लेखकू(ला) व्हायरल होतो
सध्या लेखकू फार अस्वस्थ होता. तसा तो सोशल मीडियावर मागची बरीच वर्षं होता. तिथं तो अधूनमधून फुटकळ लिखाण करायचा. त्याला माफक प्रतिसादही मिळायचा. पण आत्तापर्यंत तो कधी व्हायरल झाला नव्हता. कभी वो सोशल मीडियापे छा नहीं गया था. ‘सोशल मीडिया सेलेब्रिटी’ असलेल्या लोकांनी एखादी पोस्ट करायचा अवकाश, की लगेच त्यावर कमेंटींचा पाऊस सुरू होतो, त्यांना ते सविस्तर उत्तरं लिहितात, त्यातल्या काही कमेंटींच्या वेगळ्या पोस्ट्स होतात, मग त्यावर अजून कमेंटी येतात, मग अजून पोस्ट्स… पोस्ट, प्रतिपोस्ट, उपपोस्ट, प्रतिउपपोस्ट, कमेंटी, उपकमेंटी, प्रतिउपकमेंटी, हॅशटॅग्स, स्क्रीनशॉट्स, मिम्स - ‘बिग बँग थिअरी’ नुसार एका ठिपक्यापासून जसं विश्व तयार झालं तसं एका पोस्टीपासून एक छोटंसं विश्वच सोशल मीडियावर तयार होतं. या सगळ्या घडामोडी लेखकू अगदी भान हरपून बघत रहायचा. इतकं सगळं करण्यासाठी हे लोक वेळ कसा काढतात असा एक प्रॅक्टिकल प्रश्न त्याला पडायचा खरा, पण सध्या मात्र त्याला वेगळाच प्रश्न सतावत होता - हे माझ्याबरोबर कधी होणार? कुठं फेसबुक उजळवून टाकणारी या सेलेब्रिटी पोस्ट्सची रोषणाई, आणि कुठं ‘छान’, ‘सुंदर’, ‘तरल’ असल्या दहापाच कमेंट्स मिळवून, पुरेशी दारू न भरलेल्या फटाक्यासारख्या धुसफुसून लगेच विझून जाणाऱ्या आपल्या केविलवाण्या पोस्ट्स! छे- सोशल मीडियावरच्या आपल्या अस्तित्वाला काही अर्थच नाहीये. कशाला रहायचं इथं? सरळ सोडून जावं का? पण आपण सोडून गेल्यानं कुणाला फरक पडणार आहे? काही लोकांनी ‘आता थोडा वेळ फेसबुकवरून ब्रेक घेतोय’ अशी पोस्ट केली रे केली की लगेच त्यांचे चाहते ‘ न जाओ सैय्या छुडाके बैय्या’ च्या आविर्भावात त्यांना न जाण्याची गळ घालतात. पण आपल्याबद्दल तसं थोडंच होणार आहे? आपण सोशल मीडियावर आहे काय, नाही काय - कुणालाच फरक पडणार नाही या जाणिवेनं तो फारच खिन्न झाला. त्याची झोप उडाली. तहानभूक हरपली. शेवटी त्यानं काकांना गाठायचं ठरवलं…
खरं तर हे ‘काका’ म्हणवणारे गृहस्थ लेखकूपेक्षा फारसे मोठे नव्हते. पण त्यांना त्यांच्या वर्तुळात थोडाफार मान होता. ते काही देश फिरले होते, त्यांनी वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या होत्या, त्यांच्या घरी पुस्तकांचा संग्रह होता आणि ते त्या पुस्तकांतली वाक्यं बोलण्यात अधूनमधून पेरत, त्यामुळं ‘काकांना बरंच समजतं, त्यांच्याकडं सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात’ असं त्यांच्या मित्रांना वाटायचं आणि ते काकांकडं सल्ला विचारायला वगैरे जायचे. किरकोळ कर्तबगारी गाजवलेली माणसं फेसबुकवर जशी ‘सर’ बनून जातात तसे हे गृहस्थसुद्धा ‘काका’ बनून गेले होते. अर्थात काकांनाही सगळ्याच बाबतीतली माहिती असायची असं काही नाही, पण एखादा अवघड प्रश्न आला की ते ‘मला माहित नाही’ असं सरळ न सांगता उगाचच गूढ मंदस्मित करत दाढदुखी झाल्यासारखा चेहरा करून समोरच्याकडं बघत रहायचे. समोरचाही ‘काकांच्या हसण्यातूनच मला उत्तर समजलं ’ असं म्हणत परतायचा.
