"स्त्रियांच्या लैंगिकतेविषयी सकारात्मक दृष्टीकोन मांडला" - वंदना खरेंशी संवाद

वंदना खरे या 'योनीच्या मनीच्या गुजगोष्टी' मराठी रंगभूमीवर आणणाऱ्या भाषांतरकार आणि दिग्दर्शिका म्हणून आपल्याला माहीत आहेत. या वर्षी, महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्याशी केलेली ही बातचीत. त्यातून त्यांचं अन्य काम, त्यांची मतं, मराठी रंगभूमीवर झालेला हा नवा प्रयोग याबद्दल आपल्याला काहीतरी नवीन मिळेल अशी आशा वाटते.

ऐसी अक्षरे : तुमचा 'मिळून साऱ्याजणी'मधला लेख (लेखाचा दुवा) वाचला. त्यात तुमच्या वाढत्या वयातल्या अनुभवांबद्दल वाचलं. त्या वयात मानसिक आणि शारीरिक हिंसा सहन केल्यावर इतरांकडून मदतीची गरज असणे ते आपण आपली लैंगिकता समजून घेऊन तिचा सोहोळा करावा असं सुचवणारं 'Vagina Monologue' या प्रवासाबद्दल सांगा.

वंदना : हा प्रवास खूपच लांबलचक आहे. वयाच्या १८ व्या वर्षापासून जरी सुरुवात केली तरी मी हे नाटक करायला लागले (२००९) तिथपर्यंत किमान २५ वर्षांपेक्षा मोठा काळ होतोय... इतक्या वर्षातल्या भावनिक, बौद्धिक आणि इतर प्रवासाबद्दल सांगायला बरीच जागा लागेल... जवळजवळ माझं आत्मचरित्रच होईल ... इतकी जागा या एका मुलाखतीत तुम्हांला अपेक्षित नसेलच!

त्यामुळे थोडक्यात सांगायचं तर आधी मी स्वत:ला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी माझं आर्किटेक्चरचं शिक्षण पूर्ण केलं. त्याचसोबत स्वत:ला भावनिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न होत होते. या प्रयत्नांना स्त्रीवादी मूल्यांची जोड होती आणि अनेक स्त्रीवादी मैत्रिणींचीही साथ होती. वेगवेगळ्या प्रकारच्या स्त्रीवादाशी संबंधित इंग्लिश पुस्तकांचं वाचन होतं! या सगळ्या प्रवासाचा एक भाग म्हणून ह्या नाटकाचा अनुवाद आणि नंतर निर्मिती, दिग्दर्शन केलं. स्वत:ला समजून घेण्याचा आणि अनेक विषयांबद्दल सर्जनशील अभिव्यक्ती करण्याचा प्रवास अजून सुरू आहे.

ऐसी अक्षरे : "या देशात लोकांना खायलाही मिळत नाही आणि तुम्हांला लैंगिक उपभोगाबद्दल नाटक काय करायचंय?" असं तुम्हांला ऐकावं लागलं आहे. लोकांना खायला मिळत नाही म्हणणारे लोक, स्त्रियांना माणूस म्हणूनही जगू देत नाहीत, याची आठवण करून देणारं काही लिखाण, नाटक करायचा विचार आहे का?

वंदना : मी गेली पंचवीस वर्षं मी तेच तर करतेय! मी माझं आर्किटेक्चरचे शिक्षण पूर्ण करण्यापूर्वीच 'स्त्री-उवाच' नावाच्या स्त्रीवादी प्रकाशन गटात सामील झालेली होते. साधारण ८७ सालापासून मी या गटाशी जोडलेली आहे. त्या सुमारास स्त्रीमुक्ती यात्रा निघालेली होती. त्यासाठी काम करताना आणि त्यानंतरदेखील जे स्लाईड शोज बनवले गेले त्यांची स्क्रिप्ट्स लिहिणं, त्यांची कॉमेंट्री रेकॉर्ड करणं, पोस्टर सिरीजसाठी कॉपीरायटिंग करणं, देवदासी चळवळीसंबंधी लेख लिहिणं असं काही ना काही काम सुरूच झालेलं होतं. 'स्त्री-उवाच'तर्फे ८ मार्चला एक वार्षिक अंक निघत असे. १९९१ च्या अंकात झो फेअरबर्न्सच्या 'बेनेफिट' कादंबरीचा मी केलेला अनुवाद प्रकाशित झाला होता. मी तेव्हा ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर लग्न करून नाशिकला राहायला गेले होते. नाशिकमध्ये असताना मी ‘सकाळ’मध्ये आणि कधीतरी ‘मिळून साऱ्याजणी’मध्ये लिहीत असे आणि ‘प्रयोग परिवार’ नावाचा नाटक करणारा एक ग्रुप होता; त्यांच्यासोबत नाटक करीत असे!

१९९४ मध्ये मला मुलगी झाली. नंतर मी जेव्हा मुंबईला परत आले तेव्हा काही काळ माझं लिखाण अगदी बंद झालं होतं. माझी survival struggle सुरू होती. सुरुवातीच्या दोन वर्षांच्या काळात एकटीने राहत असताना अडीच वर्षांच्या मुलीला सांभाळून नोकरी करणं एवढं माझ्यासाठी खूप थकवणारं होतं. त्यात माझा नवरा मला खुनाच्या धमक्या देत असे; त्याच्यापासून लपून रहाण्याचा ताण होता. ह्यादरम्यान मी आर्किटेक्चर सोडून स्वयंसेवी संस्थेत नोकरी करायला सुरुवात केली. तिथे जेमतेम कामाचे रिपोर्ट लिहायला लागत तेवढेच लिहीत असे. पण दोनेक वर्षांत नवऱ्याबद्दलची भीती हळूहळू कमी झाली; आणि मी किंचित मोकळी व्हायला लागले.

ह्या संस्थेमधलं काम शिक्षक आणि शाळांशी थोडं जोडलेलं होतं आणि माझी मुलगीदेखील तेव्हा शाळेत जायला लागलेली होती. त्या वेळी मला वारंवार 'अब्राहम लिंकनचे पत्र' अनेक शाळांमध्ये लावलेले दिसायचे. माझा शिक्षण व्यवस्थेबद्दलचा एक नवा विचार त्यावेळी माझ्या मनात दृढ होऊ लागलेला होता. त्याचं प्रतिबिंब त्या पत्राचं स्त्री-वादी दृष्टीकोनातून रुपांतर करताना उमटले. हे रुपांतर मी त्यावेळी ‘चित्रलेखा’ आणि ‘मिळून साऱ्याजणी' अशा दोन मासिकांना पाठवलं होतं. ते दोन्ही मासिकांनी एकाच वेळी प्रकाशित केलं. 'मिळून साऱ्याजणी' मासिकाच्या वाचकांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला असावा. कारण त्यांनी ते पोस्टरच्या रूपात प्रकाशित केलं.

आज इतक्या वर्षांनंतरदेखील त्याच्या प्रती विकल्या जात असतात. हे पत्र अनेक शाळांमध्ये लावलेलं असतं. अनेक कार्यशालांमध्ये ते वापरलं जातं, अनेक विषयांच्या हस्तपुस्तिकामध्ये ते छापलं गेलं (माझी परवानगी न घेता किंवा मला न कळवता ) मी या पत्राचं एखाद्या मोनोलॉगसारखे सादरीकरणदेखील करीत असे. शिवाय, कष्टकरी वर्गातल्या मुलींसोबत मी मुंबईत पहिल्यांदा जेव्हा पार्टीसिपेटरी थिएटर केलं तेव्हा याच पत्राचा उपयोग केला होता.
मी साधारण २००० सालापासून 'पार्टीसिपेटरी थिएटर' हे माध्यम वापरून काम करीत आहे. त्यात आई-मुलगी या संबंधांतील तणाव, मुलींची रस्त्यात होणारी लैंगिक छळणूक, मासिक पाळीच्या अनुषंगाने येणाऱ्या सामाजिक समस्या, बालविवाह अशा अनेक विषयांचा समावेश असतो. (पण 'पार्टीसिपेटरी थिएटर' हे एका छोट्या गटापर्यंत मर्यादित असतं आणि पर्फोर्मंस हा त्याचा मुख्य हेतू नसतो त्यामुळे त्याची मुख्य प्रवाहातल्या माध्यमातून दखल घेतली जात नाही; त्यामुळे माझं हे काम कुणाला फारसं माहित नसतं.) हे काम आत्त्तापर्यंत शहरातल्या आणि खेडेगावातल्या मुलामुलींसोबत केले आहे.

लैंगिकता, स्त्री-पुरुष समभाव आणि प्रसार माध्यमांची चिकित्सा ह्या विषयांशी माझं काम मुख्यतः निगडीत असतं. मी वेगवेगळ्या वयोगटातील आणि व्यवसायातील लोकांसाठी या विषयांवर कार्यशाळा घेत असते आणि लिहित असते. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, सकाळ, लोकमत, लोकप्रभा, चित्रलेखा, तनिष्का, मिळून साऱ्याजणी, कारभारनी अशा अनेक मासिकात आणि वृत्तपत्रात माझे लेख प्रकाशित झालेले आहेत. माझ्या कामाचे स्वरूप खूप हेक्टिक असल्यामुळे कॉलम सारखे नियमित लिखाण मात्र मला झेपत नसे. मी साधारण सहा महिन्यांच्या वर कुठलाच कॉलम चालवू शकले नव्हते. ‘मिळून साऱ्याजणी’ मासिकातल्या माझ्या कॉलमचे नंतर ‘पाच प्रश्न शंभर उत्तरे’ नावाचे पुस्तक तयार झाले. २०११ मध्ये ‘दिव्य मराठी’ लिहिलेल्या कॉलममधील लेखांमध्ये काही आणखी लेखांची भर पडली आणि ‘नवज्योती सह्याद्रीच्या’ हे पुस्तक युनिसेफतर्फे प्रकाशित झाले आहे. पण मागच्या वर्षापासून मी जरा आणखी नियमित लिहायला लागले. २०१३ सालात लोकप्रभात माझा ‘स्त्री-मिती’ नावाचा कॉलम होता. यावर्षी 'दिव्य मराठी' मध्ये कॉलम सुरू झालाच आहे. त्यात मी जेंडर आणि मिडीया या विषयावर लिहिते आहे.

ऐसी अक्षरे : कणेकरांच्या प्रतिक्रियेने तुम्हाला बराच क्लेश झाला. कणेकरांची एकूण पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांची प्रतिक्रिया अनपेक्षित होती का? नसल्यास त्याची एवढी दखल घ्यावी असं तुम्हाला का वाटले की त्यांच्या प्रतिक्रियेने झालेल्या आर्थिक नुकसानीची झळ पोहोचल्याने दखल घ्यावी लागली?

