Skip to main content

चच्या'च' चषेसारख्याभा चतरइ चषाभा

लहानपणी आपण सर्वांनीच 'च'ची भाषा वापरली असेल. मराठीवर आधारित असलेल्या अशा सांकेतिक भाषा अनेक आहेत, पण 'च'ची भाषा सर्वाधिक वापरली जात असावी. संदीप खरेने चक्क एक गाणंही केलेलं आहे या भाषेत.

या विषयावर बोलणं चाललं असताना मला आमच्या शाळेतली 'मुंडवर्पा'ची भाषा आठवली. हिची उकल मला तेव्हा अजिबात समजली नव्हती आणि आता ती ऐकायला मिळत नाही :-(. अशा भाषांबद्दल मी आणखी दोघांकडे चौकशी केली तर दोघांनीही मला एक-एक नवी भाषा सांगितली. 'स्म'ची आणि 'टर'ची. यांबद्दलही मला नीटशी माहिती नाहीये. एकूणात अशा अनेक भाषा असण्याची शक्यता दिसते आहे. 'ऐसी..'करांना अशा अधिक भाषा माहीत असतील तर त्यांची नावं आणि त्या कशा वापराव्यात हे वाचायला फारच आवडेल.

मिहिर Mon, 22/07/2013 - 22:54

माझी आई, मावशा, आज्ज्या वगैरे 'पडे'ची भाषा बोलतात. चच्या भाषेसारखे चच्या ऐवजी प वापरून शब्दाच्या शेवटी डे जोडायचे.
उदा. पझेमाडे पवनाडे पहिरमिडे पहेआडे.

कला नावाच्या एका आज्जीला कली, कली अशा हाका मारत असताना कोणीतरी पलीकडे असे उत्तर दिल्यावर त्यांना ह्या भाषेची कल्पना सुचली असे सांगतात. :)

आम्ही काही भावंडे रफची भाषा बोलतो. पहिल्या अक्षरांनंतर रफ घालायचे आणि फला आधीच्या अक्षराचे काने-मात्रे द्यायचे. फार मोठा शब्द असेल तर अंदाजपंचे मध्येच आणखी रफ घालायचे. रचा उच्चार पायमोडका.
उदा. मारफाझे नारफाव मिरफिहिर आरफाहे. मरफला ररफची भारफाषा बोरफोलायला येरफेते.

चची किंवा पडेची भाषा मी पटापटा बोलू शकत नाही, विचार करण्यात मध्ये वेळ जातो. पण रफची भाषा आतून आपोआप येते असे वाटते. :)

सन्जोप राव Tue, 23/07/2013 - 08:38

In reply to by मिहिर

आम्ही काही भावंडे रफची भाषा बोलतो. पहिल्या अक्षरांनंतर रफ घालायचे आणि फला आधीच्या अक्षराचे काने-मात्रे द्यायचे. फार मोठा शब्द असेल तर अंदाजपंचे मध्येच आणखी रफ घालायचे. रचा उच्चार पायमोडका.
उदा. मारफाझे नारफाव मिरफिहिर आरफाहे. मरफला ररफची भारफाषा बोरफोलायला येरफेते.
चची किंवा पडेची भाषा मी पटापटा बोलू शकत नाही, विचार करण्यात मध्ये वेळ जातो. पण रफची भाषा आतून आपोआप येते असे वाटते.

हेच म्हणतो.

अमुक Mon, 22/07/2013 - 23:08

कधीपासून या विषयावर एक धागा काढायचा होता. तुम्ही ते काम करून टाकलेत !
०. 'पडे' भन्नाट आहे !
१. तुमची 'रफ'ची भाषा मला 'ट्टर्फ'ची भाषा म्हणून माहीत आहे.
उदा: माट्टर्फाझे नाट्टर्फाव अट्टर्फमुक आट्टरफाहे.
२. इंग्रजीत पिग्-लॅटीन हा प्रकार आहे. त्यात सांकेतिकीकरण सोपे असले तरी ऐकणार्‍याला उकल तेवढी सोपी नाही असे वाटते. फार न वापरल्याने कल्पना नाही.

'न'वी बाजू Tue, 23/07/2013 - 08:51

In reply to by अमुक

मराठीकरिताची 'च'ची भाषा आणि इंग्रजीकरिताची पिग लॅटिन यांच्यातील प्रचंड साधर्म्य लक्षात घेता, 'च'च्या भाषेचे पुनर्नामकरण 'डुक्करसंस्कृत' असे करण्यात यावे, या आमच्या (जुन्याच) मागणीचा पुनरुच्चार या निमित्ताने येथे करू इच्छितो.

बाकी चालू द्या.

बॅटमॅन Sat, 27/07/2013 - 16:18

In reply to by 'न'वी बाजू

नावच ठेवायचे असेल तर वराहसंस्कृत किंवा सूकरवाणी हे जास्त योग्य वाटेल. परंतु त्यासाठी

इंग्रजी: पिग
संस्कृतः ?

