Skip to main content

हमारी बाल्कनी मे उगवा हुवा अनानास

लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी आपल्याला आपल्या नवऱ्याची/बायकोची/पार्टनरची कोणती सवय सगळ्यात जास्त डोक्यात जाते हे लक्षात येतं. आता यातल्या काही सवयी डीलब्रेकर असतात. त्यामुळे घटस्फोटच होतो. पण काही सवयी अशा असतात की त्या आपण डिव्होर्स घेण्यासाठी म्हणून कोर्टात सांगतो आहोत असा विचार केला की आपल्यालाच हसायला येतं. दुर्दैवानं बऱ्याच डोक्यात जाणाऱ्या सवयी या गटातल्या असतात. मला माहिती आहे माझ्या नवऱ्याला माझ्या कोणत्या सवयी आवडत नाहीत. त्या सगळ्या सवयींचं एका विशेषणात वर्णन करायचं झालं तर मी पैशांच्या बाबतीत ‘उधळी’ आहे असं होईल. त्याच्या सवयींपैकी एक अत्यंत चीड आणणारी सवय म्हणजे त्याचं अव्यवहार्य झाडप्रेम. हे वाचून मी खूप दुष्ट आहे असं वाटेल पण नाही. 

 

एकदा मी सकाळी उठून कॉफीचा कप घेऊन बाल्कनीत गेले. आदल्या रात्री अंधार असल्यामुळे नवऱ्यानं बाल्कनीत काहीतरी आणून ठेवलं आहे हे मला दिसलं नव्हतं. मी एकदम उत्स्फूर्तपणे विचारलं: 

 

“अय्या! हा शेणाचा गोळा कुणी आणला?” 

त्यावर, कुठूनतरी खूप तिरीमिरीला येऊन,हिंदी भाषेत मराठीची भेसळ करून, नवऱ्यानं उत्तर दिलं

“शेण का गोळा नही है वो! कैलाशपति का फल है!” 

 

कैलासपती नावाचा एक अगडबंब वृक्ष असतो. अतिशय देखणा. त्याला मंद सुगंध असणारी गाजरी-गुलाबी आणि पांढरी अशी सुंदर फुलं येतात. हे झाड आम्ही मुंबईत राणीच्या बागेत  बघितलं होतं आणि नंतर कोचीच्या समुद्रकिनाऱ्याला लागून, एक लहान मुलांची पार्क आहे, तिथे! आता हे वर्णन ऐकून काही लोकांना वाटेल की मलाही झाडं आवडतात. तर होच! पण माझी आवड सरंजामी आहे. आमच्या ऑफिसात आम्ही गच्चीवर बाग केली आहे. ती सुंदर ठेवायला दोन आठवड्यातून एकदा एक माळी येतो. माझं वृक्षवल्ली प्रेम म्हणजे ती नीट ठेवलेली बाग बघायची. आयती फुलं तोडून आणायची. गच्चीला लागून असलेल्या चिंचेच्या झाडावरच्या मधमाश्यांच्या पोळ्याच्या कन्स्ट्रक्शनची देखरेख करायची. चार लोकांना आज्ञा देऊन तयार केलेलं कंपोस्ट त्या बागेत घालायचं. म्हणजे आपण स्वतः काहीही न करता इतरांच्या कष्टांचा केवळ उपभोग घ्यायचा. नवऱ्याच्या बाबतीत मात्र हे वेगळं आहे. तो स्वतः मातीत हात घालतो. आंतरजालावरून फुलं कशाने वाढतील, किडीसाठी ऑरगॅनिक उपाय काय आहेत, मातीचा पीएच किती असावा वगैरे माहिती गोळा करतो. मध्यंतरी त्यानं केवळ झाडं लावण्यासाठी म्हणून एक जमिनीचा तुकडा विकत घेण्याची कल्पना काढली होती. पण त्यातल्या अनेक प्रॅक्टिकल अडचणी दाखवून दिल्यावर त्यानं तो बेत (कसाबसा) रद्द केला. कुठे गावाला जायचं असेल तर तो मला साधारण सत्तर वेळा "मेरे पेड मत मार देना" अशी विनवणीवजा धमकी देतो. याचा मला इतका ताण येतो की तो गावाला गेल्या गेल्या मी माझ्या मावशींना ४ दिवसांची पगारवाढ देऊन पाणी घालण्याचं काम त्यांच्याकडे सुपुर्द करते. तरीही परत आल्यावर सामान दारातच ठेवून तो आधी बाल्कनीत जाऊन माती किती ओली आहे ते बघून येतो. आणि पुढे, "ये तुम ने किया या मावशीने?" असा खडूस प्रश्नही विचारतो. 

 

राणीच्या बागेतलं कैलासपती
राणीच्या बागेतील कैलासपती

          

 

कैलासपतीची फुलं
कैलासपतीची फुलं

 

तर ते कैलासपतीचं फळ बघितल्यावर माझ्या मनात जो प्रश्न उमटला (जो वास्तविक ते आणायच्या आधी त्याच्या मनात यायला हवा होता) तो ‘हे कुठे लावणार आहेस तू?’ असा होता. या अतिशय निरागस आणि साध्या प्रश्नानंदेखील तो उखडला. आणि नेहमीप्रमाणे गप्प झाला. काही दिवसांनी येऊन त्यानं जाहीर केलं की सोसायटीनं त्याला झाडासाठी जागा दिली आहे. मग त्यानं त्या शेणाच्या गोळ्यातल्या बियांची रोपं केली. आणि त्यातलं एक त्या जागेत लावलं (बाकीची कुठे गेली हे विचारायचं धाडस मी केलं नाही). उन्हाळ्यात कैलासपतीच्या आजूबाजूची झाडं मरत असताना, हा आणि आमचे चिरंजीव रोज येता-जाता त्या एकाच झाडाला पाणी घालायचे. असं करून आता ते झाड चांगलं चार-पाच फूट उंच झालं आहे. येता जाता आपल्या या कैलासपतीकडे नवरा स्वतःच्या मुलाकडे बघावं तसा बघत असतो. 

