माझ्या मित्रांची ओळख

नमस्कार,

मुलांना मित्र मिळवून द्या!!

मला हे खर तर सगळ्या आई-बाबांना सुचवायच आहे.

मी स्वतः एकुलती एक वाढले , खूप लहान वयातच आई बाबा ऑफिसला गेले कि एकटी राहायचे आणि तरीही मला कधीच भावंडांची उणीव भासली नाही. ह्याचं मुख्य कारण म्हणजे माझे हे मित्र मैत्रिणी. ह्यांनी मला लहानपणापासून, पुढे शिक्षणासाठी एकटे राहताना होस्टेल वर आणि आता अमेरिकेतही नेहमीच साथ दिली … देत आहेत.
कोण हे मित्र… तर हे पुस्तकातून भेटणारे मित्र. पुस्तकातून केवळ हे मित्रच भेटतात असं नाही तर त्यांचं पूर्ण भावविश्वच समोर उभं दिसतं आणि हे असे मित्र सध्याच्या मुलांसाठी खरोखरीच दुर्मिळ झाले आहेत.

हे सगळं मी इथे का लिहितेय कारण आजकाल सर्वच पालक आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खास प्रयत्न करताना दिसतात. तरीही आजकालच्या मुलांबद्दल खालील निरीक्षणे नोंदवली जातात :

१. आजकालची मुले सतत टीव्ही / सेल फोन आणि ह्यात नव्याने सामील झालेल्या tablets इत्यादितच रमलेली असतात
२. मुलांची भाषा चुकीची आणि शब्द -ज्ञान अत्यंत अपुरे आहे
३. मुलांचे आपल्या आणि इतरही संस्कृतीविषयक सामान्य ज्ञान कमी आहे.
४. मुलांना वाचनात रस नाही

भारताबाहेर राहणाऱ्या मुलांमध्ये तर हे आणि अशाच प्रकारचे वागणे खूपच दिसून येते आणि पालकांचे त्याविरोधी प्रयत्न सुद्धा !!

आणि सर्वात महत्वाचा म्हणजे, मी जेव्हा आजच्या लहान पिढीला पाहते तेव्हा हि पुढची पिढी खूपच smart, विचारी आणि बुद्धिवादी वाटते.
ह्या पिढीला जर हे असे मित्र भेटले तर त्यांचे अनुभव विश्व खूपच समृद्ध, प्रगल्भ आणि रंगबिरंगी होईल (असे मला वाटते ).

आता हे नमनाला घडाभर तेल झाल्यानंतर मी मूळ मुद्द्यावर येवून ह्या मित्रांची ओळख करून देते. मी फक्त ओळख करून देत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही , त्यामुळे key -points चा उल्लेख राहून गेला तर कृपया माफ करवे.

१. डेनिस - पुस्तकाचे नाव "देनिसच्या गोष्टी" लेखक Victor Dragunsky - खूप लहानपणी- १लि २रीत असताना आई ह्या गोष्टी वाचून दाखवत असे. ह्या पुस्तकाचे अजून एक आकर्षण म्हणजे ह्यातली पान-पान भरून मोठ्ठी रंगीत चित्रे. रशियामध्ये राहणारा डेनिस, त्याचे आई बाबा, त्यांचा मित्र , त्याला नंतर मिळालेली एक लहानगी बहिण, त्याच्या आई बाबांचे मित्र-मैत्रिणी असे अनेक जण आहेत इथे. आणि ज्यांना अजून नीट वाचता येत नाही किंवा नुकतं वाचायला सुरु करणाऱ्यांसाठीसुद्धा हे पुस्तक चालेल.

२. तोत्तोचान - पुस्तकाचे नाव "तोत्तोचान" लेखिका तेत्सुको कुरोयनगि - दुसर्या महायुद्धाच्या काळातील जपान मधील आपल्या प्रायोगिक शाळेबद्दल आणि मुख्याध्यापक सोसाकू कोबायाशी यांच्या बद्दल तोत्तोचान ने मोठ्ठी झाल्यावर लिहिलेलं पुस्तक . मी स्वतः कोल्हापूरला अशाच प्रायोगिक शाळेत शिकले त्यामुळे हे खूपच जवळच पुस्तक. तोमोई शाळा अगदी आमच्या सृजन आनंद शाळेसारखी आणि लीलालाई म्हणजे सोसाकू कोबायाशींच. तोत्तोचान च्या छोट्या छोट्या गोष्टी खूप काही सांगणाऱ्या , शिकवणाऱ्या … हे पुस्तक वाचून मला जपानला जाऊन तोत्तोचानला भेटायचं होतं. Smile असो… तोत्तोचान पहिलीत असल्यापासुंनच्या गोष्टी ह्यात असल्याने पहिली आणि पुढील वयोगटासाठी चांगले.

