स्वारस्याची अभिव्यक्ती

वामन आणि मी, आम्ही दोघेही बसमध्ये बसून तासभर कसा काढावा ह्याचा विचार करत असता, ही चर्चा सुरू झाली.
आणि मग उत्तरोत्तर रंगतच गेली. तिचाच हा वृत्तांत. हा संवाद कमीअधिक प्रमाणात प्रत्यक्षात असाच घडलेला आहे.

स्वारस्याची अभिव्यक्ती

मीः हे बघा, तुम्हाला ह्यात रुची आहे का?
वामनः छे! हे सगळे गणिताने भरलेले आहे. ह्यात आपल्याला काय ’इंटरेस्ट’ असणार?
मीः ’इंटरेस्ट’? म्हणजे तुम्हाला ’स्वारस्य’ म्हणायचाय काय?
वामनः हो. तेच ते.

मीः तुम्हाला ह्यात स्वारस्य नसेल, तर आपण अधिक सुरस गप्पा करू या!
तुम्ही ’instrumentation’ मध्ये एवढी वर्षे काम करताय. मग सांगा बरे ’instrumentation’ ला मराठीत काय म्हणतात?
वामनः साधनशास्त्र.
मीः अहो ते म्हणजे तर ’रिसोर्स सायन्स’ झाले. आठवा ’ह्युमन रिसोर्स’.
वामनः मग ’अवजार’शास्त्र असेल.
मीः अवजार म्हणजे ’टूल’. आता मीच तुम्हाला सांगतो की ’instrument’ म्हणजे ’उपकरण’. तर मग ’instrumentation’ ला मराठीत काय म्हणणार?
वामनः काय?
मीः ’उपकरणन’!
वामनः ’उपकर्णन’?
मीः छे हो. इथे कानाचा काय संबंध? ’उ प क र ण न !’
वामनः ’उ प क र ण न !’

मीः हो. आता बरोबर झालं! आता ह्या विषयात ’रिझोल्यूशन’ म्हणजे काय ते तुम्हाला नक्कीच माहीत असणार.
वामनः हो. ’रिझोल्यूशन’ म्हणजे ’ठराव’!
मीः छे! ही काय सहकारी गृहनिर्माण मंडळाची आमसभा आहे?
वामनः मग ’कमीत कमी मोजदाद’!
मीः ते तुम्ही ’लीस्ट काऊंट’ बद्दल बोलताय.
वामनः मग, काय म्हणतात?
मीः ’सापेक्षपृथकता’! सुट्टे पाहता येतील असे, लहानात लहान भाग मापण्याची क्षमता!!

वामनः हे किती अवघड नाव आहे. असले कठीण कठीण शब्द सुचवाल तर लोक कशाला मराठी शब्द वापरतील?
मीः छे. हे नाव कठीण नाहीच. वापरात नाही हे मात्र खरेच आहे. ’रिझोल्यूशन’ च्या ऐवजी नेहमी वापरू लागलात तर मुळीच कठिण वाटणार नाही.

वामनः कबूल पण मग नुसतीच ’पृथकता’ म्हणता येईल की! ती सापेक्ष असण्याची काय गरज आहे?
मीः समजा मी तुम्हाला ’सुट्टा पाहता येईल असा लहानात लहान भाग’, ’एक इंच आहे’ असे सांगितले तर त्यावरून ’सापेक्षपृथकता’ कळेल का?
वामनः हो. कळेल की.
मीः नाही. कळणार नाही. कारण प्रश्न हा उरेल की एकूण केवढ्या पल्ल्यात ’सुट्टा पाहता येईल असा लहानात लहान भाग’ आहे ’एक इंच’? फुटपट्टीवर मोजत असाल तर बारा इंचात एक इंच म्हणजे १/१२ = ८.३३% ही ’सापेक्षपृथकता’ होईल. मात्र एका मैलात एखादा इंच मोजत असाल तर मैलभरातील ६३,३६० इंचात एक इंच म्हणजे १/६३,३६० = ०.००१५७८ % ही ’सापेक्षपृथकता’ होईल. सुमारे पाच हजार पट फरक आहे ह्या ’सापेक्षपृथकतां’मध्ये. यासाठी पट्टीशी सापेक्ष असते म्हणून सापेक्ष. एरव्ही पृथकताच.

वामनः आपल्याला काय म्हणायचाय ते ’प्रिसाईझली’ सांगता यायला हवे. नाही का?
मीः हो. तर मग आता सांगा की ’प्रिसाईझली’ ला मराठीत काय म्हणाल?
वामनः ’एक्झाक्टली’!
मीः पण मराठीत काय म्हणाल ते विचारलय मी!
वामनः मराठीत ना? मराठीत ’एक्झाक्टली’ म्हणजे ’तंतोतंत’.
मीः हो. पण मग ’प्रिसाईझली’ म्हणजे काय?
वामनः ’प्रिसाईझली’ म्हणजे अचूक.
मीः छे! ’अचूक’ला इंग्रजीत ’अक्युरेट’ म्हणतात!
वामनः हो. हो. हा अर्थ मात्र तुम्ही ’नेमका’ सांगता आहात!
मीः बरोब्बर. ’प्रिसाईझली’ म्हणजे ’नेमका’च.
वामनः अरे वा! माझा अर्थ बरोबर निघाला की!