 

एकदा मुलगा आजी-आजोबांकडे होता म्हणून आम्ही डेटवर जायचं ठरवलं आणि ठिकाण वरिजनल दोराबजी निवडलं. कॅम्पात कुठे चारचाकी न्या, म्हणून आम्ही रिक्षाने गेलो. तिथे अकुरी-पाव, मटण कटलेट आणि इथला चांगला असतो म्हणून, मीच त्याला आग्रहानं घ्यायला लावलेला क्रीम सोडा असा आहार आम्ही घेतला. ते बेनॅड्रिलसारखं सरबत पितापिता हे कॉलेजमध्ये आपल्याला नक्की का आवडायचं याचा विचार मी करत होते तेवढ्यात नवरा फोनमध्ये बघत एकदम आनंदानं ओरडला. तो मॅच बघतो आहे का हे बघायला मी तिथे डोकावले तर तो झाडांचं एक ॲप बघत होता. त्या ॲपमध्ये आपल्या आजूबाजूला कोणकोणती झाडं आहेत ते दिसतं. म्हणजे एकप्रकारे  झाडांचं टिंडरच (टू बॅड, झाडांना चालता येत नाही). तर त्यावर त्याला जवळपास कुठेतरी बाओबाब आहे हे दिसलं होतं. मला बाओबाब माहिती होतं कारण ते लिटिल प्रिन्समध्ये आहे. 

 

तर त्यानं मला विनंती केली की ते बाओबाब त्याला बघायचं आहे. सकाळपासून आमच्या दोघांमधलं वातावरण अतिशय आनंदी होतं त्याचा परिणाम म्हणून मी हो म्हणाले. मग आम्ही दोराबजीमधून चालत निघालो. पुढे आमचे ‘हे’ त्यांचे सव्वा सहा फुटी पाय कर्कटकासारखे टाकत आणि मागे मी, पोटात बेनॅड्रिलच्या समुद्रात तरंगणारे कटलेट वागवत. साधारण ऐंशी पावलं चालल्यावर याला होकार देणं ही आजच्या दिवसाची चूक आहे हे माझ्या लक्षात आलं. कारण रस्त्यात कुठेही उभा राहून तो आपण कुठे आहोत आणि झाड कुठे आहे याची सतत खात्री करत होता. मला राग येऊ नये म्हणून मी अशी विश्रांती मिळाली की दिसेल त्या दुकानात गायब व्हायचे. तेवढ्या वेळात मी एका बेकरीतून क्रीमरोल, एका रस्त्यावरच्या विक्रेत्याकडून केस बांधायचे स्क्रंची असं काही काही घेऊ लागले. तेवढ्यात नवऱ्याच्या लक्षात आलं झाड कुठे आहे. मग आम्ही नकाशावरचा आमचा गोळा बघत बघत तिथवर पोहोचलो. पण सगळा रस्ता चकाचक सिमेंटचा! तिथे साधं काँग्रेसचंही झुडूप नव्हतं. मग आम्ही एखाद्या कुत्र्याने त्याच्याच शेपटीचा पाठलाग करावा तसे तिथे गोलगोल फिरलो. तेवढ्यात एका कुंपणातून मला पलीकडे एक सुजलेलं झाड दिसलं. तेच ते बाओबाब! ते असं बेवारशी रस्त्यावरचं झाड नसून एका आलिशान बंगल्यातल्या अंगणातलं झाड होतं. त्या बंगल्याबाहेर एक सिक्युरीटी गार्ड होता. ते झाड बघायचं आहे असं त्याला सांगितल्यावर त्यानं आमच्याकडे एक तुच्छ कटाक्ष टाकून वाट करून दिली. असे अनेक वेडे तिथे येत असावेत. मग त्या झाडाच्या वयाबद्दल, इतिहासाबद्दल त्या माणसाला नवऱ्याने अनेक प्रश्न विचारले ज्या सगळ्यांना ‘माहित नाही’ अशी एकच मख्ख प्रतिक्रिया मिळाली. मग मी नवऱ्याला सुचवलं की इथवर आलो आहोत तर आपला झाडाबरोबर एक फोटो काढू. ही कल्पना त्याला आवडली. मग आमचा फोटो त्या झाडात जराही रस नसलेल्या सिक्युरिटी माणसाने आनंदाने काढून दिला. तो काढत असताना नवऱ्याने "झाड येतंय ना?" असं त्याला तीनवेळा विचारलं. आम्ही दोघे आणि ते विशाल दीडशे वर्षं म्हातारं झाड एकाच फ्रेममध्ये माववताना त्या माणसाला चांगलीच कसरत करावी लागली. त्यामुळे फोनचा वरील भाग जमिनीशी काटकोनात न ठेवता हा फोटो काढला आहे. आणि म्हणूनच तो जत्रेतल्या आरशात बघितल्यासारखा आला आहे. वास्तवात मी एवढी उंचही नाही आणि इतकी कमी जाडही नाही हे इथे प्रांजळपणे कबूल करायला हवं. 

