‘हार्ड लेबर’ – आधुनिक जगण्याचा भयपट

Hard Labour - Film Poster

खा-उ-जा धोरणांपायी होणारी फरफट दाखवणारे अनेक चित्रपट गेल्या काही वर्षांत जगाच्या निरनिराळ्या कोपऱ्यांत निर्माण झाले. ‘तेच ते’ म्हणता येईल इतकं या वास्तवाचंसुद्धा कसं जागतिकीकरण झालं आहे ते अशा चित्रपटांमधून अनेकदा लक्षात येतं. तरीही काही चित्रपट त्यांतल्या वेगळेपणामुळे लक्षात राहतात. ‘हाय-सो’मध्ये आत्ममग्न म्हणता येईल अशा प्रकारे ते वास्तव भिडतं. भयपटासारख्या एखाद्या वेगळ्याच विधेतून (genre) जर सामाजिक आशय मांडला तर ते कसं वाटेल? असा काहीसा प्रयत्न ‘हार्ड लेबर’ हा ब्राझिलीअन चित्रपट करतो.

चित्रपटाचं कथासूत्र पाहिलं तर ते पुन्हा एकदा ‘तेच ते’ आहे हे सहज लक्षात येईल – मध्यमवयीन ओत्ताविओ-हेलेना आणि त्यांची शाळकरी मुलगी व्हनेसा हे मध्यमवर्गीय शहरी कुटुंब आहे. एक गाळा विकत घेऊन त्यात किराणा मालाचं दुकान थाटायचा हेलेनाचा बेत आहे. अचानक ओत्ताविओची नोकरी जाते. त्यामुळे ते दुकान फायद्यात चालवण्यासाठी हेलेनावर अधिक दबाव येतो. येनकेनप्रकारेण आपलं मध्यमवर्गीय अस्तित्व टिकवण्याचा या कुटुंबाचा लढा ‘हार्ड लेबर’मध्ये दाखवला आहे.

Ottavio-Helena

भारत जसा सुपरपॉवर होण्याच्या उंबरठ्यावर आहे असं म्हटलं जातं, तद्वत ब्राझिलबद्दलही म्हटलं जातं. इथे आपल्याला दिसणारं ब्राझिल मात्र तसं नाही. ओत्ताविओ हा आताच्या कॉर्पोरेट जगात ‘redundant’ ठरवल्या गेलेल्या कोणत्याही नोकरदारासारखा आहे. एकदा नोकरी गेल्यावर त्याला नवीन नोकरी मिळणं जड जातं आहे, कारण कॉर्पोरेट जगातल्या बदलत्या ‘ट्रेंड’प्रमाणे तो ‘ट्रेंडी’ नाही. एकदा तो नोकरीसाठीच्या मुलाखतीला जातो. तिथे नवीन व्यवस्थापन तत्त्वांनुसार त्याला एक खेळ खेळायला लावतात. त्याला हे असलं काही रुचत नाही अन् तो बाहेर पडतो. जसजसं त्याच्या लक्षात येऊ लागतं की या बदलणाऱ्या जगात आपल्यासारख्या मध्यमवयीन माणसाला नोकरी मिळणं दुरापास्त आहे, तसतसा तो तणावग्रस्त होऊ लागतो.

दिवसभर घर सांभाळायला ठेवलेली नोकराणी पाउला किंवा दुकानात काम करणारे कर्मचारी यांना त्यांची उपकथानकं आहेत याची छोट्या प्रसंगांतून जाणीव होते, पण ती हेतुपुरस्सर गूढच ठेवली आहेत. यामुळे चित्रपटात अनेकजण अदृश्य तणावाखाली वावरत असल्याचं जाणवतं. नक्की कशाचा तणाव ते अदृश्य राहिल्यानं मुख्य पात्रांवरचा तणाव अधोरेखित करण्याचं उद्दिष्ट साधतं आणि कथानक भरकटत नाही.

