मह्या आणि मी आणि ...

चारेक महिन्यांपूर्वीची गोष्ट.

रविवार दुपार होती. आम्ही मह्याच्या घरी बसलो होतो. वेळ जात नव्हता, म्हणून रद्दीच्या दुकानांमधून जुनी पुस्तकं शोधून ती मूळ मालकाला विकायचा बिझनेस केल्यावर उरलेली पुस्तकं चाळत बसलो होतो.

"भेंजो ही १९८०-९० च्या दरम्यान भा रा भागवतांची चिकार पुस्तकं होती ना रे?" मह्यानी विचारलं.

"हो रे. दहाबारा पुस्तकं विकली, तरी अजून चारपाच शिल्लक आहेत. आणि आपणपण लहानपणी वाचायचो की!"

"हो. माझं फेवरेट होतं ते आहे इथं - मुंबईला चक्कर."

"हो. कोणीतरी बेट लावतं म्हणून बिपीन बुकलवार ठराविक वेळेत मुंबईला पूर्ण फेरी मारतो अशी स्टोरी होती."

"भेंजो तो जमाना निराळा असणार. आता असा बिपीन बुकलवारपण नसेल, आणि अशा बेट लावणारंपण कोण नसेल."

"पॉईंट आहे. जाऊदे भेंजो. पण हा किस्सा ब्लॉगवर टाकायला चांगला आहे. "मुंबई आहे बेट, पण कोणी लावत नाही बेट" असं टायटल देतो."

"ब्लॉगवर टाक, पण हे टायटल नको."

मग मी ब्लॉगवर टाकलं, आणि आम्ही दोघे सुट्टा मारायला सद्गुरू स्टॉलला गेलो.

===================================

आता माझ्या ब्लॉगवर कधी फारशी ट्राफिक नसते. शाळा-कॉलेजातले काही मित्र, फेसबुक-इंस्टावरचे मित्रमैत्रिणी एवढेच. (शाळा-कॉलेजात मैत्रिणी नव्हत्या हा निष्कर्ष चाणाक्ष वाचकांनी काढला असेलच.) पण "मुंबईला चक्कर"च्या पोस्टवर एकदम अचानक कमेंट आली.

"बेट लावायची तयारी असेल तर अमुक अमुक पोस्ट बॉक्सला सुवाच्य हस्ताक्षरात पत्र पाठवा."

मी मह्याशी बोललो, आणि जमेल तेवढ्या सुवाच्य अक्षरात आम्ही पोस्ट बॉक्सला पत्र पाठवलं.

चारपाच दिवसांनी मला फोन आला.

"मी महापात्रा, महापात्रा, आणि महापात्रा असोसिएटसमधून महापात्रा बोलतोय. आमच्या अशीलाच्या सांगण्यानुसार तुम्हाला फोन करतोय. बेटची पूर्ण माहिती घेण्यासाठी आमच्या कचेरीत येऊन भेटा."

"येतो. पण कोणत्या महापात्रांना भेटायचं? थोरल्या, मधल्या, की धाकल्या?" मी विचारलं.

"कोणत्याही महापात्राला भेटा. या अशीलाचं काम आम्ही तिघेही बघतो," महापात्रांनी पाॅझ घेतला, "आणि आम्ही तिळे आहोत."

दुसऱ्या दिवशी मह्या आणि मी त्यांना भेटायला गेलो.

"भा रा भागवतांच्या "ब्रह्मदेशातला खजिना" या पुस्तकात वर्णन केलेला प्रवास तुम्हाला, म्युटाटीस म्युटांडीस, करायचा आहे. प्रवास पूर्ण केल्यास तुम्हाला प्रत्येकी दहा लाख रूपये मिळतील. हे पैसे एस्क्रो अकाऊंटमध्ये ठेवले जातील. प्रवासखर्च वगैरे म्हणून काही रक्कम आधीच दिली जाईल. आहे कबूल?"

"कबूल, कबूल, कबूल!" मह्या आणि मी एकदमच ओरडलो.

===================================

आता ब्रह्मदेशात जायचं खरं, पण तिथली भाषा, चालीरीती हे कोणाला माहितीय भेंजो? गाईड घेतला तर चालेल का, हे विचारायला मी महापात्रांना फोन केला.

"गाईड चालेल की. माझ्याकडे तीन गाईड्सचे इमेल आयडी आहेत; हे घ्या," महापात्रा मदतीला तत्पर होते.

मह्यानी तिन्ही गाईड्सना ईमेल केले; आणि एका गाईडने आम्हांला ब्रह्मदेशाच्या राजधानीत भेटायचं कन्फर्म केलं.

"चलो रंगून!" मी बोललो.

