भारताची प्रगती ३: जीवेत शरदः शतम

भारताची प्रगती १: प्रास्ताविक
भारताची प्रगती २: घृतं पीबेत

प्रगती झाली असं म्हणण्यासाठी मूलभूत गोष्टी काय आहेत? गेल्या शतकात अनेक लोकांकडे गाड्या आल्या. त्याआधी सगळाच प्रवास पायी असायचा. ही एका अर्थाने प्रगती म्हणता येईल. गाड्या मोजणं सोपं असतं, आणि त्यांच्याकडे बोट दाखवून ही प्रगती असं ठामपणे सांगता येतं. मात्र गाड्यांची संख्या वाढल्याने जीवन अधिक सुखी झालं का? हा प्रश्न रहातोच. त्यामुळे 'खऱ्या अर्थाने जीवन सुखी होण्यासाठी कुठच्या घटकांची आवश्यकता असते?' या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय मोजमापं करण्याला अर्थ नसतो.

उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून मानवाची निर्मिती झाली. तीमधून प्रत्येक जिवाला जीजिवीषा मिळालेली आहे. मृत्यूचं भय, जगण्यासाठीची धडपड, आणि आपली संतती जगवण्यासाठी कष्ट घेण्याची तयारी ही त्यातून मानवाला मिळालेली देणगी. उत्क्रांतीच्या सटवाईने कपाळावर बाकी काही लिहिलं नाही, तरी हे सगळ्यांच्याच कपाळी लिहायला विसरत नाही. आपलं आयुष्य शक्य तितकं भयमुक्त करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत असतो. मृत्यूची भीती समोर उभी राहिली की बाकी सगळ्या गोष्टी कस्पटासमान वाटतात. दीर्घायुषी व्हावं व आपलं जीवन काळजीमुक्त असावं ही सर्वांचीच आकांक्षा असते. म्हणून सरासरी आयुर्मान वाढलं तर देशाची प्रगती झाली असं म्हणता येतं.

गेल्या शतकात जी वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाली तीमुळे जगभरातच सर्वत्र सरासरी आयुर्मान वाढलेलं आहे. भारतात ते विशेषकरून गेल्या पन्नास वर्षांत वाढलेलं आहे. (त्याआधीही कदाचित वाढलेलं असेल, पण त्याबद्दल माझ्याकडे विदा नाही). १९६० साली जन्मलेल्या सर्वसाधारण मुलाचं अपेक्षित आयुष्य ४२ वर्षांचं होतं. तेच २०१० साली ६५ वर्षांचं झालं. ही प्रगती स्पृहणीय आहे. परंतु या आकड्यांचा नक्की अर्थ समजावून घ्यायला हवा. जन्मवेळी अपेक्षित आयुर्मर्यादा म्हणजे काय? १९६० साली जन्मलेले सगळेच फक्त ४२ वर्षं जगले का? अर्थातच नाही. तसं असतं तर आजच्या घटकेला त्यांच्या मुलांशिवाय कोणीच शिल्लक राहिलं नसतं. ४२ वर्षं हा सरासरी आकडा आहे. त्यामुळे निव्वळ सरासरीच्या आकड्यांपेक्षा ती कुठल्या वितरणाची सरासरी आहे हे तपासून पहाणं महत्त्वाचं ठरतं. त्यावरून ४२ हा आकडा बदलून इतक्या ६५ का झाला, तो तसा होणं हे खरोखरच प्रगतीचं लक्षण आहे का हे कळायला मदत होते.

जन्माच्या वेळी अपेक्षित आयुर्मान कसं काढतात? १९६० साली ४२ हा आकडा कसा आला? त्यासाठी ६० साली जे मृत्यू झाले त्यांची वयं तपासली जातात. म्हणजे किती टक्के मृत्यू वय वर्ष एकच्या मुलांचे झाले, किती टक्के मृत्यू वय वर्ष दोन असताना झाले... असं संपूर्ण लोकसंख्येसाठी तपासलं जातं. आणि त्यांची त्या टक्केवारीनुसार सरासरी काढली जाते. हे सरासरी उत्पन्न काढण्यासारखंच आहे, फक्त उत्पन्नाच्या आकड्याऐवजी मृत्यूच्या वेळचं वय घेतलं जातं. उत्पन्नाची सरासरी जशी टोकाच्या उत्पन्नामुळे अधिक येऊ शकते तसंच सरासरी आयुर्मर्यादेच्या बाबतीत होऊ शकतं. फक्त उलट्या दिशेने. एक सोपं उदाहरण घेऊ. समजा ८० टक्के जनता बरोब्बर ८० वर्षं जगते, पण उरलेले २० टक्के ५ व्या वर्षीच मरतात. तर सरासरी वय (८० x ८० + ५ x २०)/१०० = ६९ इतकं येतं. हे जन्माच्या वेळचं सरासरी अपेक्षित वय. मात्र जी मुलं पाच वर्षांपलिकडे जगतात त्यांचं सहाव्या वर्षी अपेक्षित वय ८० होतं.

या दुसऱ्या आलेखात हाच मुद्दा प्रत्यक्ष आकडेवारीने स्पष्ट केलेला आहे. भारताच्या बाबतीत मला सहज हे आकडे न मिळाल्याने अमेरिकेसाठीचे आकडे वापरले आहेत. १८५० ते २००० पर्यंत दर पन्नास वर्षांनी अपेक्षित आयुर्मान वयाप्रमाणे कसं बदलत घेलेलं आहे हे त्यात दाखवलं आहे. म्हणजे १८५० साली जन्मवेळी अपेक्षित आयुर्मान ३९ वर्षं इतकं होतं. मात्र तेच वयाच्या दहाव्या वर्षी ५८ इतकं जास्त होतं. वीस वर्षांपर्यंत जगलात तर ते वाढून फक्त ६० इतकंच होतं. याचा अर्थ पहिल्या दहा वर्षांत मृत्यू होणाऱ्यांची संख्या प्रचंड होती.