रविवारी दुपारी लेखकू काकांकडं गेला तेव्हा काका आरामखुर्चीत सांडले होते. त्यांच्या बनियनवर एक माशी निवांत विसावली होती आणि काका एक जाड पुस्तक हातात घेऊन तिला मारायच्या बेतात होते. त्यांनी पुस्तकाचा फटका आपल्या पोटावर मारायला आणि लेखकू दरवाजा उघडून आत आल्यानं घाबरून ती माशी उडून जायला एकच गाठ पडली. काका किंचित कळवळले.
“सॉरी काका, माशी मारताना डिस्टर्ब केलं का?” लेखकूनं अपराधीपणे विचारलं.
“नाही हो, माशा मारायला कुणाला वेळ आहे?” काका थोडेसे उखडले, ”या पुस्तकातलं एक प्रकरण संपवून चिंतन करत होतो.”
“ ‘ अतिप्राचीन आणि नवअर्वाचीन कलाभ्यासातील मूलधागे: एक व्यामिश्र आढावा’. .. बापरे! फारच जटिल विषय दिसतोय. म्हणजे नक्की कशावर आहे हो हे पुस्तक?” लेखकू पुस्तकाचं नाव वाचत म्हणाला. यावर काकांनी दाढदुखी + मंदस्मित वाला चेहरा केला आणि ते म्हणाले, “तुमच्यासारख्या सोशल मीडियावरच्या प्रसिद्ध लेखकाला माहित नाही? कमाल आहे! ” काकांनी नेमकं दुखऱ्या नसेवर बोट ठेवल्यानं लेखकू कसनुसा झाला आणि म्हणाला,” काका, खरं तर त्याबद्दलच तुमच्याशी बोलायचं होतं.”
“हं, असं आहे तर,” लेखकूनं त्याची समस्या ऐकवल्यावर काका उद्गारले.
“काही मार्ग आहे का?” लेखकूनं अधीरतेनं विचारलं.
“तुम्ही जे मिळमिळीत लेखन करता त्यानं काही तुम्ही व्हायरल होणार नाही. पण बाकी काही मार्ग नक्कीच आहेत,” काका थोडं थांबून म्हणाले, ”मला सांगा, तुम्ही कुठल्या कॅम्पात आहात?”
“कॅम्पात म्हणजे?”
“म्हणजे मोदीभक्त, मोदीद्वेष्टे, पुरोगामी, सनातनी, लिबरल, संघवाले, धार्मिक, निरीश्वरवादी…. कुठल्यातरी कॅम्पात असणं फार गरजेचं आहे. कारण तसं असलं की आपल्या बाजूचा उदोउदो करणारी नाहीतर विरुद्ध बाजूला सडकून शिव्या देणारी आक्रस्ताळी पोस्ट लिहिता येते. म्हणजे आपल्या बाजूची मंडळी ‘जी जी रं जी’ करायला आणि विरुद्ध बाजूची मंडळी ट्रोल करायला पोस्टवर जमतात आणि पोस्ट व्हायरल होऊन जाते."
“खरं सांगू का काका, याबाबत माझं थोडं पु. लं. च्या धोंडो भिकाजी जोश्यासारखं होतं- म्हणजे असली कुठली सडकू पोस्ट वाचायला लागलो की मला त्या पोस्टवाल्याचं सगळं पटतं. पण मग विरुद्ध बाजूच्याची पोस्ट वाचायला लागलो की त्याचंही पटतं. मग मी आपला दोन्हीकडं टिळे लावून येतो. त्यामुळं माझा असा कुठला कॅम्प नाहीच!”
