रूढी, परंपरा आणि कांदे

मी स्वत:ला रूढीप्रिय किंवा परंपरावादी कधीच समजणार नाही. लहान वयात मी आचरणात काय आणत होतो ते मला आता सांगणे कठीण आहे, परंतु स्वतंत्र विचार करण्याची क्षमता प्राप्त झाल्यानंतर म्हणजे गेली काही दशके तरी मी स्वत:ला पूर्णपणे अपरंपरावादी समजत आलेलो आहे. मी नास्तिक जरी नसलो तरी मूर्तीपूजनाशी माझी तशी जवळीक कधीच होऊ शकली नाही आणि त्याच्याबरोबर येणारे उपचार आणि कर्मकांडे यांचा तर मला मनस्वी तिटकारा आहे. पण माझ्या आवडीनिवडी आणि स्वभाव याबद्दलचे हे भारूड मी आज का लावले आहे, याला आज सकाळी मी आणि माझी पत्नी यांच्यात झालेला एक छोटासा संवाद कारणीभूत आहे.

आज सकाळी वृत्तपत्रांचे वाचन करताना एका बातमीने माझे लक्ष वेधून घेतले होते. कांद्यांचा एका किलोचा किरकोळ विक्रीचा भाव 100 रुपयापर्यंत पोचला असल्याचे ते वृत्त होते. ते वाचल्यावर मी पत्नीला सहज सांगितले:
"आपण कांद्यांचा वापर जरा कमीच केला पाहिजे. नाहीतरी चातुर्मासात कांदे लसूण खाऊ नये असेच सांगतात."
हे सांगितल्यावर माझा मीच जरा चमकलो. स्वत:ला अपरंपरावादी समजणारा मी, खुशाल एका रूढीची भलावण करत होतो. पण मग माझ्या डोक्यामधे, चातुर्मासात कांदा, लसूण न खाण्याचा तोच तो विषय घोळत राहिला.

आपण प्राथमिक शाळेच्या भूगोलात शिकत असतो की जगाच्या इतर भागांत जसे उन्हाळा आणि हिवाळा हे दोनच ऋतू येतात तसे भारतीय उपखंडात येत नाहीत. आपल्याकडे 2 च्या ऐवजी 3 ऋतू येतात. उन्हाळ्याची परमावधी होते त्या जून महिन्यापासून ते थंडीची चाहूल लागण्याच्या काळापर्यंत, पावसाळा हा आणखी एक अंगतुक ऋतू भारतवर्षात उपटतो. आता भारतीय पंचांगाप्रमाणे या पावसाळा ऋतूमधे मोजली जाणारी 9 नक्षत्रे ही भारतीयांच्या पोटात पडणार्‍या अन्नधान्य उत्पादनाच्या साठी सर्वात महत्त्वाची असतात हा भाग वेगळा. पावसाळा ऋतूमध्ये, संपूर्ण भारतीय उपखंडाच्या कानाकोपर्‍यात सारखेच हवामान असते असे काही नाही. थोड्याफार प्रमाणात कमी जास्त होतेच. पण पश्चिम महाराष्ट्रात किंवा निदान सह्याद्रीच्या कुशीत असणार्‍या पुण्यासारख्या शहरात तरी हा पावसाळ्याचा ऋतू म्हणजे, सतत झाकोळलेले आकाश, सूर्यदर्शन नाही, मधून मधून येणार्‍या पावसाच्या सरी आणि एकंदरीतच कुंद व मंद वातावरण, हेच चित्र दिसते. कदाचित याच कारणांमुळे या ऋतूमध्ये अलर्जी व त्याच्या अनुषंगाने येणारे सर्दी खोकला किंवा फ्ल्यू यासारख्या विकारांचा मोठा प्रादुर्भाव झालेला लक्षात येतो.

