Skip to main content

माधव गाडगीळ : लोकाभिमुख वैज्ञानिक

माधव गाडगीळ (१९४२-२०२६) : लोकाभिमुख वैज्ञानिक

अतुल देऊळगांवकर

पर्यावरणशास्त्रज्ञ आणि विचारवंत अशी ओळख असलेल्या गाडगीळांनी भारतात पर्यावरणीय अभ्यासाची पायाभरणी केली आणि सहा दशकं ते सातत्याने ठसवत राहिले, की पर्यावरण जपण्याची सुरुवात मानवी समुदायांकडूनच होणं आवश्यक आहे.

 

माधव गाडगीळ
माधव गाडगीळ ‘द हिंदू’शी कोची येथे १३ फेब्रुवारी २०२० रोजी संवाद साधताना. ‘विकास’ शक्तिशाली समुदायांना आणखी समृद्ध करतो आणि आदिवासी, शेतकरी, आणि मच्छीमार यांसारख्या दुर्बल घटकांना त्यांच्या नैसर्गिक भावतालाला पारखं करत निर्वासित बनवतो हे त्यांनी त्यांच्या अभ्यासातून सिद्ध केलं. | चित्रश्रेय : तुलसी कक्कत

दोन शाळकरी मुलं साताऱ्याजवळच्या यवतेश्वर डोंगरावर रणरणत्या उन्हात फिरत होती. त्यांना तहान लागली आणि ते मंदिराजवळच्या विहिरीकडे गेले. तेव्हा पुजाऱ्याने विचारलं, "तुम्ही ब्राह्मण आहात का? हे पाणी इतरांसाठी नाही." माधव गाडगीळ तत्काळ उत्तरले, "आम्ही दोघेही ब्राह्मण नाही." तहानेने व्याकूळ झाले असतानाही त्यांनी जातीय भेदभावाला कणभरही थारा दिला नाही कारण त्यांच्या आई-वडिलांची शिकवण – जातिव्यवस्था हा भारतीय समाजाला लागण झालेला भस्म्या रोग आहे. 

 

त्यांचे वडील – म्हणजे उदारमतवादी अर्थशास्त्रज्ञ धनंजयराव गाडगीळ – कोयना धरणाच्या पाणीपुरवठ्यावर देखरेख करणाऱ्या आयोगावर होते. एका बैठकीनंतर ते म्हणाले, "माधव, उद्योगाच्या प्रगतीसाठी वीज आवश्यक आहे. पण निसर्गाचा विनाश आणि लोकांवर अन्याय ही त्याची किंमत नव्हे." विदुषी इरावती कर्वे त्यांच्या सख्ख्या शेजारी होत्या. त्यांच्या उत्खननांच्या कहाण्या ऐकून माधवला त्यांच्यासोबत अशा उत्खनन मोहिमांवर जाण्यात रस निर्माण झाला. शिवाय पक्षीशास्त्रज्ञ सलीम अलींसोबतच्या चर्चांमुळे त्यांना पक्षीनिरीक्षणाची आवड लागली. या तीन घटना माधव गाडगीळ उणेपुरे चौदा वर्षांचे असताना घडल्या. त्याच वर्षी त्यांनी जीवशास्त्रज्ञ होण्याचा निर्णय घेतला; असा जीवशास्त्रज्ञ जो माणसाची फारशी लुडबूड नसलेल्या प्रदेशांत आणि जंगलांत मोकळेपणी भटकत अभ्यास करेल. 

 

गाडगीळांचा सर्व प्रकारच्या जीवसृष्टीवर जीव होता – मुंग्या, फुलपाखरं, बेडूक, देवमासे यांपासून ते शैवाल, तण, निवडुंग, आणि शतकानुशतकं तगलेले पाइन वृक्ष. निसर्गाची अनेक रूपं न्याहाळण्यासाठी त्यांनी हिमालयापासून ते पश्चिम घाट, आणि नागालँडपासून ते थार वाळवंटापर्यंत हजारो किलोमीटरचे प्रदेश पालथे घातले. कॉलेजच्या वर्षांत त्यांनी धावणं, पोहणं, टेनिस, आणि स्क्वॉश यांत प्रावीण्य मिळवलं होतं.

 

देवमाशांच्या कळपांना पाण्याचे फवारे उडवताना आणि सागरी प्लवकांना रात्री निळाईने झळाळताना पाहताना ते अक्षरश: हरवून जात. एकदा ते असेच वननिरीक्षणात गुंग असताना अचानक अंधार पडला; तेव्हा जंगली हत्तींपासून बचाव म्हणून त्यांनी संपूर्ण रात्र उंच झाडावर बसून काढली. जीवसृष्टीबद्दलची अशी जन्मजात ओढ वा आंतरिक माया ‘बायोफिलिया’ म्हणून ओळखली जाते. गाडगीळ ही संकल्पना हार्वर्ड विद्यापीठात शिकले. हा शब्द घडवणारे सोशियोबायोलॉजीचे आद्यगुरू एडवर्ड ओ. विल्सन यांच्यासोबत त्यांनी काम केलं. डीएनएच्या दुपेडी रचनेच्या शोधकर्त्यांपैकी एक जेम्स वॉटसन यांच्याशीही त्यांची ओळख झाली. 

