जे काही आहे ते सगळंच 'तत्त्वमसि' आहे!

आज कित्येक दिवसांनी आलोय तुझ्याजवळ निवांतपणे. तुझं हे सौंदर्य नेहमीच मला भुरळ घालतं, आजही घालतंय! हे मोहक रूप डोळ्यांत साठवून घ्यायला उभा जन्मही अपुरा पडावा. तुझ्याजवळ कधीही येऊन बसलो की खूप शांत, प्रसन्न वाटतं. हलकेच तुझ्या कुशीत गाढ झोप लागते नि रोजच्या दगदगीने थकलेल्या मनाला खूप आराम मिळतो. डोळ्यांना सुखावणारी ही दाट वनश्री, सोनसळी नव्हाळी ल्यालेली ही साळीची शेतं, भयाण गडगडाटांनी आसमंत भरून टाकणारे ते कृष्णमेघ, जीवाच्या आकांताने कोसळणार्‍या त्या जलधारा, त्या तिकडे मखमली गालिच्यावर लकाकणारी सोनेरी उन्हं, ही अवखळपणे डोंगरदर्‍यांना गुदगुल्या करत बागडणारी नदी - अरे आणखी किती वेड लावशील?! एखादं सुरेल गीत ऐकताना जसं उचंबळून यावं तसंच तुझी ही सारी मनमोहक रूपे पाहताना होतं!

स्कॉटलंडमधील 'ग्लेनको' व्हॅली असो किंवा परशुरामातून दिसणारं वसिष्ठीचं खोरं असो, दोहीकडे सारखाच आनंद, सारखंच सुख की रे! सह्यकड्यांत तू राकटपणातलं सौंदर्य दाखवतोस, तर ग्लेनकोमध्ये, क्वुलीनमध्ये या सौंदर्याला एक करूणपणाची झालर आहे. पण सारी तुझीच रूपं, त्यामुळं कुठंही एखाद्या अनोळखी प्रदेशात गेलो तरी अजिबात परकं वाटत नाही! तुझ्या दर्शनानं कुठंही असलो तरी नेहमीच खूप भरून येतं. अंतर्बाह्य लखलखाट होतो नुसता! कुणीतरी वीणा वा बॅगपाईप वा तत्सम वाद्याच्या अफाट सुरांनी काहीशी आर्त आळवण करतंय असा भास होतो!

"रोमांचातून कधि दीपोत्सव, कधि नेत्रांतून पुष्पांचे स्रव,
कधि प्राणांतून सागर तांडव, अमृतसिंचित जीणं,
सख्या रे झिणिझिणी वाजे बीन, अनुदिन चीज नवीन!"

असंच आहे की रे तुझंही! रोज नवं गीत, रोज नवी चीज! आणि जुनंच गीत पुन्हा आलं तरी त्याला प्रत्येक वेळी नवा अर्थ असतो! आणि नेहमी एकाच ठिकाणी येऊन जरी बसलो तरी किती विभिन्न अनुभवांनी समृद्ध करून सोडतोस तू! अमृतानुभव दुसरा तो काय? या अमृताची हाव लागून मी रसलंपट होतो तोच तुझ्यापुढं मी किती क्षुद्र आहे ही जाणीव अवचितपणे गोसावीपणही देऊन जाते! मग मनाला एकेक प्रश्न पडू लागतात..

मी कोण? कोठुनि आलो? अन कशास आहे जगती?
भंडावून सोडे मजला ही प्रश्नांची सरबत्ती!

वाटते तुझ्याजवळी रे, सुटतील प्रश्न हे सारे
हे भूमिभूषणा मजला, तूं कवेत घेशील का रे?

"हे प्रश्न तुझे रे सोपे, कां उठते हे काहूर?
बघ उघडुन डोळे नीट, नाहीत उत्तरे दूर!"

कोठे घनदाट अरण्यें तर कोठे दुर्मुख माळ
कोठे सरितेसी पूर, कोठे भानुज दुष्काळ?

-- "चेहरे जरी हे माझे परि सूत्रधार मी नाही
त्या जगन्नियंत्याच्या मी प्रासादातील शिपाई"

तो कुठे मला भेटावा? ना इतुके माझे पुण्य!
-- "पुण्याची गणितें कसली? श्रद्धेविण उत्तर शून्य!

आक्रोश ओस माळाचा अन गांभीर्य काननाचे
बघ अनुभवुनी तुज त्यांत, अस्तित्व दिसेलच ’त्या’चे!"

निर्मळ आनंदाचा तूं परिपूर्ण स्रोत असताना
मज नकोच दर्शन त्याचे, साक्षात तुला बघताना!

पाहून तुझी ही रूपें, नि:शब्द थक्क मी होतो,
घे कवेत मजला आता मी तव मायेने न्हातो!

-- "मी केवळ निमित्तमात्र, हे सारे श्रीधन आहे
परमेशाच्या पूजेचे, मी केवळ साधन आहे!"

ना कर्मकांड ना पूजा, ना प्रार्थना ना धर्म
तादात्म्य तुझ्याशी हेच निर्मळ हर्षाचे मर्म

-- "हा मुक्त हर्ष अनुभवता, अद्वैतही तुज उमजावे
प्रश्नांचे तुझिया उत्तर, त्याद्वारे तुला मिळावे!"

अन गाभार्‍यात मनाच्या उसळोनि उत्कट मोद
"ब्रह्मास्मि!" साक्षात्कारें, दुमदुमला एकच नाद!