या पावसाळ्याच्या काळात येणार्‍या चार महिन्यांना चातुर्मास असे म्हणण्याची प्रथा आहे. माझी आजी मला नेहमी सांगत असे की या दिवसात पचनशक्ती कमी होते, तसेच आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते, आजार बळावतात म्हणून या काळात आहारविहारावर जास्त नियंत्रण हवे, कांदा लसणीसारखे वातूळ पदार्थ खाऊ नयेत. पण मोठे झाल्यावर आणि जरा विचार केल्यावर माझ्या लक्षात हे आले होते की या आजीच्या सांगण्यात काही फारसा दम नाही. या पावसाळ्याच्या दिवसातच एकादशीला बटाटा, साबुदाणा यापासून बनवलेल्या आणि तळलेल्या पदार्थांवर आपण ताव मारत असतो आणि ते काय कमी वातूळ असतात का? या महिन्यात मटार भरपूर येतो आणि त्याची उसळ नेहमी होतेच. या उसळीला वातूळ नाही असे कोण म्हणेल? मग कांदा लसणीवरच राग का? या विचारामुळेच या कांदा लसूण न खाण्याच्या प्रथेला काही शास्त्रीय कारण देता येईल असे मला आतापर्यंत तरी कधी वाटले नाही. पण तरीही ही प्रथा का रूढ झाली असावी असा प्रश्न मला नेहमी पडत असे.

भारतात किंवा निदान महाराष्ट्रात तरी, कांद्याचे पीक घेणारे शेतकरी वर्षात दोन वेळा कांद्याचे पीक घेतात. यापैकी उन्हाळी पीक म्हणजे मार्च एप्रिल मधे तयार होणारे पीक 6 किंवा 8 महिने म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत सहज टिकते. वर्षातले दुसरे किंवा पावसाळी पीक हे या सुमारास बाजारात येते. मात्र हे पीक काही आठ्वडेच टिकू शकते. त्यामुळे ज्या ज्या वर्षी पाऊस दगा देतो त्या त्या वर्षी आधीच्या उन्हाळी पिकात घेतलेले व नंतर बाजारात आलेले कांदे, ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत संपत आले की बाजारात मालाची चणचण भासू लागते व भाव भराभर वाढू लागतात.

मागच्या वर्षी किंवा 2012 मध्ये भारतातील बहुतेक ठिकाणी, पाऊस अतिशय अनियमित आणि कमी प्रमाणात पडला. त्यामुळे अर्थातच पावसाळी कांद्याचे पीक कमी प्रमाणात आले व परिणामी बाजारात आधी आलेले उन्हाळी कांदे संपत आल्यावर आणि त्याजागी येणारे पावसाळी पीक कमी प्रमाणात आल्याने, ऑक्टोबर नोव्हेंबर 2012 मध्ये कांद्याचे भाव वाढू लागले. नाशिक जिल्ह्यामधील लासलगाव येथे असलेल्या, देशामधील सर्वात मोठ्या घाऊक कांदा बाजारात कांद्याचे भाव 10000 रुपये प्रती मेट्रिक टन या भावापासून 23000 रुपये प्रती मेट्रिक टन एवढे पुढच्या 2 किंवा 3 महिन्यात वाढले. विक्रीच्या साखळीतील प्रत्येक पायरीवर असलेल्या व्यापार्‍यांचा नफा यात मिळत गेल्याने, किरकोळ बाजारात ग्राहकाला मिळणारे कांद्याचे भाव शेवटी प्रचंड प्रमाणात कडाडले. उन्हाळी पीक बाजारात आल्यावर 2013च्या सुरवातीला कांद्याचे भाव शेवटी पूर्वस्थितीवर आले. परंतु बाजारात मुळातच कांदा कमी असल्याने मागच्या वर्षीच्या तुटवड्याचा प्रभाव या वर्षी लवकर म्हणजे ऑगस्टमध्येच जाणवू लागला व त्याचे पर्यावसान किरकोळ बाजारात कांद्याला किलोला 80 रुपये एवढा चढा भाव मिळण्यात झाले.