वंदना : आर्थिक नुकसान होण्याइतकं मुळात काही नव्हतंच. नाटक नुकतंच सुरू झालेलं होतं. पण कणेकरांची प्रतिक्रिया मला अनेक त्यासारख्या प्रतिक्रियांचं प्रतिनिधित्व करणारी वाटली; नाटकाला वृत्तपत्रातून जसा एकीकडे positive response मिळाला होता; त्याचवेळी अनेक लोक थोडी negative कुजबूज देखील करत होतेच! 'अॉर्कुट'च्या माध्यमातून ती कुजबूज व्यक्त होत होती. याच कुजबुजीला कणेकरांकडून लेखाचे रूप मिळाले आणि त्यामुळे कुजबूज (व्हिस्पर कँपेन ) करणाऱ्यांचा आवाज आणखी वाढला. मला त्या सगळ्याचा जो एकत्रित त्रास होता, क्लेश होते आणि त्या सर्वांना मी एकत्रितपणे दिलेले ते उत्तर होतं. मला पाठींबा देणारे काही लोक तेव्हाही होते पण त्यांचा आवाज त्या विरोधी सुरापेक्षा अगदीच क्षीण होता. मुख्य म्हणजे तो माझ्यापर्यंत पोचत नव्हता. अनेक लोक कुंपणावरचेही होते. त्यातले काही मजा बघणारेही होतेच. अनेकांना आपण पाठींबा व्यक्त करावा की नाही याबद्दल संभ्रम होता. कणेकरांना उत्तर देण्यासाठी 'लोकप्रभा'ने स्पेस देऊ केली होती. तिचा मी उपयोग करून घेतला. 'अॉर्कुट'सारख्या ठिकाणी उत्तर देताना दोन तीन अडचणी असतात. एक म्हणजे तिथे जागा कमीच असते; आपले म्हणणे सविस्तर मांडता येत नाही, दुसरं म्हणजे ती जागा एकप्रकारे flippant comments चीच मानण्याचा प्रघात असतो, तिथलं कुणी फारसं सिरीयसली घेत नाही. लोकप्रभाचा वाचकवर्गदेखील माझ्या अॉर्कुट पानापेक्षा नक्की मोठा होता. आणि तिथे दिलेल्या उत्तराचा impact जास्त झाला हे दिसलंच!

मी दिलेलं उत्तर खूपच लोकांना आवडल्याचे ई मेल्स मला आले. नाटकाच्या प्रेक्षकांनीही मला प्रत्यक्ष येऊन तसं सांगितलं. अॉर्कूटवरचा प्रतिसाददेखील बदलला. हे सगळे सकारात्मक बदलही घडलेच! त्यामुळे मी त्या लेखाला प्रतिसाद देणं गरजेचं होतं हेच मला पटतं. अजूनही प्रथमच भेटणारे अनेक लोक मला माझं ‘ते’ उत्तर वाचल्याची आठवण आवर्जून सांगतात!

ऐसी अक्षरे : लैंगिकतेसंबंधात होणाऱ्या चर्चांबद्दल तीव्र दुस्वासाची, कणेकरांची आली तशी प्रतिक्रिया येऊ शकते हे पाहिलंच. दुसऱ्या बाजूने Vagina Monologue मधला विचार पूर्णपणे मान्य असणारेही लोक आहेत. यांच्या अधेमधे, कुंपणावर असणाऱ्या लोकांचाही मोठा वर्ग आपल्या समाजात आहे. साधारण मध्यममार्गी, पापभीरू असं यांचं वर्णन करता येईल. नाटकात वर्णनं असणारी युद्ध, संबंधित अत्याचार याला हा वर्ग मान्यता देत नाही पण लैंगिकतेबद्दल चारचौघात बोलणंही या लोकांना पटत नाही. "योनी हा शब्द एकत्र म्हणू" हे सरळच इंग्लिशमधून मराठीत आणताना हा वर्ग दुरावण्याची भीती वाटली का?

वंदना : तुम्ही पापभीरू, मध्यममार्गी अशा वर्गाबद्दल अशा वर्गाबद्दलच म्हणत असाल तर तो वर्ग दुरावायची भीती अजिबातच नाही वाटली. उलट मी अतिशय कन्व्हिक्शनने माझा पहिला प्रवेश करते. तो प्रेक्षकांशी एक छोटासा पण महत्त्वाचा संवाद असतो. नाटकाच्या सुरुवातीला ‘योनी’ हा शब्द उच्चारायला लावून मला त्यांची मनोभूमिका तयार करायची असते. अनेकजण हे नाटक पहायला बिचकत-बाचकत आलेले असतात. ते अशा संवादाने जरा खुलतात, सावरतात, नाटक पाहण्याचा त्यांचा संकोच कमी होतो. अनेक प्रेक्षक ‘त्या’ प्रवेशाबद्दल आवर्जून सांगतात की तुम्ही सुरुवातीला बोलता ते खरंच गरजेचंच आहे “..नाहीतर,अशा विषयावर हसायची तशी सवय नसते ना!...” त्या पहिल्या प्रवेशात मी जे काय बोलते ते काही मी आयत्यावेळी सुचेल तसं बोलत नाही; नाटकातील इतर संवादाप्रमाणेच तेही नीट लिहून काढलेलं आहे, लोक कुठे काय प्रतिसाद देतील त्याचा अंदाज घेत बसवलेलं आहे; आणि ते तसंच असायला हवं असे मला ठामपणे वाटतं. तो प्रवेश इतर काही कलाकारांना करायला देण्याचा प्रयोगही मी करून पाहिला आहे; पण वरवर दिसायला सोप्पा वाटणारा तो प्रवेश करताना सगळ्या जणींची गडबड उडत असे. त्यातून एकून प्रयोगाचा इफेक्ट खराब होत असल्याचे लक्षात आल्यावर तो प्रवेश आता आवर्जून मीच करते. इतक्या प्रयोगानंतर तो प्रवेश आणि त्यातला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून प्रयोगात यापुढे कसा, कुठेकुठे प्रतिसाद मिळणार त्याविषयी मी आता खात्रीने सांगू शकते. इतकच नाही तर मुंबईमध्ये दादर, कल्याण, डोंबिवली, ठाणे, गिरगाव, बोरीवली इथे कसकसे प्रतिसाद मिळतील त्याचे ठोकताळे बनलेले आहेत.

पण याशिवाय काही लोक ‘दांभिक’ किंवा सोप्या शब्दात खोटारडे देखील असतात; ते मात्र दुरावेलेले आहेत हे नक्की. स्वत:ला ‘कलाकार’ म्हणवणारे काही लोक या नाटकाबद्दल आवर्जून ‘वाईट’ लिहित असतात; बोलत असतात. नाटकाला इतकंदेखील यश मिळावं हे त्यांना आवडलेलं नाही हे उघड आहे! असं बोलणारे “कलाकार” स्वत: काय प्रकारचे काम करतात, तेही लक्षात घ्यावे लागेल. आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे अशा लोकांच्या मूर्ख ताशेऱ्यांना परस्पर इतरही अनेकजण छेद देतच असतात. मी स्वत: त्याना उत्तरं देत बसावं इतकं त्यांचं महत्त्व मला वाटत नाही.

ऐसी अक्षरे : 'योनीच्या मनीच्या गुजगोष्टी' हे नाटक मराठी प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचा उद्देश १००% यशस्वी झाला असं वाटतं का? हा प्रश्न यासाठी की प्रेक्षक पहिल्यांदाच स्त्रियांची लैंगिकता या विषयावर उघडपणे आणि जाहीरपणे आणि सामूहिकपणे पाहात असतो, ऐकत असतो तसेच प्रतिसाद देत असतो.

वंदना : 'योनीच्या मनीच्या गुजगोष्टी' हे नाटक मराठी प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचा उद्देश आणि तो “यशस्वी” होण्याचीही वेगवेगळी परिमाणे आहेत. मी माझा फक्त उद्देश आणि माझे ‘यश’ मोजण्याचे माप सांगू शकते. उदा. संख्यात्मक स्वरूपात जर हे यश मोजायचे ठरवले तर, मी जेव्हा ईव्ह एन्सलर कडून पहिल्यांदा प्रयोगाची परवानगी काढली तेव्हा फक्त तीन प्रयोग करावे असं मनात होतं. तालमी सुरू असताना जे अनुभव आले त्यावरून एकतरी प्रयोग होईल की नाही अशी पहिल्या प्रयोगापर्यंत काळजी होती. पण आज १४५ प्रयोग झाले आहेत.... म्हणजे माझ्या कल्पनेपलिकडचीच भरारी आहे. पण मराठीत अनेक नाटकांनी हजाराच्यावर मजल मारलेली आहेच.... त्या मनाने १४५ प्रयोग म्हणजे काहीच नाही! अगदी लैंगिकतेला मध्यवर्ती ठेवून माझ्या नाटकानंतर तीन वर्षानी आलेलं ‘एक चावट संध्याकाळ’ ह्या नाटकाचं उदाहरण घेतलं तरी त्याचेही एका वर्षात शंभर प्रयोग झाले. मला मात्र शंभरी गाठायला तीन वर्षे लागली..... अशीही तुलना करता येईल! पण मुळात अशी तुलना करूच नये असे मला वाटते. कारण दोन्ही नाटकांचे उद्देश पूर्णपणे वेगळे आहेत. त्याचबरोबर ते ‘चालवण्या’च्या पद्धती वेगळ्या आहेत.
मी हे नाटक सुरू केल तेव्हा माझा उद्देश होता की ‘स्त्रियांच्या लैंगिकतेविषयी सकारात्मक दृष्टीकोन मांडावा आणि त्याबद्दल मोकळेपणाने बोलता येईल असे एक अवकाश तयार व्हावे.’ हा उद्देश नक्की सफल झालाय असं मला वाटतं!

