काही चित्रपटविषयक नियम - भाग १
आम्ही चित्रपटांच्या बाबतीत गंभीर व्हायचे अधूनमधून ठरवतो. कधीतरी एकदा याबाबतीत पीएचडी करायला उपयोगी पडावे म्हणून असे अभ्यासपूर्ण लेख लिहायचा प्रयत्न करतो. पूर्वी (इतरत्र) लिहीलेल्या "दिल" आणि "इश्क" यावरील लेखांनंतर हे आमचे तिसरे पुष्प. फूल ना फुलाची पाकळी असे लिहीणार होतो, पण येथे पाकळ्या इतक्या झाल्या की फूलच म्हणणे योग्य होईल. पण तरीही तुम्ही दिल व इश्क वाचले नसतील तर ते आधी वाचावे म्हणजे... बरे पडेल(नोट-१).
पण यावेळेस रिसर्च करताना असे लक्षात आले की या गोष्टी ज्या नियमांमुळे घडतात त्या नियमांची माहिती घेतल्याशिवाय एखाद दुसर्या गोष्टींबद्दल लिहून फारसे काही हाती लागणार नाही. तेव्हा या पूर्ण चित्रपटसृष्टीचे म्हणून जे नियम आहेत त्याबद्दल हा लेखनप्रपंच.
आमचा पूर्वी असा समज होता की फक्त कार्टून्स मधल्या विश्वातच फक्त वेगळे शास्त्रीय नियम होते. म्हणजे टॉम किंवा डोनाल्ड पोळीसारखे लाटले जाउन पुन्हा (तव्यावर न ठेवता) फुगून पूर्वीसारखे होतात. त्यांच्या पायाखालचा सपोर्ट गेला तर तो गेलाय हे त्यांना कळेपर्यंत ते पडत नाहीत. घाटातून चाललेली आगगाडी रूळ सोडून आख्खा डोंगर हिंडून पुन्हा रूळावर येते किंवा मोठे वळण घेताना तिचे मागचे डबे एखाद्या लांब कापडासारखे हवेत तरंगून पुन्हा रूळावर येतात वगैरे. पण इतर चित्रपट बघून हे लक्षात आले की त्यात सुद्धा स्वतःचे काही नियम होते. त्यातील काही पाहू:
१. चित्रपटातील एखाद्या प्रसंगात आजूबाजूला असलेल्या व्यक्ती, गोष्टींपैकी कॅमेर्याच्या फ्रेम मधून आपल्याला जेवढे दिसते, तेवढेच त्या प्रसंगातील कलाकारांना दिसते, आपल्याला दिसले नाहीतर त्यांनाही तेथूनही दिसत नाही.
अ. कथा एखाद्या मोठ्या हॉल मधे किंवा अगदी वाळवंटात घडत असते. दोन जण एकमेकांशी बोलत असतात. आजूबाजूला कोणीही नसते. मग एक दोन मिनीटांनी धाडकन कोणीतरी एकदम क्लोजप फ्रेम मधे येउन सगळ्यांना धक्का देते. ही अचानक आलेली व्यक्ती कॅमेरा क्लोज अप असल्याने आपल्याला दिसत नाही पण त्या कलाकारांनाही दिसत नाही.
ब. याउलट दारावर वाजवलेली बेल ऐकून आतला माणूस जरी काही न बोलता दार उघडायला येउ लागला की बाहेर उभा असलेल्या माणसाला ते आपो आप कळून बेल वाजवायचे बंद होते.
२. डायनोसोर वगैरे प्राण्यांना कोणाला आधी खायचे आणि कोणाला चित्रपट संपेपर्यंत खायचे नाही याचे ज्ञान असते. मॉन्स्टर चित्रपटात हीरो, हीरॉइन व मुख्य व्हिलन हे सर्व सोडून बाकी जवळचे लोक हे त्या डायनोसोर, अजगर, मगर वगैरेंचे चित्रपटातील मधल्या वेळचे खाणे म्हणून घेतलेले असतात. १० फुटी गोरिला असो, ५० फुटी टी-रेक्स असो, दहा मजली इमारतीएवढा गॉडझिला असो किंवा उडत येणारा मॉन्स्टर, त्यापासून पळणारे लोक आकाशात कोठेही पाहात पळतात. तसेच डायनासोरच काय पण धावत्या वाहनापासून स्वत:ला वाचवायला पळणारे लोक त्या वाहनाच्या पुढे त्याच रस्त्यावर सरळ रेषेत पळतात, आजूबाजूला नाही. व्हिलन सहसा नको तेथे डेअरिंगबाजपणा केल्याने त्या मॉन्स्टरकडून खाल्ला जातो.