मीः अगदी बरोब्बर. आता तुम्हाला ’रिपिटेबल’ म्हणजेही माहीत असणारच!
वामनः हो तर. ’रिपिटेबल’ म्हणजे ’फ्रिक्वेंट’.
मीः नाही हो. एकतर तुम्ही इंग्रजीतला प्रतिशब्द देताय. दुसरे म्हणजे प्रतिशब्द म्हणूनही योग्य नाही. कारण ’फ्रिक्वेंट’ म्हणजे पुनरावर्ती.
वामनः मग तुम्हीच सांगा ’रिपिटेबल’ म्हणजे काय?
मीः ’रिपिटेबल’ म्हणजे पुन्हपुन्हा मोजले असता एकसारखेच भरणारे मापन!
वामनः तुम्ही काय म्हणत होतात? ’स्वारस्य’च ना! हे बघा ही कशाची जाहिरात आहे?
मीः ’स्वारस्याची अभिव्यक्ती’! अहो म्हणजे ’एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट’.

वामनः अहो मग असं शुद्ध मराठीत सांगा की. ’स्वारस्याची अभिव्यक्ती’ म्हटल्यामुळे ही जाहिरातच कुणी वाचणार नाहीत मुळात.
मीः असे म्हणून इंग्रजीला ’वाघिणीचे दूध’ म्हणून गौरवणारे दिवस आता मागे पडलेत.
पैसे खर्चुन ’स्वारस्याची अभिव्यक्ती’ विचारणार्‍या जाहिराती लोक करू लागलेत! सांगा जमाना बदला की नाही.
वामनः खरंच हो! असली जाहिरात मी तरी पाहिली नव्हती यापूर्वी कधी.
मीः एकदा का मराठीतच आचार, विचार आणि प्रचार करायचा हे नक्की केले की मग,
नेहमी काही राज ठाकरेच यायला हवेत असे नाही!
आपणही मराठीत सगळे व्यवहार उत्तमरीत्या व्यक्त करू शकतोच की. आजच्या आपल्या बोलण्यातून हे स्पष्टच झालेले आहे.
वामनः खरेच हो. तासभर कसा भुर्रकन उडून गेला पत्तासुद्धा लागला नाही!

पूर्वप्रसिद्धी: http://www.maayboli.com/node/27815

field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

प्रतिक्रिया

खुसखुशीत.आवडले.
आमच्या कॉलेजात उपकरणीकरण विभाग(instru dept) होते, त्याची आठवण झाली.
अशा मराठी शब्दांच्या वापराने आपण शब्दसंग्रह नेहमी अद्यतनित(updated/up to date) ठेवावी हे उत्तम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अद्यतनित हा शब्द मी मराठी आंजामुळेच शिकले. तोपर्यंत मला अद्ययावत हाच शब्द माहित होता. हे थोडंसं expiry date (ब्रिटीश) आणि expiration (अमेरिकन) असं वाटतंय.

आमच्या ठाण्याच्या बिल्डींगीत एक वॉचमन/माळी/कचरावाला होता, कानू. खालच्या टाकीतून वरच्या टाकीत पाणी टाकायला नवीन पंप (प चा उच्चार पूर्ण!) बसवला तेव्हा कानू आम्हां पोराटोरांना सांगत होता, "नवा पंप बसवलाय. आटुकमाटुक हाय." 'स्वयंचलित' या पुस्तकी शब्दापेक्षा मला 'आटुकमाटुक' हा शब्दच जास्त आपला वाटतो. मराठीत गप्पाटप्पा मारताना (colloquial मराठी) मला आटुकमाटुक हा शब्दच आठवतो.

माझ्या एका मित्राने सांगितलेली व्याख्या मला फार आवडली. एखाद्या शब्दाचं सामान्यरूप प्रचलित असेल किंवा अनेकवचन मराठीतल्याप्रमाणे होत असेल तर तो शब्द मराठी. सीडी (compact disk) हा शब्द मराठी केव्हा, जर "एक सीडी, अनेक सिड्या" असं म्हणत असाल तर तो मराठी! 'अमृताते पैजा' जिंकणारी मराठी भाषा मी तरी बोलत नाही; कोणी बोलत असेल तर मला धड समजत नाही. एवढंच काय, आजीच्या तोंडातले पुष्कळ, जाकीट असे अनेक शब्द माझ्या तोंडात चटकन येत नाहीत. तसे मराठीतले जाकीट, झंपर हे शब्द कुठून आले हे मला माहित नाही, पण इंग्लिशमधेही jacket, jumper हे शब्द आजही, साधारण त्याच अर्थांनी वापरले जातात. समोर बटणं नसलेला टॉप म्हणजे jumper, बटणं, झिप असलेला cardigan.

मागे एकदा पुण्यातच पावसाच्या सुरूवातीच्या काळात होते. तिथल्या सिक्युरिटीवाल्याने मला वॉर्निंग दिली, "म्याडम, तिथून नका जाऊ, या बाजूने जा." मी विचारलं, "का हो? तिथे निसरडं आहे का?". तर उत्तर आलं, "नाही हो, तिथे स्लिपरी आहे." मी ही मराठी आणि दुसराही माणूस मराठी! मी बोलते तेच खरं मराठी आणि त्यांचं मराठी हे मराठी नाहीच असा पवित्रा घेणं मलातरी जमत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.