अर्थ एक, अर्थछटा अनेक: शब्दसमूह नोंदींसाठी धागा
जवळ-जवळचे अर्थ असणारे अनेक शब्द आपण वापरत असतो. अर्थछटांमधला नेमका फरक नक्की करायला जावं, तर मात्र लोकांना विचारण्याखेरीज दुसरी मदत हाताशी नसते. माझ्या माहितीप्रमाणे असे जवळजवळचे अर्थ असणारे शब्द एकत्र देणारा आणि त्यांच्या अर्थछटांमधला फरक नोंदणारा कोश मराठीत नाही. (कुणाला ठाऊक असल्यास जरूर सांगा. मी आभारी असेन.) तो कोश निघायचा तेव्हा निघो, तोवर मला अशा अर्थछटांमधला फरक नक्की करण्याचं काम करणं आवडेल, कुणी करत असेल तर वाचायलाही आवडेल. तेवढ्याकरता हा धागा आहे.
इथे लिहिताना पाळायची पथ्यं:
१. शक्यतोवर शब्दाची जात (आणि जातीबरहुकूम लिंग, सामान्यरूप, अनेकवचन, अनियमित रूपं इत्यादी) नोंदावी.
२. आवश्यक आणि शक्य असेल तेव्हा हा शब्द कुठल्या भाषेतून आला, कुठल्या प्रदेशात वापरतात, त्या विशिष्ट अर्थछटेमागे काही कारण आहे का इत्यादी तपशील नोंदावेत.
३. सगळी माहिती सगळ्यांना असेलच असं नाही, लोक जमेल तसतशी भर घालतीलच. पण कृपया फक्त शब्दसमूह नोंदून सूंबाल्या करू नयेत, सोबत किमान आपण वापरत असलेल्या, आपल्याला अभिप्रेत असलेल्या अर्थछटा तरी लिहाव्यातच. नाहीतर धाग्याला काहीच अर्थ उरणार नाही.
मी सुरुवात करते. (सगळं बरोबर असेल असं नाही, काही मतभेद, अधिक माहिती नोंदवली तर बरंच.)
उष्णता (स्त्री. नाम, सा.रू. उष्णते, अ.व. -ता): पदार्थाचा मूलभूत उर्जानिदर्शक गुणधर्म. बोली आणि पारिभाषिक दोन्ही प्रकारे वापर होतो.
उष्मा (पु. नाम, सा.रू. उष्म्या-, अ.व. -ष्मे) / गरमा (पु. नाम, सा.रू. गरम्या-, अ.व. -मे): हवेतली उष्ण्ता वाढली, की त्याला उष्मा म्हणतात.
उकाडा (पु. नाम, सा.रू.उकाड्या-, अ.व.-डे): एक प्रकारचा उष्मा. वातावरणात आर्द्रता जास्त असली की 'उकाडा' हा शब्द वापरला जातो. (रतीब अशा अर्थानेही हा शब्द वापरला जातो.)
गरमी (स्त्री. नाम, सा.रू. गरमी-, अ.व. -म्या):एक प्रकारचा उष्मा. वातावरणात आर्द्रता कमी असल्यास त्या उष्म्याला गरमी असे म्हणतात. (एक प्रकारचा गुप्तरोग अशा अर्थीही हा शब्द वापरला जातो.)
तलखी (स्त्री. नाम, सा.रू. तलखी-, अ.व. -ख्या): हवेत गरमी असल्यावर जी अस्वस्थता अनुभवाला येते, तिला तलखी असे म्हणतात. जिवाची लाहीलाही होणे, सतत तहान लागणे, कोरड्या वातावरणातील उष्णतेने अस्वस्थ वाटणे म्हणजे तलखी.
पदार्थाचा मूलभूत उर्जानिदर्शक
पदार्थाचा मूलभूत उर्जानिदर्शक गुणधर्म. एखादा पदार्थ गरम, तप्त आहे म्हणजे त्यात उष्णता आहे.
