ऐसी अक्षरे दिवाळी अंक २०२३ - लेखनासाठी आवाहन.
नमस्कार,
सालाबादप्रमाणे यंदाही ऐसीचा दिवाळी अंक काढण्याचं घाटतं आहे. त्यासाठी ऐसीच्या सर्वच सदस्यांकडून लेखन मागवण्यासाठी हे आवाहन.
ऐसी अक्षरेवर दर्जेदार लेखन यावं अशी आमची कायमच इच्छा राहिलेली आहे. ऐसीचा दिवाळी अंक म्हणजे तर ऐसीच्या लेखकांच्या कौशल्याचं छोटेखानी प्रदर्शनच. त्यामुळे ते विशेष दर्जेदार व्हावं, दिवाळी अंक म्हणजे ऐसीच्या वाचकांसाठी मेजवानी वाटावी यासाठी आत्तापर्यंत आम्ही प्रयत्न केलेले आहेत. गेल्या सर्वच अंकांत एकाहून एक सरस लिखाण आलं तसंच किंबहुना त्याहूनही सरस लिखाण यावं अशी आमची इच्छा आहे. पण उत्कृष्ट दर्जाचं लिखाण करणं सोपं नाही, त्यासाठी लेखकांना कष्ट करावे लागतात. वाचकांच्या केवळ प्रतिसादांतूनच त्या कष्टाचं चीज करण्याची या माध्यमाची शक्ती आहे खरी. पण आमच्या मते तेवढं पुरेसं नाही. त्यामुळे या दिवाळी अंकातल्या लेखनासाठी काहीतरी मोबदला देण्याची इच्छा आहे. त्यायोगे ऐसीवरच्या चांगल्या लेखकांना उत्तेजना तर मिळेलच, पण इतर मान्यवर लेखकांकडूनही मानधन देऊन चांगलं लेखन मिळवता येईल.
एखादा लेख घ्यायचा की नाही हा निर्णय लिखाणाच्या दर्जाबरोबरच त्या प्रकारचं आलेलं इतर लेखन, एकंदरीत अंकासाठी आलेलं लेखन, एकंदरीत बजेट यानुसारही ठरेल. तसंच लिखाण कधी आमच्या हाती येतं हेही यावेळी महत्त्वाचं ठरेल. कोणी जर लिखाण पाठवलं तर ते आम्हाला नाकारायचं असल्यास त्यांना इतरत्र (जिथे मानधन मिळू शकेल अशा ठिकाणी) पाठवण्याइतका वेळ शिल्लक हवा. याचा अर्थ आमच्या हातात ते लेखन लवकर यायला हवं. म्हणून साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर ठेवलेली आहे. या तारखेच्या जितकं आधी तुमचं लिखाण आमच्या हाती येईल तितकाच आम्हाला त्यावर संस्करण करायला व स्वीकारायला वेळ मिळेल. तेव्हा ही तारीख कसोशीने पाळावी ही विनंती.
दिवाळी अंकाच्या निमित्तानं काही विशिष्ट विषयांवर चर्चा घडावी असा आमचा एक विचार आहे. इथे उल्लेख केलेल्या संकल्पनेवरच तुम्ही लिहायला हवं असं बंधन नाही. अंकाचा काही भाग ज्या संकल्पनेवर आधारित असेल ती ह्या धाग्यात दिलेली आहे. मात्र हा अंक केवळ त्याच विषयाला वाहिलेला असणार नाही. अंकाचा काही भाग ह्या विषयाला जरूर दिला जाईल असा अंदाज आहे. बाकीचा अंक विविध साहित्यानं नटलेला असेल. तेव्हा विषयाचं बंधन आहे असं समजू नये. ललित/वैचारिक लेख, कथा, कविता, व्यक्तिचित्रं, फोटो, चुटके, व्यंगचित्रं, चित्रं आणि अन्य संकीर्ण प्रकार ह्या साऱ्यांचं स्वागत आहे. 'ऐसी अक्षरे'वर वेळोवेळी सादर केली गेलेली चित्रं आणि छायाचित्रं (फोटोग्राफ्स) वगैरेंद्वारे विविध प्रकारच्या दृक-श्राव्य कलांना आणि त्यांच्या समीक्षेलाही व्यासपीठ मिळावं असा आमचा प्रयत्न असल्याचं तुम्हाला जाणवलं असेल. ह्या प्रकारचं काही साहित्य असेल तर तेसुद्धा पाठवा.