 

मध गोळा करताना साजेशीच फुलं अचूक निवडणाऱ्या मधमाशीसारखा गाडगीळांचा स्वभाव चोखंदळ होता. जगप्रसिद्ध संशोधक असो की समुद्रात होडी घालायला निघालेला मच्छिमार गडी : ते प्रत्येकाशी सारख्याच ऋजुतेने वागत. साठ वर्षांत भारताच्या कानाकोपऱ्यांत जाऊन देशाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा आणि नैसर्गिक निवाऱ्यातल्या कष्टकऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी असंख्य लोकांशी सख्य साधलं; त्यांत गुंतले.  

 

देवराया 

 

हार्वर्डमधून ‘गणितीय जीवशास्त्र’ या विषयात पीएचडीची मान्यता मिळवून भारतात परतल्यानंतर गाडगीळ यांनी पुण्यातील ‘महाराष्ट्र विज्ञानवर्धिनी’ संस्थेत संशोधन सुरू केलं. त्यांचे मार्गदर्शक – वनस्पतिशास्त्रज्ञ वामनराव वर्तक – यांनी त्यांना भोरजवळच्या वरंधा घाटात नेलं. दाट जंगलाचा तिथला बराचसा भाग नष्ट झाला असला, तरी स्थानिक देवराया अबाधित राहिल्या होत्या. दोघांनी विस्तृत प्रवास केला, अनेकदा गावांत किंवा झाडांखाली रात्र काढली, आणि स्थानिक लोकांशी बोलत या देवरायांबद्दल माहिती गोळा केली. या खटाटोपातून त्यांनी वनस्पतींच्या अनेक नवीन प्रजाती शोधल्या. 

 

त्यांचं हे सहशोधन Sacred Groves of India: A Plea for Conservation या मथळ्यासह ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या संशोधनपत्रिकेत प्रकाशित झालं. त्याने प्रभावित होऊन खुशवंत सिंग यांनी ते ‘इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया’मध्येही प्रकाशित केलं. त्यानंतर गाडगीळ इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्रं आणि संशोधनपत्रिका यांसाठी नियमित लेखन करू लागले. 

 

कालांतराने अवकाशशास्त्रज्ञ सतीश धवन यांनी गाडगीळांना बेंगळुरूच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मध्ये आमंत्रित केलं. १९८३मध्ये गाडगीळ यांनी तिथे ‘सेंटर फॉर इकोलॉजिकल सायन्सेस’ (सीईएस) स्थापन केलं. भारतात परिस्थितिकीच्या (Ecology) अभ्यासाची पायाभरणी करणारी ती संस्था होती. सन २०००नंतर जागतिक स्तरावर अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानवशास्त्र, तत्त्वज्ञान, आणि विज्ञान यांसारख्या शाखांमार्फत पर्यावरणाचा संयुक्तपणे साकल्याने अभ्यास सुरू झाला. त्याला ‘पर्यावरणीय मानव्यविद्या’ (environmental humanities) म्हणतात. पण त्याच्या कित्येक वर्षं आधी, १९८०च्या दशकातच गाडगीळांनी अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, मानवशास्त्रज्ञ, पर्यावरणशास्त्रज्ञ, स्थानिकांचे समुदाय, लेखक, पत्रकार, आणि धोरणकर्ते या सर्वांना सामावून घेत ‘सीईएस’ला  मानवकेंद्री आणि बहुशाखीय तत्त्वांवर घडवलं होतं.

 

बांबू आणि अन्याय 

 

त्यांचे विद्यार्थी थेट जंगलांत जाऊन स्थानिक लोकांच्या अनुभवांचे दस्तऐवजीकरण करत. त्या वेळी कर्नाटक सरकार कागद कारखान्यांना एक टन बांबू फक्त एक रुपयाला विकत असे. पण टोपल्या आणि इतर बांबू उत्पादनं निर्माण करणाऱ्या कारागिरांना त्याच बांबूसाठी टनामागे ५,००० रुपये द्यावे लागत. हा गरिबांवर तर धडधडीत अन्याय होताच, शिवाय त्यातून पर्यावरणनाशालाही वाव दिला जात होता. गाडगीळांनी अशा प्रकरणांचं व्यवस्थित दस्तऐवजीकरण आणि काटेकोर विश्लेषण सुरू केलं.