या नाटकामुळे मराठी माणसांचा लैंगिकतेकडे पहायचा दृष्टीकोन आमूलाग्र बदलून जावा, अशी काही माझी अपेक्षा नव्हती. आणि एखादं नाटक काही अशी क्रांती घडवत नसतं ....मी नाटक अनुवादित केलं ते त्यातल्या assertive humor च्या प्रेमात पडून! गेली अनेक वर्षं मी Gender आणि Sexuality या विषयांबद्दल विविध प्रकारच्या समूहांसाठी कार्यशाळा घेते आहे... त्यामुळे लैंगिकता या विषयाबद्दल लोक बोलायला बिचकत असले तरी त्याबद्दल ऐकून घेण्याची त्यांच्या मनाची तयारी आहे, हे तर मला समजलेलं होतंच. अनेक वर्षांपासून स्त्री-वादी चळवळीशी मी जोडलेली आहे; त्यामुळे स्त्रियांच्या लैंगिकतेविषयी जी नकारात्मक भावना समाजात आहे आणि ती दूर करायचा काही ना काही प्रयत्न करत रहायला पाहिजे, हेही मला जाणवत होतं. नाटक या माध्यमातून हा प्रयत्न चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो याचीही जाणीव होती. त्यामुळे स्त्रियांच्या लैंगिकतेविषयी ठामपणाने सकारात्मक विचार मांडणारे हे नाटक करायचे आणि प्रयोगानंतर त्यावर चर्चा घडवून आणायची असं ठरवलं होतं. त्यानुसार पहिले पंचवीस प्रयोग तर आवर्जून चर्चा घडवून आणल्या. लैंगिकता या विषयाबद्दल सार्वजनिक ठिकाणी मोकळेपणाने बोलायची एक Safe Space त्यातून तयार होऊ शकली. अजूनही संस्थाशी जोडून जेव्हा प्रयोग केले जातात तेव्हा अशा चर्चा आयोजित केल्या जातात. इतक्या मर्यादित अर्थाने जरी विचार केला तरी नाटक आपल्या उद्देशात यशस्वी झाले असेच मी म्हणेन. पण असे विषय हे बहुधा स्वयंसेवी संस्थांशी जोडलेल्या कार्यकर्त्यांपुरतेच मर्यादित रहातात हे देखील माझ्या लक्षात येत होतं! त्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत हा विषय पोचवण्यासाठी Ticketed Shows सुरू केले. नाट्यगृहात झालेल्या प्रयोगानंतर त्याविषयी चर्चा करायची प्रेक्षकांची मानसिकता नसते. त्यामुळे संस्थांसाठी झालेल्या प्रयोगानंतर होणाऱ्या चर्चा इथे घडवता आल्या नाहीत. मात्र माझ्या नाटकात एकही वलयांकित प्रसिद्ध कलाकार नसताना देखील प्रत्येक प्रयोगानंतर किमान दहा ते पंधरा प्रेक्षक येऊन भेटतात आणि प्रतिक्रिया सविस्तर सांगतात. हे नाटक करत रहाणं किती महत्त्वाचे आहे, हे ते बोलून दाखवतात. अनेक पुरुष प्रेक्षक त्यांची लैंगिकतेकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलल्याचं आवर्जून येऊन सांगतात हे सगळं यशाचंच द्योतक आहे असं मी समजते. नाटकाच्या नावामुळे नाटकाकडून Titillation च्या अपेक्षा ठेवणारेदेखील प्रेक्षक असतातच ... आणि आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीयेत हे समजल्यावर ते चुकीच्या ठिकाणी हसून किंवा जांभया देऊन नाटक आवडत नसल्याचं संकेतही देतात. अशा वेळी मी एकदा नाटक थांबवलं आणि निषेध व्यक्त केला. तेव्हा अनेक प्रेक्षकांनीच आचरटपणा करणाऱ्या त्या पोरांना हाकलून लावले होते. माझ्या दृष्टीने हाही नाटकाचा उद्देश सकारात्मक पद्धतीने पोचल्याचा एक पुरावा आहे! स्त्रियांच्या लैंगिकतेविषयी स्त्रियांच्याच तोंडून गांभीर्याने आणि विनोदानेही बोललेलं लोकाना ऐकायचे आहे, हे त्यांच्या प्रतिसादावरून मला प्रत्येकवेळी समजतं.

ऐसी अक्षरे : भारतीय लोकांना बोस्निया किंवा चीनसारखा व्यापक हिंसेचा अनुभव नाही. (गोध्रात तसा संघटित प्रयत्न करून झाला.) अशा वेळेस बोस्नियन स्त्रियांचं दुःख भारतीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना अडचण आली का?

वंदना : एकूणातच ‘दु:खाचा’ अनुभव पोचवणं ही अडचण नव्हतीच. स्त्रियांवर अत्याचार होतात आणि ते होऊ नयेत इतपत समजूत समाजात तयार झालेली आहे. खरी अडचण दिसली ती स्त्रियांनी स्वत:ला "सुख होत आहे" हे जाहीरपणे म्हटलेले पचवण्याची. अगदी जेन्डरविषयी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्तेदेखील येऊन सांगत असत की "बलात्काराबद्दल सांगणारे गंभीर भाग छान आहेत पण बाकी विनोदी भाग जरा कमी करा ना!"

एकूणच स्त्रियांची लैंगिकता म्हणजे अन्य्याय, अत्याचाराच्या विरुद्ध बोलणे असे आपले जे समज आहेत त्याचा हा परिपाक आहे. सुरुवातीच्या एका प्रवेशात ३ मैत्रिणी मिळून आपसात गप्पा करताना योनी विषयीचे विरोधाभास मांडतात. तो भाग अगदी हसतखेळत केला जातो. आपली योनी कुठलं गाणं म्हणाली असती, अशा प्रकारचे क्रेझी डायलॉग देखील आहेत; मासिकपाळीच्या निमित्ताने वाळीत टाकल्यासारखे वागवणे आणि त्याच कारणासाठी देवीची पूजा केली जाणे अशा विरोधाभासांवर बोट ठेवलेले आहे. नंतर एका प्रवेशात ‘चूत’ हा शब्द शिवीसारखा वापरला जातो त्याविरुद्ध बंडखोरी म्हणून त्यातला निगेटिव्ह अर्थच काढून टाकायचा प्रयोग केला जातो. या सगळ्यात Assertive Humor आहे – आणि विद्रोह देखील आहे. मराठी साहित्य विश्वाला दलितांचा विद्रोह नवीन नाही पण स्त्रियांच्या अशा विद्रोहाची अभिव्यक्ती मात्र नवीन होती. या नाटकात द्वयर्थी बोलणे अजिबात नाही मंचावरून आम्ही जे बोलतो ते अगदी थेट आहे.... शिव्या जरी उच्चारल्या तरी त्यादेखील नेहमी जसा कुणाचा तरी अपमान करण्यासाठी उच्चारतात त्यासाठी नाही आहेत; किंवा राग व्यक्त करण्यासाठीदेखील नाहीत.

ऐसी अक्षरे : मूळ नाटकाची संहिता लेखिकेने घेतलेल्या २००हून अधिक स्त्रियांच्या मुलाखतीवर आधारित आहे. त्या स्त्रिया ज्या पद्धतीने व्यक्त झाल्या असाव्यात त्याच्याशी इंग्रजी संहिता प्रामाणिक असावीशी वाटते त्यामुळे कदाचित ती अधिक प्रभावी झाली असावी. (मराठी नाटकाची क्लिप पाहिली त्यावरून) भाषांतराऐवजी, अशा पद्धतीच्या मुलाखती वेगवेगळ्या आर्थिक-सामाजिक गटातल्या, वेगवेगळ्या वयाच्या मराठी स्त्रियांच्या मुलाखती घेऊन त्यावर नाटक उभे केलं असतं तर ते अधिक परिणामकारक आणि अजून मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचलं असते असे वाटते का?

वंदना : ईव्ह एन्सलरजवळ त्या २०० स्त्रिया कशा व्यक्त झाल्या ते फक्त तिलाच माहित असेल. पण या नाटकासंबंधी तिला प्रश्न विचारले जात असताना एकदा मी हजर होते. तिला असं विचारलं गेलं ,“नाटकातले काही भाग अगदी काव्यात्मक आहेत (उदा. एका बाईला आपल्या क्लायटोरीसची जाणीव होणे किंवा एका मुलीला लेस्बियन बाईने दिलेला अनुभव इ.) तर बायका स्वत:च्या अनुभवांबद्दल तुमच्याशी खरंच अशा भाषेत बोलल्या होत्या का?” तेव्हा तिने सांगितले की , “मुळीच नाही. त्यांची अभिव्यक्तीची भाषा अगदी निराळी होती. पण मी माझी क्रिएटीव्हीटी वापरून हे नाटक अशा पद्धतीने लिहिलेलं आहे.” थोडक्यात इंग्रजी संहिता प्रभावी असण्याचे कारण ईव्हचे लिखाण हे आहे! मी त्याचे रुपांतर करताना गाभा कायम ठेवून सांस्कृतिक संदर्भ मात्र बदलले आहेत. उदा. बोस्नियन महिलांवर होणाऱ्या युद्धातील बलात्काराच्या संदर्भाऐवजी नक्षलवादाच्या प्रभावामुळे चन्द्रपूर, गडचिरोली अशा भागातल्या अत्याचारांचा संदर्भ आहे. एका मोनोलॉगमध्ये पाश्चात्य देशांत बारीक असण्याला सुंदर मानले जाते असा संदर्भ होता त्याऐवजी गोरे असण्याला सुंदर मानले जाण्याचा उल्लेख केलाय.
असे अनेक बदल आहेत. नेटवर असलेली एखादी दोन मिनिटांची क्लिप पाहून नाटकातल्या सांस्कृतिक संदर्भांबद्दल बोलणे योग्य नाही.

मी या नाटकाचे भाषांतर केलं नसून रुपांतर केलं आहे. ते culturally relevant आहे अशी माझी खात्री आहे. अनेक प्रेक्षकदेखील मला आवर्जून तसे येऊन सांगतात. आणखी एक छोटेसं उदाहरण देते. मूळ इंग्लिश नाटकात Reclaiming Cunt नावाचा एक प्रवेश आहे. त्यात Cunt या श्ब्दातीला एकेक अक्षर घेऊन त्यातून योनीबद्दल सकारात्मक अर्थ मांडला जातो. त्याऐवजी माझ्या नाटकात ‘चूत’ हा शब्द वापरला आहे. त्या शब्दाला सकारात्मक अर्थ देण्यासाठी तो वेगवेगळ्या पद्धतीने म्हणून पाहिला जातो. वेगवेगळ्या शब्दांसोबत म्हटला जातो .... आणि एकदा तर ‘कीस बाई कीस’च्या चालीवर ‘चूत बाई चूत, चुतडी चूत! कुणाची चूत बाई कुणाची चूत? तेरी भी चूत और मेरी भी चूत!’ असं गाणंही म्हटलं जातं. प्रेक्षक तो सगळा प्रसंग अतिशय एन्जॉय करतात. नाटकात अशी अनेक उदाहरणं आहेत. माझं जे रुपांतर आहे ते आपल्या सांस्कृतिक संदर्भांपासून दूर असल्यामुळे प्रभावहीन आहे असे मला तरी वाटत नाही आणि हे माझे वाटणे मला जो प्रेक्षकांचा प्रतिसाद दर प्रयोगाला मिळतोय त्यावर आधारित आहे.

ऐसी अक्षरे : या नाटकाच्या प्रयोगांमुळेतुमच्या व्यक्तिगत आयुष्यात, तुमच्या स्त्रीवादाच्या आकलनात काही बदल झाले काय, भर पडली का?

वंदना : माझ्या स्त्रीवादाच्या आकलनात या नाटकामुळे बदल व्हावा इतका मोठा ऐवज यात आहे असे मला तरी वाटत नाही. मी साधारण १९८५ पासून आजतागायत स्त्रीवादाची विविध रूपे समजून घेत आले आहे. वाचन असते, कामानिमित्त चर्चा असतात त्यातून सतत update होणे सुरूच असते. पण खासकरून या नाटकामुळे स्त्री –वादी जाणीवेत काही भर पडली असे नाही वाटत.

