सौदा - भाग ५

सौदा - भाग १
सौदा - भाग २
सौदा - भाग ३
सौदा - भाग ४

विक्रमने गाडी सरळ घरी नेली. घरात मामी आणि दिलआंटी हजर होत्याच. आपली डिलिवरी इथेच होणार हे अनघा समजून चुकली होती. या सर्वांच्या तावडीतून सुटायला आता कोणताच मार्ग शिल्लक नव्हता. अनघाच्या डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखे झाले आणि नंतर काय घडते आहे त्याची शुद्ध तिला राहिली नाही....

आता पुढे...


अनघाने डोळे उघडले तेव्हा क्षणभर आपण कुठे आहोत याची जाणीव तिला होईना. क्षण दोन क्षणांनी आपण आपल्याच बेडरूममध्ये असल्याचं तिला जाणवलं. समोर दिलआंटी बसून सटासट स्वेटर विणत होत्या. अनघाकडे त्यांचं लक्षही नव्हतं. हळूहळू अनघाला मागल्या प्रसंगांची आठवण होऊ लागली तशी तिचा हात आपसूक पोटाकडे गेला. पोटाचा वाढलेला घेर तिला जाणवला नाही.

“माझं बाळ...” अशक्तपणामुळे तिच्या तोंडातून आवाज फुटत नसला तरी दिलआंटींच्या डोळ्यांनी हालचाल टिपली होती.

“अरे डिकरी.. तू जागी झालीश... थांब मी सर्वांना बोलावते.” दिलआंटी पटकन उठून उभ्या राहिल्या.

“माझं बाळ..” अनघा पुन्हा पुटपुटली पण तोपर्यंत दिलआंटी खोलीच्या बाहेर पडल्या होत्या.

दिलआंटी, परांजपे मामा-मामी आणि विक्रम लगबगीने बेडरूममध्ये आले तेव्हा अनघा उठून बसायचा प्रयत्न करत होती. “हं, हं झोपून राहा. अद्याप अशक्तपणा आहे.” विक्रम पुढे होत म्हणाला.

“माझं बाळ कुठे आहे मामी?” अनघाने विक्रमचा हात झिडकारला.

“अनघा, मी काय सांगते ते ऐक. तुझं बाळ गेलं. जन्मत:च मृतावस्थेत होतं. डॉक्टरांनी कसलीही कसर ठेवली नव्हती पण तुझ्या नशिबात बाळ नव्हतं.” मामींचा आवाज कोरडा होता.

अनघाला ते ऐकून धक्का बसला तरीही धीर करून ती म्हणाली,“खोटं! बाळाची तब्येत उत्तम होती. तुम्ही मारलंत त्याला. बळी घेतलात माझ्या बाळाचा. शी:! त्या अर्भकाची दया नाही आली का तुम्हाला कोणाला? क्रूर... क्रूर आहात तुम्ही आणि विक्रम तू... किळस वाटते मला तुझी.”

“अनु, अगं हा वेडेपणा प्लीज पुरे कर. आम्ही कोणीही बाळाला काहीही केलेलं नाही. त्याचं नशीब. तेवढंच आयुष्य होतं त्याचं.” विक्रम म्हणाला पण त्याने अनघाची नजर चुकवली.

“खोटं, खोटं. तू मारलंस बाळाला. हव्यासापायी. नोकरी, प्रमोशन, पगार, तुझं करिअर हेच हवं होतं ना. त्यापायी तू मित्तलांना वाटेतून काढलंस. श्रद्धा मला मदत करत्ये म्हटल्यावर तिला दूर केलंत. बाबांची तब्येत बिघडली. सर्व प्लॅन्ड होतं. स्वार्थी! स्वार्थी आहेस तू.” अनघा रडत म्हणाली.

“अनघा, शांत हो.” मामांनी आवाज वाढवून सांगितलं. “तुझं बाळ गेलं यात कोणी काहीही केलेलं नाही. कोणाचाही दोष नाही. तुम्ही दोघे तरुण आहात. आणखी मुलं होतील तुम्हाला. हा काही जगाचा अंत नव्हे. सावर स्वत:ला. आराम कर.”

“अनु, मामा योग्य ते सांगाताहेत. अगं, आपण आणखी २ मुलं जन्माला घालू.” विक्रम अनघाला म्हणाला.

“नाही... कधीच नाही. मला तुझं तोंडही बघायचं नाही विक्रम. तू सौदा केलास. आपल्या बाळाचा. आपल्या पोटच्या गोळ्याचा.” अनघाने तोंड ओंजळीत खुपसलं आणि ती रडायला लागली.

“ठीक! अनघा, तू बरी हो. मी तुला दिल्लीचं तिकिट काढून देतो. आईबाबांना भेटून ये. तुला आणि त्यांनाही बरं वाटेल पण त्यासाठी आधी चालण्याफिरण्याची शक्ती मिळव.” विक्रम शांतपणे म्हणाला.


