"डिफिकल्ट डॉटर्स"

DD
काही दिवसापूर्वी 'ऐसी अक्षरे' वर 'दुसरे लग्न' आणि त्या अनुषंगाने विविध प्रतिसादातून उमटलेला 'Live-in Relationship' स्वर तसेच त्याचे महत्व वा गरज यावरही इथल्या ज्येष्ठ सदस्यांनी त्या अनुषंगाने आपली मते मांडली होती. प्रश्न असा की, 'लग्न' संदर्भात आपल्या संस्कृतीची अमेरिकन वा युरोपीअन संस्कृतीशी तुलना करताना तिथे Individual Decision Making ला जे स्थान आहे तितके इथे, माना अगर ना मानावे पण, Family Involvement ला काहीसे अधिकचे स्थान आहे असे (किमान मलातरी) वाटते. हे नक्की की अशा नाजूक समजल्या जाणार्‍या प्रश्नाबाबत एकमत होणे अवघड असते (पूर्वीही होतेच) आणि मग जो तो आपापल्या मगदुरीप्रमाणे या संदर्भात निर्णय घेत असतो, वा घेऊ शकतो, आणि त्या निर्णयाचे जे काही भलेबुरे पडसाद त्याच्या/तिच्या जीवनात उमटतील त्याला सामोरे जाण्याचीही मग तयारी त्याने/तिने केलेलीच असते असे मानले जावे.

सुशिक्षित मुलगी प्रेमात पडते पण प्रियकर विवाहित असेल तर त्याने मग "दुसरेपणावर का होईना, मला पत्नीपद दिलेच पाहिजे' अशी भूमिका घेऊन शरीरसंबंधाला परवानगी देणे आणि मग प्रथम पत्नीला डरणारा तो 'वाघ्या' कधी 'होय' म्हणेल याची वाट पाहात आयुष्याचा वाटेवर माहेरच्या आपुलकीच्या नात्यापासून दूर जात कुठेतरी अनोळख्या प्रदेशात पोटाची टिचकी भरण्यासाठी पदवीच्या आधारे नोकरी करीत 'उद्याच्या आशे' कडे डोळे लावून बसणे असे काहीसे चित्र अशा संदर्भात समोर येते. ह्या विषयाचा विचार करताना एका भारतीय लेखिकेची अगदी याच विषयावर बेतलेली कादंबरी नजरेसमोर येत होती. त्या कादंबरीची ही समीक्षा नव्हे की ते परीक्षण आहे असेही इथल्या अभ्यासू सदस्यांनी मानू नये, तर या निमित्ताने कादंबरीचा परिचय करून देण्याचा प्रयत्न समजण्यात यावा. कादंबरीचे नाव "Difficult Daughters" आणि लेखिका "मंजू कपूर".

मंजू कपूर यांची "Difficult Daughters" ही कादंबरी म्हणजे जिचे जीवन वेगवेगळ्या कारणांनी प्रभावित झालेल्या आणि त्यात ओढाताण होणार्‍या एका स्त्रीची कहाणी आहे. तिचे आपल्या कुटुंबासंदर्भात कर्तव्य, शैक्षणिकदृष्ट्या परिपूर्ण होण्याची तिची उत्कट इच्छा, विवाहित पुरुषाबरोबर असलेले तिचे समाजाच्या दृष्टीने अनैतिक समजले जाणारे प्रेमप्रकरण आणि अखेरीस आपल्या स्वतःच्या अटींवर व तत्त्वानुसार आपल्या नियतीला आकार देण्यासाठी चाललेली तिची धडपड याविषयी ही कहाणी आपल्याला कल्पना देते. ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भारताचा स्वातंत्र्य-संघर्ष ही राजकीय पार्श्वभूमी या कादंबरीला लाभलेली आहे. अर्थात ऐतिहासिक घटनांची कथेच्या गरजेनुसार काल्पनिक पुनर्रचना केली आहे. स्वातंत्र्य चळवळ आणि फाळणीच्या व्यथा यामध्ये सापडलेल्या स्त्रियांच्या समस्यांचे दर्शन घडविणे व त्यांची उकल करणे हा ही कादंबरी लिहिण्यामागे प्रमुख हेतू आहे हे मंजू कपूर यानी स्पष्ट केले आहे.

"The one thing I had wanted was not to be like my mother" या विलक्षण अशा वाक्याने सुरू होणारी ही कादंबरी पहिल्या पानापासूनच वाचकाच्या मनाची पकड घेते. कादंबरीत 'फ्लॅश बॅक' तंत्राचा वापर केला असून नायिकेचा ("वीरमती") आता मृत्यु झाला असून तिची घटस्फोटीत मुलगी 'ईडा' ही आपल्या आईच्या भूतकाळाचा मागोवा घेत दिल्ली, अमृतसर, लाहोर, डलहौसी अशा गावांचा प्रवास करीत तिच्यासंदर्भातील धागेदोरे गोळा करीत आहे.

भारता-स्वातंत्र्यप्राप्तीच्या काहीच वर्षे आधीच्या कालखंडातील पार्श्वभूमीवर घडत असलेल्या घटनांच्या परस्परविरोधी प्रभावामध्ये ओढाताण होणार्‍या एका स्त्रीची - वीरमतीची - ही मन खिळवून टाकणारी कादंबरी आहे. वीरमती स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी लढा देत असताना ती असीम धैर्य आणि जिद्द दाखविते. अमृतसरमधील एका सनातन कुटुंबात जन्मलेली ती एक पंजाबी तरुणी आहे. कॉलेजच्या पहिल्याच वर्षात इंग्रजी विषयाच्या हरिशचंद्र या विवाहित प्राध्यापकाच्या प्रेमात ती पडते आणि तिचे प्रश्न सुरू होतात. हे प्रेमसंबंध अर्थातच त्या काळाचा विचार करता दोन्ही घराण्यांना मंजूर नाहीत. अशा वाटेवरून प्रवास करणारे फारच थोडे असतात आणि वीरमती या वाटेने जाण्याचा निर्धार करते. दरम्यानच्या काळात तिला स्त्री-शिक्षणाचेही महत्व पटलेले आहे आणि त्या अनुषंगाने येणार्‍या जीवनातील उत्तम गोष्टी मिळविण्याचा तिला ध्यास लागला आहे. जीवनाची क्षितिजं केवळ रुंद नाहेत, तर त्या क्षितिजापल्याडही अशा काही गोष्टी आहेत ज्या आजही अप्राप्य आहेत, असाध्य आहेत आणि त्याच्या ध्यासाने वीरमती आपल्या स्वतःचा मार्ग निवडते आणि समाजनिर्मित बंधने मोडण्यात (तिच्यापुरती का होईना) यशस्वी होते. संघर्षसमयी तिच्या लक्षात येत जाते की समाजात काही बाबी इतक्या घट्ट रूजून बसल्या आहेत की त्यांच्या शृंखला तोडण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागणार आहेतच. या प्रवासात एका साध्या निष्पाप मुलीपासून तिचे रुपांतर अनुभवाने आणि संकटाने परिपक्व झालेल्या एका स्त्रीमध्ये होते. तिचे जीवन म्हणे सच्च्या प्रेमाचा प्रदीर्घ शोध आहे, स्वत:ला जाणून घेण्याचा एक शोध आहे आणि हा शोध कधीच थांबत नाही.

