‘नातं - तुझं नि माझं’

प्रत्येक वाचकाला कधी ना कधी आपल्या वाचनछंदाचा मागोवा घ्यावासा वाटतो. एका निबंध-स्पर्धेच्या निमित्ताने मलाही तो घ्यावासा वाटला, काही वर्षांपूर्वी!
‘माझी मलाच स्पष्टता यावी’ ह्या एकमेव हेतूने तो निबंध लिहिला गेला. आणि सादरीकरण केले अर्थातच आमच्या ‘वाचकघर’मध्ये!
‘नातं - तुझं नि माझं’

क्षणाला आईच्या उदरातून बाहेर पडले, त्या क्षणाला शरीराने आतून सुटी होऊन बाहेर आले अन बाहेरच्या अनेक नात्यांनी बांधली गेले.आई-वडील, आजी-आजोबा, काका-काकू, मामा-मामी, मावशी-आत्या, सख्खी-चुलत-आत्ते-मामे मावस भावंडं......
वाढत्या वयाबरोबर शाळा-कॉलेज-क्लास-नोकरीतील मित्र-मैत्रीणी परिवार....
म्युझिक सर्कल्स-चित्रकला प्रेमी-फेसबुक सारखी सोशल नेटवर्क्स...
नात्यांची वर्तुळं विस्तारतच रहातात!
लग्नानंतर पती-पत्नी ह्यासह इतर अनेक नात्यांची भर पडली.आणि,‘आई’पण आल्यानंतर तर माझ्याच उदरातून जन्मलेल्या जीवाच्या निमित्ताने ‘अनंत काळची माताच’ झाले जणू!
थोडक्यात काय, तर रक्ताचे संबंध असोत किंवा नसोत, आपलेपणातून नाती जुळतात.

आता ह्या इतक्या सगळ्या नात्यांच्या गोतावळ्यात ‘नातं - तुझं नि माझं’ मधील नेमका ‘तू’ शोधणं अवघड झालं. वर उल्लेख केलेल्या प्रत्येक नात्याने वयाच्या त्या-त्या टप्प्यावर स्नेहबंधाचा अनुभव दिला. आपली जडण-घडण होण्यात त्या प्रत्येकाचाच काही ना काही सहभाग आहे हेही जाणवलं. पण लक्षात आलं...कुठलंच नातं सर्वस्वी अतूट नाही. काळाच्या ओघात, परिस्थितीनुरूप काहीकाही नाती संपून जातात, तर काही जास्त जवळ येतात. रक्ताच्या नात्यांचं स्वरूप बदलत रहातं. प्रत्येक नात्याला काही ना काही बंधनं अन मर्यादा आहेत, त्यामुळे अपरिहार्यपणे त्यासाठी तडजोडीही आवश्यक आहेत. आशा-निराशा, अपेक्षा-अपेक्षाभंगाचं दु:ख असं सगळं ह्या नात्या-गोत्यांत आहे.असं कोणतं नातं आहे की जे नेमकेपणाने वरील कुठल्याच कॅटेगरीत बसत नाही? आणि तरीही त्याच्यावाचून आपण जगूही शकत नाही? असं नातं जे त्याच्या स्वरूपाशी कुठलीही तडजोड न करावी लागता आपल्याशी कायमचं बध्द आहे?

मनात एकच नाव लखलखलं... वाचनछंद!
‘मी अन माझा वाचनछंद’
मला शब्दांची ओळख करून देणारा, त्यांच्यासमवेत अर्थपूर्ण जगायला शिकवणारा स्नेहबंध... वाचनछंद!
कधी अन कशी बरं आमची गाठ पडली? आमच्यातलं नातं कसं फुलत-बहरत राहिलं? आम्ही एकमेकांना काय अन किती दिलं?

॥ श्री ॥

१५.११.२००७

माझ्या प्रिय ‘वाचनछंदा’,

" काय देऊ तुला?भाग्य दिले तू मला !"

तुझं नि माझं नातं माझ्या शाळकरी वयापासून सुरू होऊन आजपर्यंत वेगवेगळी वळणं घेत आता अशा एका टप्प्यावर येऊन स्थिरावलंय की ह्यापुढे एकमेकांच्या साथीनेच आपण पुढे जाणार. ‘तू तिथं मी, मी तिथं तू!’आजवर पुस्तकं भरून वाचनानंद देत आला आहेस. अन माझी अवस्था मात्र ‘घेता किती घेशील एकाच मनाने’ अशी झाली आहे.