'तत् त्वमसि' खरे कसे रे, कुणि दिले ब्रह्मपण मजसी?
-- "सारेच ब्रह्म रे येथे, तूं त्याचे तत्त्वम् असि! त्वमेव तत्त्वमसि!"

सध्या मिपावर नर्मदा परिक्रमा गाजत असलेली पाहून मला कुंट्यांच्या पुस्तकाआधी भ्रमणगाथा आणि तत्त्वमसि ही पुस्तकं आठवली. त्यातलं तत्त्वमसि खूपच आवडलं मला. त्यातले निवडक उतारे आठवले! मग त्या पुस्तकापासूनच सुरू झालेली अन् बरेच दिवस रखडलेली एक कविता पूर्ण झाली. काही महिन्यांपूर्वी परशुरामात वसिष्ठी दर्शन पॉईंटवर बसलेलो असताना विचारचक्र सुरू झालं. थोडाफार निसर्गाशी संवाद सुरू झाल्यासारखं वाटलं होतं तेव्हा. त्या भावनेतूनच या कवितेची निर्मिती झाली होती. निसर्गाशी तादात्म्य भाव हा प्रत्येकात कुठेतरी दडलेला असतोच. त्यातून मिळणारा आनंद फार निर्मळ असतो हे खरं! आणि हा आनंद त्याच्या परम स्वरूपात प्रत्येक मनुष्यात प्रकट होतोच आणि एकदा का झाला, की त्या मनुष्याला आपोआपच 'तत्त्वमसि'ची जाणीव होते! Smile

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सुरेख प्रकटन. अगदी मनापासून लिहिलेलं. कवितेबद्दल तर काय बोलावं? शंभर नंबरी आहे. दुर्मुख माळ आणि भानुज दुष्काळ ही विशेषणांची जोडीही खासच. बोरकरांची 'गीत तुझे गाता गाता मीच गीत झालो' कविता आठवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर लेखन रे!
कविता तर लाजबाब आहेच.
तुझी स्थिती वाचुन, माझी नायगारा बघुन झालेली स्थिती आणि रामदासस्वामींच्या 'धबाबा'ची झालेली आठवण आठवली. (टिपः दुवा मनोगत.कॉमवर नेतो)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मंदार आणि ऋ, लेखन आवडलं. 'दुर्मुख माळ' आणि 'भानुज दुष्काळ' मलाही आवडली.

वाढत्या वयाचाच परिणाम का छोट्या धबधब्यात मनसोक्त भिजता येणं माहित नाही पण, दहा-बारा वर्षांपूर्वी शिवथरघळीच्या धबधब्यात शिरून जेवढा आनंद झाला होता तेवढा आनंद नायगारा बघून झाला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

निसर्गावर नितांत प्रेम व्यक्त करणारं मुक्तक आवडलं. या प्रेमात देश, संस्कृती अशा मानवनिर्मित कप्प्यांना काहीच अर्थ उरत नाही हेही छान सांगितलं आहे. मुक्तकात आणि कवितेवर बोरकरांचा प्रभाव जाणवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> तो कुठे मला भेटावा? ना इतुके माझे पुण्य!
-- "पुण्याची गणितें कसली? श्रद्धेविण उत्तर शून्य!>>
या ओळी तर फारच भावल्या.

कविता अप्रतिम आहे. सहज सुचलेली, अंतरीच्या गाभ्यातून उमटलेली वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद सर्वांनाच. Smile

नंदन - शाळेत केशवसुतांची ’दुर्मुखलेला’ कविता होती ती मला खूप आवडायची. (सारी शार्दूलविक्रीडिताची किमया!) मामाच्या गावाला असताना माळरानावर (वाळवट म्हणतात तिकडे) एक जांभळाचं झाड होतं भलं मोठं. खूप जांभळं लागत त्याला. त्यावर जाऊन बसणे आणि तिथे खेळणे हा आमचा उन्हाळ्याच्या सुट्टीतला एक महत्त्वाचा उद्योग होता. एकदा आम्ही भावंडं तिथं बसून कविता म्हणण्याचा कार्यक्रम करत होतो. मी दुर्मुखलेला ही कविता म्हटली होती आणि सगळ्यांनी मला ’ए दुर्मुखलेला’ म्हणून जे चिडवलं होतं तेव्हा! तो ओसाड माळ, वर आग ओकणारा सूर्य या सगळ्यात सगळे मला चिडवताहेत.. मला फार बोचलं होतं ते.परवा ही कविता लिहिताना तो प्रसंग डोळ्यासमोर तरळला होता. म्हणून आपसूकच ओसाड माळाला ’दुर्मुख’ असं विशेषण चिकटलं! Smile
तू आणि एका सुंदर कवितेची आठवण करून दिलीस! धन्यवाद. Smile
ऋषिकेश - तुझं लिखाण आवडलं. Smile संपूर्ण अमेरिकायण सावकाश वाचून काढीन.
राजेश - बोरकरांच्या कवितांनी मी लहानपणापासूनच प्रभावित आहे. ते तुम्हांला लिखाणात जाणवलं हे वाचून आनंद झाला. प्रतिसाद आवडला. Smile
अदिती - कदाचित त्या भव्यतेमुळे भारावली असशील आणि ’मजा करणं’ विसरली असशील. रौद्रपणा अंगावर येतो खूप. Smile
सारीका - मन:पूर्वक धन्यवाद. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे वा. मग दुर्मुखलेलाचं रसग्रहण येऊ दे कि
ही कविता वाचलेली नाहि बहुतेक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!