चेतागुंजन

#संकल्पनाविषयक #समाजमाध्यम #ललित #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२४

चेतागुंजन
- झंपुराव तंबुवाले

क्लिनीक
डॉक्टर गार्गी चाणक्य यांचे चकचकीत क्लिनिक. प्रशस्त खोली, खोलीत मोजकेच पण किमती फर्निचर. टेबलांवरच्या किमती फ्लॉवरपॉट्समध्ये ताजी टवटवीत फुलं. खिडक्या बंद असूनही नैसर्गिक वाटावी अशा प्रकाशाची योजना. भिंतींवर चेतापेशींची गुंतागुंत असलेले, सोन्या-चांदीच्या तलम धाग्यांनी मढवलेले मनोहारी ॲब्स्ट्रॅक्ट आर्ट. शेजारी वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजचे प्रमाणपत्र. डॉ. गार्गी, त्यांच्या पांढऱ्या कोटात आणि गोल काचांच्या सुबक चश्म्यात, खुर्चीत रेलून समोर बसलेल्या तरुणाचं बोलणं ऐकत लयबद्धतेने मान हलवतात.

समोर बसलेल्या तरुणाचे डोळे विस्फारले. त्यानं थरथरत्या आवाजात विचारलं, "डॉक्टर, मला नेहमी असं वाटतं की कधीही काहीतरी भयंकर घडणार आहे. काहीच बरोबर होत नाही. थोडंसं काही चुकलं की माझं मन सैरभैर होतं. पुढचं सगळं वाईट होईल असं वाटतं. शांत बसवत नाही. काय करू, काहीच कळत नाही."

डॉ. गार्गी थोड्या पुढे वाकल्या, शांत आणि हळुवार आवाजात म्हणाल्या, "असं पाहा. आपला मेंदू एखाद्या संगणकासारखा असतो. लहानपणापासून आपण त्याला हळूहळू वेगवेगळ्या गोष्टी शिकवतो. पण सगळं शिकलेलं बरोबरच असेल असं नाही. आणि सगळ्या गोष्टी नेहमीच एकसारख्या होत नाहीत. अनिश्चिततेला सामोरं जाताना आपला मेंदू संपूर्ण माहिती नसलेल्या अशा रिक्त जागा भरण्यात तरबेज असतो. यामुळे अनेकदा आपला वेळ वाचतो आणि कधीकधी जीवही."

"जीव वाचतो? तो कसा?" उत्सुकतेमुळे पहिल्यांदाच तरुणाच्या आवाजातील थरथर थोडी कमी झाली.

डॉक्टर गार्गींनी त्यांच्या नोटपॅडवर एक न्यूरल नेटवर्कचं स्केच काढलं; अनेक टिंब आणि त्यांना परस्पर जोडलेल्या रेषा.

"म्हणतात ना, 'भित्यापाठी ब्रह्मराक्षस'. अंधारात आपण कधीकधी दोरीला साप समजतो. चुकून दोरीला साप समजल्यास फार काही बिघडत नाही. त्याउलट खऱ्या सापाला जर दोरी समजलो तर मात्र जीव जाणार. दोऱ्या किती वेळा असतात आणि साप किती वेळा असतात हे माहीत असूनही अनेकदा मेंदू तुम्हाला उपयुक्त ठरेल असा शॉर्टकट घेतो."

"मग माझं डोकंच ठीक नाही का? काही गडबड झालीय का?"

"नाही," डॉक्टर हसून म्हणाल्या. "पण तुमचे न्यूरल हॅल्युसिनेशन्स अर्थात दोरीला साप समजणारे मनाचे खेळ वाढले असू शकतात. अपूर्ण डेटावर प्रशिक्षित कृत्रिम बुद्धिमत्तेप्रमाणेच आपला मेंदूही असे काल्पनिक धोके दर्शवू शकतो."

तरुणानं विचारले, "मग मी काय करू?"

डॉ. गार्गी म्हणाल्या, "आपल्या मनाला त्या टोकाच्या विचारांपासून दूर न्यायचं. फक्त मोठे डोंगरच नाहीत, तर आजूबाजूला सुंदर दऱ्याही आहेत हे मनाला दाखवायचं. विचारांचा आवाका वाढवायचा. वाइटापेक्षा चांगलं काय होऊ शकतं याचा विचार करायचा. तुम्हालाच फरक जाणवू लागेल."

तरुणानं हळूहळू मान डोलावली, त्याच्या चेहऱ्यावरचा ताण थोडासा निवळला. आशेचा एक किरण दिसल्यासारखा तो हलकेच हसत म्हणाला, "म्हणजे... ते बदलणं शक्य आहे? गोष्टी वेगळ्या प्रकारे पाहणं?"

डॉ. गार्गी हसल्या आणि सकारात्मक पुनर्रचनेसाठी काही सूचना लिहून दिल्या. तो तरुण बाहेर जात असतानाच त्यांच्या फोनवर एक नवीन संदेश दिसला.

"रुग्णांच्या केसेसबद्दल अधिक तपशील हवा आहे. आपली मॉडेल्स सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण असू शकणारे पॅटर्न्स दिसत आहेत." स्फटिक.

डॉ. गार्गींच्या कपाळावर आठ्या पडल्या, त्यांचं बोट त्या संदेशाला उत्तर देण्याच्या बटणावर रेंगाळलं, पण बटन न दाबताच त्यांनी हात मागे घेतला. फोन बाजूला ठेवून सेक्रेटरीला पुढच्या रुग्णाला आत पाठवायला सांगितलं.

