कपिलाषष्ठी, गटारयंत्र व इतर - अर्थात, मायमराठीची लेणी : भाग २

गेल्या लेखात आपण कै. विद्याधर वामन भिडे रचित "मराठी भाषेचे वाक्प्रचार व म्हणी" या ग्रंथातील काही निवडक वाक्प्रयोगांशी परिचय करून घेतला. ह्या लेखातही मागीलप्रमाणेच आम्हांस मौजेचे व अनोखे वाटणारी काही निवडक उदाहरणे सादर करीत आहोत.

कपिलाषष्ठीचा योग -
१. अगदी दुर्मिळ, क्वचित प्रसंगी मिळणारी संधी, संयोग अथवा पडणारी गाठ.
२. अतिआश्चर्यकारक आणि अनपेक्षित प्रकारे आनंददायक गोष्टी एकाच वेळी जुळून येणे, ही जुळणी.
प्रस्तुत लेखमालेच्या 'मातीचे कुल्ले व नागवे कोल्हे' या मागच्या भागावरील प्रतिसादांत या शब्दप्रयोगाचा उल्लेख झाला होता. म्हणून भिडेशास्त्र्यांनी दिलेले त्याचे स्पष्टीकरण येथे देत आहोत.
ज्योतिषशास्त्रात भाद्रपद महिना, कृष्णपक्षातील षष्ठी ही तिथी, हस्त हे महानक्षत्र, व्यतिपात योग, मंगळवार व दिवसनक्षत्र रोहिणी ह्या सहा गोष्टी एकाच वेळी जुळून आल्या म्हणजे त्यास कपिलाषष्ठीचा योग असे नाव दिले आहे. यापैकी कपिल शब्दाचा अर्थ माहीत असल्यास वाचकांनी कृपया सांगावा. कपिल हे कृष्ण किंवा काळे याच्याशी संबंधित विशेषण असावे असा आमचा कयास. उदाहरणार्थ, संपूर्ण काळ्या (फक्त कान पांढरे असलेल्या?) धेनूस कपिला म्हणण्यात येते. त्यावरून तर्कच करावयाचा झाला तर ही षष्ठी कृष्णपक्षात येते म्हणून कपिलाषष्ठी असे म्हणता येईल.

खडाष्टक किंवा षडाष्टक -
एका माणसाच्या राशीपासून दुसऱ्याची रास सहावी व दुसऱ्या माणसाच्या राशीपासून पहिल्याची आठवी अशी असली म्हणजे त्या दोघांत खडाष्टक किंवा षडाष्टक आहे असे म्हणतात. हे दोन प्रकारचे असते. प्रीती दाखवणारे ते प्रीतिखडाष्टक आणि वैर दर्शवणारे ते मृत्युखडाष्टक. परंतु व्यवहारात खडाष्टकचा अर्थ वैर असाच समजला जातो.

अर्धचंद्र -
अष्टमीचा चंद्र अर्धा असून तो अर्धवर्तुळाकृती असतो. गंचांडी (एखाद्याला मानगुटीस धरून बळाने घालवून) देताना हाताचा अंगठा व पुढचे बोट ही ताणली जाऊन अर्ध्या चंद्राचा आकार तयार होतो. यावरून अर्धचंद्र म्हणजे गचांडी असा अर्थ झाला.
व्यवहारात प्रत्यक्ष हाताने गचांडी मारलेली नसताना देखील सांकेतिक अर्थाने घालवून देणे या अर्थी हा शब्द वापरला जातो. उदा. नोकरीतून अर्धचंद्र मिळणे.
आम्हांस असा प्रश्न पडतो की जर मानगूट पकडण्यासाठी होणाऱ्या आकारास अर्धचंद्र म्हटले जाते, तर दोन्ही हातांनी अर्धचंद्र करून गळा दाबण्यास पूर्णचंद्र देणे म्हणावे काय?

गौडबंगाल -
मंत्रतंत्र, किमया, जादू वगैरे.
पूर्वी गौड आणि बंगाल हे देश वरील विद्यांत प्रवीण होते.