पण व्यक्तिगत आयुष्यातल्या अनेक खासगी बाबींमध्येही या नाटकामुळे म्हणजे नाटक सादर करण्याच्या अनुभवामुळे खूप फरक पडलाय हे नक्की.
अ. नाटक रुपांतरीत करण्यापूर्वी देखील मी लिहित होते. वर्षातून पाच–सहा लेख तरी कुठे ना कुठे छापून येत असत. माझे एक पुस्तक देखील प्रकाशित झालेले होते. एका कादंबरीचा अनुवाद प्रकाशित झाला होता. पण तरीही मी ‘लेखिका’ नाही, असे मी म्हणत असे! कुणी तसा उल्लेख केला तर मी तो खोडून काढत असे. पण नाटकानंतर मात्र मी स्वत:ला ‘लेखिका’ म्हणून मान्य केलं.
आ. मी नाटकाचे केवळ रुपांतर केलेलं नाही तर प्रत्येक प्रयोगात मी अभिनयदेखील करते. मला पूर्वी मेक–अपबद्दल काहीही ज्ञान नव्हतं. पण नाटकामुळे ते नव्यानेच समजलं. पूर्वी मी महिनोनमहिने आरशात पहात नसे. पण नाटकाच्या निमित्ताने आरशात पहायची सवय लागली. हळूहळू स्वत:च्या दिसण्याबद्दल जागरूकता येत गेली.
इ. नाटकाच्या निर्मितीशी आणि व्यवस्थापनाशी संबंधित अनेक गोष्टी समजल्या. पहिल्या काही प्रयोगांची तिकिटे मी घरच्या घरी computer वर डिझाईन करून प्रिंट आउट काढले होते. पण तिकिटे अशी तयारच छापून मिळतात हे मला सावकाशीने समजलं.
ई. नाटकामुळे खूप नवीन ओळखी झाल्या तसेच जुन्या ओळखीच्या अनेकांचे बुरखे फाटले! नाटकावर टीका होत असताना काहींनी माझ्याशी ओळख नाकारली तर काहीजण बोटचेपी भूमिका घ्यावी असा सल्ला देत राहिले. अशा वागणुकीमुळे त्यांची पूर्वी जी ‘ओळख’ होती ; त्या ऐवजी नव्याने ओळख पटली!

ऐसी अक्षरे : मराठीत लैंगिकता या विषयावर रस घेऊन वाचावं असं ललित लिखाण बहुतांशी वयात येणाऱ्या मुलग्यांसाठी आहे, पिवळ्या पुस्तकांच्या रूपात. यात काही सकारात्मक बदल घडताना तुम्हाला दिसतात का? 'योनीच्या मनीच्या गुजगोष्टी', निदान शहरी भागात तरी जुनं झालं. अशासारखं अजून काही घडताना, रंगमंचावर, टीव्ही, चित्रपटात, छापील लिखाणात दिसतं का? फेसबुक, ब्लॉग्ज यांच्यामुळे माध्यमांचं लोकशाहीकरण होत आहे असं जे म्हणतात, त्याचा परिणाम म्हणून या माध्यमांमधे चांगल्या प्रकारे लैंगिकतेसंदर्भातले विषय हाताळले गेलेले तुम्हाला दिसले आहेत का?

वंदना : मी कधी ‘पिवळी पुस्तके’ म्हणतात तसे लिखाण वाचलेले नाही. त्यामुळे त्यात काय फरक पडला याची माहिती माझ्याकडे नाही.

''योनीच्या मनीच्या गुजगोष्टी' निदान शहरी भागात तरी जुनं झालं.’ हे वाक्य समजून घ्यायला मला अवघड आहे! या नाटकाला मंचावर येऊन ४ वर्ष झाली आहेत. पण अजून दीडशे प्रयोगसुद्धा झालेले नाहीत. त्यातले अर्ध्याहून जास्त प्रयोग तर मुंबई, पुणे आणि नाशिक एवढ्या त्रिकोणातच झालेत. अजून सातारा, इचलकरंजी, कराड, सोलापूर, वाई या पश्चिम महाराष्ट्रातल्या सहज पोचता येईल अशा शहरातदेखील प्रयोग नाही केले. मग चन्द्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, जालना, परभणी तर फारच लांब आहेत. पण प्रश्नकर्त्यांना हे वर उल्लेख केलेले भाग शहरी वाटतात की नाही मला माहित नाही.

सध्या अशासारखा अजून काही घडताना दिसतंय का, या प्प्रश्नाला उत्तर असे आहे की “योनी” हा शब्द ज्या नाटकांच्या नावात आहे अशी दोन नाटकं सध्या रंगमंचावर आहेत. त्यातल्या एका नाटकाने तर माझ्या नाटकाच्या नावामागे “अशा या” ह्या दोन शब्दांचे शेपूट जोडून लबाडी करायचाही प्रयत्न केला होता. त्यांच्यावर खटला करून मला माझा हक्क शाबित करावा लागला होता. तर अशाही प्रकारे सवंगपणे हा शब्द तरी वापरला जातोय.

सध्या लैंगिक आशय व्यक्त करणारी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘चावट संध्याकाळ’ने अशा नाटकांच्या मालिकेला सुरुवात झाली. त्या नाटकाने ‘महिलांना प्रवेश देणार नाही’ अशी जाहिरात करून controversy तयार करायचा प्रयत्न केला होता. तो यशस्वी झाला देखील. एकापुढे एक विनोद एकमेकाना सांगणारे दोन पुरुष असे या नाटकाचे स्वरूप आहे. या नाटकाचे वर्षभराच्या आत शंभर प्रयोग झाले. मला मात्र त्यातल्या एकाही विनोदाला हसू आलं नाही.

पण ‘अग्रेसिव्ह’, ‘शिश्नाच्या गुजगोष्टी’, ‘नवरा हवाच कशाला’ या नाटकांचे प्रयोग मात्र मी पाहिलेले नाहीत. ज्या लोकांनी ते पाहिलेत त्यांच्याकडून कळलेल्या माहितीनुसार या नाटकांमधून लैंगिकतेविषयी काही ठाम आणि वेगळं विधान केलं जात आहे असं वाटलं नाही.

अशा नाटकांपेक्षा निराळं उदाहरण म्हणजे संजय पवार यांचं “ठष्ठ” हे नाटक! या नाटकाचा विषय विविध कारणांनी मुलींची लग्न मोडणं, हा आहे. नाटकात स्त्रियांच्या लैंगिकतेसंबंधी काही उल्लेख आहेत,एक शिवराळ बोलणारी बंडखोर मुलगी आहे. पण त्यात बायकांच्या हस्तमैथुनाविषयी जे ओझरते उल्लेख आहेत ते मात्र अगदीच चुकीच्या माहितीवर किंवा नेहमीच्या गैरसमजांवर आधारित आहेत एवढं नक्की! याखेरीज लैंगिकतेशी संबंधित विषयावर - ‘अलिबाबा आणि चाळिशीचे चोर’ हे आणखी एक नाटक पाहिले होते. दहा वर्षांपूर्वी चं.प्र. देशपांडे यांचं ‘बुद्धिबळ आणि झब्बू’ नावाचे जे नाटक होतं त्या जातीचं हे नाटक आहे. मला आवडलं, एकूणच लैंगिकतेबद्दलच्या मध्यमवर्गीय दांभिकतेबद्दल त्यात कॉमेंट आहे असं मला वाटले.

ऐसी अक्षरे : स्त्रियांची लैंगिकता ही केवळ योनीपुरतीच मर्यादित आहे असा गैरसमज किंवा असा संदेश नाटक देत नाही का? याचा अर्थ पुरूष ज्या पद्धतीने स्त्रियांच्या लैंगिकतेकडे बघतात, त्यालाच हे नाटक अधोरेखित करत नाही का?

वंदना : मी नाटक करणारी व्यक्ती म्हणून कोणत्या उद्देशाने काय करते, तेवढेच सांगू शकेन. प्रेक्षक त्यातून काय संदेश घेतात त्यावर मी बोलणे खूप मर्यादित अनुभवावर आधारित असेल. कारण, प्रेक्षकांच्या हशा, टाळ्या, याखेरीज प्रत्यक्ष भेटून दिलेल्या किंवा लिहिलेल्या प्रतिक्रिया एवढंच साहित्य माझ्याकडे आहे. जे बोलतच नाहीत, हशा-टाळ्या देत नाहीत किंवा ज्यांच्याकडून काहीही प्रतिक्रिया येत नाहीत असेही अनेक लोक आहेतच. त्यांनी काय संदेश घेतलाय त्याबद्दल मी काही अंदाज नाही करू शकत. मला जे म्हणायचं आहे ते तसेच्या तसे त्यांनी ऐकलं असेल अशी शक्यता फार कमी असते. त्यांनी काय संदेश घेतलाय ते समजून घेण्यासाठी एक वेगळा रिसर्च करायला लागेल. तो मी केलेला नाही.

या नाटकात “योनी“ हे स्त्रीच्या लैंगिकतेचे प्रतीक या अर्थाने वापरलेलं आहे. कुठल्याही प्रतीकाद्वारे अगदी मर्यादित प्रमाणातच त्या त्या संकल्पनेचे प्रतिनिधित्त्व केले जाते. उदा. झेंडा हे त्या देशाचे प्रतीक असे म्हटले तरी त्या देशातील प्रत्येक सामाजिक वर्गाचे लाक्षणिक अर्थानेसुद्धा प्रतिनिधित्व झेंड्यातल्या रंगातून किंवा आकारांमधून मिळत नाही. त्या अर्थाने ‘योनी’ या प्रतीकाला मर्यादा आहेतच! पण नाटकात त्या मर्यादा ओलांडायचाही प्रयत्न केला आहे उदा. क्लायटॉरीसबद्दल बरेच उल्लेख आहेत. एका बाईला स्वत:च्या क्लायटॉरीसचे अस्तित्व उमगतं त्याबद्दल एक आख्खा मोनोलॉगच आहे! मुख्य म्हणजे लैंगिकतेभोवतालच्या राजकारणाबद्दलही खूप काही म्हटलेले आहे. त्यात कुठेही प्रीचिंग नाहीये. रोज आसपास घडणाऱ्या घटनांची उदाहरणे आहेत. उदा. स्त्रियांच्या लैंगिक अवयवांची नावे शिवी म्हणून वापरली जाणे हा भाषिक हिंसाचार आहे; त्या अनुषंगाने चूत ह्या शब्दाचा ‘शिवीपणा‘ काढून टाकण्याबद्दल एक प्रवेश आहे. त्याला ही खूप जोरदार प्रतिसाद नेहमीच मिळत आलेला आहे. मासिकपाळीचे एकीकडे गौरवीकरण केले जाणे आणि त्याच वेळी बायकांना वाळीत टाकले जाणे या विरोधाभासाची चर्चा आहे, गायनेकॉलोजिस्ट ज्या असंवेदनशीलतेने तपासणी करतात त्याबद्दल, टँपोनबद्दल, घट्ट अंडरवेअरबद्दल, डूशबद्दल बोललं गेलेलं आहे. चीड व्यक्त झाली आहे. शेवटचा बाळ जन्माला येण्याचे वर्णन करणारा मोनोलॉग आहे. असे विविध पैलू मांडलेले आहेत. पण लोक त्यातून काय संदेश घेतात त्याची आपण कल्पना करू शकत नाही. उदा. पुरुषांच्या लैंगिक अवयवापेक्षा बायकांच्या लैंगिक सुख देणाऱ्या अवयवात दुप्पट मज्जातंतू आहेत, अशी माहिती आणि याबद्दल एक विनोद माझ्या नाटकात आहे. त्याला प्रत्येक प्रयोगात सगळ्यात मोठा हशा आणि टाळ्यांचा प्रतिसाद मिळतो पण तोच विनोद माझ्या एका मित्राला अत्यंत अपमानकारक वाटला आणि आमचे भलंमोठं भांडण झालं होते ! पुरुष म्हणून स्वत:च्या लैंगिकतेबद्दल त्याने वर्षानुवर्ष जोपासलेल्या अभिमनालाच त्या विनोदाने हादरा दिला होता. एक प्रकारे त्याच्या सामाजिक सत्तेलाच आव्हान दिले होते. म्हणून त्याला तो विनोद आक्षेपार्ह वाटला!