अखेरीस वीरमतीच्या मनात काही प्रश्नांची खळबळ उडणं अगदी स्वाभाविकच आहे - जीवनाचा हा शोध घेण्याइतपत जीवन महत्वाचं आहे काय ? आपण जे ध्येय बाळगलं ते खरोखरच प्राप्त केले आहे काय ? इतका संघर्ष करण्याइतपत जीवन खरोखरच महत्त्वाचं नाही असं तिला अखेरीस वाटतं, हा संघर्ष व्यर्थ नि वाया आहे, गोष्टी जशा दिसतात किंवा भासतात तशा नेहमीच नसतात. आपल्याला हवं ते मिळविण्यासाठी ते प्राप्त करण्यासाठी ती आयुष्यभर लढत राहते; आपल्या स्वतःच्या तत्त्वानुसार नि विचारानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करते आणि या प्रक्रियेत आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक अर्थपूर्ण भाग गमावून बसलो आहोत आणि हे सगळं अर्थहीन असतं याची तिला जाणीव होते.
कादंबरीची नायिका वीरमती, कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी, आपल्या भावंडांची ती जणु दुसरी आईदेखील आहे. बाळंतपणापाठोपाठ येणार्‍या आजारामुळे आई आणि त्यामुळे भावंडांची देखभाल करणे वीरमतीची जबाबदारी होऊन जाते. शिस्तीची आहेच पण त्यामुळे सोशीकदेखील बनली आहे. चिडचिड्या स्वभावाच्या आईमुळे तिच्या वाट्याचे प्रेम आणि काळजी अजिबात तिला मिळत नाही. साहजिकच बालपणीचा काळ आठवावा असं तिला वाटत नाही आणि त्यामुळेच जपून ठेवाव्यात अशा बालपणीच्या आठवणीदेखील तिच्यापाशी नाहीत. तिच्या शिक्षणाच्या आसक्तीबद्दल घरातील कुणालाच फारशी पर्वा नाही. शिक्षणापेक्षा मुलीसाठी आयुष्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी असतात हे तिच्या मनावर ठसविण्याचा तिच्या आईचा प्रयत्न आहे. तिच्या मनावर एकच गोष्ट बिंबवली जातेय - बाईच्या जातीनं लग्नाची इच्छा बाळगावी, नवीन घर बसविण्याचा प्रयत्न करावा, मुलांना जन्म देऊन त्यांचं पालनपोषण करावं, कौटुंबिक सुखासाठी प्रयत्न करावेत आणि वैवाहिक समाधान हे तिच्या आयुष्याचं इतिकर्तव्य असावं. योग्य वयात तिच्या लग्नाची चर्चा घरात चालू होते. याविरुद्ध बंड करावं आणि परंपरागत रीतीरिवाजांचे अडथळे मोडून टाकावेत असे विचार वीरमतीच्या मनात सतत येत राहतात. पण तरीही लग्न हे ठरतंच. आईबरोबर वाद घालताना आईच्या, "मी तुझ्या वयाची होते त्यावेळी गरोदर होते आणि तुला जन्म देणार होते, तुझ्यासारखी आईबरोबर वाद घालत नव्हते' या उत्तराने सुन्न होते.
पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळे असते. नियोजित वराच्या वडिलाचे निधन झाल्याने लग्न बेमुदत पुढे जाते आणि दरम्यानच्या काळात घरातील ज्येष्ठ मंडळी वीरमतीची कॉलेज शिकण्याची इच्छा आणि तिला काहीसे समाधान मिळावे म्हणून प्रवेशाची अनुमती देतात आणि कॉलेजच्या रंगीबेरंगी दुनियेमुळे वीरमती हरखून जाते. कॉलेजमधील "ऑक्सफर्ड रीटर्न" इंग्रजीचे प्रा. हरिशचंद्र यांच्या आगमनाने तिचे सारे भावविश्वच व्यापून जाते. प्रोफेसर आणि वीरमती यांची कॉलेजबाहेर त्यांच्या कॉलनीत भेट होते त्यावेळी ते आवर्जून तिला घरी बोलावितात आणि एका सुमधुर संगीताची ध्वनिमुद्रिका ऐकवतात आणि ती ऐकून तिच्या चेहर्‍यावर उमटलेले भाव म्हणजे हरीशच्या दृष्टीने एक पारितोषिकच ठरतं. प्रोफेसराच्या व्यक्तिमत्वाने आणि राहणीमानाने ही लाजरीबुजरी वीरमती प्रभावित झाली नसती तर नवलच ! कॉलेज आणि कॉलेजबाहेरील भेटीगाठीमधून प्रेमांकुर बहरायला वेळ लागत नाही. पण प्रोफेसर हरीशचंद्र हे विवाहित असल्याने या दोघांच्या प्रीतीची वाट कधीच सरळसपाट असणार नाही हे उघडच सत्य. सामाजिक बंधनं आणि नैतिक अडथळे ही मोठी अडचण असते व त्या दृष्टीने विवाहित पुरुष आणि एक कॉलेजकन्या यांचे हे प्रेमप्रकरण अवैध ठरते. [आपल्याकडील माधव जूलियन आणि वरदा प्रकरण.]