३. एखादी कथा जेव्हा एखाद्या मोठ्या शहरात घडते तेव्हा त्यातील प्रसंग नेहमी त्या शहरातील नावाजलेल्या ठिकाणाच्या जवळपासच घडतात. म्हणजे पॅरिस असेल तर आयफेल टॉवर, सॅन फ्रान्सिस्को असेल तर गोल्डन गेट ब्रिज वगैरे. प्रीती झिन्टा न्यू यॉर्क मधे जॉगिंग करत असेल तर ती ब्रूकलिन ब्रिज, सेन्ट्रल पार्क वगैरे मधेच जाते. सिडनी ला आमीर खान चे ऑफिस त्या ऑपेरा हाउस समोरच असते. सत्या सुद्धा कोठूनही आला तरी व्हीटीलाच उतरावा लागतो, कुर्ला ट. वगैरे चालत नाही.
४. ज्या लोकांवर शास्त्रीय संकटे येणार असतात त्यांची मुले अगदी पाळण्यात असली तरी आधीच "हॅकर" म्हणून तरबेज असतात. डायनोसोर ठेवलेल्या पार्कचे इन्वेस्टर्स, त्याची इन्श्युरन्स कंपनी स्वतंत्र वकील पाठवून इतर गोष्टींची पाहणी करते पण अशा ठिकाणी टी-रेक्स चे पिंजरे इत्यादी ठिकाणची कुलुपे मात्र ८-१० वर्षांच्या मुलांनाही सहज उघडता बंद करता येतील अशी डिझाइन केलेली असतात. एवढेच नव्हे तर वापरायला सोपी व्हावीत म्हणून आख्ख्या पार्क चा नकाशा कॉम्प्युटर वर टाकून माउस ने सहज ओणत्याही ठिकाणी जाउन दारे उघडता वगैरे येतील एवढे सोपे केलेले असते. अशा गोष्टी सहज करणार्या लहान मुलांना कोणतेही पासवर्ड बाहेर दारावर रॅप्टर्स धडका मारत असताना दोन मिनीटात सुचतात.
५. एखादा कॅरेक्टर "फ़्लॉ" असल्याशिवाय नायक किंवा नायिका होताच येत नाही. आधी घटस्फोट दिलेली किंवा संबंध दुरावलेली बायको, लहान मुले किंवा आधी हातून घडलेली चूक, ड्रग्ज किंवा अती दारूचे व्यसन, एखादे अफेअर असावेच लागते. अजून एक म्हणजे दुरवलेले कुटुंब असेल तर हिरो ने काहीतरी अभूतपूर्व पण त्यांच्या वादाशी संबंध नसलेला पराक्रम केल्यावर ते पुन्हा एकत्र येते.
६. चित्रपटातील सर्व टाइम बॉम्ब हे शेवटच्या एक दोन सेकंदात निकामी केले जातात. फार फार तर एखादे मिनीट. आणि मुख्य म्हणजे बहुधा हीरो वगैरे लोकांना त्यांच्याकडे नक्की किती वेळ आहे हे कळावे म्हणून ते तसे लावले जातात. तो बॉम्ब फुटायच्या आत तेथून स्वत: पळून जायचे हा उद्देश असलेला व्हिलन हीरो किंवा हीरॉइन ला वाचण्यासाठी किती वेळ आहे हे सहजपणे कळेल असा इंडिकेटर दाखवणारा बॉम्ब ठेवून जातो.