या वर्षी बाजारात असलेला कांद्याचा तुटवडा क्षणभर बाजूला ठेऊन आपण थोड्या मोठ्या कालखंडातील कांद्यांच्या भावाचा विचार केला तरी आपल्याला एक नियमित स्वरूपाचा पॅटर्न दिसू शकेल. महाराष्ट्रातील कांद्याचे पीक बहुधा पावसावर अवलंबून असल्याने अगदी काही शतकांचा कालखंड जरी विचारात घेतला तरी हा पॅटर्न बहुदा बदलणार नाही. ज्या ज्या वर्षी पावसाने ओढ दिलेली असेल त्या त्या वर्षीच्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये, आणि त्याच्या पुढच्या वर्षीच्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये बाजारात येणारा कांदा हा कमी प्रमाणातच आलेला असणार आहे. पूर्वीच्या काळी तर कांद्याची बाजारपेठ आणि घाऊक विक्री केंद्रे यापासून पिकलेला कांदा दूरपर्यंत पोचवण्यासाठी येणार्‍या अडचणी, या व्यापारावर असलेली अडते आणि घाऊक व्यापार्‍यांची मगरमिठी या गोष्टी लक्षात घेतल्या तर कांद्याची एकूण बाजारपेठ अतिशय मर्यादित आणि स्थानिक स्वरूपाची असल्याने, शेतकरी पीकही मर्यादितच घेत असणार हे लक्षात येऊ शकते. त्यामुळे अशा स्थितीत कांद्याचे येणारे पीकही संपूर्णपणे पावसावरच अवलंबून असणार हे उघड आहे.

आपल्याकडे एक म्हण आहे की गरिबाचे अन्न म्हणजे कांदा-भाकर. आता ही अशी म्हण, कांदा वर्षभर स्वस्त दरात उपलब्ध असल्याशिवाय काही समाजात प्रचलित होणार नाही. म्हणजेच या आधीच्या कालात, कांद्याचे पीक आता सारखेच पावसावर सर्वस्वी अवलंबून असूनही, गरिबांना, कांदा त्यांना परवडेल, या दरात उपलब्ध होत असला पाहिजे. सध्या शक्य नसलेली ही गोष्ट पूर्वी कशी शक्य होत होती? थोडा विचार केल्यावर माझ्या हे लक्षात आले की पूर्वी हे शक्य होत होते याच्या मागे चातुर्मासात कांदा व लसूण सेवन न करण्याची परंपराच कारणीभूत असली पाहिजे. या चार महिन्यात कांद्याला जर बाजारात उठावच नसला तर माल कमी असूनही भाव वाढणारच नाहीत आणि गोरगरिबांचा हक्काचा कांदा त्यांना परवडेल अशा किमतीत सर्व काळ मिळत असणार. परंपरा झिंदाबाद! नाही का?

परंतु आता या असल्या चातुर्मासासारख्या परंपरा कोण पाळणार? असेच बहुधा सर्वजण म्हणतील. मग काय करायचे? कांद्याच्या महागाईला तोंड कसे द्यायचे? याला माझे उत्तर आहे की पावसाने ओढ दिली आहे हे एखाद्या वर्षी लक्षात आले की त्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये आणि त्याच्या पुढच्या वर्षीच्या जून महिन्यामध्ये 3 ते 4 महिने पुरेल एवढा कांदा खरेदी तरी करायचा किंवा हे शक्य नसेल तर चातुर्मास पाळायचा! बघा तुम्हाला काय जमते ते!

30 ऑगस्ट 2013

field_vote: 
2.666665
Your rating: None Average: 2.7 (3 votes)

प्रतिक्रिया

अवो, कोनती जागा, कोनती येळ आणि तुमी काय मनून रायले? नीट चिलकत बिलकत घालून आले ना? मसाजच करून घ्यायचा होता तर तसं विचारायचं, एखादं पुस्तक बिस्तक सुचवता आलं असतं. डायरेक्ट झोडूनच घ्यायची इच्छा का मनं झाली तुमाला? :~ कर्फ्यू अजून चालू आहे, रस्त्यावर अजूनही पोलिस आहेत. 'प्र' शब्द 'परं' शब्द काढू नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