सुनील गावसकरच्या बाबतीत म्हणायचे की त्याने २० रन्स केल्या की समजायचं, तो हमखास सेंचुरी करणार. बॅट्समन प्रथम बॅटिंगला येतो तेव्हा खेळपट्टीचा अंदाज आलेला नसतो. चेंडू उसळी घेणार की आपटून हळू होणार हे समजायचं असतं. ते समजून घेण्यासाठी थोडा वेळ जातो. त्या काळात थोडं चाचपडायला होतं. म्हणून सेट व्हायच्या आत बाद होण्याची शक्यता अधिक असावी. (हे अर्थातच आकडेवारीने तपासून बघितलेलं नाही).

नवजात अर्भकाचं आयुष्य हेदेखील ओपनिंग बॅट्समनसारखंच असतं. शरीर कमकुवत, नाजूक असतं. रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते. साध्या आजारपणातून दगावण्याची शक्यता अधिक असते. त्यात पाचवीला पुजलेली गरीबी आणि अज्ञान असलं की विचारायलाच नको. लहान मुलं पटापटा मरायची. अजूनही मरतात. आजमितीला होणाऱ्या बालमृत्यूंपैकी दोन तृतियांश हे सहज टाळता येण्याजोगे समजले जातात. बहुतेक मृत्यू न्यूमोनिया, डायरिया, मलेरिया, मीझल्स, आणि या सगळ्यांची तीव्रता वाढवणाऱ्या कुपोषणातून येतात. शुद्ध पाणी, निरोगी वातावरण, वैद्यकीय सुविधांची सहज उपलब्धता, आईवडिलांसाठी जुजबी आरोग्यविषयक ज्ञान या सर्वांमुळेच हे मृत्यू कमी व्हायला मदत होते. म्हणून हा आकडा (अथवा त्याच्याशीच संलग्न असलेला नवजात मृत्यूचा आकडा) समाजाच्या एकंदरीत प्रगतीचा निर्देशांक मानला जातो.

अमेरिकेची आकडेवारी दाखवणाऱ्या आलेखाकडे नीट बघितलं तर हे लक्षात येतं की १९५० ते २००० मध्ये जन्माच्या वेळचं अपेक्षित आयुष्य ४८ वर्षांवरून ६७ वर्षांवर गेलं. म्हणजे भारतात सुमारे १९६५ ते २००९ पर्यंत जो बदल (४६ वरून ६५ पर्यंत) झाला त्याच्याशी खूप मिळताजुळता. त्यामुळे या दोन देशांमधल्या आयुर्मानांची त्या दोन कालखंडांतली तुलना करता यावी. अमेरिकेत या कालखंडात महत्त्वाचा बदल दिसतो तो म्हणजे १९०० सालचा ० ते १० मधला प्रचंड फरक १२ कमी होऊन तो १९५० साली ३ वर आला. म्हणजे १९०० साली बरीच लहान मुलं मरायची. १९५० साली दहा वर्षांच्या आत होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण सुमारे एक चतुर्थांश झालं असावं. (इथे मी अगदी अचूक गणित करत नाहीये, पण साधारण अंदाज बांधतो आहे). गणिताच्या भाषेत बोलायचं झालं तर त्या भागातला रेषेचा चढ एक चतुर्थांश झाला. हा त्या वयाच्या टप्प्यात होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणाशी साधारणपणे समानुपाती आहे.

भारतातदेखील १९६० नंतर हे प्रमाण कमी झालेलं असावं असा अंदाज बांधता येतो. साठ साली हजार जन्मलेल्या बालकांपैकी २३९ बालकं वय वर्षे पाचच्या आत मरायची. जवळपास चारात एक! यावर विश्वास बसत नसेल तर आपल्याच आजी-आजोबा किंवा काका-आत्या-मामा-मावश्या यांपैकी किती प्रमाणात भावंडं लहानपणीच गेली हे आठवून पहा. आणि शहरांपेक्षा त्याकाळी गावांत हे प्रमाण अधिक होतं हेही लक्षात घ्या. गेल्या पन्नास वर्षांत हे प्रमाण खूपच कमी झालेलं आहे. २३९ वरून ते ६२ वर आलेलं आहे. सुमारे एक चतुर्थांश. विसाव्या शतकाच्या पहिल्या अर्धात अमेरिकेत जे घडलं त्याच्याशी हे चित्र मिळतंजुळतं आहे. त्या आलेखातून हेही दिसतं की पहिल्या दहा वर्षातल्या मृत्यूंचं प्रमाण जसं कमी झालं, तसंच त्यानंतरच्या तीसेक वर्षांतल्या मृत्यूंचं प्रमाणही बरंच कमी झालेलं आहे. याचा अर्थ जन्माला येणारं मूल जगणं आणि चाळीस ते पन्नास वर्षांपर्यंत वाढण्याची शक्यता वाढलेली आहे.

हे सगळं वाचायला छान वाटतं. पण खरोखर सामान्य माणसाचं जीवन सुधारलं का? का ही नुसती कोरडी आकडेवारी आहे? या आकड्यांचा जीवनावर दिसणारा परिणाम काय? उत्तर तसं सोपं आहे. चारात एक मूल मरण्याचं प्रमाण कमी होऊन ते सोळात एक मूल इथपर्यंत आलेलं आहे. साठच्या सुमाराला भारतातल्या स्त्रियांचा फर्टिलिटी रेट सुमारे ६ होता. याचा अर्थ जवळपास सर्वच आईबापांना आपलं मूल पाच वर्षांच्या आत गेल्याचा अनुभव एकदा यायचा. मोठ्या लोकसंख्येला तो दोनदाही यायचा. आता फर्टिलिटी रेट २.६६ आहे. म्हणजे त्याच तीव्रतेचा वाईट अनुभव येणाऱ्या आईवडिलांचं प्रमाण सुमारे पंधरा टक्क्यांवर आलेलं आहे. दोन मुलं इतक्या लहान वयात जाण्याचा अनुभव घ्यावा लागणारे आईवडील विरळाच - एखाद दोन टक्के असावेत.