७. कलाकारांबद्दल च्या चित्रपटात त्यांच्या आयुष्यातील प्रसंगाप्रमाणे आनंदी किंवा दु:खी गाणी ते स्टेज वर सादर करतात. एखाद्या दिवशी चांगली भरपूर देशी 'घेऊन' एखादी खटकेबाज लावणी ऐकायला, त्या शो ची कीर्ती ऐकून व आधीची "आ रं बत्ताशा, कशाला पिळतोयस मिशा" अशी भन्नाट गाणी ऐकायला किंवा स्वत:ची "गडी अंगानं उभा नी आडवा" वगैरे तारीफ़ ऐकायला आलेले प्रेक्षक ती "इष्काची इंगळी डसली" किंवा "मोसे छल किये जाय" सारखी रडकी गाणी सुद्धा त्याच उत्साहाने ऐकतात.
८. एखादी चांगली दणकट बिल्डिंग. आत व्हिलन लम्बे चौडे डॉयलॉग मारतोय. त्यात एखादा फारच आगाउ संवाद मारतो आणि तेवढ्या बाहेरून भिंत, काच फोडून हीरो एन्ट्री मारतो. कधीकधी ही एन्ट्री गाडीतूनही असते. गाडीतून फास्ट आल्यामुळे तो आधीचा संवाद म्हंटला जात असताना त्या जाड भिंतीच्या बिल्डिंग पासून ३०-४० फूट लांब असला तरी त्याला तो संवाद ऐकू गेलेला असतो. एवढेच नव्हे तर भिंत वगैरे फोडून आत येताना त्याला त्याचे योग्य प्रत्युत्तर ही सुचते.
९. एखादा मौल्यवान हिरा, एखाद्या बँकेतील प्रचंड रक्कम. चार पाच जण एकत्र येऊन ती चोरायचे ठरवतात. या चोरांतही चांगले व वाईट चोर असतात. अटीतटीच्या क्षणी सर्व सुरक्षा रक्षकांचे लक्ष भलतीकडे असल्याने चोरी वगैरे यथासांग होते. आता सगळे चांगले चोर ती लूट एका बॅगेत टाकून निघणार तेवढ्यात त्यांच्यापैकी एकजण- वाइट चोर- पिस्तूल काढतो व ती बॅग स्वत:कढे घेऊन तेथून पळून जातो. मग चांगले चोर एक मिनीट दु:खी चेहरे करतात पण मग रहस्य उघडते. वाईट चोर विमानात बसल्यावर बॅग उघडतो, तर त्यात दगड निघतात आणि मूळ हिर्याची बॅग चांगल्या लोकांकडेच राहते. वाईट चोर लोक आपण चोरलेल्या बॅगेत खरच सोने वगैरे आहे की दगड भरले आहेत हे ती पुन्हा बदलायचा चान्स निघून जाईपर्यंत बघत नाहीत.
१०. ही टेक्नॉलॉजी हिन्दी चित्रपटात फारशी दिसली नाही. जेथे सुरक्षेसाठी क्लोज सर्किट व्हिडीओ लावलेले असतात अशा इमारतींमधे कोणत्याही खोली तून अथवा कॉरीडॉर मधून एखादे छोटे यंत्र बसवून कोणालाही तेथेच पूर्वी घेतलेल्या व्हिडीओचे पुन:प्रक्षेपण करता येते. असे इमारतींमधल्या वेगवेगळ्या ठिकाणचे प्रि-रेकॉर्डेड व्हिडीओ सर्वत्र उपलब्ध असतात. तसेच हा आधीचा व्हिडीओ live feed च्या ऐवजी लावला जात असताना अचूक त्याच वेळेस ज्यांनी हे सतत चेक करावे ती सिक्यूरिटी वाली मंडळी बरोबर दुसरीकडे कोठेतरी बघत असतात.
११. नायक किंवा नायिकेकडे असलेले कोणतेही नेटवर्क वाले उपकरण म्हणजे सेल फोन, लॅपटॉप वगैरे जगात कोठेही असले तरी लगेच नेटवर्क ला कनेक्ट होते, तेथून अतिशय वेगाने कोणतेही ग्राफिक्स दिसते, तसेच कोणत्याही देशाच्या कोणत्याही सरकारी किंवा खाजगी संस्थेच्या नेटवर्क वर तेथून जाता येते आणि ते हॅक करून पाहिजे ती माहिती मिळवता येते.