हे त्रैराशिक सोडवावयास लागेल इतकेच सुचवू इच्छितो.

मिहिर Sat, 27/07/2013 - 16:51

In reply to by बॅटमॅन

त्रैराशिक मांडायला चुकलेय. डुकराला लॅटिनमध्ये काय म्हणतात याचा विचार केलेला नाही, तस्मात् संस्कृत शब्दच वापरण्याची गरज नाही.
त्रैराशिक इंग्रजी: पिग ::मराठी:? असे हवे.

'न'वी बाजू Sun, 28/07/2013 - 08:12

In reply to by मिहिर

(माझे) टंकनश्रम वाचविल्याबद्दल आभारी आहे.

राजेश घासकडवी Tue, 23/07/2013 - 02:05

मी अप्म ची भाषा ऐकली आहे. म्हणजे पहिल्या अक्षरानंतर अप्म म्हणायचं. मप्मला काप्माही कप्मळत नाप्माही.

दोन भाषांचं कॉंबनेशन कधी ऐकलेलं नाही, पण करता येईल. म्हणजे वरच वाक्य चप्मलाम चप्माहीका चप्मळतक चप्महीना. अर्थात ही च च्या भाषेची सुधारित आवृत्ती आहे - च ऐवजी चप्म इतकंच.

बॅटमॅन Tue, 23/07/2013 - 11:45

In reply to by मेघना भुस्कुटे

मण्टला ही भाण्टषा माण्टहिण्टती आण्टहे!!! च, रफ अन ण्ट या तीन भाषा माहिती आहेत. वरती मिहिरने म्हटल्याप्रमाणे रफ प्रमाणेच ण्ट सुद्धा आतून येणे सोपेय तसे.

राधिका Fri, 26/07/2013 - 22:34

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन आणि मेघना या दोघांनी दिलेल्या 'ण्ट'च्या भाषा या कोणत्यातरी एका प्रोटो-निओ-ण्ट-भाषेच्या आजच्या काळातील दोन वेगवेगळ्या बोलीभाषा वाटत आहेत. :ड दोघांनी 'ही' या शब्दाचे 'भाषांतर' वेगवेगळे केले आहे.

सोकाजीरावत्रिलोकेकर Fri, 26/07/2013 - 10:41

मुळात ह्या भाषा आहेत का?

Cryptography (गुढीकरण (?) किंवा कूटीकरण (?)) मधले substitution cipher ह्या अल्गोरिदम चे अतिशय सोपे व्हर्जन असावे असे वाटते. त्यामुळे ह्या भाषा नसाव्यात.

- (Cryptographer) सोकाजी

मिहिर Fri, 26/07/2013 - 11:08

In reply to by सोकाजीरावत्रिलोकेकर

Cryptography (गुढीकरण (?) किंवा कूटीकरण (?)) मधले substitution cipher ह्या अल्गोरिदम चे अतिशय सोपे व्हर्जन असावे असे वाटते. त्यामुळे ह्या भाषा नसाव्यात.

ह्यातले पहिले वाक्य दुसऱ्या वाक्याचे कारण कसे होऊ शकते ते कळले नाही. कूटीकृत असल्या तरी त्या संभाषणाचे, संदेशवहनाचे काम करतात, तसेच चॉम्स्कीच्या व्याख्येप्रमाणे सांत शब्दसंख्या असूनही अनंत वाक्ये निर्माण करू शकतात. त्यामुळे त्यांना भाषा म्हणायला हरकत नाही असे वाटते.

सोकाजीरावत्रिलोकेकर Fri, 26/07/2013 - 14:40

In reply to by मिहिर

त्या रचना ह्या संभाषणाचे, संदेशवहनाचे काम करत असल्या तरीही त्यांना भाषा म्हणजे पटत नाहीयेय कारण भाषाचे आकृतीबंध (Structure), व्याकरण (Grammar), शब्दार्थ, शब्द-संरचना, वाक्यरचना-क्रम मुलभूत घटक असतात. तसे ह्या कूटीकृत रचनांचे नसते. तो प्रकार हा मूळ भाषेतला कूटीकृत पेलोड (Payload) असतो.

- (निसर्गाकडून कूटीकृत होऊन आलेला) सोकाजी

राधिका Fri, 26/07/2013 - 22:32

In reply to by सोकाजीरावत्रिलोकेकर

माझ्यापुरते बोलायचे झाले, तर मी इथे 'भाषा' हा शब्द तांत्रिकदृष्ट्या वापरलेला नाही. मराठीत या प्रकाराला उद्देशून जो शब्द वापरला जातो, तो वापरला. यावरून मराठी भाषिकांत असलेली भाषेबद्दलची संकल्पना काय असावी याचा विचार करणे रोचक ठरावे.

राधिका