अवांतर -
लातूरला गरमी हा शब्द खुमखुमी, माज आणि मस्ती यांच्या सौम्य स्वरुपांसाठी वापरला जातो.
काही लोक मादक स्त्रीला गरम आहे असे गमतीने म्हणतात.
शिवाय इंग्रजी शब्दांचे तशास तसे रुपांतर करणारे लोक तिखट/मसालेदार साठीही गरम शब्द वापरतात.
मेघना लाज वाटतेय ग असा प्रतिसाद द्यायला लोक काय म्हणतील बंडुला ?
लाज वाटणे- हा घाणेरडा प्रकार बघुन बंडुला स्वत:चीच लाज वाटली.
लाज काढणे- भर रस्त्यात अस विचारुन तात्यांनी बंड्या ची लाज च काढली.
लाजेने चुर चुर होणे- तिने हात धरताच बंडु लाजेने चुर चुर झाला.
लज्जास्पद- हे असे लज्जास्पद वर्तन बंडोपंत तुमच्यासारख्या ज्ञानी माणसाला शोभते का ?
लाजाळु च झाड- आमचा बंडु किनइ लाजाळु च झाड च आहे हो !
लाजलज्जा- अरे काय हे वागणं तुझ बंडु काही लाजलज्जा आहे की नाही तुला ?
लाज-लज्जा-शरम- अरे अरे बंड्या तुला काही लाज ?.... लज्जा ?...... शरम ?
लाज टाकली- ओ बंडु साहेब ! धंद्याला उभी राहीली ना तवाच म्या लाज टाकली.
निर्लज्ज व्हा- कधी कधी बंडु निर्लज्ज व्हाव लागत रे असाच लाजत राह्यलास तर कस व्हायच रे तुझ बंड्या ?
लाज येणे- वसंतसेनेचे ते शब्द आठवताच बंडु ला लाज आली.
सल्लज मुद्रा- बंडु सल्लज मुद्रेने वसंतसेने कडे बघत होता.
लाजेने चेहरा लालबुंद होणे- आणि बंडु चा चेहरा वसंतसेने च्या कामुक कटाक्षाने लालबुंद झाला.
लाजरा - असा लाजरा न साजरा मुखडा चंद्रावाणी ग.
लाजिरी- लाज लाजिरी गोड गोजिरी ताई तु होणार नवरी.
निलाजरा= बंडु मेला निलाजरा च आहे.
लाज बाळगणे- अरे बंड्या आपण कोण ? वसंतसेना कोण ? जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळग.
लाज राखणे- आणि वसंतसेने ला नकार देउन बंडु ने घराण्याची लाज राखली.
लाज रखो - वसंतसेना अब हमारे खानदानकी लाज आपके ही हाथ मे है.
लोक-लाज- आणि वसंतसेने ने लोकलाजेस्तव अखेर बंडु शी च विवाह करण्याचा निर्णय घेतला.
रॉजेट
http://kammasubbarao.files.wordpress.com/2010/12/roget-thesaurus.pdf
मेघनाजी, वरील ठीकाणी भाषेतील सारे शब्द ५-६ मोठ्या गटांत आणि १००० उपगटांत फार सुसुत्रपणे आणि संकल्पनांचे वर्गीकरण करून मांडले आहेत. पैकी प्रत्येक शब्दाचा मराठी समानार्थी शब्द रोज घेतला तर या उपक्रमाला एक पद्धत लाभेल.
अहोजाहो नाही केलंत तर बरं
अहोजाहो नाही केलंत तर बरं होईल.
