हाय – फाय आध्यात्मिकतेचा अनुभव

xxx
(आज काल उच्च व अत्युच्च मध्यम वर्गातील नव श्रीमंत ‘आम्ही अंधश्रद्ध नाही, आमचा परमेश्वरावर विश्वास नाही, देव-धर्मावर विश्वास नाही, आम्ही कुठलेही कर्मकांड पाळत नाही, ...’ हे ठासून सांगत असतानाच आपल्या ‘आत्मोन्नती’साठी (व सर्व प्राणिमात्रांच्या दीर्घ आयुरारोग्य व सुखसमाधानासाठी) स्पिरिच्युअल (आध्यात्मिक) असणं किती गरजेचे आहे हेही सांगण्यास ते विसरत नाहीत. यासाठी सत्संगाच्या पारायणांची रतीब टाकत असतात. परंतु हे 'अध्यात्म' म्हणजे नेमके काय असते, याचा शोध घेत असताना पु.लंच्या अनुभवाची आठवण झाली. त्याचप्रमाणे शांता गोखले यांनी केलेल्या आध्यात्मिक अनुभवाच्या वर्णनाचीसुद्धा!

जरी या लेखकद्वयांचे अनुभव पूर्णपणे काल्पनिक असले तरी त्यातील काही अंश तरी वास्तवात होते, हे नाकारता येत नाही. कदाचित आजकाल पु. ल. देशपांडे व शांता गोखले यांनी वर्णन केल्याप्रमाणे अध्यात्माचा प्रत्यक्ष अनुभव मिळत नसेलही. परंतु अध्यात्माची वाट कशी होती वा असू शकते याची ही एक गंमतीशीर झलक.

(डिस्क्लेमरः यात कुणाच्याही भावना दुखविण्याचा उद्देश नसून पाच-दहा मिनिटाचा विरंगुळा देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. कुणाच्या भावना दुखल्यास आगावूच माफी मागत आहे.)

असा मी असा मी - पु. ल. देशपांडे

….. इकडे ब्रदर अरुणाचलम हातात एक मेणबत्ती घेऊन उभा राहिला. मंडळी उभी राहिली. सर्वोनी हात जोडले. मीही जोडले. सगळी माणसं व्यवस्थित उभी होती. आप्पा भिंगार्डे मात्र कीर्तन संपल्यावर “घालीन लोटांगणा”ला राहतात तसा यडपटासारखा पोट खाजवीत उभा होता. दृष्टी पारशिणीच्या पाठीवरून चेहऱ्याकडे वळली होती. मग ब्रदर अरुणाचलम म्हणाला, “गुरुदेव स्वामी संप्रभावानन्दमहाराज की”--, लोक ”जय” म्हणाले. पुन्हा तो म्हणाला, “गुरुदेव स्वामी संप्रभावानन्दमहाराज की--”, महाराज की म्हणाल्यावर लोकांनी “जय” म्हणण्यापूर्वी भिंगार्ड्यानं पुन्हा एकदा “हिऽऽक् छयाक्” केले. हा भिंगार्ड्या म्हणजे अत्यंत कंडम माणूस आहे!

तेवढ्यात प्रोफेसर कुंभकोणमनी आपली “प्रेय्यर” सुरू केली . तो मृदुंगवाला आणि झांजवाला एकदम अंगात आल्यासारखे आपापली वाद्यं बदडायला लागले. मनसोक्त आदळआपट केल्यावर एकदम थंड पडले आणि आपल्या आवडत्या म्हशीपासून पाचसहा वर्षे ताटातूट झालेला अत्यंत व्याकूळ अवस्थेतला रेडा जितका गोड आवाज काढेल तसल्या आवाजात प्रोफेसर कुंभकोणमनं गायला सुरुवात केली. “वातापि गाणापातीं भाजेऽऽअम्” गाता गाता मधूनच ते बनियनमधून ढेकूण चावल्यासारखं करीत होते. कुंभकोणमच्या असल्या गाण्यानंतर गुरुदेवच काय ब्रह्मदेवसुद्धा धावून आला असता. पण ते खाली बसल्यावर “नाउ ब्रदर सुकुमारसेन बंडोपाध्याय विल सिंग ए बैंगॉली प्रेय्यर” अशी घोषणा झाली आणि सुकुमार हे नाव धारण करणारा सुमारे सव्वादोनशे पौंडांचा देह नाकावरचा चष्मा सावरीत आणि धोतराचा सोगा पैरणीच्या खिशात घालीत उठला. त्यानं दोन्ही गालांत सुपाऱ्या ठेवून बोलल्यासारखी सुरुवात केली. मोठ्या हंडयावर मडकं उपडें ठेवल्यासारखा दिसणारा हा गृहस्थ, आपण पाळण्यातल्या पोराशी जसं ”शोन्याला कॉ पॉजे ऑमच्या? कुनी मॉल्लो आमच्या शोन्याला? कोशोकोशो बाई लोलू आलं?” असं बोबडं बोलतो तसं थोडा वेळ बोलला. एकदम ऊर्ध्व लागल्यासारखे त्यानं डोळे फिरवले आणि गाणं म्हणायला सुरुवात केली. त्याचं ते भजन संपलं आणि हॉलमघलं झुंबर आणि इतर दिवे पेटले.

कुणीतरी जोरात शंख फुंकला. मला आधी वाटलं, भिंगार्ड्यानं जांभई दिली म्हणून. कारण तो हापिसात “होssईss “ अशी जांभई देतो. पण ब्रदर अरुणाचलम शंख फुंकीत होता. शंख फुंकून झाला. पडदा बाजूला झाला आणि हातात एक मोरपिसांचा पंखा घेऊन सुवर्णा कपूर आली. तिच्यामागून सौभद्रातल्या त्रिदंडी संन्यास घेतलेल्या अर्जुनासारखा दिसणारा गृहस्थ आला. हेच ते गुरुदेव असावेत असं वाटेपर्यंत सगळ्यांनी “ श्रीसद्गुरुस्वामी-“ असा घोष केला. मला वाटलं, भिंगार्ड्या पुन्हा “हीक््याँश्” करणार पण तो त्या सुवर्णा कपूरकडे ‘आ’ वासून पाहत होता. मग गुरुदेव आसनावर बसले. सौभद्रातल्या अर्जुनासारखे. सुवर्णा कपूर पंख्यानं वारा घालीत होती. सुभद्रेसारखी. फक्त ‘नाराऽऽयण-- नाराऽऽयण-- नाराऽऽयण!’ तेवढं नव्हतं. मग लोकांनी त्यांना हारबीर घातले. कायकिणी गोपाळरावांनी तर साष्टांग दंडवत घातला होता आणि हात जोडून दासमारुतीसारखा तो बसला. तेवढ्यात माझ्या शेजारची बाई आणि तिची ती स्वरूपसुंदर कन्या उठल्या आणि त्यांनी गुरुदेवांच्या पायावर डोकं ठेवलं. त्या बाई कुठल्याशा राणीसाहेब होत्या. राणीसाहेब, राजकन्या वगैरेंच्या शेजारी बसणारा कडमड्याच्या जोशी घराण्यातला मी पहिला महापुरुष निघालो याचा मला अभिमान वाटत होता. .....