लहान मूल जाणं ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे. एक मूल नऊ महिने पोटात बाळगण्यासाठी आणि त्याला जन्म देण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात ते स्त्री झाल्याशिवाय कळत नाहीत. जन्मलेल्या मुलामध्ये आई व वडील दोघांचीही शारीरिक, मानसिक आणि भावनिक गुंतवणुक असते. ते जाईपर्यंत वाढतं, खेळतं असतं. जायच्या आधी कदाचित आजारी असतं. या सगळ्यासाठी दोघांनीही वेगवेगळ्या प्रकारच्या खस्ता खाल्लेल्या असतात. हे सगळं पाण्यात जातं. अनेक आईबाप मूल गेल्यानंतर महिनोन महिने त्या धक्क्यातून सावरत नाहीत. या सगळ्या दुःखाची किंमत मोजता येत नाही. हे इथे सांगायची गरज का पडावी? हे सगळं उघड उघड सत्य नाही का? माझ्या मते आहे. पण मी ही आकडेवारी दाखवल्यावर अनेकांनी मला 'त्याकाळी आईवडिलांना तितकं दुःख वाटत नसे कारण मुलं जाणार हे त्याकाळी गृहितच असायचं' असा युक्तिवाद ऐकलेला आहे. म्हणजे ऍब्सोल्यूटली दुःख कमी झालं असलं तरी ते रिलेटिव्हली कमी झालेलं नाही, असं काहीसं. म्हणजे 'ज्या काळी चपला वापरत नसत त्याकाळी काटे टोचून टोचून पायच राठ झालेले असायचे. म्हणून तेव्हाच्या लोकांना काटे, दगड टोचायची सवय असायची. उलट चपला वापरायला लागल्यापासून माणसाचे पाय मऊसूत रहातात आणि मग त्या नसल्या की अडचण होते' असा काहीसा युक्तिवाद. हे मला पटत नाही. माझ्या मते काटेकुटे सहन करण्याचा कठोरपणा पायांमध्ये वागवावा लागणं हे उत्तम समाजाचं लक्षण नाही. आपल्या मुलाच्या जन्मापासूनच त्याच्या जीवनाचा सोहळा करताना 'हे पोर मरेल बहुतेक पाच वर्षांत' असं मनाला मुर्दाड बनवून ठेवण्याची पाळी येणं ही काही चांगली गोष्ट नव्हे. तो मुर्दाडपणा जाणं हीच प्रगती.

आणि हे केवळ लहान मुलांच्याच बाबतीत. अमेरिकेच्या आकडेवारीकडे पाहून लक्षात येतं की हाताशी आलेल्या तरुण मुलामुलींची, कर्त्या पुरुषांची, भरल्या घरातल्या आयांची, नुकत्याच झालेल्या आजी-आजोबांचीही मरण्याची शक्यता कमी झालेली आहे. या सगळ्यांच्या मृत्यूचं दुःख तर टळलंच. शिवाय ते प्रेमाचा स्पर्श करू शकतील, छाया देऊ शकतील अशांचीही आयुष्य उजाड होण्यापासून वाचली. तुमच्यापैकी नक्की कोणाला याचा फायदा झाला हे सांगता येईल का?

प्रगती बहुतेक वेळा अशीच होते. सुखं वाढण्यापेक्षा दुःखं कमी होण्यातून. तसं बघितलं तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत या. एकीपासून दुसरी वेगळी काढणं कठीण. तरीही त्यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. माझ्याकडे कालपर्यंत गाडी नव्हती, आज आहे हे बोट दाखवून सांगता येतं. पण आयुर्मर्यादा वाढल्याचे फायदे तसे बोट दाखवून सांगता येत नाहीत. आपल्या आई-वडिलांना, त्यांच्या आई-वडिलांना जी दुःखं सहन करावी लागली ती आपल्याला सहन करावी लागत नाही. पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती कायम असती, तर आज तुमच्यापैकी किती जण जिवंत असते? तुमच्या भावडांपैकी किती जिवंत राहिले असते? तुमच्या मुलांपैकी, नातवांपैकी, भाच्यांपैकी किती जणांसाठी तुम्हाला अश्रू ढाळावे लागले असते, आईवडलांचं सांत्वन करावं लागलं असतं? तुम्हाला तितक्या मृत्यूंना सामोरं जावं लागत नाही, हीच प्रगती. मग ती स्पष्ट दिसो वा ना दिसो.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

तो मुर्दाडपणा जाणं हीच प्रगती.
अगदी सहमत. हाती पैसा नि दारी गाडी आहे पण मन अजूनही दुरवस्थेकडे पाहून 'हे असेच चालणार' असे म्हणून डोळे मिटून घेत असेल तर या बदलाला प्रगती म्हणणे अवघड आहे.