या दुव्याकरता आभार. पण याचा आधार घेतला, तर मग तिथल्या संकल्पनांचं सरळ भाषांतर सुरू होईल, जे मला व्हायला नको आहे. शिवाय यातली उत्स्फूर्तता हरवेल. (अवांतरः इतक्या शिस्तबद्धतेनं काम करायला मला जमलं असतं, तर मी सरळ कोशाचंच काम करायला घेतलं असतं, इथे धागे कशाला काढले असते!) अर्थात, जर हा धागा चालला आणि त्यात म्हणण्यासारखी माहिती गोळा झाली, तर तिचं वर्गीकरण आणि मांडणी करायला त्या दुव्याचा आधार घेणं जरूर सोईचं आहे.
निर्णय पुं. ना. निर्णया
निर्णय पुं. ना. निर्णया :सर्व बाजू-मतमतांतरे तपासून अधिकारी व्यक्तीने त्यातले बरे-वाईट, खरे-खोटे, तरतम ठरवणे, निवाडा. डिसिजन. उदा. धर्मनिर्णय, कालनिर्णय. कठोर निर्णय घावा लागला इ.
निकाल पुं, ना. निकाला : अंतिम तात्पर्य, सोक्षमोक्ष, न्यायनिवाडा (अॅज़ इन निकालपत्र)
परिणाम पुं. ना. परिणामा : प्रभाव, आधी घडलेल्या घटनांचे दृश्य फल. रिज़ल्ट उदा. परिणामी, परिणामस्वरूप, इंग्रही शाळेत घातल्याचा परिणाम असा होतो की, हा सगळा बॉलिवूडचा परिणाम.
हिंदीत आणखी आहेत. असर, अंजाम, नतीजा.
मिळणे
१. टू गेट- मला पाच रुपये मिळाले.
२. टू अर्न- या कामाचे मला पाच रुपये मिळतात.
३. टु मिट- मला ती रस्त्यात मिळाली आणि आम्ही खूप गप्पा मारल्या.
४. टु कम टुगेदर ऑर टु ड्रेन इन- नदी सागराला मिळाली.
५. टु अॅड- दोनात पाच मिळाले की सात होतात.
यालाच परस्मैपदी करा की एक व अॅड होता.
मग मिळवा, मिळवली, मिळवणे अशा आण्खी अर्थच्छटा होतील.
जु़बाँ / जबान
दुसर्या धाग्यातील प्रतिसाद जशास तसा देत आहे.
ह्या धाग्याशी अगदिच सुसंगत नाही, तसच फार्तच विसंगतही वाटला नाही.
http://www.aisiakshare.com/node/2304
.
.
उर्दू जबान्/जुबान हा शब्द जीभ म्हणून वापरतात. " जुबान खींच लेम्गे तेरी" ह्या वाक्यात आहे तशी.
किंवा "भाषा" ह्या अर्थानेही वापरतात.
"गोरे लोग पता नही किस जुबान से बात कर रहे थे" ह्या वाक्यासारख.
किंवा "तोंड" ह्या अर्थानेही वापरतात.
"किस जबान से जाउ मालिक के पास हारने के बाद" ह्या वाक्यासारखं.
.
.
travel,journey,tour जवलच्या अर्थच्छटा असणारे शब्द.
पण "हॅपी जर्नी" ह्या वाक्यात टूर किम्वा ट्रॅवल वापरता येत नाही.
.
टूरिस्ट आणि ट्रॅवलर ह्यातही फरक आहेच. प्रवास दोघेही करतात, पण एकाचा सुख सोयी युक्त असतो.
.
.
राग व संताप समानार्थी शब्द नसावेत.
संताप हा तीर्व राग असण्याच्या स्थितीबद्दलचा शब्द होय.
( "माझा संताप होतोय" = "मला प्रचंड राग आलाय")
आभार व धन्यवाद
आभार व धन्यवाद यात नक्की फरक काय?
आभार कधी मानतात?
जसे आभार 'मानले' जातात तसे धन्यवाद काय? म्हटले जाते? दिले जातात?
थँक्यु व्हेरी मच चे अनेकानेक आभार/धन्यवाद, खूप खूप आभार आदी रुपांतरे योग्य का अयोग्य?