पण प्रेमाने वेड्या झालेल्या वीरमतीच्या नजरेत आता 'हरीशचंद्र' हाच आपला जीवनसाथी असतो. तरीही स्त्रीशिक्षणाचा सार्वजनिक पाठपुरावा करणार्‍या आपल्या आजोबांना आपल्या या कृतीमुळे गावात मान खाली घालावी लागेल याची तिला जाणीव आहे. वडिलांनी टाकलेल्या विश्वासालाही आपला निर्णय धक्का देणारा ठरणार हेही तिला माहीत आहे. इतकेच नव्हे तर विवाहित हरीशशी प्रेम म्हणजे आपल्या धाकट्या बहिणींच्या विवाहातील मोठी अडचण होऊ शकेल याचीही भीती तिला आहेच. तरीही घरात प्रेमाची गोष्ट ती आईजवळ बोलून अगोदर ठरलेल्या लग्नाला नकार देण्याचे धाडस तिच्यात येते ते त्या आंधळ्या प्रेमापोटीच. साहजिकच घरात वाद, ताणतणाव, संताप, कमीजास्त शब्द. इ.ची देवाणघेवाण चालू होते. वीरमतीची आईही तितकीच निर्धारयुक्त असते आणि विरूला ती तिच्या मनासारखं वागू देत नाही आणि त्यामुळे संताप आणि निराशेपोटी वीरमती आजोबाच्या गावी जाऊन तेथील कॅनालमध्ये आत्महत्या करण्याचाही प्रयत्न करते. पाण्यातून तिला बाहेर काढण्यात येते आणि मग गोडावूनमध्ये बंदिस्त ठेवले जाते, घराबाहेर पडायला बंदी जरी असली तरी ज्येष्ठांना नकळत ती आपल्या पारो नावाच्या धाकट्या बहिणीमार्फत पाठवित असलेल्या चिट्ठ्याद्वारे प्रोफेसर हरीशशी संपर्क कायम ठेवते. पण काही दिवसातच तिला अन्य माहितीगारांकडून कळते की हरिशची पहिली पत्नी त्याच्यापासून गरोदर आहे. ही वस्तुस्थिती तिला धक्का देणारी ठरते. कारण "तुझ्यावर माझे जीवापाड प्रेम आहे" असे सतत घोकणारा आपल्या प्रियकर दुसरीकडे पत्नीशी शारीरिक संबंध कसा काय ठेवू शकतो हे तिच्यासाठी न उलगडणारे कोडे असते. दुसरीकडे लग्न न करण्याच्या तिच्या हट्टास सामोरे जाऊन घरचे लोक तिच्या इंदूमती या दुसर्‍या धाकट्या बहिणीचे त्या नियोजित वराशी लग्न लावून देतात आणि ही पिडा इथे नकोच म्हणून वीरमतीला लाहोरच्या कॉलेज व हॉस्टेलमध्ये पाठविले जाते.

वीरमती नावाप्रमाणेच शूर आणि जिद्दी असल्याने एका नैतिक आचारविचाराच्या नियमानुसार जगण्याची ती नक्कीच प्रयत्न करते, पण नियतीच्या मनात दुसरंच असतं. कुटुंबाच्या आणि समाजाच्यादृष्टीने ती बंडखोर आहे. लाहोरच्या हॉस्टेलमध्ये तिच्या जीवनावर प्रभाव टाकणार्‍या दोन व्यक्ती आहेत, एक तिची चुलतबहीण शकुंतला तर दुसरी रूममेट स्वर्णलता. दोघींनाही भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याविषयी विशेष आस्था आहे. त्यांच्या नजरेत उद्याची 'नवी स्त्री' घडविण्यासाठी हा कालखंड फार उपयुक्त आहे. आयुष्यात प्रेमापेक्षाही अजूनही काही मौल्यवान करण्यासारखे आहे. वीरमतीही हळूहळू त्या विचारधारेसमवेत जाऊ लागते. पण हरिशला ती विसरण्यास तयार नाही. लाहोरमध्ये ती असल्याचे त्याला समजताच तो तेथील हुसेन नावाच्या एका मित्राच्या माध्यमातून तिला भेटतो आणि प्रत्यक्ष भेटीत प्रेमाच्या उमाळ्यापेक्षा त्याने आपल्याबरोबर अगोदर लग्न केले पाहिजे असे आग्रहाने सांगते खरे पण हरिशचा असा एकांत आणि अनिर्बंध सहवासही तिला हवाहवासा वाटतो आणि त्यांचे शारीरिक मिलनही होऊन जाते. कालबाह्य नैतिकतेच्या गोष्टींना ठोकर मारायचीच असाही तिचा आग्रह असतो. कॉलेजला पडलेली दिवाळीची सुट्टी दोघेही लाहोरमध्येच एकत्रित व्यतीत करतात. दरम्यान देशभर सत्याग्रह चळवळ सुरू होते व साहजिकच लाहोरमध्ये त्याचे पडसाद उमटतात. नेत्यांच्या अटकसत्रापाठोपाठ पाकिस्तान निर्मितीचेही आवाज उठू लागतात. वीरमतीचा या चळवळीतील काही आघाडीच्या स्त्रियांसोबत संपर्क येतो आणि तिला त्यांच्या कार्यावरील प्रेम आणि आपले प्रेम यांच्या व्याख्या किती भिन्न आहेत याची जाणीव होते. दुसरीकडे 'आपण लग्न करू या' या तिच्या मागणीला हरीश या ना त्या कारणाने वाटाण्याच्या अक्षता लावीत असतोच. पुढे आपण गरोदर आहोत हे समजल्यावर तर ती अधिकच केविलवाणी होते. हरिश अमृतसरला गेल्यामुळे आणि परत येऊ शकणार नाही हे उमगल्याने त्या अवस्थेत स्वर्णलताच्या सल्ल्याने आणि मदतीने लाहोरमध्येच गुपचूप गर्भपात करून घेते.

पुढे बी.एड. झाल्याबरोबर तिला एका छोट्या संस्थानातील विद्यालयात मिळालेली शिक्षिकेची नोकरी स्वीकारते आणि तिथे ती रमूही लागते. पण हरिश एपिसोड ती विसरू शकत नाहीच व त्याच्याकडून आलेल्या पत्रांना ती उत्तरही देते. त्यावरून हरिश त्या शाळेत वारंवार येऊ लागतो. त्यांच्या भेटीकडे संस्थाचालकांचे अर्थातच लक्ष जाते आणि शाळेतील मुलींवर अशा विवाहबाह्य संबंधाचे दुष्परिणाम होतील या भावनेतून वीरमतीला ते नोकरीचा राजिनामा देण्यास सांगतात. हरिशला ओळखणारा दिल्लीतील एक मित्र तिची ससेहोलपट थांबवावी या हेतूने हरिशला त्याने वीरमतीशी आता लग्न करणे किती महत्त्वाचे आहे हे पटवून देतो. काहीसा गोंधळलेला हरीश शेवटी मित्राच्या का होईना दबावाखाली एकदाचे वीरमतीला आपली पत्नी मानतो आणि दुसरी बायको म्हणून अमृतसरला घरीही आणतो. त्यावेळी अर्थातच प्रथम पत्नीकडून या 'सवती' चे थंडेच स्वागत होते. प्रथम पत्नी, सासू यांच्या भेदक नजरा तिचा सतत वेध घेत राहतात. हरीश कॉलेजला गेल्यावर घरी केवळ आळसात पडून राह्यचे तिच्या जीवावर येते. हरीशच्या मुलांना ती आपलंसं करण्याचा प्रयत्न करते पण गंगा [हरीशची प्रथम पत्नी] तसे करू देत आहे. घरातील वाढत्या कटकटी नकोच म्हणून हरीश वीरमतीला पदव्युत्तर शिक्षण पूर्ण कर म्हणून परत लाहोरच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यास सांगतो. असा या स्वतंत्र विचारसरणीने राहू इच्छिणार्‍या स्त्रीचा फरफटून गेलेला संसार. लाहोरमध्येच तिला एक मुलगीही होते. ही 'ईडा'. मरेपर्यंत वीरमतीची ही स्थिती संपतच नाही, किंबहुना स्वतःवर बसलेला 'दुसरी औरत' चा शिक्का घेऊनच ती मृत्युमुखी पडते. काय मिळविले या पोरीने ? असा प्रश्न तिच्या उर्वरीत कुटुंबियांच्या मनी गुंजतो.

सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे "डिफिकल्ट डॉटर्स" या कादंबरीचे कथानक फ्लॅशबॅक तंत्रातून ही मुलगी "ईडा" चा सांगत आहे. ईडाने वीरमतीच्या आयुष्याची एक मुलगी म्हणून उजळणी केली आहे. स्त्री-स्वातंत्र्याच्या नावाखाली आपल्या आईने मिळविले ते नेमके काय? आईच्या ससेहोलपटीची तिच्या मनी चीड आहे आणि त्यामुळेच आईविषयी एक प्रकारचा आकसही आहे. कादंबरीचा प्रारंभच, "मला एकच गोष्ट हवी होती आणि ती म्हणजे मला माझ्या आईसारखं व्हायचं नव्हतं" या ईडाच्या मतप्रदर्शनाने होतो. ईडा स्वतः अपत्य नसलेली एक घटस्फोटीता आहे आणि आयुष्यभर ती आपल्या आईला समजून घेण्यास कमी पडते. तिला सत्य उमगते ते वीरमतीच्या मृत्युनंतर. ती प्रवासात आईच्या जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करते आणि तिच्या जीवनाचे एकेक पदर उलगडत जातात. आईच्या मृत्युनंतर आपण अपराधीपणा आणि लाज यांच्या खोल गर्तेत सापड्लो आहोत आनी तिच्याविषयी आपण उगाचच आकस बाळगला याची तिला स्पष्ट जाणीव होते. आपल्या स्वत:च्या आठवणींचे एकेक तुकडे गोळा करीत आईच्या जीवनाची इमारत उभी करते. अखेरीस ईडा म्हणते, "हे पुस्तक माझ्यात आणि आईच्यामध्ये एक बंध विणतं आणि प्रत्येक शब्द म्हणजे जणू एक वीट आहे माझ्या आईच्या जीवन इमारतीच्या, जी मी अंतःकरणापासून व बुद्धीच्या जोरावर बांधली आहे. आई, आता तू या घरात राहा, आणि इथून पुढे मला वारंवार भेटू नकोस !"

Manju

(मंजू कपूर यांचा जन्म अमृतसर इथला असून सध्या त्या दिल्लीच्या मिरांडा हाऊस कॉलेजमध्ये इंग्रजीच्या प्राध्यापिका आहेत. Difficult Daughters ही त्यांची पहिलीच कादंबरी असून त्याच्या संशोधन आणि लिखाण यासाठी मंजूना पाच वर्षे लागली. या कादंबरीला युरेशिया विभागातील प्रथम सर्वोत्तम पुस्तक म्हणून मानाचे कॉमनवेल्थ अ‍ॅवॉर्ड मिळाले. यानंतर मंजू कपूर यानी "Married Women", "Home" "Immigrant" ह्या तीन कादंबर्‍या लिहिल्या आहेत. या चारही कादंबर्‍या स्त्री-जीवनातील चढउतार याच विषयाभोवती आधारित असून त्यांचे नाव भारती मुखर्जी, शशी देशपांडे, अनिता देसाई, अरुंधती रॉय या स्त्रीलेखिकांच्यासमवेत घेतले जाते.)

field_vote: 
3.166665
Your rating: None Average: 3.2 (6 votes)

प्रतिक्रिया

व्वा!

बरीच वाक्ये आवडली. किंबहुना आणि कदाचित तुमचा हा परिचयपर लेख मूळ कादंबरीपेक्षा अधिक सुंदर तर नसेल ना अशी भीती सुखदपणे मनाला चाटून गेली. असो!

अस्वस्थ करणे हेच तर कलाकृतीचे ध्येय असे काहीसे मनात आले. Smile

-'बेफिकीर'!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'डिफिकल्ट डॉटर्ज़'चा एक सोपा आणि सुलभ परिचय करून दिल्याबद्दल आभारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कादंबरीचा परिचय आवडला आणि कादंबरी वाचण्याची इच्छाही झाली.

असा या स्वतंत्र विचारसरणीने राहू इच्छिणार्‍या स्त्रीचा फरफटून गेलेला संसार.

एकंदरच स्वतंत्र विचारसरणीच्या लोकांना बांधीव आयुष्य जगू इच्छिणार्‍यांचा त्रास आजही कमीअधिक प्रमाणात होतो; विशेषतः असे लोकं आपल्या जवळच्या नात्यातले असले तर! वेगळं काही करतो आहोत तर त्रास होणारच यासाठी वीरमती तयार असली तरी हरीश नव्हता हे स्पष्ट आहे. असे अनेक हरीश आजही दिसतात, तपशीलात फरक असतो एवढंच.

अशाच वेगवेगळ्या पुस्तकांची ओळख तुमच्यामुळे होईल अशी आशा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचलं पाहिजे हे पुस्तक!
परिचयाबद्दल आभार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पुस्तकाची अत्यंत रोचक ओळख. माझ्याकडे हे पुस्तक होते (दिल्ली च्या दर्यागंज रविवार पुस्तक बाजारात ५० रु ला घेतलेले!) पण नंतर घर-गाव बदलीत ते कुठे हरवले कोण जाणे. खूप शोधले, कुठेही सापडले नाहीच. मुखपृष्ठावरच्या चित्रातली बाई सिनेनटी नंदा सारखी दिसते, नाही?

"Married Women", "Home" "Immigrant" ह्या तीन कादंबर्‍या लिहिल्या आहेत. या चारही कादंबर्‍या स्त्री-जीवनातील चढउतार याच विषयाभोवती आधारित असून त्यांचे नाव भारती मुखर्जी, शशी देशपांडे, अनिता देसाई, अरुंधती रॉय या स्त्रीलेखिकांच्यासमवेत घेतले जाते.

मी कपूर यांच्या अन्य कादंबर्‍या वाचल्या नाहीत, पण भारतीय साहित्यात अनेक पिढ्यांच्या स्त्रियांच्या नात्यांवर बेतलेल्या कादंबर्‍यांचा आता एक मोठा साठाच आहे. या स्त्री-साखळीतून देश, समाज, घराणे, परंपरा या सर्व (पुरुषप्रधान दृष्टीकोनातून आखल्या गेलेल्या) कल्पनांचे परीक्षण, स्त्रीसमूहाची, स्त्रीनात्यांची स्वतंत्र, वेगळी जाणीव समोर आणण्याचे प्रयत्न केलेले दिसतात.