रोचक थियरी. साधारण मला समजलेला मतितार्थ असा 'कांद्याचं पीक पावसाच्या लहरीनुसार दरवर्षी कमी जास्त होतं. त्यामुळे बऱ्याच वर्षी चणचण निर्माण होते. ही चणचण कमी करण्यासाठी चातुर्मासात कांदे कमी खावे अशी रूढी तयार झाली, आणि फायदेशीर ठरत असल्यामुळे टिकली'. आपण कोल्ह्याला द्राक्षं आंबट असं म्हणतो तसं काही प्रमाणात चातुर्मासात कांदे वातुळ असं म्हणता येईल. हे हिणवण्याच्या दृष्टीने म्हटलेलं नसून खरोखरच ज्या गोष्टी मिळत नाहीत, त्या चांगल्याच नाहीत ही समजूत करून घेणं एवढं साम्य फक्त आहे.

हे तत्त्वतः शक्य आहे. अनेक परंपरा का पडल्या याची काहीतरी ओढूनताणून कारणं दिली जातात. त्यापेक्षा सरळसरळ आर्थिक कारण केव्हाही पटतं. कदाचित ती रूढी पडण्यामागे ते कारण नसलं तरी टिकून रहाण्यामागच्या कारणांपैकी निश्चितच असणार. "आपण कांद्यांचा वापर जरा कमीच केला पाहिजे. नाहीतरी चातुर्मासात कांदे लसूण खाऊ नये असेच सांगतात." या वाक्यातूनच महागाई आहे म्हणून टाळणं, आणि ते शिवाय परंपरेला धरून असणं या पूरक गोष्टींमुळे ही परंपरा टिकायला मदत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चातुर्मासात कांदा न खायची परंपरा आहे त्यामुळे तेव्हा कांदा स्वस्त असावा आणि त्यामुळे गरीबांच्या खाण्यामधे कांदा-भाकर स्वरूपात कांदा खायची प्रथा रूढ झाली असावी असा तर्क वरील धाग्यात मांडला आहे असे मला वाटते. (तसे नसल्यास कृपया सांगा.)

हा तर्क मांडण्याअगोदर सुचतील अशी गरीबांनी कांद्याचा वापर अधिक करण्यामागची काही कारणे मला जाणवतात. ती अशी.

केवळ चातुर्मासातच नाही तर एकूणातच कांद्याकडे - आणि लसणीकडेहि - पहाण्याची समाजातील बर्‍याच जणांची दृष्टि उपेक्षेची होती. माझ्या नात्यातील काही जुन्या वळणाच्या कुटुंबांमधून ३०-४० वर्षे पूर्वीपर्यंत कांदा स्वयंपाकात अजिबात नसे. मारवाडी आणि जैन समाजांच्या पुष्कळ कुटुंबांमधून आजहि कांदा वर्ज्य असतो.* ('जैन भेळ' ह्या प्रकाराचे नाव तुम्ही ऐकले असेलच.) कांदा आणि लसूण ह्या गोष्टींना उग्र वास असतो आणि 'सात्त्विक' आहारामधून सहज वगळले जावे अशी त्यांची प्रकृति असते. टोमॅटो, बीट ह्या गोष्टीहि ह्याच कारणासाठी वर्ज्य मानल्या जात. पुढील अन्योक्ति श्लोकात कांद्याबाबतची ही कुचेष्टेची दृष्टि सहज दिसते:

कर्पूरधूलीरचितालवाल: कस्तूरिकाकुङ्कुमलिप्तदेह:।
सुवर्णकुम्भै: परिषिच्यमाण: निजं गुणं मुञ्चति किं पलाण्डु:॥

(अर्थ - कापराच्या चूर्णाने अळे बनविले, त्यावर कस्तूरी शिंपडली. त्याला सोन्याच्या झारीने पाणी घातले म्हणून पलाण्डु (कांदा) आपला गुण सोडतो काय?)