मोल्सवर्थमध्ये धन्यवाद हा शब्दच मिळाला नाही.
===========
माझे मतः
आभार मानतात/व्यक्त केले जातात. तर धन्यवाद हा शब्द स्वतंत्र वापरला जातो.
केवळ थेट समोरच्याशी प्रत्यक्ष बोलताना / दोन व्यक्तींमधील समोरासमोरील संवादलेखनात "धन्यवाद!" हे इतर कोणत्याही जोड क्रियापदाशिवाय म्हणणे योग्य.
अन्यथा इतर विव्ध वाक्यांमध्ये "आभार" हा शब्द व त्याची रुपे वापरावीत.
आता हे चुक का बरोबर?
देतात
धन्यवाद देतात.
आभार मानतात, प्रदर्षित करतात.
संभाषणात नुसतेच 'धन्यवाद' म्हणायचे. किंवा 'आभारी आहे' म्हणायचे.
इंग्रजीत जसे आपण 'आय थँक यू'
न म्हणता 'थँक यू' म्हणतो.
हिंदीतही 'धन्यवाद देना' असेच म्हणतात.
आजकाल काहिही मागतात - देतात ते सोडा.
'आम्ही आभार मागतो' असेही आशीर्वाद मागितल्यासारखे मागितलेले पाहिलेत.
यावरून आशीर्वाद सारखाच धन्यवाद शब्द हे आठवलं.
आशीर्वाद म्हणजे आशीर्वचन- आशीष देणारे शब्द
तसेच धन्यवाद म्हणजे 'धन्य' वचन देणारे शब्द.
आभार आणि धन्यवाद
मला वाटते की आभार आणि धन्यवाद हे दोन्ही शब्द गेल्या दीडदोनशे वर्षांच्या मराठी भाषेच्या आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांमधून कोणीतरी निर्माण केले आहेत.
आपल्यासाठी कोणी काही चांगले केले तर त्याचे शब्दांनी आभार मानायचे ही प्रथा इंग्रजांच्या अनुकरणाने आपण शिकलो असू. आपल्या संपूर्ण संस्कृत आणि जुन्या मराठी लिखाणात ह्या अर्थांनी हे शब्द कोठेच भेटत नाहीत. संस्कृतमध्ये अनुगृहीतोऽस्मि उपकृतोऽस्मि असे शब्द वाचल्याचे स्मरते पण आभार आणि धन्यवाद कोठेच नाही.
आपटे संस्कृत-इंग्लिश कोशामध्ये आभार असा शब्द नाही. आभृ - to bear, support असे क्रियापद दिले आहे. तसेच धन्य - bestowing or confering wealth असा अर्थ दाखवला आहे. स्वनामधन्य, धन्यास्तदङ्गरजसा मलिनीभवन्ति (शाकुन्तल ७.१७)असे त्याचे वापरहि आपण जाणतो पण धन्यवाद कोठेच भेटत नाही
मोल्सवर्थमध्ये आभार - the weight or burden of a favour received, आभारभरित (a modern phrase) - filled with a sense of obligation, आभारी - obliged असे दाखविले आहे. धन्य साठी blessed, happy आणि उद्गारवाचक bravo! well-done! असे अर्थ आहेत पण आधुनिक शब्द धन्यवाद कोठेच नाही.
हे शब्दच नवे असल्याने त्यांचा अर्थ आणि वापर कसा करावयाचा हे चालू वापरातूनच ठरेल.
एक शंका: अर्थछटा म्हणजे
एक शंका: अर्थछटा म्हणजे शब्दचित्र - त्या शब्दाचं वापरकर्त्याने मनाशी बाळगलेलं चित्र. प्रत्येकाचं शब्दचित्र एकसारखं कसं असेल?
उदा. शोधणे, हुडकणे, धुंडाळणे, चापसणे.
