Skip to main content

आय लाईक द वे यू मूव्ह

"अरे काल संध्याकाळी कट्ट्यावर दिसला नाहीस?"

"पुतण्याचं लग्न आहे उद्या - त्याच्याच फंक्शनला गेलो होतो."

"पुतण्याचं नाव काय म्हणालास?"

"रमेश. जीएम रमेश."

"जीएम? तुझा पुतण्या जेनेटिकली माॅडिफाईड आहे?!?"

"गप रे! जीएम म्हणजे ग्रँडमास्टर. 2525 चं इलो रेटिंग आहे त्याचं!"

"अरे वा! कधी बोलला नव्हतास? पण ते असो. कालचं मेहंदी-संगीत वगैरे कसं झालं? मजा आली?"

"संगीत नव्हतं. आगळावेगळा कार्यक्रम होता."

"म्हणजे?"

"म्हणजे असं बघ. संगीत वगैरे कार्यक्रम करतात तेव्हा उपस्थित सगळेच काही संगीताचे चाहते नसतात. मग उपस्थितांना आवडेल असं काहीतरी केलं पाहिजे असं रमेशला वाटलं. म्हणून संगीत न ठेवता बुद्धीबळाचा कार्यक्रम आयोजित केला होता."

"अरे पण त्याच्या होणाऱ्या बायकोला चाललं हे?"

"हो! ती वुमन इंटरनॅशनल मास्टर आहे. दोघांच्या फ्रेंड सर्कलमधे बहुतांशी बुद्धीबळपटूच आहेत. आणि ध्वनिप्रदूषण टाळता येईल म्हणून दोन्ही घरचेही तयार झाले - नागरी कर्तव्याची जाण आहे हो मुलीकडच्यांना!"

"पण हा कार्यक्रम नेमका कसा झाला?"

"छान हाॅल घेतला होता. आरामदायक खुर्च्या मांडल्या होत्या. बुजुर्ग ग्रँडमास्टर्ससाठी पुढे लाल सोफे मांडले होते. बरीस स्पास्कींनाही आमंत्रण होतं, पण ते येऊ शकले नाहीत. मागच्या रांगांमध्ये बसणाऱ्यांना कार्यक्रम नीट दिसावा म्हणून स्क्रीनवरही प्रक्षेपण होतं.

छान स्टेज होतं. संगीत असलं तर गाणं म्हणायला एकेक-दोनदोन जण क्रमाने स्टेजवर जातात तसंच होतं.

पहिला मान व्याही आणि विहीणींचा होता. आधी कोण खेळणार असे रूसवेफुगवे होऊ नयेत म्हणून स्टेजवर एकाच वेळी दोन पट मांडले होते. कोरिओग्राफरने - आपलं, ट्रेनरने - उत्तम तयारी करून घेतली होती त्यामुळे दोन्ही गेम ड्राॅ झाले.

नंतर नवरानवरी दोन गेम खेळले, आणि एकेक गेम जिंकले. पुढे संसारात कधीकधी पडतं घ्यावं लागतं याचा जणू वस्तुपाठच आहे असं बारूआजींनी सांगितलं तेव्हा सर्वांनी टाळ्या न वाजवता मन:पूर्वक माना डोलावल्या.

इतर सिनियर नातेवाईक मुलांच्या इच्छेला मान देऊन थोडाथोडा वेळ खेळले. काहींना कॅसल किंवा ऑन पासां करता येत नव्हतं, पण उत्साह वाखाणण्यासारखा होता.

जरा मध्यमवयीन पिढीचे लोक खेळताना आपलं तरूणपणातलं कौशल्य दाखवायचा प्रयत्न करत होते, पण बहुधा स्वतःचं हसं करून घेत होते. आता तूच सांग - किंग्ज गॅम्बिट ॲक्सेप्टेड नाहीतर ब्लॅकमार गॅम्बिट वगैरे चाळीशीच्या लोकांना शोभतं का? दुसरं टोक म्हणजे दोन पुरंध्री लंडन सिस्टीमचा रटाळ गेम खेळल्या - कशाबशा जांभया आवरल्या यार!

तरूण मंडळी खेळताना मात्र वातावरण हलकंफुलकं होतं. कुठे "आय लाईक द वे यू मूव्ह" अशी प्रशंसा ऐकून कोणी नवयौवना आरक्त होत होती. कोणी उसनं अवसान आणून "आज तेरा भाई कारो-कान क्या चीज है वो तेरी होनेवाली भाभी को दिखाकेही रहेगा" असं सांगत होता. नवऱ्यामुलाचा बेस्ट फ्रेंड तर अगदीच चेकाळला होता - चार करवल्यांसोबत चार पटांवर एकदम सायमलटेनियस खेळणार वगैरे बोलू लागला तेव्हा मीच त्याला गप्प केलं.

बाकी बच्चेकंपनीसुद्धा मजेत होती. जरा मोठी मुलंॲन्टी-चेस खेळत होती, आणि अगदी लहान मुलं हत्ती-उंट-घोडे यांच्या पुतळ्यांमागे लपाछपी खेळत होती.

नंतर खाणं वगैरे झालं, आणि कार्यक्रम संपला."

"झकास. मजा आली तर!"

"मजा आली. पण आनंद आला असता तर अधिक आनंद झाला असता."

Node read time
2 minutes
2 minutes

अमुक Fri, 15/12/2023 - 21:49

नादस्वरम वा सनईवर राग 'पट'दीप वगैरे नव्हता?
आनंद आला नसला, तरी 'विशी'न्ग असेलच ना! ;-)

सागर शाह आणि अमृता मोकल ह्यांचं लग्न आठवलं.

'न'वी बाजू Sat, 16/12/2023 - 18:33

एक वेगळा प्रयोग म्हणून ठीक आहे. (बोले तो, ष्टोरी. लग्नात बुद्धिबळाचा कार्यक्रम नव्हे.)

बाकी, मराठी लग्नांत आजकाल जर मेहंदी-संगीत वगैरे उपरे प्रकार खपतात (नव्हे लागतात), तर मग हेच काय वाईट आहे, म्हणतो मी. (ते मेहंदी-संगीत प्रकार याहूनही रटाळ नि रद्दी असतात. तरी बरे, वर-वधू क्रिकेट- किंवा हॉकीपटू – नाहीतर स्विमिंग चँपियन – वगैरे नाहीत.)

‘ध्वनिप्रदूषण’ वगैरे पंचेस आवडले; मार्मिक आहेत.

(लग्नातले उखाणे काय, चेकमेटवरून का?)

चिमणराव Sat, 16/12/2023 - 20:21

शंकर पार्वती सारीपाट खेळली म्हणे.
एक नवरा नवरी डोंगर भटकंती वाले होते. त्यांचं लग्न ड्यूक्स नोज आणि समोरचा सुळका यांत दोर लावून हवेत अधांतरी लावलं . आमंत्रित दोन्ही सुळक्यावर. ( मला आमंत्रण नव्हते पण मी बसलो होतो तिकडे मुलाकडची मंडळी होती - तर नवऱ्या मुलाकडून होतो). भटजी डोंगर भटकंती वाला नव्हता पण त्यालाही तिसऱ्या दोरावरून पुढे पाठवलं आणि अधांतरी मांडी घालून बसला बिचारा.
असो. मजा आली. चालायचंच.

जयदीप चिपलकट्टी Sun, 17/12/2023 - 02:53

मुकुंद्राव म्हणतात कसे: रात्री करूया हेल्पमेट
पण घोडं पुढे सरकेना अन् होऊन बसली स्टेलमेट

-----

'न'वी बाजू Sun, 17/12/2023 - 03:53

In reply to by जयदीप चिपलकट्टी

“घोडं पुढे सरकेना”वर श्लेष असणार, अर्थात?

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 21/12/2023 - 03:44

In reply to by देवदत्त

म्हणजे ज्यानं चांद्रयान कुठे उतरवायचं हे ठरवलं नाही तो! समजलं. तो मान मोदीजींचाच!

'न'वी बाजू Fri, 10/01/2025 - 02:49

(धागा वर आणण्याकरिता तथा जुने प्रतिसाद दृश्य करण्याकरिता.)