कांद्याला मागणीच कमी असल्याने एकूणातच कांदा स्वस्त असणार. सध्याची नैमित्तिक कांदाटंचाई ही कांद्याला समाजाच्या सर्व थरात मागणी वाढल्याने आणि सुलभ वाहतुकीमुळे पूर्वी जेथे कांदा वापरण्याची अजिबात प्रथा नव्हती अशा ठिकाणीहि कांदा पोहोचू लागल्याने निर्माण होते. (शंभरच काय पन्नास वर्षापूर्वीपर्यंत कोकणासारख्या दारिद्र्यग्रस्त भागात कांदाच काय, कसलाच भाजीपाला मिळत नसे. आज तेथे ह्या गोष्टी कोपर्‍याकोपर्‍यावर मिळतात.)

आजची नैमित्तिक कांदाटंचाई ऐतिहासिक आहे असे मानण्याचे कारण नाही. १००-१५० वर्षांपूर्वी गोरगरिबांना मीठ परवडत नसल्याचा गोष्टी ऐकल्या आहेत पण कांद्याबाबत अशी काही मौखिक परंपरा नाही.

गरीब जनतेने कांदा आहारात पसंत का करावा ह्याबाबत एक जास्ती सरळ कारण सुचते. मीठ आणि तेलासारख्या - आजच्या विचाराने मूलभूत बाबी - दुर्मिळ असण्याच्या त्या काळात गरीबाला सहज वापरता येईल असे एकच तोंडीलावणे होते, ते म्हणजे कांदा. कांद्याला स्वत:ची मूळची चव असते. गरीबाला सहज मिळेल आणि स्वतःची चव आहे अशी ही एकच गोष्ट असावी. तो सरळ कच्चा खाता येतो, त्याला कसलाही मसाला, तेल, तिखट, मीठ लागत नाही. थोडक्यात म्हणजे तो गरीब-फ्रेंडली आहे इतके एकच कारण त्याच्या 'कांदाभाकर'मध्ये समाविष्ट होण्यास पुरेसे दिसते. चातुर्मास्यातील कांदाबंदीशी त्याचा बळेबळे संबंध लावून त्या प्रथेला टेकू देण्याचे काही कारण दिसत नाही.

(* अवान्तर - कलकत्त्यामध्ये 'बेंगाल रोइंग क्लब' नावाचा क्लब रवींद्र सरोवराच्या काठावर आहे. त्याला 'मारवाडी क्लब' असेहि गमतीचे नाव आहे. १९३०च्या दशकापासून हा क्लब तेथे आहे. ज्यूटच्या व्यापारावर श्रीमंत झालेला खूप मोठा मारवाडी समाज कलकत्त्यात पहिल्यापासून आहे, उदा. बिर्ला कुटुंब. क्लबचे सदस्यत्व ही प्रतिष्ठेची बाब मानण्याची प्रथा कलकत्त्यात ब्रिटिश काळापासून आहे आणि तेथील सर्व जुने क्लब ब्रिटिश आणि ब्रिटिश-धार्जिण्या प्रतिष्ठितांसाठीच चालत. तेथे मद्य, मांस अशा मारवाडी समाजाला अमान्य गोष्टी अर्थातच होत्या. ह्यावर उत्तर म्हणून तेथील श्रीमंत मारवाडी समाजाने आपला स्वतःचा क्लब 'बेंगाल रोइंग क्लब' ह्या नावाने सुरू केला. तसे पाहिल्यास मारवाडी समाज रोइंगसारख्या गोष्टींच्या मागे नसतो पण त्यांना हीच जागा क्लब काढायला मिळाली म्हणून क्लब येथे सुरू झाला असे मी ऐकले आहे. ह्या क्लबात प्रथमपासून कांदा-लसूण, मांसाहार ह्यावर बंदी होती आणि सुमारे २५ वर्षांपूर्वी एकदा मी तेथे गेलो होतो तेव्हापर्यंत तरी ती चालू होती.

मारवाडी-जैन समाजाला कांद्याचे किती वावडे आहे ह्याचे मजेदार उदाहरण म्हणून हे अवान्तर येथे टाकले आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक प्रतिसाद.