“बरं ते सोडा. अजून कोणत्या महत्वाच्या गोष्टीबद्दल तुमची ठाम भूमिका आहे का? ग्लोबल वॉर्मिंग, रशिया-युक्रेन युद्ध, एआय शाप की वरदान, भारतात रहावं की परदेशात, फेमिनिझमची नक्की व्याख्या काय?, के. एल. राहुल संघात - म्हणजे क्रिकेटच्या संघात - असावा का? वगैरे…अशा विषयांवरच्या पोस्टलाही बराच ट्राफिक मिळतो."
“अहो काका, माझी कसली आलीये ठाम भूमिका? तुम्हांला सांगतो, शाळेत असताना मी ‘प्राण्यांना फुटले पंख’ नावाच्या नाटकात कुबड आलेल्या गाढवाची भूमिका केली होती. ती माझी नाटकातली एकमेव भूमिका. पण त्यातही ठाम राहता आलं नव्हतं, कारण कुबड आल्याची ऍक्टिंग करायची होती. मग आयुष्यात काय डोंबलाची ठाम भूमिका घेणार? पण काम मात्र चांगलं झालं होतं. ‘गाढव बरीक शोभलास हो!’ अशी शाबासकीसुद्धा नाटकाच्या वाळिंबे बाईंनी दिली होती,” जुन्या आठवणींनी लेखकू थोडा भावविवश झाला.
आता काका थोडे वैतागले होते. “ठीकाय, तेही जाऊदे. सोपं काहीतरी विचारतो- तुम्हांला कुठल्यातरी गोष्टीबद्दल तीव्र मतं आहेत का? ती गोष्ट कितीही टिनपाट असली तरी चालेल. "
“उदाहरणार्थ?"
“उदाहरणार्थ साधे खायचे पदार्थ घ्या - मिसळ, उपमा, पोहे, वडे, सांबार, आंबे, मीठ, लिंबू , पापड, पाणी - हे अमुक एका ठिकाणीच चांगले मिळतात, अमुक ठिकाणचे अतिशय फालतू असतात, अमुक प्रकारे केले तरच चांगले लागतात किंवा हा पदार्थच ओव्हररेटेड आहे अशी काही मतं घेऊन लिहिता येईल का तुम्हांला? मुद्दा कितीही सामान्य असो, पोस्ट मात्र अतिशय जहाल असायला हवी. "
“पण असल्या विषयावरची पोस्ट व्हायरल का होईल?”
“होते तर - सध्या फेसबुकवर काहीही होतं. निव्वळ अशा पोस्टी करून ज्ञानेश्वरांनी काय चालवली नसेल इतक्या जोरात आपली भिंत चालवणारे महारथी आहेत इथं. अशा पोस्टमुळं लगेच लोकांच्या भावना, अस्मिता वगैरे दुखावतात. ‘लवकरच महाराष्ट्रातले उद्योग बाहेरच्या राज्यांत जाणार आणि मग मराठी लोकांना बारीकसारीक कारणांवरून आपसात भांडत बसण्याशिवाय काम उरणार नाही’ असं भाकित काही महिन्यांपूर्वी एका धुरिणानं केलं होतं, ते खरंच होईल की काय असं वाटावं अशा होळ्या असल्या पोस्ट्सवरून पेटतात. म्हणजे पोस्ट व्हायरल व्हायची गॅरंटीच!"
“पण काका, माझं खाण्याबद्दलचं धोरण एकच आहे - जे समोर येईल ते बकाबका गिळायचं - बिल दुसरं कुणी देत असेल तर अधिकच बकाबका…"
हताश होऊन सुस्कारा सोडत काका म्हणाले, "तेही राहू द्या. तुमच्या आयुष्यातल्या घटनांबद्दल तुम्ही मनोरंजक पोस्टी करू शकाल का? कुटुंब, ऑफिस, ट्रॅफिक…काहीही चालेल. एक विषय पकडायचा आणि रतीब घालत सुटायचं. हळूहळू पोस्टी व्हायरल व्हायला लागतात."
"पण फेसबुकवर पर्सनल गोष्टी अति शेअर करू नये म्हणतात नं?"
