काश जावेद साहब ............
परवा लल्लन्टॉप या प्रसिद्ध युट्युब वाहीनीवर एक वादचर्चा प्रसिद्ध करण्यात आली. चर्चेचे शिर्षक Does God Exist ? असे होते. या चर्चेत नास्तिकांच्या बाजुने जावेद अख्तर हे होते आणि आस्तिकांच्या बाजुने मुफ्ती शामाईल नादवी हे होते. या सुमारे २ तास चाललेल्या चर्चेची वैशिष्ट्ये म्हणजे
१- चर्चा फारच सुंदर रीतीने करण्यात आली कुठले प्रश्न घ्यावे काय वेळ देण्यात यावी चर्चा कशी करावी हे सर्व पुर्वनियोजित होते आणि तसे अंमलातही आणले गेले.
२- दोन्ही चर्चक अख्तर आणि नादवी उत्तम वक्ते आणि अभ्यासु होते. (नादवी अख्तरांना अकॅडेमीकली भारी पडत होते पण ते एक असो )
३- एक मॉडरेटर म्हणुन श्री सौरव द्विवेदी यांनी आपली भुमिका फार चोखपणे बजावली आणि चर्चेचे उत्तम संचलन केले त्यामुळे चर्चा एका उंचीला पोहोचली.
४-प्रेक्षकवर्ग व स्थान दोन्ही तालेवार होते प्रेक्षकांमधुन सुद्धा उत्तम प्रश्नांच्या फैरी झाडण्यात आल्या.
५-तमाम कचरा टेलीव्हिजीन वाहीनींच्या आक्रस्ताळी, किंचाळी चर्चकांना आणि वाईट्ट अशा निवेदकांच्या गालावर या सुसंस्कृत चर्चेने एक सणसणीत चपराक हाणली.
६-तमाम नेटीझन्स नी या चर्चेला अल्पावधीत विक्रमी व्ह्युज देउन ( ३ दिवसात आतापावेतो ५५ लाख ) आणी अक्षरशः हजारो कॉमेंट्स चा पाऊस पाडुन डोक्यावर घेतले.
अशा अजुन चर्चा घडोत हीच सदीछा. कोणाची कुठलीही बाजु असो प्रेक्षकांना चर्चेतुन छान मुद्दे मिळाले.
आता यामध्ये आस्तिकांच्या बाजुने मांडणी करणारे मुफ्ती यांनी एक प्रश्न विचारला की जगातील वस्तुनिष्ठ नैतिकतेचे अधिष्ठान काय आहे तुम्हा नास्तिकांच्या मते ? हे सांगा आमच्या मते ईश्वर हाच जगातील मानवी वस्तुनिष्ठ नैतिकतेचे अधिष्ठान आहे. ( आपके पास ऑब्जेक्टीव्ह मोरालिटी का कोइ फाऊंडेशन नही है ) पुढे मुफ्ती यांनी प्रश्न विचारला की तुम्हा नास्तिकांच्या जगात वस्तुनिष्ठ नैतिकता कशी ठरवणार ? यावर जावेद अख्तर यांना खरे म्हणजे चांगले प्रत्युत्तर जमलेच नाही. अख्तर म्हणाले की
मेजॉरीटी ठरवणार की काय चांगले आहे काय नाही. त्यावर मुफ्ती म्हणाले की जसे जर्मनीच्या मेजॉरीटी ने ठरवले की ज्युंचे जेनोसाइड हे योग्य आहे तर तुम्ही म्हणाल की ते योग्य आहे ? यावर जावेद म्हणाले की त्यावेळेस सर्व पृथ्वीतलावर ग्रहावर जितके लोक होते त्यांचे मेजॉरीटी मत असे होते का की जेनोसाइड व्हावे या अर्थाने ? त्यावर मुफ्ती म्हणाले की अच्छा सर्व पृथ्वीग्रहाची मेजॉरीटी ठरवणार तर मग संपुर्ण पृत्थ्वीवर धर्म मानणारे जे आहेत ते बहुसंख्य आहेत मग तुम्ही धर्म का मानत नाही ?
एकुण जावेद अख्तर यांना मुफ्तीने बर्यापैकी जेरबंद केले.
माझ्या मते जावेद अख्तर हे एक उत्तम शायर, भाषाप्रभु वगैरे आहेत यात वाद नाही मात्र ते उत्तम अभ्यासक असे काही फारसे वाटत नाही. त्यंना मुफ्ती ने मांडलेले मुद्दे समजुन घेण्यातही अडचण येत होती, ते अनेकदा चाचपडत अडखळत होते तर ते एक असो.
माझे ही चर्चा पाहतांना मुफ्ती यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर दोन बाजुने केलेले तर्क आठवले. मुफ्ती यांचा महत्वाचा प्रश्न की वस्तुनिष्ठ नैतिकता अशी काहीही अस्तित्वात असु शकत नाही. ईश्वर हाच मानवी नैतिकतेचे अधिष्ठान आहे. म्हणजे ईश्वर आहे त्याचा न्याय आहे त्याची भिती आहे तो आपल्या पापाची शिक्षा देईल आणि सुकर्माची सुफळे देइल हे निश्चीत आहे. आणि म्हणुनच ईश्वर प्रेरीत मानवी नैतिकता जगात अस्तित्वात आहे. वस्तुनिष्ठ ईश्वर अस्तित्वा व्यतिरीक्त स्वतःच्या पायावर उभी असणारी वस्तुनिष्ठ नैतिकता संभवतच नाही अशा अर्थाचे मुफ्ती यांचे आर्ग्युमेंट होते.
याचाच असा अर्थ की ईश्वर नसेल किंवा नसता तर कोणीही नैतिक राहणार नाही नसता. मानवी नैतिकता स्वतंत्र असुच शकत नाही तिचा आधारस्तंभ ईश्वर हाच आहे.