१२. कोणत्याही बँकेतून दुसर्या अकाउंट वर पैसे ट्रान्स्फर होत असले की स्क्रीन च्या दोन्ही बाजूला एक एक फोल्डर दाखवून त्या फाइल्स किंवा पैसे इकडून तिकडे उडी मारून जातात. तसेच कधी कधी जास्त पैसे ट्रान्स्फर होत असले की जास्त वेळ लागतो. या ट्रान्स्फर्स त्या करणार्याला पकडू शकेल असा माणूस स्क्रीन जवळ येईपर्यंत बरोबर पूर्ण होतात. तसेच काही वेळेस तर पेट्रोल भरल्यासारखे किती पैसे ट्रान्स्फर झाले हे दाखवणारा काउंटर वाढत जातो.
असो. तर असे हे १२ नियम आत्तापर्यंत कळाले आहेत. अजून काही सापडले आहेत, ते बर्याच ठिकाणी लागू होतात का नाही हे पाहून पुढचा भाग टाकला जाईल.
नोट-१: येथे "म्हणजे..." च्या पुढे त्या गंभीर टोन मधे काय लिहायचे सुचले नाही हे साफ खोटे आहे.
मागे पडलेले नियम
हिरो हिरॉइन यांना आई आणि बाप दोघेही असू शकत नाहीत. एक कोणीतरी गचकलेले असणे मश्ट असते., चित्रपटातील सर्व लहान मुले आगाऊ असावीत. त्यांना नको त्या वयात नको त्या गोष्टी कळत असाव्या., नायिका गरीब असली तरी म्याचिंग साडी, बांगड्या परिधान केलेली असणे.
वगैरे वगैरे नियम आता मागे पडलेले दिसतात. नवे नियम आवडले.
अतिशय आवडलेले आहे. भयंकर हसू
अतिशय आवडलेले आहे. भयंकर हसू आले..
कुर्ला ट., टाईम बाँब वगैरे प्रचंड मस्त.
गाणारे लोकही स्टेजवर असो किंवा पार्टीत.. ते जे काही गातात ते उघड सजेस्टिव्ह असूनही आणि गायक जिची एन्गेजमेंट आहे अशा हिरॉईन आणि तिच्या नवर्याभोवती गोल गोल फिरत तिच्याकडे रोखून पहात तू प्यार है किसी और का वगैरे गात असताना एकाही उपस्थिताला शंका येत नाही की गाणारा हिरॉईनकडून बेवफाईची शिकार झाला आहे.
नियमावली आवडली.
पुनरानुभूती झाली. मस्त.
पुढच्या नियमावलीत "स्वयंचलित पिस्तुल, रिव्हॉल्वर यांच्यात किती गोळ्या असतात? मॅगेझिन काढल्यावरही चेंबरमध्ये एक गोळी शिल्लक असते हा नियम व्हिलनने हिरोवर गोळी झाडताना लागू पडत नाही पण हिरोने व्हिलनवर गोळी झाडताना नेहमीच लागू पडतो." यावरही चर्चा व्हावी.
अहाहा... हे संशोधन आमच्या
अहाहा...
हे संशोधन आमच्या अत्यंत जिव्हाळ्याचे आहे.
आणखी काही टिपा:
1. कितीही मोठी सेलिब्रिटी, संशोधक, लेखक असो त्याचा ऐर्यागेर्या नथ्थु खैर्यासारखा उल्लेख
म्हणजे उदा. स्टीफन हॉकिंगबद्दल काही असेल तर, कौन? वो स्टीफन हॉकिंग? मै उसे एटलांटा में मिला था जब उसने इस थियरी को स्टेजपर बताया था... मैनै उससे कुछ सवाल पुछे.. लेकीन उसने उसे टाल दिया.. (आणि हा सवाल चालु चित्रपटाच्या दृष्टीने जीवनमरणाचा प्रश्न असतो)
हॉलिवूडची हिंदीत होणारी डबींग हा संशोधनाचा स्वतंत्र विषय आहे, पण तरीही..