"कुणी सांगितलं तुम्हांला? अहो, नोबेल प्राईझ मिळालेलं असो नाहीतर घरातल्या संडासासाठी नवं टमरेल आणलेलं असो, सगळंसगळं फेसबुकवर साजरं करायचे दिवस आहेत. बिनधास्त पोस्ट करा…"
"बरं मग हा किस्सा ऐका. आज ऑफिसला जाताना नेमकी नवीकोरी चप्पल तुटली. वाटेत देवदर्शनाला थांबलो तेव्हा देवाला प्रार्थना केली की आता चप्पलदुरुस्तीच्या खर्चात नको पाडू. बाहेर आलो तर काय, सेम टू सेम चप्पल काढून ठेवलेली दिसली! माझी तुटकी चप्पल तिथं टाकून ती दुसरी चप्पल घालून सटकलो. देव इतक्या पटकन पावल्यामुळं डोळे भरून आले हो! हे पोस्ट करू?"
बुरशी आलेल्या पावाकडं बघावं तसं लेखकूकडं बघत काका म्हणाले, " राहूच दे! तुम्ही व्हायरल व्हायचा नाद सोडून द्या. तुमच्याकडं ते मटेरियलच नाहीये. "
लेखकू जड आवाजात म्हणाला, " म्हणजे या जन्मात व्हायरल न होताच मरणार म्हणा की आम्ही!"
आणि काकांचे डोळे एकदम लकाकले, " सापडला, व्हायरल व्हायचा मार्ग सापडला!”
"कोणता?"
"तुम्ही मरा. "
"काय?" काकांच्या डोळ्यात कुठं वेडाची झाक दिसतेय का ते लेखकू बघायला लागला.
"खरं सांगतोय. मेल्यावर तुम्ही नक्कीच व्हायरल व्हाल."
"काका हा कसला सल्ला? आणि जिवंतपणी कुणी मला विचारत नाही तर मेल्यावर काय विचारेल? कुणीतरी एक फोटो टाकेल, त्याखाली आरआयपी वाल्या मूठभर मेसेजेसची रिपरिप होईल, की झालं!"
“कुठल्या जगात रहाता तुम्ही? अहो सध्या सोशल मीडियावर मरणाचाही इव्हेंट करायची पद्धत आहे. म्हणजे बघा, तुम्ही कुणी प्रसिद्ध असाल आणि जख्ख म्हातारे झाला असाल किंवा गंभीर आजारी असाल तर तुम्ही जायच्या आधीच ‘गेले, गेले’ अशी आवई उठते. खास अशा वेळी उत्साहानं रसरसणारे लोक लगेच श्रद्धांजली वहायला सुरुवात करतात. मग कुणीतरी शहाणा बातमी आणतो की अजून जीव आहे! आणि एकदा का तुम्ही खरंच गेलात की तुमच्याबद्दलच्या पोस्टी पडायला सुरुवात होते. लोक ‘तुम्ही त्यांनाच कसे समजला होता’ किंवा ‘तुमची एक वेगळीच बाजू त्यांना कशी दिसली होती’ वगैरे लिहायला लागतात. तुमच्याबरोबरचे फोटो टाकून तुमच्याशी मरणोत्तर जवळीक सिद्ध करायची अहमहमिका सुरु होते. माझ्या ओळखीचे एकजण तर कुणी खपायच्या मार्गावर आहे हे कळल्यावर पटकन त्याला भेटून आधी सेल्फी घेऊन टाकतात, म्हणजे त्यांनी विकेट फेकली की हे सेल्फी टाकायला मोकळे!”
“पण माझ्या ओळखीत इतके काही लोक नाहीयेत …”
“अहो तुम्ही एकदा मेलात की तुमची किंमत प्रचंड वाढते. तुम्हांला दोन मिनिटांसाठी सार्वजनिक मुतारीत भेटलेले लोकसुद्धा तुमच्यावर पोस्टी आणि फोटो टाकतील.”
“कुठले फोटो? मुतारीतले?”
“एक उदाहरण दिलं हो!”