हे आर्ग्युमेंट जुनेच आहे. विवेकानंद सुद्धा हेच आर्ग्युमेंट थोडे वेगळ्या अर्थाने अद्वेत बाजुने करतात. विवेकानंद विचारतात की अद्वैतवाद ज्या शुद्ध-बुद्ध-मुक्त-नित्य ब्रह्म तत्वाचे प्रतिपादन करतो जे की सर्व मानव प्राणि वनस्पती सर्व सर्वांत विराजमान असे तत्व आहे तेच खरे मानवी नैतिकतेचे अधिष्ठान आहे. विवेकानंद विचारतात की माणसाने माणसाला का मारु नये किंवा दुख देऊ नये इ. कारण की सर्वात तेच ब्रह्म तत्व विराजमान आहे म्हणुन इतरांप्रति केलेली हिंसा ही स्व प्रतिच होणार इत्यादी. अशाच लाइन वर त्यांचे आर्ग्युमेंट असे
या वरील मांडणीचा प्रतिवाद करतांना मला दोन संदर्भ महत्वाचे वाटतात
एक तात्विक अंगाने या वरील मांडणीच्या विरोधात उत्तम आर्ग्युमेंट जे केलेले आहे ते इमान्युएल कांट या विख्यात तत्ववेत्याने नैतिकते संदर्भात ईश्वरनिरपेक्ष अशा नैतिकतेची मांडणी केलेली आहे.
दुसरे म्हणजे the god delusion या ग्रंथात Richard dawkins यांनी वैज्ञानिक दृष्टीकोणातुन माणुस उत्क्रांत होत असतांना उत्क्रांतीच्या अंगाने मानवात नैतिक आचरण नैतिक गुण कसे विकसीत होत गेले व ही नैतिकता कशी सर्वस्वी ईश्वर निरपेक्ष अशी आहे यांचे उत्कृष्त असे विवेचन केलेले आहे.
या दोन्हीचा वापर जावेद अख्तर यांना करण्याची संधी होती ती त्यांना करता आली नाही अन्यथा चर्चेत अजुन सखोल उहापोह झाला असता.
वरील दोन्ही कांट आणि डॉकीन्स यांच्या मांडणी विषयी पुढील भागात लिहितो तुर्तास कंटाळा
तोपर्यंत मान्यवरांचे या संदर्भातील विचार जाणुन घेण्यास आवडतील.
ही चर्चा अवश्य पाहावी याचा दुवा इथे.
https://www.youtube.com/watch?v=sejkUeZS3dU
…
जर देव सर्वशक्तिमान आणि दयाळू असेल, तर जगात वाईट किंवा दुःख का अस्तित्वात आहे?
देव जर सर्वशक्तिमान असेल, काय वाटेल ते जर करू शकत असेल, तर तो असा दगड बनवू शकतो का, की जो त्याला स्वतःलाही उचलता येणार नाही?
असाही एक प्रश्न या संदर्भात ऐकलेला आहे.
(तुमच्या त्या एपिक्युरसच्या विरोधाभासात निदान ‘त्याची मर्जी!’ म्हणून वेळ मारून नेण्याची सोय तरी आहे. (पक्षी: त्याला जर वाटले असते, तर जगात वाईट किंवा दुःख अस्तित्वात नसते. किंबहुना, त्याला जर वाटले, तर तो आजसुद्धा वाईट आणि दुःख चुटकीसरशी नष्ट करू शकेल. परंतु, तूर्तास त्याचा तसा मूड नाही. असले काहीबाही आर्ग्युमेंट करता येतेच. (तसेही, जगाच्या किंवा मानवाच्या भल्यासाठी तो बांधील नाही, आणि (मानवाला) उत्तरदायी तर नाहीच नाही. त्याने हे विश्व केवळ स्वतःच्या करमणुकीसाठी तथा वेळ घालविण्यासाठी बनविलेले आहे; मानवाच्या सोयीसाठी नव्हे. सबब, त्याला — साक्षात परमेश्वराला! — प्रश्न विचारणारे तुम्ही कोण? वगैरे वगैरे.) परंतु, दगडाच्या या विरोधाभासात, कोठल्याही बाजूने जरी पाहिले, तरीसुद्धा, परमेश्वर (मनात आणले, तरीही) काय वाटेल ते करू शकत नाही, आणि, सबब, तो सर्वशक्तिमान नाही, असा दावा करून, (परमेश्वराचे अस्तित्व outright न नाकारतासुद्धा) परमेश्वराची इज्जत काढली आहे ना, राव!)
असो चालायचेच.
आस्तिकांची आवडती Surgery analogy
मात्र एपिक्युरसचा विरोधाभास (Epicurean Paradox) म्हणजे जर देव सर्वशक्तिमान आणि दयाळू असेल, तर जगात वाईट किंवा दुःख का अस्तित्वात आहे? हा प्रश्न मला वैचारिकदृष्ट्या महत्त्वाचा वाटतो. या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देणे अवघड आहे, आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर यावर दिले जाणारे काही प्रतिवाद मला वैयक्तिकरित्या फारसे पटलेले नाहीत.
तुमचा प्रश्न मला सुद्धा फार अगत्याचा वाटतो. आणि मलाही उत्तरे फारशी पटत नाहीत. Why Good people suffer नावाचे एक पुस्तक आहे त्यात आस्तिक बाजूने असा युक्तीवाद येतो की,
तुम्ही समजा दूर उभे राहून एक सर्जरी बघत आहात आणि ( तुम्ही इतके मठ्ठ आहात की तुम्हाला सर्जरी हा प्रकारच माहित नाही असे त्यात नाही म्हटलेले पण मी म्हणतो इतका मठपणा अपेक्षित आहे काल्पनिक उदाहरणात ) तर तुम्हाला वाटेल की डॉक्टर त्या रुग्णाचे हाल करत आहेत त्याला torture करत आहे. तर त्यांचे म्हणणे हे तुमचे अज्ञान आहे. Surgeon त्याच रुग्णाच्या भल्याकरिता त्याचा unwanted part काढत आहे वगैरे. आणि यात जी रुग्णांची तुम्हाला suffering दिसत आहे ती प्रत्यक्षात त्याची suffering नाहीच.
एक mr bean चा विनोदी चित्रपट आहे नाव नेमके आठवत नाही. त्यात एक असाच प्रसंग आहे बिन बाजूच्या बिल्डिंग मधून सर्जरी होताना बघतो त्याचा गैरसमज होतो तो तिथे जाऊन त्याला detective style वाचवण्याचा प्रयत्न वगैरे करतो असा धमाल विनोदी प्रसंग आहे.