1. इंग्रजी चित्रपट पूर्णत: हिंदी परिभाषेत आला पाहिजे.. उदा. बारमध्ये व्हिस्कीचा पेग मागायचा असेल तर ''अरे एक पटियाला पेग बनाना...''
2. नावेही हिंदीच आली पाहिजेत.. उदा. ''मेरी इस बात को ध्यान मे रखना करमचंद..!'' (टायटॅनिक)
3. आपको उडान भरने की अनुमती नहीं है....
(नामचिन गुंडांनी हायजॅक केलेल्या विमानाचा नामचीन गुंड पायलट ) : अनुमती की जरुरत किसे है भाई?
आणखी भर घातली जाईल..
नियम आवडले!
लेखातले नियम आवडले. पण ह्या गोष्टींपेक्षा मला माझ्या जीवनात होतील अशा गोष्टीं जर नीट दाखवल्या नाहीत ना तर फार राग येतो! डायनासोर वगैरे माझ्या आयुष्यात येणार नाही म्हणून मी एकवेळ त्या दिग्दर्शकाला सूट देईनही... पण, उदाहरणादाखल. बर्याच सिनेमांमध्ये दाखवतात, एकदम काहीतरी भारी बातमी हिरोलावगैरे कळते, हिरविन लग्नाला हो म्हणते इ. इ. तो बार नाहीतर हॉटेलात असतो आणि मग तो एकदम ओरडून सांगतो, ऑल ड्रिंक्ज ऑन मी.. नाहीतर पनीर बटर मसाला सगळ्या हॉटेलला माझ्याकडून वगैरे. आता बार मध्ये इतका दंगा चालू असतो त्यात हा ओरडला की सगळे एकदम गप्प कसे होतात काय कळत नाही!! (च्यायला, आम्ही हाटेलात गेलो तर बसलेल्या चार लोकांना मी शांत करू शकत नाही.) त्यांचे ड्वायलाक वगैरे इतक्या दंग्यात आपल्याला ऐकू येतात हे एक वेगळंच. मी बार मध्ये दोन चार वेळा गेलो होतो तर मित्रांना सांगून थकलो, अरे शांत रहा कोणीतरी ओरडून म्हणालं की ड्रिंक्ज ऑन मी तर ऐकू यायचं नाही.. त्यांनी मला वेड्यातच काढलं! श्रीमंत बापाची पोरं..
पण मला सर्वात जास्त राग येतो तो पुढच्या गोष्टीचा. तो हिरो जाहीर अनाउंसमेट करतो आणी मग बार मधून निघून जाताना दाखवतात हो! अरे पैसे देताना तरी दाखवा... किती बिलं झालं? ड्रिंक्ज ऑन मी म्हणल्यावर नक्की कोणती ड्रिंक्ज त्याच्यावर लावायची? तो म्हणायच्या आधीचं मोसंबी ज्यूस लावता येईल का? वेटर हिशेब कसा लावतात? तो निघून गेल्यावर कितीवेळ त्याच्या नावार ड्रिंक्ज पीता येतात? त्याने अनाउंस केल्यानंतर मी मित्रांना बोलावून दारवा पाजल्या तर बिल कोणावर येईल? या सगळ्याची उत्तर कोण दाखवणार!! कोणत्या सिनेमात दाखवले असेल तर मला प्लीज कळवा हो.
जबरदस्त निरीक्षणं....
पैशांची ट्रान्स्फर कॉंप्युटरवर फाइल डाऊनलोड केल्याप्रमाणे होताना दाखवलेली असते नेहमी. आणि टाईमबॉंबचा टायमर टिकटिक करत पूर्वी खाली जायचा. आता इलेक्ट्रानिक आकडे फिरताना दिसतात. पण असल्या काउंटडाउनांविषयी फिल्लम इंडष्ट्री भयंकर ऑब्सेस्ड असते हे मात्र नक्की. कुठल्यातरी स्पेसमधल्या का समुद्रातल्या पिक्चरमध्ये हिरो बाहेर जाऊन काहीतरी घेऊन येतो. त्यासाठी त्याने घेतलेला ऑक्सिजनचा सिलिंडर बरोब्बर १२० सेकंद पुरणार असतो. मग बाहेर जे गोंधळ होतात ते निस्तरत तो बरोब्बर २.५ सेकंद शिल्लक असताना परत येतो. इतक्या दशांश सेकंदात ऑक्सिजनचा हिशोब कॅल्क्युलेट करणारा सिलिंडर धन्यच म्हणायचा!