ब्रदर अरुणाचलम एका चिमट्यानं नोटा उचलून मखमली पेटीत टाकत होता. राणीसाहेबांनी चांगली शंभर रुपयांची नोट टाकली होती. लाजेकाजेस्तव मीही खिशात हात घातला आणि बघतो तर खिशात दहाची नोट निघाली! हा चमत्कार कसा झाला कळेना. हिनं तर येताना माझ्या हातावर पाचाची नोट टिकवली होती. ती तिकिटांत जवळजवळ संपून एक रुपया आणि काही चिल्लर उरली होती. मी “गुरुमाउलीss, काय हा चमत्कार!” म्हणून त्यांचे पाय धरणार, इतक्यात माझ्या डोक्यात लखख प्रकाश पडला. तो कोट गोठोस्करदादांचा होता. त्यांनी खिसे न चाचपताच कोट दिला. गोठोस्करदादा म्हणजे देवमाणूस....
..
काही वेळानं स्थिरस्थावर झाली. गुरुदेवांनी एकदम श्वास आत ओढला आणि म्हणाले, हू आर यूऽऽ?” मला वाटलं, मला विचारताहेत. मी “सर, माय नेम इज-“ वगैरे वाक्य जुळवायला लागलो इतक्यात ते तिसरीकडेच पाहत पुन्हा ओरडले, “हू आर यूsऽ- हू आर यूSS - हू अॅम आय? अँड हू इज हीऽs” म्हणून त्यांनी बोट वर केलं. मी वर पाहिलं वर काहीच नव्हतं. पण गुरुदेव मात्र बोट वर करून सारखे “हू इज ही?” असं विचारत होते. सगळी मंडळी शांतपणानं ते “हू आर यू आणि हू इज ही” ऐकत होती. आमच्या मॅकमिलनच्या प्रायमरमध्ये पूर्वी “ही इज ए बॉय - शी इज ए गर्ल - दे आर गर्ल्स” असला धडा असे. गुरुदेव त्याच चालीवर म्हणायचे, “हू आर यू?” आणि मग आपल्या त्या प्रशनाचं उत्तर द्यायचे, “ही इज द हू ऑफ द यू इन द आय ऑफ द ही इन विच यू आर द आय अँड आय इज द यू -- अँड दॅट यू इन यू अँड ही इन यू-”; माझी हाय आणि लो ब्लडप्रेशरं एकदम सुरू झाली. काही वेळानं मला नुसतंच ‘यू यू यू यू’ एवढंच ऐकू यायला लागलं. आणि येताना ओसरीवर माझ्याकडे पाहून तुच्छतेनं मान फिरवणारा तो कुत्रा आणि हे समोरचे लोक सारखेच दिसायला लागले. त्यातून तो उदबत्यांचा आणि राजकन्येच्या दिशेनं येणारा सुगंध आणि गुरुदेवांचे ”द इटsऽर्नल ब्लिस ऑफ द सोऽऽल विच एक्सप्लोअर्स द रेल्म्स बियाँड द रेल्म्स ऑफ द स्यूपरा-कॉन्शसनेस...” वगैरेमुळे काय झालं कोणाला ठाऊक, काही वेळानं मला कुणीतरी धक्के देतोय असं वाटलं. आणि नेहमीप्रमाणं मी “ए शंकऱ्या, पलीकडे जाऊन झोप. काय लोळतात पण कार्टी! “ असं ओरडलो. बघतो तर कायकिणी गोपाळराव मला जागं करीत होते. सगळा हॉल रिकामा झाला होता.

“यू आर व्हेरी फॉर्च्युनेट हां धोंडोपंत-”; कायकिणी गोपाळराव सांगत होते
“आँ”.
“अहो, असं समाधी लागायचं म्हणजे तुमचं पूर्वपुण्याई ग्रेट असलं पायजे – “

ही असली समाधी जन्माला आल्यापासून आजतागायत ताकभात उरकून हात धुऊन होईपर्यंत लागते हे त्याला कशाला सांगा! मी हॉलबाहेर आलो. बाकीच्या सगळ्या मखमली चपला, जरतारी चढाव, चकमकीत बूट वगैरे केव्हाच गेले होते. माझी फाटकी चप्पल केविलवाणेपणानं माझ्याकडे पाहत एकटीच पडली होती. तिला बिचारीला पोटासाठी तुडवायची वाट ठाऊक ही अध्यात्माची वाट अगदीच नवी होती.

त्या वर्षी - शांता गोखले

…..सुमित्राबेन आता दाराजवळ उभ्या राहून अत्यंत नम्रपणं स्वागत करतायत. लवकरच चुडीदार पायजम्यांवर रेशमी झब्बे घातलेल्या पुरुषांनी आणि मंद रंगांच्या उंची तलम साड्या आणि खोल गळ्यांचे ब्लाऊज घातलेल्या त्यांच्या बायकांनी दालन भरून जातं. काही जोडप्यांबरोबर सलवार-कमीजमधल्या मुली आणि जीन्समधले मुलगेही आहेत. सर्व जण बसल्यावर आतून चांदीच्या ट्रेवर क्रिस्टलच्या पेल्यांमधून दोन-तीन प्रकारची सरबतं आणली जातात. कलिंगडाचा वितळलेल्या माणकांसारखा रस, त्याच्या शेजारी चंद्रकिरण ओतल्यासारखा लिचीचा रस आणि पाचूंसारखं लखलखणारं खसचं सरबत. ... जमलेल्या मंडळीमध्ये पुसट कुजबूज चालल्येय ती एकाएकी बंद होते. आतल्या खोलीतून सुमित्राबेन शिवानंदस्वामींना बाहेर घेऊन येतात आणि त्यांना मंचावरच्या आसनावर स्थानापन्न होण्याची लवून विनंती करतात. स्वामी आसनावर बसतात. त्यांचा वेष सफेद रेशमी पायघोळ कफनी, कानांत मोत्यांची कुंडलं, गळ्यात द्राक्षांएवढ्या मोठ्या रुद्राक्षांची माळ आणि कपाळावर उभा शेंदरी टिळा असा आहे. ते बसल्यावर जमलेल्या सत्संगींना एका तीक्ष्ण दृष्टिक्षेपात ते अजमावतात. त्यांचे डोळे खोलीतल्या प्रत्येक व्यक्तीवर एका क्षणांशासाठी विसावतात. (एका) मध्यमवयीन बाईच्या शरीरातून कळ उठल्यासारखी ती ‘आह’ करते. मग स्वामी त्यांचे भेदक डोळे मिटतात आणि काही काळ ते तसेच ध्यानस्थ बसतात. सत्संगींच्या रोखलेल्या श्वासांच्या शांततेनं वातावरण जड होतं. स्वामी डोळे उघडतात तेव्हा सर्वांच्या तोंडून फुस्स असा एकत्रित श्वास सुटतो. स्वामी हलकी टाळी वाजवतात. त्यासरशी पुरुषाच्या आवाजांतला ध्वनिमुद्रित मंत्रघोष थांबतो. त्यानंतर आतून त्यांचे चार शिष्य येतात. त्यांतला एक सफेद परदेशी आहे. सर्वांनी धोतरं- बंड्या असा पोशाख केला आहे. फिरंग्याच्या दोन्ही बाहूंवर मोठी चित्रं गोंदलेली आहेत - उजव्या दंडावर शिव, डाव्यावर पार्वती. हे चार शिष्य आता स्वामींच्या मागच्या बाजूला कापडावर रंगवलेलं एक चित्र उंच स्टँडवरून टांगतात. त्याच्या मध्यभागी एक लाल वर्तुळ आहे आणि भोवताली ध्वनिलहरींसारख्या काळ्या रेषा. स्वामी खोल, मुलायम आवाजात धिम्या लयीत मंत्र म्हणण्यास सुरुवात करतात :

सर्वे वेदा यत्पदमामनन्ति
तपांसी सर्वाणी च यद्वदंति
यदिच्छंतो ब्रह्मचर्य चरन्ति
तत्ते पदं संग्रहेण त्रवीम्योमित्येतत्

स्वामी डोळे उघडतात. ह्या मंत्राचा अर्थ आहे : सर्व वेद ज्या पदाची घोषणा करतात, सर्व तप ज्याच्याविषयी बोलतात, व ज्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्याचे आचरण करतात, पद तुला संक्षेपाने सांगतो, की ते आहे...

इथे स्वामींचे चार शिष्य ओंकाराचा घोष सुरू करतात.

तो क्रमशः विरतो तसे स्वामी पुन्हा बोल लागतात :

“ ‘अ’, ‘उ’, व ‘म्’ आणि (चंद्रकार) मिळून ओंकार बनतो. ओंकारातला ‘अ’ हा विभाग जागृती ह्या अवस्थेचा, विश्व ह्या आत्मस्वरूपाचा आणि विष्णू ह्या देवतेचा निर्देशक आहे. ‘उ’ हा स्वप्न, तेजस् आणि महेश्वर ह्याचं प्रतीक आहे ‘म्’ सुषुप्ती, प्रज्ञ आणि ब्रह्मा ह्याचा निर्देशक आहे. ओंकाराच्या उच्चाराचं अंतिम फलित ब्रह्मप्राप्ती आहे. तिथवरचा प्रवास आपली ऐहिक कर्तव्यं सांभाळत करणं कठीण आहे.