असंच आणखी एक उदाहरण म्हणजे - नाटकाच्या शेवटी, क्लायमॅक्स म्हणता येईल असे जे मूल जन्माला येण्याच्या प्रसंगाचं वर्णन करणारं एक स्वगत आहे, त्यात एक वाक्य आहे, “मी त्या योनीचे हृदयामध्ये रुपांतर होताना पाहिले!” साधारणपणे ह्या प्रसंगात काही कुणाला आक्षेपार्ह वाटलं नव्हतं. उलट या कल्पनेला खूप दाद मिळते. जनरली बायका येऊन म्हणतात की मला माझ्या मुलीच्या बाळंतपणाची आठवण झाली, किंवा स्वत:चे बाळंतपण डोळ्यासमोर उभं राहिलं.

पण एकदा एक बाई म्हणाल्या “तुम्ही तर मातृत्वाचे गौरवीकरण करताय! ज्या बाईला मूल नाही ती हृदयशून्य आहे असा तुम्हाला वाटतं का काय?” ही खूपच आश्चर्यकारक प्रतिक्रिया होती! अशा तिरकस लोकांबद्दल काय म्हणावं? तुम्ही विचारताय तर कदाचित असतीलही असे प्रेक्षक की ज्यांना असं वाटत असेल की स्त्रीची लैंगिकता योनीपुरतीच मर्यादित आहे, असं मला म्हणायचंय!

ऐसी अक्षरे : गेल्या काही महिन्यांमध्ये लैंगिकतेविषयी उघडपणे बोलणारी अनेक नाटकं आली आहेत. त्यामुळे सामाजिक बदलात एक पाऊल पुढे गेल्याचं बोललं जातं हे कितपत खरं आहे? या प्रत्येक नाटकाचे उद्देश वेगवेगळे आहेत, आणि ते सामाजिक बदल म्हणून घातक वाटतात का?

वंदना : अशा नाटकांबद्दल वर लिहिलंच आहे. लैंगिकतेविषयी काही नवा दृष्टीकोन या नाटकांमधून मांडला जातोय असं मला तरी दिसत नाहीये. प्रेक्षकांना चाळवणारं काहीतरी रंगमंचावर दाखवणे म्हणजे सामाजिक बदल असंही मला वाटत नाही. पूर्वीही एकदा ‘हिट आणि हॉट’ नाटकांची लाट येऊन गेलेली आहेच. जर असे काही पाहणे प्रेक्षकांना आवडत असेल तर ते दाखवलं जाणारच.

ऐसी अक्षरे : 'मुलगी झाली हो' हे ८० च्या दशकातलं नाटक आणि 'योनीच्या मनीच्या गुजगोष्टी' हे त्यानंतरचं सुमारे २५ वर्षांनंतरचं नाटक. स्थूलमानाने एका पिढीनंतर आलेलं. जुन्या पिढीचे प्रश्न आणि नव्या पिढीचे प्रश्न यांमधले फरक या दोन नाटकांच्या अनुषंगाने कसे अधोरेखित होतात?

वंदना : ‘मुलगी झाली हो’ हे नाटक ज्या काळात सुरू झालं तेव्हा स्त्री-वादी विचारांच्या मांडणीची सुरुवात झालेली होती. स्त्रियांचे अनेक प्रश्न एकमेकांत कसे गुंतलेले आहेत, ते समजावून सांगणारे अनेक लेख त्या काळात विद्या बाळ, छाया दातार इ. नी लिहिलेले आहेत. हुंडाबंदीची चळवळ देखील तेव्हा सुरू होती. समाजातला भेदभाव अधोरेखित करणे आणि तो नष्ट करायचे आवाहन करणे Discourse चे प्रतिबिंब त्या नाटकात दिसते. त्या नंतरच्या २५ वर्षात अनेक आर्थिक बदल झाले आणि त्या अनुषंगाने स्त्री-पुरुष नातेसंबंधातदेखील बदल घडले. निदान शहरी स्त्रियांना मिळणाऱ्या संधी आणि त्यांची वागणूक यात तरी जाणवण्याइतके बदल झाले. अर्थातच लैंगिकतेच्या अभिव्यक्तीतदेखील बदल झाले. ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ या नाटकाच्या केंद्रस्थानी ‘स्त्रियांची लैंगिकता’ हाच विषय असणे यातूनच नव्या पिढीच्या बदललेल्या प्राथमिकतांचे प्रतिबिंब दिसते.

ऐसी अक्षरे : सध्याच्या पिढीत स्त्रीवादाचं नेतृत्व कोण करतं आहे? लढा नक्की कुठे चालू आहे? स्त्रीमुक्ती चळवळीची गरज नक्की कधी संपेल असं वाटतं? किंवा वेगळ्या प्रकारे विचारायचं झालं तर कुठची ध्येयं गाठली की स्त्रीमुक्ती झाली असं म्हणता येईल?

वंदना : ‘स्त्री वाद’ –ही काही मोनोलीथीक संकल्पना नाही. त्याचे एखाद्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे असावे तसे कुठेतरी हेड ऑफिस नसते... त्यामुळे एखादी CEO एका ठिकाणी बसून त्याचे नेतृत्व करतेय –असे काही घडत नसतं. जगात अनेक ठिकाणी तिथल्या विविध सामाजिक शक्यतानुसार लोक स्त्री-पुरुष समभाव प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न करीत असतात. मार्क्सिस्ट फेमिनिझम, लिबरल फेमिनिझम, रॅडिकल फेमिनिझम असे अनेक विचार प्रवाह देखील आहेत. अनेक पुरुषदेखील या सगळ्यात सामील असतात आणि पुरुषांच्या जाणीव जागृतीचे काम देखील जगभर सुरू असते. आपल्या देशात देखील या सर्व प्रकारच्या विचार प्रवाहांनुसार लोक काम करीत असतात. त्याच बरोबरीने या कामाला आपापल्या पंखाखाली घेण्याचे प्रयत्न देखील सरकारकडून आणि कॉर्पोरेट्सकडून होत असतात. त्यामुळे स्त्री-वाद Co- Opt झाल्यासारखेही कधीकधी वाटू लागते. तरीही ,फक्त शहरातच नाही तर खेड्यातदेखील महिला स्वत:चे हक्क, अधिकार यांच्या भाषेत विचार आणि वागणूक करीत आहेत. वैयक्तिकदृष्ट्या मला तर खेड्यातल्याच मुलींमध्ये समतेच्या नव्या आशा दिसतात.

ऐसी अक्षरे : आजचा स्त्रीवाद :- तुम्ही अनेक वर्षे स्त्रीवादी चळवळीशी जोडलेल्या आहात, आजचा नवा स्त्रीवाद (निओ फेमिनिझम) नेमका कसा आहे असं तुम्हाला वाटतं?

वंदना : 'निओ फेमिनिझम' या शब्दाचं ‘नवा स्त्रीवाद’ असं भाषांतर करणं अगदीच चुकीचं आहे. जगभरात निओ फेमिनिझम या संकल्पनेला वेगळाच अर्थ आहे. ७० च्या दशकात ज्या गोष्टी स्त्री-वादाने त्याज्य ठरवल्या, नेमक्या त्याच गोष्टीमुळे आपल्याला सक्षमीकरणाचा अनुभव येतो असे पॉप्युलर मिडीयामधल्या काही बायका ठासून सांगू लागल्या. या प्रकाराला ‘निओ फेमिनिझम‘ असं नाव पडलं. आपल्याकडचं उदाहरण द्यायचं झालं तर, मल्लिका किंवा प्रियांका चोप्रा जसं म्हणतात की, आयटेम सॉंग करणे ही आमची अभिव्यक्ती आहे आणि आमचा चॉईस आहे! एक प्रकारे अशा प्रकारच्या वस्तुकरणाची त्यांना जाणीव नसते आणि त्या त्याचे समर्थनदेखील करतात. या प्रकाराला Neo – Feminism असं म्हणतात. नवा स्त्री-वाद खूप विविध प्रकारच्या प्रवाहांनी बनलेला आहे. त्याचा आवाका या मुलाखतीत अजिबात मावणार नाही. पण खेड्यातल्या मुलींना मिळणाऱ्या नवीन संधी आणि त्यांच्यावर होणाऱ्या दडपशाहीला त्या जो प्रतिकार करतात तो पाहून मला त्यांच्याकडूनच येत्या काळात जास्त आशा वाटतात हे मात्र खरं!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

मुलाखत आवडली. यापुर्वी यावर उपक्रमावर झालेल्या चर्चेची आठवण आली, http://www.mr.upakram.org/node/2204

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

पण लैंगिकतेबद्दल चारचौघात बोलणंही या लोकांना पटत नाही. "योनी हा शब्द एकत्र म्हणू" हे सरळच इंग्लिशमधून मराठीत आणताना हा वर्ग दुरावण्याची भीती वाटली का?

छे छे! 'योनी' हा शब्द चारचौघांत बोलायला/लिहायला आम्हाला यत्किंचितही लाज, संकोच, इन्हिबिशन वगैरे काहीही वाटत नाही.

सिद्ध करून दाखवू काय? (चला रे, म्हणा सगळे माझ्याबरोबर.)

योनी! योनी!! योनी!!! योनी!!!! योनी!!!!! योनी!!!!!! योनी!!!!!!! योनी!!!!!!!! योनी!!!!!!!!!! योनी!!!!!!!!! योनी!!!!!!!!!!

(चला मंडळी! बैंची इच्छा पूर्ण करू या. पुढील पंचवीसएक प्रतिसाद सगळ्यांचे एकमुखाने एकासुरात "योनी!!!!! योनी!!!!!!" म्हणणारे आले पाहिजेत! आज दाखवूनच देऊ यात, आम्ही संकुचित मनोवृत्तीचे नाही आहोत म्हणून, आम्हीही पब्लिकमध्ये "योनी!!!!! योनी!!!!!!" म्हणू शकतो, म्हणून! चला तर मग, येऊ द्यात प्रतिक्रियांचा पाऊस!)

इन फ्याक्ट, मी तर म्हणतो, की लैंगिकतेबद्दल कमालीचा संकोच बाळगणार्‍या आपल्या या संस्कृतीत फक्त स्त्रियांनीच काय म्हणून, पुरुषांनीसुद्धा आपल्या लैंगिकतेबद्दल मोकळे व्हायला शिकले पाहिजे. त्या दृष्टीने ही चांगली ऐडिया आहे! फक्त, 'शिश्न' वगैरेंसारखे कोणीही वापरत नाहीत आणि बहुतांश पब्लिकला धड उच्चारतासुद्धा येत नाहीत, असले अवजड (आणि त्यातसुद्धा संस्कृतोद्भव, साडेतीनटक्की) शब्द वापरून उपयोग नाही. लेट अस डू वन बेटर! चला तर मग समस्त पुरुषमंडळी, म्हणा माझ्याबरोबर...