मेंदू चेतागुंजन

प्रयोगशाळा

अनेक गोष्टींनी गजबजलेली प्रयोगशाळा. पण अस्ताव्यस्त नाही. समीकरणांनी भरलेले व्हाइटबोर्ड आणि संगणकांच्या अनेक स्क्रीनवर नाचणारी आकडेमोड. अशाच एका स्क्रीनकडे तल्लीनतेनं पाहत आहे स्फटिक प्रेमधागे. आयआयटी मुंबईमधून कृत्रिम बुद्धिमत्तेची पदवी मिळाल्यानंतर त्याने स्वत:ची प्रयोगशाळा थाटली. कॉलेजकुमार शोभेल अशी देहयष्टी, काळे-कुरळे केस आणि अंगावर साधा टीशर्ट आणि जीन्स. हाताची बोटं टेबलवरच कीबोर्डसारखी बडवण्यात मग्न. दरवाजाचा आवाज झालेला ऐकून तो मागे वळला.

"गार्गी, तू हे बघायलाच हवं. हे लार्ज लँग्वेज मॉडेल डेटाच्या छोट्याछोट्या, विलग तुकड्यांवरूनही भावनिक स्थितींचा अंदाज लावायला लागलंय – थोडक्यात या मॉडेल्सचं स्वप्नरंजन हे मानवी स्वप्नरंजनाचा ठाव घेण्यात यशस्वी होण्याची चिन्हं आहेत."
असं म्हणत स्फटिकने लॅपटॉपवरील काही आलेखांकडे बोट दाखवलं.

डॉ. गार्गी कुतूहलानं पुढे होऊन स्क्रीन न्याहाळत म्हणाल्या, "बहुतांश रुग्णांना अनिश्चितता छळत असते. डेटा आणि विचार एकत्र करून मेंदूला मनोहारी भविष्य वर्तवायला शिकवू शकलो तर अनेक प्रश्न सुटतील."

स्फटिक मान डोलावत म्हणाला, "अगदी. जर आपल्याला पेशंट्सची थोडी जास्त माहिती मिळाली, तर आपलं मॉडेल आणखी सुधारेल."

डॉ. गार्गींनी किंचित हसत तर्जनीने चश्मा मागे ढकलला. "स्फटिक, तू कायम जास्त माहिती मागतोस. पण तुला माहीत आहे की रुग्णांची गोपनीयता किती महत्त्वाची आहे ते."

स्फटिक हसून खांदे उडवत म्हणाला, "अर्थात, अर्थात. पण तुला माहीत आहे की मी नेहमी आणखी डेटाच्या शोधात असतो. तुला तुझ्या प्रॅक्टिसमध्ये माझ्या रिसर्चची मदत झाली आहे हे विसरू नकोस. आधी छोटीशी खोली होती; आता एक प्रशस्त क्लिनिक आहे. आणि मी कुठे कोणाशी ती नावे शेअर करणार आहे."

"नाहीच विसरणार. म्हणूनच आपण अजूनही बरोबर काम करतो आहोत. आणि तू जशी ती नावे गोपनीय ठेवायची म्हणतोस तसेच मीही तशी ती गोपनीय ठेवण्यास बांधील आहे."

त्यानंतर बराच वेळ डेटा आणि मॉडेल्सबद्दल दोघं बोलत राहिले.

सत्संग
माँ सर्वज्ञा. सोशल मिडियावरचं एक नवं प्रस्थ. गोरीपान. भगवी वस्त्रं ल्यालेली. सदैव वज्रासनात. डोक्याभोवती हलकासा तेजोगोल. माँचा आशिर्वाद करेल संकटावर मात अशा सफाईदार स्टाईलच्या, भय दूर करणाऱ्या आणि आंतरिक शांतिशोधनात मदत करणाऱ्या ऑनलाइन व्याख्यानांमुळे माँच्या चाहत्यांची संख्या पाहता पाहता लाखांपासून कोटींपर्यंत गेली. त्या व्याख्यानांमध्ये प्रगल्भ काही नसलं तरी त्यांत सहजी पोहोचणारे सामान्य संदेश असत. पण प्रत्यक्ष, थेट असं कोणत्याच वैयक्तिक प्रश्नांचं त्यांत समाधान नसे. तरीही त्या लोभसवाण्या टीझर्समुळे लोक माँच्या प्रत्यक्ष सत्संगाकडे आकर्षित होत.

या टीझर्समध्ये एक प्रकारचं आश्वासन होतं, आयुष्यातल्या कठीण समस्यांशी लढण्याचं बळ आणि शिकवण मिळण्याचं आश्वासन होतं. त्यातून लोक माँच्या सत्संगांकडे ओढले जात. तिच्या ऑनलाइन उपस्थितीनं प्रेरित झालेले नवीन अनुयायी लाइव्ह सेशनला उपस्थित राहण्याच्या संधीसाठी उत्सुकतेने नोंदणी करत. पण सत्संगाची संधी तितकी सोपी नसे. नावनोंदणीनंतर बहुधा कोणतीतरी सखोल तपासणी होत असे. अनेक आठवड्यानंतर काहींना सत्संगाचे आमंत्रण येई, तर काहींना सांगण्यात येई की काही दिवसांनी पुन्हा प्रयत्न करा. कारण नेहमीच कमी जागा असल्याचे सांगितले जाई.