पण ओंकाराच्या उच्चारणानं आत्मज्ञान प्राप्त करून घेणं हे काही प्रमाणात साध्य होऊ शकणारी गोष्ट आहे. ओंकाराचं उच्चारण डोळे मिटून करायचं असत. पण मन एकाग्र नसेल तर डोळे मिटूनसुद्धा आपण स्वत:मध्ये शिरू शकत नाही. म्हणून प्रथम माझ्या मागं लावलेल्या ह्या बिंदूवर आपली दृष्टी स्थिर करायची आहे. बिंदू ही शिवाची एक शक्ती आहे. बिंदू हा योग्याचा ज्ञानचक्षू आहे. त्यावर लक्ष केंद्रित करून जी एकाग्रता प्राप्त होईल तिच्या आधारानं आपण आपल्या आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

ज्यांना पद्मासन घालता येणं शक्य असेल त्यांनी घालावं. ज्यांना नसेल त्यांनी साधी मांडी घातली तरी चालेल. मग आम्ही उच्चारणास सुरुवात करू. ह्या बिंदूवर लक्ष पूर्णपणं केंद्रित करावं. त्यात तुम्ही डोळे मिटून सामील व्हाव. जगातल्या सर्व प्राचीन तत्त्ववेत्त्यांनी आंधळेपण हे एका वेगळ्या प्रकारच्या दृष्टीचे साधन मानलं आहे. बाहेरचं जग ज्याला दिसत नाही त्याला जे अव्यक्त आहे, जे निराकार आहे, ते दिसू लागतं. आमचे गुरुबंधू, स्वामी प्रसादानंद अचानकपणं एका डोळ्यानं आंधळे झाले. त्याच दुःख ते करत बसले नाहीत. जे घडलं आहे त्याचा स्वीकार जो करत नाही तो दुःखी होतो. स्वीकार करतो त्याला वेगळी दृष्टी येते. स्वामींना हे कोणी सांगण्याची गरज नव्हती ते त्यांच्या शिष्यांना म्हणाले, “इतरांना दिसतं ते मला माझ्या एका डोळ्यानं दिसतं. पण दुसरा डोळ्यानं जे इतरांपासून लपलेलं आहे, जे बाहेर कुठेच नाही तेही मला दिसतंय.

डोळे मिटणं म्हणजे तात्पुरता आंधळेपणा स्वीकारणं. दृश्य जगापासून अलग होणं. आणि स्वत:च्या आत्म्याचा शोध घेण्याचा प्रयास करणं. हे तुम्ही यशस्वी रीत्या करू शकलांत तर डोळे उघडल्यावर तुम्हांला दुश्यजगदेखील बदललेल्या स्वरूपात दिसेल मग ह्या जगाशी संबंधित तुमच्या सर्व चिंता गळून पडतील. तुमच्या भोवताली तुमच्या आतून निर्माण झालेलं असं एक प्रसन्न वातावरण तयार होईल. दैवी शक्तीचा एक लहानसा अंश आपल्यात शिरल्याची तुम्हांला अनुभूती येईल. आतां आपण सर्वांनी मांडी घालावी आणि बिंदूवर लक्ष केंद्रित करावं.”

स्वामींच्या प्रवचनानं प्रकाश गलबललाय. पद्मासन घालता घालता तो चोरून इतराकडे बघतोय. फार कमी लोकांना पद्मासन जमतंय. तरुण पोरं-पोरी आणि काही पुरुष-बायकाही प्रयत्न करता करता खसखसतायत, तर काहींनी गंभीर मुखवटे चढवल्येत.

प्रकाश बिंदूवर लक्ष केंद्रित करतो. काही वेळानं डोळे सतत उघडे ठेवल्यामुळं ते झोंबून ओलावतात. ते पुसायची परवानगी आहे का, डोळ्याची उघडझाप केलेली चालते का हयाबद्दल स्वामी काहीच बोलले नाहीत.

प्रकाश क्षणभर बिंदूवरचं लक्ष हलवतो आणि डोळ्यांच्या कोपऱ्यांतून आजूबाजूच्या लोकांकडे बघतो. त्याच्या शेजारची बाई डोळे मिटून डुलत्येय. पलीकडला माणूस डोळे सारखे मिचकावतोय. प्रकाश हळूच स्वामींकडे बघतो. ते एका शिष्याला काही तरी सांगण्यात गुंतलेले आहेत. त्यांचं ह्या दोघांकडे लक्ष नाहीये. कोणाकडेच लक्ष नाहीये. कदाचित त्यांच्या आतल्या डोळ्याला सर्व दिसत असेल.... ते एक पोचलेले गुरू आहेत.

प्रकाश पटकन डोळे पुसतो आणि ते पुन्हा बिंदूवर रोखतो. हळूहळू त्याच्या डोळ्यांसमोर बिंदू कंपित होतो. त्यातून प्रकाशाचे तरंग उठू लागतात. प्रकाशचं मन उत्तेजित होतं. त्याचे डोळे आपोआप मिटतात. लाल बिंदून त्याच्या पापण्यांच्या मागं आकार धारण केलाय. बिंदुची शक्ती आपल्यात सामावल्याची जाण त्याला होते. तो आनंदतो. तेवढ्यात स्वामींचे चार शिष्य ओंकाराचा घोष सुरू करतात. प्रकाश त्यांना भरदार साथ करतो. त्याचं डोकं हलकं झालंय. हा अनुभव कोणाला सांगू, कोणाला नाही, असं त्याला झालंय. आता लवकरच त्याला त्याच्या अंतरंगात डोकावता येईल..... ते इतरापेक्षा काहीतरी वेगळं आणि अद्भुत असेल.

स्वामींचा आवाज आता लांबून येतोय. ते आज्ञा करतात : “आता ओंकाराचा घोष एकदम न थांबवता हळूहळू आत खेचून घ्या. त्याचा आवाज व्यक्त झाला नाही तरी तो तुमच्या मनात चालू असेल. बरोबर. आता हळूहळू डोळे उघडा. आतल्या जगातून बाहेरच्या जगात येताना धक्का बसू शकतो. सुपरसॉनिक विमान अंतराळातून आपल्या वातावरणात प्रवेश करताना जसा स्फोट होतो तसा तुमच्या डोळ्यांसमोर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी ही काळजी घ्यायची असते.”

आता सर्वांनी डोळे उघडल्येत. उपस्थित तरुण पोरांपैकी एक खालच्या आवाजात शेजारच्या मुलीला म्हणतो, “डिड यू फील एनिथिंग? मैं तो सो गया यार.”
मुलगी म्हणते, “शट अप. इट वॉज अ ब्यूटिफुल एक्स्पीरियन्स.”
मुलगा म्हणतो, “बुलशिट. आय होप द फूड इज गुड.”
मुलगी म्हणते, “इट्स ऑल व्हेजिटेरियन.”
मुलगा म्हणतो, “शिट यार. व्हाय डिड यू ब्रिंग मी हियर?”
मुलगी किंचित आवाज चढवून म्हणते, “आय डिड? यू वॉटेड टू सी मी. आय टोल्ड यू आय वाज कमिग हियर, यू सेड; कॅन आय कम? आय सेड; श्योर, इफ यू वाँट टू. सो हाऊ डिड आय ब्रिंग यू हिअर?”
मुलगा म्हणतो, “यू आर राइट, यू डिडन्ट, बट व्हॉट अबाउट ‘प्रसन्नता’ अँड सर्व चिंता गळून पडतील वगैरे? आफ्टर यॉर ब्यूटिफल इनर एक्सपीरियन्स यू शुड्न्ट आरग्यू विथ पीपल आऊटसाइड वर्ल्ड लाइक मी.”

मुलीला उलट उत्तर सापडत नाही. मुलगा जोरात हसतो. त्यामुळे स्वामींच्या पाया पडायला लाइनीन उभ्या असलेल्या सत्संगीनी भक्तिभावानं जी शांतता राखत्येय त्याला तडा जातो. एकाएकी सर्वच जण एकमेकांशी कुजबूजू लागतात. आतून जेवण लावल्याचे आवाज येऊ लागतात. काही जण मोठ्यानं हसतातसुद्धा. सर्वांचं स्वामीच्या पाया पडून होतं. सुमित्राबेन स्वामींसाठी चांदीच्या ताटात ठेवलेल्या चांदीच्या वाट्यांमध्ये आतल्या टेबलावरचे सर्व पदार्थ रचून आणतात. त्यांच्या आसनासमोर एक बैठ टेबल ठेवलं जातं. त्यावर त्या ते भरलेलं ताट, चांदीचा गडवा-भांडे, एका पेल्यात बदाम लावलेलं थंड दूध-असं सर्व ठेवतात. स्वामी पहिला घास घेईपर्यंत त्या अदबीनं त्यांच्यासमोर उभ्या राहतात. नंतर आपल्या पाहुण्यांकडे लक्ष पुरवायला आात जातात.