यातले गौड हे काय प्रकरण आहे हे आमच्यासाठी एक गौडबंगालच आहे. हा शब्द आम्हाला गौड सारस्वत या जातीच्या संदर्भात माहीत आहे. परंतू जादूटोण्याशी या जातीचा फारसा संबंध असल्याचे ऐकिवात नाही. तो शब्द गूढ शी निगडित असावा काय? तसेच बंगाली मिठाया नामांकित असून हे लोक गोडघाशे म्हणून प्रसिद्ध आहेत. तेव्हा पूर्वी आम्हास त्या गौडची व्युत्पत्ती गोड वरून असावी अशी शंका होती. तसेच या शब्दाचा वापर कधी सुरू झाला असावा? आमचा अंदाज असा आहे की मराठ्यांच्या बंगालच्या स्वारीनंतर हा शब्द प्रचलित झाला असावा.

घटकेचे घड्याळ -
एकच घटकाभर चालत रहाणारे घड्याळ. म्हणजे लक्षणेने, मनुष्याचे क्षणभंगूर जीवित.

गाढवाचा खरारा -
मूर्ख बिनअकली माणूस.
यास गायीचे यजमान, पतिराज किंवा चिरंजीव असेही म्हणतात.
मूळात गाढव शब्द मूर्ख व्यक्तीचे विशेषण म्हणून वापरण्यात येतो. पण मग प्रश्न असा येतो की गाढवाचा खरारा हे मूर्ख माणसासाठी केलेले काम न ठरता परत मूर्खासाठीच समानार्थी शब्द का व्हावा?

अंगचा मळ -

अतिशय कमी किमतीची अथवा टाकाऊ वस्तू
रामकृष्णपंत भारी अदत्त आहे. कोणाचा जीव वाचविण्यासाठी तो अंगचा मळही देणार नाही.
आमच्या काही कोकणी स्नेह्यांकडून हेच वाक्य 'रामकृष्णपंत कोणाच्या कापल्या करंगळीवर मुतायचा देखील नाही' या स्वरूपात ऐकले आहे.

हातचा मळ -
अंगचा मळ च्या व्युत्पत्तीवरून पाहता हातचा मळ म्हणजे त्याहूनही मामूली किमतीची किंवा अतिटाकाऊ वस्तू असावी असा तर्क बांधणे सहज शक्य आहे. परंतु भिडेशास्त्र्यांनी ह्या शब्दप्रयोगाचे मूळ निराळे दिले आहे, ते याप्रमाणे.
मूळ संस्कृत शब्द हस्तामलकवत. आमलक म्हणजे आवळा हातात धरणे, लपवणे कोणासही अतिसहजी शक्य असते. तेवढ्या सहजरीत्या करता येईल अशी गोष्ट. कोणा संस्कृत न जाणणाऱ्या व्यक्तीने त्याचे हातचा मळ असे रूपांतर केले असावे.
खरे तर आम्हास हातचा मळ ही शब्दसंगती जास्त चपखल वाटते. हाताच्या त्वचेवरचा मळ लपवून ठेवणे किंवा इथून तिथे घेऊन जाणे हे आवळ्यापेक्षा किती तरी पटीने सुलभ आहे. शिवाय आवळा म्हणजे डोंगरी आवळा की रायआवळा? मोरावळ्यासाठी वापरावयचे टपोरे आवळे लहानखुऱ्या शरीरयष्टीच्या माणसाला तितक्या सहजी तळहातात लपवून ठेवता येत नाहीत. शिवाय आवळे त्या त्या ऋतूतच मिळावयाचे. मळाचे काय, सदासर्वकाळ असतोच. त्यामुळे आत्यंतिक सहजसाध्य कामाला संस्कृत हस्तामलकाऐवजी मराठमोळा हातचा मळ हाच शब्दप्रयोग योग्य वाटतो. अपभ्रंशातून मूळ शब्दाहून अधिक समर्पक शब्द तयार होण्याचे हे विरळा उदाहरण असावे.

कानामागून येणे आणि तिखट होणे -

एखाद्याच्या मागून येणे आणि त्याच्यावर आपला अंमल गाजवण्यास प्रवृत्त होणे.
याचेच मूळ रूप पुढीलप्रमाणे असून तेही प्रचलित आहे.
कानामागून आले शिंगट, ते झाले महातिखट -
गाय, म्हैस आदी प्राण्यांना कान जन्मतःच असतात. शिंगे मात्र कानाच्या मागील बाजून आणि मागाहून उगवतात. आणि ती कानापेक्षा जास्त उपद्रवी ठरतात.

