Skip to main content

उडतं झुरळ Vs तुम्ही

उडतं झुरळं मारणं हे खरं तर सोप्पं नव्हे. पण यशाचं गमक हेच की उडत्या झुरळांना मारताना तुम्हाला त्रिमितीय गोष्टींची जाणीव हवी. म्हणजे बघा, की तुमच्या घराची मुख्य खोली. आता त्यात काय असणार ? तर कोपऱ्यात एक टी व्ही, एक सोफा एखादं टेबल. आणि झुरळ असं ट्यूब लाईट खाली बसलेलं.
आता तुम्हाला त्या झुरळाचा possible flight path काय असू शकेल, ह्याची कल्पना असायला हवी. ते भिंतीवरून सरपटत जाईल का? की मग हवेत भरारी घेऊन पलिकडल्या भिंतीवर जाईल? किंवा असंच कुठेतरी भिरकटत हवेत फरफर करून पुन्हा तिथेच बसेल? ह्याचा अंदाज येणं महत्त्वाचं आहे.
तेव्हा ह्याचा अंदाज नसेल तर झुरळाला इथे वरचढ ठरण्याची संधी आहे, हे लक्षात ठेवा.
स्कोर : झुरळ १-० तुम्ही

त्या नंतर महत्वाची गोष्ट म्हणजे पंखा. पंखा हे आपल्या घराच्या भूगोलातील एक महत्वाचं अंग आहे, त्याचा तुम्ही झुरळविरोधी लढाईत योग्य वापर करून घ्यायला हवा. पंखा फुल स्पीडवर चालू असेल तर झुरळाची पंचाईत होते. त्याला आपली trajectory बदलून जावं लागतं -इथेच तुम्ही पहिले मार्क मिळवता. झुरळ आता त्याच्या comfort zone च्या बाहेर आलेलं आहे तेव्हा तुम्ही इथे mind game खेळून अजून एक मार्क मिळवला आहे
स्कोर : झुरळ १-२ तुम्ही

झुरळाला निव्वळ कोंडीत पकडायचं असेल तर त्याला मोकळ्या मैदानात आणा. एकदा का ते डायनिंग टेबल किंवा दिवाण किंवा मग गणपतीचा फोटो - ह्या मागे गेलं, की युद्ध चालूच राहील पण तुम्ही ती लढाई तरी हरला असाल. उडत्या झुरळाचं काय आहे, त्याला ओवर कोन्फ़िडन्स असतो - आपण काय कसेही कुठेही जाऊ शकतो म्हणून. ह्याच मुद्द्याचा तुम्ही फायदा घ्यायचा आणि मोकळ्या जागेत त्याला चेचायचं.
स्कोर : झुरळ २-३ तुम्ही

आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा : हत्यार. बहुतेक लोक झाडू हे हत्यार झुरळ मारायला वापरतात. पण हे तितकसं बरोबर नाही. हवाई बेटांवरच्या संशोधकांनी सिद्ध केलंय की हिराची झाडू किंवा साधी झाडू ह्यापेक्षा घडी घातलेलं किंवा दुमडलेलं एखादं मासिक हे उत्तम हत्यार आहे. त्याची लांबी साधारण ७-१२ इंच असावी आणि वजन जवळपास ५०० ग्र्याम. असं शस्त्र तुम्हाला भर्रकन फिरवता येतं आणि घनतेमुळे त्याने झुरळाला धक्कासुद्धा बसतो. ह्याउलट झाडूच्या फटकार्याने झुरळाला काहीच होत नाही आणि झाडू फिरवताना बराच हवाई भाग व्यापते.
एवढं सगळं नीट केलंत तर तुम्ही झुरळाचं मानसिक खच्चीकरण केलंय म्हणून समजा. तेव्हा शस्त्र निवड महत्त्वाची ठरते.
स्कोर : झुरळ २-४ तुम्ही [ १ बोनस मार्क शस्त्राबद्दल ]

तुम्हाला जर झुरळाबद्दल किळस वाटत असेल तर तुम्ही ती मनातून काढून टाकायला हवी. झुरळं ह्याच गोष्टीचा गैरफायदा घेतात असं आढळून आलेलं आहे. एखादा मनुष्य झुरळाला घाबरतो हे झुरळाच्या दृष्टीने अतिशय नॉर्मल आहे. पण एखाद्याने झुरळाला कौतुकाने जवळ घेतलं तर झुरळं बिथरतात आणि मग त्यांना सांगोपांग विचार करता येत नाही हे संशोधानातून सिद्ध झालंय. तेव्हा तुम्ही झुरळाबद्दलची किळस घालवलीत तर तिथे तुम्हाला अजून काही मार्क मिळतात.