पुढले ४-५ दिवस अनघा झोपूनच होती. मामी कर्तव्य म्हणून जेवण करून देत होत्या पण त्या आणि दिलआंटी पहिल्यासारखं अनघाचा ताबा घेतल्यागत वागत नव्हत्या. बहुधा, त्यांच्या दृष्टीने अनघाची गरज संपली होती. आता डोकावल्याच तर जेवणाचा डबा देण्या-नेण्यापुरत्या. विक्रमही ऑफिसला जाऊ लागला होता. अनघात आणि त्याच्यातले संबंध तुटल्यासारखे झाले होते. बोलणं जवळपास खुंटलंच होतं. आठवड्याभरात अनघा घरातल्या घरात हिंडूफिरू लागली होती. थोडंफार कामही करू लागली होती. तिचं मन अद्याप सावरलं नसलं तरी अजून आठवडाभराने इथून निघून जायचा बेत तिने नक्की केला होता.

तिच्या बाळाला जाऊन १०-११ दिवस होत आले होते. विक्रम ऑफिसच्या कामानिमित्त दोन दिवस बंगलोरला गेला होता. त्या दिवशी सकाळी दूधवाल्याने बेल वाजवली तशी दुधाची पिशवी आणायला अनघा बाहेर गेली. पिशवी उचलताना एक आगळा आवाज तिच्या कानावर पडला... मजल्यावर कुणीतरी तान्हं बाळ रडत होतं.

अनघा मनातल्या मनात चरकली. ’हे भास थांबायला हवेत. हे रडणं नाही ऐकू शकत मी.’ तिने घाईघाईत आत येऊन दरवाजा लावून घेतला आणि ती पुन्हा येऊन पलंगावर पडली पण तिच्या डोक्यात संशयाचा किडा वळवळू लागला होता. तिचे कान पुढला पूर्ण दिवस त्या रडण्याची चाहूल घेत होते. विचारांनी डोकं शिणून गेलं होतं, “माझं बाळ जिवंत आहे. या लोकांनी त्याला अद्याप जिवंत ठेवलं आहे. एखाद्या मुहूर्तावर ते त्याचा बळी... शी शी... मला बाळाला वाचवायला हवं. या सर्वांच्या तावडीतून सोडवायला हवं.” तिने एकदोनदा दरवाजा उघडून कानोसा घेतला पण तिला दिवसभरात कसलाही आवाज ऐकू आला नाही. कदाचित भास असावा...

त्या रात्री विक्रम बंगलोरहून परतला तेव्हा त्या दोघांमध्ये संभाषणही झालं नाही. दुसर्‍या दिवशी मजल्यावर वर्दळ असल्याचं तिला जाणवत होतं. बहुधा परांजप्यांकडे माणसं येत होती. काहीतरी कार्यक्रम असावा पण मग मला कसं नाही कळवलं? अनघाचं मन पुन्हा शंकाग्रस्त झालं. ’आज माझ्या बाळाचं काहीतरी...’ ती दिवसभर दरवाजापाशीच घुटमळत होती. सकाळी एकदा तिला रडण्याचा अस्पष्ट आवाज ऐकू आला पण भास की सत्य हे तिला ठरवता येत नव्हतं.

दुपारचे तीन वाजले असावे. अनघा दारापाशीच कान लावून उभी होती. शेवटी तिने मनाचा हिय्या करून परांजप्यांची बेल वाजवली. दरवाजा दिलआंटींनी उघडला. “तू इकडे काय करते अनघा?” अनघाने उत्तर न देता दिलआंटींना बाजूला सारलं आणि ती तडक आत घुसली. आत अनोळखी वीस-पंचवीस माणसं होती त्यात डॉक्टर मखिजा होते. विक्रमही होता. तो तिथे असल्याचं तिला आश्चर्य वाटलं नाही पण सर्वात आश्चर्याची गोष्ट होती ती म्हणजे तिथे ती तिला सतत दिसणारी वृद्ध बाईही हजर होती. फरक एवढाच होता की आज ती अनघसोबत इतरांनाही दिसत होती. खोलीच्या कोपर्‍यात जमिनीवर पद्मासन घालून ती बसली होती आणि तिच्या बाजूला पाळणा होता.... बाळाचा पाळणा! अनघाच्या बाळाचा पाळणा.

अनघाला पाहून खोलीत कुजबूज सुरू झाली. “अनघा, तू परत जा. तुझं इथे काही काम नाही.” परांजपेमामा अनघाचा रस्ता अडवून म्हणाले.

“बाजूला व्हा. तुम्ही माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करून इथे ठेवलं आहे. मी त्याचं रडणं ऐकलं आहे. मला माझ्या बाळाला भेटू द्या.” अनघा रागाने म्हणाली पण परांजपेमामा तसूभर हटले नाहीत.