(यातील अध्यात्माच्या ‘अनुभूती’बद्दल काही कळल्यास इतर (अज्ञ) वाचकांबरोबर शेर करावे, ही विनंती.)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ह्यात सधगुरुंचेही अनुभव कोणी सांगितल्यास धागा लेटेष्ट होईल.
सधगुरूंसोबत सध्या आणखी काही कॉर्पोरेट गुरू आहेत काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नास्तिक लोकांना भलती खोड आहे ही आस्तिक लोकांच्या जीवनात काय चालले आहे ते जाणून घ्यायची.
आपण नास्तिक आपली तत्व वेगळी कशाला नको ते उद्योग करायचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मौजमजा आहे हे तरी बघा ना तात्या ...
एरवी तुम्ही शिरेस लेखांवर विनोदी प्रतिसाद देता मग इथे का शिरेस प्रतिसाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पु. ल. चे लेखन वाचले होते, कथाकथन ऐकलेले आहे. गोखल्यांनी लिहिलेला अनुभव प्रथमच वाचला.
इतके तरल, मुलायम, सुंदर अध्यात्म अनेकांना भितीदायक का वाटते माहिती नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

एक बार वक्तसे लम्हा गिरा कहीं | वहॉ दास्ता मिली, लम्हा कहीं नहीं ||
थोडासा हसाके, थोडासा रूलाके - पल ये भी जानेवाला हैं ||

बाबा इंडस्ट्रीज माझा जिव्हाल्याचा विषय आहे. माझा या विषयावर आवड असल्याने थोडा फार अभ्यास आहे. तर काही निरीक्षणे नोंदवावीशी वाटतात.
१-

आर्ट ऑफ लिव्हींग ची ऑनलाइन टीम अत्यंत सावध सक्रीय आहे. तुम्हाला युट्युब वर अत्यंत अपवादाने श्री श्री वरील टीकात्म्क व्हीडियो आढळतील त्यांची लिगल टीम अत्यंत आक्रमक आहे. माझ्या ज्या मित्रांच्या गटाने त्याचा अनुभव घेतलाय त्या संदर्भातील चर्चेवरुन सांगतोय. एक गंमत पहा यांच्या आश्रमात काही वर्षापुर्वी एक गोळीबार झाला होता. तुम्ही जर शेरलॉक शोध पत्रकारीता वगैरे किडे चावलेले असाल तर या प्रकरणाचा थांग घेऊन पहा. चार ओळी पलीकडे कुठेही कुठल्याही मिडीयात तुमच्या हाती काह्ही म्हणजे काहीही लागणार नाही. समांतर उदाहरण सत्यसाई च्या आश्रमात त्यांना मारायला ४ लोक घुसली तेच पकडले गेले त्यांना कोंडल गेलं पण ...............या वरही माहीती घेऊन बघा ढुंढते रह जाओगे ......... इंडीया टुडे ने मला वाटत टॉप ३० मिस्टरीज चा एक अंक काढला होता त्यात हे एक चार मारेकरी सत्य साई प्रकरण आल होत. श्री श्री ने बरीच युद्धे थांबवलेली आहेत पण युक्रेन मे गुरुजी इंटरेस्ट नही ले रहे ना ही पुतिन को सुदर्शन क्रिया सीखा रहे है. कोरोना त बाबा आश्रमातच मुक्कामाला होते डाय ही बहुधा स्वत:च्या हाताने करत एकदा छान सा अपवादात्मक असा व्यायामाचा व्हिडीयो ही आलेला आधुनिक उपकरणां सोबतीने ( नाही म्हणजे योगा वगैरे सर्व परीपुर्ण असतांना हे पाश्च्यात्य फॅड असे काही नालायकांना वाटते ) शिवाय मलाला को नोबेल मिलनेका मलाल , नदी साफ करके भी मेरे इमेज को मैला किया उसका भी मलाल

२-
तर आम्हा ब्रह्म्कुमारींच्या अनेक थेअरीज आहेत त्यापैकी एक साधारण विलायती धर्माच्या स्टाइलची आहे. जग ५००० की काय वर्शानंतर बुडणार मग जहाजात जितके ब्रह्म कुमार आणि कुमारीज आहेत तितकेच फक्त वाचतील नवी दुनिया वसवतील असे बरेच काहीसे डिटेल्स आठवत नाही पण त्यांच्य प्रमुख आंतरराष्ट्रीय प्रमुख एक दादीजी आहेत ज्यांचे वास्तव्य माऊट आबु येथे असते. मग तो काहीतरी कयामत का दिन आ चुका है उनके थेअरी के हिसाब से आणि म्हणून मग ते त्यांचे कुमार्स आणी कुमारीज दादीजी ला विनंती लाडे लाडे करीत असतात
दादीजी बटन दबाओ नो मग ते जग संपणार वगैरे पण मग दादीजी त्यांना समजाऊन मान हलवितात अभी रुको ..........अभी वक्त है
दादीजी बटन्

( यांच्यात एक इंटरेस्टींग रीच्युअल पण होत ज्या कुमारीला दीक्षा घ्यावयाची असते त्या माऊट अबु ला एक कार्यक्रम होतो त्यात तेथील कोणी वरेष्ठ स्स्रीच्च्या शरीरात शिव बाबा चा संचार होतो मग दिक्षीत जिला कराय्ची आहे त्या महीलेचे या महीले सोबत एक लग्न लावले जाते म्हणजे शिव बाबा सोबत लग्न लावले जाते. हे ही एक मोठा टाइमपास चा आयटम आहे.
३-
थोडा कंटाळा नंतर लिहित जातो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