 

पुणे कॅम्पमधील बाओबाब
पुणे कॅम्पमधील बाओबाब

 

 

मागच्या वर्षी आम्ही मे महिन्यात मेघालयला गेलो होतो. ज्यांनी कुणी हा प्रदेश बघितला नाही त्यांनी तो आवर्जून बघावा. भर मे मध्ये तापमान बावीस अंश सेल्सियस होतं. आणि सगळीकडे घनदाट झाडी, जंगल, तलाव. त्याबरोबर एका बाऊलमध्येच मिळणारं पूर्णान्न - नूडल सूप. पण या अशा आल्हाददायक वातावरणात आम्ही फिरायला गेलो की नवरा सतत जंगलात जाऊन एखादं रोप घेऊन बाहेर यायचा. त्याला ऑर्किड शोधायचा इतका नाद लागला की काहीवेळा तो आमच्याबरोबर फिरायला आला आहे याचाही त्याला विसर पडायचा. 'कळत-नकळत' नावाचा एक सिनेमा आहे. त्यात अशोक सराफ चिरोटे विकून श्रीमंत व्हायची स्वप्नं बघत असतो. त्याला सगळीकडे चिरोटे दिसत असतात तसं नवऱ्याला सगळीकडे त्याची भावी बाग दिसत होती. मग एकदा तो असं ऑफरोडींग करून परत आल्यावर मी त्याचे दोन्ही खांदे धरून त्याला गदागदा हलवून सांगितलं, "तू आमच्याबरोबर ट्रीपला आला आहेस! आमच्याकडेही लक्ष दे!" त्यानंतर तो थोडासाच भानावर आला. चेरापुंजी आमचा शेवटचा थांबा होता. तिथवर आमच्याकडे एक इनोव्हा होती. पण त्यानंतर मात्र विमानानं परत यायचं होतं. त्या रिसॉर्टवर पोहोचल्यावर आपण नेमकी किती झाडं उचलली आहेत याचा आढावा घ्यायला आम्ही ती दारात काढून ठेवली. प्रत्येक झाडाच्या मुळाशी एक ओला टिशू! त्यावर तिथल्या ड्रायव्हर करून घेतलेला दोरा सुबकरित्या बांधलेला, हे सगळं पाहून त्याच्या जितका राग आला होता तितकंच त्याचं कौतुकही वाटलं. पण झाडं मोजल्यावर ती साधारण बारा भरली. मग त्यानं विमानकंपनीला फोन करून झाडं विमानात आणलेली चालतात का असं ("का नाही चालणार? तू गांजा नेतो आहेस का?" या माझ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून) विचारलं. पण बारा झाडं नेणं शक्य नाही हे नशिबाने त्याच्या आपणहूनच लक्षात आलं. त्यातली तीन ऑर्किडं त्यानं निवडली आणि बाकीची हॉटेलवाल्यांना, "तुम्ही ही नक्की कुठेतरी लावा" असं सांगून देऊन टाकली. तो अजूनही, 'अरुणाचल प्रदेशात थिसीसचे काम करताना' वापरायचा तो पाठीला लावायचा होल्डऑल वापरतो. अरुणाचलबद्दलही तो झाडांबद्दल आहे तितकाच भावुक आहे. त्या होल्डऑलच्या बाजूच्या कप्प्यांमध्ये त्यानं ती झाडं ठेवली आणि केबिनमध्ये नेली. ते बघून मला अर्थातच 'फ्रेंच किस'मधला केविन क्लाइन आठवला ('प्यार तो होना ही था' मधला अजय देवगण अजिबात नाही!) आणि मी माझ्या त्रस्त पत्नीच्या भूमिकेतून थोडीशी बाहेर आले. 

 

घरी परत आल्यावर एक नवीन प्रकल्प सुरू झाला. ऑर्किडं कशी लावतात याबद्दल संशोधन. मग कधी नव्हे ते आमच्याकडे अमेझनकडून त्याच्या नावाने पार्सल येऊ लागली. आधी खिडक्या असलेल्या कुंड्या आल्या. मग कोकोपिट आलं. मग दगड आले (हे आमच्या सोसायटीच्या मैदानातून आले). आणि एकीकडे फोन आणि दुसरीकडे प्रायोगाचे सामान असं करून ती ऑर्किडं स्थानापन्न झाली. हा काहीसा ट्रॉमॅटिक प्रसंग मी त्यानंतर विसरून गेले. मग ऑक्टोबरमध्ये त्यातल्या एका ऑर्किडला बहुतेक कळ्या येऊ लागल्या आहेत असं आम्हाला जाणवलं. एव्हाना मीही त्या प्रयोगात मनाने गुंतले होते. मग त्या नक्की कळ्या आहेत की झाडाला फोड आले आहेत यावर आम्ही दोघांनी संशोधन करून असं शोधून काढलं की आमच्या ऑर्किडला खरंच गर्भधारणा झाली होती. बरोबर दसऱ्यादिवशी पिवळ्या धम्मक फुलांचा गुच्छ त्या झाडावर उमलला. आणि नवऱ्यानं तो कुंडीसकट मला आणून दिला. "कुछ पाने के लिये कुछ खोना भी पडता है" या घिस्यापिट्या उक्तीसकट. पण ती फुलं बघून (पुन्हा एकदा) नवऱ्यावर आपण उगाच रागावलो अशी भावना माझ्या मनात आली. 