विकिपिडिया वाचणारा आमचा मह्या म्हणाला, "एकतर रंगूनचं नाव आता यांगाॅन झालंय. दुसरं म्हणजे म्यानमारची राजधानी आता वेगळीच आहे. नेप्यिडाॅ नावाची."

"भेंजो म्हणजे रंगोलीत लागणाऱ्या त्या गाण्याचं आजचं व्हर्जन "मेरे पिया गये नेप्यिडाॅ" असं होईल की! त्याचं टेलिफूनशी यमक कसं जमवायचं?"

"गप भेंजो. आपण यांगाॅनला जाऊन तिथून टॅक्सीने जाऊ."

व्हिसा वगैरे तसा सहज मिळाला. ऑफिसात सुट्टीचंपण साॅर्ट केलं. प्रवासखर्चाचा ॲडव्हान्स महापात्रांनी दिला. आणि आम्ही विमानाने यांगाॅनला, आणि तिथून टॅक्सीने नेप्यिडाॅला पोचलो.

गाईडने सांगितलेल्या हाॅटेलच्या लाॅबीत आम्ही चहा पीत बसलो होतो. दुपारचे तीन वाजले होते. अचानक काॅन्सिअर्ज काऊंटरजवळच्या बॅगांमागून एक बाई अवतीर्ण झाल्या. तशा वयस्कर वाटत होत्या. पेस्टल कलरचं पातळ आणि वर ब्राऊन बाॅम्बार्डिअर जॅकेट, अशा वेषातल्या त्या बाई आमच्या टेबलकडे आल्या आणि म्हणाल्या, "तुम्हांला भेटून आनंद झाला. मी तुमची गाईड. ईमेल आयडी दलास्टब्राऊनहंटर. पाळण्यातलं नाव सिंधु बसराकर. यू मे काॅल मी सिंधुआज्जी!"

===============================

"वुई मे काॅल यू सिंधुआज्जी?" मह्या अचंबित होऊन म्हणाला. त्याला असं अचंबित झालेलं मी पहिल्यांदाच बघितलं.

"यू मस्ट काॅल मी सिंधुआज्जी!" सिंधुआज्जी ठामपणे म्हणाल्या.

"भेन् .. भे .. भेटून आनंद झाला," मह्याचा मेंदू परत काम करू लागला होता.

"चला. माझा सहकारी वाट बघतोय," सिंधुआज्जी म्हणाल्या आणि हाॅटेलच्या दरवाजाच्या दिशेनी चालू लागल्या.

आम्ही पार्किंग एरीयात आलो. सिंधुआज्जी एका ओपन जीपकडे वळल्या. जीपमध्ये ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर कोणीतरी बसलं होतं.

"भेंजो! अस्वल!" माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हते.

"काळजी करू नका. तो ड्रायव्हिंग करणार नाही," सिंधुआज्जी म्हणाल्या. "बसा बसा. आपल्याला लांबचा पल्ला गाठायचाय."

मह्या आणि मी मुकाट्याने मागच्या सीटवर बसलो. भेंजो आजवर चिकार जुगाड केले होते; पण म्यानमारमधे अस्वलासोबत जीपचा प्रवास करू असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं.

===================================

"अर्ध्या तासात माझं आवडीचं उपहारगृह आहे. तिथे थांबूया," सिंधुआज्जी म्हणाल्या.

आम्हाला भूक लागली होती, आणि ऑथेन्टिक बर्मीज खाओ सुए ट्राय करायचीच होती.

सिंधुआज्जींनी धुरळा उडवत सफाईदार वळण घेऊन जीप थांबवली. धुरळा विरळ झाल्यावर आम्हाला गिफ्ट शाॅप दिसलं.

"इथे खाओ सुए मिळेल?" मी जरा कन्फ्यूज होऊन विचारलं. (या पदार्थाला मी आधी "खाऊ सुई" म्हणायचो. मग बाॅसिणीनी एकदा करेक्ट केलं होतं.)

"नाही. हे उपहारगृह आहे; उपाहारगृह नाहीये," जीपमधून उतरत सिंधुआज्जी म्हणाल्या. "तुम्ही आत जाऊन माझ्यासाठी भेटवस्तू घेऊन या. मी तोवर जीपच्या तेलपाण्याचं बघते."

मह्या आणि मी मुकाट्याने गिफ्ट शाॅपमधे गेलो. सुदैवाने दुकानदार इंग्रजी बोलत होता. "लव्ह नेप्यिडाॅ"चे फ्रीज मॅगनेट घेऊन आम्ही बाहेर आलो. गिफ्ट बघून सिंधुआज्जी तोंडभर हसल्या, आणि त्यांनी आम्हाला "आयुष्यवंत व्हा" असा आशीर्वाद दिला.

===================================

मजल दरमजल करत आमचा प्रवास चालू होता.