दोन अनुयायी, दोघेही भगव्या वस्त्रांमध्ये, सत्संग सुरू होण्याची वाट पाहत असताना हळू आवाजात कुजबूज करत होते. हॉलमध्ये मंद प्रकाश पसरला होता. धूपाच्या धुरानं हॉल थोडा रहस्यमय झाला होता.

अनुयायी १ एक मध्यमवयीन, डोळ्यात भक्तीची चमक असलेला पुरुष आहे. तो मृदु आवाजात म्हणतो, "तुम्ही माँचा नवीन व्हिडिओ पाहिला का सोशल मिडियावर? लगेच व्हायरल झाला. एका तासात दहा लाखांहून अधिक व्ह्यूज."

अनुयायी २ एक तरुण स्त्री आहे. जोरात मान डोलावत ती म्हणते, "हो तर. माँची शिकवण आगीसारखी पसरते आहे. पण तुम्हाला माहीतच आहे की त्या ऑनलाइन जे सांगतात ती फक्त झलक आहे."

अनुयायी १ म्हणतो, "अगदी. अगदी. ऑनलाइन व्हिडिओ फक्त झलक आहेत. पण इथे, सत्संगात खरं ज्ञान मिळतं. इथेच आपण आपल्या भीती आणि चिंता दूर करायला शिकतो."

अधिकाधिक लोक हॉलमध्ये येऊ लागतात, सर्व जण नियमानुसार आवश्यक असलेल्या भगव्या वस्त्रांमध्ये. पुरुष धोतरांमध्ये, स्त्रिया दुपदरी वस्त्रांमध्ये, दोन्ही गट वेगवेगळ्या भागात. फोन, वॉलेट बाहेर लॉकर्समध्ये बंद. फोटो घेणे, एवढेच नाही तर कागदावर लिहून घेण्यावरही बंदी. आवश्यक ती लिखित सामग्री सर्वांना सत्संगानंतर मिळण्याचा रिवाज असतो.

अनुयायी २ आवाज थोडा खालावत म्हणते, "मी वास्तवात माँला कधीच जवळून पाहिलेले नाही, पण ते महत्त्वाचं नाही. त्यांची उपस्थिती सर्वत्र आहे – त्यांचे शब्द आपल्याला मार्गदर्शन करतात."

अनुयायी १ मान डोलावतो. मंद स्मित करत तो म्हणतो, "आपण त्यांना पाहिलं किंवा नाही, त्यांची शिकवण महत्त्वाची. इथे यायला लागल्यापासून, मी माझ्या चिंतांचा खुल्या मनाने स्वीकार आणि सामना करू शकलो आहे."

अनुयायी २ साश्रू नयनांनी म्हणते, "मला माहीत आहे तुम्हाला काय म्हणायचे आहे. मीही मनाच्या काळोखात भरकटले होते – भविष्याची भीती, स्वतःबद्दल शंका. पण माँचे अनुसरण करायला लागल्यापासून, सगळं वेगळं वाटतं. माझ्या मनातल्या गोंगाटाच्या पलीकडे पाहण्याचा एक नवीन मार्ग. नद्या ना नद्या वाटतात, ना डोंगर डोंगर असल्यासारखे वाटतात."

अनुयायी १ म्हणतो, "मलाही. कधीतरी आपल्याला माँचे प्रत्यक्ष दर्शन होईल अशी आशा आहे."

अनुयायी २ म्हणते, "हो ना. तो खरा सुदिन असेल. पण मी असं ऐकलं आहे की अनेक पातळ्या ओलांडून मगच माँच्या आतल्या वर्तुळात शिरता येतं."

अनुयायी १ पुन्हा मंद हसत म्हणतो, "त्या पायऱ्यांना लागणारे अधिकाधिक पैसे मी कधीचे जमवून ठेवले आहेत."

दोघेही क्षणभर शांतपणे एकमेकांकडे बघतात, हॉलमध्ये शिरून दरवाजा बंद करतात. त्यांच्या भोवती, इतर लोकांची हलकी कुजबूज. सगळ्यांच्या नजरा गाभाऱ्याप्रमाणे सजवलेल्या स्टेजवर. स्टेजसमोर असलेली अर्ध-पारदर्शक हिरवट काच वरच्या दिव्यांचा मृदू प्रकाश परावर्तित करत असते. मागे दिसणाऱ्या आकृतीचे अस्पष्ट रूप तिच्या रहस्यमयतेत भर घालते.

माँ सर्वज्ञाचा आवाज येताच हॉल शांत होतो. मन शांत करणारा आवाज खोलीत भरतो. "मन कसं खोटी भीती आणि चिंता निर्माण करणारं एक दोषपूर्ण यंत्र आहे, यावर आजचा भर आहे. मनाला पुनर्प्रोग्राम करण्याची गरज, या भ्रमांच्या पलीकडे पाहून सत्य आणि स्पष्टता शोधण्याची आवश्यकता." अनुयायी तन्मय होऊन ऐकतात, प्रत्येक शब्द झेलत, मान डोलावत.