"मनास असते ओढ वाचनाची,वाचनाने तया येतसे ताजेपण;
वाचनातून मी आले वरती,वाचनावाचून अधुरे जीवन."

सुरूवातीला गोष्टींच्या पुस्तकांतून पर्‍या-राक्षसांचं, जादू-नवलाई नगर्‍यांच्या अद्भुत दुनियेचं दर्शन तू घडवलंस. त्यानंतर गाठ घालून दिलीस श्याम-त्याची आई-धडपडणारी मुलं, गोट्या, चिंगी, फास्टर फेणे, (अन अगदी अलिकडे लेकीच्या बरोबर चिंटू, बोक्या सातबंडे) अशा दोस्त मंडाळींशी! कालांतराने ‘अपूर्वाई’, ‘पूर्वरंग’ सारख्या पुस्तकांतून पु. ल. अन सुनीताबाईंचं बोट धरून घरबसल्या जगभर फिरवून आणलंस. शिवाय शाळा-कॉलेजातील अभ्यासांच्या पुस्तकांनी माझ्या ज्ञानात भर घालत होतासच!
व्यावसायिक शिक्षण-नोकरीमुळे वाचलेल्या स्व-मदत पुस्तकं अन चरित्रं-आत्मचरित्रांमधून विचार-प्रवृत्त करत होतास, माझ्या सकारात्मक बदल करायला मला भाग पाडत होतास.नंतर जेव्हा ‘मातृत्वा’च्या भूमिकेत शिरले, तेव्हा सुजाण पालक बनण्याच्या माझ्या धडपडीचा दिशा-दर्शक बनलास.
‘पुस्तकं वाचून जगता येत नसतं’ हे कळूनही तुझी साथ सोडवत नव्हती. अन तू? तूही माझ्यातील बदल निरखत मला बिलगून होतासच.तुझं नि माझं नातं अबोध पातळीवर सुरू होतं.

परंतु, त्यानंतरच्या काळात काही बदल होत गेले. नोकरीची ६ वर्षं, नोकरी सोडल्यानंतरची ७ वर्षं आणि एकीकडे संसारातील व्यस्तता ह्या सार्‍यात पूर्ण बुडाले. आणि ... तुझी साथ-संगत पार विसरूनच गेले.सातेक वर्षांपूर्वी नोकरी सोडल्यानंतर, व्यवसाय सुरू करण्यापूर्वी, थोडसं रिकामपण आलं. केवळ ‘रांधा-वाढा’च्या व्यापान मनाची घुसमट होऊ लागली. मित्र-मैत्रीणींच्या जगाशी संपर्क कमीच झालेला. एकलकोंडेपणा येऊ लागला. एक दिवस अचानक तुझी आठवण आली.तू आता कुठे असशील? इतक्या वर्षांच्या दुराव्यानंतर मला ओळखशील? माझ्या हाकेला ओ देशील? माझ्याकडे परत येशील?

"भेटिलागि जीवा, लागलीसे आस..."

म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग! तुझ्या शोधासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांतून एका घरपोच वाचनालयाची माहिती मिळाली. घरबसल्या चांगली, वाचनीय, दर्जेदार पुस्तकं मिळू लागली. तू माझ्याजवळच असल्याची खात्री पटली. इतक्या वर्षांच्या विरहानंतरही तुझं नि माझं नातं कधी संपलेलंच नव्हतं याची प्रचीती आली. मी तुला स्मरलं, न स्मरलं तरीही निरेपक्षपणाने मला जडविण्या-घडविण्यात मग्न राहीन तू माझी साथ कायम राखलीस, ह्याचा अत्यानंद झाला."ओळख वाचनछंदाची स्मरते,सांग पुस्तका कशी मी दिसते?"
कथा-कादंबर्‍यांच्या, वास्तवात नसलेल्या तरीही वास्तवाशी इमान राखून असणार्‍या, काल्पनिक जगाची सफर घडू लागली, ते जग आवडू लागलं. नकळतच मी स्वत:मध्ये गुरफटू लागले, कधी अन कशी ते माझं मलासुध्दा समजलंच नाही रे! तुझ्या संगतीने पुस्तकांतून स्वत:ला शोधण्याचा नाद लागला.

