गडान्स्क : इतिहासाची समृद्ध आवर्तने
गडान्स्क : इतिहासाची समृद्ध आवर्तने
- भूषण_निगळे
युरोपातील शहरांतून फिरताना इतिहासाच्या जखमांचे व्रण क्षणोक्षणी जाणवतात. रोमन साम्राज्याचा उत्कर्ष आणि विलय रोमच्या अप्रतिम स्थापत्यातून आणि भग्नावशेषांतून दिसतो. बर्लिनने १९३३-१९४५च्या दुःखद-अपराधी घटनांची आठवण मध्यवर्ती स्मारकांद्वारे जागी ठेवली आहे. फ्रेंच राज्यक्रांतीच्या हिंसेचे पडसाद अजूनही पॅरिसच्या इमारतींतून घुमतात. या शहरांचे सौंदर्य आणि कीर्ती कालातीत असल्यामुळे युरोप दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांचा ओढा त्यांच्याकडे असतो. युरोपच्या मध्यभागी असलेल्या पोलंडला जाण्याचे बेत क्वचितच आखले जातात, आणि भेट दिलीच तर ती वॉरसॉ (राजधानी) किंवा क्राकोव्ह, ऑशविट्झ (दुसऱ्या महायुद्धातील छळछावण्यांमुळे जगाला माहीत असलेले शहर) या शहरांना असते. बाल्टिक समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या गडान्स्कला जाण्याचे प्रयोजन नसल्यामुळे प्रवासी दुर्दैवाने एका उद्बोधक अनुभवाला मुकतात.
दुसरे महायुद्ध आणि कम्युनिस्ट राजवटींची स्थापना-पडझड या विसाव्या शतकातील दोन अग्रगण्य घटना होत्या. या दोन्ही घटनांत गडान्स्कचे स्थान कळीचे होते – दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात गडान्स्कमध्ये झाली आणि कम्युनिझमच्या जागतिक पराभवाची नांदीही. परंतु शहरात फिरताना हे महत्त्व वरकरणी जाणवत नाही. प्रवाशांना प्रथमदर्शनी दिसतात तांबड्या इमारतींच्या रांगा, आखीव आणि प्रशस्त रस्ते, मोटलावा नदीचा वक्रशांत प्रवाह. इतिहासाशी अनभिज्ञ असलेल्या प्रवाशांनाही ही शांतता मोहवते. पण मग दुःखाचे स्तर उलगडत जातात आणि हा शोक प्रेमभंग झालेल्या एखाद्या युवकाचा नसून अनेक आघात सोसून समृद्ध जीवनदृष्टी जोपासलेल्या वृद्धेचा आहे हे कळते. गडान्स्कच्या समृद्ध इतिहासाचा नाद अस्फुटपणे कानी पडतो. कालांतराने त्याच्या शिकवणीचा अनुनाद मनात कायमचा झंकारणार असतो.
गडान्स्कने ११ शतकांच्या इतिहासात बरीच स्थित्यंतरे अनुभवली. बाराव्या शतकात बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावरच्या प्रमुख शहरांनी 'हान्सा लीग' नावाची संघटना स्थापन केली होती. चौदाव्या ते सोळाव्या शतकांमधील काळ हान्साच्या उत्कर्षाच्या होता. उत्तर युरोपातील व्यापारावर संघटनेची मक्तेदारी संस्थापित झाली, आणि स्वतःचे आरमार-फौजा असल्यामुळे लष्करी सामर्थ्य प्रस्थापित करता आले: संघटनेतील शहरे कुठल्याही उमराव-राजाच्या अधिपत्याखाली नसून स्वतंत्र होती. नॉर्वेतील ब्रेमेन, जर्मनीतील लुबेक आणि हॅम्बुर्ग, लातव्हियातील रीगा ही संघटनेतील कळीची शहरे होती. बाल्टिक समुद्र आणि युरोपातील प्रमुख शहरांना जोडणारे शहर असल्यामुळे गडान्स्कला महत्त्व प्राप्त झाले. अनेक देशांचे लोक, कारागीर, व्यापारी एकत्र आल्यामुळे आणि व्यापारी मक्तेदारीमुळे गडान्स्कची आर्थिक आणि सांस्कृतिक भरभराट झाली. पंधराव्या शतकापासून सुरुवात होऊन सतराव्या शतकात गडान्स्क पोलंड-लिथुएनिया साम्राज्यातील अग्रेसर शहर बनले.