...पण नको! म्हणजे, पुरुषाच्या जननेंद्रियाकरिता मराठीत असलेला डौन-टू-अर्थ शब्द अशा रीतीने चारचौघांत (किमान इथे तरी, इफ नॉट फॉर एनीथिंग, टू प्रूव अ पॉइण्ट) वापरायला आम्हांस व्यक्तिशः काहीही संकोच वाटत नाही. आणि, इथे तो मोठमोठ्याने बोंबलून कदाचित इथल्या पब्लिकच्या अंगावर येऊ शकेल, ही एक किंचित्शक्यता लक्षात घेता तसा तो बोंबलावयास जबरदस्त इन्सेण्टिवही आहे. परंतु, त्याकरिता अश्लीलताविरोधी संभाव्य कायद्यांशी पंगा घेण्याइतकीही खाज आमच्या पार्श्वहृदयी ('इन द हार्ट ऑफ माय बॉटम' अशा अर्थी) वास करत नाही. आम्हाला आमच्या आयुष्यात त्याहून बरे उद्योग आहेत. (खरेबैंच्या वतीने बोलू शकत वा इच्छीत नाही.) शिवाय, इथल्या व्यवस्थापनासही कदाचित ते महागात पडू शकेल, ही शक्यता आहेच. (पण द्याट कुड बी द लीष्ट ऑफ माय कन्सर्न्स.) तेव्हा, सारासार विचार करता, थोडे सब्लिमेशन आवश्यक आहे. सबब, (अशा परिस्थितीत सर्वच सुज्ञजन अवलंबितात, ती ष्ट्र्याटेजी वापरून) त्याकरिता कोडवर्ड वापरू या. (अर्थात, हे अश्लीलताविरोधी कायदेही बदलले पाहिजेत, असे आमचे मत आहेच. पण शिवाजी (जन्मायचाच असेल, तर) नेहमी शेजार्‍याच्या घरी जन्मावा. (याबद्दल पुन्हा कधीतरी.))

चला तर मग, समस्त पुरुषमंडळी. म्हणा माझ्याबरोबर...

बाबूराव! बाबूराव!! बाबूराव!!! बाबूराव!!!! बाबूराव!!!!! बाबूराव!!!!!! बाबूराव!!!!!!! बाबूराव!!!!!!!! बाबूराव!!!!!!!!!! बाबूराव!!!!!!!!! बाबूराव!!!!!!!!!!

पुढील पंचवीसएक प्रतिसाद 'बाबूरावां'नी भरलेले आले पाहिजेत! होऊ द्या कहर! (अर्थात, डेरिंगबाजांनी याहून थेट शब्द वापरण्यास माझी व्यक्तिगत हरकत असण्याचे काहीही कारण नाही, पण त्याची जबाबदारी मी घेऊ शकत अथवा इच्छीत नाही, तेव्हा प्लीज स्पेअर मी! आपण साले डरपोक आहोत, आपण कबूल करतो. थेट शब्द वापरायला आपण विमुक्त नाटककार थोडीच आहोत?)

त्यात Cunt या श्ब्दातीला एकेक अक्षर घेऊन त्यातून योनीबद्दल सकारात्मक अर्थ मांडला जातो. त्याऐवजी माझ्या नाटकात ‘चूत’ हा शब्द वापरला आहे.

'बाबूरावा'करिताच्या 'त्या' शब्दाचाही 'अकार चरणयुगुल-उकार उदर विशाल-मकार महामंडल'-छाप विच्छेद करावयास मजा येऊ शकली असती, परंतु (१) आमची प्रतिभा या बाबतीत अंमळ तोकडी पडते, सबब हे काम कोणा प्रतिभावंतास औटसोर्स करणे प्राप्त आहे, आणि (२) मुळात शब्द जेथे छापता येत नाही, तेथे त्याचे पृथःकरण फ़िज़ूल आहे. असो चालायचेच.

उदा. स्त्रियांच्या लैंगिक अवयवांची नावे शिवी म्हणून वापरली जाणे हा भाषिक हिंसाचार आहे; त्या अनुषंगाने चूत ह्या शब्दाचा ‘शिवीपणा‘ काढून टाकण्याबद्दल एक प्रवेश आहे. त्याला ही खूप जोरदार प्रतिसाद नेहमीच मिळत आलेला आहे. मासिकपाळीचे एकीकडे गौरवीकरण केले जाणे आणि त्याच वेळी बायकांना वाळीत टाकले जाणे या विरोधाभासाची चर्चा आहे, गायनेकॉलोजिस्ट ज्या असंवेदनशीलतेने तपासणी करतात त्याबद्दल, टँपोनबद्दल, घट्ट अंडरवेअरबद्दल, डूशबद्दल बोललं गेलेलं आहे. चीड व्यक्त झाली आहे. शेवटचा बाळ जन्माला येण्याचे वर्णन करणारा मोनोलॉग आहे. असे विविध पैलू मांडलेले आहेत. पण लोक त्यातून काय संदेश घेतात त्याची आपण कल्पना करू शकत नाही. उदा. पुरुषांच्या लैंगिक अवयवापेक्षा बायकांच्या लैंगिक सुख देणाऱ्या अवयवात दुप्पट मज्जातंतू आहेत, अशी माहिती आणि याबद्दल एक विनोद माझ्या नाटकात आहे. त्याला प्रत्येक प्रयोगात सगळ्यात मोठा हशा आणि टाळ्यांचा प्रतिसाद मिळतो पण तोच विनोद माझ्या एका मित्राला अत्यंत अपमानकारक वाटला आणि आमचे भलंमोठं भांडण झालं होते ! पुरुष म्हणून स्वत:च्या लैंगिकतेबद्दल त्याने वर्षानुवर्ष जोपासलेल्या अभिमनालाच त्या विनोदाने हादरा दिला होता. एक प्रकारे त्याच्या सामाजिक सत्तेलाच आव्हान दिले होते. म्हणून त्याला तो विनोद आक्षेपार्ह वाटला!

पण... पण... अमेरिकेसारख्या ठिकाणीसुद्धा गायनेकॉलॉजिष्ट 'कण्ट' हा शब्द वापरत असण्याचा अनुभव नाही, आणि 'कण्ट' हा शब्दप्रयोग चारचौघांत करणे असभ्यच मानले जाते. नाउ, 'व्हजायना'... द्याट्स अ होल डिफरण्ट ष्टोरी (पन मोष्ट डेफिनिटली नॉट इण्टेण्डेड)... सो, व्हॉट्स द पॉइण्ट अगेन?

पण बाकी...

‘चूत बाई चूत, चुतडी चूत! कुणाची चूत बाई कुणाची चूत? तेरी भी चूत और मेरी भी चूत!’

...हे गाणे लै भारी आहे. येथे चढत्या फॉण्टसाइझनिशी गुणगुणून दाखवले असते (नि इतरांसही कहर करावयास आवाहन केले असते), पण आमचा (कायद्यासंदर्भातला) डरपोकपणा आड येतो. ("कारण शेवटी आम्हीं भटेंच! त्याला काय करणार?" - पु.ल.!) त्यामुळे जौद्या, चालायचेच, इ.इ.

असो. तूर्तास एवढेच.

.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सध्या अशासारखा अजून काही घडताना दिसतंय का, या प्प्रश्नाला उत्तर असे आहे की “योनी” हा शब्द ज्या नाटकांच्या नावात आहे अशी दोन नाटकं सध्या रंगमंचावर आहेत. त्यातल्या एका नाटकाने तर माझ्या नाटकाच्या नावामागे “अशा या” ह्या दोन शब्दांचे शेपूट जोडून लबाडी करायचाही प्रयत्न केला होता.

आणि...

याखेरीज लैंगिकतेशी संबंधित विषयावर - ‘अलिबाबा आणि चाळिशीचे चोर’ हे आणखी एक नाटक पाहिले होते.

'अशा या योनीमनीच्या गुजगोष्टी' या नाट्यनामात लबाडी आहे, तर 'अलीबाबा आणि चाळिशीचे चोर'मध्ये कशी नाही? मूळ 'अलीबाबा'चे प्रताधिकार उलथल्याला 'य' वर्षे - रादर शतके - उलटून गेली, एवढ्याशा टेक्निक्यालिटीवर? असेल ब्वॉ...

पण तरीही, 'अशा या योनीमनीच्या गुजगोष्टी' यात लबाडी आहे, हे कोठेतरी पटते. त्याऐवजी, 'अशा या (वंदना खरेंच्या) "योनीमनीच्या गुजगोष्टी"' या नावाने उघडउघड प्यारडी पाडली असती, तर ते (कायद्याच्या दृष्टिकोनातून) कसे ठरले असते, या प्रश्नावर तूर्तास विचार करत आहे.
====================================================================================================================

कृपया डबल-क्वोट्सकडे विशेष ध्यान द्यावे. नाहीतर साली आमच्यावर नसती आफत! (च्यायला, इंडियन्सपुढे१अ लिहिताना असला डिस्क्लेमर टाकावा लागतो.)

१अ श्रीमती खरे या भारतीय नागरिक आहेत, असे गृहीत धरून. (नसल्यास चूभूद्याघ्या.)

.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मुलाखत आवडली.

त्यात माझा नवरा मला खुनाच्या धमक्या देत असे; त्यापासून लपून रहाण्याचा ताण होता.

वंदनाजींचा नवरा त्यांनी योनीमनीच्या गुजगोष्टीसारखे नाटक लिहिले/सादर केले म्हणून त्यांना धमक्या देत असे का? असे असेल तर लग्नापूर्वी आपली रुची काय आहे याची कल्पना वंदनाजींनी त्यांना सांगीतले होते काय? अर्थातच खुनाच्या धमक्या देणे वाईटच, पण ज्या बाबत समाजाच्या संवेदना तीव्र आहेत त्या समाजात (तसे झाले असेल तर) कल्पना न देता फार वेगळे करीयर करणेही समर्थिता येणार नाही.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी नाटक पाहिलेलं वा वाचलेलं नाही, हे आधी नोंदते. पण मुलाखत आवडली.

मला खटकलेली गोष्टः स्त्री आणि योनी या दोहोंच्या कथित अभिन्नत्वानं स्त्रीचं दैवतीकरण करण्याखेरीज दुसरं काहीही साध्य केलेलं नाही. या दैवतीकरणानं बाई स्वतंत्र झाली की परतंत्र झाली, हे स्वयंस्पष्ट आहे. त्या पार्श्वभूमीवर मला योनी या अवयवाला दिलेलं असाधारणं महत्त्व धोकादायक वाटतं. मग ते प्रतीकात्मक का असेना. शिवाय लिंगभाव ही केवळ एका अवयवाशी निगडीत असलेली गोष्ट आहे, असंही मला वाटत नाही. सारं शरीर माध्यमच असतं. या शब्दाचा उच्चरवानं तथाकथित धक्कादायक घोष करून सगळ्या शरीराच्या मागण्यांचं आणि जबाबदार्‍यांचं भान येतं काय? मला नाही तसं वाटत. त्यानं उलट या नाजूक, गुंतागुंतीच्या गोष्टीचं सुलभीकरण होतं, जे कितीतरी जास्त चिंताजनक आहे.