शेवटचे दोन परिच्छेद आवडले. संख्याशास्त्रात दोन प्रकारच्या 'एरर्स' मोजल्या जातात, 'असत्याला सत्य ठरवण्याची' नि दुसरी 'सत्याला असत्य ठरवण्याची'. कोणतेही निकष, निर्णयप्रक्रिया यातील एकाला कमी करू पाहते तेव्हा अपरिहार्यपणे दुसरी वाढते. किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर काही मिळवण्यासाठी काही किंमत मोजावी लागते. त्यामुळे जेव्हा प्रगती झाली असे आपण म्हणतो तेव्हा त्यासाठी मोजलेली किंमत ही सुद्धा हिशोबात धरायला हवी. म्हणजे माझ्याकडे गाडी आली ही प्रगती असेल तर माझ्या मिळवलेल्या पैशातून चार लाख घटले हे ही विसरता कामा नये (दुर्दैव हे की हेच उदाहरण चटकन समजते हल्ली) त्यामुळे ही घटना प्रगती म्हणून मोजणार असेन तर झालेले नुकसान वजा जाता हाती वट्ट फायद होतो आहे ना हे ही महत्त्वाचे. बहुधा मोजलेली किंमत ही प्रगतीच्या मूल्यमापनात साफ विसरलेली गोष्ट असते. अमेरिकेच्या सार्‍या प्रगतीच्या वाटेवर 'नासाडीचे' रुजलेले तत्त्वज्ञान नि गरजेपेक्षा अधिक विकत घेणे, पुरेपूर वापर न करता टाकून देणे वाया घालवणे - ज्या मुळे डिमांड जेनेरेट होत राहते नि पैसा निर्माण होत राहतो, पण त्याचा प्रत्यक्ष उपयोग किती हे विचारायचे नाही - ब्यांकबुकात आकडा आहे नि घरात ढिगभर उपकरणे आहेत पण उपयोगिता १०% सुद्धा नाही ही घातक प्रवृत्ती रुजते ही त्या प्रगतीची मोजलेली किंमत मात्र मोजायची नाही हे काही आपल्याला पटत नाही. जमाखर्च, ताळेबंद न मांडता फक्त जमेची बाजू मोजत गेलं तर प्रगती नेहमी नेत्रदीपकच असते. आणि मोजलेली किंमत ही फक्त पैशात मोजायची नसते हे ही रुजवायला हवे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

लेख आणि हा प्रतिसाद फार आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जमाखर्च, ताळेबंद न मांडता फक्त जमेची बाजू मोजत गेलं तर प्रगती नेहमी नेत्रदीपकच असते. आणि मोजलेली किंमत ही फक्त पैशात मोजायची नसते हे ही रुजवायला हवे.

हे पटण्यासारखं आहे. लेखात याच प्रकारचा पण विरुद्ध बाजूचा मुद्दा मांडलेला आहे. बऱ्याच वेळा गाड्या, उपकरणं वगैरे मोजायला सोप्या असल्यामुळे याच गोष्टी जमेच्या बाजूला मांडल्या जातात. आणि मग प्रगती यातच आहे असं गृहित धरलं जातं. आणि मग चंगळवाद फोफावणे वगैरे आरोप होतात. या वस्तू म्हणजे हिमनगाचं दिसणारं टोक असतं. किंवा परिस्थिती सुधारल्यानंतर एखाद्या व्यक्तीचे झकपक झालेले भरपूर कपडे असतात. या लेखमालेत शक्यतो या वस्तूंपलिकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. पाण्याखाली हिमनगाचा किती भाग आहे? किंवा त्या कपड्यांखालचं शरीर तसंच रोगट आहे की सुदृढ झालेलं आहे हे तपासून बघायचं आहे. म्हणून अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, स्वातंत्र्य, समता, न्याय अशा मूलभूत एककांचं मोजमाप करून त्या सर्वांमध्ये गेल्या पन्नासेक वर्षांत सुधारणा आहे हे दाखवून द्यायचं आहे. या खऱ्या जमेच्या बाजू. बऱ्याच वेळा त्या न मोजता अनेकजण प्रगती झालीच नाही, प्रगतीचा फायदा सामान्य माणसाला झालाच नाही अशी ओरड करतात.

बाकी भारतातल्या लोकांना 'चंगळवादी झालेत' म्हणणं म्हणजे 'चंगळ करताहेत, मटारउसळ खाताहेत लेकाचे' असं काहीसं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या लेखमालेत शक्यतो या वस्तूंपलिकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. पाण्याखाली हिमनगाचा किती भाग आहे? किंवा त्या कपड्यांखालचं शरीर तसंच रोगट आहे की सुदृढ झालेलं आहे हे तपासून बघायचं आहे. म्हणून अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, स्वातंत्र्य, समता, न्याय अशा मूलभूत एककांचं मोजमाप करून त्या सर्वांमध्ये गेल्या पन्नासेक वर्षांत सुधारणा आहे हे दाखवून द्यायचं आहे.या खऱ्या जमेच्या बाजू. बऱ्याच वेळा त्या न मोजता अनेकजण प्रगती झालीच नाही, प्रगतीचा फायदा सामान्य माणसाला झालाच नाही अशी ओरड करतात.

@राजेश घासकडवी - हे फार मार्मिक आहे, फक्त ह्यातलं स्वातंत्र्य आणि समता ह्या दोन गोष्टी सोडल्या तर मी पुर्ण सहमत आहे, मला वाटतं की आज जगात कुठल्याही समाजव्यवस्थेत प्रामुख्याने भांडवलशाहीत ठराविक वर्गाशिवाय इतरांचे स्वातंत्र्य आभासी असते, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य किंवा त्या स्वातंत्र्याची मात्रा ही फार उथळ असते, चुकुन तसे स्वातंत्र्य असलेच तर काही दिवसातचं त्याचं शोषण व्हायला सुरुवात होते, उदा. अमेरिकेचे किंवा पुण्याचे घ्या - सार्वजनिक बस-सेवा वापरण्याचा पर्याय हे स्वातंत्र्य आहे, पण ह्या स्वातंत्र्याच्या दिखाव्याआड असतं काय? तर कमी बस-संख्या, निच-दर्जाची सेवा, ढिसाळ वेळापत्रक, आणि वेळ-खाउ इन्फ्रास्ट्रक्चर. मग हे स्वातंत्र्य आहे की आभास आहे? असचं प्रत्येक कमॉडीटीबाबत थोड्याफार फरकाने म्हणता येइल, हे स्वातंत्र्य धोक्यात आलं की समता नाहीशी व्हायला वेळ लागत नाही, किंवा शोषण करणारे आणि ज्यांच शोषण होतं अशांच एक विषम समता मॉडेल तयार होतं.