मेघालयातील ऑर्किड
मेघालायतले ऑर्किड

 

साधारण चार वर्षांपूर्वी आमच्या ऑफिसमधले एक सहकारी मला दर आठवड्याला अननस आणून द्यायचे. त्या काळात मी अननसाचा मुरांबा, अननसाचा 'अपसाईड डाऊन' केक, अननसाची कढी, अननस चिकन असे जगातले सगळे अननसीय पदार्थ केले होते. मग शेवटी त्या काकांना मला आता अननस नको असं सांगावं लागलं होतं. त्यातल्या एका अननसाच्या डोक्याला नवऱ्यानं प्रयोग म्हणून (शेवटी आम्ही शास्त्रज्ञच!) एका बशीत पाण्यात ठेवलं. काही दिवसांनी त्याला मुळं फुटली. लगेच एका मोठ्या कुंडीत त्याची ट्रान्स्फर झाली. एखाद्या खोचक बायकोप्रमाणे, "आता अननस का उगवणार आहोत आपण?" असं विचारल्याचं स्पष्ट आठवतं आहे. ती कुंडी आणि त्यात असलेल्या अननसाच्या झाडानं नंतर आम्हाला काहीही त्रास दिला नाही. त्याला येता-जाता निरपेक्षपणे पाणी घालणे एवढेच काम आम्ही करत राहिलो. पण साधारण महिन्याभरापूर्वी त्या झाडाच्या मध्यभागी काहीतरी घडू लागलं. हा अननस तर नसेल? अशी शंका नवऱ्याने व्यक्त केली. त्यावरही मी, "अननसच असणार ना! अननसाच्या झाडाला सफरचंद का लागेल?" अशी टिंगल केली होती. पण काही दिवसांनी त्याला खरंच एक छोटासा अननस आला. तो बघून मला काय वाटलं याचं वर्णन मी शब्दांत करू शकत नाही. एखादं मांजराचं पिल्लू आपणहून आपल्या घरात यावं तेव्हा जसं वाटतं तसं काहीतरी. मग तो अननस मोठा होऊ लागला. दरम्यान मला अननस हे क्लायमेटरिक फळ नाही हे कळलं. याचा अर्थ असा की तो आंबे, केळी, पपई अशा फळांसारखा झाडावरून काढल्यावरही पिकू शकत नाही. त्यामुळे तो नक्की केव्हा काढायचा यावर आता संशोधन सुरु आहे. काढायला तयार होण्याआधी अननस त्याच्या देठावरून कलायला हवा. आणि त्याचा रंग हिरव्याकडून पिवळ्याकडे झुकायला हवा. शिवाय त्याच्या जवळ गेल्यास अननसाचा सुगंध यायला हवा. आता आम्ही रोज सकाळी, अननस कुठल्या बाजूला वाकला आहे त्याचा अभ्यास करतो. आजच्या राजकीय परिस्थितीला अनुसरून अननस त्याच्या उजव्या बाजूला कलला आहे. पण ती माझी डावी बाजू असल्यानं मी तो डावा आहे असं ठरवलं आहे. त्याला गोड वास येतोय का ते बघायला नवरा मला रोज बाल्कनीच्या त्या टोकाला जायला लावतो. गुलाबांच्या काट्यांचे डंख झेलत मी जाऊन तो तयार आहे का बघून येते. अजून तरी तयार नाही. पण तयार झाल्यावर नवरा तो कापू देईल का हा एक प्रश्न अजून अनुत्तरित आहे!

 

हमारी बाल्कनी में उगवा हुवा अनानास
बाल्कनीतला अननस

 

 

अबापट Wed, 29/04/2026 - 12:22

म्हणजे तुम्ही बघितलात तो बाओबाब डॉ कपिल देसाई यांच्या ( प्रशस्त आवार असणाऱ्या ) बंगल्यातील काय ? ईस्ट स्ट्रीट आणि त्याच्या पलीकडचा रस्ता जोडणारी गल्ली (कयानीच्या अलीकडची ?)
बाओबाबला मराठीत 'गोरखचिंच ' म्हणतात असं तुम्ही तुमच्या पतिराजांना सांगितलं तर त्यांचे बाओबाबप्रेम कमी होईल की जास्त होईल ?
पुण्यातील वृक्षसंपदेविषयक चारपाच पुस्तके छापली गेली आहेत. ती तुम्हाला सुचविली तर तुम्हाला फायदा होईल का ?

सई केसकर Wed, 29/04/2026 - 13:43

In reply to by अबापट

>>म्हणजे तुम्ही बघितलात तो बाओबाब डॉ कपिल देसाई यांच्या ( प्रशस्त आवार असणाऱ्या ) बंगल्यातील काय ? ईस्ट स्ट्रीट आणि त्याच्या पलीकडचा रस्ता जोडणारी गल्ली (कयानीच्या अलीकडची ?)

हो! तोच बंगला.

>>बाओबाबला मराठीत 'गोरखचिंच ' म्हणतात असं तुम्ही तुमच्या पतिराजांना सांगितलं तर त्यांचे बाओबाबप्रेम कमी होईल की जास्त होईल ?

अजिबात नाही. अ बाओबाब बाय एनी अदर नेम! आता तर काय त्यांच्याकडे गुगल लेन्स असते. एकदा पंचमढीला गेलो होतो तेव्हा तिथे असणाऱ्या कोणत्यातरी झाडाला गूगल लेन्सकरून हे किती दुर्मिळ आहे वगैरे सांगितलं होतं. त्यामुळे नाव माहिती नसेल तरी त्यांची काही हरकत नसते.

>>पुण्यातील वृक्षसंपदेविषयक चारपाच पुस्तके छापली गेली आहेत. ती तुम्हाला सुचविली तर तुम्हाला फायदा होईल का ?

का असे प्रस्ताव ठेवता? आहे ते काय कमी आहे का?

नंदन Wed, 29/04/2026 - 14:18

लेख अतिशय आवडला. 

आधी आढेवेढे, साशंक मनोवस्था आणि मग सवयीने वाटू लागलेलं मम-त्व हे संक्रमण जसं पाळीव प्राण्यांबद्दल होतं; तसंच झाडांबद्दलही ('कळत जाते तसे कशी झाडे पाखरे जीव लावतात...')