वा वा, मारवाजी ,
माझ्याही जिव्हाळ्याचा विषय आहे हा.
कृपया कंटाळा करू नका, अजून लिहा.
श्री श्री आश्रमात गोळीबार ही बातमी वाचली नव्हती.
जगद आचार्य रामदेवजी यांच्याबद्दलही लिहा.
कृपया.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुलंचा बटाट्याच्या चाळीचा विनोद खूप वेळा वाचला आहे आणि त्यावर नेहमी वाचले की हसू येतेच. शांता गोखले यांचं लेखन वाचलं आहे आणि ते आवडतं सुद्धा! हा लेख वाचला नव्हता. दोन्ही लिखाणात अध्यात्माबद्दल जे लिहिलंय त्यात तथ्य आहे. त्यात आलेला तत्त्वज्ञानाचा भाग बऱ्यापैकी योग्य आहे. पुलंच्या लिखाणातला ‘ही इज द हू ऑफ द यू इन द आय ऑफ द ही इन विच यू आर द आय अँड आय इज द यू -- अँड दॅट यू इन यू अँड ही इन यू’ वाला भाग अत्यंत विनोदी आहे पण सर्व चराचर सृष्टीच्या मुळाशी जे चैतन्य (consciousness) आहे, ब्रह्म आहे ते कसं विनोदी पद्धतीने सांगता येईल याचा हा नमूना आहे. (सध्याचा याचा अवतार म्हणजे स्वत:ला स्वामी नित्यानंद म्हणवणारा एक स्वयंघोषित गुरु आहे त्याचा यूट्यूब चॅनल पहावा.) अर्थात कथेची पात्रं, एकूण ‘उच्चभ्रू’ वातावरण, आणि त्यात सापडलेला सामान्य मनुष्य ही पार्श्वभूमी असल्यामुळे विनोदाची निर्मिती होते. शांता गोखले यांच्या लेखात सुरुवातीला आलेला श्लोक, ‘सर्वे वेदा...’, कठोपानिषदातला आहे. ॐ हेच अक्षर ब्रह्मचे नाम-रूप आहे आणि ओंकार नामसाधनेमुळे ब्रह्म प्राप्ती होते. यात ब्रह्मचर्य, ध्यान वगैरे संकल्पना येतात आणि या संकल्पना न समजल्यामुळे किंवा त्यांचे अतिसुलभीकरण केल्यामुळे ते जे कुणी बाबा लोक आहेत त्यांचं ‘हाय-फाय’ अध्यात्म फावतं. दोन्ही लेखात जे गुरु म्हणवणारी पात्रे आहेत त्यांचा दांभिकपणा दाखवलेला आहे. त्याच बरोबर जे शिष्य म्हणून आलेले आहेत त्यांचाही दांभिकपणा दिसून येतो. मुंडक उपनिषदात एक श्लोक आहे – ‘परीक्ष्य लोकान् कर्मचितान् ब्रह्मणो, निर्वेदमायान्नास्त्यकृतः कृतेन। तद्विज्ञानार्थं स गुरुमेवाभिगच्छेत् समित्पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम् ॥१.२.१२॥...’. अर्थात ‘कर्माने निर्माण केलेली सर्व फळे अनित्य आहेत ही जाणीव झाल्यावर, मनुष्य त्या अमृत तत्वाचे ज्ञान मिळवण्यासाठी ब्रह्म ज्ञानाने युक्त अशा गुरूला हाती समिधा घेऊन शरण जातो.’ आयुष्यात स्थिर स्थावर झाल्यावर उपनिषदात सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्वांना ही अपूर्णत्वाचा जाणीव होते. पूर्णत्व आणि अपूर्णत्व यातील द्वंद्व मनात सतत सुरू असते. इथे परंपरेचं मार्गदर्शन नसेल तर मनुष्य या अपूर्णतेला स्वीकारतो आणि ‘कभी खुशी, कभी गम’ हेच जीवनाचे अंतिम चक्र आहे हे स्वीकारून आयुष्याची मार्गक्रमणा करतो. परंपरेचं मार्गदर्शन असेल तर योग्य गुरूचा शोध सुरू होतो आणि मनुष्य गुरुच्या चरणी लीन होतो. मुंडकातल्या १.२.१२ आणि १.२.१३ या श्लोकांमध्ये जिज्ञासु आणि गुरु यांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. जिज्ञासु म्हणजे ज्याला कर्म करून निर्माण होणार्‍या फळांचे अनित्यत्व लक्षात आलेलं आहे व त्यातून निर्माण होणार्‍या अपूर्णत्वाचा लोप होण्यासाठी गुरूचा शोध सुरू केलेला आहे असा मनुष्य. तर गुरु म्हणजे जो ब्रह्मज्ञानी आहे आणि ज्याची बुद्धी ब्रह्म मध्ये पूर्ण स्थापित झाली आहे असा. इथं लगेचच असा प्रश्न निर्माण होतो की जो जिज्ञासु आहे त्याला समोर असलेला मनुष्य ब्रह्मज्ञानी आहे की नाही ही कसं समजावं? कारण जर जिज्ञासु माणसाला जर परंपरेची ओळख नसेल तर कोणीही त्याच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊ शकतो आणि इथे त्याची फसगत होते. दोन्ही लेखात असलेले गुरु आणि जिज्ञासु ही दोघेही दांभिक आहेत. जिज्ञासु लोकांना benefit-of-doubt देऊन आपण असेही म्हणू शकतो की अशा लोकांना अध्यात्म समजावून सांगण्यापेक्षा त्यांची फसवणूक करण्याचा या ‘गुरूंचा’ हेतु आहे.
‘आत्यंतिक दु:ख निवृत्ति आणि शाश्वत सुख प्राप्ती’ या मोक्षाचे मार्ग दाखवणारा हिंदू धर्म ज्याला आपण सरसकट ‘अध्यात्म’ म्हणतो त्यात अनुभव, अनुभूति आणि ज्ञान यात नेहमी गल्लत केली जाते. विविध दर्शन परंपरांची नाळ तुटल्यामुळे आणि किमानपक्षी तोंडओळखही नसल्यामुळे जिज्ञासु लोकांना एकतर शब्द खेळांची किंवा अनुभवांची चटक लावली जाते किंवा लागते. श्रीशंकराचार्यांच्या गुरूंचे गुरु श्री गौडपाद मांडुक्य कारिकेमध्ये (मक iii.१६) मंद, मध्यम आणि उच्च असे मनुष्याच्या बुद्धीचे तीन प्रकार सांगतात. ब्रह्म समजणे ही बौद्धिक असल्यामुळे बुद्धीची पातळी येथे महत्त्वाची ठरते. इथे मंद बुद्धी म्हणजे आजचा रूढार्थ म्हणजे कमी बुद्धीचे किंवा बुद्धीने विकलांग असा नाही. ज्यांच्या बुद्धीला ‘ब्रह्म हेच अद्वैत आहे’ याचे ज्ञान झाले आहे अशा बुद्धीला उच्च बुद्धी म्हटले आहे. मंद बुद्धी म्हणजे ज्यांना ‘ब्रह्म हेच अद्वैत आहे’ ही समजलेले नाही अशी बुद्धी, आणि मध्यम बुद्धी म्हणजे जे जिज्ञासु बुद्धी! जे मंद बुद्धी आहेत त्यांच्या साठी कठोपनिषद ॐकाराची पूजा करणे हा श्रेष्ठ मार्ग सांगते, जे मध्यम बुद्धीचे आहेत त्यांच्यासाठी ॐकारध्यान आणि जे तीक्ष्ण बुद्धी आहेत त्यांना ब्रह्म ॐकारातच ब्रह्म ज्ञान होते. ‘ब्रम्ह बुद्धीच्या गुहेत स्थापित होते तेंव्हा द्वैत नष्ट होते आणि अद्वैताची समाज निर्माण होते’ ही संकल्पना समजली नसेल तर हा सगळा एकतर काहीतरी गूढ प्रकार आहे किंवा फक्त शब्द खेळ असा समज निर्माण होणे साहजिकच आहे. ‘श्रवण-मनन-निदिध्यासन’ या मार्गे मनुष्य आपल्या बुद्धीला तीक्षता आणू शकतो. शांता गोखले यांच्या लेखात असलेले गुरु पात्र ध्यान मार्ग दाखवत आहे. पण समोर बसलेले लोक कोणत्या पातळीवर आहेत याचा विचार त्याने केलेला आहे असे दिसत नाही. तोच प्रकार पुलंच्या कथेत...

आपण जेंव्हा सायकल चालवायला सुरुवात करतो आणि पहिल्यांदा ज्या वेळी तोल सांभाळून पेडल मारतो त्या क्षणी आपल्याला सायकल चालवण्याचा ‘अनुभव’ येतो. बहुतेक सामान्य लोकांना यातून अतिशय आनंद होतो. असा अनुभव जितक्या वेळा आपण घेतो तितक्या वेळा आपण त्यातून शिकतो आणि ‘हळूहळू’ सायकल चालवणे हे ज्ञान आपल्या अंगवळणी पडते. त्यानंतर तो पहिला नवथर अनुभव मागे पडतो, सुरुवातीची ती आनंदाची अनुभूति मागे पडते व तोल सांभाळत सायकल चालवणं ही ज्ञान आपल्या जेंव्हा हवं असेल तेंव्हा आपल्यापाशी उपलब्ध असेल आशा स्थितीत आपण पोचतो. आता प्रयत्न करूनही आपण सायकल चालवणे विसरू शकत नाही. आता असा विचार करा की, एकदा सायकल चालवायला यायला लागली की आपल्या बाबतीत असं कधीच होत नाही की, ‘एका विवक्षित क्षणी मला सायकल चालवण्याचा अनुभव घेता येतो आणि नंतर मला सायकल कशी चालवायची हे आठवत नाही किंवा ते आठवण्यासाठी प्राणायाम, आसनं, समाधी वगैरे प्रकार करावे लागतात’. अनुभवातून निर्माण झालेली अनुभूति जर शाश्वत ज्ञानापर्यंत पोचत असेल तरच ती खरी विद्या! केवळ अनुभव आणि अनुभूति यांतच आपण अडकलेले असू तर ती अविद्याच हे समजावे. आपण आपल्या आयुष्यात असेच शिकतो आणि कोणतीही ‘विद्या’ अशीच साध्य होते. जो जिज्ञासु आहे त्याला विद्या काशी प्राप्त होते हे समजावे यासाठी ‘सायकल शिकणं’ हे उदाहरण दिले.