त्याचप्रमाणे प्रगतीच्या स्थित्यंतरातुन न जाता प्रगतीची फळ चाखाणारी जमात ही चंगळवादाकडे जास्त झुकते उदा. सेझ मधे जमिनी विकुन फटाफट श्रीमंत होणारे शेतकरी, किंवा कॉलसेंटर मधे कमी वयात बक्कळ पैसा मिळवणारी पिढी. अर्थात सगळेच वाईट नसतात पण आयत्या चंगळवादाची वृत्ती फोफावते असं वाटतं, पाश्चिमात्यांच्या गाड्या आल्या पण त्यांचा सिव्हीक सेन्स नाही आला, सुबत्ता आली पण ती उपभोगण्याची सेन्सिबिलिटी आत्मसातच केली नाही.

सुविधा, सुबत्ता असुन वृत्तीत सकारात्मक फरक दिसणार नसेल तर त्या प्रगतीला फक्त आकड्यांमधे मांडता येण्याजोगी प्रगती म्हणावं लागेल.

मला स्वत:ला १५ वर्षापुर्वीचं पुणं किंवा माझं गाव हेच जास्त आवडतं, आज दोन्हीठिकाणी प्रगतीच्या नावाखाली भयानक परिस्थिती आहे असचं म्हणेन, अर्थात त्यला मी स्वतःदेखील जबाबदार आहेच, ह्याला कदाचित स्मरणरंजक होणं म्हणत असावेत,पण आजच्या घडीला आपण वाईटाकडून चांगल्याकडे चाललो आहोत असं खात्रिने म्हणतां येणार नाही.

म्हणावं तर अवांतर आहे, म्हणावं तर लेखाला धरून आहे अस मतं अच्युत गोडबोलेंच इथे आढळलं, अच्युतच्या लेखाचा पहिला भाग अतीरंजक पण काही वर्षात शक्य अशा वैज्ञानिक सोयी/सुविधांचा उल्लेख करतो, तर शेवटचा परिच्छेद मार्मिक मत-कम-निष्कर्ष मांडतो, अच्युतच्या निष्कर्षाशी मी बराचसा सहमत आहे.

माझं शुद्धलेखनपण असचं आहे, मराठी आंतरजालाची सुविधा आली पण लेखन सुधारलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>उदा. अमेरिकेचे किंवा पुण्याचे घ्या - सार्वजनिक बस-सेवा वापरण्याचा पर्याय हे स्वातंत्र्य आहे, पण ह्या स्वातंत्र्याच्या दिखाव्याआड असतं काय? तर कमी बस-संख्या, निच-दर्जाची सेवा, ढिसाळ वेळापत्रक, आणि वेळ-खाउ इन्फ्रास्ट्रक्चर. मग हे स्वातंत्र्य आहे की आभास आहे? असचं प्रत्येक कमॉडीटीबाबत थोड्याफार फरकाने म्हणता येइल,

सहमत आहे. आणि प्रगतीच्या बेटांचा आणखी तोटा होतो तो म्हणजे ज्या वर्गाकडे धोरणात्मक बदल घडवण्याची शक्ती (आवाज उठवणे वगैरे) असू शकते ती स्वतःच्या कार वापरू लागल्याने बस वापरणार्‍यांच्या अडचणींविषयी 'इन्डिफरण्ट' होऊन ती बस सेवा अधिकाधिक ढिसाळ बनते. हे हळूहळू इतर सेवांच्या बाबतही होत जाईल. उदा. शाळा, वाचनालये इत्यादि.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आणि प्रगतीच्या बेटांचा आणखी तोटा होतो तो म्हणजे ज्या वर्गाकडे धोरणात्मक बदल घडवण्याची शक्ती (आवाज उठवणे वगैरे) असू शकते ती स्वतःच्या कार वापरू लागल्याने बस वापरणार्‍यांच्या अडचणींविषयी 'इन्डिफरण्ट' होऊन ती बस सेवा अधिकाधिक ढिसाळ बनते.

अगदी-अगदी, हे तर मध्यमवर्गीयांचं व्यवच्छेदक लक्षणच आहे, मुख्य प्रवाहातील शिक्षण महाग झालं आहेच, राहाण्याची जागा विकत घेणं परत स्वप्नवत झालय, उल्ट्रा-महाग मॉल्स कचर्‍यासारखे वाढलेत, तिथे विजेचा तुटवडा अजिबात नाही, पण तेथून ५० मैलावर पुण्यात येण्यासाठी बस नाही, प्यायला शुद्ध पाणी नाही, नाण्याची ही दुसरी बाजू आहे, एक बाजू चांगली आहेच त्याबद्दल वाद नाहीच.

वाढलेल्या आयुर्मानाचा उपभोग घेणार्‍या वर्गाकडून सोयीनुसार झापड कशी लावायची हे कौशल्य शिकण्यासारखं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लेखांक (शब्दाचा श्रेय अव्हेरः धनंजय).. भारतातील आकडेवारी मिळाली असती तर चार चॉंद लागले असते. आकडेवारी नसली तरी नैसर्गिक बालमृत्युंचे प्रमाण कमी झाले आहेच, शिवाय आता अनेक प्रकारच्या लसी आल्या आहेत. (ज्यापैकी ज्या सक्तीच्या आहेत त्या सगळ्यांना घ्याव्या लागतातच पण त्याच बरोबर अश्या कित्येक आहेत ज्या आजारांच्या लसी भारतातही उपलब्ध आहेत हे समजल्यावर आश्चर्यमिश्रीत कौतूक वाटतं)
तसेच स्टेम सेल्स व त्यामुळे ब्लड कॅन्सरसारख्या रोगांवरील इलाज वगैरे नवनव्या शोधांनी मानवी जीवन अधिक निरोगी बनवलं आहे हे नक्की

आता मिळालेल्या अधिकच्या आयुष्यामुळे आयुष्याची किंमत घटली आहे का? असा एक निराशावादी विचार कधीकधी मनात येतो खरा.