गडान्स्कमधील एक रस्ता. गडान्स्कने हान्साकालीन स्थापत्याची आठवण जागी ठेवली आहे.
यथावकाश सागरी वाहतूक तंत्रज्ञानातील बदलांमुळे आणि अंतर्गत कलहामुळे हान्सा संघटना लयाला गेली. संघटनेची आठवण मात्र तिच्या शहरांच्या अनन्यसाधारण स्थापत्यातून (आणि लुफ्टहान्सा या जर्मन विमानकंपनीच्या नावातून – लुफ्ट = वायू) जागी आहे. खुद्द पोलंडचे अस्तित्वच संकटात आले – शेजाऱ्यांच्या आक्रमणामुळे पोलंड सव्वाशे वर्षे नकाशावरून पुसला गेला आणि गडान्स्कची मालकी प्रशियाकडे गेली. पहिल्या महायुद्धानंतर गडान्स्क स्वतंत्र झाले आणि एक स्वायत्त शहर म्हणून आपले अस्तित्व त्याने प्रस्थापित केले. गडान्स्कमधील जर्मन भाषकांची बहुसंख्या (गडान्स्कचे जर्मन भाषेतले डान्झिग हे नाव अजूनही प्रचलित आहे) आणि रणनीतीच्या दृष्टीने त्याचे महत्त्व पाहता हिटलरचा गडान्स्कवर डोळा होता. १९३९च्या ऑगस्टमध्ये गडान्स्कच्या वेस्टरप्लाट या द्वीपकल्पाच्या चौकीपुढे जर्मन नौदल गस्त घालू लागले. हिटलरने दिलेला शरणागतीचा आदेश गडान्स्कने येणाऱ्या परिणामांची पर्वा न करता धुडकावला. नाझी नौदलाची आगेकूच आणि गडान्स्कचा पाडाव निश्चित होता. मात्र एक सप्टेंबरच्या उषःकाली जे झाले ते साऱ्या जगाला अचंबित करणारे होते.
नाझी युद्धनौकेने तोफांचा हल्ला सुरू करून चौकीवर सैन्य उतरवले. अवघ्या तीस सैनिकांनी नाझी नौदल-सैन्याचा सामना करत गनिमाला मागे रेटले. शेवटी नाझी हवाईदलाला पाचारण करून वेस्टरप्लाट उद्ध्वस्त करावे लागले. सात दिवसांच्या प्रखर लढाईत ५० जर्मन सैनिक मारले गेले. गडान्स्कच्या झुंझार लढ्याच्या गाथेने पोलिश जनतेला प्रेरणा दिली – विशेषतः गडान्स्कच्या पोस्टखात्याच्या कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी कुठल्याही सैनिकी प्रशिक्षणाशिवाय नाझी सैन्याचा मुकाबला केला आणि शत्रूची बरीच हानी केली. जर्मनीशी परत विलीनीकरण झाल्यामुळे डान्झिगची जनता जल्लोषाने मुक्तिदात्या हिटलरचे स्वागत करत आहे याचे चित्रीकरण हिटलर आणि गोबेल्सने प्रोपागंडासाठी वापरले.
दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात जिथे झाली त्या वेस्टरप्लाटमधील नाझी हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त झालेली इमारत.
आज वेस्टरप्लाटमध्ये या स्फूर्तिदायक लढ्याचे स्मारक उभारले आहे. बलिदान देणाऱ्या सैनिकांची समाधी, हवाई हल्ल्यामुळे उद्वस्त झालेल्या बंकरचे भग्नावशेष, आणि एक मोठा स्तंभ एवढेच स्मारकाचे स्वरूप असल्यामुळे जगभर किमान आठ कोटी लोकांचा बळी घेणाऱ्या घटनांची सुरुवात या ठिकाणी झाली यावर विश्वास बसणे सुरुवातीला अवघड जाते. मग बाल्टिक समुद्राची दुःखगंभीर गाज ऐकू येते आणि मन ऐंशी वर्षे मागे जाते. दणाणणाऱ्या तोफा, संगिनींची चकमक, आणि सैनिकांच्या आरोळ्या ऐकत आहोत असा भास होतो. धारातीर्थी पडलेले काही सैनिक नुकतीच मिसरूड फुटलेली मुले होती हे छायाचित्रांवरून दिसते आणि त्यांच्या समाधीपुढे भेटीसाठी आलेल्या मुलांचा किलबिलाट मंदावतो. मानवी क्रौर्याने आणि शौर्याने मन भयचकित होते. अतुलनीय धैर्य जगाच्या कोपऱ्यातूनही येऊ शकते, ते फक्त आपल्या आत शोधावे लागते याची जाणीव होते.
