Skip to main content

बुद्धी, विचार, वैज्ञानिक दृष्टी, विवेक यांची हकालपट्टी!

photo 1

खासगी वितरणासाठी असलेली एक पुस्तिका अलिकडेच माझ्या वाचनात आली. त्यातील उतारे वाचताना आपण कुठल्या 'अंधार''युगात वावरत आहोत असे वाटू लागले. त्यातील काही मासलेवाइक उताऱ्यावरून बुद्धी, विचार, वैज्ञानिक दृष्टी, विवेक यांना रजा दिल्यासारखे वाटते. क्षणिक मनोरंजनासाठी व गंमत म्हणून वाचायला हरकत नसावी!

(डिस्क्लेमरः यात कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. चुकून दुखावल्यास अगोदरच क्षमा मागत आहे.)

आपला हिंदू धर्म मरणोत्तर जीवनाचा पुरस्कर्ता आहे. म्हणजेच हिंदू धर्म हा व्यक्तीच्या मृत्युनंतरसुद्धा त्याच्या आत्म्याचे अस्तित्व मानतो.... मृत्यु हा जीवनाचा शेवट नसून मृत्युनंतर नष्ट होतो तो फक्त देह! जे जाते ते केवळ जड शरीर !..... ज्याच्या त्याच्या पापांनुसार कमी जास्त काळ भोग भोगण्यासाठी भूतयोनीत आत्मा तडफडत राहतो. त्याला भयंकर क्लेष होतात; पण या त्रासातून तो स्वत:ची सुटका करून घेऊ शकत नाही. गतजन्मीच्या पापाचा हिशोब चुकता होईपर्यंत तसेच भावनांतून सुटेपर्यंत तो भूतयोनीत खिजपत पडतो. हे कार्यक्षेत्र नसून भोगक्षेत्र असल्याने तेथे कुठलेही कर्म करता येत नाही. तर फक्त केलेल्या कर्माचे भोग भोगावे लागतात. कर्म करू शकणार्‍या देहाअभावी भावनांची तीव्रता वाढते. निष्क्रिय परावलंबित्व त्याला बोचत राहते. फालतू गोष्टीत संपूर्ण जन्म व्यर्थ दवडल्याने प्रचंड दु:ख त्याला सलत राहते; पण ते व्यक्त करता येत नाही. ना तो संवाद करू शकतो, ना त्याला कृती करता येते!

अतृप्त आत्म्यास कमी पडणारे पुण्य त्याला कुठल्या माध्यमाद्वारे पोहोचविता येईल ह्यावर प्राचीन ऋषी - मुनींनी वर्षानुवर्षे केलेल्या अथक संशोधनाचे फलित म्हणजेच अंत्यसंस्कारादि अंत्यविधी आणि पिंडदानादि श्राद्धविधी!

सर्व शास्त्रशुद्ध विधिसहित योग्य प्रकारे मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जाणे अत्यंत आवश्यक आहे. कारण तो मृतदेह आत्म्याचे त्या जन्माचे घर असतो व साहजिकच आत्म्याशी संलग्न भावना देहाशी निगडित असतात. देहाला जमिनीत पुरून त्या भावनांतून आत्म्यास सोडविणे शक्य नसते. पुन्हा पुन्हा आत्मा त्या देहाकडे आकर्षित होऊन मुक्तीच्या मार्गातून ढळू शकतो. आणि अंतिम ध्येयापासून वंचित राहतो. ह्याकरिता देहाचे पूर्ण ज्वलन करून तो संपूर्ण नष्ट करण्यासाठी अंत्यसंस्कारात देहाला अग्नी दिला जातो. शिवाय परमेश्वराने दिलेल्या देहाचे हवन करून तो त्यास समर्पित करण्याचा भाव त्यामागे आहे. त्याखेरीज ईश्वरी शक्तीच्या विरुद्ध कार्य करणाऱ्या असुरी शक्ती अग्नीला घाबरतात आणि म्हणूनच त्या मृतदेहाचा पर्यायाने त्या आत्म्याचा ताबा घेण्यास अशा शक्ती धजावत नाहीत.