आखाडसासरा -

नसता मोठेपणा आपल्याकडे घेऊन दुसऱ्यावर करडा अंमल चालवू पहाणारा माणूस (त्याचप्रमाणे आखाडसासू)
आषाढ महिन्यापुरता सासरा (अगर सासू). आषाढाच्या महिन्यात सुनेने सासऱ्याचे तोंड बघू नये असा आपणात परिपाठ आहे. म्हणून तिला दुसऱ्या घरी आषाढात रहाण्यासा पाठवितात. तेथील माणूस तेवढा काळ तिच्यावर खऱ्या सासऱ्याप्रमाणेच अधिकार गाजवू लागतो. यावरून त्याला आखाडसासरा म्हणतात.
या प्रथेमागे काय प्रयोजन असावे? आमच्या समजुतीप्रमाणे आषाढात शेतातली कामे भरपूर असतात. आणि ती वेळीच होणे निकडीचे असते. त्यासाठी घरातील सर्व मनुष्ये यथाशक्ती राबणे गरजेचे असते. अशा वेळी घरातील तरण्याताठ्या विवाहित मुलांचे लक्ष शेतकामातच गुंतून रहावे म्हणून सुनेचा अडथळा दूर करण्यासाठी केलेली ही युक्ती असावी.

अनागोंदी -
हंपीच्या आधी आनेगुंडी हे शहर एकेकाळी विजयनगरच्या साम्राज्याची राजधानी होते. विजयनगरचे राज्य दक्षिणेत दूरवर पसरलेले होते खरे. परंतु तेथील राजे आपण सर्व हिंदुस्थानचे राजे आहो आणि इतर राजे आपले मांडलिक आहेत, असे भासवण्याचा प्रयत्न करीत. त्यासाठी इतर सर्व 'मांडलिक राजां'कडून खंडणीच्या रूपाने मोठमोठ्या रकमा आल्या आहेत असे भपकेदारपणे जमेच्या बाजूस दाखवीत. तेवढ्याच रकमा त्यांच्या नावावर नजराणे, देणग्या, आहेर अशा भपकेदार शब्दांनी खर्चाच्या बाजूस दाखवून जमाखर्चाची तोंडमिळवणी करून दाखवीत. यावरून 'अनागोंदी' या शब्दाचा अर्थ भपकेदार, अव्यवस्थित, ताळतंत्र नसलेला असा क्रमाक्रमाने होत गेला. अनागोंदी हे विशेषण कारभार, जमाखर्च, व्यवस्था इत्यादी नामांच्या मागे योजण्यात येते.

अनेगुंडी म्हणजे कानडीत हत्तीच्या फिरण्याची जागा, त्याचा अपभ्रंश अनागोंदी असेही भिडेशास्त्र्यांनी ऐकिवात आल्याचे नमूद केले आहे.

गटारयंत्र -

या शब्दाची व्युत्पत्ती मोठीच मौजेची आहे.
पुणे शहरात भांग्या मारुती, जोगेश्वरी आणि रामेश्वर या तीन देवळांच्या पुढील गटारांवर किंवा ओट्यांवर आणि बुधवार पेठेत ढमढेरे यांच्या वाड्यातील पटवेकऱ्यांच्या दुकानात भट, आचारी, पाणके वगैरे लोक संध्याकाळी दुसऱ्या दिवसाच्या आमंत्रणांची वाट पहात बसतात. तेथे त्या मंडळींत इकडच्या तिकडच्या अनेक विषयांवर गप्पा निघतात. व त्या गावच्या सर्व बातम्या आणि खबरा यांच्यावर काथ्याकूट चालतो. तेथील बातम्या आणि खबरा पुष्कळ वेळा निराधार व खोट्या ठरतात. यावरून निराधार बातमीस 'गटारबातमी' आणि ती जेथे उत्पन्न केली जाते त्या स्थानाला अगर माणसाला 'गटारयंत्र' असे म्हणतात.