अमर्याद किंमत देऊन नाझी भस्मासुराच्या तावडीतून गडान्स्क सुटले, पण नागरिकांचे नष्टचर्य संपले नाही. नाझी सैन्याने गडान्स्क सोडताना शहर बेचिराख केले, आणि स्टालिनच्या सैन्याने मुक्तीच्या वेळी जनतेवर अविरत अत्याचार केले. १९४५च्या पॉट्सडॅम करारानंतर गडान्स्कला पोलंडमध्ये समाविष्ट करण्यात येऊन स्थानिक जर्मन भाषिकांना क्रूरपणे हाकलले गेले. पोलंड कम्युनिस्ट पोलादी पडद्यामागे बंदिस्त झाल्यावर स्वातंत्र्यप्रिय पोलिश जनतेला कम्युनिस्ट दडपशाहीमुळे होणारी घुसमट असह्य होऊ लागली. कामगारांचे सार्वभौमत्व स्थापन करायला आलेल्या पोलिश कम्युनिस्ट पक्षाने प्रत्यक्षात सोविएत रशियाचे मांडलिकत्व पत्करून एकाधिकारशाही प्रस्थापित केली. एव्हाना गडान्स्कचे 'लेनिन शिपयार्ड'चे जगातील प्रमुख गोदींपैकी एक बनले होते. जीर्ण कम्युनिस्ट राजवटीला भस्मसात करणारी ठिणगी मोटलावा नदीवरच्या या गोदीत पडणार होती.
गडान्स्कमध्ये सुरू होऊन पोलंडभर पसरलेल्या सॉलिडॅरिटी चळवळीचा इतिहास प्रेरणादायक आहे. गोदीत उभारलेल्या सॉलिडॅरिटी वस्तूसंग्रहालयात या चित्तथरारक इतिहासाची तोंडओळख अतिथींना होते. गोदीतल्याच एका इमारतीत हे वस्तूसंग्रहालय स्थापले गेले आहे. इमारतीच्या भव्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर काही क्षणांतच वास्तू आपल्यावर परिणाम करू लागते आणि चैतन्य अजूनही सळाळत असल्याची भावना तीव्र होत जाते.
कामगार-क्रांतीचा अग्रदूत म्हणवणारी पोलिश कम्युनिस्ट राजवट प्रत्यक्षात कामगारांना संपाचे आणि एकजुटीचेही हक्क देत नव्हती. या अन्यायाविरुद्ध पोलिश कामगार वारंवार आवाज उठवत पण प्रत्येक वेळी सरकार मग्रूरपणे चळवळ दडपे. १९८० साली मात्र कामगारांच्या संतापाचा कडेलोट झाला; लेक वालेन्सा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली गडान्स्क गोदीच्या कामगारांनी संप पुकारला. या कामगारांशी एकजूट – सॉलिडॅरिटी – दाखवायला पोलिश जनतेतील अनेक गट पुढे आले. पोलंडभर हे सारुप्य घट्ट होत गेले आणि शेवटी राजवटीला चळवळीशी वाटाघाटी करायला गडान्स्कमध्ये यावे लागले. वालेन्सा आणि त्यांच्या सहकाऱ्यांची पार्श्वभूमी साधी होती – वालेन्सा इलेक्ट्रिशियन होते आणि ज्यांच्या हकालपट्टीमुळे संप सुरू झाला त्या ॲना वॉलेन्टीनोविश या क्रेन-चालिका. पण वाटाघाटींत आपल्या अननुभवाचे दडपण त्यांनी येऊ दिले नाही.
वाटाघाटींत कामगारांचा विजय झाला, पण सरकारची दडपशाही वाढत गेली आणि काही महिन्यांतच राजवटीने लष्करी कायदा अमलात आणला. सॉलिडॅरिटीने अनेक पराभव पचवले, पण अहिंसेचे आणि असहकाराचे धोरण कायम राखले. शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पाश्चात्त्य लोकशाही राष्ट्रे खंबीरपणे सॉलिडॅरिटीच्या मागे उभे राहिली. कॅथॉलिक चर्चनेसुद्धा आपली तटस्थता सोडून सॉलिडॅरिटी आणि कम्युनिस्ट राजवटीत मध्यस्थी केली. पोप जॉन पॉल हे स्वतः पोलिश होते आणि पोलंडला अनेकवेळा भेट देऊन त्यांनी कॅथॉलिक चर्चचा चळवळीला असलेला पाठिंबा सूचित केला.