त्यांच्यासाठी, हे केवळ एक व्याख्यान नाही; ही एक गहन अनुभूती आहे. सोशल मिडिया व्हिडिओंनी त्यांना इथे आणले असेल, पण सत्संगांची व्याप्ती आणि तीव्रता त्यांना पुन्हा पुन्हा येण्यास प्रवृत्त करते. असा विश्वास देऊन की त्यांना त्यांच्या मनातली आणि जीवनातली गुंतागुंत सोडवता येईल.

तपास

युधिष्ठिर त्याच्या अपार्टमेंटमध्ये बसला होता – पुस्तकांनी आणि कात्रणांनी अस्ताव्यस्त. अनेक रॅक्समध्ये त्याने घेतलेल्या इंटरव्ह्यूच्या कात्रणांनी भरलेल्या फाईल्स असतात. भिंतीवर अटलांटिकचे इन्वेस्टीगेटिव्ह जर्नलिजमचं प्रमाणपत्र. हात लांब करून त्यानं बिअरचा मग उचलला. रिकामा आहे पाहून पुन्हा टेबलवर दाणकन आदळला. जवळच्या दोन स्क्रीन्सवर माँचे यूट्युब व्हिडिओ सुरू होते. माँ सर्वज्ञाच्या सोशल मिडियावरील अचानक उदयाचा तो मागोवा घेतो आहे. तिच्या अनुयायांच्या संख्येत होणार प्रचंड वाढ त्याला आश्चर्यकारक वाटत राहते. त्याला संशय असतो की तिची कथा इतरांपेक्षा वेगळी पण तितकीच पोकळ आहे. मात्र तिच्या इतिहासाचा कोणताही मागमूस मिळत नसतो. या प्रकाराचा छडा लावण्याच्या प्रयत्नात इतर सगळ्या गोष्टी मागे पडत राहतात. सरतेशेवटी काही धागेदोरे मिळायची शक्यता निर्माण होते. अनेक महिन्यांच्या प्रयत्नांनंतर माँच्या सत्संगात प्रवेश मिळवण्यात युधिष्ठिर यशस्वी होतो. चक्क नाव बदलून. तिथे नेमकं काय करायचं यावरच त्याचा विचार सुरू असतो..

दुसऱ्या दिवशी सत्संगाला युधिष्ठिर पोचतो तेव्हा कोणकोणत्या डिटेल्सची नोंद करायची हे ठरवूनच. मात्र फोनबरोबर डायरी आणि पेनही बाहेर ठेवावे लागल्यामुळे आता मदार केवळ स्मरणशक्तीवर. त्यानं तिथे बाहेर रीतीनुसार भगवं धोतर नेसलं. थोडं अस्वस्थ वाटत असूनही इतरांमध्ये मिसळून जाण्याचा त्यानं निश्चय केला. विचक्षण नजरेनं त्यानं खोली न्याहाळली; कोणी ओळखीचे दिसतं का, त्याचप्रमाणे स्टेज, त्यासमोरची पारदर्शक काच, काचेच्या मागची आकृती वगैरे.

माँ सर्वज्ञा आज मनाच्या पुनर्प्रोग्रामिंगबद्दल बोलत असतात. पूर्वग्रह नष्ट करून मनाच्या पुनर्बांधणीबद्दल. युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत राहतो. खोलवर कुठेतरी त्याची एक आठवण चाळवते.

अनुयायी ३ शेजारच्याला हळूच म्हणतो, "माँ दोषपूर्ण प्रोग्रामिंग आणि हॅल्युसिनेशन्सबद्दल बोलताहेत... जणू त्या माझ्या मनात डोकावून पाहू शकतात."

अनुयायी ४ मान डोलावत म्हणतो, "म्हणूनच हे सत्संग ऑनलाइनपेक्षा वेगळे आहेत. प्रत्येकासाठी पर्सनल. शुद्धतेच्या त्या अवतार असल्यामुळे आपली सगळी पापे धुऊन निघतात."

सत्संग संपत असताना युधिष्ठिरला दुसऱ्यांदा डेजा वू होतो. वाक्-प्रचार, उपमा परिचित वाटतात. तो त्या स्वतःशी घोकत हॉलमधून बाहेर पडतो, त्याने ते कुठे आधी ऐकले आहे हे आठवण्याचा प्रयत्न करत.

जाणीव

त्याच्या अरुंद, गजबजलेल्या अपार्टमेंटमध्ये परत आल्यावर, युधिष्ठिर त्याच्या डेस्कवर बसतो. एक दिवा अस्ताव्यस्तपणे पसरलेल्या त्याच्या नोट्सवर पिवळसर प्रकाश टाकत असतो. माँ सर्वज्ञाच्या शिकवणीचं कोडं सोडवण्याचा प्रयत्न करत युधिष्ठिर डोळे मिटतो आणि त्याच्या मनाला सत्संगाकडे परत जाऊ देतो. तिथला मंद प्रकाशित हॉल, धुपाचा सुगंध, माँ सर्वज्ञाचा शांत खोलीभर पसरलेला आवाज, तिचे शब्द या सर्वांची आठवण येते.

सत्संगातील घोकलेले वाक्-प्रचार पहिल्यांदाच जोरात उच्चारतो, समोर पडलेल्या कागदावर पटापट लिहितो.

"मन हे एक दोषपूर्ण यंत्र आहे. कोणतेही धोके नसताना भ्रम निर्माण करणारे. या भ्रमांवर मात करण्यासाठी तुम्हाला तुमचे मन पुनर्प्रोग्राम करावे लागेल..."