पुण्यासारख्या पुण्यशील व त्याचबरोबर जाज्वल्य अस्मिता बाळगणाऱ्या शहराबद्दल सरळसरळ नाव घेऊन असे लिहिणाऱ्या (मूळ बेळगावकर) भिडेशास्त्र्यांच्या धार्ष्ट्याचे मराठी आंतर्जालीय वाचकांना भारीच कौतुक वाटेल. यावरून, तत्कालीन लेखकांना पुण्याच्या सांस्कृतिक अस्मितेचा धाक म्हणावा तितका वाटत नसे असे अनुमान काढता येते.

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

'गौड' आणि 'बंगाल' हे जवळजवळ सारख्याच अर्थाचे शब्द आहेत. मोनिअर-विल्यम्सच्या कोषात 'गौड' ह्याचा अर्थ 'वंगापासून ओरिसाच्या हद्दीपर्यंतचा प्रदेश' असा दिला आहे. (वंग म्हणजेच बंगाल. आठवण करा - 'वंगभंगाची चळवळ'.) वंग नावाच्या प्राचीन शहराचे अवशेष शिल्लक आहेत असेहि कोषात नमूद केले आहे.

मराठे बंगालात जाण्याचा आणि ह्या शब्दाचा काही संबंध नाही कारण शब्द संस्कृत भाषेत पहिल्यापासून आहे. संस्कृत लेखनात दीर्घ समासांनी भरलेल्या आणि जरा क्लिष्ट अशा लेखनशैलीला गौडी शैली म्हणतात. समजायला सोप्या अशा शैलीला वैदर्भी म्हणतात.

एक सूचना. हे पुस्तक आता copyright च्या मर्यादेबाहेर गेले असले पाहिजे. (लेखकाच्या मृत्यूपासून ६० वर्षे). हे scan/pdf करून archive.org, scribd.com अशा संस्थळांवर ठेवल्यास सर्वांना लाभ होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गौड हा शब्द गूड = गुळावरून, किंवा गौ = गाईवरून आला अशी दोन मतं बंगाली इतिहासकारांमध्ये सापडतात. गुळाचे निरनिराळे प्रकार हे या प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे.

गौड हे पूर्वेकडील (आजच्या उत्तर-पश्चिम बंगालकडील मुर्शिदाबाद, बिर्भूम आणि बर्द्धमान जिले) ६व्या शतकातल्या (इसवी) प्राचीन राज्याचे, तसेच त्याच्या राजधानीचे नाव होते. आजही गौड शहराची काही ऐतिहासिक खिंडारे आहेत. गौड आणि वंग हे सुरुवातीला वेगळे प्रदेश किंवा राजकीय युनिट्स होते असे दिसते, पण पुढे पाल आणि सेन राज्यांतर्गत एकत्रित केले गेले. शशांक पाल या राजाला पहिले एकत्रित बंगाली राज्य स्थापन केल्याचे श्रेय दिले जाते; त्याची राजधानी गौड होती. मध्ययुगीन, जुन्या बंगाली लिपीला ही "गौडीय लिपी" म्हणतात. चैतन्य महाप्रभूच्या पंथाला ही "गौडीय वैष्णव" म्हणतात.

गौड-सारस्वत हे काश्मीर हून बंगाल मार्गी आले अशी कथा ऐकली आहे. कर्नाटकातल्या गावप्रमुखांच्या "गौड" पदवीशी, किंवा पंच गौड ब्राह्मणांच्या पोटजातींशी या सर्वाचे नेमके काय नाते आहे माहित नाही.