“पण माझे बरेच फोटो मित्रांबरोबर ‘बसलेलो’ असतानाचे आहेत…”
“मग तर अजूनच छान! हे फोटो टाकून लोक ‘तुम्ही किती व्यसनी होतात आणि त्यामुळंच तुम्ही कसे गेलात’ यावर लिहितील. बैठकीत तुमचा चौथा पेग भरणारे किंवा तुमची बिडी आपल्या काडीनं पेटवणारेच ‘दोस्ता थोडा कंट्रोल केला असतास तर वाचला असतास की रे’ असा टाहो फोडतील. तुम्ही कोविडची लस घेतलीत म्हणून गेलात असाही जावईशोध कुणी लावेल. कुणी तुमचे अजून अवगुण बाहेर काढेल…”
“पण मेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये म्हणतात नं?”
“ते सगळं संपलं आता. या जगाची नैतिकताच वेगळी आहे. किंबहुना अनैतिक असं काही राहिलंच नाहीये. अहो, तुम्ही कुणाच्या शत्रुपक्षातले असाल तर ते चक्क तुमचं मरण सेलिब्रेट करतील. तुम्ही किती वाईट्ट माणूस होता हे लिहून तुम्हांला झोडपतील…”
“मग ते ‘मरणान्ति वैराणि’ वगैरे?”
“चॅक! पण तुम्हांला काय फरक पडतो? कसे का होईना, तुम्ही व्हायरल झाल्याशी मतलब! तुकाराम म्हणाले होते नं - आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो जाला सोहळा अनुपम्य. सोशल मीडियावर आपलं मरण कसं साजरं झालं हे सध्या कुणाला बघायला मिळालं तर तेही हेच म्हणतील.”
काका हे भलतंच सुचवत होते. व्हायरल होण्यासाठी प्राण गमवायची लेखकूची तयारी नव्हती.
“बराय, मी निघतो,” तो म्हणाला.
“थांबा हो, काकू आत पॅटिस करतायत ते खाऊन जा.”
काकूंच्या पाककौशल्याचा अनुभव आधी एकदा घेतला असल्यानं लेखकूला तिथं थांबायचं नव्हतं, पण तोवर काकू पॅटिस घेऊन आल्याच.
”रणवीर ब्रारची रेसिपी आहे. चटणीबरोबर खा हं. मैने बता दिया. आप कहना मत की काकू आपने बताया नही.” काकूंची रणवीर ब्रारची नक्कलही रेसिपीच्याच दर्जाची होती. पॅटिस समोर ठेवून त्या वळणार इतक्यात त्यांना मोठी शिंक आली. त्यांनी हातानं तोंड झाकलं खरं, पण त्यांच्या बोटाच्या फटीतून निसटलेले काही तुषार पॅटिसच्या दिशेनं उडालेले लेखकूनं बघितले. पण काकाकाकूंना ते समजलं नसावं. ते लेखकूला आग्रह करत राहिले. भिडेखातर त्यानंही थोडंसं पॅटिस उष्टावलं, काकूंचं कौतुक केलं आणि तो तिथून निघाला.
घरी पोचेपर्यंत तो खूपच उदास झाला होता. त्याचं डोकं जड झालं होतं. तिरीमिरीत त्यानं काहीतरी पोस्ट केलं आणि तो न जेवताच झोपून गेला.
“व्हायरल असणार, सगळीकडं पसरतंय…”, लेखकूला जाग आली तेव्हा कुणीतरी त्याच्या शेजारी उभं राहून हळू आवाजात म्हणत होतं.
“काय व्हायरल असणार? माझी पोस्ट?” तो ताडकन उठून बसला. पण त्यानं बघितलं तर त्याचे डॉक्टर त्याच्या बायकोबरोबर बोलत होते.
“तुम्हांला जबरदस्त व्हायरल इन्फेक्शन झालंय. चांगलाच ताप चढलाय. इन्फेक्शन झालेल्या कुणाच्या संपर्कात आला होता का?” डॉक्टरांनी विचारलं. काकूंच्या नासिकेतून टेकऑफ केलेले जलबिंदू लेखकूच्या डोळ्यांसमोर चमकून गेले.