तर आस्तिक म्हणतात की तुम्ही mr bean आहात ईश्वराचा grand plan तुम्हास ठाऊकच नाही म्हणून तुम्ही suffering समजत आहात ते प्रत्यक्षात त्यावर केलेलं उपकार आहेत वगैरे वगैरे.
आता यावर काय बोलणार ?
या वरील चर्चेत सुद्धा मुफ्ती ने असाच एक sixer मारला. गाझा मध्ये जी मुले मारली जात आहेत त्यांचे ईश्वर recompense करणार अशा अर्थाने.
!!!
तुम्ही समजा दूर उभे राहून एक सर्जरी बघत आहात आणि ( तुम्ही इतके मठ्ठ आहात की तुम्हाला सर्जरी हा प्रकारच माहित नाही असे त्यात नाही म्हटलेले पण मी म्हणतो इतका मठपणा अपेक्षित आहे काल्पनिक उदाहरणात ) तर तुम्हाला वाटेल की डॉक्टर त्या रुग्णाचे हाल करत आहेत त्याला torture करत आहे. तर त्यांचे म्हणणे हे तुमचे अज्ञान आहे. Surgeon त्याच रुग्णाच्या भल्याकरिता त्याचा unwanted part काढत आहे वगैरे. आणि यात जी रुग्णांची तुम्हाला suffering दिसत आहे ती प्रत्यक्षात त्याची suffering नाहीच.
हे लॉजिक तद्दन बकवासच नव्हे, तर धोकादायक आहे!
ठीक आहे, वादाच्या सोयीकरिता हेदेखील एक वेळ मानले, की तुम्ही यात त्रयस्थ आहात. एक तर तुम्हाला ज्ञान नाही, आणि त्रयस्थ असल्याकारणाने यात मध्ये पडण्याकरिता locus standi नाही. परंतु, ज्या ‘रुग्णा’वर ‘सर्जरी’ चाललेली आहे, गेला बाजार त्याची तरी लेखी consent (आणि तीदेखील सर्जरीच्या अगोदर) असावयास नको काय?
अशी लेखी consent ‘रुग्णा’कडून (आणि तीही ‘सर्जरी’अगोदर) घेतलेली आहे, असे तुमचे हे आस्तिक्यवादी, झालेच तर मुफ्ती, वगैरे ठामपणे, खात्रीने सांगू शकतील काय?१ कारण, ‘रुग्णा’कडून तशी लेखी consent ‘सर्जरी’अगोदर घेतलेली नसल्यास, तुमचा हा ‘सर्जन’ (पक्षी: ईश्वर) medical malpractice करीत आहे, असे नाइलाजाने म्हणावे लागते. (ईश्वराच्या लेखी सामान्य medical ethics वगैरे क्षुल्लक बाबींना काडीचीही किंमत नाही काय?)
कृपया लक्षात घ्या: यात ईश्वराचा (म्हणजे माझा) — म्हणजे, तो (म्हणजे मी) असलाच, तर२ — कोठल्याही प्रकारे अपमान करण्याचा इरादा नाही. कारण, ईश्वर medical malpractice करीत आहे, असा आरोप मुळात मी करीत नाहीये, तर, ईश्वर हा कोठल्यातरी ‘रुग्णा’वर ‘सर्जरी’ करीत आहे, असले भंपक दावे/ॲनालॉज्या मांडणारे आस्तिक, मुफ्ती वगैरे लोक त्या दाव्यांतून करीत आहेत. (कारण, हा त्या दाव्याचा logical consequence आहे. तसे नसल्यास, दावेकरी मंडळींनी consentचा कागद पुरावा म्हणून अवश्य सादर करावा.) ईश्वर आहे, की नाही, वगैरे वाद तूर्तास बाजूस ठेवू. परंतु, ईश्वर जर असेल, आणि तो जर ‘सर्जऱ्या’ करीत असेल, तर आगाऊ लेखी consentचा पुरावा सादर करण्यास सज्ज ठेवावा; अन्यथा, medical malpracticeच्या आरोपास उत्तर देण्यास सज्ज राहावे.
बरे, समजा, ईश्वर आहे. तरीसुद्धा, त्याचे वकीलपत्र या मंडळींना नक्की कोणी दिले? (किंवा, फॉर्दॅट्मॅटर, नास्तिक्याचे जावेद अख्तरांना?)
(आणखी एक जबरदस्त वाईट शंका: त्या चॅनेलवरची ही चर्चा (डब्ल्यूडब्ल्यूएफच्या कुस्त्यांप्रमाणे) फिक्स्ड असावी काय? करमणुकीकरिता खोटीखोटी? लुटूपुटूची?)
या वरील चर्चेत सुद्धा मुफ्ती ने असाच एक sixer मारला. गाझा मध्ये जी मुले मारली जात आहेत त्यांचे ईश्वर recompense करणार अशा अर्थाने.
मुफ्तीसाहेब ईश्वराच्या वतीने असा दावा इतक्या बेधडकपणे नक्की कोणत्या अधिकाराने करीत आहेत? (किंबहुना, असा दावा ही blasphemy नव्हे काय?)
तळटीपा:
१ या प्रश्नाचे उत्तर ‘होऽऽऽऽऽऽ!’ असे असल्यास, पुढचा प्रश्न ‘ठीक आहे तर मग. Consentचा कागद दाखवा.’ असा असणार आहे.
२ आफ्टर ऑल, माझे अस्तित्व हा माझ्याच कल्पनेचा खेळ असू शकेलही!
जगात वाईट किंवा दुःख का…
जगात वाईट किंवा दुःख का अस्तित्वात आहे? हा प्रश्न मला वैचारिकदृष्ट्या महत्त्वाचा वाटतो. या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देणे अवघड आहे
गौतम बुद्धाने 'दुःख का अस्तित्वात आहे' ह्या प्रश्नाचे उत्तर शोधून काढून ते 'चार आर्यसत्य' ह्याद्वारे समाधानकारक उत्तर दिले आहे!!