धुंडाळण्याचं माझ्या डोळ्यांसमोरचं शब्दचित्र म्हणजे कुणीतरी गृहिणी स्वयंपाकघरात एकापाठोपाठ एक डबे उघडून काहीतरी शोधत आहे. चापसण्याचं शब्दचित्र म्हणजे विमानतळावर होतं तसं frisking. बाकी सर्वांसाठी मी "शोधणे" वापरतो. माझ्या एका मित्राचं बालपण सातारा जिल्ह्यातल्या एका गावात गेलं. तो सगळ्या गोष्टी "हुडकतो". धुंडाळण्या आणि चापसण्याबद्दल आमच्यात एकमत आहे.
शोधणे: हरवलेल्या/विसरलेल्या
शोधणे: हरवलेल्या/विसरलेल्या वस्तुंचा ठावठिकाणा माहिती करणे. यात वस्तु कोणती आहे हे ही माहिती असते, त्याचा वापरही थोड्या काळापूर्वी झाला असतो. हे सामान्यतः अधिक वेळा वापरले जाणारे क्रियापद आहे.
हुडकणे: इथेही अनेकदा वस्तु(ऑबजेक्ट) हरवलेली/विसरलेली असते. पण शोधणे पेक्षा त्या ऑब्जेक्टचा वापर करून इथे 'शोधणे' पेक्षा अधिक काळ गेला असतो व ती वस्तु कुठे मिळू शकेल याचा अंदाज 'शोधणे' पेक्षा कमी असतो. कोणालाही माहिती नसलेल्या वस्तुंचा घेतलेल्या शोधालाही 'हुडकणे' वापरले जाते.
धुंडाळणे: सदर क्रियापद पडताळणी करण्यासाठीही वापरले जाते. इथे ती वस्तु कुठे असेल याचा अंदाज इतर कोणतेही क्रियापद वापरण्यापेक्षा अधिक असतो. ठराविक भागात बर्यापैकी काळ व्यतीत करून वस्तु 'धुंडाळली' जाते.
चापसणे: अधिक खोलवर शोधकार्य न करता वरवर शोधणे.
अर्थ लिहिणं जरा अवघडच आहे. ते
अर्थ लिहिणं जरा अवघडच आहे. ते जमणार नाही, तेव्हा मी वाक्यात उपयोग करण्याचा खुश्कीचा मार्ग स्वीकारून पळ काढणारेय.
मजा करणे - आनंददायी कृती करून स्वतःचे लाड करणे. लोक 'मजा करतात', तेव्हा स्वतःच्या आनंदाबद्दल बोलत असतात. इतरांच्या नव्हे. उदा. जत्रेत आम्ही खूपच मजा केली; तमाशा पाहिला, रेवड्या खाल्ल्या, मित्रांनाही भेटलो.
मजा मारणे - आनंददायी कृती करून स्वतःचे लाड करणे. मात्र 'मजा मारणे' हा 'मजा करण्या'पेक्षा नकारात्मक आहे. दुसर्या कुणाच्यातरी पैशावर डल्ला मारून किंवा जे करायला नको ते करून आनंद ओरबाडून घेणे, असा काहीसा अर्थ 'मजा मारणे'ला आहे. उदा. बायकोच्या माहेरच्या पैशांवर त्यानं आयुष्यभर मजा मारली.
मजा येणे - स्वतः फारसं काही न करता, एखाद्या घटनेतून आनंद मिळणे. माणसाला 'मजा येते' तेव्हा तो सहसा कृतिशील नसतो, तरीही त्याला बहुधा अनपेक्षितपणे आनंद मात्र मिळतो. उदा. परवा संध्याकाळी आपण भेटलो तेव्हा मजा आली, नाही? खरं तर सिनेमा पकाऊच होता. पण तरी मजा आलीच!