बाकी बाकीबाब बोरकरांच्या (अजून काही) ओळी आठवल्या:

झाड पाताळ फोडते, झाड आकाश वेढते
ताळमूळ संसाराचे, गाठीगाठीत जोडते

झाड स्वछंदी आनंदी, सुखे होय जायबंदी
घावाघावातून गाळी, फुले ज्वाळांची जास्वंदी

झाड माझे वेडेपिसे, उन्ही जळताना हसे
रूसे धो धो पावसात, चांदण्यात मुसमुसे


अवांतर: शीर्षकात ज्या पुलंच्या वाक्याकडे निर्देश आहे, त्याची मूळ (१९२४ सालातील) जाहिरात.

No photo description available.

'न'वी बाजू Wed, 29/04/2026 - 21:36

In reply to by नंदन

अवांतर: शीर्षकात ज्या पुलंच्या वाक्याकडे निर्देश आहे, त्याची मूळ (१९२४ सालातील) जाहिरात.

अरे वा! ही कोठे मिळाली?

(अशीच ‘ओटो दिलबहार’चीसुद्धा मिळू शकेल काय? म्हणजे निदान पु.लं.च्या वाक्याचा (संपूर्ण) संदर्भ तरी लागेल! (इंग्रजांच्या जमान्यातले, मुंबईतून कोठून तरी विकले जाणारे, ((बहुधा) मोगऱ्याच्या वासाचे? (चूभूद्याघ्या.)) अत्तर असावे, इतपत पत्ता माफक गूगलशोधातून लागला. परंतु, याचा उर्दूशी (किंवा, गेला बाजार, पु.लं.(नी उभारलेल्या (निवेदकाच्या) पात्रा)च्या उर्दूशी) नक्की काय संबंध, ते कळू शकले नाही.) असो चालायचेच.)


(बाकी, पु.लं.चे एखादे रँडम वाक्य, त्यामागील संदर्भ अजिबात लक्षात न घेता (अथवा, ठाऊक नसतानासुद्धा), वाटेल तेथे, डोळे झाकून ठोकून देणे हे चालू जनरीतीस तथा (मराठी) जालपरंपरेस अनुसरूनच झाले. (O tempora, o mores!) चालायचेच. कदाचित, कालौघात जेव्हा पु.ल. हे समग्र मराठी मानससमुच्चयाच्या विस्मरणात जातील, तेव्हा(च) कोठे ही कुप्रथा बंद होईल. (कालाय तस्मै नमः।) (आमेन!))


(बाकी,

१. माकडछापवाले कायकाय म्हणून विकायचे! (मराठी जनमानसातील कविमंडळी एकेकाळी उदरनिर्वाहाकरिता डालडापासून ते जहाजापर्यंत काय वाटेल ते विकायची, त्याची आठवण होते.)

२. घ्राणेंद्रियास ‘वासेंद्रिय’ म्हणणारा (आणि स्वतःस मराठी म्हणविणारा!) मनुष्य(!) कोठकोठल्या घाणींत आपले नाक खुपसून वास घेत असेल, याची कल्पना करवत नाही.

परंतु, हे असेच चालायचे!)


याउपर, मूळ विषयात आपल्याला (म्हणजे, मला!) यत्किंचितही गती नसल्याकारणाने, ‘सोबतच्या चित्रांतील झाडे (आणि इतर सजीव) छान दिसतात!’ इतकीच पोच देऊन गप्प बसतो.

बाकी चालू द्या.


तळटीपा:

यावरून कोणास (विशेषेकरून अबापटांस) 'My Family and Other Animals' या पुस्तकशीर्षकाची आठवण झाल्यास त्यास माझा नाइलाज आहे.१अ

१अ प्रस्तुत पुस्तक (किंवा, फॉर्दॅट्मॅटर, त्याच्या लेखकाचे कोठलेही पुस्तक) मी वाचलेले नाही. मात्र, एखाद्याची (अगदी शीर्षकाचीसुद्धा!) उद्धृते नि:संदर्भ (किंवा, संदर्भ ठाऊक नसतानासुद्धा) वाटेल तेथे बिनदिक्कतपणे पेरण्याच्या कुप्रथेचा बहुमान हा मराठीतच, आणि, त्यातसुद्धा, केवळ पु.लं.नाच, का असावा, या कारणास्तव, इंग्रजी लेखकांसंदर्भातही ही कुप्रथा (मराठीतूनच का होईना, परंतु) प्रस्थापित करण्याचा हा माझा एक दुबळा प्रयत्न, इतकेच.

सई केसकर Thu, 30/04/2026 - 05:46

In reply to by 'न'वी बाजू

मराठी लोक हिंदी कसे बोलतात यावरून शीर्षक घेतलं आहे!!
त्यामुळे तुमचा सिसरो फिसरो वाया गेला.

'न'वी बाजू Thu, 30/04/2026 - 07:14

In reply to by सई केसकर

मला सिसेरोचे (की किकेरोचे? (चूभूद्याघा.)) ते वचन कसेही करून फेकायचेच होते. ते मी फेकले. माझे उद्दिष्ट साध्य (की सिद्ध?) झाले. मामला खतम.

बाकी तुम्ही संदर्भ कशावरूनही घेतला असेनात का. मला त्याने काय फरक पडतो?

असो चालायचेच.