अद्वैत सिद्धांतानुसार ब्रह्म बुद्धीत प्रस्थापित होण्याची क्रिया ही कोणत्याही इतर विद्येप्रमाणेच आहे. प्रथम या संकल्पनांचा व्यूह समजणे (श्रवण), मग स्वत:ची प्रत्येक कृती या संकल्पनांच्या कसोट्यांवर मोजून समजून घेणे या प्रक्रियेचा (मनन) सराव करावा लागतो. या मननातून स्वत:त होणारा बदल समजून घेणे (निदिध्यासन) आणि हळूहळू ‘दु:ख निवृत्ति व आनंद प्राप्ती’ या अनुभवाची एक-एक पायरी चढत अद्वैताचे ज्ञान पक्के होवू लागते. इथे एकच-एक असा क्षण अपेक्षित नाही. दुर्दैवाने या ब्रह्म ज्ञान प्राप्तीचा रूढ समज असा अजिबात नाही. आपल्या सगळ्यांना बुद्धाची कथा माहीत असते. बोधिसत्वाच्या झाडाखाली समाधिस्थ अवस्थेत असताना गौतमाला परम शांतीचे गूढ उकलले आणि तो बुद्ध (ज्ञानी) झाला अशी कथा! पुढे स्वामी विवेकानंद आणि त्यांच्या अनुषंगाने गुरु रामकृष्ण परमहंसांच्या ध्यान-समाधी-कुंडलीनी-राजयोग-हठयोगाच्या विविध कथा आपण ऐकलेल्या असतात. आपल्या संत आणि गुरु परंपरांमधून कितीतरी असे ‘अनुभव’ पुन:पुन्हा आपण ऐकत राहतो. त्यातून ध्यान-समाधी-कुंडलीनी-राजयोग-हठयोग ते ‘कृपा (grace या अर्थी) अशाच साधनांचा मारा होत राहतो आणि यातूनच ‘ब्रह्म प्राप्ती म्हणून जे काही सांगितले जाते, ते मला मिळेल’ असा विचार दृढ होतो. या ठिकाणी हेही नमूद केले पाहिजे की, काही लोक असे असू शकतात की ज्यांना हे ज्ञान हळूहळू न होता एकाच क्षणी होऊ शकते. भगवान श्री रमण महर्षि यांचे चरित्र वाचले तर हे जाणवते की मदुराईच्या मिनाक्षी मंदिरात आणि नंतर तिरूवनामलाईच्या अरुणाचल डोंगरावर उन्मनी अवस्था प्राप्त झाली आणि त्यातून बाहेर पडल्यावर अद्वैत ज्ञान आपल्यात पूर्णपणे स्थापित झाले आहे हे त्यांना उमगले. श्री रमण महर्षि याला अक्रम मुक्ती (sudden liberation) म्हणतात. ‘मी कोण आहे?’ या प्रश्नाचा शोध घेत क्रमाक्रमाने जेंव्हा बुद्धी अद्वैतात स्थिर होते त्याला क्रम मुक्ती म्हणतात. सामान्य मनुष्याला क्रम मुक्तीचा मार्ग योग्य आहे. दुर्दैवाने श्री रमण महर्षि प्रमाणेच आपल्याला उन्मनी अवस्था येणार आणि एका क्षणात मुक्ती मिळणार हेच इतकं ठसवलं जातं की सामान्य मनुष्य त्याकडे आकृष्ट होतो किंवा ही थोतांड आहे म्हणून दुर्लक्ष करतो.
याचं कारण म्हणजे परंपरेतून आलेली तात्विक बैठक कोणीही सहसा समजावून सांगत नाही किंवा सामान्य मनुष्य सुद्धा असे प्रयत्न करत नाही आणि त्यामुळं आपलं ‘वैज्ञानिक’ दृष्टीचं मन श्रद्धा-अंधश्रद्धा यात हेलकावे खात राहते. काही जण यातून ‘नास्तिक’ विचारांवर विश्वास (faith/belief या अर्थी) ठेवतात तर काही स्वत:ला आस्तिक (faith/belief या अर्थी) समजून त्यावर विश्वास ठेवतात. बरेचसे लोक अनुभव म्हणजेच ज्ञान किंवा सहज शॉर्ट-कट म्हणून त्याकडे पाहतात आणि गोंधळ सुरू राहतो. एकदा लोक-समुदाय म्हटला की जे गुण दोष कोणत्याही व्यवस्थेत निर्माण होतात त्याला अध्यात्म क्षेत्र तरी कसं अपवाद असेल. इथूनच दांभिकपणा, अपसमज, त्यातून निर्माण होणारी फसगत, व्यावहारिक गणितं वगैरेचा उगम होतो. पुलं आणि शांता गोखले यांचे दोन उतारे त्याचेच प्रतिबिंब दाखवतात.

सुधारक (progressive) विचार आणि भारतीय अध्यात्म यात मूळ दोन मुद्दे आहेत. हे मुद्दे मांडण्यासाठी थोडी पार्श्वभूमी गरजेची आहे. युरोपियन रेनेसां (वैचारिक क्रांती) मुळं ‘Age of reasoning’ आणि ‘Enlightenment’ मधून मनुष्य समाजात मूलभूत बदल झाले. त्याचा परिपाक पुढे औद्योगिक क्रांती होण्यात झाला. यातून व्यक्तीच्या आणि समाजाच्या विकासासाठी स्वातंत्र्य, समता, लोकशाही ही मुल्ये विकसीत झाली. या आधुनिकतेनं (Modernity) मानवी जीवनात न-भूतो असे बदल केले. कोट्यवधि लोकांचे दारिद्र्य यातून कमी झाले, सुबत्ता आली आणि ज्या मुक्तीची मानव अपेक्षा करीत होता ती मुक्ती देण्याची क्षमता केवळ आधुनिकतेत (Modernity) आहे हाच विचार दृढ होत आहे आणि त्यात काही चुकीचं नाही. आपण सगळेच या बदलाला साक्षी आहोत आणि हे अनुभवत आहोत. युरोपियन आधुनिकतेच्या विचारात मानवी विवेक बुद्धीची उत्क्रांती कशी होत गेली आणि मॉडर्न जग हेच मनुष्याच्या विवेक बुद्धीचे सर्वात परिष्कृत गंतव्य स्थान आहे अशा ऐतिहासिकरणाची (historicization) प्रक्रिया सुरू झाली. इथेच हेही नमूद करून ठेवतो की वेदांतातला विवेक आणि आधुनिक विचारातला विवेक यात काही मूलभूत फरक आहेत. कांट-हेगेल-मार्क्स प्रभूतींनी शब्द प्रामाण्याचा (revelations) उच्छेद केला. अर्थात तो ख्रिश्चन धर्माच्या आणि बायबल संदर्भात होता. या पार्श्वभूमीवर भारतावर फ्रेंच-इंग्रज वसाहतवादाचं आणि जर्मन विचाराचं प्राबल्य निर्माण झालं. भारतीय समाजात विविध दर्शन शास्त्रांतली मुल्ये बाजूला पडून जाती-पातीचे जे दोष निर्माण झाले होते आणि जे वैचारिक साचलेपण होते त्यातून समाजाची प्रगती खुंटली होती. धर्म-अर्थ-काम-मोक्ष ही पुरूषार्थ सांगणारा भारतीय विचार पूर्णपणे झाकोळला गेला होता. परकीय आक्रमणं भारतावर झाली आणि त्या पाठोपाठ औद्योगिक क्रांतिमुळे उत्पादनाचे-वितरणाचे नवे प्रकार अस्तित्वात आले. नवी अर्थव्यवस्था निर्माण झाली आणि पारंपरिक भारतीय समाज व्यवस्था हादरून गेली आणि तत्कालीन भारत एका नव्या प्रकारच्या आर्थिक पारतंत्र्यात गेला. पुढे मार्क्स च्या विचाराने भारतात जाती-व्यवस्थेमध्ये जे दोष निर्माण झाले होते त्यांना ‘स्वातंत्र्य आणि समता’ यामुळे नवी परिभाषा व परिप्रेक्ष मिळाले. वर्ग व्यवस्था हा एकच मापदंड वापरून सर्व प्रचलित व्यवस्थांचा विचार सुरू झाला. भारतीय विचारवंतांनी ‘आपण का हरलो’ याचा विचार साहजिकच सुरू केला आणि युरोपियन नवविचारवादाचा भारतीय प्रवाह सुरू झाला. यालाच आपण भारतात आधुनिकतेचं युग सुरू झालं असं म्हणतो. आधुनिकता आणि ऐतिहासिकरण (modernity & historicization) यामुळे आपल्या दृष्टीत एक मूलभूत बदल झाला आहे आणि तो म्हणजे, ‘जो कोणी शब्द प्रामाण्य (revelations) हेही ज्ञानाचे साधन मानतो तो मनुष्य मागासलेल्या विचारांचा आहे.’ याची अर्थापत्ति (corollary) म्हणजे ‘असे शब्दप्रामाण्यवादी सर्व विचार टाकावू आहेत आणि ते सोडून दिले तरच मनुष्याचं अंतिम साध्य शक्य आहे.’ याचाच साधा अर्थ म्हणजे आधुनिक बनणे.

या आधुनिकतेच्या विचारालाच आपण वैज्ञानिक विचार म्हणतो. ‘देवाचे अस्तित्व आहे का? (does god exists?’, ‘धर्म विरुद्ध शास्त्र (religion vs science)’, ‘आस्तिक-नास्तिक’, ‘पुरोगामी-सनातनी’ हे वाद याचीच काही प्रातिनिधिक उदाहरणे! या वादात सहसा कुणी दर्शन शास्त्रांच्या संदर्भात विचार करीत नाही. बहुतेक सनातनी म्हणवणाऱ्यांचा राग पुरोगामी वर्गांकडून कर्म-कांडाला होणार विरोध याला असतो. पुरोगामी वर्ग हा वर्गव्यवस्था मानणारा असल्याने त्यांना सगळीकडे ‘शोषित-शोषणकर्ते-शोषण’ हेच दिसतात. त्यात आधुनिक विवेक म्हणजे शब्द प्रामाण्य नाकारणे हे प्रमुख असल्याने वैचारिक असणे म्हणजे वेद-शास्त्र-पुराणे थोतांड आहेत अशी एका टोकाची किंवा वेद-शास्त्र-पुराणे सध्याच्या आधुनिक काळात आता अप्रस्तुत (irrelevant) आहेत अशी मवाळ भूमिका घेणे. भारतीय दर्शन शास्त्रांचा उगम आणि विकास झालाय आणि अजूनही होतोय त्याच्या मुळाशी असलेला मूळ प्रश्न हा ‘आत्यंतिक दु:ख निवृत्ति आणि शाश्वत सुख प्राप्ती साठी योग्य मार्ग कोणता?’ हा आहे. आधुनिक वैचारिक बैठक असणाऱ्या लोकांनी याचा अभ्यास केला पाहिजे. जे लोक कोणत्या तरी विचारावर विश्वास (blind faith/belief या अर्थी) ज्यात आस्तिक-नास्तिक दोन्ही गट आले, त्यांच्या कडून उपनिषद ज्याला श्रद्धा म्हणतात त्याची अपेक्षा आपण करू शकत नाही.