अवांतर - सुधारणावादी लोकं पु.ना.ओकांबद्दल जे बोलतात ते का बोलतात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चातुर्मासात कांदा न खायची परंपरा आहे त्यामुळे तेव्हा कांदा स्वस्त असावा आणि त्यामुळे गरीबांच्या खाण्यामधे कांदा-भाकर स्वरूपात कांदा खायची प्रथा रूढ झाली असावी असा तर्क वरील धाग्यात मांडला आहे असे मला वाटते.

आईशपथ!

म्हणजे, बामणे (चातुर्मासातसुद्धा) कांदे खाऊ लागल्यापासून कांदा महाग झाला, म्हणायचा की! Wink

साडेतीन टक्क्यांच्या क्रयशक्तीचा विजय असो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंटरेस्टिंग पोस्ट आहे.
हणजेच या आधीच्या कालात, कांद्याचे पीक आता सारखेच पावसावर सर्वस्वी अवलंबून असूनही, गरिबांना, कांदा त्यांना परवडेल, या दरात उपलब्ध होत असला पाहिजे. सध्या शक्य नसलेली ही गोष्ट पूर्वी कशी शक्य होत होती? >>>>

हे खालील पैकी एक दोन गोष्टींमुळे असावे का?
१. साधारण २५-३० वर्षांपूर्वीपर्यंत रेस्टॉरंट्स मधे खाणे फारसे नव्हते. गाड्यांवरचे खाणे ही सध्याच्या मानाने कमी होते. पावभाजी, पंजाबी, नॉन व्हेज हे कांदा मुबलक प्रमाणात असलेले पदार्थ बनवण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शहरातील कांद्याची एकूण गरज सध्यापेक्षा खूप कमी होती. शहरातील लोकसंख्या वाढलीच पण त्याच्या कितीतरी जास्त प्रमाणात कांद्याचा वापर वाढला. घरातील रोजच्या स्वयंपाकात पूर्वी कांदा कमी असावा (सर्वसाधारण मध्यमवर्गीय घरांत). तो ही वाढला.
२. कांद्याची सध्याची सप्लाय-चेन तेव्हा फारशी नसावी. जेथे पिकतो तेथे जवळपासच्या बाजारांतच तो विकला जात असेल, त्यामुळे स्वस्तही पडत असेल. किंवा तेव्हाचा बराचसा शेतकरी स्वतःचा कांदा खात असेल व एरव्ही दुसरे पर्याय वापरत असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुठल्याही गोष्टीचे भाव हे डिमांड सप्लाय या दोन गोष्टींवर अवलंबून असतात. एखाद्या गोष्टीचा सप्लाय कमी झाला तर भाव वाढतात ही गोष्ट खरी आहे पण डिमांड (विशेषत: जगण्यास अत्यावश्यक* नसलेल्या वस्तूंची) ही अ‍ॅब्सोल्युट नसते. तर ती बाजारातल्या भावावर अवलंबून असते.

कांद्याची डिमांडही अशीच भावानुरूप ठरते. तशी ती ठरत नसती तर कायमच कांदा १००-२००-१००० रु किलो भावाने विकला गेला असता. कांदा ५० रु किलो होतो कारण "उपलब्ध असलेला सर्व कांदा" ५० रु ने विकत घेणारे लोक अस्तित्वात आहेत.

५० रु ने कांदा घेऊ शकणार्‍यांची (आणि घेणारच अशी मानसिकता असलेल्यांची) एकूण मागणी उपलब्ध कांद्यापेक्षा कमी असेल तर काही कांदा पडून राहील आणि तो विकण्यासाठी नवे ग्राहक आकर्षित करण्यासाठी कांद्याचे दर विक्रेत्यांना कमी करावे लागतील.

समजा १००० रु किलोने कांदा विकत घ्यायची तयारी असलेल्या ग्राहकांची एकूण मागणी उपलब्ध कांद्यापेक्षा जास्त असेल तर कांद्याचा भाव १००० रु राहील आणि ज्यांना १००० रु परवडत नाहीत त्यांना कांदा खाणे सोडणे भाग पडेल.

