Skip to main content

नगर जिल्ह्यातील दलित-दलितेतर संबंध

ऐसी अक्षरेच्याच दुसर्‍या एका धाग्यावर नगर जिल्ह्यातील एका दुर्दैवी घटनेचा संदर्भ पाहण्यात आला. गेल्या दोन एक वर्षातल्या नगर जिल्ह्यातील बातम्यांकडे लक्ष गेल तर, नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दलित-दलितेतर ह्या संबंधात तणाव तर नाही ना अशी सहजच शंका येते.

माझा नगर जिल्ह्याशी फारसा कधी संबंध आलेला नाही. या धाग्याचा उद्देश नगर जिल्ह्याच्या संपर्कात वास्तव्यात असलेल्या व्यक्तींकडून नगर जिल्ह्यातील दलित-दलितेतर संबंध समजावून घ्यावेत आणि तणाव असेलच तर सौहार्दपूर्ण सामाजिक संबंधाकरता जनजागृतीकरता काय करता येण्यासारखे आहे याचा मागोवा घेता यावा असा उद्देश आहे.

प्रतिसादांना उशीर झाला तरी चालेल पण पहिल्या माझी प्रतिसादाची अपेक्षा नगर जिल्ह्याच्या संपर्कात/वास्तव्यात/ माहितीत असलेल्या व्यक्तींकडून असेल.

हा चर्चा धागा शक्यतो नगरजिल्ह्या पुरताच ठेऊन विषयांतर टाळण्यात सहकार्य करावे. प्रतिसादांसाठी धन्यवाद.

बातमीचा प्रकार निवडा

माहितगारमराठी Sat, 03/05/2014 - 23:51

आज महाराष्ट्र टाइम्स मध्ये नगर जिल्ह्यातले अजून एक वृत्त वाचले.

आंतरजाल अजून शोधले तर काही स्थानिक पत्रकारांचे जुने वार्तांकन आढळले. सकाळचे वार्ताहर विजयसिंह होलम यांचे एका ब्लॉगवर वार्तांकन (२०१०) आढळले. श्रीनिवास हेमाडे यांचे (२००९) लोक्सत्ता वार्तांकन हि वृत्ते जुनी (२००९ , २०१०) असली तरी सामाजीक दरीचा अंदाज देतात. अण्णा हजारेंनी ज्या जिल्ह्यात काम केले त्या जिल्ह्याने तरी काळाच्या मागे जाणे अभिप्रेत नाही. तेथील स्थानिक समाजाने सामंजस्य आणि सलोख्याचे वेळीच प्रयत्न केल्यास २१व्या शतकात तरी सुधारणेस वाव मिळेल.

नितिन थत्ते Sun, 04/05/2014 - 12:19

In reply to by माहितगारमराठी

>>अण्णा हजारेंनी ज्या जिल्ह्यात काम केले त्या जिल्ह्याने तरी काळाच्या मागे

या विषयी साशंक आहे. अण्णा हजारे यांचे एकूण विचारविश्व काळानुरुप असल्याचे वाटत नाही. [हे अर्थातच त्यांच्याविषयी जे काही वाचले आहे त्यावरून बनलेले मत आहे. त्यांचा प्रत्यक्ष संपर्क नाही].

नगरीनिरंजन Sun, 04/05/2014 - 13:58

नगर शहराच्या संपर्कात आणि वर्षाकाठी जाऊन-येऊन असलो तरी संपूर्ण जिल्ह्यासंबंधात भाष्य करता येणे अवघड आहे.
नगर जिल्ह्याचा दक्षिण भाग जिरायती, दुष्काळी व मागास भाग आहे आणि घडलेल्या दोन्ही (कोठेवाडी धरल्यास तीनही) घटना दक्षिण भागात घडल्या आहेत.
उत्तर भागात जिथे काळे-कोल्हे व विखेंचं साम्राज्य असलेला बागायती भाग आहे तिथे अशा घटना घडल्या नाहीत.
खुद्द नगर शहरात मुस्लिम व दलितांची भरपूर वस्ती आहे आणि हिंदू-मुस्लिम दंगे अनेकवेळा झाले असले तरी दलितांवरच्या अत्याचाराच्या घटना घडल्याचे आठवत नाही. दुष्काळी ग्रामीण भागात विकासाचा मागमूस नसल्याने व दलित-दलितेरांमध्ये सांपत्तिक दरी कमी असल्याने जातीपातीचं राजकारण करण्याची प्रवृत्ती अलिकडे वाढीस लागली असण्याची शक्यता आहे आणि त्याचे हे दृष्य परिणाम असावेत.
तरीही इतर जिल्ह्यांमध्ये उच्चवर्णिय (विशेषतः मराठा) व दलितांमध्ये बेटी व्यवहार कितपत प्रचलित झाले आहेत हे कळल्याशिवाय नगर जिल्ह्यात त्या बाबतीत ताणतणाव जास्त आहे असे भाष्य करणे योग्य ठरणार नाही.

ऐसि पाहुणा Sun, 04/05/2014 - 17:56

'नगर जिल्ह्यातिल ब्राह्मण-ब्राह्मणेतर' संबंध असा प्रश्न विचारला असता तर या संकेतस्थळावर डझनभर प्रतिसाद मिळण्याचि खात्रि होति.