३. बिम्म- पुस्तकाचे नाव "बखर बिम्मची" - लेखक जी ए कुलकर्णी - फार कमी लोकांना माहित असलेले जी ए याचे हे गोंडस पिल्लू बिम्म. त्याची बहिण बब्बि त्यांची त्यांच्यावर प्रेम करणारी पण त्यांचं करता करता दमून जाणारी आई, त्याच्या परसातले त्याचे मित्र असलेले आजोबा … बिम्म चे विचार अगदीच मजेशीर … रस्त्यावर पडलेल्या सावल्या निट घडी करून आणणारा बिम्म , राहुल हत्तीशी बोलणारा बिम्म, पावसासाठी होड्या करणारा बिम्म, काठीने ढगाला ढोसून त्याच्याकडे पावसासाठी गाऱ्हाणं घालणारा बिम्म, , कधी काळजाला हात घालून डोळ्यात पाणी आणेल सांगता येत नाही. मोठ्यांनीही वाचलंच पाहिजे असं पुस्तक आहे हे.

४. लंपन - पुस्तक- "वनवास, शारदा संगीत, झुंबर, पंखा" अशा चार पुस्तकांचा संच. लेखक - प्रकाश नारायण संत . मला वाटतंय कि ह्यापूर्वीच लंपन वर खूप जणांनी खूप काही लिहिलेलं आहे पण त्याच्या उल्लेखाशिवाय हि यादी पूर्ण होणार नाही. माझा खूप जवळचा म्याड सारखा मित्र आणि त्याचं मॅड जग . पौगान्डावास्थेच्या उंबरठ्यावर उभा लंपू अतिशय निर्मळ आणि प्रेमळ आणि संवेदनशील असा . त्याच्या बद्दल जितकं लिहावा तितकं कमीच … ५वि च्या पुढची मुले जास्त चांगल्या प्रकारे एन्जोय करू शकतील.

५. बोक्या सातबंडे - मराठीतले प्रगल्भ अभिनेते, दिलीप प्रभावळकर ह्यांचा मानसपुत्र बोक्या! नुकताच ह्यावर एक सिनेमा येवून गेला . मुंबईत राहणारा बोक्या उपद्यावी आणि प्रेमळ आहे. बोक्या हा लंपन पेक्षा जास्ती समकालीन वाटू शकतो. त्याच्यासोबत आत्ताची मुले कदाचित जास्ती relate करू शकतील. माझ्याकडे तीन पुस्तकांचा संच होता. आता पुढचे भाग आले आहेत असं ऐकलं . धमाल गोष्टी आहेत. वयोगट ४थी -५वी आणि पुढे .

६. गोट्या - भाग १,२ आणि ३ लेखक ना . धो . ताम्हणकर - गोट्या वाचण्याआधी स्वातंत्र्यपूर्व काळाची ओळख करून देणे जरा गरजेचे आहे. मग गोट्याचे, त्याच्या वैनी दादांचे वागणे आणि त्यामागील विचार मुले समजून घेवू शकतील .
गोट्या हा आदर्शवादी विचार असणारा आणि तरीही चुका करणारा, चुकांतून शिकणारा मुलगा. अनाथ पोर ते आत्मविश्वासपूर्ण युवक असा त्याचा प्रवास मनोरंजक आणि उद्बोधकही आहे.

७. चिंगी- हि ताम्हणकर यांचीच लाडकी मानसकन्या गोट्या प्रमाणेच नितळ मनाची पण उपद्व्यापी ; चांगल्या भावनेने केलेली हिची गोष्ट काहीतरी विपरीतच होणार आणि हि आईचा ओरडा खाणार … हि सुद्धा गोट्याची समकालीन असल्याने कालखंडा ची ओळख आधी करून देणे आले. भाषा देखील जरा पुस्तकी वाटू शकते.