सई केसकर Thu, 30/04/2026 - 08:07

In reply to by 'न'वी बाजू

https://youtu.be/KsgiFQqOdG4?si=SSTkcL_fy9nRPxGl

हे मला माहिती असल्याचं कारण मी एक परीक्षण लिहिले होते. मानवतावादी विचारांची उत्क्रांती अशा आशयाचे ते पुस्तक होते. एका अतिशय हुशार बाईने लिहिलेले. पण नेहमीप्रमाणे मला आत्ता त्याचं नाव आणि त्या लेखिकेचे नाव काही म्हणजे काही आठवत नाही. पण तिचं दुसरं एक पुस्तक At the Existentialist Cafe, हेही तितकेच भारी आहे.
तर ते परीक्षण लिहिताना मी या सगळ्या ग्रीकांची नावं देवनागरीत कशी लिहायची त्यासाठी त्यांचे उच्चार शोधून काढले होते. कारण मी किकेरो लिहिलं असतं, तर मी ते सगळं ७०० पानी पुस्तक वाचून काहीतरी खरडलं आहे हे न बघता मला कसा सिसरो हा उच्चार माहिती नाही यावरून मला कुणीतरी पत्र लिहिलं असतं. नाव आठवलं की इथे येऊन सांगते.

प्रभुदेसाई Thu, 30/04/2026 - 10:04

In reply to by सई केसकर

The Greek pronunciation of "Cicero" is Κικέρων (Kikérōn), which reflects a hard "k" sound. This pronunciation is based on how the name was transliterated into Greek, indicating that the classical Latin pronunciation would also have been similar.
म्हणजे सिसेरो in इंग्लिश
किकेरो in ग्रीक/ लाटिन

'न'वी बाजू Thu, 30/04/2026 - 11:53

In reply to by सई केसकर

मी या सगळ्या ग्रीकांची नावं देवनागरीत कशी लिहायची त्यासाठी त्यांचे उच्चार शोधून काढले होते.

अं… सिसेरो/किकेरो ग्रीक?

'न'वी बाजू Thu, 30/04/2026 - 02:09

In reply to by नंदन

झाड पाताळ फोडते, झाड आकाश वेढते

काही सांगू नका!

मध्यंतरी (मागच्या जाने-फेब्रुवारीत) तीन आठवड्यांकरिता(च) पुण्यात टपकून गेलो. (तीच ती ट्रिप, जिचा ज़िक्र येथे केल्यावर, 'येऊन गेलात, कळविले नाहीत' अशा प्रकारची खंत अबापट यांनी व्यक्त केली.)

असो. माझी पुणे-ट्रिप आणि तिचे तपशील येथे महत्त्वाचे नाहीत. हा प्रतिसाद त्याबद्दल नाही. सांगण्याचा मतलब इतकाच, की मागच्या जाने-फेब्रुवारीत मी तीन आठवड्यांकरिता (सपत्नीक) घरापासून दूर होतो. या कालावधीत घरात कोणीही नव्हते. (मुलगा तसाही शिक्षणानिमित्त परगावी असतो.)

तीन आठवड्यांनंतर घरी परतल्यावर काय पाहायला मिळाले असेल? (खरे तर, ज्या रात्री अटलांटात उतरलो, त्याच्या थोड्याच अगोदर संध्याकाळी, आमचे गवत कापणारा मनुष्य आमच्या अनुपस्थितीत गवत कापण्याकरिता येऊन गेला होता, त्याने बॅकयार्डाचा फोटो पाठवला होता, त्यावरून, घरी आल्याआल्या आपल्यासमोर काय वाढून ठेवलेले असेल, याची धूसरशी कल्पना विमानातून उतरतेवेळीच आलेली होती, परंतु, that certainly did not make things any better. असो.)

कसे आहे, की माझ्या बॅकयार्डाच्या मागून एक ओढा जातो. ओढा आणि बॅकयार्ड यांच्यामध्ये ओढ्यास लागून (माझे) लाकडी कुंपण आहे. परंतु, तत्त्वतः माझ्या प्रॉपर्टीची हद्द थोडीशी त्या ओढ्याच्याही पलीकडे जाते. आणि, ओढा आणि माझ्या प्रॉपर्टीची हद्द यांच्या मधल्या चिंचोळ्या पट्टीत (अर्थात कुंपणाच्या मागच्या बाजूस, परंतु ओढ्यापलीकडे) कोणीही न लावलेली परंतु अशीच निसर्गमाने आपलीआपली उंच वाढलेली काही रानटी (पाइनप्रभृति) झाडे आहेत.

आता, वास्तविक, आमच्या अटलांटा परिसरात बर्फ असे फारसे पडत नाही. (एखादे दिवशी जर चुकून जेमतेम अर्धा इंच बर्फ वगैरे पडले, तर संपूर्ण वर्षाचा कोटा संपला, म्हणून समजतात.) थंडीही असते, परंतु सामान्यतः (उत्तरेच्या तुलनेत) तितकीशी कडाक्याची नसते.

या खेपेस मात्र साधारणतः जानेवारीअखेरीकडे (आम्ही तेथे नसताना) कधीतरी थंडीची एक प्रचंड लाट थोड्याच काळाकरिता आमच्या परिसरात येऊन गेल्याचे पेपरांतून वाचले होते. (पुढे काय झाले असावे, हा माझा निव्वळ तर्क आहे. प्रत्यक्षात काय घडले, हे कळण्याकरिता कोठलाही मार्ग उपलब्ध नाही; फक्त, अंतिम परिणाम ठाऊक आहे.) बहुधा त्यात झाडावर पाणी गोठून त्याचे वजन न पेलविल्याने, किंवा कसे, ते निश्चित ठाऊक नाही, परंतु, कुंपणापलीकडील एक झाड तुटून ते (१) लाकडी कुंपणावर, आणि (आख्खे बॅकयार्ड ओलांडून) (२) घरावर पडले. कुंपणाच्या ज्या भागावर पडले, तेथे कुंपणाची वाट लागली. घरावर मात्र, सुदैवाने, घरामागील डेकच्या कठड्याने बहुतांश आघात झेलल्याने घराचे नुकसान अगदी किरकोळ स्वरूपाचे झाले. (कोठे एकदोन फाटलेली insect-screens, कोठे एकदोन कौलांचे किरकोळ नुकसान, इतपतच. थोडक्यात बचावलो!) मात्र, पडलेल्या झाडाच्या अवशेषांचा राडा डेकभर तथा बॅकयार्डभर झाला होता. त्याच्या निचर्‍यासाठी इन्शुरन्स कंपनीने ताबडतोब कोणाला तरी पाठविण्याची व्यवस्था केली, नि त्याचे पैसेही दिले; कुंपणाच्या आणि घराच्या नुकसानासाठी मात्र फक्त पैसे दिले, नि त्याच्या दुरुस्तीकरिता उचित कंत्राटदार शोधून ती दुरुस्ती करवून घेण्याची डोकेदुखी माझ्यावर सोपवून अंग काढून घेतले. त्याची तितकीशी तातडी नसल्याकारणाने, ते हळूहळू एकएक करून अद्यापही निस्तरतोय.