एकट्या जेम्स बॉंडच्या सिनेमाच्या नियमांची टिंगल करून तीनचार मस्त पिक्चर झाले....
तिरंगा या सिनेमात बहुधा..
तिरंगा या सिनेमात बहुधा.. (किंवा कोणता ते आठवत असल्यास सांगावे..)
सगळा देश नष्ट करणार्या मिसाईल्स (ही रॉकेटसारखी अनेकमजली उंच आणि लाँच करायला सदैव तयार ठेवलेली असतात..
आणि व्हिलन ह्यह्यह्य हसत ती अगदी लाँच करण्याच्या वेळी हिरो एक वायरवजा पदार्थ हातात घेऊन प्रकट होतो आणि गर्जतो की अब कोई फायदा नही, "मैने इसका फ्यूज निकाल लिया है"
बाजारगप्पा नाही मारत.. पाहिलंय कुठेतरी पिच्चरात.
आणखी काही आठवलेले: - बाँब
आणखी काही आठवलेले:
- बाँब फोडणार्या रीमोटची रेंज अमर्याद असते..
- गगनचुंबी इमारतीवरुन पडलेला मनुष्य हिरो असेल तर तो बाय डिफॉल्ट खालून जाणार्या ट्रकवर मऊ गादीत पडतो.
- दुष्टांविरुद्धचा पुरावा एका व्हिडीओटेप किंवा कॅसेटमधे रेकॉर्ड होतो.. त्यात खलपुरुष आपापल्या कृत्यांची ढळढळीत कबुली सेलेब्रेशनची दारु पितापिता एकमेकांना देत असतात. (हां मैनेही उसके दूध में जहर मिलाया.. और पापा आपने नयना के मन में राज के लिये नफरत पैदा कर दी.. एक पत्थर में दो पंछी इ इ आपका जवाब नही.. वगैरे..) हे सर्व रेकॉर्ड झालेलं असतं.. पण ते हिरो किंवा हिरवीण लोक्स तातडीने व्हिलन्सच्या अड्ड्यावरच ती टेप उंच करुन ललकारतात की तेरे दिन भरगये राका, अब मैं समाज के सामने तेरी शराफत का पर्दाफाश करुंगा. मैं ये टेप लेके पुलीस स्टेशन जा रहा हूं..
आणखीही बरेच काही पण पूर्वी पोस्ट लिहिल्याने आता अजून लिहीत नाही..
मिशन इम्पौसिबल
मस्त.
मिशन इम्पौसिबल मधे टॉम क्रुझ सिआए च्या हापीसात चोरी करतो तेथे -
१. क्यमेरा सोडून सर्व सुरक्षा उपकरणे असतात!!
२. लॉफ्टच्या झाकणाचा स्क्रू हा उलट्या बाजुने काढताना दाखविला आहे, असा स्क्रू ड्राईव्हर शोधला पाहिजे!!.
अजून बराच वाव आहे, पण बाकी गम्मत इतरांनी सांगावी.
हा हा हा डाँक्टर राँक्स तिकडे
हा हा हा
डाँक्टर राँक्स
तिकडे प्रतिसाद देता येत नाही म्हणून इथे देतेय
हिरो नोकरीचा इंटरव्यू देउन आल्यानंतर माँ मे सिलेक्ट हो गया वगैरे डाँयलाग
नंतर यच्चयावत हिरोना सिलेक्ट झाल्यानँतर गाजराचाच हलवा का लागतो हे एक कोडे आहे
हिरोईनी नेहमी आर्टसच घेतात इंजीनिअरिग सायन्स काँमर्स वगैरे ही शाखा असतात हे काय गावीच नसते
डायरेक्टरचे माफी पत्र
कधीतरी ' रसरंग ' नावाचे एक साप्ताहिक(मासिक?) निघत असे. ते आम्ही केशकर्तनालयांत गेल्यावर वाचत असू. त्यामध्ये " इथे
डायरेक्टर दिसतो " ( किंवा असेच काहीतरी ) नावाचा विभाग असे. ह्यामध्ये हुशार, चतुर, बहुश्रुत, जाणकार प्रेक्षक डायरेक्टरच्या चुका काढून दाखवत असत. धरमेंदरच्या एका पिक्चर मध्ये हिरो गुंडांबरोबर दे दनादन मारामारी करतो. त्या मारामारीत त्याचा शर्ट फाटतो. पुढच्या सीन मध्ये मारामारी उरकून तो हिरॉइनला बागेत भेटायला जातो तेव्हा त्याचा तोच शर्ट व्यवस्थित असतो. तेव्हा एका प्रेक्षकाला सहाजिकच ये कुछ जचता नही असे वाटणे शक्य आहे. त्याने तशी कॉमेंट केली.