- पहिले आर्यसत्य – दुःख आहे
- दुसरे आर्यसत्य – दुःखाचे मूळ आहे
- तिसरे आर्यसत्य – दुःख निरोध शक्य आहे
- चौर्थ आर्यसत्य – दुःख निरोधाचा मार्ग आहे
संयुक्त निकाय १२.२ ह्या प्रतित्य समुत्पाद सुत्रामधे दुःख का अस्तित्वात आहे आणि त्याच्या निर्मुलनाचा मार्ग ह्यावर व्यवस्थित मार्गदर्शन / विवेचन केले आहे.
आणखि संदर्भः
- pratītya-samutpāda
- Pratītyasamutpāda: The Buddhist Concept of Dependent Origination
- प्रतीत्यसमुत्पाद - वैज्ञानिक चिंतन (Paper)
- (समाधानी) सोकाजी
.
माझे बौद्ध तत्त्वज्ञानावर फारसे वाचन नाही, आणि वेळेअभावी वर दिलेले संदर्भही अजून वाचता आलेले नाहीत. त्यामुळे तुम्हीच एखादा लेख लिहाल तर आवडेल. किंवा मारवाजी पुढच्या लेखात काय लिहितात तेही पाहू.
तरीही मला इतके ढोबळपणे माहित आहे की बौद्ध तत्त्वज्ञान दुःखाचे विश्लेषण सखोलपणे करते, पण ते सर्जनकर्ता, सर्वशक्तिमान, सर्वदयाळू देव ही संकल्पना मान्य करत नाही. चुभुद्याघ्या. विरोधाभास मूलतः देवाच्या गुणांवर आधारित तर्कशास्त्रीय प्रश्न आहे.
व्यक्तीच्या इच्छापूर्ती न होण्यामुळे निर्माण होणार्या दुःखाचे निराकरण तत्त्वज्ञानाने (बुद्धांचे असो वा निष्कामकर्मयोगाचे) काही प्रमाणात शक्य आहे, हे मान्यच आहे. पण मला इथे दुःख म्हणताना अभिप्रेत असलेले दुःख वेगळ्या स्वरूपाचे आहे (evil) जसे की, पाशवी बलात्कार, शुल्लक कारणावरून किंवा चोरीसाठी झालेली निर्घृण हत्या, शक्तिशाली व्यक्तीच्या वैमनस्यातून केलेला छळ/हत्या, वैचारिक मतभेदातून झालेली हिंसा वा त्यामुळे एखाद्या निरपराध व्यक्तीचे कायमस्वरूपी अपंगत्व, युद्धामुळे बालवयात आलेले अपंगत्व किंवा मृत्यू, घरगुती शारीरिक छळवणूक, अशा "अनाहूत, अमानुष आणि असह्य" घटनांबद्दल मी बोलत आहे. काही लोक हे सर्व पाप-पुण्याच्या हिशेबाशी जोडतात. आणि पाप-पुण्य हे नैतिकतेशी जोडले जाते, ज्याची व्याख्या मात्र काळानुसार बदलत राहते. तरीपण मग प्रश्न उरतोच, असे कोणते पाप असते की ज्याची शिक्षा इतकी क्रूर, असमान आणि बार्बेरियन स्वरूपाची असावी? आधुनिक लोकशाही व्यवस्थेतही अशा शिक्षा मान्य नाहीत.
देव आहे किंवा नाही
हा प्रश्न विचारण्यापेक्षा देव मानावा किंवा नाही हा प्रश्न जास्त योग्य नाही का? कारण देव आहे किंवा नाही या प्रश्नाचं उत्तर जे देव आहे असं मानतात आणि नाही असं मानतात त्या दोघांनाही देता येत नाही.
देव मानण्याचे अनेक फायदे आहेत.
एकतर तुम्ही आपोआप समाजाच्या बहुसंख्य लोकांचा भाग होता. देव आणि त्याला जोडून येणारा धर्म लोकांना बांधून ठेवतात. धर्म जसा लोकांना एकत्र आणतो तसं दुसरं काही आणत नाही. शिवाय देव मानण्याचे मानसशास्त्रीय परिणाम असतात. अडचणीच्या काळात देव आहे माझ्या पाठीशी असा विचार केल्यावर मनोबल वाढतं. जप/ध्यान वगैरे करून मनाला काही प्रमाणात शांती मिळते. देवावर श्रद्धा असली की कदाचित चिंता कमी होत असावी. चांगलं काय वाईट काय याचा एक रेडी मेन्यू मिळतो.
या उलट देव न मानणारे लोक बऱ्याच अंशी एकटे पडतात. नास्तिकांचे मेळावे असतात पण त्यांची सतत थट्टा होते. ही थट्टा मला अप्रस्तुत वाटते कारण एका धारणेच्या लोकांनी एकत्र येणं हा मानवी स्वभाव आहे. We all want to belong to human groups.
आपल्या सर्व कृतींची अंतिम जबाबदारी केवळ आपली आहे. या जगात आपल्याला कोणत्याही अदृश्य शक्तीचा आधार नाही हे मान्य करून आयुष्य जगणं anxiety उत्पन्न करणारं आहे. पण ती पत्करून आयुष्य जगण्यात नास्तिकांना खरेपणा वाटतो. एकदा देव मानण्यातला फोलपणा लक्षात आला की.पुन्हा त्या दिशेने प्रवास घडणं अवघडच. नाास्तिक असणं म्हणजे कृतघ्न असणं असंही काही नाही. आपल्याला जे मिळालं आहे त्याबद्दल कृतज्ञता वाटणे हादेखील मानवी गुणधर्म आहे. त्याचा देवाशी काहीच संबंध नाही. असे गुणधर्म प्राण्यांमध्येही दिसतात.
Morality चं म्हणाल तर आजवर किती युद्ध केवळ दोन वेगळे देव मानणाऱ्या जमातींमध्ये झाली आहेत? देवाच्या नावावर जितका रक्तपात होतो त्यासमोर नास्तिकांचा स्वैराचार किती टिकणार?
आणि ही morality मोठ्या मोठ्या गोष्टींना आणि पुरुषांच्या निर्णयांना लागू असते का? बायकांनी काय घालावं, किती जणांशी संभोग करावा, असल्या गोष्टींना ही morality करकचून लावलेली असते. आणि लहान मुलांच्या शाळांवर बॉम्ब टाकायला देवाचा अडसर येत नाही.