८. little women मूळ लेखिका Louisa may Alcott अनुवाद: चौघीजणी - शान्ता शेळके; मेग,जो, बेथ आणि एमी अशा चार बहिणीची हि गोष्ट अमेरिकेत civil war च्या सुमारास घडते . वडील युद्धावर गेले असताना आईच्या खंबीर आधारावर जगणाऱ्या आत्मनिर्भर, स्वावलंबी, कलात्मक आणि विचारी मुलींचे दैनंदिन आयुष्य त्यातील छोटे मोठे चढउतार खूपच प्रभावीपणे शब्दबद्ध केले आहेत. वातावरण आणि आसमंताचे वर्णन वाचून तर आपण अगदी तिथेच असल्याचा भास होतो. विशेष करून मुलींना तेही १२-१५ वर्षाच्या मुलींना खूप आवडेल. मी अमेरिकेत आल्या आल्या खूप होमेसिक झाले होते पण इथल्या लोकल library मध्ये हे पुस्तक दिसले आणि परत एकदा लहानपण आठवले.

९. Anne Frank - पुस्तकाचे नाव The diary of Anne Frank- English आणि मराठी, दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. नाझींच्या छळछावण्यांपासून वाचण्यासाठी गुप्त निवासात राहणाऱ्या तेरा वर्षांच्या मुलीची हि डायरी. तिच्या मित्राहीन आयुष्यावर तिने काढलेला तोडगा म्हणजे डायरीला मैत्रीण मानून आपली सुखदु:ख्खे डायरी सोबत share करणे.
आपल्या स्वातंत्र्याची किंमत नव्याने कळते हि डायरी वाचून. तेरा वर्षे आणि पुढील मुलामुलींना वाचण्यायोग्य

१०. फास्टर फेणे -लेखक भा रा भागवत; हा धाडसी हुशार चाणाक्ष मुलगा माझ्याही आधीच्या पिढीचा फारच लाडका . प्रत्येक पुस्तकात नवीन साहस घेवून भेटत असे . प्रतापगडावर फास्टर फेणे , चक्रीवादळात फास्टर फेणे , जंगल पटात फास्टर फेणे इत्यादी पुस्तके आठवतात. शेरलॉक होम्स चे चाईल्ड व्हर्जन म्हणता येईल असा हा हेर फास्टर फेणे आणि त्याच्या चातुर्यकथा . वयोगट ८ आणि पुढे

११. फ्रांक गिल्बर्ट आणि त्यांची बारा मुले- हि टोळी भेटते cheaper by dozen ह्या पुस्तकतुन. फ्रांक गिल्बर्ट ह्यांचा बारा मुलं करण्याचा निर्णय, त्यांना वाढवण्याच्या, त्यांच्या संगोपनाच्या पद्धती, त्यांना वेगवेगळी कौशल्य शिकवण्याच्या अनोख्या कल्पना आणि युक्त्या … एकूण मजेशीर आणि मनोरंजक पुस्तक. हे खरतर खास लहान मुलांसाठी असं नाहीये पण मी लहानपणी वाचलेलं … आणि सर्व वयोगटातील व्यक्ती एन्जॉय करू शकतात असं आहे.

तर असे हे मित्र …. ह्यापैकी काहिंशी तुमची भेट आधीच झालेली असेल. काही नवीन असतील . जुन्या मित्रांच्या आठवणी ह्या निमित्ताने जाग्या व्हाव्या आणि नव्या मित्रांशी तुमची, तुमच्या व तुमच्या मित्र परिवारातील चिमुकल्यांची मैत्री व्हावी हाच ह्या लेखाचा उद्देश.

टीप: ऐसी वर , किंबहुना मराठीत हे एवढे पहिल्यांदाच टाईप करून लिहिले आहे. त्यामुळे चूक भूल देणे घेणे.

हे झाले मराठीतून भेटणारे मित्र अजून Harry potter, Famous Five, Secret seven, Little house ची Laura ह्यांच्या बद्दल पुन्हा कधीतरी.
आणि हो, तुमच्या ओळखीत अजून असेच कोणी मित्र असतील तर मला जरूर कळवा.

- सिद्धि.

field_vote: 
4.42857
Your rating: None Average: 4.4 (7 votes)

प्रतिक्रिया

धन्यवाद! देनिस प्रचंड लाडका आहे. १९९० नंतर सोवियत पुस्तके तितकीशी पाहिली नाहित. सुदैवाने देनिस सांभाळून ठेवला होता. देनिस लहान मुलांसाठी जितका आहे तेवढाच मोठ्यांसाठीही आहे.. हे आता कळतं!
हल्लीच गंमत म्हणून amazon.com वर पाहीले तर हे पुस्तक इंग्रजीत उपलब्ध आहे असे कळले.. पण मालक रशियाचा होता Blum 3

भा रा भागवतांची इतर पुस्तकेसुद्धा खूपच छान -"भुताळी जहाज", "खजिन्याचे बेट" किंवा त्यांचा "बिपिन बुकलवार".