 

त्यांनी देशभरातली जंगलं आणि त्यांच्या निवाऱ्याला असणाऱ्या लोकांचा अभ्यास केला. ‘जुलमी फारेस्टखात्याची होळी करावी’ असं महात्मा जोतिबा फुले यांनी 'शेतकऱ्याचा असूड'मध्ये (१८८३) ठणकावलं होतं. गाडगीळ यांनी पुराव्यांनिशी दाखवलं, की वर्तमानातही हेच घडत होतं. त्यांच्या १९८२च्या ‘इंडियन एन्व्हायर्नमेंटल कन्झर्व्हेशन पॉलिसी’ या निबंधामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, की भारतात प्रचंड जैवविविधता असूनही या वारशाचं जतन करण्याचे प्रयत्न नगण्य आहेत. त्यामुळे जैवविविधतेचं अपरिमित नुकसान होत आहे. स्थानिक समुदायांनी तिचं आजवर जतन केलं असल्याने त्यांना जी त्याबद्दल खोल समज आहे ती जोपासत जतनाची जबाबदारी त्यांच्याकडेच सोपवावी.

 

त्यांच्या प्रयत्नांमुळे निलगिरी प्रदेश भारताचं पहिलं राखीव जीवावरण क्षेत्र (biosphere reserve) म्हणून घोषित झालं, आणि बंदीपूर जंगलाला अभयारण्याचा दर्जा मिळाला. त्यांनी कर्नाटकातल्या बेड्ती नदीवरल्या प्रस्तावित धरणाच्या पर्यावरणीय परिणामांबद्दल एक रोखठोक अहवाल लिहिला. त्यांतल्या निष्कर्षांची दखल घेऊन ती धरणबांधणी रद्द केली गेली.

 

संशोधन, शिकणे, शिकवणे, आणि सार्वजनिक संवाद या साऱ्या गोष्टी गाडगीळ एकाच वेळी समरस होत साधत. ते इंदिरा गांधींनी नियुक्त केलेल्या पर्यावरण आणि वन मंत्रालय स्थापनेच्या समितीवर होते. त्या काळात ते सायलेंट व्हॅली, चिपको, आणि कर्नाटकाच्या कित्तीको-हच्चिको यांसारख्या प्रमुख पर्यावरणसंबंधीच्या चळवळींत सामील झाले होते.

 

पश्चिम घाट अहवाल 

 

महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांत १,६०० किलोमीटर पसरलेला पश्चिम घाट जैवविविधतेने समृद्ध आहे. त्याचं जतन करण्यासाठी स्थानिक लोकांनी १९८७ मध्ये एक मोर्चा आयोजित केला. गाडगीळांनी त्यात सामील होत त्या लोकांच्या जगण्याचं बारकाईने निरीक्षण केलं आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

 

२०११मध्ये त्यांनी ‘पश्चिम घाट पर्यावरणतज्ज्ञ समिती’चा ३०० पानी अहवाल लिहिला. त्यात त्यांनी पर्यावरणीय क्षेत्रांचं वर्गीकरण करत विनाशाच्या कारणांचं विश्लेषण केलं आणि जतनाचे उपाय सुचवले. अतिक्रमण, अवैध खाणकाम, आणि पवनचक्क्यांचे प्रकल्प यांवर नियंत्रणांचा अंकुश नसेल तर पश्चिम घाट वाचवता येणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला. स्थानिक रहिवाशांनी शतकानुशतकं निसर्गाचं संरक्षण केलं असल्याने विकास प्रकल्प आणताना त्यांची संमती अनिवार्य आहे. स्थानिक समुदायांच्या आधारे जलस्रोतांचं पुनरुज्जीवन करणं, छोटे बंधारे बांधणं, आणि सूक्ष्म-जलविद्युत प्रकल्प राबवणं यांसारखे उपाय त्यांनी सुचवले.

 

पश्चिम घाट पर्यावरणतज्ज्ञ समिती
पश्चिम घाट पर्यावरणतज्ज्ञ समितीचे अध्यक्ष या नात्याने केरळातील पथानमथिट्टा या भागातल्या चेंबनमुडी डोंगरांना भेट देताना माधव गाडगीळ. ७ नोव्हेंबर २०१३.  | चित्रश्रेय : लेजू कमल

तरीही कोणत्याही राजकीय पक्षाच्या राज्य किंवा केंद्र सरकारने त्यांचा अहवाल अमलात आणण्याची इच्छा दाखवली नाही.  ‘विकास अपरिहार्य आहे म्हणून पर्यावरणीय नुकसान सहन करावंच लागेल’ हे सतत ठसवलं जातं, पण वननाशाने डोंगरउतारांवरल्या दरडी कोसळणं वेगाने वाढलं आहे, आणि मातीची प्रचंड धूप झाल्याने हाहा:कार माजवणारे पूर वारंवार येत आहेत. या तथाकथित विकासाचा डोलारा किती पोकळ आणि क्षणभंगुर आहे ते प्रत्येक संकट आपल्या तोंडात मारून दाखवत राहतं आणि तरीही तोच मार्ग चोखाळणं सुरू आहे. अधूनमधून, विशेषतः एखाद्या मोठ्या नैसर्गिक उलथापालथीनंतर लोकांना ‘गाडगीळ अहवाल’ आठवतो. त्याबद्दल विचारलं, तर गाडगीळ म्हणत, “तुम्ही जर चुकीच्या दिशेने धावत असाल, तर वेगाने धावूनही काही साधत नाही.”