Helena

जसजसं हेलेनाला हे लक्षात येऊ लागतं की नवऱ्याला नोकरी मिळत नाही तसतसा नवीन दुकान चांगलं चालावं यासाठी तिच्यावरचा मानसिक दबाव वाढू लागतो. पण मंदीच्या परिस्थितीत दुकान चालणंसुद्धा कठीण असतं. मोठ्या सुपरमार्केट चेन्स लहान दुकानांचा काळ ठरतील की काय असा सतत संदर्भ आहे. पण सर्वात त्रासदायक भाग म्हणजे या तणावाखाली हेलेनामध्ये होणारे बदल: कर्मचाऱ्यांवर संशय घेणं, त्यांना उशीरापर्यंत किंवा सुटीच्या दिवशी थांबायला लावणं असे उपाय हेलेना योजू लागते. दुकानात कॅमेरे बसवते. ओत्ताविओ तिला तिच्या या त्रासदायक बाजूची जाणीव करून देतो, पण तो पैसा कमावत नसल्यामुळे त्याच्या बोलण्याला हेलेना फारसं महत्त्व देत नाही की काय, असं वाटतं. घरी बसून वैतागलेला ओत्ताविओ आणि दुकान चालवण्यात पिट्टा पडल्यामुळे कावलेली हेलेना यांच्यात हळूहळू तंटे होऊ लागतात. दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, पण बदलत्या परिस्थितीत नातं टिकवणं मुश्कील होतं.

हे दाखवताना वापरलेला भयपटाच्या धर्तीवरचा कथाविस्तार कसा केलेला आहे आणि त्यानं काय साधतं हे आता पाहूया.

Helena in the shop

दुकानाच्या गाळ्याबद्दल पहिल्यापासून काहीतरी गूढ जाणवत राहतं. त्या जागेवर आधीही एक दुकान असतं, पण त्याचे चालक गायब असतात किंवा त्यांच्याशी संपर्क साधण्याला गाळामालक अनुत्सुक असतात. आधीच्या चालकानं दुकानात टाकून दिलेल्या चित्रविचित्र गोष्टी सापडतात – उदा: एक भलामोठा हातोडा किंवा कुत्र्याच्या गळ्यात घातला गेला असेल असा एक धातूचा पट्टा, पण त्याला मानेपाशी रुततील असे धारदार काटे असतात; जणू एखाद्या हिंस्र पशूला काबूत ठेवण्यासाठी त्याला अशा त्रासदायक पट्ट्यानं जखडून ठेवलेलं असावं. एकदा काहीतरी सामान आणण्यासाठी हेलेना रात्री उशीरा दुकानात जाते तेव्हा तिच्यावर एक कुत्रा भुंकू लागतो. दुकानात कुणाचातरी वावर आहे की काय अशी तिला शंका येते. दुकानातून वस्तू गायब होत राहतात. दुकानातल्या अशा प्रसंगांतून आणि घरीही अधूनमधून घडणाऱ्या प्रसंगांतून काहीतरी हिंस्र, पाशवी अस्तित्व जाणवत राहतं. कोणत्याही क्षणी काहीतरी भयंकर घडेल असं वाटत राहतं.