“परांजपे, रस्ता सोडा तिचा. आई आहे ती बाळाची. ये अनघा, बघ बाळाला. जवळ घे त्याला. त्यालाही आईची गरज आहे.” ती वृद्ध बाई धीरगंभीर आवाजात म्हणाली. “ये. घाबरू नकोस. आता सर्व कसं व्यवस्थित झालं आहे.”

सर्व काही इतकं सरळ आणि सोपं असेल असं अनघाला वाटलं नव्हतं. ती थोडी पुढे सरली तशी परांजपेमामा तिच्या वाटेतून बाजूला झाले. “तुम्ही माझ्या बाळाचं काय करणार आहात? प्लीज त्याला मारू नका. त्या जिवाने अजून डोळेही उघडले नसतील. मला माझं बाळ परत द्या. आम्हाला इथून जाऊ द्या.” अनघाने रडवेल्या आवाजात विनंती केली.

“अनघा, तुला कोणी सांगितलं आम्ही बाळाला मारणार म्हणून? किती दिवस झाले, एकच धोशा लावला आहे. पुरे झालं. आज आनंदाचा सोहळा आहे. उज्जैनहून खास महायोगिनी भानुमती येथे आल्या आहेत.” मामी अनघाला म्हणाल्या.

“तिला येऊ द्या पुढे. ये अनघा,” महायोगिनींचा धीर गंभीर आवाज पुन्हा घुमला. अनघा पुढे झाली. “बस! बाळ तुझंच आहे आणि स्वस्थ आहे, सुदृढ आहे पण त्याला बघायच्या आधी तुझ्याशी काही बोलायचं आहे. बस इथे अशी.” साधारण दिसणार्‍या त्या बाईच्या आवाजात विलक्षण जादू होती. अनघा आणखी थोडी पुढे सरकली आणि खाली बसली.

“शिवस्वरूप भैरव जन्माला येणार हे सत्य गेली ४ वर्षे आम्ही जाणून आहोत. महायोगी कलकनाथांच्या निर्वाणाआधीच साक्षात भैरव जन्माला येईल हे वक्तव्य त्यांनी केलं होतं.” महायोगिनी थांबून अनघाकडे पाहत म्हणाल्या. त्या काय बोलताहेत त्याचा बोध अनघाला होत नव्हता. तिला काही समजून घ्यायचंही नव्हतं. तिला फक्त तिचं बाळ हवं होतं. मेंदू बधीर झाला होता. राहून राहून तिचं लक्ष पाळण्याकडे जात होतं.

“त्यांचा जन्म पुन्हा या पृथ्वीवर व्हावा या साठी एका पुरूष आणि एका खास स्त्रीचा समागम होणे आवश्यक होते. तो होताना तंत्रविद्येचे प्रयोगही त्यांच्यावर होणे आवश्यक होते. जिच्या पोटी हा गर्भ राहिल ती स्त्री वैशाख अमावास्येच्या दिवशी जन्मलेली हवी. तिच्या गर्भाची देखरेख आम्ही जातीने करणार होतो. बदल्यात त्या जोडप्याचा उत्कर्ष आम्ही कबूल केला होता. परांजप्यांची जुनी शेजारीणही वैशाख अमावास्येची. ती स्वखुशीने तयार झाली... आयुष्यात मोठा पल्ला गाठायचा होता तिला...पण आयत्या वेळेला तिने पड खाल्ली. तिला मूल नको झालं आणि आम्हाला ती...” सोनियाचं काय झालं असावं याचा अंदाज अनघाला आता येत होता. ती गप्प राहून ऐकून घेत होती.

“विक्रमच्या रूपाने आम्हाला हवा तसा भक्त भेटला.” महायोगिनींनी मंद हास्य करून विक्रमकडे पाहिलं तशी त्याने मान झुकवली. “तुझाही जन्मही वैशाख अमावास्येचा. सर्व गोष्टी जुळून आल्या. गर्भधारणेसोबत विक्रमला आयुष्यात हवं ते मिळत गेलं आणि आता पुढेही मिळत राहिल. पैसा, हुद्दा सर्व काही येत राहिल. फक्त या अर्भकावर हक्क आमचा. साक्षात भैरव परत आला आहे.” शेवटचं वाक्य महायोगिनी ठसवून म्हणाल्या तशा जमलेल्या लोकांनी “जय भैरवनाथ”चा घोष केला.

“मी तुझ्या गर्भारपणात सतत तुझ्यासोबत वावरत होते. तू आणि बाळ दोघे आम्हाला महत्त्वाचे. त्याची काळजी घ्यायला मी सतत तुझ्या सोबतीला होते. आम्ही तुझे कायम ऋणी राहू, अनघा. साक्षात भैरवनाथ परत आला आहे. भैरव स्मशानात राहतो. रात्री बाहेर पडतो. नरमुंड बाळगतो. नग्नावस्थेत मानवी रक्षा शरीराला फासून अंधारात मार्गक्रमण करतो. सर्व सिद्धिंचा पालक, तंत्रविद्येचा अधिकारी... जय भैरवनाथ!” महायोगिनी एका तालात, आपल्याच धुंदीत बोलत होत्या.