काही महाभाग मृतदेहास अग्नी न देता विद्युतदाहिनीत जाळतात. ते शास्त्रान्वये पूर्णत: अयोग्य असून असे कदापि करू नये. लाकडात सुप्त शक्ती असल्याने लाकडाला धार्मिक महत्व आहे. ...चंदनाचे लाकूड पवित्र तर असतेच पण चंदनाची शीतलता आत्म्यास उद्विग्नता येऊ न देता शांत व विरक्त मार्ग दर्शवून मोक्षाकडे नेते. अग्नीसंस्कारात म्हणून लाकडाचा अग्नी असावा हेच खरे!

पाश्चात्य मान्यवर वैज्ञानिकांनी संशोधनांती सिद्ध केले आहे की आपल्या शरीरात आत्मा आहे व तो 'ईथर' ह्यासदृश रासायनिक घटकाचा बनला असून रक्तातील प्लाझ्मा अवस्थेतील एक्टोप्लाझ्म हा घटक पदार्थ त्याचा मूळ आधार असतो. प्रयोगांती आढळले की धार्मिकविधी, योगासने आणि सूर्य किरणात एक्टोप्लाझ्म दाट होते तर अमावास्येस व विवक्षित स्थळी ते विरळ होते. तपस्वी व्यक्तीभोवती एक्टोप्लाझ्म तेजस्वी सोनेरी छटा निर्माण करते तर मृत्युपंथावरील अत्यवस्थ व्यक्तीभोवती ते काळी छटा निर्माण करते. ह्या आत्म्याचे फोटो इन्फ्रा-रेड कॅमेराद्वारे घेतले गेले असून त्यात ते धुरकट भासतात. आत्म्याला मुक्ती देणे म्हणजे एक्टोप्लाझ्मच्या भोवताली जमलेली वलये, ज्यांना वासनादेह म्हणतात त्यातून त्यास, पूर्णत: मोकळे करणे.

मृत्युनंतर अंत्यसंस्कार यथाविधी केले असतील तरीही जोडीला श्राद्धविधी करणे जरूरीचे आहे. अतृप्त आत्म्याला मुक्ती मिळवण्याच्या मार्गात असणारे अडथळे दूर करण्यासाठी अंत्यसंस्काराच्या विधीमध्ये जरी भरपूर उपाययोजना असली तरीही तो आत्मा भावना-वासनामध्ये इतका खोलवर बुडालेला असतो की अंत्यसंस्काराचे उपाय त्यास पूर्णत: मुक्त करू शकत नाहीत. म्हणून यथासांग श्राद्धविधी केले जातात.

सप्त वासनादेहामध्ये अडकून पडलेले अतृप्त आत्मे अनेक बंधनामध्ये अडकलेले असतात. शारीरिक नव्हे तर मानसिक भूक त्यांना त्रस्त करते. अन्न, पाणी दिसले तरीही अन्न खाता येत नाही, पण अन्नाचा वास मात्र त्यांना पोहोचू शकतो. त्यांच्या नावे ठेवलेल्या अन्नाच्या वासनादेहावर ताबा मिळवून त्यास पितर ग्रहण करतात. श्राद्धविधी हा मुख्यत्वे अन्नदानाचा विधी आहे. सर्वच धर्मामध्ये अन्नदान हे सर्वोच्च मानले गेले आहे. विशिष्ट प्रकारे अन्नदान करून आत्म्यास कमी पडणारे पुण्य मिळवून देण्याचा प्रकार श्राद्धविधी अंतर्गत पार पाडला जातो. ह्यामध्ये कधी नव्हे तो कावळ्याला मोठा मान दिला जातो. कारण एक तर सर्व पशू - पक्षींपैकी कावळाच एक सहजपणे सापडतो व दुसरे म्हणजे त्याच्या काळ्या रंगामुळे पितरांना त्यावर पकड घेणे सोपे जाते. कारण सर्पाकारात पितरांचे मुख मानलेल्या राहूचा रंग काळा आहे.

हा फक्त ट्रेलर आहे, बाकी 'चित्रपट' भरपूर मोठा आहे व त्यात यापेक्षा जास्त भयानक, सुरस, व चमत्कारिक विधानांचा साठा आहे. अशा आत्म्याच्या गोष्टींना गंभीरपणे घेणारे अजूनही आपल्यात आहेत याचे सखेदाश्चर्य वाटते.