आता सुधारक (progressive) विचार आणि भारतीय अध्यात्म यात जे मूळ दोन मुद्दे आहेत तिकडे वळू. आधुनिकतेची मूल्यं आणि भारतीय विचार यांचा झगडा ‘कर्म-कांडातून निर्माण होणारी अंधश्रद्धा/फसवणूक’ आणि ‘ईश्वराचं रूप हे ख्रिश्चन किंवा इस्लाम या एकेश्वरवादी विचारांप्रमाणेच हिंदू विचारात आहे त्यामुळे आधुनिकतेची कास धरायची असेल तर हे धर्माचं ओझं कमी केलं पाहिजे’ या दोन मुद्यांभोवती घोटाळत राहतो. त्यात जाती-व्यवस्थेच्या दोषांमुळे निर्माण झालेली विषमता व दैन्य हा संलग्न मुद्दा आहेच. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेतच आणि त्याचा सतत पाठपुरावा करून जे दोष आहेत ते दूर करीत राहणे गरजेचे आहे. सध्याचा आधुनिक विवेक विचार आणि त्यातून होणारी श्रद्धेची हेटाळणी यात ‘कर्म-कांडाच्या मागे जाणारा समाज प्रगती (ऐहिक) करू शकत नाही, त्यांच्यात नव निर्मिती होत नाही आणि अधोगती होऊन पारतंत्र्याचे जोखड येते’ हा निष्कर्ष आहे. भारतीय परंपरेत हा निष्कर्ष नवा नाही. चार्वाक, बौद्ध, जैन ते सांख्य व योग या दर्शन विचारांमध्ये कर्म-कांडावर कडाडून टीका आहे. इतकंच काय तर, वेदांच्या पूर्व भागात असलेल्या कर्म-कांडावर वेदांच्या शेवटी – वेदांताची सुरुवात ही या टीकेनेच होते. ऋषिंच्या मनात उपनिषदं उमटली ती सुद्धा कर्म-कांडाच्या मोक्षप्राप्तीप्रती असलेल्या मर्यादा लक्षात आल्या म्हणूनच! भारतीय दर्शन शास्त्रं समजून घेतली तर आधुनिक युगात मोक्ष प्राप्ती कशी होईल याची समज वैज्ञानिक दृष्टीने विचार करणारांमध्ये निर्माण होईल.

जे लोक स्वत:ला वैचारिक आणि ‘आम्ही सर्व विचार तपासून घेतो’ असा पवित्र घेतात त्यांनी तरी किमान उपनिषद ज्याला श्रद्धा म्हणतात ते तत्व बाणवून भारतीय विचारातला विवेक हा खरा प्रगत विचार आहे की नाही यावर विचार करावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ3

हू आर यू?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अभिजित देशपांडे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(सांगण्याचा मुद्दा एवढाच होता, की नानावटींच्या लेखापेक्षाही तो प्रतिसाद भयंकर आणि पकाऊ आहे. असो.)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही तो ३ शब्दांच्या पुढे वाचलात का? दाद दिली पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

इदं न मम।

हे श्रेय मी घेऊ शकत नाही!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मूळ लेखाचा उद्देश विरंगुळा होता. त्यात उल्लेखलेले स्पिरीच्युअल अनुभूतींचे किस्से हे विरंगुळा म्हणूनच वाचले गेलेत आणि जातात.

पण हा प्रतिसाद त्या विरंगुळ्याला ‘टॅन्जन्ट’ मारून दर्शनशास्त्रांचे मर्म उलगडून सांगण्याचा प्रयत्न करतोय. ‘अध्यात्म हे एक फॅड आहे’ ह्या मतप्रवाहाला, तो मतप्रवाह तसा का झाला आहे आणि तो तसा का असू नये हे अत्यंत सुरेख, मुद्देसुद, क्रमवार आणि संयत पद्धतीने ह्या प्रतिसादात कव्हर केलंय.

खरंतर हा संपूर्ण प्रतिसाद, एक स्वतंत्र लेख म्हणून वेगळा करून, त्यावर निकोप चर्चा घडावी इतका रोचक आहे!

‘आत्यंतिक दु:ख निवृत्ति आणि शाश्वत सुख प्राप्ती’ या मोक्षाचे मार्ग दाखवणारा हिंदू धर्म ज्याला आपण सरसकट ‘अध्यात्म’ म्हणतो त्यात अनुभव, अनुभूति आणि ज्ञान यात नेहमी गल्लत केली जाते.

_/\_

- (प्रतिसाद अतिशय आवडलेला) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू लोकांची आध्यात्मिक गुरू, बुवा-बाबा लोकांची एक इकोसिस्टिम तयार झालीय. मग हळूहळू त्यांचे डे टू डे युझेबल प्रॉडक्ट्स विक्रीसाठी येतात भक्तगणांच्या मार्फत. हर्बल आणि आयुर्वेदिक फॉर एनहान्स इम्युन सिस्टीम वगैरे वगैरे.
हिल स्टेशनवरील सत्संगात ब्रँडेड कारमधून जातात. तालुकास्तरीय सत्संगात माळरानावरील भव्य मंडपात ट्रक टेम्पोतून येतात. गावाकडे सप्ताह सोहळे साजरे होतात. मेट्रोसिटीत कोणी हौशी नगरसेवक आपला वॉर्डातील कोण्या एका मोठ्या हॉल मध्ये शोभायात्रा वगैरे काढून फ्लेक्स बाजी करून कल्चरल इन्व्हॉल्वमेंट दाखवतात. बाकीचे अल्ट्रालिजंडस डायरेक्ट राष्ट्रपातळीवर धर्मसंसद वगैरे परिषदा आयोजित करतात.
अजब गजब अध्यात्मिक लोकांचे हायफाय फंडे लय भारी असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

माऊंट अबुला नेहमीची सर्व ठिकाणे पाहून झाल्यावर हॉटेलवाल्याने सल्ला दिला. 'ब्रह्माकुमारीजची फुलांची बाग पहायची असेल तर आधीच्या ब्रेन वॉशिंगची तयारी असेल तरच जा. फुलांचे आकर्षण असल्यामुळे आम्ही तिथे गेलो. आधी एका ऑडिटोरियममध्ये ती ५००० वर्षांची थिअरी, सत्ययुगातली राखीव सीट वगैरे आमिषांना बळी न पडता पेशंटली बसून राहिलो. नंतर त्यांच्या बागेत आम्हाला सोडण्यांत आलं. खरोखरच उत्कृष्ट बाग होती ती. तिथे जाण्याचं सार्थक झालं असं वाटलं. पण परत बाहेर येताना त्यांच्या पुस्तक विक्री काऊंटर्स मधून जावं लागलं. पुन्हा तो पोकळ शब्दांचा भडिमार चुकवण्यासाठी दोन -चार पुस्तके विकत घ्यावी लागली.
त्यांच्या पंथात एकदा गेलेल्या व्यक्तिला परतीचा मार्ग बंद असतो असे नंतर कळले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्हीही गेलो होतो तेथे, परंतु ही ब्रेनवॉशिंगची भानगड कळल्यावर बागेला टांग दिली. ‘बाग नको, परंतु ब्रेनवॉशिंग आवर.’

बाकी, मुंबईत काही काळ एका ब्रह्मकुमारी-टैप कुटुंबाच्या घरी पेइंगगेस्ट म्हणून राहात होतो. आता, शितावरून भाताची परीक्षा करावी, किंवा कसे, कल्पना नाही, परंतु, ब्रह्मकुमारी मंडळींच्या बौद्धिक पातळीबद्दलचे माझे मत निदान तेव्हा तरी फारसे चांगले झाले नव्हते. (अर्थात, कोणत्याच कल्टची अथवा झुंडीची बौद्धिक पातळी फारशी ग्रेट नसतेच, म्हणा.) पुढे, अधिक वाचनाअंती, हा एका सिंधी बिझनेसमनने सुरू केलेला प्रकार आहे, असे कायसेसे कळले, आणि हा लोकांना चु*या बनविण्याचा प्रकार असल्याबद्दल खात्री पटली. (जनरलायझेशन होते आहे, कल्पना आहे; नाइलाज आहे.) असो चालायचेच.

