बेंच
पंच्याऐंशी साली रघुनाथकाका गेले, तेव्हा त्यांच्या मुलांनी सोसायटी कंपाऊंडच्या कोपऱ्यात काकांच्या स्मरणार्थ दोन बेंच बांधून घेतले. छान ग्रॅनाईटचे बेंच. काटकोनात बांधलेले. एका बेंचवर तीनजण बसू शकतील असे. काकांच्या स्मरणार्थ अशी पाटी कोरलेले. खरेदी करून किंवा देवळातून आल्यावर जिने चढायच्या आधी वयस्कर लोक जरा बेंचवर बसून दम खात. क्रिकेट खेळून अगदीच घाम आल्यावर, किंवा बाॅल शेजारच्या वाडीत गेला तर तो परत आणेपर्यंत, मुलं बेंचवर बसून गप्पा मारत.
ब्याण्णव साली कुलकर्णी आजोबा गेले तेव्हा त्यांच्या मुलीनेही बेंच बांधून घेतला. बेंचच्या काटकोनाची एक बाजू डबल लांबीची झाली. दोनतीन वर्षांनंतर तिनं फ्लॅट विकला. बेंच ऑफकोर्स तसाच राहिला.
स्वातंत्र्यापूर्वीचं जग पाहिलेली पिढी हळूहळू काळाच्या पडद्याआड जाऊ लागली. सोसायटीतल्या बेंचची संख्या हळूहळू वाढत राहिली. सोसायटीसमोरच्या पूर्व आणि दक्षिण भिंतीची परिमिती बेंचने भरून गेली.
दोन हजार सालची ईजीएम मला क्लीअरली आठवतेय. सोसायटीच्या सुरूवातीपासून राहणारे मेहता अंकल गेले, आणि त्यांच्या मिसेसने त्यांच्या स्मरणार्थ तीन बेंच लावायचे आहेत असं मॅनेजिंग कमिटीला कळवलं. सेक्रेटरी तसे नवीन होते, आणि त्यांनी ईजीएम बोलावली.
"आपल्या सोसायटीत आता दहा बेंच आहेत. एन्ट्री केल्यावर डावीकडच्या दोन्ही भिंतींच्या कडेला बेंच आहेत. उजवीकडची जागा वाहनांना मागे पार्किंगमध्ये जायला रिकामी ठेवली पाहिजे. त्यामुळे अजून बेंच लावणं कठीण आहे." सेक्रेटरींनी मीटिंगमध्ये सांगितलं.
मेहता अंकलचा मुलगा चेतन चवताळून उठला. "दहादहा बेंच आहेत बिल्डिंगमंदी, एकाएका माणसचे दोनदोन बेंचपण आहेत. पण माझ्या पप्पांचा बेंच बांधायचा नाही? हा अन्याय आहे."
"तसं नाही हो, पण जागा कुठेय?" सेक्रेटरी त्याला शांत करायचा प्रयत्न करत म्हणाले.
"पप्पांचा एकतरी बेंच पायजेच. कुलकर्णींचा बेंच आता कशाला? त्यांचा फ्लॅटपण नाय आता. तो तोडा आणि आमचा बेंच बसवा. समदा खर्च मी करतो." चेतनने त्याच्या परीने सोल्यूशन दिलं, पण त्यानं आगीत तेल ओतल्याचा परिणाम झाला.
"मामांच्या बेंचला हात लावायचा नाही, समजलात?" सोसायटीत राहणारा कुलकर्ण्यांचा भाचा कडाडला.
"अहो रागावू नका. त्यांचा पाॅईंट ऐकून तरी घ्या."
"मामांचा फ्लॅट विकला म्हणताय तर रघुनाथकाकांचाही विकलाय. त्यांचे बेंचपण तोडायचे?"
सगळे निरुत्तर झाले. सोसायटीची स्थापनाच मुळात रघुनाथकाकांच्या पुढाकाराने झाली होती. जुन्या चाळीतले दिवस आठवणारे आणि त्यामुळे रघुनाथकाकांबद्दल कृतज्ञ असणारे लोक अजून सोसायटीत होते.
शिंदे आजींनी घसा खाकरला. "मी काय म्हणते, कोपऱ्यात काटकोनात बेंच आहेतच. जरा गॅप ठेवून अजून बेंच बांधला तर बेंचचा छान चौकोन होईल. आठदहा जणांना गप्पा मारायलाही बरं."
सेक्रेटरींनी सुटकेचा निश्वास सोडला. शिंदे आजींच्या सुचनेनुसार ठराव पास झाला. चेतनने दोन बेंच बसवले, आणि बेंचच्या चौकोनाच्या आत मार्बलचं छोटं टेबलही बसवलं.
चार साली डिसूझा आंटी गेल्या तेव्हा हा प्रिसिडंस होताच. रोझमेरीनं पुढच्या बेंचच्या काटकोनात एक बेंच बसवला आणि बेंचचं आखात निर्माण झालं. पुढच्या वर्षी सुब्रमण्यम अंकल गेले आणि आखाताचं रूपांतर चौकोनात झालं. मग हे चालूच राहिलं.
मुलांची खेळायची जागा जाते म्हणून कोणीतरी एकदा माफक विरोधाचा प्रयत्न केला होता; पण मुलं आता खेळतात तरी कुठे, असं सांगून त्यांना गप्प बसवण्यात आलं.
बिल्डिंगमध्ये लिफ्ट आली. खरेदी करून किंवा देवळातून दमून आलेले लोक लिफ्टने डायरेक्ट घरी जाऊन एसीची हवा खाऊ लागले. मुळात खरेदी झेप्टोवर आणि देवदर्शन अशाच कुठल्या ॲपवर सुरू झाल्यानं लोकांचं दमून घरी परतणंही कमी झालं.
आमच्या सोसायटीत आलात तर माॅलमधल्या फूडकोर्टच्या टेबलांसारखे बेंचचे चौकोनच्या चौकोन दिसतील. एकूण बेचाळीस बेंच झालेत, पण क्वचितच कोणी तिथे बसतं. नावं आणि मृत्यूतिथी यांच्या पाट्यांमुळे सोसायटीचं अंगण ख्रिश्चनांच्या स्मशानभूमीसारखं भासतं.
:D
.