@अरुणजोशी
समाजाच्या धारणा को-ण-त्या-ही प्रकारच्या असोत. त्यामुळे खुनाच्या धमक्यांचं समर्थन होतं काय? '
योनी' या शब्दाचा वापर करून समाजाच्या धारणा बदलण्याचा केलेला प्रयत्न पटो वा न पटो. त्याबद्दल मतभेद संभवू शकतात. पण "हे 'असलं' काही केलंत, तर चिडणारच ना माणूस, देणारच ना धमक्या?" अशा प्रकारचं समर्थन जर तुम्ही करत असाल, तर ते भीषण आहे.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

फियर ऑफ द नेम इन्क्रीझेस द फियर ऑफ द थिंग इटसेल्फ.

टॅबूच गेला तर त्याविषयी मोकळेपणी बोलणं होऊ शकेल.

सारं शरीर माध्यम असतं हे मलाही मान्य आहे. पण त्याच वेळी 'योनी' किंवा त्या अनुषंगाने आलेल्या गोष्टी नाजूक, गुंतागुंतीची गोष्टी असतात असंही तू म्हणते आहेस. नाजूक, गुंतागुंतीच्या म्हणून तू त्याला थोडंफार का होईना एक्स्क्लूझिव्ह करते आहेस का? ’या’ गोष्टीलाच एक्स्क्लूझिव्हीटी का?

स्त्रिया प्रथम त्या उच्चारवाबद्दल भीती काढून टाकायला शिकल्या, किंवा आपलं स्त्रीत्व त्या चार इंची अवयवाशी निगडीत नसतं याचं त्यांना भान आलं की त्यांना आपल्या शरीराचं भान येऊ शकतं. हे भान आणण्याकरता प्रयत्न करण्यामागची कल्पना वाईट नाही, प्रत्यक्ष प्रयत्नाबद्दल नो कमेण्ट.

<<लिंगभाव ही केवळ एका अवयवाशी निगडीत असलेली गोष्ट आहे, असंही मला वाटत नाही.
चार पुस्तकं वाचलेल्या, आपली मतं आपणाहून बनवू शकणा-या तुझ्या-माझ्यासारख्या स्त्रियांना असं वाटत नाही. (हे मत डिफ़ॉल्ट)पण इतर स्त्रियांचं काय? अजूनही मुलीच्या चारित्र्याचं मेजरमेण्ट करायला ’योनीशुचिता’ हा नॉर्म वापरला जातो, तो या अवयवाला असलेल्या महात्म्यामुळेच आणि शतकानुशतके झालेल्या स्त्रीच्या न्रेनवॉशिंगमुळेच.

त्यामुळे त्या अवयवाला असलेला एकंदर ऑरा, स्त्रीचं चारीत्र्य म्हणजे काचेच्या फ़ुलदाणीसारखं, फ़ुटली की सांधता येत नाही हे सरळ-सरळ योनी आणि अनाघ्रात असण्या-नसण्याबद्दलच्या खुळचट कल्पना संपल्या तर बरंच काही हेल्दी होऊ शकेल. या खुळचट कल्पना आपल्या कुटुंबात किंवा आपल्या आजूबाजूला असलेल्या समाजात नाहीत म्हणून कुठेच नाहीत असं नाही. या नाटकाचा टारगेट ऑडीयन्स हाच असावा.

Escoge un amante que te mire como si quizás fueras magia!

"प्रत्यक्ष प्रयत्नाबद्दल नो कमेण्ट." हे जे तुझं म्हणणं आहे ना, त्याबद्दलच बोलतेय मी. प्रयत्न करणं स्वागतार्हच. पण 'या' प्रयत्नानं कितपत भलं होईल याबद्दल मी साशंक आहे.

योनी हा शब्द (किंवा च्यूत किंवा अजून काही) उच्चारण्याचा संकोच गेला, म्हणून त्यानं काय साध्य होईल? वयात आलेल्या मुलीला जेव्हा एका मुलाबद्दल आकर्षण वाटतं आणि ती त्या दिशेनं काहीएक करू पाहते, त्याला 'लफडं-धंदे-उधळणं' या चालीवरचे शब्द बदलले जातील? तिच्या शरीरा-मनाची गरज सर्वमान्य होईल? त्याबद्दल तिला नीतिमत्तेचे धडे देणं बंद होईल? त्याबद्दल तिला एखाद्या जबरी बलात्काराची शिक्षा होणं (किंवा फॉर दॅट मॅटर खुनाच्या धमक्या मिळणं) हेच कसं योग्य आहे, असं समर्थन करणार्‍या बथ्थड प्रतिक्रिया बदलतील?

शब्दाभोवती असलेले संकोच वितळावेत हे ठीकच. पण 'योनी योनी..' असं चारचौघांत ओरडून लैंगिकतेबद्दलचे अनाठायी संकोच संपतील, असा विश्वास बाळगणं मला भाबडं वाटतं. एखाद्या खुनी प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या हस्ताक्षराचं वळण बदलून त्याद्वारे त्याच्या मनोभूमिकेत बदल होण्याची आशा करण्यासारखं भाबडं.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

प्रत्यक्ष प्रयोगाबद्दल नो कमेण्ट म्हटलं कारण ज्या गोष्टींबद्दल मी आधीपासूनच जागरूक आहे त्याच गोष्टी अत्यंत ऑब्व्हियस पद्धतीने मांडलेल्या असल्याने मला त्यातून नवं काही मिळालं नाही, पण, इतरांना मिळालं असावं. या नाटकाने स्त्रियांचं कितपत भलं होईल हे मला माहित नाही, पण प्रयोगाला आलेल्या, माना डोलावून दाद देणा-या स्त्रिया पाहिल्या की त्यांना काहीतरी समजलंय यावर विश्वास ठेवायला वाव आहे असं वाटतं.

<<त्यानं काय साध्य होईल?
लेट अस सी. त्या शब्दाबद्दलची अनाठायी भीती गेली की आपल्या सेक्स लाईफबद्दल, लैंगिक गरजा याबद्दल मोकळेपणी बोलणं होईल. कधीकधी आपल्याला चांगला कुर्ता घातला, चांगला हेयरकट केला की छान कॉन्फिड्ण्ट वाटतं. तसंच होऊ शकेल कदाचित. उभारी यायला छोट्या गोष्टी पुरतात. मनाची ठाऊक नाही पण शरीराची गरज असते हे सांगायला ती कचरणार नाही. लैंगिक आजारांना केवळ संकोचापायी गुमान तोंड बंद ठेवून अंगावर काढणं बंद होईल. नाटकचां नाव आहे योनीच्या मनीच्या गुजगोष्टी- नाटकाला काय सांगायचं आहे हे स्पष्ट आहे. नाटकाकडून समस्त स्त्री जातीला असलेल्या प्रश्नावर भाष्य व्हावं ही अपेक्षा बाळ्गणं अनाठायी आहे. माझा अर्ध्या भरलेल्या कपावर विश्वास आहे, रिकाम्या राहिलेल्या नाही. तुझं मत वेगळं असू शकेल-तो तुझा पाहण्याचा दृष्टिकोन.

<<एखाद्या खुनी प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या हस्ताक्षराचं वळण बदलून त्याद्वारे त्याच्या मनोभूमिकेत बदल होण्याची आशा करण्यासारखं भाबडं.
इथे आपण उपमांचं विश्लेषण करायचं ठरवलं तर तू समाजाला खुनी प्रवृत्तीची ठरवून त्याच्या मनोभूमिकेत बदल होण्याची सुतराम आशा नाही असं बोलतेयेस. ही टोकाची भूमिका आहे असं मला वाटतं. आणि आशा नसेल कदाचित म्हणून प्रयत्न करायचं सोडायचं का? होपलेस परिस्थिती आहे असं पाहून प्रयत्न केलेच नसते तर आज कदाचित स्त्रियांना मतदान करता आलं नसतं, शिकता आलं नसतं, लहानपणी लग्न होणं थांबलं नसतं..यादी न संपणारी आहे. कोणी आपल्या कुवतीने प्रयत्न केलेच तर त्याला किमान नाउमेद करू नये ही माझी भूमिका. तो प्रयत्न कसाही असो.

Escoge un amante que te mire como si quizás fueras magia!

मी समाजाच्या प्रवृत्तीत बदल होण्याची आशा नाही, असं म्हणतच नाहीय. पण हा या बदलासाठी पुरेसा आणि योग्य रस्ता आहे का, अशी शंका व्यक्त करतेय.

रिकामा ग्लास, अर्धा ग्लास... वगैरे ठीक. प्रयत्न, प्रयत्नामागचे हेतू, जे काही बदल होतील ते... सगळं स्तुत्य, स्वागतार्ह वगैरे वगैरे. फक्त हे फारच वरवरचं आहे. इतकंच. त्यानं सकारात्मक इत्यादी वाटून घ्यायचं असल्यास भारीच. पण काही प्रयत्न कितीही प्रामाणिक असले तरीही ते अंतिमतः साध्य करण्याच्या ध्येयाचं नुकसान करतात, असं मला वाटतं. आणि हा त्यांपैकी एक. पुन्हा एकदा नोंदते - हेतूविषयी यत्किंचितही शंका नाही. बाकी - लेट्स अ‍ॅग्री टु डिसॅग्री.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

माझ्याच भूमिकेचा मला पुन्हा विचार करायला लावणारा हा एक रोचक लेख. माझं मत बदललेलं नाहीय, पण... असो! वाचा.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

गावी माझ्या घराबाजुला एक देऊळ आहे, तिथे संध्याकाळी काही आज्ज्या (आया(कन्नड)) आजुबाजुच्या वस्तीवरुन गप्पा ठोकायला जमतात. एकदा एक आजी एकीला सहज थट्टेत म्हणाली, "तेरा वेळा फोदरा फाडून घेतलाय तवा तू तुझ्या दोन पोरांचं कवतुक मला सांगतीस व्हय." (त्या आजीला तेरा पोरं/पिळगी होती)
बरं त्या बायकातच असं बोलतात असंही नव्हे.

हा मोकळेपणा पांढरपेशा वर्गात नसतो. कष्टकरी वर्गात हा सहजपणे दिसून येतो. खेड्यात एखाद्या नवबाळंत स्त्रीला जेव्हा आपले मूल नीट बाळगता येत नाही तेव्हा जेष्ठ स्त्री तिच्या या अकुशलतेचा उल्लेख " ती लई येड्या दान्याची हाये. प्वॊर बी धरता येत नाई!" असा अगदी सर्रास केला जातो.