युधिष्ठिर पेन खाली ठेवतो. जवळच्या रॅकमधून तीन-चार वह्या बाहेर काढतो, त्याची बोटं उत्सुकतेनं पानं उलटतात. शेवटी, त्याला हवी ती गोष्ट सापडते – 'मन : एक कोडे' ह्या डॉ. गार्गी चाणक्य यांच्या मुलाखतीच्या त्याच्या जुन्या नोट्स. ती मुलाखत काही वर्षं जुनी असते. अधाश्यासारख्या तो त्या वाचून काढतो. वाक्यं अगदी तीच नसली तरी त्यांच्यातलं साधर्म्य वादातीत असल्याचं त्याला दिसतं. क्षणात त्याच्या नजरेसमोर त्या मुलाखतीचा दिवस येतो. डॉ. चाणक्यांचं क्लिनिक छोटंसं होतं, पण पेशंटना हाताळण्याच्या त्यांच्या पद्धतीवरच्या एका प्रबंधामुळे त्या त्यांच्या वर्तुळात प्रसिद्ध झाल्या. आधी त्यांनी मुलाखतीला दिलेला नकार, आणि ती एका जर्नलमध्ये छापली जाणार असल्याचे कळल्यावर दिलेला होकार हेही त्याला आठवतं.

युधिष्ठिरनं पटकन उठून बाजूच्या ड्रॉवरमधून एक टेप काढली आणि शेजारच्या प्लेयरमध्ये टाकली. तसं करताना या सगळ्या टेप्स डिजिटल बनवायच्या असं स्वत:ला बजावलं.

मुलाखत ऐकताना त्याच्या हृदयाची धडधड वाढली. माँ आणि गार्गी यांच्या वक्तव्यांमधली समानता सहजी जाणवू शकेल अशी होती – शब्दरचना, उपमा वगैरे. भाषणाची लय मात्र अगदी वेगळी. चांगली प्रॅक्टिस सोडता माँला मिळणारे पैसे हे गार्गीच्या श्रीमंतीचे रहस्य असणार का? माँचा सत्संग रेकॉर्ड करणे शक्य नसल्यानं त्याच्याजवळ थेट पुरावा काहीच नव्हता. युधिष्ठिर उठला आणि खोलीत येरझाऱ्या घालू लागला. स्वतःशीच बडबडत.

सरळ पोलिसांकडे जावं का असा विचार मनात येताच पुन्हा पुराव्याजवळ त्याची गाडी अडली. आणखी पुरावा मिळवायला हवा. शेवटी त्याने एक निर्णय घेतला आणि सरळ डॉक्टर चाणक्यांना फोन लावला. पलीकडून एक पेंगुळलेला आवाज आला, "कोण बोलतंय?"
"मी युधिष्ठिर. आठवतंय का, मी तुमची मुलाखत घेतली होती? 'मन : एक कोडे'."
"अहो, पण काही काळ वेळ? रात्रीचे अकरा वाजले आहेत."
"कारण तसं महत्त्वाचं आहे. मला तुमची जुळी बहीण सापडली आहे."
"हे कोणतं भलतंच कोडं? मला कुणी बहीण नाही."
"माँ सर्वज्ञा."
"कोण माँ? असं करा, तुम्ही सकाळी क्लिनिकला या. जे सांगायचं आहे ते आमने-सामने सांगा."
"आताच भेटावं लागेल; नाही तर या वेळचा लेख वर्तमानपत्रातच. तोही उद्याच्याच."
"हे काय भलतंच? ठीक आहे. मी तुमच्या या नंबरवर माझा पत्ता पाठवते."
"नाही, नाही. घरी भेटता येणार नाही. तुमच्या घराजवळच्याच नेताजीनगरच्या हॉटेल पॅलेसवर भेटू. ते उघडं असतं उशिरापर्यंत. बरोबर १२ वाजता."
"ठीक आहे." झोपाळूपणाऐवजी आता गार्गीच्या आवाजात नाराजी जास्त होती.
युधिष्ठिरनं फोन ठेवला. तो जे करणार होता त्यात धोका आहे याची त्याला जाणीव होती, पण आता मागे फिरण्यात अर्थ नव्हता.

सामना

युधिष्ठिर हॉटेल नेताजीमध्ये दहा मिनिटं आधीच पोचला. त्याची ही नेहमीची जागा असल्यानं त्याला कोपऱ्यातलं, त्याच्या आवडीचं टेबल लगेच मिळालं. वेटरला खूण करून त्यानं समोसे आणि दोन चहा मागवले. मध्यरात्र होत आली असल्यानं हॉटेलमध्ये तुरळकच लोक होते. त्यांतले निदान अर्धे झिंगलेले. बरोबर बारा वाजता गार्गी पोचल्या. झोपेतून उठून आल्यामुळे त्यांचा नेहमीचा पॉलिश्ड लुक नव्हता.

पोचताच युधिष्ठिरसमोरच्या खुर्चीवर अंग टाकत त्यांनी विचारलं, "किती हिस्सा हवा?"
आक्रमक पावित्र्याची तयारी असलेला युधिष्ठिर गांगरला. "हिस्सा? कसला?"
"माझ्या बहिणीचं गुपित राखण्याचा."
"तुम्ही सगळं मान्य करता तर?" युधिष्ठिर गोंधळून म्हणाला.
"मान्य काहीही नाही. मी तुमची परीक्षा घेत होते. सांगा काय प्रकरण आहे ते."
पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावरचे मिश्कील भाव युधिष्ठिरला दिसले.

"तुम्ही तुमच्या मुलाखतीत मनाबद्दल जे सांगितलं तसंच माँ सर्वज्ञा त्यांच्या सत्संगांमध्ये सांगतात."
"तर? मी जे सांगते ते सर्वज्ञात आहे. कोणालाही तसं सांगता यायला हवं. आणि कोण ही माँ?"
"तिच्याबद्दल तुम्ही ऐकलं नाही असं शक्यच नाही. सर्व सोशल मिडियावर असते ती."
"हं. काही फॉर्वर्ड्स आले असतील, पण लक्ष द्यायला मला वेळ नसतो. दाखवा एखादं."

युधिष्ठिरनं फोन काढला, पण लगेच पुन्हा खिशात ठेवत म्हणाला, "पण या ऑनलाईन रील्समध्ये तसे शब्दप्रयोग नसतात."
"युधिष्ठिर, तुम्ही माझा वेळ वाया घालवत आहात. एखादं चांगलं मनोरहस्य सापडण्याचा आशेनं मी आले आणि तुमच्याजवळ काहीही नाही. इथे भेटण्याऐवजी तुम्ही माझ्या ऑफिसातल्या कोचावरच शोभाल. निघते मी."
युधिष्ठिरनं पुन्हा फोन काढला आणि माँ सर्वज्ञाचा फोटो दाखवला.
"आणि ही माझी बहीण कशी? ना रंग सारखा, ना रूप."
"अहो, पण मन आणि लार्ज लँग्वेज मॉडेलांबद्दल तुमचीच भाषा ती बोलते." पुरावा नसल्यानं पुढे काय बोलावं हे युधिष्ठिरला कळत नव्हतं.
"काय? एल. एल. एम. मात्र माझी मक्तेदारी आहे. सांगा काय म्हणते ती." गार्गी पुन्हा खाली बसत म्हणाली.
ते ऐकून खिशातून डायरी काढत आठवणीनं लिहिलेली वाक्ये युधिष्ठिर वाचायला लागला.
"हं. या वक्तव्यांवरून माझी बहीण शोभेल खरी. पण आमचा काऽही संबंध नाही. सांगा मला जरा तिच्याबद्दल." वेटरला आणखी चहा आणायची खूण करत गार्गी म्हणाली.

युधिष्ठिरनं तिच्या सोशल मिडियावरील यशोगाथेपासून, सत्संगातील प्रवेशापर्यंत सगळं सांगितलं.
"नाव युधिष्ठिर आणि तुम्ही खोट्या नावानं गेलात?" त्या गंभीर झालेल्या वातावरणातही गार्गीनं हसत विचारले.
"करावंच लागलं. लोकांना अनेक महिने आत शिरता येत नाही. आत गेल्यावरच मला कळलं की तिथेही प्रत्यक्ष माँला भेटताच येत नाही."
"म्हणजे?"
"त्यात अनेक वर्तुळं आहेत. प्रत्येक ठिकाणी जास्त पैसे देऊन आणि फक्त आमंत्रितांनाच प्रवेश मिळतो."
"याचा अर्थ ही शुद्ध लुबाडणूक आहे. आतापर्यंत साधी आणि चांगली काँपिटीशन वाटत होती. प्रवेश मिळायला वेळ का लागतो?"
"माँचे अनुयायी प्रत्येकाची कसून तपासणी करतात."
"मग तुम्हाला खोट्या नावानं कसा प्रवेश मिळाला?"
"माझी पोलिसांशी ओळख आहे ना. तशी थोडी व्यवस्था केली होती."
"मग तुम्ही पोलिसांकडेच का जात नाही? ते शोधतील ही कोण बया आहे ते."
"पुराव्याशिवाय काही करणार नाहीत ते."
"तेही योग्यच म्हणा. सरकार मात्र वाट्टेल त्याला आत टाकतं. काय करायचं म्हणता आता?"
"तुम्ही जर माँ नसाल तर तुमचा एखादा पेशंट तर नसेल ना हे करत?"
"पण मी ती नाही हे सिद्ध कुठे झालं आहे अजून?"
"तुमच्या शब्दावर माझा विश्वास आहे. मिळेल पेशंट्सची यादी?"
"पेशंट्सची यादी?" ताडकन उठत गार्गी म्हणाली.
"का? काय झालं?" युधिष्ठिरने विचारले.
"नक्की हे स्फटिकचंच काम."
"कोण स्फटिक?"
"स्फटिक प्रेमधागे हा माझा कंप्युटिंगमधला गुरू. त्याच्याच बरोबर मी मन आणि लार्ज लँग्वेज मॉडेल एकत्र करायला शिकले. तो खूप महत्त्वाकांक्षी आहे आणि त्यानं अनेकदा माझ्या पेशंट्सची यादी मागितली आहे."
"पण स्फटिक हा माणूस आहे, आणि माँ एक बाई?"
"दाखवा पुन्हा ते व्हिडिओ."
युधिष्ठिरनं इतक्यातले सोशल मिडियावरचे दोन-तीन व्हिडिओ दाखवले. गार्गीने ते बारकाईने पाहिले. तिसऱ्या व्हिडिओतला माँचा चेहरा गार्गीने निरखून पाहिला आणि अचानक म्हणाली, "बिंगो."
"काय झालं?"
"माँ हा एक केवळ डिजिटल अवतार आहे. सामान्यांना सहजी भुलवता येईल इतका चांगला हा जनरेटिव कृत्रिम बुद्धिमत्तेचा आविष्कार. माझा पेशाच लोकांच्या चेहऱ्यांवरचे हावभाव टिपण्याचा असल्याने मी ते ओळखू शकले. तुम्हाला तो हवा आहे, मी नाही."
"डीप फेक? पण इतका चांगला? हा तर अगदीच नैसर्गिक वाटतो. हावभाव, बॅकग्राऊंड, आवाज."
"सगळ्या व्हिडिओंचं ॲनालिसिस केलं तर त्यात नक्कीच त्या डीप-फेकच्या सिग्नेचर्स सापडतील. I am certain!"
"हं. यामागे जर तुम्ही म्हणता तसा स्फटिकसारखा एखादा कंप्युटर सायंटिस्ट असेल तर त्यांचे सोशल मिडियावरचे फॉलोअर पटापट का वाढत आहेत, हेसुद्धा समजणं सोपं आहे. त्या प्लॅटफॉर्मवर काही खोटे सीड्स वापरून असं करता येऊ शकतं हे ऐकलं आहे."
"त्याची महत्त्वाकांक्षा इतके पुढे जाईल असं कधीच वाटलं नव्हतं."
"अजूनही आपले हात रिकामेच आहेत. आधी पुरावा मिळवावा लागेल. मी पाहतो कोणते टूल्स वापरता येतील ते."
"बरंच आधी आम्ही एकत्र तयार केलेलं मटेरियल मी पण तुम्हाला पाठवून देते." गार्गी म्हणाली.
आणखी थोडी चर्चा करून दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला, दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटायचं ठरवून.

पुरावा

अपार्टमेंटमध्ये परत येताच युधिष्ठिर डिजिटल सिग्नेचर शोधण्याच्या मागे लागला. झोप न झाल्यानं लाल झालेले डोळे ताणत त्यानं अनेक ब्राउझर टॅब्स उघडले: सोशल मिडिया प्रोफाइल्स, कोड रिपॉझिटऱ्या आणि तंत्रज्ञान उत्साही एआय आणि डीपफेक तंत्रज्ञानांवर चर्चा करतात असे फोरम.

त्यानं माँ सर्वज्ञांच्या सर्वांत लोकप्रिय व्हिडिओपैकी एकावर लक्ष केंद्रित केलं. मंदगतीने चालवत, प्रत्येक फ्रेम तपासत. माँचा शांत चेहरा, भगवी शाल, मोहक डोळे – सर्व काही खूपच परिपूर्ण वाटतं. त्याने एक नवीन टॅब उघडला आणि डीपफेक निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या ज्ञात अल्गोरिदम्सचा क्रॉस-संदर्भ घेत, कृत्रिमतेच्या खुणा शोधू लागला.

व्हिडिओमध्ये एक छोटी विसंगती दिसताच त्याचे डोळे बारीक झाले. पार्श्वभूमीतल्या काही पिक्सेलमध्ये काही वेळा क्षणिक चमक दिसली, अनैसर्गिक वाटावी इतकी एकसमान. तो थांबला आणि रिवाइंड आणि झूम करत, ब्राइटनेस आणि कॉन्ट्रास्ट बदलत पुन्हा पुन्हा त्या भागांचा अभ्यास केला. त्याचं हृदय आता जोरात धडधडत होतं.

"गॉट यू." युधिष्ठिर नकळत जोरात ओरडला.

पुढच्या तासाभरात तेच टेक्निक वापरून अजूनही तीन-चार चुका त्यानं शोधून काढल्या. कृत्रिम बुद्धिमत्ता आता अतिप्रगत असली तरी अजून नैसर्गिक झालेली नव्हती. स्फटिकनं गार्गीबरोबर प्रयोगशाळेत काम करताना तयार केलेल्या डिजिटल सामग्रीचंही युधिष्ठिरने विश्लेषण केलं. अनेक सॉफ्टवेअर लायब्रऱ्या त्यांच्या मॅन्युअलसकट ऑनलाईन असल्यामुळे असं करणं कोणालाही सहजी शक्य आहे. तीच कोडिंग स्टाइल, आणि कोड हाताळण्यासाठी वापरलेलं तंत्रज्ञान.

शेवटी सर्व गोष्टी जुळल्या. "स्फटिक प्रेमाधागे, एआय प्रतिभावान, माँ सर्वज्ञांच्या डिजिटल मुखवट्यामागे आहे. त्याने प्रगत एआय तंत्रं वापरून एक विश्वसनीय व्यक्तिमत्व तयार केलं आहे. ते वापरून लाखो लोकांची फसवणूक करत आहे." संगणकावर एक फाईल उघडून युधिष्ठिरने धडाधड टाईप करणे सुरू केले. सकाळच्या वर्तमानपत्रांच्या दृष्टीनं उशीर झाला होता पण ई-पुरवणीत जागा नक्की होती.