स्कोर : झुरळ २-५ तुम्ही

५ झाले की काय, जिंकलात तुम्ही !

Nile Fri, 11/07/2014 - 01:38

इथे आम्हाला माशा मारायला सुद्धा वेळ नाही अन तुम्ही झुरळं कसली मारता! सर्वात सोपा उपाय म्हणजे क्लीनिंगसाठी जे डिसिन्फेक्टंट स्प्रे घरात असतात ते वापरणे. लांबून स्प्रे करता येतो, स्प्रे असल्याने हवेच्या दाबात किरकोळ फरक पडत असल्याने झुरळ-माशा इत्यादींना कळत नाही. आणि शिवाय, तुमचे घर घाणच असल्याने (नाहीतर झुरळ, माशा कुठून आल्या, हां?) तेव्हडंच डिसइन्फेक्टंट स्प्रे होतं इकडे तिकडे. तिहेरी फायदा. आम्ही ७: झुरळ १!! आम्ही वर्ल्ड कप जिंकलो!

............सा… Fri, 11/07/2014 - 01:54

=)) =)) सॉलिडे!!! असच पालीचही येऊ द्यात :D

तुम्हाला जर झुरळाबद्दल किळस वाटत असेल तर तुम्ही ती मनातून काढून टाकायला हवी. झुरळं ह्याच गोष्टीचा गैरफायदा घेतात असं आढळून आलेलं आहे.

कसलं खरय राव!!!!
काही झुरळे सरळ तुमच्या डोळ्यात डोळे घालून, नैनवा से नैनवा लडाईके अ‍ॅटॅक करतात :( :( :( अशा महाभागांचा कसा बंदोबस्त करावा अस्वलभाऊ? :(

अस्वल Fri, 11/07/2014 - 02:14

In reply to by ............सा…

पालींबद्दल कल्पना नाही! पण पाल हा प्रकार तसा झेपेबल वाटला आहे. त्या शेपूटतोड तंत्रासाठी मात्र काहीतर तोड हवी.

@लढाऊ अंगावर येणारी झुरळं - पुणेरी स्टाईलचे स्कार्फ ह्या दृष्टीने उपयोगी ठरू शकतात! शिवाय असं एखादं कामिकाझे झुरळ धावून्/उडून आलं तर तुम्हीही गनिमी काव्याने थोडी चपळता दाखवणं गरजेचं आहे. :D

बॅटमॅन Fri, 11/07/2014 - 18:00

In reply to by ............सा…

काही झुरळे सरळ तुमच्या डोळ्यात डोळे घालून, नैनवा से नैनवा लडाईके अ‍ॅटॅक करतात

त्यांना रा.रा. गोविन्दा याञ्चे 'अक्खियों से गोली मारे' हे अजरामर गाणे ऐकवावे अशी 'शिप्पारस' करतो. म्हणजे गुण येई न संशयू |

पण एक शङ्का आहे. झुरळाचे डॉळे पाहून, त्यांतील अगम्य (कारण आम्हांस झुराठी येत नाही) भाव वाचायचा म्हणजे तुमचं दृष्टी सॉलिडच पायजे की ओ. काय मायक्रोस्कोप वापरतासा का काय ओ?

बॅटमॅन Fri, 11/07/2014 - 18:59

In reply to by ............सा…

इसापनीतीतल्या गोष्टींमधल्यागत तुम्हांला अमानवीय सृष्टीशी संभाषण करता येते तर मग ;)

प्रथम मराठी भाषांतर ड्यूरिंग १८०७-१८१४ इन तंजावूर प्रेस, स्पॉन्सर्ड बाय सरफोजीराजे द सेकंड.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 11/07/2014 - 04:07

मोकळ्या भागात आणण्याच्या मुद्द्यात झुरळाला एकच मार्क देण्याबद्दल तीव्र असहमती आहे. इथे एक मुद्दा विसरून चालणार नाही, ते म्हणजे ... वही होता है, जो मंजूर-ए-झुरळ होता है। झुरळांना असं कमी लेखणं आवडलेलं नाही.