पण देव न मानताही मनुष्य प्राणी प्रेमाने, सहभावाने आणि ज्याला आपण integrity म्हणतो त्या गुणांनी नक्कीच वागू शकतो. या भावना उपजत आहेत. जसे देव मानणाऱ्या गटात दांभिक असतात तसेच देव न मानणाऱ्या गटांतही असतात.
शेवटी टेरेंस म्हणतो तेच योग्य आहे.
Homo sum, humani nihil a me alienum puto
मी मनुष्य आहे. आणि मानवी असलेलं असं काहीही माझ्यासाठी परकं नाही.
हे वाक्य मानवतावाद्यांना त्यांचं ब्रीदवाक्य केलं आहे. पण मूळ नाटकात हे वाक्य एका अशा पात्राच्या तोंडी आहे जे अतिशय भोचक आहे. इतरांच्या आयुष्यात सतत नाक खुपसणाऱ्या या पात्राला जेव्हा लोक म्हणतात की तुला कुणी हे असले धंदे सांगितले आहेत? त्यावर उत्तर म्हणून हे खरंतर एक विनोदी वाक्य आहे. पण ते इतकं खरं आहे म्हणून आता ते वाक्य एकदम गंभीरपणे वापरलं जाऊ लागलं आहे.
लोकांना रॅशनल केलं तर धर्माच्या नावे होणारी हिंसा थांबेल असं अनेक मानवतावाद्यांना वाटून गेलं आहे. But that was probably a blind spot. माणूस रॅशनल नाही. आणि रॅशनल आणि इमोशनल असे दोन विभागही नाहीत. एखाद्याला इजा पोहोचवू नये हे उमगणं हे बुद्धिमान असण्याचेच लक्षण आहे असं मी मानते. मग ती शारीरिक इजा असो किंवा भावनिक. त्यामुळे बुद्धी आणि भावना या दोन वेगळ्या गोष्टी आहेत यावर माझा विश्वास नाही. अनेक नास्तिकांना असं वाटतं की भावनिक नसणं म्हणजे अधिक उत्क्रांत असण्याचं लक्षण आहे. पण हे भावनिक रित्या आणि त्यामुळे बौद्धिक रित्या अपरिपक्व असण्याचंच लक्षण मी मानते.
…
लोकांना रॅशनल केलं तर धर्माच्या नावे होणारी हिंसा थांबेल असं अनेक मानवतावाद्यांना वाटून गेलं आहे. But that was probably a blind spot. माणूस रॅशनल नाही.
बरे, समजा, माणूस रॅशनल जरी झाला, आणि त्यातून समजा धर्माच्या नावावर होणारी हिंसा जरी थांबली, तरीसुद्धा, त्या (धर्माच्या नावावर होणाऱ्या) हिंसेची जागा दुसऱ्या कशाच्यातरी नावावर (किंवा, कशाचेही नाव न घेता) होणारी हिंसा घेणार नाही, याची शाश्वती काय?
झटका, की हलाल, याने खाणाऱ्याला फरक पडत असेलही कदाचित. बकऱ्याला पडू नये, नव्हे काय?
मनुष्य हा मूलतः हिंस्र आहे. धर्म हे केवळ त्या हिंसेकरिता एक उपलब्ध (आणि, उपयुक्त!) साधन आहे, इतकेच.
…(२)
(देव आहे किंवा नाही) हा प्रश्न विचारण्यापेक्षा देव मानावा किंवा नाही हा प्रश्न जास्त योग्य नाही का?
- देव आहे किंवा नाही (किंवा, देवाने असावे किंवा नसावे) हा सर्वस्वी देवाचा प्रश्न (अत एव डोकेदुखी) आहे. त्याने (म्हणजे, तो असल्यास) यासंबंधी काय वाटेल तो निर्णय घ्यावा. (तो नसल्यास अर्थातच निर्णय घेण्याचा प्रश्न उद्भवणार नाही.) Either ways, मला काहीही आक्षेप नाही. (सोयरसुतक तर नाहीच नाही.)
- Having said that, देव मानावा किंवा नाही, या प्रश्नाचे एकच, one size fits all उत्तर असलेच पाहिजे, हा अट्टाहास नक्की कशासाठी?
.
माझं उत्तर व्यक्तिगत प्रश्न अशा अर्थानं होतं. म्हणजे देव मानावा किंवा नाही असा एक टप्पा काही लोकांच्या आयुष्यात येत असावा. कारण लहान मुलांना हा प्रश्न विचारताना आणि त्यावर चर्चा करताना ऐकलं आहे. यातही बऱ्याच छटा आहेत.
देव मानतो पण कर्मकांड मनात नाही
देव मानत नाही पण स्पिरिच्युअल आहोत
आमचं काही ठरलेलं नाही
देव रोजच्या आयुष्यात कुठे येतो? काय फरक पडतो?
देव मानतो, पूजा करतो, कर्मकांड मानतो
देव मानतो आणि त्याबद्दल जजमेंटल आहोत
देव मानत नाही आणि त्याबद्दल जजमेंटल आहोत.
तुम्ही म्हणता तशी थेट धुरंधरछाप शारीरिक हिंसा ज्यांना करता येत नाही ते वैचारिक हिंसा करतच असतात.
पण तरीही...
माणसाचा चांगुलपणा देवाच्या काचावर अवलंबून आहे हे मला पटत नाही.
मनुष्य आपल्या जीवनाला काहीतरी अर्थ आहे असं स्वतःला समजावण्याचा कसोशीने प्रयत्न करत असतो. एकीकडे भय आणि दुसरीकडे असा अर्थ शोधणं यातून देव ही संकल्पना जन्माला आली असेल.
पण आपल्या स्पेसिफिक आयुष्याला काही विशेष अर्थ किंवा पॅटर्न नाही आणि इथे केवळ आपण प्रजनन करून झाल्यावर मरणाची वाट बघत थांबायचं आहे (प्रजनन अर्थातच ऑप्शनल आहे) हा विचार मला अधिक सुखावह वाटतो.
+/-
पण आपल्या स्पेसिफिक आयुष्याला काही विशेष अर्थ किंवा पॅटर्न नाही
हे अर्थातच मान्य करता येण्यासारखे आहे. ‘आयुष्याला अर्थ’ वगैरे is, at best, a self-imposed construct designed solely to kill time. (We are all here merely due to a series of accidents हे मानायला मी तयार आहे; It certainly does sound like a plausible logical explanation.)