“तुम्ही माझ्या बाळाचं काय केलंत? मला माझ्या बाळाला बघायचं आहे.” अनघाने मनाचा हिय्या करून तोंड उघडलं.

“ते बाळ तुझं नाही. ते बाळ आता आमचं आहे. आम्हा सर्वांचं... आम्हा कपालिकांचं पण तू आई आहेस त्याची. तू त्याची क्षुधापूर्ती करू शकतेस. त्याला दूध पाजून तृप्त करू शकतेस. आमच्या मार्गावर आमच्या सोबत चालू शकतेस. विक्रमही आमच्यासोबत आहे. तूही ये. हे बाळही आहे.” महायोगिनी गंभीर परंतु आर्जवी स्वरात म्हणाल्या. त्यांच्या बोलण्यात दुसर्‍याला भुरळ घालण्याचा गोडवा होता.

अनघा गोंधळून गेली. तिच्या खांद्यावर कुणाचातरी हात पडला तशी तिने नजर वर करून पाहिलं. विक्रम होता.

“अनु, महायोगिनी बरोबर सांगत आहेत. आपल्या आयुष्यात झालेले चांगले बदल तू पाहिले आहेस. हे बाळ त्यांचं आहे. मी कबूल केलं होतं की पहिलं मूल तुम्हाला देईन... पण तूही आमच्या सोबत ये. आम्हाला साथ दे. बाळाला आपलंसं कर.”

अनघाच्या अंगावर शहारा आला पण तिने मान खाली घालून निमूटपणे हलवली. “मला बाळाला बघायचं आहे. ते सुखरूप आहे ना, विक्रम?”

“तूच बघ अनघा. ते कसंही असलं तरी तुझं बाळ आहे आणि आम्हा सर्वांना प्रिय आहे.” विक्रम म्हणाला.

अनघा पाळण्याच्या दिशेने पुढे सरकली. 'कसं असेल बाळ? काळं, कुरुप, नाकी-डोळी बटबटीत? कसंही असलं तरी माझं बाळ आहे. माझ्या पोटचा गोळा. मी आई आहे त्याची. नऊ महिने पोटात वाढवलं आहे. मला साथ द्यायला हवी. माझ्या बाळासाठी. कोणजाणे कदाचित मी त्याला या सर्वांपासून दूर घेऊन जाण्यात यशस्वीही होईन.' पाळण्याजवळ जाणार्‍या प्रत्येक पावलासरशी अनघाचा विरोध गळून पडत होता.

ती धडधडत्या हृदयाने पाळण्यात डोकावली. कपड्यात गुंडाळलेलं तिचं बाळ पाळण्यात स्वस्थ झोपलं होतं. गोरं, डोक्यावर काळंभोर जावळ, लालचुटुक ओठ. इतर १०-१२ दिवसांच्या कोवळ्या अर्भकांसारखंच दिसत होतं. बाळाला बघून अनघाचा उर भरून आला होता, ते सर्वसाधारण बाळ आहे हे पाहून तिने सुटकेचा निश्वास टाकला आणि ती झरकन पुढे सरकली. पाळण्यातल्या निर्धास्त झोपलेल्या जिवाला तिने थरथरता हात लावला. बाळाचा पहिला स्पर्श. त्याची उब तिच्या हातांना जाणवत होती. तिचे डोळे भरून आले. थरथरत्या हातांनीच तिने बाळाच्या सर्वांगावरून हात फिरवायला सुरुवात केली.

तिच्या हाताचा स्पर्श झाला तशी बाळाची झोप चाळवली. कपड्यातल्या त्या इवल्याशा बोचक्याने हालचाल करून आपली झोपमोड झाल्याचे दाखवले आणि हाताला झटका लागल्यागत अनघा मागे झाली. बाळाने झोपेतून डोळे उघडले होते पण... पण तिथे डोळे नव्हतेच. होते ते फक्त रिकाम्या खोबणींत चमकणारे लाल ठिपके. ते ठिपके अनघाकडे रोखून बघत होते. १२ दिवसांच्या त्या अर्भकाने जांभई दिली आणि अनघाला त्याच्या बोळक्यात बत्तीस दातांचं दर्शन झालं.

"अरे देवा! हे काय केलंत तुम्ही माझ्या बाळाचं?" अनघाला आपल्या पायांतलं त्राण जातं आहे याची जाणीव होत होती. ते घर, ती माणसं, पाळणा सर्व आपल्या भोवती गरगर फिरतं आहे असं अनघाला वाटू लागलं आणि ती धाडकन तिथेच कोसळली.

कोणीतरी तिच्या तोंडावर पाणी मारत होतं. तिने डोळे उघडले तेव्हा विक्रम आणि परांजपे मामी तिला उठवत होत्या. “इट्स ओके अनघा. डोळे उघड. सावर स्वत:ला” विक्रम तिला सांगत होता पण तिच्या कानावर शब्द आपटून मागे फिरत होते. क्षणभराने तिने स्वत:ला सावरलं आणि ती निग्रहाने उठून उभी राहिली.