विपश्यनेचे गोयंका नेहमीच एक वाक्य घोळत असतात. "नेहमीच्या व्यवहारातील गोष्टीसाठी तुम्ही बुद्धी वापरा. परंतु धर्म व अध्यात्म या गोष्टी बुद्धीच्या पलिकडे आहेत." या सर्व प्रकाराला बिनडोकपणाचा कळस म्हणावयास (काही अपवाद वगळता) कुणाचीही हरकत नसावी!

Taxonomy upgrade extras

Rajesh188 Mon, 10/07/2023 - 20:05

माणसाला जगण्यासाठी.
अन्न,वस्त्र,निवारा,संपत्ती, ही लागतेच .
पण सर्वात जास्त गरज असते.
ती मानसिक शांती( मानसिक आरोग्य), उत्तम सामाजिक सहजीवन.
पुरातन काळातील कथे ना ह्या नजरेतून पण बघितले जव.
देव,आत्मा,मृत्यू नंतर जीवन .हे विज्ञान च्या निकषात बसत नाहीत
ह्याचा अर्थ ते सर्व खोटे आहे असा एक अर्थ आहे .
आणि दुसरा अर्थ आहे.
आताचे विज्ञान अजून इतके प्रगत नाही की ते त्या संकल्पना समजू शकेल.
किंवा आताच्या माणसाची आकलन क्षमता अजून त्या पातळीवर पोचली नाही.

विज्ञान, विज्ञान म्हणून जे घोष लावतात.
त्यांचे ज्ञान फक्त कुठे तरी वाचलेले उतारे असतात.
गुरुत्व लहरी म्हणजे काय असे विचारले तर.
येथील सर्व च आयडी .
कोणकोणते शोध निबंध मधील उतारे इथे देतील.
मला नाही वाटत कोणाला गुरुत्व लहरी म्हणजे काय ह्याचे आकलन असेल.
बहुसंख्य लोकांना म्हणजे अगदी ९९,% .
ग्रह,तारे का फिरतात.
विश्व कसे निर्माण झाले.
बिग बँग कसा झाला.
सजीव निर्मिती कशी झाली .
ह्याचे बिलकुल आकलन नसते असते फक्त वाचलेली माहिती.
आणि त्याच्या जोरावर ते सर्व ज्ञानी असल्याचा अभिनय करत असतात.
पुरातन ज्ञान विषयी पण आपली तीच स्थिती आहे.
आकलन झीरो.

सोकाजीरावत्रिलोकेकर Tue, 11/07/2023 - 06:46

लेखाचं शिर्षक वाचून उत्सुकतेने धागा उघडला. डिसक्लेमर वाचून उत्सुकता आणखिनच चाळावली गेली. लेख वाचल्यावर, 'धर्म, समाज आणि मृत्युकल्पना' ह्या लेखमालेच्या पार्श्वभूमीवर ह्या लेखाचं टायमिंग रोचक वाटलं.

पण, लेखाच्या शेवटी 'विपश्यनेचे गोयंका' हा संदर्भ वाचल्यावर लेखाशी याचा काय संबंध असावा? असा प्रश्न पडला. लेखात, नेमकी कुठली पुस्तिका वाचली हे काही नमूद केले नाहीयेय. त्यामुळे धागा लेखक आणि विपश्यना ह्याबाबत गुगलबाबाला साकडे घातले आणि 'बोधप्राप्ती' झाली.

एका मराठी संस्थळावरील एका लेखात घाटपांडेकाकांच्या एका प्रतिसादात प्रस्तुत लेखकांच्या ऐसीवरील एका लेखाचा संदर्भ मिळाला.

त्या लेखावर श्रावण मोडकांचे काही प्रतिसाद वाचले आणि मग 'विपश्यनेचे गोयंका' हा संदर्भ वाचल्यावर लेखाशी याचा काय संबंध असावा असा जो प्रश्न पडला होता त्याचं उत्तर मिळून गेलं आणि पुढे काही प्रश्न होते ते विचारायची आवश्यकता राहिली नाही.