एव्हाना सोव्हियत रशियाचे नेतृत्व गोर्बाचेव्ह यांच्याकडे आले होते. त्यांनी लष्करी सामर्थ्यावर सत्ता टिकवून ठेवण्याचा धोरणाला पाठिंबा देणार नाही असे संकेत पोलिश सरकारला दिले. १९८९ साली शेवटी पोलिश सरकारला मर्यादित निवडणुका घ्याव्या लागल्या. १०० जागांच्या वरिष्ठ सभागृहात पक्ष सहज 'बहुमत-पार' होऊ शकतो याची खात्री घमेंडखोर कम्युनिस्ट पक्षनेतृत्वाला होती. प्रत्यक्षात निकाल आले त्या वेळी सॉलिडॅरिटीने ९९ जागा जिंकल्या होत्या. काही महिन्यांतच पोलिश कम्युनिस्ट पक्ष इतिहासजमा झाला आणि लेक वालेन्सा राष्ट्राध्यक्ष बनले.
इतिहासाचा हा प्रवाह मोठ्या रंजक पद्धतीने वस्तुसंग्रहालयात मांडला आहे. कामगारांचे करड्या रंगाचे कपडे, हेल्मेट्स, कामाची अवजारे यांना मानाचे स्थान मिळाले आहे, तर सरकारचा प्रचार अभिनव पद्धतीने दर्शवला आहे. एका उभारणीत नऊ दूरचित्रवाणी संच मांडले आहेत. दर्शनी भागात सरकारचा प्रचार दिसतो ― सारे काही चकचकीत, विकसित. दर्शनी भागाला स्पर्श केल्यावर चित्र आपोआप उलटते आणि सत्यस्थिती दिसते ― दैन्य, बेरोजगारी. रेडिओवर सरकारचा अथकपणे प्रचार चालू असतो आणि सर्वोच्च महानेत्याचा जयघोष.
सॉलिडॅरिटी वस्तुसंग्रहालयातील एक संचमांडणी: कामगार संघटनेने आपल्या २१ मागण्या या दोन लाकडी फलकांवर लिहून व्यवस्थापनाला दिल्या.
पण शेवटी काय होते? वर्तमानपत्रभर जाहिराती, काबीज मीडिया (वालेन्सा यांना १९८३ सालचा नोबेल शांतीपुरस्कार मिळाल्याची बातमीला पोलिश वर्तमानपत्रांनी पाचव्या पानावर दीड कॉलम जागा दिली होती), विरोधकांचा दबलेला आवाज, गतप्राण न्यायसंस्था हे एका बाजूला. दुसरीकडे मूल्यांवर श्रद्धा आणि घटनात्मक तंत्रांवर विश्वास असलेले नेतृत्व आणि अन्यायाच्या प्रतिकारासाठी आसुसलेली जनता. या अगदीच विषम लढाईत सत्याचा विजय झालेला पाहून आपण भरून पावतो आणि हे धडे वैश्विक आहेत याची खात्री येऊन बळ मिळते.
भारतीय मनाला हुरूप येण्याचे अजून एक कारण म्हणजे वस्तुसंग्रहालयाच्या सरतेशेवटी एका स्वतंत्र हॉलमध्ये मांडलेला मदर टेरेसा आणि गांधीजींचा पुतळा. गांधीजींच्या अहिंसा-सत्याग्रहाच्या मार्गाने सॉलिडॅरिटीच्या नेतृत्वाला प्रभावित केले होते. पण गांधीजींचे ऋण फेडणे एवढाच अर्थ त्यांचा पुतळा ठेवण्यामागे नसून गांधीजींची मूल्ये कालातीत आहेत आणि त्यांचा मार्ग पुढील पिढ्यांनाही स्फूर्ती देईल हे संचालकांना ठसवायचे आहे. अशावेळी ‘गांधीजींची ओळख जगाला त्यांच्यावरच्या सिनेमामुळे झाली’ हे विधान आठवते आणि विषाद दाटून येतो.
