Skip to main content

निखारा

‘माझ्यासाठी काय गंमत आणलीएस?’
तू लहान मुलीसारखी
हात पुढे करत म्हणालीस
तुझे हात-
गुलाबी
पारदर्शक
नितळ!

मी स्तब्ध
सायमलटेनियसली तुझ्याकडे व हातांकडे पाहत
पाठीमागे हातातल्या हातात
निखारा खेळवत राहतो
- प्रणव

............सा… Fri, 04/11/2011 - 19:03

अस्वस्थ करणारी कविता. आवडली. वेगळाच अनुभव देऊन गेली.

हरवलेल्या जहाज… Fri, 04/11/2011 - 19:18

या कवितेतीच वाट पहात होतो...नेमके आणि साधे शब्द..वाचताना मन आपली जागा सोडुन कवितेत कधी आणि कसे उतरते, ते त्याचे त्याला कळत नाही...त्याच्या हातातुन निखारा वाचकाच्या गुलाबी पारदर्शक मनावर अनपेक्षितपणे येऊन पडतो आणि शेवटच्या ओळी कायमच्या गोंदुन ठेवतो

नगरीनिरंजन Fri, 04/11/2011 - 20:24

किमान शब्दांत कमाल आशय.
शीर्षक मात्र निखारा ऐवजी 'भेट' किंवा तत्सम असतं तर आणखी बरं झालं असतं असं वाटलं.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 04/11/2011 - 21:03

साधीसोपी आहे म्हणून नाही पण आशयपूर्ण कविता आवडली.

गेल्या दोन दिवसांत आलेल्या प्रियालीच्या या धाग्यावरचे काही प्रतिसाद आणि शरलॉक होम्स यांच्या लेखातला आशय लक्षात घेता, कविता जास्तच आवडली.

आडकित्ता Sat, 05/11/2011 - 20:41

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

खालचा प्रतिसाद फक्त कविता, कोणत्याही कॉन्टेक्स्टशिवाय वाचून दिलेला आहे. काँटेक्स्ट वाचून वेगळा अर्थ फारसा सुचला नाही. कदचित गियर बदल्ला गेला डोक्यातला.

धनंजय Fri, 04/11/2011 - 21:05

हा निखारा दोघांनाही चटका देणारा आहे. "तू"च्या हातात निखारा ठेवण्याचा क्रूरपणा "मी"ने टाळला तरी पाठीमागे हातातल्या हातात निखारा खेळवणारे हातही भाजले जातात.

प्रेमीजनांत हा असा दुष्टपणा होता खरा पुष्कळदा.

राजन बापट Fri, 04/11/2011 - 21:06

कविता अत्यंत आवडली. येथे येत राहा आणि कविता देत रहा अशी विनंती.

प्रणव सखदेव Sat, 05/11/2011 - 10:01

सगळ्यांचे मनापासून आभार. :-)

आडकित्ता Sat, 05/11/2011 - 20:37

काय केलं होतं तिनं??
निखारे झेलण्यासाठी?

तिच्या चारित्र्यावर संशय घेतलेला कुणा परिटाच्या कुजबुजीतून तुझ्या कानावर आलं होतं?

की तूच काही असं करायला निघाला होतास की तिला निखारे झेलायची सवय करून घ्यावी लागणार होती?

हात नितळ, पारदर्शी : निष्पाप आहेत हे दिसल्याने निखारा हातात खेळता राहीला, की अग्निदिव्याची मागणी करण्याची हिम्मत होण्यासाठी असावा लागणारा राम तुझ्यात नव्हता?

काय होतं ते? संसारावर निखारा ठेऊन करण्यासारखं? उदात्त देशप्रेम, की अतीरेकी कृष्ण्कृत्य?

मस्त रे!
छान कविता. अजून खोल चिंतावी लागेल..

प्रणव सखदेव Sun, 06/11/2011 - 22:21

सगळ्या मित्रांचे मनापासून आभार. :-)