बाकी, ररांचा वरचा प्रतिसादही मार्मिक आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भारतातील आकडेवारी मिळाली असती तर चार चॉंद लागले असते.

पहिला आणि तिसरा आलेख भारतातलाच आहे. अमेरिकेतला विदा केवळ कारणपरंपरा दाखवण्यासाठी वापरलेला आहे. अर्थातच प्रत्यक्ष भारतातला विदा देता आला असता तर हेच भारतालाही लागू असेल असा युक्तिवाद करावा लागला नसता.

आता मिळालेल्या अधिकच्या आयुष्यामुळे आयुष्याची किंमत घटली आहे का? असा एक निराशावादी विचार कधीकधी मनात येतो खरा.

मला तसं वाटत नाही. किंबहुना 'पाच-सहा पोरं होतील, त्यातली एखाद-दोन मरतील. सगळ्यांचंच होतं तसं' ही मनाची तयारी ठेवणं यात एक आयुष्याला कमी लेखणारी भूमिका (नाईलाजास्तव स्वीकारलेली का असेना) दिसते. जास्त लांब आयुष्य असल्याने समाजाच्या दृष्टीने प्रत्येक जिवाची किंमत वाढते. एकेकाळी लोकसंख्येच्या प्रश्नाचा विचार करताना 'खाणारी तोंडं' अशा प्रकारे मांडणी व्हायची. आता 'पिकवणारे हात' असं बघितलं जातं. म्हणून ३५ खालील मोठी लोकसंख्या हा ऍसेट मानला जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा भाग उत्तम जमला आहे.

वाचता वाचता मनात आलेला (क्वालिटेटिव्ह) प्रश्न : सरासरी आयुष्यमान वाढलं ही सुखद गोष्ट आहे का? की बालमृत्यू + बाळंतपणातील मृत्यू कमी झाले ही जास्त सुखद गोष्ट आहे? ०-५ या वयात तसेच ३५-५५ या वयात मृत्यू पावणार्‍यांची संख्या कमी होणे हे सुखद आहे. परंतु ७५ पेक्षा जास्त वयापर्यंत जगणार्‍यांची संख्या वाढणे ही तितकी* सुखद गोष्ट नाही असे वाटते.

*व्यक्तीचा मृत्यू ही दु:खदच गोष्ट असते. पण एकूण सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने मी म्हणत आहे. म्हणजे सरासरी आयुर्मान वाढण्यात कोणत्या गोष्टीचा वाटा जास्त आहे त्यावर सुखद की कसे ते ठरेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सरासरी आयुष्यमान वाढलं ही सुखद गोष्ट आहे का?

अर्थातच हो. सरासरी आयुर्मान हे अनेक गोष्टींचा परिपाक असतं. वैद्यकीय सुविधा, त्या परवडण्याची क्षमता, त्या वापरण्याचं ज्ञान, रोगराईमुक्त वातावरणात वाढ, लशींच्या प्रमाणात वाढ.... म्हणून तो समाजाच्या एकंदरीत आरोग्याचा निर्देशांक म्हणून वापरला जातो. त्यात सुधारणा म्हणजे त्यात सहभागी असणाऱ्या या बहुतेक गोष्टींत सुधारणा.

माझा असा अंदाज आहे की आरोग्य सुधारल्यामुळे शरीर ढासळण्याचं वयही पुढे गेलेलं आहे. पूर्वी साठी साजरी करण्याची पद्धत असे. आता ती तितकी वैशिष्ट्याची गोष्ट राहिलेली नाही. त्यामुळे म्हाताऱ्यांचं प्रमाण वाढणं एका विशिष्ट आकड्याने मोजणं योग्य नाही. त्यापेक्षा प्रत्येक वयोगटातील शारीरिकदृष्ट्या सक्षम लोकांचं प्रमाण पूर्वी व आता किती हे तपासून बघणं अधिक सार्थ ठरेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखाचा शेवटचा परिच्छेद आवडला.
ररांचा प्रतिसाद त्याहूनही आवडला.
पुढील भागाची वाट पहातोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

छान. लेखा आणि लेख दोन्ही पटण्यासारखे. क्रिकेटमधील उपमा उत्तम आहे.

भारतासाठी ४०-एक वर्षांचे आकडे येथून मिळू शकतील (http://s3.amazonaws.com/zanran_storage/mospi.nic.in/ContentPages/1875505...)
खरे तर वेगवेगळ्या वयांत अपेक्षित आयुर्मानाचे गणित करण्यापेक्षा काहीतरी सोपे करावे. तक्ता क्रमांक १.२३ (पान थेट त्या तक्त्यावर उघडत नाही, क्षमस्व.) तक्त्यातले "वेगवेगळ्या वयांतला मृत्यूदर" हे आकडे थेटच बघावे :
वर्ष | ०-४ वयांत मृत्युदर | ५-९ वयांत मृत्युदर | ... | ५०-५४ वयांत मृत्युदर | ... (मृत्युदर दर हजार-डोई)
१९७१ | ५१.९ | ४.७ | ... |१६.८ | ...
१९८१ | ४१.२ | ४.० | ... | १३.२ | ...
१९९१ | २६.५ | २.७ | ... | ११.३ | ...
१९९९ | २०.४ | १.८ | ... | १०.२ | ...

असे दिसते, की सर्व वयोगटांतला मृत्युदर कमी होत आहे. पण बालकांचा मृत्युदर कमी होण्याची टक्केवारी डोळे दिपवणारी आहे :
१९७१ ते १९९९ काळात ०-४ वर्षे वयांतला मृत्युदर तब्बल ६१% घटला.

या आकड्यांमुळे थेटच राजेश घासकडवी यांच्या म्हणण्याचे समर्थन होते.