 

परिस्थितिकी आणि लोक 

 

दशकानुदशकं सामाजिक जीवन, राजकारण, आणि शासन यांचं बारकाईने निरीक्षण केल्यानंतर गाडगीळ यांनी भारतीय समाजाला पर्यावरणीय दृष्टीकोनातून तीन गटांत विभागलं. 

१. परिस्थितिकी-लोक : जे स्थानिक नैसर्गिक साधनसंपदेवर अवलंबून आहेत; 

२. जैवावरण/सर्वभक्षी-लोक  ज्यांच्या आवाक्यात बाजार आणि तंत्रज्ञान आलं आहे, 

३. परिस्थितिकी-निर्वासित : पारंपरिक साधनसंपत्तीला पारखे झालेले, बाजारही आवाक्याबाहेर असणारे असे. 

 

नैसर्गिक साधनसंपत्ती वापरण्यातला असमतोल पर्यावरणीय संघर्षाला पाठबळ देतो असं ही संकल्पनात्मक मांडणी दाखवते. सर्वभक्षी लोकांच्या उपभोगी वृत्तीमुळे परिस्थितिकी-लोक हे परिस्थितिकी-निर्वासित बनत जातात. नैसर्गिक स्रोतांच्या ऱ्हासामुळे भूमिहीन मजूर, अल्पभूधारक शेतकरी, ग्रामीण कारागीर, पशुपालक, छोटे मच्छीमार, भटके, आणि आदिवासी समुदाय यांची वाताहत होत राहते.

 

‘सह्यचला आणि मी : एक प्रेमकहाणी’ या त्यांच्या आत्मचरित्रातील प्रत्येक अध्याय कालिदास, केशवसुत, बहिणाबाई, बोरकर, महानोर, आणि विंदा यांसारख्यांच्या कवितेने सुरू होतो. त्यात एके ठिकाणी झारखंडातल्या कवयित्री, पत्रकार, आणि कार्यकर्त्या जसिंता कर्केट्टा यांची विस्थापितांची वेदना व्यक्त करणारी कविता उद्धृत केली आहे :

 

मंदिर, मशीद, चर्च फोडल्यानंतर तुमची वेदना इतकी तीव्र असते, की

शतकानुशतके घेत राहता त्याचा हिशोब.

परंतु जंगल ज्यांचे पवित्र स्थळ आहे त्यांना उद्ध्वस्त करण्याचा हिशोब,

कोण देणार साहेब?

(कविता साभार : राजहंस प्रकाशन)

 

सह्याचला आणि मी एक प्रेमकहाणी : माधव गाडगीळ

कविता, विज्ञान, आणि मिस्कील विनोदांत रंगणाऱ्या गाडगीळांनी त्यांच्या कार्यात विविध क्षेत्रांतल्या तरुणांना सतत सहभागी करून घेतलं. अनेक संशोधक आणि शिक्षक घडवले. ब्याऐंशी वर्षांच्या वयातही ते महाराष्ट्र आणि केरळ राज्यांतल्या भूस्खलनांमुळे होणाऱ्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नुकसानीचा अभ्यास करत होते. ते म्हणतात, “मला जे सत्य वाटतं ते बोलण्यासाठी मी नेहमी आग्रही राहिलो आहे – मग ते सत्ताधारी आणि श्रीमंतांना आवडो वा न आवडो.”

 

सतत शंका विचारत राहणं हे खऱ्या शास्त्रज्ञाचं व्यवच्छेदक लक्षण. कोणतीही गोष्ट शास्त्रज्ञ कधी आंधळेपणाने स्वीकारत नाही; वास्तव तथ्यांशी ताडून पाहत राहतो. हे तत्त्व गाडगीळ यांनी आयुष्यभर अखंड जपलं.

 

अतुल देऊळगांवकर हे पर्यावरणाचे अभ्यासक, पत्रकार, आणि लेखक आहेत. 

 

मूळ लेख : https://frontline.thehindu.com/other/obituary/madhav-gadgil-profile-indian-ecologist/article70486439.ece

छायाचित्रे मूळ लेखातून साभार.