ती कॉमेंट वाचून डायरेक्टरचे पित्त खवळले. (नवखा असेल बिच्चारा.) त्याला उत्तर द्यायची खुमखुमी आली.
" हो, माझे थोडे चुकलेच! खर तर हिरो शर्ट शिवून घेण्यासाठी शिंप्याच्या शोधांत वणवण फिरू लागला (तासभर). पण त्यादिवशी सोमवार असल्यामुळे दुकाने बंद होती. शेवटी गल्ली नंबर पाच मधल्या एका जुनाट वाड्यावर दिलासां देणारी पाटी दिसली.
" इथे लहान मुलांची झबली. टोपडी, लंगोट व मुलींचे चिटाचे फ्रॉक शिवण्याचे काम केले जाईल. भेटा पारू आज्जीला." हीरोला थोडा धीर आला. ही आजी आपले काम करेल असा त्याला विश्वास वाटला. वाड्यांत शिरून तो आज्जीचा शोध गेऊ लागला. ( इथे जुन्या वाड्याचे सौंदर्य टिपणारे काही शॉट). हिरो आरडा ओरड करतो. आज्जी सावकाश बाहेर येतात.त्या बहुतेक बहिऱ्या आहेत. इथे बहिऱ्या आजी आणि वैतागलेला हिरो ह्याचे सवाल जबाब. ( फुल स्कोप) म्हणजे हिरो काहीतरी बोलणार आणि आज्जी दुसरेच ऐकणार! तेवढ्यात आजीची १७-१९-२० वर्षाची नात बाहेर येते. ती दिसायला सुंदर आहे हे काय सांगायला पाहिजे? क्यामेरा तिच्या सर्वांगावरून फिरतो. ती मध्यस्थ होऊन आजीला शर्ट शिवून द्यायची गळ घालते. हिरो शर्ट काढून आजीला शिवायला देतो. त्याचे पिळदार शरीर पाहून ती नात ----- जाऊ दे झाले. हिरोच्या शर्टलां म्याच होणारा धागा मिळाल्यावर बॉबीन भरायचा कार्यक्रम सुरु होतो. मधून मधून आजी हिरोची चवकशी करता असतात, शिक्षण नोकरी लग्न झाले का? शर्ट कसा फाटला.? इत्यादी. त्यावर नातीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव. तिकडे हिरॉइन वैतागून घरी निघून जाते, शोचा टाईम संपल्याने प्रेक्षकही शिव्या देत देत चित्रपटगृहाच्या बाहेर पडतात. देऊ देत. ते म्हणे हिरो हिरोईनचे बागेतल गाणंं बघायला आले होते. पण आधी आपल्यासारख्या चोखंदळ प्रेक्षकांचे समाधान हे अधिक महत्वाचे.असे हे सर्व मी माझ्या पुढच्या पिक्चरमध्ये दाखवेन. केवळ तुमच्या समाधानासाठी! अजूनही बरेच डिटेल दाखवायचे आहेत ते सगळेच इथे सांगत बसत नाही. माझ्या पुढच्या पिक्चरमधेच पहा."
हा हा हा
एक नंबर लेख झालाय!
यातले बरेच नियम चित्रपट बघताना माझ्याही लक्षात येतात.
शेवटचा नियम तर धम्माल आहे. २-३ पिच्चरांमध्ये हा प्रकार बघितला आहे.