आणखी एक नोंदवण्यासारखी गोष्ट - आम्हाला हा अंक म्हणजे कागदी दिवाळी अंकांची डिजिटल आवृत्ती अशा मर्यादित स्वरूपात सादर करायचा नाही. इंटरनेटच्या माध्यमात लिखित शब्दापलीकडे कितीतरी अधिक सामावता येतं. ह्या बलस्थानाचा शक्य तितका वापर करण्याचा मानस आहे. तेव्हा काव्यवाचन, कथांचं अभिवाचन, चलतचित्र, अॅनिमेशन, संगीत अशा अनेक गोष्टी त्यात अंतर्भूत व्हाव्यात असं वाटतं. त्या दृष्टीनं तुम्हाला विनंती आहे की तुमचं योगदान देताना निव्वळ लिखित शब्दांचाच विचार करण्याची गरज नाही. ह्या अनुषंगानं तुमच्या आणखी काही अभिनव कल्पना असतील तर त्यांचंही स्वागत आहे.
ललित किंवा अन्य प्रकारच्या लेखनातही काही फोटो, चित्रं, स्केचेस टाकण्याची इच्छा आहे, पण आपण चित्रकार/फोटोग्राफर नाही अशी अडचण असेल तर कृपया संपर्क साधावा. लिखाण पूर्ण झालेलं नसलं तरीही थोडी पूर्वकल्पना दिलीत, तर काय प्रकारची स्केचेस/चित्रं टाकता येतील ह्याचा अंदाज घेऊन त्यावरही काम सुरू करता येईल. ज्यांना लेख व कथांसाठी चित्रं काढून देण्याची इच्छा असेल अशांना विशेष आवाहन आहे.
कालमर्यादा - १५ सप्टेंबर २०२३
लिखाण ऐसी अक्षरेला व्यक्तिगत निरोपाने पाठवावे. aisiakshare@gmail.com
लिखाण युनिकोडमध्ये असणे आवश्यक आहे. वेगळ्या फाँटमधले किंवा हस्तलिखित स्वीकारले जाणार नाही.
आता थोडं यंदाच्या दिवाळी अंकाच्या विषयाबद्दल.
विषयाच्या प्रास्ताविकातला विनोद आणि खेळकरपणा ऐसीअक्षरेच्या सहृदय आणि विचक्षण वाचकांना आवडेल अशी आशा आहे
या वेळी नेहमीप्रमाणे भविष्यवेधी, साहित्य-कला किंवा संस्कृतीविषयक उच्च किंवा ट्रॅशी अभिरुचीचे दर्शन घडवणारा किंवा अनिश्चिततेच्या सावटाखालचा किंवा सत्याची चड्डी असली नसलेली चड्डी नेसणारा (घालणारा नव्हे नेसणारा बरं! #प्रमाणभाषाप्रेमीआम्ही) अंक न करता वेगळा विषय असावा असं उगाचच आम्हांला वाटलं. म्हणून मराठीमधे जो विषय (फारसा!) आला नाहीये, याचीही जाणीव नसणारा असा विषय घेतला आहे तो म्हणजे आफ्रिका खंड.
युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या खंडांमध्ये मराठी भाषकांच्या एक-दोन पिढ्या रुजल्यामुळे आता त्या भागांबद्दल मराठीत बरंच लिखाण उपलब्ध आहे. परंतु गेल्या दोन शतकांमध्ये विविध युरोपीय देशांनी केलेल्या भयाण वसाहतवादामुळे, एड्स-इबोला यांसारख्या साथींमुळे, वंशविद्वेष आणि गुलामव्यापारामुळे, स्वातंत्र्योत्तर काळात महासत्तांच्या हातातील बाहुलं झालेल्या स्वार्थी आणि लबाड हुकूमशहांमुळे, समृद्ध खनिजसंपत्तीवर डोळा असणाऱ्या नवमहासत्तांमुळे, खऱ्या लोकशाहीची मुळं पंचावन्न देशांच्या विशाल आफ्रिका खंडात फारशी कधीच रुजली नाहीत. आफ्रिका खंड अक्षरशः होरपळलेला, लचके तोडलेला आणि दुर्लक्षित भूभाग आहे. मराठीत आफ्रिकेचं दर्शन आलंच तर पूर्वी टारझन, महाबली वेताळ (इंद्रजाल कॉमिक्स) यांसारख्या कल्पनारम्य लिखाणातून; किंवा डोक्यावरून हात फिरवण्याइतकं जवळून काढलेल्या सिंहांच्या मसाईमारामधल्या फोटोंमधून; किंवा आम्ही यावर्षी 'क्रुगर केलं' या छापाच्या वर्णनांमधून. यांव्यतिरिक्त ‘गॉड्स मस्ट बी क्रेझी’ किंवा ‘सफारी’सारख्या चित्रपटांतून. गेल्या काही वर्षांत ‘अमुक तमुकचे दिवस’ पद्धतीचे काही वर्षं आफ्रिकेत कामानिमित्त वास्तव्य केलेल्या एक्स-पॅटसचे अनुभव या कशातूनही आफ्रिकेचं वास्तव दर्शन काहीएक स्वरूपापुरतं होतं. त्यालाही मर्यादा असतात.