सुरुवातीला ही शैली बर्‍यापैकी रॅडिकल होती, पण त्यात फारसे नावीन्य आले नाही - काही दिवसांपूर्वी मराठीत अनुवादैत आशापूर्णा देवींची अशीच एक तीन पिढ्यांच्या आई-मुलगी-नात साखळीवर कादंबरी मालिका पाहिली होती - प्रथम प्रतिश्रुति, सुवर्नलता, आणि बकुळ - पहिल्या कादंबरीनंतर मी सोडून दिली, कारण भयानक मेलोड्रामाचा मारा सहन होईना. सुवर्णलता आता बंगाली टीव्ही वर अत्यंत लोकप्रिय सीरियल आहे हे पाहून आश्वर्य नाही वाटत! थोडे सपाटीकरण करून सांगायचे तर अनेक लेखिकांची पुस्तके याच ढाच्यातली वाटतात - सुखवस्तू, मध्यमवर्गीय घराण्यातल्या स्त्रीयांच्या कडू-गोड आठवणी; स्वत्वाची शोध; जमीनदारी किंवा गावाकडच्या घरातून शहरी जीवनात, आणि शहरातून परदेशात स्थलांतर; घर-बाहेर, देश-विदेश यातली ओढाताण. दमयंती नरेगल यांचे कन्नड "तेर नेलेय बारे तंगे"; अंजना अप्पाचना, "लिसनिंग नाओ"; अनिता राव बदामी, "टॅमरिंड मेम".... अजून यादीत भर घालता येईल.

इंग्रजीत शशि देशपांडे आणि अरुंधती राय या अपवाद ठरू शकतात, पण याच थीम वरची सर्वात निराळी म्हणजे गौरी देशपांडेंची "निरगाठी" दीर्घकथा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडला.
पूर्ण वाचणे शक्य होइलच असे सांगता येत नाही. त्यावर एखादी दर्जेदार मालिका बनली तर नक्की बघेन.(भीष्म साहनींच्या "तमस"वर DD एन एक दर्जेदार मालिक प्रसरित केली होती, किंवा "माल्गुडी डेज्" बनले,"गोट्या" बनले तसेच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

परिचय वाचून टागोरांच्या नायिकांची आठवण झाली. 'घोरे बाईरे'मधली स्वातंत्र्यसैनिकावर भाळणारी बिमला, साहित्यप्रेमी अमलच्या प्रेमात पडणारी चारुलता, 'चोखेर बाली'मधली बिनोदिनी आणि इथली वीरमती या सर्वजणी आपापल्या काळातल्या स्त्रियांच्या मानानं अधिक शिकलेल्या असतात. मोकळ्या वातावरणात खुलणार्‍या या नायिकांच्या आकांक्षा आणि त्यामुळे त्यांची होणारी फरफट यांत साम्यस्थळं असावी असा काहीसा विचार मनात आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

धन्यवाद मंडळी. मला आनंद झाला तुम्हा सर्वांच्या भावणार्‍या प्रतिक्रिया वाचून. एकतर मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे वरील लिखाण 'समीक्षा' गटात बसणारे नाही पण बोर्डवर दुसरा विकल्प नसल्याने मग त्या गटात हे लिखाण प्रवेष्ठीत केले, जे खरे तर एका कादंबरीचा परिचय इतक्याच माफक अपेक्षा ठेवून केले होते.

१. श्री.बेफिकीर हे स्वतः एक चांगले लेखक (त्यातही गझल प्रकारात नाव मिळविलेले) असल्याने त्यांनी केलेले कौतुक मलाही सुखावून गेले. अशा प्रतिसादांच्या झुळकेने खरे तर नवनवीन वाचनासाठी माणूस उद्युक्त होतो.

२. श्री.चित्तरंजन भट : तुम्ही केलेले 'सोपा आणि सुलभ' शब्दांचे योजन मला आवडले. खरे तर लिहितानाही मला असेच वाटत होते की, मी कुणाच्या समोर बसून त्या कादंबरीविषयी बोलतोय की काय.

३. अदिती : यू नो, आय हॅड इन माय माईंड दॅट पर्टिक्युलर थ्रेड अलॉन्गवुईथ पॉईन्ट्स वुई डिस्कस्ड. या निमित्ताने [खरे तर ही कादंबरी पूर्वीच वाचली होती, पण परिचय लिहायचा निर्णय घेतल्याने पुन्हा एकदा काही प्रकरणे दुबारा वाचली] तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वाचलेल्या/वाचत असलेल्या काही इंग्रजी कादंबर्‍यांचा इथे परिचय देण्याचा मी नक्की प्रयत्न करीन.

४. प्रियाली : येप्प, आई आणि मुलगी (वीरमती आणि ईडा) यांच्या परस्परसंबंधाविषयी काही जादाचे लिहिता आले असते, पण वेल, ते झालेले नाही हे मी मान्य करतो. त्याला कारणही मी स्वतःच ज्यादा 'वीरमती' मध्येच गुंतलो असे म्हटले तरी अतिशयोक्तीचे होणार नाही. तुम्हाला "ईडा" चा आकस पटला हे वाचून समाधान झाले, दॅट वॉज अल्सो माय एक्स्पेक्टेशन फ्रॉम दॅट कॅरॅक्टर (केवळ याच कारणासाठी मी हल्लीचा हॉटकेक Live-in Relationship संदर्भात होऊ शकत असलेले कौटुंबिक कॉन्सेक्वेन्सीस इथल्या मातीशी ताडून पाहिली पाहिजेत असे मत 'तिथे' मांडले होते.)

५. ऋषिकेश : धन्यवाद ऋषि. जरूर वाचावी ही कादंबरी अशी मुद्दाम शिफारस करीत आहे. त्यातही मंजू कपूरचे ते पहिले लिखाण होते म्हणून तर अधिकच.

६. रोचना : मी मंजू यांच्या सर्वच कादंबर्‍या या निमित्ताने वाचल्या पाहिजेत असे म्हणणार नाही, किंबहुना तो या लेखाचा उद्देश्यही नव्हता. खुद्द मी मंजूच्या या DD व्यतिरिक्त Home ही एकच वाचली आहे. तिच्याविषयी इथे जास्त लिहित नाही (राखून ठेवतो). तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पुरुषसाखळी आणि त्याच्या जोखडातून मुक्ती घेऊ इच्छिणार्‍या स्त्रियांनी अगदी स्वानुभावर लेखन केले असल्याने [लिखाणातील सारेच अनुभव 'काल्पनिक' असूच शकत नाही] त्या लिखाणाची जातकुळी मलातरी भावत आली आहे. मताबद्दल विभिन्नता नि:संशय असू शकते, पण धार्ष्ट्याने लेखन तरी येत आहे, हे सुचिन्ह मानतो.