प्रत्यक्षात पात्रं ज्या जीवनसंघर्षात धडपडताहेत त्यातून ती अधिक हिंस्र बनावी अशी सध्याची सामाजिक-आर्थिक रचना आहे. चांगुलपणा, माणुसकी, कणव अशा मूल्यांना इथे थारा नाही – किंबहुना अशा मूल्यांना जे थारा देतील ते या व्यवस्थेत टिकणार नाहीत आणि स्वत:तल्या माणुसकीला दाबून जे हिंस्र होतील त्यांना कदाचित यश मिळेल. नव्या व्यवस्थेला सामोरं जाण्यासाठी यातली पात्रं धडपडत राहतात. त्यामुळे ती तणावग्रस्त होतात. तणावाखाली असताना छोट्याछोट्या दैनंदिन गोष्टीदेखील अमानवी किंवा अशुभसूचक आणि म्हणून भीतिदायक भासू लागतात. तणावामुळे भीती वाढते - भयसूचक गोष्टींमुळे तणाव वाढतो; अशी विचित्र परिस्थिती यातून निर्माण होते. अशा अवस्थेत पात्रं आपला मूळ स्वभाव बदलून वैतागवाणी, कटकटी, त्रासिक आणि हिंस्र होतात. त्यांच्यातले हे बदल त्यांना यशस्वी करतील का? माहीत नाही. हे बदल त्यांचं वैयक्तिक आयुष्य अधिकच तणावग्रस्त आणि अधिकच भयग्रस्त करतील का? निश्चित. 'भय इथले संपत नाही' अशी भयकथेतली हिंसेची चाहूल या विचित्र तिढ्याला अधिक टोकदार बनवते आणि एक वेगळा अनुभव देते.

ट्रेलरः

अधिक माहिती: http://www.imdb.com/title/tt1686328/

(छायाचित्रे आंतरजालावरून)
अद्ययावतः शेवटच्या परिच्छेदात किरकोळ बदल

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

परीक्षण/ओळख आवडली.
आधुनिक जीवनशैलीत तंत्रज्ञानाच्या प्रगतीने जीवन सुखकारक झालं आहे हे जितकं खरं आहे तितकंच एकसाचीकरण, अनावश्यक ताण, अनपेक्षित समस्या यांसारख्या दूरगामी तोट्यांची चाहूल लागणे सुरु झाले आहे आणि त्यांची दखल या चित्रपटात कल्पकपणे घेतलेली दिसतेय. खरोखरच आयुष्यात निर्माण होणार्‍या ताणाचा नेमका उगमच कळत नाही असे या प्रश्नाचे स्वरूप आहे.
आपल्याकडे मात्र अजून अशा विषयांवर असे अभिनव प्रयोग केलेल्या कलाकृती निघत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रपटाची ओळख आवडली.

आपल्याकडे मात्र अजून अशा विषयांवर असे अभिनव प्रयोग केलेल्या कलाकृती निघत नाहीत.

टॅण्ण!!!! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा भयपटासारखी हाताळली कशी असेल हे तितकेसे समजले नाहि..
बघायला हवा! Smile

आभार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उत्तम परि़क्षण!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान ओळख
चित्रपट बघण्याची उत्सुकता आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

तुम्हाला चित्रपट पाहून लिहिताही येतं त्यांच्याबद्दल... इतका वेळ!! श्रीमंत आहात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आता चिंता म्हणतील वेळ असत नाही "काढावा लागतो" Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परिक्षण वाचून बघण्याची उत्सुकता वाढली आहे. वेळ मिळाला की बघावा लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

जुन्या कुत्र्याला नवे खेळ शिकून करून दाखवावे लागतात. एका बाजूने व्यवस्थेत जागा सापडत नाही. दुसऱ्या बाजूने व्यवस्थेच्या बाहेर रहाणं अशक्य व्हावं अशी परिस्थिती. मॉम-ऍंड-पॉप ग्रोसरी स्टोअर्स मोठ्या दुकानांपुढे टिकाव धरू शकत नाहीत. त्यामुळे आतली तडफड वाढते. या तडफडीपोटी हिंस्रपणा वाढतो. असा आशय असणारी पटकथा वाटली.

व्यवस्थेने त्रासलेली व्यक्ती हा जुन्या काळपासूनचा झगडा आहे. चार्ली चॅप्लिनने यांत्रिकीकरणाचं चित्रण विनोदाच्या अंगान केलं होतं. या चित्रपटात तशाच यांत्रिकीकरणाचं (स्वतंत्र विचार, दुकानं मोडून मोठ्या चेन प्रस्थापित होण्याचं) चित्रण भयकथेच्या मार्गाने केलेलं दिसतं. चित्रपट पहायला हवा. पहायला हवाच्या यादीत आणखीन एक भर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0