मी कोणासारखी दिसते?
‘स्व’शी ओळख पटल्यानंतर अनेक वर्षांच्या विवाह-बंधनातील विफलता लक्षात आल्याने त्यातून मोकळ्या होऊन, कुटुंब सोडून घराबाहेर पडणार्‍या गौरी देशपांडेंच्या नमू (‘दुस्तर हा घाट’), कालिंदी (‘थांग’, ‘मुक्काम’) सारखी मी दिसते? की,
कुन्दनिका कपाडिआंच्या वसुधा (‘सात पावलं आकाशी’) सारखी मी दिसते?
सानियांच्या सुचेता (‘आवर्तन’) सारखी श्रीरंगशिवय, केवळ त्याच्या आठवणींच्या बळावर जगायला शिकणारी? की नंदीता (‘स्थालांतर’) सारखी जगदीशच्या साथीने पंखांमध्ये बळ घेईन अवकाशात भरारी घेणारी?
मुलीच्या सुखासाठी, नाईलाजाने, तिच्यापासून चार हात लांब राहून तिच्यावर मायेची पाखर घालू बघणार्‍या, तिला जिंकल्याचा आनंद मिळावा म्हणून पराभवाचं सोंग घेणार्‍या जी. ए. कुलकर्णींच्या माधव कामतच्या आईसारखी (पराभव - ‘रक्तचंदन’)? की
रूग्णांची मनोभावे सेवा करूनही त्यांच्याकडून हेटाळणी वाट्यास आलेल्या मिस. डिसूझासारखी (वस्त्र - ‘रक्तचंदन’)?
दिलीप प्रभावळकरांच्या ‘एका खेळिया’प्रमाणे वेळोवेळी अनेक भूमिकांत शिरत राहणारी अष्टावधानी ‘होममेकर’ (कार्येषु मंत्री; करणेषु दासी; भोज्येषु माता; शयनेषु रंभा...) मी? की
विद्याताई बाळांच्या बरोबर एकतर्फी ‘संवाद’ साधत ‘स्वत:चा शोध’ घेणारी, स्वत:तील मिळवतेपणाचा अंदाज घेणारी (‘मिळवतीची पोतडी’) मिळवरी मी?

हळूहळू जाणवलं, मी आहे फक्त माझ्यासारखी! सर्वस्पर्शी, संवेदनशील, भावनाप्रधान मन असलेली ‘व्यक्ती’, निव्वळ स्त्री नव्हे! माझ्या मनातील परंपरेने चालत आलेल्या केवळ स्त्रीपणाच्या साखळ्या अलगद तुटत राहिल्या. पारंपारिक बंधनांच अस्तित्व स्वीकारून व अगदी मोकळ्या मनाने मी जगू लागले, ‘माणूस’ म्हणून!

तुझं नि माझं नातं तू जपून ठेवलं होतंस हे लक्षात येऊन मनोमन सुखावले. आजच्या आत्मकेंद्री जगात, माझ्याकडून कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न धरता, तू अजूनही माझ्याजवळ असल्याची, माझी साथ राखून असल्याचू खात्री पटली. मन समाधानानं भरून आलं.

"तुझं नि माझं नातं अभंग राहू दे,
तुझी नि माझी अशीच सतत साथ राहू दे!"

कितीही वाचलं तरी न शमणारी, ‘काय वाचू अन किती वाचू’ची तहान खूप सुखावणारी आहे रे माझ्या वाचनछंदा! आवडलेल्या प्रत्येक पुस्तकागणिक बदललेलं अनुभवविश्व, कोणत्याही एकाच साहित्य-प्रकाराशी मला फार काळ रेंगाळून ठेवत नाही. चरित्र-आत्मचरित्र, स्व-मदत पुस्तकांच्या बरोबरीने कथा-कादंबरी, कविता, समीक्षा, वैचारीक, ललित असं सर्व (आवडतं - नावडतं) असा भेद न मानता एकसारख्याच प्रेमाने वाचू लागले आहे मी!

जुन्या दिवसांच्या आठवणी जाग्या करणारी ‘शाळा’ (मिलिंद बोकील) मनात घर करते. आपल्या रोजच्या जगण्यापेक्षा वेगळं काही करणार्‍या ‘समुद्रापारच्या समाजां’विषयीचं (मिलिंद बोकील) कुतूहल जागं होतं. विजय पाडळकरांचं ‘नाव आहे चाललेली’, ‘चंद्रावेगळं चांदणं’, ‘सिनेमाचे दिवस पुन्हा’ चित्रपटांचा आस्वाद घ्यायला शिकवतं.चिं. त्र्य. खानोलकर, जी. ए. कुलकर्णी, गो. नी. दांडेकर अशा लेखकांच्या कथा-कादंबर्‍यांतील आदिबंध उलगडणारे ‘काळोखातील कवडसे’ (अरूणा ढेरे) मनाचे सारे कोपरे उजळवून टाकतात.