धाड

दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता युधिष्ठिर डॉ. चाणक्यांच्या क्लिनिकला पोचला तेव्हा दोन पेशंट तिथे बसले होते. युधिष्ठिरचं व्हिजिटींग कार्ड पाहून रिसेप्शनिस्टनं त्याला बसायला सांगितलं. तितक्यात गार्गीच्या खोलीत असलेला पेशंट दरवाजा उघडून बाहेर आल्याचं पाहून युधिष्ठिर पटकन आत शिरला. तो असा अचानक शिरल्यानं गार्गीच्या हातातलं पेन खाली पडलं. युधिष्ठिरनं काही न बोलता हातातले प्रिंटआऊट गार्गीच्या समोर ठेवले. ते वाचताना गार्गीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले.

"आमच्या भागीदारीचा असा फायदा करून घेत होता तो? केवळ वर्तमानपत्रात हे देऊन चालणार नाही. थेट त्याला गाठायला हवं. लगेच जाऊ या त्याच्या लॅबवर." गार्गी म्हणाली.
"हो, पण फक्त आपणच नाही. ११ वाजता पोलीसही तिथे पोचणार आहेत."

पोलीस स्फटिकच्या लॅबवर पोचले तेंव्हा मात्र त्यांच्या हातात काहीच पडलं नाही. लॅब पूर्ण रिकामी होती.

त्याच वेळी पोलिसांची दुसरी तुकडी सत्संग हॉललाही पोचली. पोलिसांच्या गाड्या पाहून अनुयायी आणि इतर बघ्यांचा एक छोटासा जमाव बाहेर तयार झाला. हॉलचे मोठे लाकडी दरवाजे ढकलून पोलीस आत शिरले. त्या पूर्ण रिकाम्या जागेत, तिथल्या संगमरवरी फरशीवर त्यांच्या बुटांचा आवाजाचा प्रतिध्वनी येत राहिला.

धुपाचा सुगंध अजूनही हवेत दरवळत होता. स्टेजवरील पारदर्शक काच तशीच; पण त्यामागची व्यक्ती गायब. केवळ काळजीपूर्वक घडी केलेलं एक भगवं वस्त्र शेजारच्या खुर्चीवर.

आतल्या खोलीत पोलिसांना रेकॉर्डिंगसाठी वापरलेली उपकरणे सापडली - उच्च-प्रतीचे कॅमेरे, लाइटिंग रिंग्ज, प्रगत ऑडिओ सेटअप - पण काहीही लाइव्ह नाही. प्रत्येक गोष्ट स्टेज केलेली, लाइव्ह सत्संगाचा आभास निर्माण करण्यासाठी काळजीपूर्वक नियोजित केलेली.
आणखी एका कुलुपबंद स्टोरेज रूममध्ये त्यांना कागदपत्रांचे ढीग सापडले – उपस्थितांची तपशीलवार नोंद, संभाव्य भरतीबद्दल टिपा, आणि सर्वांत अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे नावांची एक यादी. वर लाल शाईत लिहिलेलं : "बाहेर ठेवा. संभाव्य धोका."
त्याच वेळी युधिष्ठिरचा तपशीलवार लेख इंटरनेटवर बाँबसारखा आदळला. माँ सर्वज्ञाच्या शिकवणीमागची हाताळणी, तिच्या व्यक्तिमत्त्वाचा आभास निर्माण करण्यासाठी वापरलेले डीपफेक तंत्रज्ञान आणि कदाचित डॉ. चाणक्य यांच्या संशोधनातील मानसशास्त्रीय डेटाचा अनैतिक वापर. सोशल मिडिया प्रतिक्रियांनी पेटून उठला – धक्का, अविश्वास, राग दर्शवणारे आणि विश्वासघात झाला असे म्हणणारे तर होतेच, पण तितक्याच हिरीरीनं हे सर्व माँ विरूद्धचे कारस्थान आहे असं म्हणणारेही होते. युधिष्ठिरला जिवाच्या धमक्याही मिळाल्या.

अनुयायी ५ म्हणाला, "माँ खरी नव्हतीच? इतका वेळ आपण एका मशीनचे ऐकत होतो?"
अनुयायी ६च्या डोळ्यांतून अश्रूंची धार वाहत होती. तो हुंदके देत म्हणाला, "पण माँची मला मदत झाली. ती खरीच होती."

स्फटिक प्रेमाधागे यांनी काळजीपूर्वक तयार केलेला तो डिजिटल आभास, आणि स्वत: स्फटिक नाहीसे झाले होते. मागे अनेक प्रश्न आणि भंगलेला विश्वास सोडून. पुन्हा कुठे आणि कसे अवतरतील कुणास ठाऊक. स्फटिक अचानक आणि बिनबोभाटपणे गायब झाल्यामुळे बाकीच्यांना होत्या त्यापेक्षा एका मोठ्या शंकेनं युधिष्ठिरच्या मनात घर केलं होतं.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कथा छान फुलवली आहे. आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रस्तुत दिवाळी अंकातील आदूबाळाच्या लेखाव्यतिरिक्त त्यातल्या त्यात आवडलेली कथा. कथाबीज चांगले आहे (मुख्य म्हणजे सेन्सिबल आहे), आणि ते सुसूत्रपणे चांगले फुलविलेले आहे. मेक्स परफेक्ट सेन्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा आवडली. ऐसीचा दिवाळी अंक वाचताना, आदुबाळाच्या पाठोपाठ झंपुरावांना शोधले जाते आपोआप. कारण दोघेही कधी निराश करत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा आवडली. ही कथा आणि "स्नॅपचॅट स्वप्ना" ही कथा अंकाच्या थिमशी मिळती जुळती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0