(प्रजनन अर्थातच ऑप्शनल आहे)
हेदेखील पटण्यासारखे. (किंबहुना, (प्रजनन) हादेखील, at best, एक self-imposed construct designed solely to kill time असावा काय? किंवा, at worst, ‘आयुष्याला अर्थ’ नावाची कृत्रिम गोष्ट देण्याकरिता केलेला एक desperate प्रयत्न? किंवा, अध्येमध्ये कोठेतरी, एक निव्वळ प्रथा? Not that I am necessarily against it; in fact, if anything, I am far from being against it. परंतु तरीही, हा प्रकार नक्की काय आणि कशासाठी आहे, हे (स्वतःपुरते, स्वतः) समजून घेण्यास हरकत नसावी.)
इथे केवळ आपण प्रजनन करून झाल्यावर मरणाची वाट बघत थांबायचं आहे
येथे मात्र किंचित मतभेद दर्शवू इच्छितो.
(प्रथम, एक वैयक्तिक प्रश्न: तुम्ही प्रजनन केलेले आहेत, असे मी समजतो. (चूभूद्याघ्या.) तसे असल्यास, तुमच्या ज़िंदगीचा मक़सद आता संपलेला आहे, असा तुमचा दावा आहे काय? (‘ज़िंदगीचा मक़सद’ अशी काही चीज़ मुळात अस्तित्वात नसते, हे आगाऊ मान्य करूनसुद्धा?))
(दुसरी गोष्ट म्हणजे, प्रजनन हे ऑप्शनल आहे, असे तुम्ही म्हणता. ठीक आहे; ते बरोबरच आहे. परंतु, ऑप्शनल आहे, याचा अर्थ एवढाच, की ते करण्यासाठी काही active प्रयत्न करण्याची तुमच्यावर सक्ती नाही. उलटपक्षी, समजा तुम्ही active प्रयत्न केलेत जरी, आणि ते जर काही कारणास्तव फळाला आले नाहीत, तर तुम्हाला मरण येणार नाही, असे थोडेच आहे? ते कधी ना कधी तसेही यायचेच आहे; भले तुम्ही प्रजनन केलेत काय, नाही केलेत काय, किंवा करू शकला नाहीत काय. मग या सगळ्या भानगडीत प्रजनन आले कोठे? किंबहुना, ख़ामख़ा प्रजननाला यात घुसडून तुम्ही ज़िंदगीकरिता एक कृत्रिम मक़सद तर पैदा नाही करीत आहात? समजा, विश्वातल्या कोठल्याच सजीवाने इतःपर प्रजनन केले नाही. काय होईल? विश्वातली जीवसृष्टी भविष्यात नष्ट होईल. त्याने विश्वाचे नक्की काय बिघडेल? मुळात विश्वात जीवसृष्टी निर्माण होणे हीच एक series of accidents आहे, म्हटल्यावर…)
(तिसरे, आणि सर्वात महत्त्वाचे. तुम्ही काही करा वा न करा, मरण कधी ना कधी यायचेच आहे, हे उघड आहे. परंतु, मरणाची वाट काय म्हणून पाहायची? (In fact, why bring मरण into it at all?) ते जेव्हा केव्हा यायचे, तेव्हा येऊ द्यात; तूर्तास आपल्याला स्वतःची करमणूक करून घ्यायची एक प्रचंड संधी लाभलेली आहे, असा विचार का नाही करायचा? (आणि त्या संधीचा शक्य तितका, पुरेपूर फायदा का नाही घ्यायचा?) आणि, if, after all, you do have to bring मरण into it (for whatever convoluted reason of yours), तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे, स्वतःची करमणूक करून घ्यायची अशी संधी मरणानंतर तुम्हाला (बहुधा) मिळणार नाहीये. (चूभूद्याघ्या. याबद्दल काही खात्रीलायक विदा उपलब्ध नाही खरा, परंतु, मरणानंतर तशी संधी मिळेलच, अशी खात्री नाही, हे तर बहुधा तुम्हालाही मान्य व्हावे.) तेव्हा, मरणाबिरणाच्या वाटेस न जाता (let alone मरणाची वाटबीट पाहता), आत्ता मिळालेल्या (स्वतःची करमणूक करून घ्यायच्या) संधीवर लक्ष केंद्रित का करू नये?)
पाहा विचार करून.
(आणि, खरे सांगू? ते मरणाची वाट पाहात बसणे, वगैरे (आणि, त्यानंतर, क़यामतच्या दिनाची/मुक्तिदिनाची/चौऱ्याऐशी लक्ष योनींची (Eeeeks!)/तत्सम कशाची तरी वाट पाहात बसणे, वगैरे) ही सर्व (१) विविध धर्मवाल्यांनी आपापली दुकाने चालू ठेवण्यासाठी, झालेच तर, (२) विविध मराठी साहित्यिकांनी (अत्यंत depressing tribe!) आपापली पुस्तके खपविण्यासाठी, उठविलेली हूल आहे. ती गंभीरपणे घ्यायची नसते. झालेच तर, चित्रगुप्त हीदेखील सीकेप्यांनी आपल्या ज्ञातीची महती अवाच्यासवा वाढवून ठेवण्यासाठी (तथा lineage प्रस्थापित करण्यासाठी१) उठविलेली हूल आहे. तोदेखील सांताक्लॉज़इतकाच खरा असतो. चालायचेच.)