आफ्रिकेच्या विविध वास्तवांच्या जवळ जायचा प्रयत्न करत असलेला हा अंक करण्याचे आम्ही या वर्षी ठरवलं आहे. अर्थात हा एक अंक त्यासाठी खरा तर कमालीचा अपुरा पडेल याची जाण आहे.
अंकाच्या विषयावरचं - अथवा इतर कुठच्याही विषयावरचंही - लिखाण केलं तरी ते शक्य तितक्या लवकर पाठवावं ही विनंती.
धन्यवाद,
संपादन मंडळ, 'ऐसी अक्षरे'.
प्रतिक्रिया
अंकाच्या विषयाच्या
अंकाच्या विषयाच्या व्याप्तीबाबत दोन शब्द. आत्तापर्यंतत थीम निवडण्यत एकदोनतीन संपादकांचा पुढाकार असे. त्यांच्या डोक्यात असलेल्याही थीम्सवर साधकबाधक चर्चा होऊन त्यातील एक निवडली जायची. मग तिचा विस्तार कुठच्या अंगाने केला जाता येईल, कुठच्या विषयावर लेख येणं मस्ट आहे, एका अंगाचा एक विषय आला तर त्याची दुसरी बाजू मांडणारा मिळवता येइल का असं करत एक विषयांची रूपरेखा ठरवली जायची. मग त्या विषयांवर कोणाकोणाकडून लेख मिळू शकतील हा विचार करून अंक मूर्त होण्याकडे प्रवास पुढे व्हायचा.
यावेळची प्रक्रिया थोडी वेगळी झाली. पहिल्या चरपाच विषयांच्या संकल्पना पुढे येतात ना येतात तोवर संपादक मंडळात 'आफ्रिकेच्या पैलूबद्दल मी पुस्तक वाचलेलं आहे, तेव्हा लेखकांकडून किंवा समीक्षकांकडून त्यावर लेख मिळतोय का बघू' अशी 'आफ्रिका' विषयावरच उत्साही चर्चा झाली. कोणीही माओ नसताना 'हजार कळ्या उमलूद्या' चळवळ सुरू झाली. टॉप डाउन नाही तर बॉटम अप.
इतक्या मोठ्या विषयाच्या वेगवेळ्या मातीतून मिळणाऱ्या हिऱ्यांनी बनलेले भिन्न जातींच्या पैलूंचं महाकाय झुंबर बघताना गरगरायला होईल की विविधतेत दिसणाऱ्या एकतेतून काही सर्वसामावेशक पॅटर्न्स दिसून येतील हे आत्ता सांगता येत नाही.
ऐसीवर कसलेले लेखक आहेतच. त्यांचं थीमवरचं आणि थीमबाहेरचं लिखाणही थीमला कोंदण देऊन आकर्षकता वाढवेल अशी आशा आहे.
बघू.
आमचे एक पूर्वज आफ्रिकेतच मारले गेले होते- त्यांच्या आठवणी मिळाल्या तर पाठवीन.
बाकी आफ्रिकेशी काही संबंध नाही उरला आता. पूर्वीची गोष्ट वेगळी होती.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
तसेच म्हटले, तर...
...आपणां सगळ्यांचेच (बोले तो, मानवजातीचे; अस्वलांबद्दल कल्पना नाही.) पूर्वज आफ्रिकेतून आले, अशी कायशीशी लेटेष्ट थियरी आहे ना?
त्यामुळे, anything goes. कशाबद्दलही काय वाटेल ते लिहा; आफ्रिकेशी त्याचा (बादरायण)संबंध जोडता येईलच.
(अन्यथा, कोणीही काहीही लिहिणे कठीण वाटते. येथे किती जणांचा आफ्रिकेसंदर्भात लिहिण्याइतका आफ्रिकेशी संबंध असेल असे वाटते?)
लेखन पाठवले आहे
लेखन पाठवले आहे
कुठवर आली तयारी?
कुठवर आली तयारी?