वेल.....कादंबरीच्या मुखपृष्ठावरील स्त्री 'नंदा' सारखी दिसत्ये काय ? याबद्दल चर्चा होऊ शकते, पण मला ती 'माधवी मुखर्जी' सारखी भासली. आय मीन, मी जर 'डिफिकल्ट डॉटर्स' वर चित्रपट काढायचा ठरविला असता तर 'वीरमती' च्या भूमिकेसाठी 'माधवी मुखर्जी' ला घेण्याचा विचार केला असता. पण माधवी झाली आहे ७० वर्षाची, त्यामुळे तो रोल आता सध्याच्या जनरेशनसाठी रीझर्व्ह ठेवतो. 'वीरमती' च्या व्यक्तिमत्वाला साजेल असा 'माधवी मुखर्जी' चा एक फोटो अवलोकनार्थ देतो, त्यावरून तुम्ही म्हणू शकाल, "व्वा. प्रमुख भूमिकेसाठीची ही निवड अगदी सार्थ आहे."

MM

७. मन : "तमस" चे प्रक्षेपण ज्या काळात दूरदर्शनवर झाले होते तो सारा काळ मी अनुभवलाय. इतकेच नव्हे तर 'तमस' ची डिव्हिडीही माझ्याकडे आहे. त्या विषयावर एक नवीन लेख होऊ शकतो. धन्यवाद.

८. चिं.जं. : होय, टागोरांच्या त्या सार्‍या नायिका मला माहीत असल्याने त्यांच्यातील (अगदी नावापासून) आणि 'वीरमती' मधील भावविश्वाचे साम्य ही बाब सिद्ध करते की, मुलीना - त्या काळात - दिले गेलेले आंग्ल शिक्षण हे त्यांच्या कल्पनेच्या भरारीला उत्तेजन देणारे ठरले....विशेषतः "स्त्री स्वातंत्र्याबद्दल" ची त्यांची स्वप्ने. मला व्यक्तीशः अमंग दॅट लॉट, 'चारुलता' ही सर्वात जास्त भावलेली नायिका. वैशिष्ट्य म्हणजे या नायिका आपल्या प्रथम पतीच्या संसारात समाधानीच असतात. कुठलीही नायिका 'मी या संसाराला विटलेली आहे' असा त्रागा करीत नाही. भरल्या घरातील असल्याने अन्य तक्रारीलाही जागा नाही. पण या ना त्या निमित्ताने कुणीतरी पुरुष त्या घरात येतो आणि मग त्याच्यातील काही सुप्त गुणांमुळे (शारीरिक नव्हे) तिला आपल्यात एक कबुतर लपलेले आहे आणि ते उंच आकाशात भरारी घेऊ पाहते आहे असे भासत जाते; आणि गंमत म्हणजे मग हे माझ्या इतक्या वर्षात लक्षात कसे आले नाही ? या प्रश्नाचे उत्तर शोधताना त्याला कारणीभूत असलेल्या त्या नवागताला आपलेसे मानते.

अपर्णा सेन यांच्या "परोमा" त तरी दुसरे काय होते ?

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेल.....कादंबरीच्या मुखपृष्ठावरील स्त्री 'नंदा' सारखी दिसत्ये काय ? याबद्दल चर्चा होऊ शकते, पण मला ती 'माधवी मुखर्जी' सारखी भासली. आय मीन, मी जर 'डिफिकल्ट डॉटर्स' वर चित्रपट काढायचा ठरविला असता तर 'वीरमती' च्या भूमिकेसाठी 'माधवी मुखर्जी' ला घेण्याचा विचार केला असता.

वीरमतीचा रोल माधवीला जास्त 'सूट' झाला असता याबद्दल अजिबात दुमत नाही - मला फक्त चित्र पाहून ही हम दोनो मधली नंदा आठवली, एवढेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोकळ्या वातावरणात खुलणार्‍या या नायिकांच्या आकांक्षा आणि त्यामुळे त्यांची होणारी फरफट यांत साम्यस्थळं असावी असा काहीसा विचार मनात आला.

तसेच, स्वतंत्र (काही अंशी स्वैर) असलेल्या नायिकांवर बेतलेल्या कहाण्या अधिक लोकप्रिय का होतात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डिफिकल्ट डॉटर्सचा परिचय आवडला.

आतापर्यंत अश्या विषयावर जे चित्रपट/मालिका पाहिले आहेत किंवा कादंबर्‍या वाचल्या आहेत त्यावरून मी एक ढोबळ निरिक्षण केले आहे. समकालीन स्त्रियांपेक्षा जास्त शिक्षणानंतर बाकिच्या समाजापेक्षा खूप जास्त स्वातंत्र्य इच्छिणार्‍या स्त्रिया एका विशिष्ट कालखंडातच (ब्रिटिशकालीन) होत्या. कदाचित बंधनयुक्त असणार्‍या भारतीय संस्कृतीत वाढताना युरोपियन मुक्त संस्कृतीची होणारी ओळख त्यांना सर्व बंधनं झुगारून द्यायला प्रवृत्त करत असावी.

नंतरच्या काळातल्या स्त्रियांनी स्वातंत्र्याची इच्छा धरतानाच सोबत सारासार विचार तरी केला असावा असे वाटते. किंवा नंतर अश्या स्त्रियांचे प्रमाण वाढल्यावर त्यावर वेगळी कादंबरी लिहिण्यासारखे नाविन्य राहिले नसावे असेही असू शकतेच.

अवांतरः वीरमतीच्या हरिशसोबतच्या प्रेमप्रकरणावरून पल्लवी जोशीचा 'रीटा' आठवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

अवांतरः वीरमतीच्या हरिशसोबतच्या प्रेमप्रकरणावरून पल्लवी जोशीचा 'रीटा' आठवला.

'रिटा'ची मूळ कादंबरी 'रीटा वेलिणकर'ही जरूर वाच. मी चित्रपट पाहिलेला नाही, पण दोन तासांत एवढं दाखवणं शक्य नाही असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

परिचय अतिशय आवडला. त्याचमुळे कादंबरी वाचण्याची इच्छा निर्माण झाली आहे.
धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका शब्दपेक्षा दोन बरे.

>>वैशिष्ट्य म्हणजे या नायिका आपल्या प्रथम पतीच्या संसारात समाधानीच असतात. कुठलीही नायिका 'मी या संसाराला विटलेली आहे' असा त्रागा करीत नाही. भरल्या घरातील असल्याने अन्य तक्रारीलाही जागा नाही. पण या ना त्या निमित्ताने कुणीतरी पुरुष त्या घरात येतो आणि मग त्याच्यातील काही सुप्त गुणांमुळे (शारीरिक नव्हे) तिला आपल्यात एक कबुतर लपलेले आहे आणि ते उंच आकाशात भरारी घेऊ पाहते आहे असे भासत जाते; आणि गंमत म्हणजे मग हे माझ्या इतक्या वर्षात लक्षात कसे आले नाही ? या प्रश्नाचे उत्तर शोधताना त्याला कारणीभूत असलेल्या त्या नवागताला आपलेसे मानते.<<