- (श्रामोंच्या आठवणीने अंमळ हळवा झालेला) सोकाजी

स्वयंभू Tue, 11/07/2023 - 10:20

बौद्धिक फ्रस्ट्रेशन वाढविण्यासाठी गायत्री परिवारातर्फे आणि सनातन संस्थेतर्फे छापलं जाणारं काहीही वाचावं.

अजूनही वैचारिक मेजवानी हवी असल्यास पुण्याचे वर्तक म्हणून कोणी डॉ आहेत म्हणे (शनवाराती तपकीर कारखान्याचे वर्तक आणि हे वर्तक काही संबंध आहे काय माहित नाही.). त्यांची पुस्तके वाचावीत. ते ध्यानधारणा करून अंतराळातील ग्रहावर जाऊन येतात म्हणे.

लैच तारे तोडले आहेत त्यांनी.

अहिरावण Tue, 11/07/2023 - 13:54

बाकी काही असो... नानावटीचे लेखन हाच बिनडोकपणाचा कळस आहे.

काही बरं लिहितात पण बाकीचे अनेक लेख हे सनातन स्टाईलच नाना व टी असतात्

अहिरावण Wed, 12/07/2023 - 14:25

In reply to by ऐसीअक्षरे

मात्र... लेखाचा शेवट आपण कदाचित वाचला नसावा.

आपल्या माहितीसाठी शेवटचा परिच्छेद उध्दृत करत आहे, कृपया वाचनाची तसदी घ्यावी.

विपश्यनेचे गोयंका नेहमीच एक वाक्य घोळत असतात. "नेहमीच्या व्यवहारातील गोष्टीसाठी तुम्ही बुद्धी वापरा. परंतु धर्म व अध्यात्म या गोष्टी बुद्धीच्या पलिकडे आहेत." या सर्व प्रकाराला बिनडोकपणाचा कळस म्हणावयास (काही अपवाद वगळता) कुणाचीही हरकत नसावी!

नानावटी महान लेखक आणि विचारवंत आहेत, त्यांचे काही गुण आत्मसात करावे या लालसेपोटी त्यांच्या लेखातील काही शब्द वापरले. आपणास ते आवडले नाही असे दिसत आहे. अरेरे ! आमचा नानावटींच्या मार्गावर जाण्याचा प्रवास आपणास आवडला नाही असे दिसते. असो.

'न'वी बाजू Wed, 12/07/2023 - 17:30

In reply to by ऐसीअक्षरे

वरील प्रतिसादात असभ्य शब्द नेमके कोठे आढळले, याबद्दल कुतूहल आहे.

(मलाही शिकायला मिळतील, त्या निमित्ताने.)

विवेक पटाईत Tue, 11/07/2023 - 21:48

travel चॅनल लाऊन सुंदरी सोबत जग बघता येते.तसेच डोळे बंद करून ध्यान लावून स्वर्गात जाणे सहज शक्य आहे.

Rajesh188 Wed, 12/07/2023 - 14:46

जहाल शब्द किंवा विचार हिंसा घडवू शकतात पण वैचारिक क्रांती नाही घडवू शकतं.
.
लोकांचे विचार बदलायचे असतील विज्ञान काय आणि स्वप्न रंजन काय .
हे पटवायचे असेल तर.
ते जहाल शब्द नी कधीच साध्य होत नाही.
लोकांना पटेल असेच विचार व्यक्त करायचे असतात.
तर च ते शक्य होते.

सुधीर Thu, 13/07/2023 - 16:54

"The truth is that truth was never high on the agenda of Homo sapiens.”

"When a thousand people believe some made-up story for one month, that's fake news. When a billion people believe it for a thousand years, that's a religion."

हरारीच्या २१ लेसन्स पुस्तकातल्या "पोस्ट ट्रूथ" मधली ही वाक्य आहे. माणसं नेहमी गोष्टीवर विश्वास ठेवतात. आणि त्या गोष्टी खोट्या असल्या तरी त्याने "ह्युमन कोऑपरेशन" निर्माण करण्यास मदतच केली आहे. त्यामुळे अंधारयुग असे काही मला वाटत नाही. याच लेखकाकडून मला विपश्यना बद्धल कळाले. ह्याच पुस्तकाच्या शेवटच्या भागात त्याने स्वतःच्या अनुभवावर लिहिले आहे.