अमेरिकेची आकडेवारी दाखवणाऱ्या आलेखाकडे नीट बघितलं तर हे लक्षात येतं की १९०० ते १९५० मध्ये जन्माच्या वेळचं अपेक्षित आयुष्य ४८ वर्षांवरून ६७ वर्षांवर गेलं. म्हणजे भारतात सुमारे १९६५ ते २००९ पर्यंत जो बदल (४६ वरून ६५ पर्यंत) झाला त्याच्याशी खूप मिळताजुळता. त्यामुळे या दोन देशांमधल्या आयुर्मानांची त्या दोन कालखंडांतली तुलना करता यावी. अमेरिकेत या कालखंडात महत्त्वाचा बदल दिसतो तो म्हणजे १९०० सालचा ० ते १० मधला प्रचंड फरक १२ कमी होऊन तो १९५० साली ३ वर आला. म्हणजे १९०० साली बरीच लहान मुलं मरायची. १९५० साली दहा वर्षांच्या आत होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण सुमारे एक चतुर्थांश झालं असावं.

(अधोरेखितावरून असे जाणवते आहे की वेगवेगळ्या वयात मरणारी मुले किती [टक्केवारी] हे गन्तव्य आहे, ते थेटच वरील तक्त्यात सापडते.)

ता. क. जर लाइफ एक्पेक्टन्सी बाय एज गणित करायचेच असेल, तर तक्ता क्रमांक १.७ मधील आकडे वापरावे. (वयोमानांचे त्या-त्या वर्षांतील वितरण.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अधोरेखितावरून असे जाणवते आहे की वेगवेगळ्या वयात मरणारी मुले किती [टक्केवारी] हे गन्तव्य आहे,

अमेरिकेतली १९०० ते १९५० मधली आकडेवारी घेऊन तिची तुलना भारतातल्या १९६५ ते २००९ मधल्या आकडेवारीशी केली. ती निव्वळ शून्य वर्षांच्या आयुर्मान अपेक्षेबाबतच तुलनीय नसून त्याबदलामागची कारणपरंपरादेखील समान आहे हे दाखवून द्यायचं होतं. म्हणून दोन्ही ठिकाणी बालमृत्यूचं प्रमाण चतुर्थांश झाल्याचं विधान आलेलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मीमांसेत पुढील कारण शोधले आहे ना?

अमेरिकेत या कालखंडात महत्त्वाचा बदल दिसतो तो म्हणजे १९०० सालचा ० ते १० मधला प्रचंड फरक १२ कमी होऊन तो १९५० साली ३ वर आला. म्हणजे १९०० साली बरीच लहान मुलं मरायची. १९५० साली दहा वर्षांच्या आत होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण सुमारे एक चतुर्थांश झालं असावं. (भारताविषयी कारण हेच असे अध्याहृत : भारतात १९६५ ते २००९ काळात दहा वर्षांच्या आत होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण सुमारे एक चतुर्थांश झालं असावं.)

वरच्या दुव्यात १९७१ ते १९९९ काळात असेच काही दिसते : दहा वर्षांच्या आत होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण सुमारे १/३ [३८%] झाले आहे. १९६५ ते २००९ काळातला बहुतेक खंड १९७१-१९९९ मध्ये येतो. [१/४ की १/३ हे महत्त्वाचे नाही - मोठ्या प्रमाणात घट झाली हा मुद्दा आहे.] तो मुद्दा वर थेट कळून येतो.

१० वर्षांच्या आतल्या मृत्यूच्या प्रमाणापेक्षा ५ वर्षांच्या आतल्या मृत्यूचे प्रमाण अधिक "स्टॅन्डर्ड" आहे. हे आकडे अधिक सहज मिळतात. आणि वरच्या मुद्द्याकरिता ५-वर्षांआत की १०-वर्षांआतला मृत्यूदर वापरला, तर मूलभूत फरक पडत नाही

आणखी एक दुवा (पीडीएफ) : तक्ता २.२ बघावा.
१९७२ ते २००४ या काळात ५-वर्षांआतला मृत्यूदर ५७.३पासून १७.० इतका कमी झाला. म्हणजे २९% (१/३ आणि १/४च्या दरम्यान)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा लेख आवडला. अनेक सकारात्मक आणि भावनिक पैलू लक्षात आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखमाला एकत्र वाचून काढली. त्यामागे असलेली कळकळ आणि त्याकरता केलेली मेहनत जाणवली. उत्कृष्ट लिखाण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

प्रगती ही फारच व्यक्तिसापेक्ष असते असे ननिंनी एका धाग्यात म्हटले होते, व त्यानंतर हा धागा वाचला. ते अधिक पटले.

होते काय, की आजच्याच सकाळमध्ये http://www.esakal.com/eSakal/20120207/4887056844170137402.htm आणि http://www.esakal.com/eSakal/20120207/5214320753087735575.htm ह्या दोन्ही बातम्या शेजारीशेजारी दिसतात.
आणि म्हणूनच आपले चिदु http://www.esakal.com/eSakal/20110929/5350563424044302107.htm असे काहितरी बोलतात.
आणि कुणी काहिही करायचे म्हटले तरी भारतीय व्यव्स्थेत प्रत्येक भल्या प्रयत्नाचा निकाल http://www.esakal.com/eSakal/20120207/5206792877184939473.htm ह्याच दिशेने जातो.
सगळ्याच बातम्या आजच्या सकाळमध्ये दिसताहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सरासरी आयुष्यमानात वाढ म्हणजे चांगली गोष्टच का, आणि मग चंगळवादात वाढ होतेय त्याचं काय, सकाळमधल्या समृद्धी-दारिद्र्याच्या बातम्या वगैरे विविध मुद्दे इथे उठवले जात आहेत. ते पाहता मला वाटतं 'ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स'कडे (एच.डी.आय.) लक्ष द्यायला हवं. निव्वळ 'जीडीपी'सारख्या आकडेवारीतून देशाची प्रगती नीटशी किंवा पुरेशी ठरवता येत नाही म्हणून महबूब हक (पाकिस्तानी अर्थशास्त्रज्ञ) आणि अमर्त्य सेन यांनी या संकल्पनेची मांडणी केली. सरासरी आयुष्यमान, शिक्षण यांसारख्या घटकांच्या आधारानं एच.डी.आय. हा निर्देशांक मोजला जातो. जन्मतानाचं सरासरी आयुष्यमान हा लोकसंखेचं आरोग्य जोखण्यासाठीचा एक घटक म्हणून यात समाविष्ट असतो. कोणत्याही ठिकाणची प्रगती मोजायचा हा आता एक प्रमाण मार्ग बनला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