“बरं आता चारपाच दिवस विश्रांती घ्या. ताण घेऊ नका. कॉम्प्युटर, फोन, सोशल मीडियापासून लांबच रहा,” डॉक्टर सांगून निघून गेले.
“किती चेहरा उतरलाय! तुमचं व्हायरल थोड्या दिवसांत उतरेल बरं. मग त्यावर एखादा मस्त लेख लिहून फेसबुकवर टाका म्हणे. पण तोवर विश्रांती घ्या. मी आतून दूध हळद घेऊन येते,” असं म्हणून त्याची बायको निघून गेली आणि छताकडं बघत लेखकू पलंगावर निमूटपणे पडून राहिला.
प्रतिक्रिया
हे अव्वल आहे!!!
हे अव्वल आहे!!!
अव्वल दर्जाच्या टवाळक्या
आहेत खरं तर. धन्यवाद नील!
लोलदायक लेख
खुसखुशीत आहे. राहुल बनसोडे यांचा आकस्मिक झालेला मृत्यू आठवला लेख वाचून.
काही लोक चांगले लिहितात. आनंद मोरे वगैरे. पूर्वाश्रमीचे ब्लॉगर, संस्थळ गाजवनारे लोक आता फेसबुक ओन्ली असतात. राज नावाचे ब्लॉगर कुठे गायब झाले कुणाला कल्पना आहे का? त्यांचे ब्लॉग खूप आवडायचे. इटली मध्ये होते.
एकंदरीत फेसबुक सध्यातरी मध्यमवयीन आणि थेरड्या लेखकांचा हक्काचा अड्डा बनला आहे. मात्र इतर मराठी संस्थळे आणि ऐसी शेवटच्या घटका मोजताहेत.
चालायचं.
गवि सारख्या लेखकांचे आश्चर्य वाटते. गवि, फेसबुकवर कधी शिफ्ट होताय? कसे काय रमत आहात तुम्ही इकडं? शेवटचे शिलेदार.
हळू हळू फेसबुकची पण अशीच गत होणार आहे.
सगळ्यांना पुरून उरले ते म्हणजे reddit.
Reddit हीच माझी आशा आहे. तिथे लेखकराव तयार होत नाहीत. खूप खूप आवडते reddit. No nonsense platform आहे.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
राजचा ब्लॉग
राज अलीकडे मराठीत फारसा लिहीत नाही. त्याचा ब्लॉग इथे आहे:
https://rajksite.com/mr/ (मराठी)
https://rajksite.com/ (इंग्रजी)
अरे वा!
हा इसम अजूनही लिहितो, हे वाचून बरे वाटले.
(या इसमाचा एक खूप जुना चाहता, या नात्याने) मन:पूर्वक आभार!
धन्यवाद
बरे झाले हा ब्लॉग बंद नाही. इंग्रजीत का होईना चालू आहे हेच खूप आश्वासक वाटले
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
Flouncing
याला इंग्लिशमध्ये flouncing असा शब्द असल्याचं एका मीम-ग्रूपावर समजलं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
नवी माहिती
ही चांगली माहिती मिळाली. ही मिलेनियल टर्म असावी काय? म्हणजे ऑफिसमध्ये एखाद्या मिलेनियलासमोर वापरून अगदीच काका नसल्याचा आव आणता येईल.
.
माझ्या समजुतीप्रमाणे flouncing चा अर्थ ‘आक्रस्ताळेपणाने एखादा ग्रूप किंवा धागा सोडणं’ अशासारखा आहे. हा नुसता ब्रेक नसून जाहीरपणे केलेला चिडचिडाट त्यात अभिप्रेत आहे.
-----
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
मजा आली
असे बरेच लेखकू आणि लेखुकी मग फेसबुकला शिव्या घालून थोडे दिवस गुप्त होतात. इन्स्टावर तर कोणीच विचारत नाही हे जाणून पुन्हा नव्या आशेने परत येतात आणि प्रयत्न सुरु ठेवतात.
खरं आहे
इन्स्टावर ती मजा नाही राव!