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मुलाखत अतिशय रोचक आहे. आवडली.
मी ही नाटक बघितलं अथवा वाचलेलं नाही. तरी मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे, नाटकाद्वारे योनी या शब्दाला महत्त्व/जोर देताना 'योनीशुचिता' वगैरे महत्त्व सोडा साधं अटेंशनही देण्याच्या योग्यतेच्या नसलेल्या भोंगळ कल्पनांना नाटकात महत्त्व दिल्यासारखं होतं का? - कोणी नाटक पाहिलं असल्यास सांगु शकतील.

बाकी, भारतातील स्त्रीवाद अजून बर्‍यापैकी (मी पोळ्या करते ना मग तु भाजी केलीच पाहिजे छाप) बालिश अवस्थेत आहे. त्याला दोन्ही बाजुने बरेच काम व्हायची गरज आहे. असे नाट्यप्रयोग, लेखन, मुलाखती, चर्चा त्या दिशेने छोटे का होईना निश्चित पाऊल टाकताहेत हे ही नसे थोडके.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रयत्नांना शुभेच्छा.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

काही प्रश्न लोडेड आहेत, तर काही प्रश्नांची थेट उत्तरंच नाहियेत, जागेची कमतरता किंवा तसे काही कारण असावे काय? त्याचप्रमाणे काहि प्रश्न नेमके आहेत पण उत्तर प्रामाणिक असले तरी समाधान करणारे नाही जसा मुलाखतींवर आधारीत लिखाणाबद्दलचा प्रश्न.

पण माहिती म्हणून मुलाखत आवडली.

काही प्रश्न लोडेड आहेत, तर काही प्रश्नांची थेट उत्तरंच नाहियेत,

लोडेड प्रश्नांमागचे कारण समजले नाही. असो, पण उत्तरे चांगली आहेत.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दैवतीकरण, त्याचं कारण-परिणाम इत्यादीबद्दल काही विस्कळीत विचार -

शीर्षकापासूनच नाटकात स्त्रियांची लैंगिकता योनी आणि आगेमागे, किंवा या प्रतीकाभोवती घुटमळत राहणार हे उघड आहे. ते तसं असण्याला विरोध करण्याचं मुळात काही कारण नाही. पण स्त्रियांच्या लैंगिकतेसंदर्भात इतर काही ललित, चित्रपट, नाटक चांगलं आहे, गाजलेलं आहे असं काही दिसत नाही. त्यामुळे स्त्रियांच्या लैंगिकतेबद्दल असणाऱ्या, गाजलेल्या या चार कलाकृतींपैकी ही एक असं दिसण्याऐवजी, हेच ते एक नाटक दिसतं. माझ्या मते, तक्रार करण्यासारखं महत्त्वाचं काही असेल तर ते हे आहे.

'मुलगी झाली हो' ज्या काळात आलं तेव्हापासून निदान काहीएक वर्ग पुढे सरकला आहे. "सुख होतं आहे" हे म्हणायची सोय निदान मोजक्या लोकांची झालेली आहे. पण त्या वर्गाचं चित्रण करणारं पुरेसं काही दिसत नाही. (मेघना पेठे वगैरे अपवाद, नॉर्म नाही.)

हे असं का याचं उत्तर माझ्याकडे नाही. पण एक प्रसंग आठवतो, त्यातून उत्तराचा एक तुकडा मिळू शकेल -
एका मित्राशी काय-वाटेल-त्या गप्पा मारता येतात, असा आमचा दोघांचा समज आहे. खरोखरच आम्ही आपसांत बोलताना काहीही जोक्स करतो, पाचकळ, गीकी, लैंगिक प्रकारचेही. त्याच्यासमोर मासिक पाळीसंदर्भात काही विनोद केले असता, "तू पाळीबद्दल obsessed आहेस" असं त्याचं म्हणणं. माझं म्हणणं, "माझ्यासाठी जे normal आहे, त्याबद्दल मी बोलते. दात घासण्याबद्दल बोललेलं चालतं तर या विषयावर का नाही?" आमचं या विषयावर अजूनही एकमत नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मासिक पाळीचं उदाहरण रोचक आणि चपखल आहे. मीही एक धोरण म्हणून मासिक पाळीबद्दल उघडपणे आणि सहजगत्या बोलते. त्या विषयाभोवतीचा टॅबू घालवण्यासाठी हे एक परिणामकारक पाऊल आहे हे मला मान्य आहे. (त्याबद्दल विविध गंमतीदार प्रतिक्रिया मिळतात. "हा स्त्रियांचा खाजगी आणि नाजूक आणि पवित्र आणि गूढ विषय आहे. तो कशाला असा उघड करायचा?"पासून "हां, तुमचं ते पोट दुखणं... माहितीय,"पर्यंत. तो एक स्वतंत्र विषय आहे.) पण माझ्या माहितीत असेही अनेक लोक आहेत, जे मासिक पाळीचा उच्चार सहजगत्या, नि:संकोचपणे करतात. मात्र त्यांचे त्याबद्दलचे गैरसमज दूर झालेले नसतात. ते दूर करून घेण्याची त्यांना इच्छाही नसते. त्यांच्याकरता असा उल्लेख करणं ही लोकांना धक्का देण्याची, स्वतःच्या तथाकथित पुरोगामीपणाकडे आणि तथाकथित संवेदनशीलतेकडे लक्ष वेधून घेण्याची एक बाब असते. बस.

असं होण्याची भीती मला या नाटकाबद्दल जास्त वाटते.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मी हे नाटक अनेक वर्षांपूर्वी वाचलंही होतं आणि त्याचा (इंग्रजीत) प्रयोगही पाहिला होता. प्रबोधन वगैरे सर्व मुद्दे बाजूला केले तरी मुळात नाटकाला त्याची म्हणून काही ताकद आहे. त्यामुळे ते निव्वळ शैक्षणिक किंवा उद्बोधक राहात नाही. चेतन दातारचं 'चंद्रपूरच्या जंगलात' पाहतानाही मला असंच वाटलं होतं. पण म्हणूनच मला पुढचा मुद्दा जाणवतो तो असा - ज्या कुणाला ह्या (किंवा पाळी, किंवा इतर काही) विषयाचा टॅबू नसेल त्याला तरीही त्याबद्दल बोलायची फारशी इच्छा नसण्याची शक्यता उरतेच. म्हणजे अशा वेळी त्याला बोलतं करण्यासाठी किंवा तुमचं त्या विषयावरचं बोलणं ऐकावंसं वाटण्यासाठी त्यातदेखील (ह्या नाटकांसारखं) काही तरी 'इंटरेस्टिंग' असायला हवं. आणि ते नसलं तर समोरच्याचा कंटाळा स्वीकारताही यायला हवा. विशिष्ट इझमनं भारलेल्या लोकांबाबत माझं हे अनेकदा होतं - म्हणजे माझा त्यांच्या म्हणण्याला विरोधदेखील नसतो (त्यामुळे वाद घालण्याची मजादेखील येत नाही), पण मला त्यात काही नवीन किंवा रोचकदेखील हाताला लागत नसेल तर त्याचा कंटाळा येतो. पण एखाद्या ध्यासानं प्रेरित असलेल्या पुष्कळ लोकांना हे घेता येत नाही असा अनुभव आहे.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

विषयाचा टॅबू नसेल त्याला तरीही त्याबद्दल बोलायची फारशी इच्छा नसण्याची शक्यता उरतेच.

अगदी अगदी!

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कुणाला त्याच त्याच विषयावर सतत बोलणे किंवा कुठल्याही संवादात तेच तेच इश्यू आणणेअ‍ॅड नॉशियम वाटू शकते.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

+१

ज्या कुणाला ह्या (किंवा पाळी, किंवा इतर काही) विषयाचा टॅबू नसेल त्याला तरीही त्याबद्दल बोलायची फारशी इच्छा नसण्याची शक्यता उरतेच. म्हणजे अशा वेळी त्याला बोलतं करण्यासाठी किंवा तुमचं त्या विषयावरचं बोलणं ऐकावंसं वाटण्यासाठी त्यातदेखील (ह्या नाटकांसारखं) काही तरी 'इंटरेस्टिंग' असायला हवं. आणि ते नसलं तर समोरच्याचा कंटाळा स्वीकारताही यायला हवा.

अगदि असेच.

विशिष्ट इझमनं भारलेल्या लोकांबाबत माझं हे अनेकदा होतं - म्हणजे माझा त्यांच्या म्हणण्याला विरोधदेखील नसतो (त्यामुळे वाद घालण्याची मजादेखील येत नाही), पण मला त्यात काही नवीन किंवा रोचकदेखील हाताला लागत नसेल तर त्याचा कंटाळा येतो. पण एखाद्या ध्यासानं प्रेरित असलेल्या पुष्कळ लोकांना हे घेता येत नाही असा अनुभव आहे.

ह्याबद्दल .
मागे मिपावर अतिशहाणा/आजानुकर्ण ह्यांचा प्रतिसाद होता.
एखाद्या विषयाचा टॅबू असेल तर त्या गोष्टीची मजा घेता येते; असा काहीतरी भावार्थ होता.
म्हणजे ज्याला मेनस्ट्रीम " छ्छी छ्छी " समजत असेल, त्याबद्दल गुफ्तगू करुन गुदगुल्या करुन घेता येणं हाही मनोरंजनाचाच एक भाग आहे. (कुणी त्याला bad taste म्हणेल; पण असो.)
उदा :- आजानुकर्ण ह्यांना गावाकडील पार्श्वभूमीमुळे गाई-गुराचे शेण किंवा अगदि गाढवाची लीदसुद्धा गलिच्छ वगैरे वाटत नसे.
(गाढवाची लीद कुंभार वापरतात मडकी बनवताना, मडक्यासाठीच्या मातीत घालून किंवा गावकडे शेणानं घर सारवतात अजूनही बर्‍याच ठिकाणी. )
त्यामुळे त्यासंबंधी शिसारी नसल्याने त्यांच उल्लेख असलेल्या ज्योकवर त्यांना हसू येत नसे.
इथे त्या शेणाचा, लीद वगैरे स्पर्श गलिच्छ समजतात; म्हणून काय ती विनोदनिर्मिती होते.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आजानुकर्ण ह्यांना गावाकडील पार्श्वभूमीमुळे गाई-गुराचे शेण किंवा अगदि गाढवाची लीदसुद्धा गलिच्छ वगैरे वाटत नसे.
(गाढवाची लीद कुंभार वापरतात मडकी बनवताना, मडक्यासाठीच्या मातीत घालून किंवा गावकडे शेणानं घर सारवतात अजूनही बर्‍याच ठिकाणी. )
त्यामुळे त्यासंबंधी शिसारी नसल्याने त्यांच उल्लेख असलेल्या ज्योकवर त्यांना हसू येत नसे.
इथे त्या शेणाचा, लीद वगैरे स्पर्श गलिच्छ समजतात; म्हणून काय ती विनोदनिर्मिती होते.

खरे तर, इन जण्रलच, स्वजातीय मूत्र-पुरीष सोडल्यास अन्यजातीय मूत्रपुरीषाबद्दल तादृश घृणा नसणे किंवा असली तरी स्वजातीय मूत्र-पुरीषाबद्दल असते त्यापेक्षा कमी असणे हे सर्व प्राणिजातींबाबत खरे असावे असे वाटते. असो.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं