Skip to main content

भारतीय पुरुषत्वाचा समाजशास्त्रीय धांडोळा

भारतीय पुरुषत्वाचा समाजशास्त्रीय धांडोळा

मंगेश कुलकर्णी

 

लंडन विद्यापीठातील ब्रिटीश ॲकेडमी ग्लोबल प्रोफेसर संजय श्रीवास्तव ह्यांनी गेली तीस वर्षे भारतातील पुरुषत्वाच्या विविध नागर आविष्कारांचा समाजशास्त्रीय धांडोळा घेऊन त्याआधारे विद्याक्षेत्रीय (academic) तसेच वर्तमानपत्रीय स्वरूपाचे विपुल लेखन केले आहेशिवाय त्यांनी माहितीपटही निर्मिले आहेत. सदर वैचारिक प्रकल्पातून प्राप्त झालेल्या अंतर्दृष्टी त्यांच्या मॅस्क्यूलिनिटी, कन्झ्यूमरिजम ॲन्ड द पोस्टनॅशनल सिटी (केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस, २०२२) या ग्रंथामध्ये साररूपाने उपलब्ध आहेत. श्रीवास्तवांच्या लेखनात शास्त्रशुद्ध तथ्यसंकलन, सैद्धान्तिक व्यासंग, काटेकोरपणा, कल्पकता आणि समानुभूति यांचा मनोज्ञ मिलाफ आढळतो. 

Masculinity, Consumerism and the Post-national Indian City

या ग्रंथातील मांडणीच्या केंद्रस्थानी असलेल्या काही कळीच्या संकल्पना आणि विषयसूत्रे पुढीलप्रमाणे. ‘पुरुष असणे म्हणजे काय?’ याविषयीच्या समाजनिर्मित वर्तनात्मक आणि देहलक्ष्यी संकेतांचा तसेच व्यवहारांचा समुच्चय म्हणजे ‘पुरुषत्व’. जेथे सामाजिक अस्मिता घडतात आणि अभिव्यक्त होतात तो ‘पैस’. भारतीयत्व राखण्याचे चिंतायुक्त व्यवधान बाळगून उपभोगपरतेचा सक्रिय पाठपुरावा करण्याची प्रवृत्ती ‘नैतिक उपभोगवाद’ या संज्ञेतून सूचित होते. अशा उपभोगवादाशी संबंधित खासगीपणा व व्यक्तिपरायणता जोपासणाऱ्या संस्कृती, तद्जन्य आकांक्षा आणि त्यांचा राष्ट्रभावनांशी असलेला अनुबंध दर्शविण्यासाठी ‘उत्तरराष्ट्रवाद’ ही संकल्पना योजली आहे.

नव्वदीच्या दशकात श्रीवास्तव ह्यांनी डेहराडून येथील डून स्कूल या १९३५ मध्ये स्थापन झालेल्या केवळ मुलांसाठीच्या प्रख्यात निवासी शाळेचा सांगोपांग अभ्यास केला. ही शाळा इंग्लंडमधल्या पब्लिक स्कूलच्या धर्तीवर बेतलेली असूनही निव्वळ एक प्रतिकृती नव्हती. प्रत्येक विद्यार्थ्याचे शरीर, बुद्धी आणि चारित्र्य यांची राष्ट्रउभारणीच्या कार्यास अनुरूप जडणघडण करणे हे या शाळेचे मुख्य उद्दिष्ट होते. विवेकनिष्ठता, धर्मनिरपेक्षता व महानगरी संवेदनशीलता ही आदर्श नागरिकत्वाची सांस्कृतिक गुणवैशिष्ट्ये असल्याची धारणा या कार्यक्रमपत्रिकेस पायाभूत होती. श्रीवास्तव ह्यांच्या मते डून स्कूल हे वसाहतवादाच्या दीर्घ छायेत उदयाला आलेल्या राष्ट्रीय संस्थाप्रणालीचे प्रारूप असून या शाळेच्या मुशीत घडलेले अभिजनवादी पुरुषत्व भारतीय समाज-वास्तवाशी विसंगत होते.

विसाव्या शतकाच्या संधिकाळामध्ये देशात घडलेल्या स्थित्यंतरांमुळे डून स्कूलने स्वीकारलेला नागरिकत्वाचा आदर्श भंग पावला आणि त्याचबरोबर हिंदू बहुसंख्यांकवादाचा व्यापक प्रसार झाला. या परिवर्तनातून नागरी पैसात अवतरलेले पुरुषत्वाचे आणि धार्मिकतेचे आविष्कार व  त्यांच्यातील आंतरसंबंध हा श्रीवास्तवांच्या आस्थेचा विषय आहे. बजरंग दल या कट्टर उजव्या संघटनेचे सदस्य असलेल्या युवकांवरील त्यांचा लेख याची प्रचिती देतो. नागर समाजातील ह्या युवकांच्या जीवनाचे विविध पैलू ससंदर्भ तपासून श्रीवास्तव असा निष्कर्ष काढतात की केवळ ‘हिंदू राष्ट्रवादाचे वाहक’ म्हणून त्यांची संभावना करणे अयोग्य ठरेल. त्यांच्या पुरुषी अस्मितेची रचना व तिचे विखंडीत स्वरूप, तसेच पुरुषी सत्तानिर्मितीतील नव्या उपभोग-संस्कृतींची महत्त्वाची भूमिका यांकडे ते लक्ष वेधतात.

हिंदी चित्रपट हा आधुनिक भारतीय जनसंस्कृतीचा आणि सामूहिक जाणिवेचा एक प्रमुख निर्धारक आहे. स्वाभाविकपणे श्रीवास्तव या चित्रपटांमधून प्रतीत होणाऱ्या पुरुषत्वाच्या आविष्कारांची चिकित्सा करतात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या दोन दशकांत हिंदी चित्रपटांचा नायक सहसा ‘पंचवार्षिक योजनांचा अध्वर्यू’ या स्वरूपात दिसतो असे निरीक्षण ते नोंदवतात. योजनाबद्ध विकासाच्या तत्कालीन राष्ट्रीय प्रकल्पाला उपकारक अशा पुरुषत्वाचे तो प्रतिनिधित्व करतो.  नागरी सुसंस्कृतपणा, विज्ञान/तंत्रज्ञान यांतील पारंगतता, मितव्ययी वृत्ती, राष्ट्रउभारणीच्या कार्याप्रतीची प्रतिबद्धता हे गुण त्याच्याठायी आढळतात. मात्र १९७०च्या दशकात एक नवी नायक-प्रतिमा उदयाला आल्याचे जाणवते. निमशहरी पार्श्वभूमी असलेला, अन्याय्य व्यवस्थेशी झगडणारा हा ‘संतप्त तरुण’ अमिताभ बच्चनने यशस्वीपणे साकारला व उदंड लोकप्रियता मिळवली. राज्यसंस्थेविषयीचा अविश्वास, उपभोगवादाचे आकर्षण आणि उत्तरराष्ट्रवादाची भुरळ हे ह्या नायकाचे गुणविशेष भावी जनसंस्कृतीचे द्योतक ठरतात.

पारंपरिक उपचारपद्धतींद्वारे लैंगिक समस्या सोडवण्याचा दावा करणारे दवाखाने दिल्ली, मुंबई व इतर शहरांमध्ये आढळतात. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात निम्नस्तरीय पुरुषांचा राबता असतो. आरोग्यविषयक व्यावहारिक सल्ला देणाऱ्या ह्या दवाखान्यांमध्ये ग्राहकांच्या लिंगभाव अस्मितांविषयी ज्या चर्चा होतात व तत्संबंधी ज्या ज्ञानप्रक्रिया घडतात त्यांचा नेटका अभ्यास श्रीवास्तव ह्यांनी केला आहे. पदपथावर विकल्या जाणाऱ्या कामोद्दीपक साहित्यातून दृग्गोचर होणाऱ्या शहरी जीवनाबद्दलच्या पुरुषी कल्पनारतींची चिकित्सा देखील त्यांनी केली आहे. उपभोग-संस्कृती आणि ‘आधुनिक’ स्त्रीविषयीची भयमिश्रित लालसा ह्यांच्या मुशीत घडलेल्या पुरुषत्वाचे स्वरूप त्यातून स्पष्ट होते.

हिंदी चित्रपटांप्रमाणेच त्या भाषेतील गुप्तचर कथा लोकप्रिय आहेत. पण अभ्यासकांनी त्यांच्याकडे पुरेसे लक्ष दिल्याचे दिसत नाही. या पुरुषप्रधान, प्रायः नागरकेंद्री साहित्याचे महत्त्व श्रीवास्तव जाणतात. वेद प्रकाश शर्मा (१९५५-२०१७) ह्या बहुप्रसव व मोठा वाचकवर्ग असलेल्या लेखकाच्या दोन कादंबऱ्यांचे विवेचन करून त्यांतील लैंगिकतेच्या आशयसूत्राचे ‘ब्रह्मचर्य’ आणि तथाकथित ‘स्थिर भारतीय कुटुंबव्यवस्था’ या रूढ कल्पनांशी असलेले साहचर्य ते अधोरेखित करतात. जागतिकीकरणाच्या जमान्यातील उपभोगप्रधान आधुनिकता आणि ‘पारंपरिक’ नीतिमत्ता यांची सांगड घालून या कादंबऱ्या नागर पुरुषत्वाला पाठबळ देतात.