“मी उचलून घेऊ बाळाला? त्याला छातीशी धरायचं आहे.” ती शांत आवाजात म्हणाली.

“जय भैरवनाथ! जय भैरवनाथ! जय भैरवनाथ!” उपस्थितांनी संतोषाने एकच जयघोष केला.

(समाप्त)

आयरा लेवीन यांच्या सुप्रसिद्ध रोजमेरी'ज बेबीवर आधारित.

सर्वांना हॅलोवीनच्या शुभेच्छा!

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

अद्भुत!!! अमानवी !!!
कथा आवडली. गूढ होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान शेवट.
अवांतरः रत्नाकर मतकरी यांची 'कळकीचं बाळ' गोष्ट आठवली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भयालीदेवी झिंदाबाद! शेवटपर्यंत कळलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भयालीदेवी मुर्दाबाद. शेवटपर्यंत कळलं नाही हे खरं आहे, पण मला शेवट अजिबात आवडला नाही. भीती नाही वाटली न काही ... तुला हवं आहे ते विशेषण अजिबात मिळणार नाही. मुर्दाबाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी खुप तर्क काढले,पण शेवट वेगळाच निघाला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

३१ आक्टोबर ह्या "हॅलोवीन" दिवसाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली ही कथा, जरी मूळची रोझमेरी आणि तिचा पती गाय ह्याची असली तरी तिला देशी टोपडे छान बसलेले दिसत्ये. चित्रपट पाहिला आहे आणि 'अनघा' च्या ठिकाणी मिया फॅरो दिसू लागली आहे. "सॅटन रिच्युअल्स" जसे पश्चिमेला मान्य आहेत त्याचप्रमाणे "सैतान भक्ती" या मातीत मान्य असणार्‍यांची संख्याही लक्षणीय आहे, त्यामुळे ह्या गोष्टी वा त्यावर आधारित जनप्रवाद वैज्ञानिक दृष्टीने पाहावेत की नाही ही बाब ज्याच्या त्याच्या मगदुरीवर अवलंबून असते.

"ओमेन" चित्रपटातही ग्रेगरी पेकच्या पत्नीला [ली रेमिक] नकळत 'सैतानपुत्रा'ला सांभाळावे लागते, अन् तेही स्वत:च्या बाळाचा बळी देऊनच. "रोझमेरी बेबी" आणि "ओमेन" कथानकांचे एक वैशिष्ठ्य म्हणजे "६६६". प्रियाली यांच्या कथानकातील वातावरण या काळातील असल्याचे दिसते त्यामुळे तिची अनघाची जन्मतारीख ६ जून ६६ असू शकत नाही हे तर उघडच आहे.

असो. एक चित्तवेधक कथा वाचल्याचे समाधान वाटले.

अशोक पाटील
'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"सैतान भक्ती" या मातीत मान्य असणार्‍यांची संख्याही लक्षणीय आहे, त्यामुळे ह्या गोष्टी वा त्यावर आधारित जनप्रवाद वैज्ञानिक दृष्टीने पाहावेत की नाही ही बाब ज्याच्या त्याच्या मगदुरीवर अवलंबून असते

सैतान ही परदेशी संकल्पना. ती आपल्या मातीत फारशी रुजलेली नाही असं मला वाटतं. आता ती बाहेरून उसनी आणली गेली असेलही. उलट, आपल्याकडे डाव्या किंवा वाममार्गी दैवतांनाही पूजनीय ठरवले जाते. वेताळ किंवा भैरव ही त्यांची उदाहरणे आणि ही सर्व शिवाची रूपे आहेत. त्यांची मंदिरे आढळतात. शाक्त पंथी सुष्ट आणि दुष्ट दोन्ही दैवतांची पूजा करतात. याबाबत आ. रा. यांचा प्रतिसादही आहेच.

६६६ ही फक्त "ओमेनी" कल्पना. रोजमेरी'ज बेबीमध्ये तिला स्थान नाही. रोजमेरी'ज बेबी १९६२ साली घडते. किंबहुना तिच्या भासांमध्ये प्रे.केनेडींचा समावेश करून कथानकांत थोडी रोचकता आणली आहे.

बाकी, वैज्ञानिक दृष्टीकोन कथानकात वापरण्याची गरज मला वाटत नाही. एका बंदिस्त चौकटीतील कथानक एवढेच त्याचे मूल्य आहे. याबाबत मला पाश्चात्यांचं अनुकरण करावसं वाटतं. स्टिफन किंग, स्टेफनी मायर वगैरेसारख्यांना इथे डोक्यावर उचलून घेतले जाते.