*पाणी ही अशी अत्यावश्यक गरज आहे. समजा सर्व उपलब्ध पाणीसाठे भविष्यात लिलावाद्वारे विकले गेले तर सर्वांना पाणी विकत घ्यावे लागेल. ज्यांनी लिलावातून पाणी घेतले आहे ते ठरवतील त्या भावाने प्रत्येकाला पाणी विकत घ्यावे लागेल. ज्यांना ते परवडणार नाही त्यांना पाण्याशिवाय जगावे लागेल. जगणे शक्य झाले नाही तर मरून जावे लागेल. पाण्याची मागणी काहीशी स्थिर आहे ती किंमतीवर अवलंबून नाही. अर्थात हेही पूर्णतः खरे नाही. जितके लोक पाणी न परवडल्यामुळे मरून जातील. तितक्या प्रमाणात पाण्याची एकूण मागणी कमी होईल.

पॉइंट ईज - वाढीव भावाला कांदा परवडणारे (आणि घेण्याची तयारी असलेले लोक आहेत म्हणून कांदा महाग आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नितीन थत्त्यांशी सहमत.
डिमांड सप्लाय, लोकसंख्या, जीवनमान, रुपयाचे मुल्य असा अनेक कारणांनी वस्तुची किंमत बदलत असते. गरीब लोकांना स्वस्त कांदा मिळावा म्हणून आपण चातुर्मास पाळावा, इतका उदात्त विचार आपल्या देशांत घाऊकपणे होणे,शक्य वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१)पूर्वी घरोघरी पावसाळ्यासाठी कांदा साठवून ठेवण्याची पद्धत होती. चैत्र-वैशाखात सफेद कांद्याच्या माळा लादलेल्या बैलगाड्या गल्लोगल्ली दिसत. सफेद कांदा खराब होत नसे. लोक गाडीभर कांदा घेऊन हवेशीर जागी साठवून ठेवत.
२)पूर्वीच्या काळी श्रीमंतांची लोकसंख्येतील टक्केवारी किती असायला हवी होती: हे अशासाठी की किती टक्के लोकांनी कांदा वर्ज्य केला असता किती टक्के गरीबांना किती टक्के सवलतीने/वजावटीने कांदा मिळू शकत होता? श्रीमंतांची टक्केवारी अगदी किरकोळ असेल तर त्यांच्या कांदा न खाण्याने कांद्याच्या भावावर जाणवण्याइतपत प्रभाव पडत होता का, आणि टक्केवारीनुसार कितीतरी जास्त संख्येने असलेल्या गरीबांना दिलासा मिळत होता का? पूर्वीच्या काळी सध्यापेक्षा अधिक दारिद्र्य होते म्हणतात. तेव्हा श्रीमंत लोक त्या काळी विरळा होते असणार.
३) कांदा खाऊ नये/चातुर्मासात कांदा खाऊ नये हा नियम/प्रथा/परंपरा एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकांना लागू होता?
३)मारवाडी/जैन (आणि तत्सम) वर्गाचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण किती होते? चातुर्मास सोडून एरवी ते कांद्याचे मोठे ग्राहक होते काय की अचानक त्यांची खरेदी थांबली म्हणून कांद्याचा खप घसरावा आणि भाव पडून गरीबांना कांदे स्वस्तात मिळावे?
४) आजघडीला मारवाडी आणि जैनांतले बरेचसे लोक आठ महिने कांदा खातात. त्यातले काही बारा महिने खातात. मारवाड्यांपैकी क्षत्रिय लोक कांदे खातात.
५) उपाहारगृहे/भोजनालये आणि त्यात जाणारे लोक यांची संख्या मात्र नि:संशय वाढली आहे. याचा कदाचित कांद्याच्या मागणीवर परिणाम झाला असेल.
मी आकडेवारीत तज्ज्ञ नाही. एक सर्वसाधारण माणूस म्हणून काही गोष्टी मनात आल्या, इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0