दुसर्‍या लग्नाविषयीच्या चर्चेचा संदर्भ आणि तुमचा हा प्रतिसाद वाचून मला एक प्रश्न पडला - टागोरांच्या नायिका असोत की या कादंबरीतली वीरमती असो; विवाहबाह्य संबंध ठेवणारी किंवा परपुरुषाच्या प्रेमात पडणारी स्त्री अंतिमतः दु:खी होते किंवा पुन्हा नवर्‍याकडे गेली तरच सुखी होते अशा प्रकारचं चित्रण असल्यामुळे मध्यमवर्गाला या कादंबर्‍या अधिक भावतात का? शांता गोखल्यांच्या कादंबरीतल्या, मध्य लटपटीत गोते खाणार्‍या 'रिटा वेलिणकर'ला तशी लोकप्रियता लाभत नाही असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अवांतरः रीटा वेलिणकर लोकप्रिय नाहीये?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

@ मेघना ~

मला वाटते "रीटा वेलणकर" हे "पात्र" तिच्या तेथील व्यक्तिरेखेमुळे वाचकात लोकप्रिय झाले नाही, असे श्री.चिंजं याना म्हणायचे असेल. 'कादंबरी' च्या लोकप्रियतेबद्दल त्यांचे ते मत नसावे. (अवांतर : तुम्ही दोघांनीही 'वेलिणकर' असे टंकले आहे. मी समजत आहे की रीटाचे आडनाव 'वेलणकर' आहे. चू.भू.द्या.घ्या.)

{बाकी श्री.चिंजं च्या त्या टोटल प्रतिसादाबद्दल स्वतंत्र लिहित आहेच.}

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मध्यमवर्गीय, सुशिक्षित "भद्रलोक" घराण्यातल्या स्त्रीला शिक्षण पाहिजे, पतीचे प्रेम पाहिजे, सहानुभूति आणि नवर्‍याबरोबर सहवास, संवाद आणि प्रेम पाहिजे, याच रॅडिकल कल्पना होत्या - पतीच्या प्रेमळ आणि पॅटर्नलिस्टिक प्रोत्साहनातून (आणि त्याच्याद्वारे सभ्य समाजाकडून) नवीन भद्रमहिला तयार झाली. आंग्ल शिक्षण मिळाले खरे, पण एका विशिष्ट प्रकाराचे: विक्टोरियन चौकटीतली शिवणकाम-विणकाम-भरतकाम करकरणारी, पियानो वाजवणारी, बंकिमचंद्र आणि स्त्रियांच्या मासिकांसहित थोडेसे वर्ड्सवर्थच्या कविता वाचणारी, साडीबरोबर ब्लाउज घालणारी, आणि घर कसे चालवायचे हे शिकणारी ही "आदर्श" भद्रमहिल आधुनिक आणि शिक्षित होती, पण परंपरेला जपणारी आणि सभ्यतेबाहेर आंग्लसंस्कृतीला नकारणारी. तत्कालीन भद्रलोक स्त्रियांसाठी देखील यसुधारणा मागताना या 'प्रगत' विवाहसंबंधांचे समर्थन करणे महत्त्वाचे होते. त्यामुळे विवाह बंधनाला नकारून बाहेर पडणार्‍या स्त्रीला तितकीच साहित्यिक सहानुभूति मिळणे कठीण होते - ही त्या काळच्या इमॅजिनेशन ची सीमाच म्हणता येईल, किंवा मध्यमवर्गीय सुधारक चौकटीचीच लक्ष्मणरेखा. निखिलेश-बिमलाचे असेच नाते आहे - तो तिला प्रेमाने, अगदी खर्‍याखुर्‍या प्रगत वृत्तीने घडवतो, पण शोंदीपचे आकर्षण तिला महाग पडते.

ठाकूरांच्या सर्व नायिकांबद्दल बोलायचे नाही, पण घॉरे बाइरे मध्ये हाच मुद्दा त्यांना स्वदेशी चळवळीत बदलत चाललेल्या राष्ट्रभावनेबद्दलही मांडायचा होता - बिमलास्वरूप राष्ट्राने निखिलेशस्वरूप मवाळ, पॅटर्नलिस्ट सभ्य समाजाचे नेतृत्व आणि पद्धत स्वीकार करावी, की शोंदीपस्वरूप आकर्षक, पण जहाल, हिंसक आणि शेवटी अविश्वासू आणि अनप्रेडिक्टेबल मार्ग? ठाकूरांनी बिमलाच्या द्विधेचे अत्यंत संवेदनशील चित्र रेखाटून तत्कालीन "गृहलक्ष्मी" च्या गोड-गोड आदर्शाला तोड दिली हे खरे; पण संदीपचा दुसरा मार्ग धरला तर समाजाचा सभ्य आणि लिबरल, प्रगतीशील पायाच नष्ट होतो, असा शेवटी निष्कर्ष निघतो - स्त्रीसाठी, आणि राष्ट्रभावनेसाठीही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>विवाहबाह्य संबंध ठेवणारी किंवा परपुरुषाच्या प्रेमात पडणारी स्त्री अंतिमतः दु:खी होते किंवा पुन्हा नवर्‍याकडे गेली तरच सुखी होते अशा प्रकारचं चित्रण असल्यामुळे मध्यमवर्गाला या कादंबर्‍या अधिक भावतात का?<<

अशी शंका उपस्थित करताना मला आजचा मध्यमवर्ग अभिप्रेत होता. टागोरांच्या काळात त्यांनी मांडलेल्या विचारांबद्दल रोचना म्हणताहेत ते बरोबर आहे, पण आजही (म्हणजे टागोरांच्या काळात रॅडिकल असणार्‍या कल्पना रुढ बनलेल्या मध्यमवर्गात) विवाहबाह्य संबंध ठेवणार्‍या स्त्रीची फरफट झाली तरच मध्यमवर्ग तिला आपलीशी करतो का? अशी शंका आहे.

>>अवांतरः रीटा वेलिणकर लोकप्रिय नाहीये?<<

लोकप्रिय म्हणता यावी इतकी ती वाचली गेली नसावी असं वाटतं. चित्रपट आल्यामुळे तात्पुरती लोकप्रियता लाभली असेल कदाचित, पण चित्रपटही फारसा चालला नसावाच. मी पुण्यात भर कोथरुडातल्या मल्टिप्लेक्समध्ये दुसर्‍या आठवड्यात पाहिला होता तेव्हा थिएटर रिकामं होतं. तिसर्‍या आठवड्यात चित्रपट गायब झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कमल देसाईंच्या नायिकांबद्दलही हेच म्हणता येईल का?

श्री. पाटील: रीटा वेलिणकरच आहे, वेलणकर नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ओके. तुम जिती मै हारा |

"वेलणकर" हे आडनाव डोक्यात बसायचे कारण म्हणजे 'अपर्णा वेलणकर' या लेखिकेचे "फॉर हिअर ऑर टू गो" हे पुस्तक. तुझ्यासारख्या अमेरिकास्थित भारतीयांच्या तेथील वास्तव्याबद्दलचे अनुभव, त्यांचे तेथील राहणीमान, आलेले अनुभव, स्थैर्यासाठी केलेली धडपड. एकप्रकार देशांतर केल्यामुळे कराव्या लागलेल्या कसरती ~ यांची प्रत्यक्षदर्शी माहितीदर्शन असलेले हे पुस्तक खरोखरीच फार छान आहे.