"हे पहा, हा रस्ता उषाच्या माहेरच्या गावी जातो. आणि हा रस्ता हेलनच्या गावी." सिंधुआज्जींची रनिंग काॅमेंटरी चालू होती.

"कोण उषा?" मी भीतभीत विचारले.

"उषा नारायणन. भारताच्या माजी राष्ट्रपतींच्या सुविद्य पत्नी," मह्यानेच उत्तर दिले.

"छान! तू चांगला हुशार आणि चौकस बुद्धीचा दिसतोस," सिंधुआज्जी कौतुकाने म्हणाल्या.

"आणि हेलन म्हणजे बाॅलीवूडमधल्या ना?" मी विचारलं.

"हो," एवढंच बोलून, माझं कौतुक न करता सिंधुआज्जींनी जीप वळवली.

"आपण कुठे जातोय?" मी थोड्या वेळानं विचारलं.

"मंडाले. तिथला तुरूंग बघायला."

"लोकमान्य टिळकांना कारावास झाला ती जागा बघायला?" मह्यानी परत हुशारी आणि चौकस बुद्धी दाखवली.

"त्या जेलरास काय स्वप्नात द्रष्टांत झाला होता काय रे ... इथे पुढे टूरिस्ट येणार म्हणून? कुणाची तरी कोठडी दाखवली नि दिलं ठोकून त्याच्यावर टिळक इथे होते म्हणून! पुरावा काय?" सिंधुआज्जी म्हणाल्या आणि आम्ही दोघं गप्प बसलो.

===================================

पुढचे दोनतीन दिवस आम्ही बरेच भटकलो. इरावती नदीचं विस्तीर्ण पात्र बघितलं. स्लाॅथ्या अस्वलाने फोडलेल्या पोळ्यांमधला मध चाखला. टपऱ्यांवर चहा प्यायलो. फाईन डाईन रेस्तराँ मध्ये खाओ सुए खाल्लं. ऑरवेलचं घर बघितलं.

मग एकदा ब्रेकफास्ट करताना मह्यानी सिंधुआज्जींना विचारलं, "सिंधुआज्जी, "ब्रह्मदेशातला खजिना" पुस्तकातला प्रवास करायला हवा आता. नाहीतर बेट कशी जिंकणार?"

सिंधुआज्जी हसून म्हणाल्या, "तुमचा ईमेल आठवतोय मला. त्यात लिहिलं होतं - पुस्तकातला प्रवास म्युटाटीस म्युटांडीस करायचाय. म्हणजे आवश्यक ते बदल करून. तुम्हांला हवं तर त्या वकीलांना विचारून बघा."

सिंधुआज्जींनी जीपमधून त्यांचा सॅटेलाईट फोन काढला, आणि महापात्रांना फोन लावून दिला. मह्या आणि मी एका महापात्राशी बोललो. पैजेची अट पूर्ण झालीये असं त्यांनी कन्फर्म केलं.

मह्या आणि मी हुश्श केलं. सिंधुआज्जी म्हणाल्या, "बरं झालं बाई. मलापण घरची आठवण येतेय आता."

त्या दुपारी आम्ही यांगाॅनला पोचलो, आणि सिंधुआज्जींचा आणि स्लाॅथ्याचा निरोप घेऊन परतीचा प्रवास सुरू केला.

===================================

मुंबईत पोचल्यावर आम्ही डायरेक्ट महापात्रांच्या ऑफिसात गेलो. तिन्ही महापात्रा आमची वाट बघत होते. त्यांनी आम्हाला आधी ग्रीन टी दिला, आणि मग बेट जिंकल्याचे चेक दिले.

"पण तुमच्या अशीलाला वाईट नाही वाटणार, एवढा खर्च झाला त्याचं?" मी विचारलं.

"नाही नाही. त्यांना हा सगळा अनुभव रोचक वाटला. त्यांनी थ्रिलसाठी खर्च केला असं समजा."

"बरं. त्यांना आमच्याकडून धन्यवाद सांगा," मह्या म्हणाला.

"तुम्हीच का नाही सांगितलं?" एक महापात्रा हसत म्हणाले. "चारपाच दिवस तुमच्याबरोबरच तर होत्या सिंधुआज्जी!"

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

गोष्टीचा पॉइंट लक्षात आला नाही. (बहुधा नसावा.)

परंतु, ठीक आहे. गोष्टीत स्लॉथ्या आहे, मजा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्राॅस-ओव्हर जाॅन्रचा प्रयत्न एवढाच पाॅईंट Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सिंधुआजींचं जोरदार स्वागत आहे. नेहमीप्रमाणे धमाल. आता पुढला कोणता देश निवडताय भटकायला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

This too shall pass!

कथेचा शेवट वाचल्यावर ट्युब पेटली की मह्याने ई मेल केलेले तिन्ही पत्ते सिंधुआज्जींचेच
असणार, भेंजो!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0