समकालीन नागर स्त्रिया सार्वजनिक अवकाशात वावरतात आणि ठरावीक उपभोगवादी व्यवहारांमध्ये सामील होऊ शकतात. मात्र हे करत असताना पुरुषी वर्चस्व आणि नियंत्रण यांपासून त्या मुक्त नसतात. या पार्श्वभूमीवर श्रीवास्तव स्त्रियांच्या सुरक्षेसाठी योजलेल्या उपाययोजनांची चिकित्सा करतात. व्यामिश्र सामाजिक समस्यांतून सुरक्षाविषयक आव्हाने निर्माण होतात याकडे दुर्लक्ष करून सुयोग्य तंत्रज्ञानातून त्यांचे निराकरण होईल असे मानण्याकडे साधारणतः कल असल्याचे ते दाखवतात. नागर जीवनासंबंधीच्या पुरुषी मनोविश्वातील तंत्रकेंद्री कल्पितादर्श आणि नैतिक उपभोगवाद विषयक धारणा यांची गुंफण यातून नजरेसमोर येते.

इथवर चर्चिलेली बहुतांश आशयसूत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्यावरील लेखात एकवटली आहेत. गेल्या दशकात मोदींची एक प्रतिमा देशाच्या सार्वजनिक जीवनात केंद्रस्थानी विराजमान झाली. ती घडवण्यात त्यांचा सक्रिय सहभाग तर आहेच; शिवाय प्रसारमाध्यमे आणि निवडणूक मोहिमा यांचेदेखील या प्रतिमानिर्मितीत लक्षणीय योगदान आहे. तिच्यातून मोदींची शक्तिशाली, गतिमान मर्दानगी अधोरेखित होते; तसेच सुरक्षा, कार्यक्षमता व सुबत्ता यांची ग्वाही मिळते याकडे श्रीवास्तव निर्देश करतात. पुरुषत्वाच्या या मोदीप्रणीत प्रतिमानात जुन्या भारतीय पुरुषी परिभाषितांना कलाटणी दिली आहे आणि वेगाने बदलणाऱ्या नागर जीवनात उद्भवणाऱ्या आकांक्षा व चिंता यांची दखल घेतली आहे. पुरुषत्व, नागर समाज आणि भांडवल यांचे परस्परसंबंध जाणण्यासाठी उत्तरराष्ट्रवाद व नैतिक उपभोगवाद या संकल्पना कशा प्रस्तुत ठरतात ते या प्रतिमा-चिकित्सेतून प्रतीत होते असे श्रीवास्तव ह्यांचे प्रतिपादन आहे.

आधुनिक भारतीय पुरुषत्व आणि नागर संस्कृती यांचा वेध घेताना श्रीवास्तव ह्यांनी एतद्देशीय सामाजिक वास्तवाच्या महत्त्वपूर्ण पैलूंवर मौलिक भाष्य केले आहे. त्यांच्या संशोधनपर लेखनातून  समाजशास्त्रीय चिकित्सेचा एक वस्तुपाठ निष्पन्न होतो व त्यापासून अनेक समानधर्मी अभ्यासकांना चालना मिळाली आहे. सदर ग्रंथ परिचयात त्यातील काही ठळक मुद्द्यांचा धावता आढावा घेतलेला आहे. तो वाचून मूळ ग्रंथसंपदेविषयी कुतूहल जागृत झाल्यास ह्या टिपणाचा हेतू साध्य झाला असे म्हणता येईल.

मंगेश कुलकर्णी 

(पूर्वप्रकाशन : मिळून साऱ्याजणी, जून २०२५)

पुस्तकाचे तपशील
Masculinity, Consumerism and the Post-national Indian City
Sanjay Srivastava
Cambridge University Press
Hardcover, 210 pages
31 October 2022
₹1,230

चिमणराव Wed, 04/06/2025 - 21:01

पुरुष असणे म्हणजे काय?’ याविषयीच्या समाजनिर्मित वर्तनात्मक आणि देहलक्ष्यी संकेतांचा तसेच व्यवहारांचा समुच्चय म्हणजे ‘पुरुषत्व’.

समाजाला अभिप्रेत पौरुषत्व वेगळेच असते. वेगवेगळ्या जनसमुदायात पौरुषत्वाची वेगळी व्याख्या होईल.

मारवा Wed, 04/06/2025 - 22:06

Multiple Personality Disorder.

नितिन थत्ते Wed, 25/06/2025 - 21:11

टेस्ट प्रतिसाद