तुझं नि माझं नातं फुलवायला, एखाद्या टिपकागदाप्रमाणे सर्व काही शोषून घ्यायला माझ्या मनाला आई-वडिलांनी शिकवलं. जन्माच्या जोडीदाराने अपरिहार्यपणे का होईना पण तुझं नि माझं नातं टिकवून ठेवायला हातभार लावला.
‘वाचू आनंदे’च्या माध्यमातून माझ्या सखीने पुस्तकांचा कधीच न संपणारा अखंड राबता चालू ठेवला.
शिवाय ‘वाचकघर’च्या सार्‍या मैत्रीणींनी मला बोलतं-लिहितं केलं.
हे सगळेचजण तुझं नि माझं नातं जपायला मदत करताहेत. मला वाटतं ह्या सर्वांच्या ऋणात रहाणंच माझ्याबरोबरीने तूही पसंत करशील, होय ना?

तुझ्या नि माझ्या नात्यामुळे असंख्य पुस्तकांतील असंख्य व्यक्तिरेखांच्या रूपाने प्रेमाच्या, राग-लोभाच्या, मोहाच्या, वेगवेगळ्या भावभावनांच्या असंख छटा मला खूप जवळून अनुभवता आल्या. स्वत:कडे तटस्थपणे बघण्याची नजर तू मला दिलीस. हातचं न राखता हे सर्व देत असताना, तू स्वत:साठी काय मिळवतोस रे? माझं जगणं, जाणीवा समृध्द करत रहाणं हाच तुझा जीवनरस असतो का? शिवाय तूही इतका मनकवडा... मी तुला थेट काहीही सांगितलं नाही तरीही माझ्या मनातील भाव तू अचूक टिपलेस. म्हणूनच आता माझ्याप्रमाणेच माझ्या लेकीलाही स्वत:च्या सुरक्षित पंखांखाली अलगदपणे ओढून घेतलंस. आजच्या दूरदर्शन, संगणक, व्हिडिओ गेम्स अशा इडिअट बॉक्सेसच्या जमान्यात तू तिला आपुलकीने जवळ केलंस ह्या तुझ्या दूरदर्शीपणाला किती दाद द्यावी रे?

‘दुबळी माझी झोळी’ भरगच्च भरत राहणारा ‘भर्ता-भरविता’ तूच आहेस रे माझ्या वाचनछंदा!

"तुझ्या माझ्या नात्याला या आणि काय हवं?दररोज वाचायला पुस्तकच नवं... "

सदैव तुझीच,

चित्रा

१३.१२.२००७ - वाचकघर २४.

field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (4 votes)

प्रतिक्रिया

बरेच दिवसांनी लिहिलंत.. पण लिहिलंय छानच!

"तुझ्या माझ्या नात्याला या आणि काय हवं?दररोज वाचायला पुस्तकच नवं... "

अगदी खरं!

पुलेशु

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माणसाला एखादी गोष्ट मनःपूर्वक आवडणं मला फार भावून जातं. आपला लेख आपल्या वाचनप्रेमाची खूप चांगली साक्ष आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लेखन आवडलं. दगड, माती, शरीर, रक्ताचं जग खरं असतं, तसंच पांढऱ्यावरच्या काळ्यातून उभं राहिलेलं जगही स्वतंत्र विश्व बनतं, आपल्यासाठी खरं बनतं. त्या जगातल्या व्यक्तिरेखांमध्ये आपलं प्रतिबिंब पाहण्याचा बरंच काही देणारा तरीही दशांगुळं कमी पडणारा सोसही आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला स्वतःला वाचनाचा छंद नाही, पण आपला प्रतिसाद आवडला. जे काही कोणाला आवडते, त्याचे एक वेगळे विश्व बनून जाते.

बाय द वे दशांगुळे कमी पडणारा सोस का म्हटलं आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ते वाक्य असं हवं.
त्या जगातल्या व्यक्तिरेखांमध्ये आपलं प्रतिबिंब पाहण्याचा - बरंच काही देणारा तरीही दशांगुळं कमी पडणारा - सोसही आवडला.
प्रतिबिंब पाहण्याचा सोस, जो रोचक आहे पण त्यातून कुठल्याच व्यक्तिमत्वात आपण संपूर्णपणे काबीज झालो आहोत असं वाटत नाही, म्हणून कमी पडणारा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आई ग्ग!! हा लेख फेसबुकवर वाचला होता. बरा सापडला. अ-फा-ट मस्त!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...