तळटीपा:
१ सीकेप्यांमध्ये जसा चित्रगुप्त, तशी कऱ्हाडे ब्राह्मणांमध्ये झाशीची राणी असते. पक्षी: आपल्या ज्ञातीची महती अवाच्या सवा वाढवून ठेवण्यासाठी, झालेच तर lineage प्रस्थापित करण्यासाठी, कल्पिलेले एक पात्र. A foundational myth. अर्थात, ती सांता क्लॉज़ अथवा चित्रगुप्ताइतपतच खरी असते, हे ओघानेच आले. परंतु, प्रत्येक कऱ्हाडा ब्राम्हण आपले lineage तिच्यापर्यंत येन केन प्रकारेण trace करतो, हे खरे.१अ
१अ मी वडिलोपार्जित जातीने जरी कऱ्हाडा ब्राह्मण नसलो, तरी रक्ताच्या सरमिसळीने अंशतः (खरे तर बऱ्याच अंशी) आहे. आणि, झाशीची राणी ही माझ्या म्याटर्नल आजीच्या खापरपणजीची सख्खी बहीण की अशीच कोणीशी होती, असे मला ठासून सांगण्यात आलेले आहे. (किंबहुना, मी जर झाशीच्या राणीचा supposed वंशज असेन, तर, झाशीची राणी हे एक fictitious पात्र आहे, याचा याहून मोठा पुरावा दुसरा नसावा. पण लक्षात कोण घेतो?)
...
अर्थात! मी ते वाक्य कोणत्याही morbid उद्देशाने लिहिले नाही. किंवा खिन्नतेनेही नाही. पण मला नेहमी असं वाटतं की आपलं काहीही नियंत्रण नसलेल्या दोन घटनांच्यामध्ये आपण जिवंत असतो. पण आपण जिवंत असताना आपल्याला अनेक अशाश्वत गोष्टींचा त्रास होतो. त्यावर आपण आपापले इलाज शोधतच असतो. पण तरीही अनेकदा आपल्या हे लक्षातच येत नाही की आपल्याला वाटतं तितकं आपलं आपल्या आयुष्यावर नियंत्रण नाही. एखाद्या डॉक्टरला भेटायच्या आधी आपण वेटिंग रूममध्ये थांबतो तसं काहीसं. तिथे बसून काही जण मासिकं वाचतील. काहीजण सतत माझा नंबर कधी येणार म्हणून रिसेप्शनिस्टला कटकट करतील. काहीजण नंबर लावून बाहेर वडापाव खायला जातील. काहीजण शेजारच्याला काय झालं आहे हे विचारून त्याचा इंटरव्ह्यू घेतील (आणि आपलं इतकंही काही वाईट नाही. यांच्यापेक्षा चांगलंच आहे असा विचार करतील). काहीजण डुलकी काढतील. काहीजण फोनवर असतील. वगैरे वगैरे (यू गेट द पॉईंट). तसे रोजच आपण जसे थोडे जगत असतो तसे थोडे मरतही असतो. किंवा काही पेशी पुन्हा तयार होऊन थोडासा जन्मही घेत असतो.
प्रजनन (काही जणांच्या) आयुष्याला अर्थ देतं असं मला वाटतं. माझ्या आयुष्याला त्यामुळे बराच सकारात्मक अर्थ मिळाला. पण ते आवश्यक आहे असं मला वाटत नाही. पण प्रोपोगेशन ऑफ द स्पिशिज या दृष्टिकोनातून मी ते वाक्य लिहिलं होतं. की माणूस सोडून इतर सर्व प्राणिमात्रांना जमेल तेवढं प्रजनन करण्याचा इन्स्टिंक्ट असतो. मानवही प्राणीच आहे. त्याला केवळ त्याच्या मेंदूमुळे एक वेगळेपण प्राप्त झालं आहे.
माझा पीएचडी गाईड एकदम ज्वालाग्रही नास्तिक आहे. तो दर शुक्रवारी आम्हा विद्यार्थ्यांना जवळच्या पबमध्ये न्यायचा आणि मग बायबल कसं होपलेस आहे, कुराण कसं होपलेस आहे (त्यानं गीता वाचली नव्हती. त्याला मी नंतर ती नेऊन दिली.) यावर आमचे कान दुखेपर्यंत बोलायचा. पण काही दिवसांनी माझ्या असं लक्षात आलं की कदाचित सामान्य ख्रिश्चन किंवा मुसलमान माणसापेक्षा त्याला त्या धर्मांची आणि देवांची जास्त माहिती होती. नास्तिक असण्यामुळे तो सतत देवाबद्दलच वाचत असायचा. आणि सतत आस्तिकांच्या तोंडावर फेकायला काहीतरी शोधत असायचा. देव खरंच असेल तर कदाचित त्याला तो आस्तिकांपेक्षा जास्त आवडला असता.
उपद्रवी आस्तिक आणि निरुपद्रवी आस्तिक
पूर्वी मी सर्व आस्तिकाना एकाच वर्गात धरत.असे. नंतर आयुष्याचा आणि माणसांचा जसजसा अनुभव येऊ लागला तसा मी दोन विभागात माझ्यापुरते वाटून घेतो. अर्थात हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे पद्धत आहे. कारण मी बघितले काही लोक आस्तिक असल्याने कुणाचंच नुकसान त्यांच्या सकट होत तर नाहीच पण खुपदा त्यांचा एकूण positive approach हा इतका गोड आणि लोभसवाणा असतो मुळात ती लोकच त्या सुंदर स्वभावाची असतात. त्यांनी त्या त्या धर्माला आपल्या पद्धतीने edit करून modify करून घेतलेले असते. कधी कधी ते धर्मातील वाईट चालीरीतीना सुद्धा चतुराईने सकारात्मकतेने adapt करून आनंदाने शांतपणे जगत असतात. तसे लोक इतके positive असतात की कुठल्या धर्माच पुस्तक आणि कर्मकांड त्यांच्या वाट्याला आले आहे त्याने त्यांना फरक पडत नाही. अशा गोड आज्या आजोबा लोक मी पाहिलेले आहेत. मला या निरुपद्रवी positive कमालीच्या समंजस आस्तिक लोकांचा अजिबात राग येत नाही उलट त्यांच्या या क्षमतेचा हेवा वाटतो.
आणि अर्थात vice versa
धर्माची entertainment value
या चर्चेत एका प्रेक्षकाने जावेद अख्तर यांना प्रश्न विचारला की मी तुमच्या दुकानात तुमच्या बाजुला यायला तयार आहे मात्र मला धर्मात जे सणवार उत्सव सोहळे यांचा आनंद लुटता येतो तो नास्तिक झाल्यावर सर्वच मजा जाईल. त्यावर जावेद यांनी एक उदाहरण दिले कि कसे पूर्वीचे pagan चे जे सण होते ते ख्रिश्चनानी कसे ते पळविले वगैरे.