"गौड-बंगाल" शब्दाचा मराठीतला प्रचलित अर्थ कदाचित १८व्या शतकातल्या स्वार्‍यांशी संबंधित असेलही, पण मूळ लेखातले गोड-घाशे किंवा मंत्रतंत्रातले कौशल्य वगैरे स्पष्टीकरण तेवढे कायकी पटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पारंपारिक विचारानुसार ब्राह्मणांचे पंचद्रविड आणि पंचगौड असे दोन प्रकार मानले जातात. ह्या दोन प्रकारांची पुढे वाटणी कल्हणाच्या 'राजतरंगिणी'नुसार अशी होते:

कर्णाटकाश्च तैलंगा द्राविडा महाराष्ट्रकाः
गुर्जराश्चेति पञ्चैव द्राविडा विन्ध्यदक्षिणे||
सारस्वताः कान्यकुब्जा गौडा उत्कलमैथिलाः
पञ्चगौडा इति ख्याता विन्ध्यस्योत्तरवासिनः||

(कर्नाटकी, तेलंगी, द्रविड, महाराष्ट्री आणि गुर्जर असे पाच द्रविड ब्राह्मण विंध्य पर्वताच्या दक्षिणेस आहेत. सारस्वत, कनोजी, गौड, उडिसी आणि मैथिली असे पाच ब्राह्मण विंध्य पर्वताच्या उत्तरेस आहेत.)

आजहि हे शब्द आपणास भेटतात. उदा. कर्नाटकी (विमल कर्नाटकी), गुर्जर (वि.सी.गुर्जर), द्रविड (रँड खून खटला-फेम आणि क्रिकेट-फेम), तेलंग (जस्टिस के. टी. तेलंग) ही आडनावे चालू आहेत. घाशीराम प्रकरणात मेलेले ब्राह्मण तेलंगी होते. महाराष्ट्रात गौड सारस्वत (सारस्वत बँक) ही एक पुढारलेली जात आहे. घाशीराम आणि संभा़जीबरोबर मृत्यु पावलेला कलुषा कब्जी हे दोघे कनोजी होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपली सूचना योग्यच आहे. परंतु सध्या आमच्यापाशी प्रतयंत्राची सुविधा नाही. तेव्हा आपण म्हणता त्याप्रमाणे पुस्तक संस्थळी ठेवणे आजमितीस तरी आम्हास कठीण भासते. यासंबंधात आपल्याशी खरडपत्रव्यवहार केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या एका सारस्वत मित्राच्या मते बंगालातले ब्राह्मण मासे खाणारे, सरस्वती नदीचा दुष्काळ आला तेव्हा ते लोकं तिथून निघाले. महाराष्ट्रात आलेल्यांना गौड सारस्वत नाव त्यावरूनच आलेलं आहे. बंगाल आणि गौड हे दोन्ही शब्द सारख्याच अर्थाचे असं कोल्हटकर म्हणत आहेत, ते या गोष्टीतूनही मान्य होण्यासारखं आहे. (मराठी आंजावरच्या माझ्या दोन मित्रांच्या बंगाल आणि बंगाली प्रेमाचं गौडबंगाल अजूनही काही धड उलगडलेलं नाही.)

'बेंगरूळ'चा काही उल्लेख भिडेशास्त्र्यांच्या पुस्तकात आहे का? कन्नडीगांचं एकूण व्यवस्थापनातलं कौशल्य पहाता बंगळुरूचा अपभ्रंश होऊन बेंगरूळ असा शब्द मराठीत आला. पण त्यावर माझा फारसा विश्वास, का कोण जाणे, बसत नव्हता. अनागोंदीची व्युत्पत्ती पाहून थोडा जास्त विश्वास बसतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे ही छानच!
षडाष्टक म्हणजे सम राशींपासून आठवी आणि त्या राशीपासून (जी विषम असते) सहावी रास अशी जोडी तयार होते. (उदा. मेष विषम रास म्हणून तिच्यापासून -तिला पकडून- सहावी म्हणजे कन्या आणि कन्या (६) पासून आठवी मेष तेव्हा मेष व कन्या यांचे षडाष्टक)

बाकी आमच्याकडेर अंगच्या मळा ऐवजी कापल्या करंगळीला प्रेफर केले जाते Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेखमालिका फर्मास जमते आहे ! वाचताना नवी माहिती तर मिळालीच पण लेखकर्त्या व्यक्तीच्या खुसखुशीत कोपरखळ्याही आवडल्या ! आणखी येऊ देत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

आणखी येऊ देत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक लिखाण

मजा येतेय वाचायला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

आमच्या समजुतीप्रमाणे आषाढात शेतातली कामे भरपूर असतात. आणि ती वेळीच होणे निकडीचे असते. त्यासाठी घरातील सर्व मनुष्ये यथाशक्ती राबणे गरजेचे असते. अशा वेळी घरातील तरण्याताठ्या विवाहित मुलांचे लक्ष शेतकामातच गुंतून रहावे म्हणून सुनेचा अडथळा दूर करण्यासाठी केलेली ही युक्ती असावी.