मजा होणे १ - तसं प्रयोजन नसतानाही एखादा गंमतीशीर प्रसंग घडणे. उदा. तुमचा कुत्रा मला चाटू लागला, तेव्हा एकदम मजाच झाली! मला वाटलं होतं, मला भीती वाटेल. पण मी अगदी सहज त्याच्या मानेवर हात फिरवला, द्या टाळी!
मजा होणे २ - अनपेक्षितपणे लाभ मिळणे. उदा. आजी पंधरवड्यासाठी राहायला आल्यामुळे बेबीची एकदम मजाच झाली, शाळेला बुट्टी, रोज नवा खाऊ आणि झोपताना मोठ्ठी गोष्ट.
मजा असणे - दुसर्या व्यक्तीला आनंददायी गोष्टी / लाभ उपलब्ध असणे. यात थोडा असूयेचा भाग आहे, विशेषतः 'ज'ला अजून एक 'ज' जोडल्यावर. उदा. तुम्हां आयटीवाल्यांची काय बॉ मज्जा आहे, दर शनिवारी सुट्टी!
स्त्रीलिंगी 'मजा' न वापरता पुल्लिंगी 'मजा' घेतला की अर्थ बदलतात. मजेच्या जागी 'गंमत' घातला की अजूनच नवनवीन शक्यता मिळतात. घालून पाहा.
शिकवणे (सर्वसमावेशक
शिकवणे (सर्वसमावेशक क्रियापद)
अर्थछटा:
- संथा देणे: काही कौशल्याची गोष्ट शिकवणे
- ढोस पाजणे / ज्ञान पाजणे: वर्तन सुधारावे म्हणून सल्ले देणे
अवांतरः एखाद्याचे "अप्रायजल घेणे" याला कॉर्पोरेट मराठीत निराळीच अर्थछटा आहे :) अप्रायजल घेण्याचा अतिरेक झाला की अप्रायजल शब्दाचा लोप होऊन नुसतंच "मला घेतलं" किंवा "माझी घेतली" असं म्हणतात
nation आणि country
nation आणि country हे शब्द कैकदा एकमेकांना पर्याय म्हणून वापरात दिसत असले तरी ह्या संज्ञांमध्ये सूक्ष्म फरक आहे.
" राष्ट्र " व "देश " ह्या शब्दांत आहे तसाच तो फरक आहे.
the state* किंवा प्रशासन्/राज्यव्यवस्था ही तर अजूनच एक भानगड आहे.
(हे राज्य/state म्हणजे महराष्ट्र्,कर्नाटक ह्या नावाची राज्य ह्या अर्थाने नाही, तर administrative अर्थाने state हा शब्द जसा ध्वनित होतो, तसा तो आहे. पूर्णतः वेगळा.)
हिंदी-उर्दू मध्येही "ऐ वतन ऐ वतन...तेरी राहों में हम..." ह्यातलं "वतन " म्हणजे देश.( "वतनदार" शब्दातल्या वतनपेक्षा तो जरा वेगळाच)
"वतन"च्या जवळ जाणारा "मुल्क" हा शब्द.
"कौम" हा शब्द nation /राष्ट्र च्या जवळ जाणारा. तो लोकसमूह आणि पर्यायाने राष्ट्र दर्शवतो.
"कौमी दंगे हुए" असं उर्दूत ऐकतो communcal riots बद्दल.
गांधी "राष्ट्रपिता" आहेत तसे मुहम्मद अली जिनांना "बाबा इ कौम" ; आमच्या जमातीचा/राश्ट्राचा पिता म्ह्टले जाते.
.
.
प्रतिसाद अतिसंक्षिप्त असल्याने काहिसा विचित्र भासेल.
अधिक तपशील मी वेगळ्या,स्वतंत्र धाग्यात टंकलेत :-
http://www.aisiakshare.com/node/1104
तिथे फक्त मूळ धाग्यात नाही, तर प्रतिसादातूनही माझ्याकडे असलेली माहिती/विचार टंकलेत.
स्टेट (एक प्रयत्न)
the state* किंवा प्रशासन्/राज्यव्यवस्था ही तर अजूनच एक भानगड आहे.