पण रासायनिक शस्त्रांचा वापर न करण्याबद्दल सहमती आहे. त्या निमित्ताने आपलाही थोडा व्यायाम होतो, 'थर्ड वर्ल्ड कंट्रीचा' मनुष्य असेल तसल्या अंगकाठ्या शाबूत राहतात.

नगरीनिरंजन Fri, 11/07/2014 - 05:39

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

झुरळाला फारच कमी 'लेखून' स्वतःचा आत्मविश्वास वाढवायचा प्रयत्न स्पष्ट दिसतोय.
पण तुम्ही झुरळाविरुद्ध स्कोर ठेवता: झुरळ ३-५ तुम्ही.
झुरळ उडून बरोब्बर तुमच्या बायकोच्याच दिशेने जाऊन तिला कानावर हात ठेऊन किंकाळ्या मारत भयभीत नजरेने कोचावर चढून उड्या मारायला लावते आणि तुम्ही रागावल्यावर याच्या शतांशानेही ती तुम्हाला घाबरत नाही हा विचार अर्धमेल्या झुरळासारखा तुमच्या मनात वळवळत राहतो: झुरळ ४-५ तुम्ही.
झुरळाकडे तुम्हाला मारण्याएवढं मासिक किंवा झाडू नसूनही झुरळा तुमच्या विरुद्ध ४ गोल करतं म्हणजे आपला पराभव झाकण्यासाठी असूयेने तुम्ही झुरळाला मारता पण त्यातही ते आपल्या विजारीत घुसलं तर काय ही भीती तुम्हाला छळत असतेच. शिवाय झुरळ मेल्यावरही बराचवेळ कोणत्याही हालणार्‍या गोष्टीत तुम्हाला झुरळाचा भास होत राहतो. झुरळ १०-५ तुम्ही.

अस्वल Fri, 11/07/2014 - 22:19

In reply to by नगरीनिरंजन

झुरळाला फारच कमी 'लेखून' स्वतःचा आत्मविश्वास वाढवायचा प्रयत्न स्पष्ट दिसतोय.

काय राव, ट्रेड सिक्रेट्स बाहेर काढलंत एकदम. आम्ही याच धर्तीवर पुढे "उंदराशी चार हात"/ "मुंग्यांशी सामना" वगैरे सेल्फ हेल्प लेख लिहिणार होतो. आता बोंबला.
jokes apart, उडतं झुरळ मारणं ही एक कला आहे!

............सा… Fri, 11/07/2014 - 22:25

In reply to by अस्वल

ऊडत्या झुरळाच्या टाळक्यातच पेपर हाणायचा अन मग तीरमीरी येऊन खाली पडलं की चेचायचं पायाखाली (बूट-चप्पल घालून). पण मग ते जे फुटतं ना त्या घटनेमुळे नंतर तसंही २-३ दिवस जेवण जात नाही मग आपोआप बारीक होतो. आनंदी आनंद भुवनी!!!

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 11/07/2014 - 22:35

In reply to by नगरीनिरंजन

झुरळ १०-५ तुम्ही.

पण ऐसीवर अस्वलच जिंकलं ना. अस्वलाला आधी पाच मिळाले. ऐसीवर पाचाच्या पुढे जाताच येत नाही. झुरळ दहा करणारच कसें?

नंदन Fri, 11/07/2014 - 05:02

पण एखाद्याने झुरळाला कौतुकाने जवळ घेतलं तर झुरळं बिथरतात आणि मग त्यांना सांगोपांग विचार करता येत नाही हे संशोधानातून सिद्ध झालंय. तेव्हा तुम्ही झुरळाबद्दलची किळस घालवलीत तर तिथे तुम्हाला अजून काही मार्क मिळतात.

=))

............सा… Fri, 11/07/2014 - 05:21

In reply to by नंदन

हाहाहा अगदी अगदी :)याच वाक्यावर फुटले.

बॅटमॅन Tue, 15/07/2014 - 16:05

In reply to by उसंत सखू

ही म्हण अंमळ गैरलागू आहे.

सशाच्या शिकारीस तोफ,
यत्ता दुस्रीचं गणित सोडवायला ऐन्स्टैन, इ.इ. उपमा जास्त चपखल आहेत.