(खूप वर्षांपूर्वी, माझ्याच बॅकयार्डातले मीच लावलेले एक उंच झाड असेच एकदा वीज पडून कोसळले होते. सुदैवाने, त्या खेपेस ते कुंपणास समांतर पडल्याकारणाने कशावरही पडले नाही, त्यामुळे नुकसान झाले नाही; फक्त कोणालातरी पैसे देऊन यथावकाश ते पडलेले झाड तेथून हलवावे लागले. त्यानंतर पडणारे हे दुसरे झाड! त्याव्यतिरिक्त, बॅकयार्डातले मीच लावलेले आणखी एक उंच झाड मध्यंतरी मीच (त्याखाली इतर झाडांना वाढू देत नाही म्हणून) पैसे देऊन कापवून घेतले होते. तर ते एक असो.)

आणखीही अशी दोनतीन उंच रानटी झाडे ओढ्यापलीकडे आहेत. त्यांचाही हळूहळू बंदोबस्त करावा लागेल. परंतु, एकएक झाड संपूर्ण कापण्याचे येथे साधारणतः हजार ते दीड हजार डॉलरच्या आसपास घेतात. (अवशेष वाहून नेऊन त्यांची विल्हेवाट लावण्याचे अधिक. अन्यथा, ओढ्यापलीकडे अवशेष फेकून दिल्यास त्याचे वेगळे पैसे नाहीत.) तरी या प्रसंगानंतर त्यांपैकी एक झाड मी नऊशे डॉलर देऊन अर्ध्या उंचीपर्यंत कापून घेतले, जेणेकरून ते पडण्याची शक्यता कमी. (आणि, जरी पडले, तरी घरापर्यंत पोहोचणार नाही.) तरीही, आणखी किमान अशी दोन झाडे बाकी आहेत. हळूहळू करावे लागेल त्यांचेही काहीतरी.

सांगण्याचा मतलब, आकाश वेढणार्‍या झाडांची कविकल्पना करणे हे बाकीबाबांकरिता सहजसुलभ असेलही, परंतु,

१. त्यांच्या घरावर कधी एखादे आकाश वेढणारे झाड कोसळले नसावे, आणि

२. आपल्याला बुवा आपल्या घराहून उंच अशा कोठल्याही झाडाचे भय वाटते.

(जाऊ द्यात! कॉलेजच्या दिवसांत, पुण्याबाहेरच कोठेतरी इंटर्नशिपकरिता स्कूटरने चाललेल्या एका कॉलेजसन्मित्राने रस्त्याच्या काठचे एक झाड अंगावर पडून आपला प्राण गमावला होता, ती कहाणी सांगून या धाग्याचा अधिक विचका करीत नाही. सांगण्याचा मतलब इतकाच, की आकाश वेढणार्‍या झाडांची कविकल्पना करणार्‍या कविमंडळींस त्याच झाडास उलटे टांगून, इ.इ., अशी माझी प्रांजळ धारणा आहे.)

असो चालायचेच.

सई केसकर Thu, 30/04/2026 - 05:50

In reply to by 'न'वी बाजू

एकदा मी आईच्या एका मैत्रिणीकडे न्यू जर्सीला गेले होते. तेव्हा तिथे एक खार दिसली म्हणून मी "किती गोड आहे" असे उद्गार काढले. तर माझ्या त्या मावशीने मला "ती माझं घर खाऊन खाऊनच इतकी गब्दुल आणि गोड झाली आहे" असं रागारागाने म्हणत जिथे जिथे छपराच्या दुरुस्त्या करायला लागल्या होत्या तिथे तिथे घेऊन गेली. त्या सगळ्याचा एकूण खर्च किती झाला आहे ते सांगितलं.
तेव्हापासून मी खारीला गोड म्हणत नाही.

'न'वी बाजू Thu, 30/04/2026 - 06:49

In reply to by सई केसकर

(खारच काय म्हणून, म्हणून सांताक्रूझ! अन्यथा, मुंबईतील, क्यालिफोर्नियातील, अथवा अलम दुनियेतील कोठल्याही सांताक्रूझशी प्रस्तुत प्रतिसादाचा यत्किंचितही संबंध नाही.)

एकदा झाडावर चढत असलेली एक खार, ‘कित्ती गोड आहे!’ म्हणून मी टक लावून पाहात असताना, अचानक तिने अंगावर उडी मारली होती.

मात्र, माझा खारींवर राग नाही. (आमच्या घरावरूनही अनेकदा उड्या मारीत असतात. दुर्लक्ष करतो. कशाकशाकडे म्हणून लक्ष देणार!)