रोजमेरीज'बेबीचे श्रेय काही प्रमाणात रोमन पोलेन्स्कीलाही जाते. हा चित्रपट जुना असूनही अद्याप पाहावासा वाटतो. काही वर्षांपूर्वी मी मिया फॅरोने वाचलेली रोजमेरी'ज बेबीची गोष्ट कारमध्ये ऐकली होती. मी सहसा भल्या पहाटे, काळोखात गाडी चालवते. त्यावेळी तिचं ते मदतीसाठी ओरडणं आणि रडणं नकोसं वाटे. Smile

असो. प्रतिसादासाठी आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फक्त "६६६" पुरता मर्यादित हा प्रतिसाद आहे.

~ रोमन पोलन्स्कीचा हा चित्रपट मी पाहिला असल्याने डॉ.हिल तिला बाळाच्या जन्माची "प्रोबेबल डेट" सांगतात - जून ६६. ज्याना न्यू टेस्टामेन्टमधील Book of Revelation माहीत असेल त्याना पोलन्स्कीला त्या डॉक्टरमुखी 'जून ६६' चा उल्लेख करण्यामागे काय सुचवायचे आहे ते उमजेल. ६६६ हा सैतानाचा सांकेतिक क्रमांक आहे. पृथ्वीवर जन्म घेतल्यापासून या क्रमांकाची खूण त्याच्या मस्तकाच्या मागील बाजूस वा उजव्या हातावर असू शकते. अर्थात हे 666 ते तीन आकडे चित्ररूपात किंवा ग्रीक लिखाणातील आकडे χξς (६६६) असेही असू शकतील.

योगायोगाची गोष्ट म्हणजे ज्या रोमन पोलन्स्कीने हा विषय 'रोझमेरी...' मध्ये हाताळला त्याच्या पत्नीची {अभिनेत्री शॅरॉन टेट} ही हत्या स्वतःला 'सैतानाचे साथी' समजणार्‍या एका 'कल्ट' ने १९६९ मध्ये केली. त्यावेळी शॅरॉन केवळ २६ वर्षाची आणि आठ महिन्याची गर्भवतीही होती.

[काहीसा किचकट आणि बर्‍याच लोकांना न पटणारा/न आवडणाराही हा विषय असू शकेल.]

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फक्त "६६६" पुरता मर्यादित हा प्रतिसाद आहे.

पाटीलसाहेब, तुम्हाला बहुधा अवांतर लिहिण्याची स्पेशल परमिशन असावी कारण तुमची अवांतरेही रोचक आणि माहितीपूर्ण असतात. तेव्हा माझ्यापुरत्या तरी लेखात अशा मर्यादा बाळगू नका ही विनंती.

मूळ कादंबरीत ६६ चा उल्लेख नाही कारण कथानक १९६२ सालातील आहे असे वाटते. (सध्या कादंबरी हाताशी नसल्याने तपासून सांगता येत नाही) पण पोलन्स्कीने ६८ साली चित्रपट बनवला असल्याने त्याने ६६६ ची भरती केली असावी.

[काहीसा किचकट आणि बर्‍याच लोकांना न पटणारा/न आवडणाराही हा विषय असू शकेल.]

नाही बुवा! हा आवडीचा विषय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा छान वाटली. वातवरण चांगले रंगवले आहे. तरीही भयाचा म्हणावा तितका परिणाम दिसला नाही हेही खरे.

बरेचसे 'तांत्रिक' बारकावे चांगले टिपले आहेत. कानाची पाळी कापणे, अर्थात "कानफाटे" हा एक तांत्रिक पंथ आहेच. आपल्या उन्नतीसाठी कुणाचे तरी वाईट करावे लागणे हा वाम तंत्रातील एक (गैर) समज व्यवस्थित रंगवला आहे. (वाममार्गाला लागणे हा वाक्प्रचार बहुदा वामतंत्राच्या कुप्रसिद्धीमुळेच आला असावा.)वृद्ध योगिनीचे गर्भार नायिकेला वेळोवेळी दर्शन होणे, बाळाला जन्मतः दात असणे, इत्यादि गोष्टी काही सिद्ध योग्यांच्या बाबतच्या आख्यायिकांमध्ये आढळून येतात.

तरीही काही विसंगती दिसतात. सिद्ध भैरव जन्माला आणायचा असेल, तर त्याच्या आईला अंधारात आणि भयाच्या सावटाखाली ही तांत्रिक भक्तमंडळी ठेवतील असे वाटत नाही. शेवटच्या भागापर्यंत असाच समज होत राहिला की बाळाचा बळी दिला जाणार आहे, कारण तसे भितीचे आणि अनिष्टाचे सावट असलेले वातावरण कथेत जोपासले होते. बाळाच्या बापाच्या ऐहिक प्रगतीसाठी त्याच्या बॉसला अडचणीत आणणे, इत्यादि. परंतु शेवटच्या भागात मंगलमय शेवट सूचित होतो. परंतु पुन्हा त्यातही खोबणीतले लालबुंद डोळे दाखवून त्या मंगलाला अमंगल करुन टाकले आहे.

