Skip to main content

निळूभाऊंनी केलाय मोठाच गोंधळ

असे म्हणतात, गिनेस बुक ठेवते सगळ्याच जागतिक विक्रमांचा ताळ आणि मेळ 
पण त्यांनाही  नाही ठाऊक निळूभाऊ भुजबळांनी** किती  उडवून दिला  गोंधळ 
     
निळूभाऊ पोहोचले चंद्रावर, अनेकांनी केल्यावर बरीच धडपड अनेक काळ
किती केला खर्च, कितीकांनी किती घेतले कष्ट, कशाचाच नाही ताळ नाही मेळ
पहा किती अरसिक, लगेच जाहीर केले चंद्राची त्वचा अजिबात नाही नितळ
निळूभाऊंनी केलाय मोठाच गोंधळ, बदलूनच टाकला तो कविकल्पनांचा काळ 

       
नवी इवली चंद्रकोर, किती तिचे कौतुक, जरासेच व्यापल्यावर आभाळ
भोवतालचा अंधार बघून, सारे म्हणत ल्याली, चंद्रकळा नवयौवना अवखळ    
निळूभाऊंनी प्रत्यक्षदर्शी म्हणून सांगून टाकले, हा सगळाच  कल्पनेचा खेळ     
निळूभाऊ भुजबळांनी केलाय मोठाच गोंधळ, पूर्ण  बदलून टाकला तो जुना काळ 

अनेक विरहिणी चंद्राला घालत साकडे, सांगत, प्रियकराला ठेव सुरक्षित, सांभाळ 
अनेक इतरही देत निरोप चंद्राकडे, जणू कांही टपाल खातेच आहे, चंद्र आणि आभाळ 
निळूभाऊंनी जाहीर केले, इथल्या निर्वातात, नाही पोचत कुठलेही संदेश किंवा टपाल     
निळूभाऊ भुजबळांनी केलाय मोठाच गोंधळ, समजून घ्यायला हवा एक नवीनच  काळ 

 
विसरा ग्रहणे, विसरा त्यांचे दोष, विसरा असे पूर्व ग्रह सगळे, अगदी विसरा राहूकाळ
करा प्रयत्न, नका बघू मुहूर्त किंवा शुभ अशुभ, व्हा सुरू असो तिन्ही सांज अथवा सकाळ 
निळूभाऊच पहा, पोहोचले ना चंद्रावर, जरी आधीच्या मोहिमा ठरल्या कितिकांचा काळ
कितीकांनी घेतले कष्ट, नाही थांबले, जेव्हा होता राहू काळ, झटले जोवर हाती न आले फळ

ते असो सगळे, पण झाली आहे पंचाईत अनेकांची जे फक्त वाचतात कविता दुसऱ्या कुणाची 
मोठाच प्रश्न, कवितेत जरी प्रियेला आहे म्हटले चंद्रमुखी, आताच्या काळांत द्यावी उपमा कुणाची 

   
** Neil Armstrong