*
पण गडान्स्कमध्ये मन अधिक काळ विषण्ण राहू शकत नाही. विषण्णतेत असहाय्यता असते, पुढील वाटचालीचे त्राण नसते. दुःखाला मात्र शांततेची किनार असते, आघात पचवून मार्गक्रमणा करण्याची अनुस्यूतता असते. असे शालीन, तटस्थ दुःख गडान्स्कमध्ये वारंवार प्रतीत होते – मग ते दुसऱ्या महायुद्धानंतर उध्वस्त झाल्यावर नव्या शैलीत बांधलेल्या इमारतींतून असो वा कम्युनिस्ट दंडेलशाहीनंतर पुनर्बांधणी केलेल्या नवीन उपनगरांत. गडान्स्कने आपले इतिहासाचे सार नेमके ओळखले आहे: दुःख चिरंतन असते, पण त्याला स्वीकारून पुढे जाण्यातच खरे शौर्य असते.
या सूत्राचा उच्चबिंदू गडान्स्कच्या मरायका (मेरी) चर्चमध्ये दिसतो. एकाच वेळी २५ हजार लोक सामावू शकणारे मरायका चर्च युरोपातील सर्वात मोठे विटांचे चर्च आहे. पण त्याची खरी भव्यता तिच्या गडान्स्क-पोलंडच्या इतिहासातील स्थानात आहे. चर्चमध्ये गडान्स्क-पोलंडच्या अनेक व्यक्तींची स्मारके उभारली आहेत: पोप जॉन पॉल, गडान्स्कचा बचाव करताना धारातीर्थी पडलेले पोस्टखात्याचे प्रतापी कर्मचारी, इत्यादी. वास्तूतून फिरताना शतकांचे मार्गक्रमण होते आणि गतावकाशाच्या मुलखातील ठळक थांबे दिसतात. गडान्स्कच्या मागील ९०० वर्षांतील ऐतिहासिक-सांस्कृतिक घटनाबिंदूंना जोडणारे महावस्त्र कधीकधी विरविरीत झाल्याचे दिसते, पण शहराच्या दृढनिश्चयाचे धागे मजबूत असल्याची ग्वाही मिळते.
एका नवीन स्मारकासमोरून मात्र पाय हलत नाहीत : पावेल आदामोवीश. १९९८-२०१९ हा प्रदीर्घ काल गडान्स्कचे नगराध्यक्षपद भूषवणाऱ्या आदामोवीशनी गडान्स्कसाठी आपले जीवन समर्पित केले होते. गडान्स्कच्या आधुनिकीकरणासाठी त्यांच्या योजना यशस्वी ठरल्या. गडान्स्कने सर्वसमावेशक, सहिष्णू मनोवृत्ती बाळगावी यासाठी ते झटले: एका अर्थी हान्साकालीन सांस्कृतिक संपन्नता आणि वैविध्य त्यांना परत आणायचे होती.
२०१९ साली एका धर्मादाय समारंभात ते देणग्यांसाठी आवाहन करत असताना एका माथेफिरू गुन्हेगाराने स्टेजवर चढून त्यांना चाकूने वारंवार भोसकले. आदामोवीश यांना तातडीने इस्पितळात नेले गेले. केवळ गडान्स्कचे नागरिकच नव्हे, तर सारी पोलिश जनता त्यांच्या जीवनासाठी प्रार्थना करू लागली. नगराध्यक्षपदाची निवडणूक नेहमी जिंकणारे आदामोवीश मृत्यूशी त्यांची लढाई मात्र हरले. "गडान्स्क उदार आहे, ते आपला चांगलेपणा इतरांना वाटते. गडान्स्कला एकजुटीचे शहर बनायचे आहे," हे त्यांचे शेवटचे शब्द होते. गडान्स्कच्या दुःखाचा अजून एक अध्याय सुरू झाला.
*
अध्याय का आवर्तन? पोलंडने खुल्या अर्थव्यवस्थेचा हिरीरीने स्वीकार केल्यावर सॉलिडॅरिटी चळवळीचा प्रभाव पूर्णपणे ओसरला आहे. आता पोलंडमध्ये एकजूट आहे ती युरोपीय संकल्पनेशी. जर्मनीशी असलेले ऐतिहासिक वैर दूर ठेवून पोलंड युरोपला ग्रासणाऱ्या समस्यांना भिडत आहे. पुतीनने २०२२ साली युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर पोलंडमध्ये लाखोंच्या संख्येने युक्रेनी लोक आले. या समान शत्रू असलेल्या आणि समवर्णीय-समधर्मीय निर्वासितांचे पोलंडने स्वागत केले (युरोपच्या बाहेरून आलेल्या निर्वासितांना मात्र तेवढे अगत्य पोलंड दाखवत नाही).