पटले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

कानामागून येणे आणि तिखट होणे -

हे खरेतर "पानामागून आली आणि तिखट झाली" असे आहे ( इतक्यातच कुठेतरी वाचले होते)

मिरची ही नंतर आली पण त्याच्या कितीतरी आधीपासून मिरे हे तिखट चवीसाठी वापरले जात. मिरची नंतर आली आणि मिरची च्या झाडावर मिरची ही पानामागे लपल्यासारखी असते पण मिर्‍यांपेक्षा तिखट म्हणून जास्त प्रिय झाली असे काहीतरी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

हा ही भाग मस्त आहे. नवीन माहिती कळतेय आणि वाचायलाही मजा येतेय.

आषाढात 'नवीन सूनेने' सासूचे तोंड बघू नये हा प्रकार मी महाराष्ट्रात तर नाही पण बंगलोरमधे पाहिला होता. माझ्या ऑफिसातल्या एकीच्या लग्नानंतर लगेच आषाढ सुरू झाला होता. खरं तर ती सासूसोबत राहत नसूनही तिला १ महिना माहेरी रहायला लागले होते Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

लेखांक आवडला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे वाचले होते.
तिन्ही सांजा कुठून आल्या?
तीन सांजांची व्युत्पत्ति सांगेल का कुणी?

'तिन्ही सांजा(ज)’ हा शब्दप्रयोग 'त्रिसंध्या’ ह्या संस्कृत शब्दावरून आला असावा असे डॉ० अशोक केळकर ह्यांनी सुचविले. 'त्रिसंध्या’ हा शब्द आपटयांच्या तीन खंडांच्या संस्कृत-इंग्रजी कोशात (सुधारित आवृत्ती संपा० प्रा० गोडे, प्रसाद प्रकाशन, पुणे, १९७९) आढळतो. पहाट, सायंकाळ ह्या दिवस व रात्रीच्या सीमारेषेवरील दोन संध्या व माध्याह्न ही सकाळ व दुपार ह्यांच्या सीमारेषेवरील संध्या अशा ह्या तीन संध्या. पूर्वी ह्या तीन संध्यासमयी संध्या केली जाई. 'तिन्हीसांज’प्रमाणे 'त्रिकाल’ (तिन्ही त्रिकाळ) हाही शब्द रूढ आहे. 'किरकिरती रातकिडे, झाल्या तिन्हीसांजा’ ही यशवंतांच्या कवितेतील ओळही एका शब्दकोशात उध्दृत केलेली आढळते.

हे गूगलून वाचले. पण हे ओढून ताणून वाटते. तिसरी संध्या असे होईल. तिन्ही सांजा स्पेसिफिकली रात्र होण्या आधीची संधीवेळ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

ह्याच्या उत्पत्तीचा प्रश्न बर्‍याच जणांना गुंगवीत आहे पण उत्तर दिसत नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

On second thought,पंच पंच उषःकाल जसे ब्राह्ममुहूर्तापूर्वीची पंचपंचाशत् घटिका ह्यावरून आला असा माझा तर्क आहे, तद्वत 'तिन्हीसांजा'चा त्रिंशत्(ती) घटिका ह्याच्याशी असू शकेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग झालेच म्हणायचे.

कदाचित तिन्ही संध्या होऊन गेल्या. या अर्थाने? जाहल्या तिन्ही सांजा? तिन्ही सांजा नेहेमी होतात. पण मग संध्याकाळ पण होतेच? संध्याकाळचे शेवटचे अंधारून येणे अन तरीही थोऽडा संधीप्रकाश असण्याचा वेळ तो तिन्ही सांजांचा असतो ना? सूर्य मावळतीला टेकण्यापासून म्हणजे सुमारे ६ ते ७ - साडे सात पर्यंतची वेळ ही संपूर्ण संध्याकाळ.. असो. कुठे तरी संदर्भ मिळेलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-