त्यांच्या पंथात एकदा गेलेल्या व्यक्तिला परतीचा मार्ग बंद असतो असे नंतर कळले.

त्या कोणत्याश्या गुहेबाहेर, आत जाणाऱ्या पावलांचे ठसे दिसायचे, परंतु बाहेर येणाऱ्या पावलांचे नाहीत, तद्वत?
—————

फाळणीपूर्व काळात, हैदराबाद सिंधमध्ये. फाळणीत यांचे उच्चाटन होऊन ही मंडळी पाकिस्तानातून गाशा गुंडाळून माउंट अबूला येऊन प्रस्थापित झाली. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यांच्या पंथात एकदा गेलेल्या व्यक्तिला परतीचा मार्ग बंद असतो असे नंतर कळले.

नक्की काय करतात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रजापिता ब्रह्माकुमारी- अध्यात्मिक बुरख्याआडची सोनेरी टोळी असा वृत्तांत लेख अंनिस वार्तापत्र वार्षिक विशेषांक 2001 मधे माझी बायको मंजिरी घाटपांडे व तिची सहकारी कल्याणी गाडगीळ यांनी दिला होता. माउंट अबू ला प्रत्यक्ष सविस्तर भेट देउन घेतलेला तो मागोवा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

काही तपशील/दुवा, वगैरे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखच टाकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ब्रम्हकुमारी भयानक प्रकार आहे. नात्यातील अगदी जवळच्या दोघीजणी वयाच्या चाळिशीत ह्या पंथाच्या नादी लागून " आजपासून माझा पती माझा बंधू " ( च्यायला त्यांच्या भाषेत भाई म्हणतात ) असे म्हणून पतीच्याच घरात स्वतंत्र राहू लागल्या. कांदा लसूण बंद. दुसऱ्याच्या हातचे ( त्यांच्या पंथातील व्यक्ती , रजोनिवृत्त स्त्रिया अपवाद ) खाणे वर्ज्य. रक्ताच्या नात्यातील सगळे एका क्षणात अपवित्र झाले. कुठेही गेले तरी ह्याचा जेवणाचा डबा बरोबर असतो. बाहेरील पदार्थ चालतात ह्यांना,खासकरून जैन बेकरीतील. का तर म्हणे ती लोकं कांदा लसूण खात नाहीत ,म्हणजे पवित्र आत्मे. कांदा लसणाची सवय असलेल्यांना बिनाकांदा लसणाच्या भाज्या मिळमिळीत वाटू लागल्या.
पतीच्या पोटाच्या भुकेचे आणि शरीराच्या भुकेचे तीन तेरा वाजले. जे व्हायचे तेच झाले. एकीचा पती बाहेरचे खाऊ लागला आणि बाहेरचे नाद लागले. पती एके दिवशी आमच्या पंथात नक्कीच येईल इतकी शक्ती आहे आमच्या पंथात.घरात रोज मुरली होते परंतु तिचा पती बाहेरच रमतोय. सुरवातीला दुसरीची मुलेही भारावून ह्या पंथात गेली होती ब्रम्हचारी होण्यासाठी. शेवटी निसर्गाने त्याचे काम चोख बजावले दोघेही प्रेमविवाह करून पंथाला सोडचिठ्ठी देऊन सुखाने संसार करत आहेत. घरात आईसमोर नॉनव्हेज खातात. आई मुरल्या वाचत आहे. आणि हो दोघींचे सीट कन्फर्म आहे पुढील जन्मासाठी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण3
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ब्रह्म कुमारी पंथ म्हणजे हे सर्व मान्य करायचे.
अवघड आहे .
.
तरी लोक नादाला लागत असतील तर ते मानसिक रोगी च असले पाहिजेत.

ब्रह्म कुमारी चे हे तत्व ज्ञान आहे माहीत च नव्हते.तुमच्या कॉमेंट मुळे माहीत पडले.
कोणाला त्रास देवू नये ,कोणावर अन्याय करू नये
अशी काही किरकोळ तत्व मी जीवनात अमलात आणतो.
बाकी ब्रह्म कुमारी किंवा बाकी पंथाची माहिती पण ठेवत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रामदेवबद्दल माझं मत एखाद्या फुलपाखरासारखं आहे. कितीही काहीही वेडंवाकडं असलं तरी बुवा योग जबरदस्त करतो आणि त्याच्या शरीराची लवचिकता अक्षरश: असामान्य आहे. बाकी त्याच्या इंडस्ट्रीॲलिझमबद्दल वेगळं लिहेन. अध्यात्म वगैरेमध्ये तो जास्त पडत नाही हा हत्तीएवढा मोठा प्लस प्वाईंट. पतंजलीचे साबण आणि कोरफड जेल ह्यांना प्रचंड मागणी आहे, आणि ते बाजारात सध्या तरी सगळ्यात स्वस्त आहेत. (स्रोत: माझा स्वत:चा शोध: यार्डले, मेडिमिक्स, म्हैसूर, अनुवेद, संतूर, हमाम, लक्स, डेटॉल, एक्स ह्या सगळ्यांपेक्षा.)

सधगुरु मात्र तिडीक आणतो. हिंदुत्ववादी तरुणाई ह्याला खूप मानते. हा बुवा महाशिवरात्रीला भक्तगणांच्या मध्ये एका रॅम्प वर येऊन नाचबिच करतो आणि भक्तगण कोल्डप्ले च्या कॉन्सर्टला आल्यासारखं कायतरी करत असतात. शिवाय विचारलेल्या प्रश्नांना गॅसलाईट तर इतकं करतो की एल्पीजीचे भाव कमी झाल्याचा भास व्हावा. इथे काहीतरी सर्क्युलर आर्ग्युमेंट झालंय कारण अध्यात्मातलं कळल्यासारखं दाखवायचं असेल तर ह्याच्या इंस्टाग्राम पोष्टी हा 'ह्या' तरुण मंडळींचा लसावि आहे. शिवाय तो चुंबकवाला व्हिडीओ त्याने अतिशय तत्परतेने काढून टाकलेला आहे, म्हणजे बुवा धूर्त आहे इतकं नक्की. ह्याच्या सगळ्या नाटकाचा अफझलखान करायचाय पण त्याला भयानक क्रिंजफेस्ट सध्ग्रू कंटेंट वाचत/पाहत बसावा लागेल.

हा रुमाल समजायला हरकत नसावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

शिवाय तो चुंबकवाला व्हिडीओ त्याने अतिशय तत्परतेने काढून टाकलेला आहे

ही नक्की काय भानगड आहे?

(नाही, प्रत्यक्ष व्हिडियो नको. तो बघण्याइतका पेशन्स नाहीये. नुसते वर्णन करून सांगितलेत, तर उत्तम.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रामदेवची एकमेव आवडणारी गोष्ट म्हणजे टूथपेस्ट. इतकी चांगली टूथपेस्ट इतक्या स्वस्तात कशी विकतो काय माहिते!
बाकी, ह्या राम्या आणि बाळ्याचे काळे धंदे उघडकीस आणून यांना जेलमध्ये डांबण्याचे सत्कार्य आज ना उद्या सरकारला करावे लागणार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

आता प्रतेक गोष्टी ची व्यावसायिकता कडे वाटचाल चालू आहे
Hifi अध्यात्म ह्याचा अर्थ च अध्यात्म हा व्यवसाय म्हणून develop केला आहे.
आता च्या धावपळ असणाऱ्या जीवन शैलीत मानसिक ताण येतो.
त्या साठी असे hifi गुरू ची गरज असते.
Five star सुविधा ह्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी असतात .पैसे खर्च करणारा वर्ग आकर्षित करायचं असेल तर सर्व कसे hifi च हवं

.ह्याचा अर्थ अध्यात्म म्हणजे जीवनाकडे कसे बघावा हा उपदेश बदलत नाही

तो जीवनाचे सार सांगतो..
गरिबांचे मार्गदर्शक योगी ,महात्मे वेगळे असले तरी उपदेश वेगळा नसतो.
फक्त ब्रँड वेगळा असतो.

उपदेश हे दुसऱ्या साठी असतात स्वतः त्या वर अमल करायचा नसतो.
हेच तत्व भक्त पण अमलात आणतात ते पण दुसऱ्याला च उपदेश करतात .जीवन माया आहे, मोहातून बाहेर या,संपत्ती इथेच सोडून जायची आहे.
सत्य बोला,कोणाला फसवू नका,हत्या करू नका.
.हे सर्व उपदेश अध्यात्म शिकवणारे देतात पण..ते स्वतः पण ते पाळत नाहीत आणि ऐकणारे पण पाळत नाहीत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0