लेखन अर्थातच आवडले. रमतारामचा प्रतिसादही. पृथ्वीच्या पोटात किंवा पृष्ठभागावर असणार्‍या गोष्टींचा उपसा करूनच प्रगती शक्य आहे. जेव्हा या गोष्टी संपतील तेव्हा काय असा प्रश्न बर्‍याचदा पडतो. दुसर्‍या बाजूने इंधन आणि इतर स्रोतांची एफिशियन्सी वाढतानाही दिसते.

मृत्युदर कमी होण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे फर्टीलिटी कमी करणं. एका स्त्रीमागे असणार्‍या मुलांची सरासरी संख्या लाईफ एक्स्पेक्टंन्सी वाढते तशी कमी होत जाते. एकेकाळी एका बाईला ४-५ मुलं असतील तर आज हा आकडा ३ च्या आसपास आला असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेखमाला आणि प्रतिसादही आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूपच परिणामकारक लेख आहे.
अगदी माझ्या आजीच्या काळापर्यंत सहा-सात (किंवा जास्त) मुले होऊन त्यातली एक-दोन दगावणे ही सामान्य घटना होती. त्यामानाने आजकाल हे प्रमाण खूपच कमी आहे हे जाणवतेच आणि वर दिलेल्या आकडेवारीने तर ते स्पष्टच होते.
शिवाय अदितीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे यामुळे भरमसाठ संतती प्रसवण्याच्या प्रवृत्तीलाही आळा बसून लोकसंख्या स्थिर व्हायला मदत होते.
त्यामुळे मानवी नागरी संस्कृती अस्तित्वात आल्यापासून माणसाच्या जीवाची शाश्वती आजइतकी कधीच नव्हती हे निर्विवाद आहे. शिवाय आज माणूस अशा टप्प्यावर आहे की काही वर्षांमध्ये माणसाचा मृत्यु ही सर्वस्वी ऐच्छिक गोष्ट होऊ शकेल.
माणसाच्या जीवनेच्छेच्या दृष्टीने ही अतिशय प्रशंसनीय अशीच प्रगती आहे.

रमताराम व मी यांनी प्रगतीच्या किंमतीच्या दृष्टीने काही रास्त मुद्दे उपस्थित केले आहेत. महत्वाचा प्रश्न आहे तो समता आणि न्यायाचा.
समजा ८० टक्के जनता बरोब्बर ८० वर्षं जगते, पण उरलेले २० टक्के ५ व्या वर्षीच मरतात. तर सरासरी वय (८० x ८० + ५ x २०)/१०० = ६९ इतकं येतं.
या उदाहरणात ८० वर्षे जगणारी जनता जर ९० वर्षे जगू लागली तर सरासरी जन्मशाश्वती ७३ वर्षे होते. म्हणजे फक्त एकाच वर्गाची प्रगती झाली तरी ती सगळ्यांची झाली असे भासू शकते.
आता यात २०% जनतेची प्रगती शून्य धरली आहे तशी ती प्रत्यक्षात शून्य नसेल पण ८०% जनतेच्या प्रगतीपेक्षा कमी असेल का? विदा नसला तरी उत्तर काय असेल याचा अंदाज आपल्याला आहे. म्हणजे आधुनिक वैद्यक असले तरी ते काही लोकांच्या क्रयशक्तीच्या नेहमीच बाहेर राहील. इथे सापेक्षता येते. जेव्हा मूल दगावणे ही सामान्य घटना असते तेव्हा दु:ख झाले तरी ते एकमेकांकडे पाहून सहन करता येते. पण जेव्हा काही लोकांची मुले नक्की जगताहेत आणि आपली मात्र मरताहेत असे दिसते तेव्हा होणार्‍या दु:खाची तीव्रता नक्कीच जास्त असणार.
दुसरा मुद्दा असा आहे की मृत्युदर इतका असण्याचे कारण अर्भकांची दुर्बळता,साथीचे वा अन्य रोग आणि आधुनिक वैद्यकशास्त्राचा अभाव हे होते असे आपण म्हणू शकतो, पण हे साथीचे वा अन्य रोग आले कुठून याचा विचार केला जात नाही.
मध्यंतरी अशी बातमी वाचली की अंदमानमधल्या अनेक वर्षे स्थिर लोकसंख्या असलेल्या दोन जमाती अचानक नष्ट झाल्या. त्याचे कारण म्हणजे बाहेरच्या जगातल्या माणसांच्या संपर्काने त्यांच्या शरीराला माहित नसलेल्या कांजिण्यांच्या विषाणूंचा त्यांना संसर्ग झाला होता असे संशोधनांती कळले.
म्हणजे मानव स्थिरावला, समाजात शेती करून राहू लागला ही जी प्रगती झाली असे आपण म्हणतो त्या प्रगतीचे फळ म्हणून हा मृत्युदर होता की नाही याची शहानिशा केली पाहिजे.
नवनवीन तंत्रज्ञानाने एक प्रश्न सुटताना दुसरा प्रश्न निर्माण होतो हा इतिहास आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0