विंदांची "अजबखाना" ह्या यादीत जोडाविशी वाटते. "तिबेटाच्या जरा खाली हिमालयाच्या जरा वर" असलेला एटू लोकांचा देश हा बरेच वर्षे माझ्या भूगोलाचा भाग होता. टोक न मोड्ण्याचा मंत्रसुद्धा मी आजमावून पहिलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे वाह तुम्ही डेनिस चे चाहते आहात हे ऐकून छान वाटले …. डेनिस जरा कमी लोकांना माहित असतो. Smile
मी विंदा चे अजबखाना वाचले नाहीये. ह्या भारत भेटीत नक्की घेईन .सुचवल्याबद्दल धन्यवाद !! Smile आणि वरील सर्वच जण लहान मोठ्ठ्या सर्वांसाठीच आहेत असे मला वाटते… शिवाय कितीही वेळा वाचले तरी कंटाळा येत नाही !!

अवांतर: बिपीन बुकलवार चे आडनाव हे खरे तर book-lover चे मराठीकरण आहे असे मला वाचल्याचे आठवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

देनिस आणि (काहीशी नंतर ओ़ळख झालेला) केल्विन हे दोघे माझे best friends! Smile
ज्यांनी देनिस वाचला नाहिये, त्यांना ह्या यूट्यूब दुव्यावर थोड्या देनिसच्या करामतींची मजा घेता येईल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देनिसचे खूप चाहते आहेत जालावर.

इथे इंग्रजी अनुवादही आहे.

हे निव्वळ जळवण्यासाठी - माझ्याकडे देनिसची जुनी हार्डबाउंड प्रत आहे. पिवळ्या मुखपृष्ठातली. इंग्रजी आणि मराठीही - जुनं भाषांतर अनिल हवालदारांनी केलेलं. सध्याचं श्रीनिवास कुलकर्णी (चूभूदेघे) यांनी केलेलं भाषांतर बरं आहे. पण पुस्तकाची बांधणी, आकार, चित्रं... सगळंच आधीच्या पुस्तकाच्या मानानं सुमार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हो का? मला नवीन प्रत आलेली माहितीच नाही. माझ्याकडेही जुनी पिवळी हार्ड-कव्हर ची प्रत आहे. Smile खूपच मजबूत बांधणी आहे त्यामुळे अजूनही सुस्थितीत आहे. डेनिस चे जालावर चाहते आहेत हेही माहिती नव्हतं , माझ्या ओळखीतल्या बऱ्याच (वाचणाऱ्या ) लोकांनी डेनिस बद्दल ऐकलंही नव्हतं .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

छान ओळख करुन दिलीय मित्रांची.
लिहीत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद. प्रयत्न करेन !! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

सिद्धी, पदार्पणातच तुम्ही खूप सुंदर विचार मांडला आहे. माझ्या मुलीला, जी बरेचदा एकुलते एकपणाची तक्रार करते , तिला आजच हा संदेश देईन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. 'पाडसा'चा मित्र असलेला ज्योडी - एक संपूर्णपणे वेगळी जीवनपद्धती, मौजमजेच्या आणि संकटांच्या कल्पना. हे पुस्तक मी अजूनही पुन्हा पुन्हा वाचू शकते
२. नवलकहाणी मधली जाई - लहानपणी नुसताच कल्पनाविलास वाटलेल्या गोष्टी मधले पॅराडॉक्सेस (मराठी?) नंतर उमजले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'पाडसा'चा मित्र असलेला ज्योडी - पुस्तकाचे नाव आणि लेखकाचे नाव कळेल का?
पॅराडॉक्सेस- मराठीत विरोधाभास Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

एका भल्या मित्राने संतांच्या लंपनची चारही पुस्तकं दिली. मोठ्या वयातच ते वाचलं. बहुदा मोठ्या वयातच त्यातला आनंद जास्त वाटेल.

'पाडस' हे भाषांतर The yearling नामक कादंबरीचं आहे. मूळ लेखिका मार्जोरी किनन रोलिंग्ज. (हिच्या नावाची एक स्टेट पार्क फ्लॉरिडात आहे. कादंबरी फ्लॉरिडातच बेतलेली आहे.) मराठी अनुवाद केलाय राम पटवर्धन यांनी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धागा बूकमार्क केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.