फार कशाला, माझा मुलगा अतिशय लहान असताना त्याला एकदा ससा चावला होता. (त्याच्याच माँटेसरीतला पाळीव ससा! ‘मिस्टर निबल्स’ म्हणे! काय पिंजऱ्यात बोटबीट घातले असेल. नक्की काय केलेनीत्, ठाऊक नाही, परंतु, ससा बहुधा घाबरला असावा, नि प्रतिक्षिप्त क्रियेने चावला असावा. नंतर आम्हालाच भीती. अशा वेळेस काय करायचे, ठाऊक नाही; कोठे इंजेक्शने घ्यावी लागतात की काय! याला त्याचे काही नाही. पुढे गूगलगिरी केल्यावर समजले, की ससे रेबीज़चे कॅरियर नसतात, त्यामुळे काहीही करावे लागत नाही, फक्त साबणाने हात स्वच्छ धुवावे लागतात, म्हणून.)

असो. तर माझा सशांवरही राग नाही.

(बाकी, हे माँटेसरीवाले ‘पाळीव’ म्हणून (मुले सोडून) कोणकोणते प्राणी बाळगतील, नेम नाही. माझ्याच मुलाच्या माँटेसरीत, ‘मिस्टर निबल्स’बरोबरच, ‘प्रेशस’ नावाचा एक (पाळीव!) अजगरदेखील होता. तोदेखील (थँक गॉड!) पिंजऱ्यातच असे. एखादी टीचरीण त्याला पिंजऱ्याच्या जाळीतून उंदीर नाहीतर बेडूक (हा प्राणी आमच्या इलाख्यात भरपूर आढळतो.) वगैरे भरवताना ही पोरे त्याच्याकडे आत्यंतिक प्रेमाने बघऽऽऽत असत. एकदा एके संध्याकाळी त्याला (म्हणजे, मुलाला. अजगराला नव्हे.) माँटेसरीतून उचलायला गेलेलो असताना, आत्यंतिक कौतुकाने त्याने ‘अवर स्नेक!’ म्हणून त्याची (येथे, अजगराची) ओळखसुद्धा करून दिली होती.)

(अजगरसुद्धा एक वेळ ठीक आहे. त्याच काळात कधीतरी आम्ही पर्यायी माँटेसऱ्यांच्या शोधात होतो. (म्हणजे, त्याच्या तत्कालीन चालू माँटेसरीत काही वाईट होते, म्हणून नव्हे. परंतु, कदाचित आणखी चांगला पर्याय मिळाल्यास, म्हणून. आणि, शेवटी बदलली नाही, ती नाहीच. परंतु, ते असो.) तर त्या भानगडीत इतरही अनेक माँटेसऱ्या पाहिल्या, त्यांपैकी एकीत ‘पाळीव’ म्हणून (हवेपुरती भोके पाडलेल्या एका प्लास्टिकच्या पारदर्शक खोक्यात कोंडून ठेवलेला) एक टारांटुला होता. आता बोला!)

तर असे आहे हे सगळे. चालायचेच.

अबापट Wed, 29/04/2026 - 16:21

कमला नेहरू पार्कात कैलासपतीचे झाड आहे असं अंधुकसे स्मरते.
ही माहिती उपयोगी आहे का ते बघा.
( म्हणजे एवढी टायरतोड करत, एवढ्या गर्दीतून पोहत इष्ट स्ट्रीट पर्यंत किंवा राणीच्या बागेत जाण्याऐवजी कमी टायरतोड करत जवळच्या जवळ हा मामला आवरता घेता येईल. बघा म्हणजे ... )

चिमणराव Thu, 30/04/2026 - 01:53

आणि तुमची लेखनाची खुमखुमी जमली की.
लेख फार आवडला. मलाही झाडं लावणे जगवणे हे मला कळायला लागल्यापासून आवडतं आहे. प्रयोग करणे ही आवड.
बाकी बाल्कनीसाठी Russelia झाड सुचवेन. सतत लाल फुलांचे झुपके आणि त्यावर मधुरस पिण्यासाठी येणारे सनबर्ड पाहायला मजा येते. बारीक दोऱ्यासारखी हिरवी पाने असतात. म्हणजे फुले नसतानाही झाड चांगले दिसते. एका झाडापासून दहा झाडे करणेही सोपे असते. ( Layering method).
.......
( पंचमढी नसून पचमढी नाव आहे.)
अनानास झाड यशस्वीपणे बाल्कनीत वाढवण्यासाठी कौतुक आहे.

प्रभुदेसाई Thu, 30/04/2026 - 10:14

अवांतर
अननस हा शब्द डच भाषेतून आपल्या भाषेत आला आहे.
कैलासपति झाडाला "cannonball fruit असेही म्हणतात.

'न'वी बाजू Thu, 30/04/2026 - 10:43

In reply to by प्रभुदेसाई

हा शब्द अनेक युरोपीय भाषांमध्ये असून, त्याचे मूळ दक्षिण अमेरिकेतील कोठल्याश्या स्थानिक (नेटिव) भाषेतील आहे, म्हणे. (हे फळही मूळचे तिथलेच.)

त्यामुळे, डच भाषेत हा शब्द असू शकेलही. परंतु, आपल्या भाषेत हा शब्द (आणि, हिंदुस्थानात हे फळसुद्धा) बहुधा पोर्तुगीजांमार्फत आला असावा/आले असावे.

प्रभुदेसाई Thu, 30/04/2026 - 11:19

In reply to by 'न'वी बाजू

हो. इंटरनेट वर असेच आहे.
पण मी एकदा एका डच टीम बरोबर काम करत असताना त्यांच्या म्हणण्या प्रमाणे त्यांनीच हा शब्द भारतात आणला. डच कॉलोनीत.
बहुतेक सगळ्या युरोपिअन भाषांतून ananas शब्द आहे, अर्थात इंग्लिश सोडून .