वर कोणी म्हणाले नास्तिकांचे मेळावे ते आवश्यक आहेत.
एकत्र जमणे मौज मजा करणे ही माणूस हा social animal असल्याने त्याची मूलभूत गरज आहेच. नास्तिकानी आपले सोहळे बनवावेत बर्ट्रांड रसेल जयंती किंवा भगतसिंग जयंती. किंवा विद्रोही दिवाळी किंवा विद्रोही नाताळ म्हातारा नव्हे तरुण सांता पुरुष नव्हे महिला सांता. कार्यक्रम रचावेत ,गाणी रचावीत. खावे प्यावे चढावे
मला वरील प्रतिसादकांप्रमाणे आयुष्य मूलतः निरर्थक आहे हे 100 टक्के मान्य असले तरी रटाळ कधीच वाटत नाही. मला ते मुलांच्या क्ले सारखे निरर्थक वाटते पण आपापली खेळणी त्या क्ले पासून बनवून खेळणे मला धमाल आवडते. असो
तर महाराष्ट्रात एक शिवधर्म जो पुरुषोत्तम खेडकर यांनी स्थापन केला. त्याची बौद्धिक मांडणी करणारे आ ह साळुंखे यांना या धर्माच्या एन्टरटेन्मेंट value ची उत्तम समज आहे. त्यांच्या पुस्तकांत त्यांनी याचे महत्व मांडलेले आहे. हा शिवधर्म मूलतः हिंदू ब्राम्हणी धर्मविरोधी प्रेरणेने निर्माण करण्यात आलेला आहे. त्यामुळे हिंदू सण जे मिस करतात त्यासाठी पर्यायी सण गाणी प्रार्थना आदी बनविणे निर्माण करणे आणि प्रचलित करणे यासाठी साळुंखे आवर्जून प्रयत्न व्हावे असे मानतात आणि स्वतः ही विविध पर्याय सुचवितात.
फुले यांनी सुद्धा मला वाटते सत्यशोधक लग्न कसे व्हावे रिती वगैरे घालून दिलेल्या आहेत.
तर नास्तिक असो की आस्तिक माणूस मुळात social animal असल्याने त्याच्या एन्टरटेन्मेंट ची काळजी नास्तिकानी ज्यांना आपला गट वाढावा वाटते त्यांनी अवश्य घ्यावी.
नास्तिकांच्या सर्वात मोठ्या संघटनांनी याची या गरजेची दखल घेणे आवश्यक आहे. एक नास्तिकांची मोठी संघटना मला आठवते त्याप्रमाणे लंडन च्या बसेस वर नास्तिकते संदर्भात slogans चिपकविते त्याप्रमाणे
एखाद्या आस्तिकाचा डाटा बघा उदाहरणार्थ
समजा एक हिंदू आस्तिक घेऊ उदाहरणार्थ (कुठलाही घेता येऊ शकतो ) त्याच्याकडे किती मोठा भजनाचा डाटा आहे. किती सणावारांचा time pass आहे. पुन्हा त्यात किती मटेरियल आहे अमुक खाद्यपदार्थ तमुक रीती भाती. निर्थकतेचा साप आस्तिकाला सुद्धा कधी न कधी दंश करतोच (उसने किसे छोडा है ?) पण त्याच्याकडे उपलब्ध मलमांचा पेन किलर्स चा साठा मोठा आहे. शिवाय कर्मकांडे बघा अमुक प्रोब्लेम आहे हे करा तमुक आहे ते करा. बोलेतो हमारी जो फिल्म है इसमे सबकूच है रोमान्स है ऍक्शन है sadness है हिरो है विलन है स्टोरी है. म्हणजे explanation चे readymade साचे उपलब्ध आहेत. कारणमीमांसा सोपी सुटसुटीत सुडौल उपलब्ध आहे. जीवनात कितीही वाईट झाले अनुभव आले तरीं उत्तरे तयार आहेत धर्माकडे.
तर कुठलाही धार्मिक व्यक्ती असा well equipped असतो. शिवाय समव्यसनी समूह पाठीशी भक्कमपणे उभा आहे.
मेरे पास भजन है कीर्तन है तोडगे है कर्मकांड है painkillers हैं emotional support है
तुम्हारे पास क्या है ?
यावर नास्तिक म्हणतो
मेरे पास सच्चाई है.
पण असे म्हणून चालत नाही you need to live a life
जगातल्या नास्तिकानो एक व्हा.
तुमच्याकडे गमावण्यासारखे आहे तरी काय ?
Epicurean Paradox
यावर चर्चा किंवा वाद घालून फारसा उपयोग होईल असे मला वाटत नाही. मात्र एपिक्युरसचा विरोधाभास (Epicurean Paradox) म्हणजे जर देव सर्वशक्तिमान आणि दयाळू असेल, तर जगात वाईट किंवा दुःख का अस्तित्वात आहे? हा प्रश्न मला वैचारिकदृष्ट्या महत्त्वाचा वाटतो. या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देणे अवघड आहे, आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर यावर दिले जाणारे काही प्रतिवाद मला वैयक्तिकरित्या फारसे पटलेले नाहीत. वर The God Delusion या पुस्तकाचा उल्लेख झालेला आहेच. पण त्यापेक्षा मला रिचर्ड डॉकीन्स यांचे The Blind Watchmaker हे पुस्तक अधिक प्रभावी वाटते.
सध्या ‘विमोह’ नावाचा एक युट्यूबर आहे. मी त्याचे व्हिडिओ अधूनमधून पाहतो, विशेषतः फँटसी प्रकारातील पुस्तकांवरील त्याच्या टिपण्यांसाठी. ती पुस्तके कदाचित मी स्वतः वाचणार नाही, पण त्यातील आशय समजून घेण्यासाठी त्याचे व्हिडिओ उपयुक्त वाटतात.
अलीकडेच त्याने Epicurean Paradox संदर्भात आस्तिकांकडून मांडल्या जाणाऱ्या absolute - relative या युक्तिवादांवर नास्तिकांची भूमिका स्पष्ट करणारा एक व्हिडिओ केला आहे. ज्यांना रस असेल, त्यांच्यासाठी तो व्हिडिओ येथे देतो आहे.
https://www.youtube.com/watch?v=w-4qQhLb4IY