विसंगती अशी आहे, की ऐहिक प्रगतीसाठी हे असले बळी देणे वगैरे प्रकार करुन तंत्रमार्गाला बदनाम करणारी अनेकानेक मंडळी या देशात हजारो वर्षांपासून आहेत. त्याच कल्पनेचा वापर करुन भयकथा उत्कृष्ट जमली असती. परंतु शेवटी सिद्ध भैरवाचे आगमन सूचित करून या सर्व मंडळींना एका आध्यात्मिक उंचीवर नेऊन ठेवले आहे. ही अशी उंची असणारी मंडळी हे चिल्लर काळ्या जादूचे प्रकार - रुमाल, पुस्तक, कंगवा इ. नेऊन त्यावर प्रयोग करणे वगैरे प्रकार करत बसणार नाहीत. ही विसंगती स्पष्ट जाणवत असल्याने, किंवा स्पष्ट जाणवत नसली तरी कुठेतरी काहीतरी खटकत असल्याने, कथा कुठेतरी फसलेली आहे असे जाणवते.

(जिज्ञासूंनी वामा खेपा या रामकृष्णांच्या समकालीन वाम तांत्रिकाबाबत अवश्य गुगलावे! त्याचे भव्य मंदिर बंगालात उभे राहिले आहे. मंगलाची आराधना करणारे लोक या सिद्धालाही पूजतात. माझ्या माहितीतील एका समाजसेवीचे नाव "ताराप्रसाद" आहे, आणि तो या महागुरुचा भक्त आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिद्ध भैरव जन्माला आणायचा असेल, तर त्याच्या आईला अंधारात आणि भयाच्या सावटाखाली ही तांत्रिक भक्तमंडळी ठेवतील असे वाटत नाही. शेवटच्या भागापर्यंत असाच समज होत राहिला की बाळाचा बळी दिला जाणार आहे, कारण तसे भितीचे आणि अनिष्टाचे सावट असलेले वातावरण कथेत जोपासले होते.

आईला अंधारात ठेवण्याचा प्रयत्न यासाठी की या काळात अनघासारख्या व्यक्ती सहज अशा संकल्पनांना बळी पडतीलच असे नाही. अनघाची तिच्या जन्मदिवसामुळे निवड झालेली आहे. विक्रम अशा गोष्टींना फशी पडणारा असल्याने तो स्वार्थासाठी त्यांना मिळालेला आहे. तसेच, सोनियामुळे या सर्वांना एक कटू अनुभव आहे. भयाच्या सावटाखाली अनघाला ठेवणे अशी या सर्वांची मानसिकता नाहीच पण निदान यावेळी गर्भाची देखरेख नीट व्हावी या दृष्टीने तिला योगिनींचे दिसणे, बेडरेस्ट घ्यावी लागणे इ. प्रकार योजले आहेत. मात्र अनघाने स्वतःच माहिती मिळवून किंवा तिला होणार्‍या भासांमुळे स्वतःची शोचनिय अवस्था करून ठेवली आहे. भीती ही दुसर्‍यांनी निर्माण करावी लागते असे नाही. मानवी मन स्वतःच भीती निर्माण करण्यात पटाईत असते. Smile

मामा, मामी, दिलआंटी आणि म्हटले तर योगिनी सतत तिची काळजी घेत आहेत. योगिनींचे स्वरूप भीतीदायक नाही. अतिशय सर्वसामान्य आहे पण त्या वेळीअवेळी अनघाला दिसत असल्याने ती घाबरते. एखादी व्यक्ती या दर्शनाने सुखावून जाण्याची शक्यताही आहे. डॉ. मखिजा तसे तिला सुचवतातही.

ही अशी उंची असणारी मंडळी हे चिल्लर काळ्या जादूचे प्रकार - रुमाल, पुस्तक, कंगवा इ. नेऊन त्यावर प्रयोग करणे वगैरे प्रकार करत बसणार नाहीत. ही विसंगती स्पष्ट जाणवत असल्याने, किंवा स्पष्ट जाणवत नसली तरी कुठेतरी काहीतरी खटकत असल्याने, कथा कुठेतरी फसलेली आहे असे जाणवते.