मला वाटते अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या पुढाकारानेच अपर्णा वेलणकर यानी हे संशोधनात्मक पुस्तक पूर्ण केले होते. जरूर वाच, नक्की आवडेल तुला.

(सॉरी फॉर अवांतर)

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"विवाहबाह्य संबंध ठेवणारी किंवा परपुरुषाच्या प्रेमात पडणारी स्त्री अंतिमतः दु:खी होते किंवा पुन्हा नवर्‍याकडे गेली तरच सुखी होते अशा प्रकारचं चित्रण असल्यामुळे मध्यमवर्गाला या कादंबर्‍या अधिक भावतात का?"

अशा (किंवा अशाच) कादंबर्‍या मध्यमवर्गाला भावतात (किंवा भावत असाव्यात असे म्हणतो) याला कारण म्हणजे शतकानुशतकाचे आपल्या मनावर झालेले 'कुटुंबव्यवस्थे'चे संस्कार. मी एकट्या हिंदु संस्कृतीविषयी म्हणत नसून सर्वसाधारणतः पाहिल्यास/मानल्यास 'वाचक नावाच्या अजब प्राण्याची' भूक इतपतच सीमित असते की "....आणि मग शेवटी मालती-माधव सुखाने संसार करू लागले." पूर्वीच्या नाथ माधव, हडप, शशी भागवत यांच्या कादंबर्‍यांना एक उपसंहार जोडलेला असायचा : "त्यानंतर राजा त्रिलोकनाथ आणि राणी इन्द्रायणी यानी वानप्रस्थाश्रम स्वीकारला. राजकुमार आदित्यचा राज्यभिषेक होऊन ते सम्राट बनले मग त्यानी आणि महाराणी सुवर्णलता यानी आपल्या प्रजेवर अलोट प्रेम केले. आदित्यचा मित्र भैरव आता सरसेनापती झाला त्याचा सैनिकांना खूपच आनंद झाला..." अशी राज्याची आबादीआबाद झाली की मग वाचकही सुखाने निद्रादेवीच्या अधिन होत असे. पु.ल. म्हणतात त्याप्रमाणे वाचकाची यापेक्षा "लई" मागणी नसायची.

इंग्रजी शिक्षणाची कवाडे खुली झाल्यामुळे आणि त्यानुसार विचारसरणीत पडलेला लक्षणीय बदल, स्वस्वातंत्र्याची झालेली हक्काची जाणीव, कोणत्याही गोष्टीकडे प्रगल्भतेने पाहण्याची निर्माण झालेली वृत्ती, पती हा परमेश्वर असेलही पण म्हणून हा परमेश्वर देऊळ सोडून कुंटणखान्याकडे तर जात नाही ना ? हे पाहण्याची दक्षता आणि जात असेल तर त्यामागची कारणमीमांसा जाणण्याची उर्मी, त्याला अनुसरून हळुहळु का होईना पण स्वतःत निर्माण होत असलेली बंडखोर वृत्ती, तिचा कानोसा, आदी घटनांनी त्या स्त्रीचे भावविश्व ढवळून जात असेलही. पण असे असले तरी तिने आपल्या आयुष्यात नव्याने पदार्पण केलेल्या प्रियकराला सर्वस्व अर्पून करून पहिल्या पतीला सोडून द्यावे असे वाचकाच्या पचनी पडत नाही हे ओळखण्याची टागोरांपासून चालत आलेली साहित्य परंपरा आजही अखंडित आहेच. बदल इतपतच की स्त्रीच्या त्या शोधक आणि हक्काच्या भूमिकेमुळे ट्रॅक सोडून जात असलेला नवरा नावाच्या प्राण्याबाबत असे दाखविले जाते "....आखिर अपनी हार मानकर दिलीप घर आ गया और शोभा ने बड्डपन दिखाकर उसकी एकही भूल को माफ कर दिया और उसे दिलसे लगा लिया |" (बासू भट्टाचार्य यांचा "गृहप्रवेश" याच 'शाम को घर आ गया भटका हुवा |" थीमवर होता.

"परोमा" मध्येही सुखीसमाधानाचा संसार सोडून त्या दोन दिवसाच्या फोटोग्राफरच्या प्रेमात पडलेल्या नायिकेला शेवटी मेन्टल हॉस्पिटलमध्ये ठेवण्याची वेळ येते त्यामुळे मध्यमवर्गीय वाचक/प्रेक्षक 'त्यामुळे' तसे झाले असा जो समाधानाचा सोयिस्कर अर्थ काढतो त्यामागील त्याची ती संस्कारित मनोवृत्तीच कारणीभूत असते. नानावटी खून खटल्यावर आधारित "ये रास्ते है प्यार के' मध्येही दुसरे काय होते ?

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तक परिचय अतिशय आवडला. वीरमती ही स्त्री आयुष्यभर एका मृगजळाच्या (illusion) मागे धावत असलेली वाटते. विशेषतः जी गोष्ट असाध्य अन अप्राप्य आहे तिची लागलेली तहान /obsession या गोष्टी कथावस्तूमध्ये ठळक रीतीने जाणवल्या. वर हरीष आपल्यावर प्रेम करतो म्हणजे त्याच्या बायकोशी त्याने शरीरसंबंध ठेऊच नये हा हट्ट किंवा इच्छाही पराकोटीची स्वार्थी अन चूकीची वाटते. चूकीची कारण जर इतका हक्क तिला हरीश वर गाजवायचा आहे तर मग फक्त शारीरीक संबंधांपर्यंतच स्वामीत्व का, संपूर्ण मनाने त्याला आपलासा करणं अशी महत्त्वाकांक्षा का नाही? अन तसे वाटणे हे स्वार्थी का वाटते ते स्वयंस्पष्ट आहेच.
.
अजुन एक पॉइन्ट जाणवला तो हा की प्रेम हे फक्त एकाच व्यक्तीवर असू शकते हे गृहीतक. अन याच पार्श्वभूमीवर एक अनवट इंग्रजी सिनेमा पाहीलेला आठवला ज्यात २ पुरुष-१ स्त्री की १ पुरुष-२ स्त्रिया हे तीघे एकमेकांवर प्रेम करतात अन त्यातून जे मूल होतं ते तीघेही एकत्र राहून सांभाळतात अशा काहीशा लाइनवरची कहाणी होती. अर्थात तीघा प्रौढ व्यक्तींचे कुटुंब होऊ शकते असा मेसेज्/अभिनव कल्पना त्यात होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडला.
हे पाटील सर सध्या सक्रीय नाहीत का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0