fidelityचा 'becoming subject' (subject होणं वा पाईक होणं) असलेल्या संबंधाकडे निर्देश करता येईल. Subject च्या 'विचारनिष्ठ' ह्या भाषांतरासाठी 'बदलाचा प्रश्न' ह्या लेखाची तळटीप क्र. ४ पाहा.

11. Subjectचं भाषांतर 'कर्ता' असे न करता 'पाईक' असं करण्यामागील भूमिकेच्या चर्चेसाठी 'बदलाचा प्रश्न' ह्या लेखाची तळटीप क्र. ४ पाहा.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

आपण सर्वजणच जग बदलतच असतो. त्यात काही शास्त्र आहे हे युनिवर्सिटीला अभ्यास म्हणून घेतात. सांपल, निरीक्षण, आकडेवारी, आलेख, संख्याशास्त्र, किती टक्के करतात जाणूनबुजून, किती जण सहज, किती जण विरोध आणि मग टक्केवारीचं अनुमान.

मग कुणी त्या शास्त्राच्या उपशाखा काढतो सामाजिक, आर्थिक, वस्त्रे आणि अलंकार लेणे,जन्ममृत्यूतर्कशास्त्र, पुनर्जन्म आणि कर्मश्रद्धा, विश्वनिर्मिती,धर्म आणि देव कल्पना , लग्न आणि संतती,करमणूक आणि संगित इत्यादी. पुन्हा यांची सांपलं आणि निष्कर्ष.

मग जग बदलायलाच हवं का यावर रविवारपुरवणी चर्चा.

आम्ही फक्त लहानपणी खेळांचे नियम बदलतो. गल्ली क्रिकेटमधले एकटप्पीक्याच - बाद, पलीकडच्या इमारतीत बॉल मारणे बाद, सरपटी झाडापर्यंत फोर ,थेट सिक्सर.
नंतर लग्नाच्या वेळी बायकोचं नाव तांदुळात लिहून बदलतो. छोटंसं आपल्यापुरतं जग. मग नाव न बदलण्याची टूम येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0