दुसरीकडे पोलंडच्या राजकारणाने आणि समाजकारणाने गेल्या काही वर्षांत चिंताजनक वळण घेतले आहे. कट्टर-उजव्या शक्ती अग्रेसर होऊन लोकशाहीची आणि व्यक्तिस्वातंत्र्याची पिछेहाट झाली आहे. स्वायत्त संस्थांचे आणि न्यायव्यवस्थेचे खच्चीकरण, गर्भपाताला आणि एलजीबीटी हक्कांना टोकदार विरोध, आणि धर्माचा वाढता प्रभाव ही या शक्तींची धोरणे आहेत आणि अनेक वर्षे सत्ता मिळाल्यामुळे त्यांना ती राबवताही आली आहेत.
गडान्स्कने मात्र आपल्या इतिहासाशी प्रतारणा न करता वाटचाल चालू ठेवली आहे. युक्रेनीच नव्हे तर इतरही निर्वासित-स्थलांतरितांचे स्वागत, उदारमतवादी मूल्यांची जपणूक, आणि सॉलिडॅरिटीप्रणित वारसा जागता ठेवत एकाधिकारशाहीला विरोध यासारख्या बाबींतून गडान्स्कने आपले हान्साकालापासून असलेले वैशिष्ट्य जपले आहे. पूर्व आणि पश्चिम युरोपला सांधणाऱ्या, माहिती तंत्रज्ञानापासून ते जहाजबांधणी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या गडान्स्कचे भौगोलिक आणि आर्थिक महत्त्व वर्धिष्णू आहे. २०२५ साली अमेरिकेत ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनले तर अमेरिका युक्रेनचा पाठिंबा काढून टाकायची शक्यता वाढेल. युक्रेन गिळंकृत करून निर्ढावलेला रशिया मग पोलंडवर लक्ष केंद्रित करू शकतो. अनेक विश्लेषकांच्या मते २०३० सालापर्यंत रशिया युरोपात आगेकूच करू इच्छितो. नाटोतून अंग बाहेर काढलेल्या आणि अंतर्गत बंडाळीमुळे वाताहत झालेल्या अमेरिकेला पुतीनला थांबवण्याचे सामर्थ्य आणि रुची असणार नाही. तसे झाल्यास गडान्स्कमध्ये रशियन आणि नाटोप्रणीत जर्मन फौजा परत भिडतील का? तीव्र ध्रुवीकरण झालेली आणि एकाधिकारशाहीच्या विळख्यात वारंवार सापडणारी पोलिश जनता मतभेद विसरून परत एकजूट दाखवेल का?
इतिहासाच्या पटावर फासे कसेही पडोत, घाव पचवत गडान्स्क वाटचाल करत राहील. यथावकाश भळभळत्या ओल्या जखमा खपली धरतील, बुजतील. त्यांचे व्रण आणि इतिहासाची अवीट शिकवण गडान्स्क धीरोदात्तपणे मिरवीत राहील.
संदर्भ :
१. डान्झिगच्या लढाईचा नाझी युद्धयंत्रणेने कसा उपयोग केला याच्या माहितीबद्दल श्री. अरुण खोपकर यांचा मी ऋणी आहे.
२. 'बदलता युरोप' या गोविंदराव तळवलकरांच्या पुस्तकात सॉलिडॅरिटी चळवळ आणि १९७० ते १९८९च्या घटनांचे उत्कृष्ट वर्णन आणि विश्लेषण आहे. (मॅजेस्टिक प्रकाशन, १९९१).
३. 'पोस्ट वॉर' हा टोनी ज्यूड यांचा अद्वितीय ग्रंथ १९४५ नंतरच्या युरोपीय इतिहासाचा सर्वदर्शी आढाव घेतो, तो आवर्जून वाचण्यासारखा आहे. (पेंग्विन, २००५).
प्रतिक्रिया
फार उत्तम लेख!
फार उत्तम लेख!
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
लेख आवडला. माहितीपूर्ण आहे.
लेख आवडला. माहितीपूर्ण आहे. असे भरपूर लेख येवोत.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.