सुनील Fri, 11/07/2014 - 09:27

जीवो जीवस्य जीवनम्

अर्थात, झुरळांचा बंदोबस्त करायचा असेल तर पाली पाळा आणि निसर्गाच्या जीवन-साखळीला हातभार लावा!! ;)

'न'वी बाजू Tue, 15/07/2014 - 21:02

In reply to by सुनील

शिवाय, पालींच्या पालनाकरिता काही विशेष कष्टही घ्यावे लागत नाहीत (साधे मुन्शिपाल्टीचे लायसनसुद्धा लागत नाही), ही बाब लक्षात घेता, या साध्यासोप्या नि सुटसुटीत पर्यायाबद्दलची सार्वजनिक अनास्था ही केवळ अनाकलनीय आणि अक्षम्य आहे.

पण लक्षात कोण घेतो?

मी Fri, 11/07/2014 - 10:48

:)फ्रायडे बरा जाईल आता,

पण झुरळाने वळचणीत घातलेल्या अंड्यांना तुम्ही विसरलेला दिसत आहात, तुम्ही जिंकलात तरी तो आपली लिगसि मागे ठेवून जातो, पण झुरळ ढेकणाची अंडी खातो तसेच पाली झुरळाची अंडी खातात असा एक शोध सध्या शन्वारर्फोर्ड युनिवर्सिटी त्यामुळे पाली आणि झुरळ हे आपल्या घराचे एक सदस्य असल्याप्रमाणे त्यांच्याशी वागावे, त्यांना ट्रोल मानु नये. त्याचप्रमाणे प.पु.श्री.श्री. गुरुदेव नवीबाजू अटलांटाकर ह्यांनी 'पालींची बदनामी थांबवा' असा मानव्याचा संदेश दिला आहेच तोही विसरून त्यांचा कोप ओढावून घेऊ नका.

बॅटमॅन Fri, 11/07/2014 - 18:06

In reply to by मी

झुरळे ढेकणाची अंडी खातात?????????

मत्कुणाचल प्रदेशात २ वर्षे काढलेल्यांना तरी सांगू नका ओ असं. आजवर एकही झुरळ त्या अंड्यांची बुर्जी, आमलेट, किंवा गेलाबाजार बॉईल्ड एग करून खाताना दिसलेले नाही. त्या मत्कुणांशी आमचे इतके जिवाभावाचे नाते होते की नंतर कोपर, पाय, झालंच तर कमरेला कधी खोपचीत एखादा डास चावला (हा डास नेहमीपेक्षा अंमळ वेगळा असतो. बसला की रुतून बसतो, जरा स्लो. शिवाय झेब्र्यागत कलर असतो, काळे व पांढरे पट्टे अल्टरनेटिव्हलि असतात.) तर त्याचे कर्तृत्व मत्कुणांस अ‍ॅट्रिब्यूटवीत असू.

चिंतातुर जंतू Fri, 11/07/2014 - 18:24

>> स्कोर : झुरळ २-५ तुम्ही
५ झाले की काय, जिंकलात तुम्ही !

सांख्यिकीचा विचार (पक्षी : 'जगाचे झुरळिक कंपोझिशन, त्याच्या बदलाचे स्वरुप') न केल्यामुळे आशादायी निष्कर्ष चुकूनमाकून निघाले आहेत. जरा आमच्या घासकडवींकडून शिकवणी घ्या. मग सांख्यिकीचा वापर करुन हेतुपुरस्सर अन् विरोधकांना तोंड देण्यात हमखास यशस्वी होणारे आशादायी निष्कर्ष काढाल आणि नाव काढाल.

रमताराम Fri, 11/07/2014 - 19:29

In reply to by चिंतातुर जंतू

सदर प्रतिक्रियेला 'मार्मिक' अशी श्रेणी द्यायची इच्छा होती. परंतु पाच श्रेणींनंतर गुणसंख्या वाढत नाही असे निदर्शनास आल्याने (पांचामुखी परमेश्वर' या उक्तीवर आडमिनचा भारी विश्वास असावा काय?) पेश्शल प्रतिसाद देऊन +१ दिले आहे.

बॅटमॅन Fri, 11/07/2014 - 19:33

In reply to by रमताराम

(पांचामुखी परमेश्वर' या उक्तीवर आडमिनचा भारी विश्वास असावा काय?)