(हे राज्य/state म्हणजे महराष्ट्र्,कर्नाटक ह्या नावाची राज्य ह्या अर्थाने नाही, तर administrative अर्थाने state हा शब्द जसा ध्वनित होतो, तसा तो आहे. पूर्णतः वेगळा.)
State हा शब्द administrative अर्थाने ध्वनित होतो, असे वाटत नाही. आणि state म्हणजे प्रशासन/राज्यव्यवस्था तर नव्हेच नव्हे. किंबहुना state हे प्रशासन/राज्यव्यवस्था/administration/शासन/सरकार यांच्यापासून distinct आहे, भिन्न आहे.
आपण ज्या state संकल्पनेचा उल्लेख करीत आहा१, ती संकल्पना मला वाटते काहीशी political entity अशा अर्थाने घेता यावी. म्हणजे, वेब्स्टरच्या व्याख्येप्रमाणे, a politically organized body of people usually occupying a definite territory; especially : one that is sovereign (व्याख्या ५अ). किंवा, या विकीदुव्यावरील पहिल्याच वाक्यात म्हटल्याप्रमाणे, A state is an organized community living under one government. (या वाक्यातून राज्य आणि शासन/प्रशासन यांची भिन्नता अधोरेखित व्हावी.)
भारतात राष्ट्रपती हा हेड ऑफ स्टेट असतो, तर पंतप्रधान हा हेड ऑफ गवर्मेंट असतो. त्याचप्रमाणे, ब्रिटनमध्ये (तूर्तास) राणी ही हेड ऑफ स्टेट असते, तर पंतप्रधान हा हेड ऑफ गवर्मेंट असतो. ऑस्ट्रेलिया, कॅनडा आदि देशांत राणी ही हेड ऑफ स्टेट असते (आणि गवर्नर जनरल हा तिचा स्थानिक प्रतिनिधी असतो), तर पंतप्रधान हा हेड ऑफ गवर्मेंट असतो. याचा अर्थ काय?
भारताचे उदाहरण घेऊ. भारत ही एक एंटिटी असते. तिला एक सरकार असते. सरकार बदलू शकते, नव्हे अनेकदा बदलते. आज याचे येते, तर उद्या ते जाऊन त्याचे येते. पण भारत बदलत नाही; तो एंटिटी म्हणून वर्षानुवर्षे, सरकारानुसरकारे टिकून राहतो.
राष्ट्रपती हा या भारत नावाच्या टिकाऊ एंटिटीचा (स्टेटचा) प्रमुख असतो, तर पंतप्रधान हा त्या भारत सरकार नावाच्या सदैव बदलत्या, नाशवंत हंगामी एंटिटीचा (गवर्मेंटचा) प्रमुख असतो.
(तूर्तास इत्यलम्|)
==================================================================================================================
१ अर्थात, काही वेगळ्या संदर्भांत स्टेट हा शब्द शासन/सरकार/प्रशासन अशा अर्थानेही वापरला जातो (उदा. 'सेपरेशन ऑफ चर्च अँड स्टेट'), नाही असे नाही, परंतु ती संकल्पना वायली आन् ही संकल्पना वायली.
पोएम आणि पोएट्री
Poem आणि Poetry यांतील फरक समजतोय पण शब्दात मांडता येत नाहीय. 'Poem' is an actual example of the abstract concept 'Poetry', असे म्हटले जाते. पण तरीही सुस्पष्ट शब्दात फरक कुणाला सांगता येईल काय?
(अगदी असेच थोडेफार Play आणि Drama या शब्दांबाबतदेखिल)
आणि हो, या शब्दांचे मराठी प्रतिशब्द कोणते?
गरमा हा शब्द नाही ऐकला कधी
गरमा हा शब्द नाही ऐकला कधी वापरलेला. एखाद्या विशिष्ट भागात वापरतात का?