मेडीटेशन/माइंडफुलनेस वर आजकालच्या सेल्फ हेल्प टाईपच्या पुस्तकात हटकून वाचायला मिळते. म्हणून मी काही महिन्यापूर्वी जो डिस्पेन्झा या न्यूरोसायन्स मधल्या तज्ञाचे "Breaking The Habit Of Being Yourself" हे पुस्तक वाचले. त्याने मेडिटेशनचा वेगळा मार्ग सांगितला आहे. पण मला ते पुस्तक तितकेसे पटले नाही. त्यापेक्षा हरारीचे टिपण थोडे रॅशनल वाटले. त्याने विपश्यनामुळे सगळ्यांमध्ये बदल घडूनच येईलच असा दावा केलेला नाही. उलट, त्याने मियानमारच्या बुद्धीस्ट माँकच्या मुलाखतीचा दाखला दिला आहे. त्यामुळे विपश्यनेच्या इफेक्टीव्हनेस वरच शंका येईल. तरीही त्याने त्याचा अनुभव घेण्याचा सल्ला त्या शेवटच्या लेखात दिला आहे.

मी मेडिटेशन/ध्यान/ विपश्यना आणि जिथके कुठले मार्ग आहेत त्याकडे मी फक्त एक टूल म्हणून बघतो. असे टूल जे "कदाचित" प्रॉडक्टीव्हिटी वाढवेल. बर्‍याचवेळा मेंदू "इम्पल्सला" पटकन रिअ‍ॅक्ट होवून मोकळा होतो. डॅनिअल कानमनने सांगितलेल्य "सिस्टीम २" चा वापर करणं टाळतो. एखाद्या टूल (एक्सरसाईजमुळे) त्यात थोडा फार बदल घडला तर उत्तमच आहे. उदा. शोशल मिडियावर वा एखाद्या संकेतस्थळावर धागा काढण्यात/ प्रतिसाद लिहिण्यात/ वाचण्यात / वाचनमात्र राहून पडिक राहण्यात घालवलेल्या वेळात इतर काहीतरी करता येऊ शकते इतपत "भान" आले तरी पुरेसे आहे.

"be skeptical! very very skeptical!" हा अ‍ॅनालिस्टचा मूलमंत्र आहे. त्यामुळे एखाद्या गोष्टी विषयी साशंक असण्यात काहीच चूक नाही. चॅट जीपिटी वर मी दोन्ही जमेच्या आणि उण्या बाजू विचारून पाहिल्या आणि समजून घेतल्या. इफेक्टीव्हनेस मोजणे हे सब्जेक्टीव्ह आहे. पण पूर्वग्रह दुषित असेल तर कदाचित एक चांगले टूल मिस होईल. आणि जर इफेक्टीव्हनेस न मोजता केवळ आंधळी श्रद्धा ठेवून तिच तिच कृती केली तर ते फक्त एक "कर्मकांड" होवून जाईल.

प्रभुदेसाई Thu, 13/07/2023 - 19:50

लेखातील शेवटचा परीच्छेद भयंकर आवडलेला आहे. गोएंका यांचे आभार माना. त्यांनी आपल्याला काही काही वेळा बुद्धि वापरायची परवानगी दिली आहे. खरा प्रॉबलेम हा आहे कि ही साली बुद्धि गप्पा बसत नाही. तिची सारखी चूळबुळ चालू असते. असो
अवांतर. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आज देवाची पूजा बांधली.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 13/07/2023 - 20:51

In reply to by प्रभुदेसाई

गोयंकांनी परवानगी देण्याबद्दल :ड

मूळ लेखाबद्दल मला किंचित आक्षेप आहे, किंवा शंका आहे. आपल्या आजूबाजूचे किती लोक विद्युतदाहिनीला विरोध करणारे, किंवा तितपत भोळसट असतात? मी फारच कमी लोकांशी बोलते, त्यामुळे या बाबतीत माझा अनुभव कुचकामी आहे.