भाषिक दौर्बल्य ;) =))

हा वाक्प्रचार फेमस करण्याचे श्रेय अरुणजोशींना दिलेच पाहिजे.

अजो१२३ Tue, 15/07/2014 - 15:59

In reply to by बॅटमॅन

ऐसीच्या वाचकांना (तसे तर आपल्या मायबोली मराठीलाच) मी १. भाषिकाचे दौर्बल्य नि २. भाषेचे (स्वतःचे) दौर्बल्य अशा दोन सुस्पष्ट संकल्पना प्रदान केल्या होत्या. आता हे 'भाषिक दौर्बल्य' काय आहे? असे करून आपण 'संवादिक दौर्बल्य' वाढवत नाही आहात का?

बॅटमॅन Tue, 15/07/2014 - 16:02

In reply to by अजो१२३

भाषिक म्ह. भाषेचे दौर्बल्य. हाच मूळ अर्थ आणि अभिप्रेत अर्थ दोन्हीही आहे.

बाकी संवादिक दौर्बल्य म्ह. संवाद करणाराचे आणि संवादाचे असे २ क्याटेगरींत मोडते. तुम्हांला कुठले अभिप्रेत(अभि-जिवंतही चालेल) आहे?

ऋषिकेश Mon, 14/07/2014 - 15:50

अरेच्या हा लेख कसा सुटला.. झुरळासारखाच दिसतोय लेखही! ;)

तुफान आवडलेले आहे. शेवटची क्लृप्ती तर खत्रा

Nile Wed, 16/07/2014 - 21:50

ज्याप्रमाणे सिएटलातील हा मनुष्य किटकांविरूद्धच्या या लढ्यात आपलं सर्वस्व पणाला लावून लढतोय त्याप्रमाणे तुम्ही केव्हा सामील होणार?
Man sets house afire while trying to kill spider with lighter, spray paint

अस्वल Wed, 16/07/2014 - 22:41

In reply to by Nile

बातमीचा शेवट -

It's unclear if the spider survived.

म्हणजे शेवटी कोळी १- माणूस ० ? =))

फूट्नोट- बघितलंत, रासायनिक शस्त्रं किती घातक ठरू शकतात ते?

वामा१००-वाचनमा… Thu, 18/12/2014 - 06:20

सेल्समन गणप्या : ओ सायब, घ्या की हो कायतरी इकत तुमच्यासाठी...

बंडोपंत : छे छे .. मला काही नकोय.

सेल्समन गणप्या : अवो मग ही झुरळांची पावडर तरी घ्या की.. एकदम झ्यॅक हाये.

बंडोपंत : ती तर अजिबातच नको. आम्ही आमच्या झुरळांचे इतके लाड करत नाही. त्यांचा काय नेम.
अहो, आज पावडर दिली तर उद्या डिओड्रंट मागतील

तिरशिंगराव Tue, 23/12/2014 - 20:09

एक ऐकीव गांवठी उपायः -
३-४ झुरळे अलगद मारुन उकळत्या पाण्यांत टाकावीत.(रासायनिक अस्त्रांनी नाही, अलगद, अशासाठी की त्याचा मौल्यवान रस जमिनीवर वाया जाता कामा नाही.) पाणी अर्धे आटवावे. त्यानंतर, पाणी गाळून झुरळांची कलेवरे फेकून द्यावीत. आता हा झुरळांचा काढा पिण्यायोग्य होण्यासाठी फ्रिजमधे ठेवून थंड करावा. पाहिजे तर चवीला मीठ मिरपूड टाकावी. असा काढा, रात्री झोपण्यापूर्वी ३ दिवस घेतल्यास अस्थमा कायमचा बरा होतो.

डिसक्लेमरः हे औषध मी स्वतः करुन पाहिले नाहीये. पण ज्याने सांगितले, त्याने छातीवर हात ठेवून असा पेशंट बरा केल्याचे सांगितले. झुरळांत काय केमिकल्स असतात माहित नाही.

लॉरी टांगटूंगकर Tue, 23/12/2014 - 20:48

In reply to by तिरशिंगराव

तोंडल्यांचे क्रॉस-सेक्षन झुरळांसारखेच दिसतात. तोंंडली घेऊन हा प्रयोग केल्यास त्याचे काय पर्यवसान होईल?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 31/10/2018 - 07:42

उगाच अस्वलाची आठवण आली.