पुन्हा, कथेत अनघाने इंटरनेटवर माहिती पाहिली आहे. त्या माहितीची विश्वासार्हता तपासलेली नाही. (मिसळपावचा ई-दिवाळी अंक ही बातमी वाचली असेलच ना ;-)) अर्धवट माहितीने निष्कर्ष काढणारे अनेक असतात त्यापैकी अनघा आहे. कथेतील इतर कोणतेही पात्र तिच्या निष्कर्षांना सहमती देत नाही. उलट, मित्तलांचे पुस्तक, कंगवा, श्रद्धाचा हातरूमाल हे साधे योगायोग असू शकतात. अनघाच्या वडिलांना आलेल्या हार्टअ‍ॅटॅकमध्ये कोणतीही वस्तू समाविष्ट नाही. Smile

बरेचसे 'तांत्रिक' बारकावे चांगले टिपले आहेत. कानाची पाळी कापणे, अर्थात "कानफाटे" हा एक तांत्रिक पंथ आहेच. आपल्या उन्नतीसाठी कुणाचे तरी वाईट करावे लागणे हा वाम तंत्रातील एक (गैर) समज व्यवस्थित रंगवला आहे. (वाममार्गाला लागणे हा वाक्प्रचार बहुदा वामतंत्राच्या कुप्रसिद्धीमुळेच आला असावा.)वृद्ध योगिनीचे गर्भार नायिकेला वेळोवेळी दर्शन होणे, बाळाला जन्मतः दात असणे, इत्यादि गोष्टी काही सिद्ध योग्यांच्या बाबतच्या आख्यायिकांमध्ये आढळून येतात.

धन्यवाद. हे सर्व प्रवाद वापरताना मला पुरेशी माहिती मिळत नव्हती. काही आठवणींच्या आधारे ती टाकावी लागली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा इथं पूर्ण झाली, हे कळलं. एकूणच मी काही असल्या कथांमध्ये रमत नसल्याने 'ठीक', एवढीच प्रतिक्रिया उमटली. पण,

तिने स्वत:ला सावरलं आणि ती निग्रहाने उठून उभी राहिली.

या वाक्याने लक्ष वेधून घेतले. कथेच्या शेवटात ही एक वेगळी सुरवात दिसते आहे. पुढचा भाग?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आतापर्यंत कथा उत्कंठावर्धक होती पण शेवट खूपच वेगळा आणि बुचकळ्यात टाकणारा निघाला. (पाश्चिमात्य असल्यामुळे कथेला शेवटून मिळालेलं वळण अनपेक्षीत असावं Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

सर्वप्रथम प्रतिसादांसाठी धन्यवाद.

मी पहिल्या भागात म्हटल्याप्रमाणे ही गूढकथा आहे. ती भयकथाही आहे का हे सापेक्ष आहे. प्रत्येक माणसाची भीतीची कल्पना वेगळी असते. एखाद्याला उंचीची किंवा काळोखाची भीती वाटत असेल तर मला ती वाटेलच असे नाही. त्यामुळे असे काही संदर्भ कथेत असतील तर मी घाबरेनच असे नाही पण त्याच वेळी दुसरा एखादा घाबरू शकतो. ही कथा कदाचित नुकतेच लग्न झालेल्या किंवा गरोदर बाईला नकोशी वाटेल.

सध्याच्या जगात भीतीची कल्पना इतकी वहावत गेली आहे की किळस म्हणजे भीती असे समीकरण होते आहे. मला ते मान्य नाही. पाच भागांच्या या कथेत सर्वत्र धक्के देत राहणे किंवा भीती दाखवत राहणे हेही मला पटत नाही. तसे काही लिहित राहण्याचा उद्देशही नाही. वातावरण निर्मिती, गूढ, उत्सुकता आणि शेवटची कलाटणी हे कथेचे मुख्य भाग आहेत.

तशी कथा निर्माण झाली का, किंवा त्यात कोणत्या त्रुटी राहिल्या हे जाणून घेणे मला आवश्यक वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा खूप आवडली. ही गूढकथाच आहे भयकथा नाही.

तसेच आळ्श्यांचा राजा म्हणतात त्याप्रमाणे प्रथम अमंगलतेचे सावट मग मंगल मग अमंगल असे मला वाटले नाही. डोळे लाल असणे हे भैरवाचे लक्षण मला अमंगल वाटले नाही तसेच ते कथेतील नायिकेला देखील वाटलेले नाही. बरे बॉसला आलेली मृत्यू हा अघोरपंथाचा बळी म्हणून आलेला आहे याला काहीही पुरावा उपलब्ध नाही. ही शंकेची पाल नयिकेच्या मनात विनाकारण चुकचुकत आहे असा "बेनेफिट ऑफ डाऊट" देण्यास पुरेशी जागा कथावस्तूत आहे. नायिका घाबरलेली असल्याने कावीळीच्या रोग्याला सर्व पीत दिसते या न्यायाने तिला सर्व घाबरविणारेच भासत होते असे मानण्यास जागा आहे.

प्रियालींच्या आतावरच्या ज्या काही कथा वाचल्या त्यांमधील ही मला सर्वात आवडलेली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही गूढकथा आहे याकडे माझं तरी सोयिस्कररित्या दुर्लक्ष झालं. कदाचित हॅलोविनच्या वातावरणात आम्हाला तुमच्याकडून भयकथा अपेक्षीत होती आणि काही ठिकाणी भीती वाटलीसुद्धा!

सध्याच्या जगात भीतीची कल्पना इतकी वहावत गेली आहे की किळस म्हणजे भीती असे समीकरण होते आहे.
हे मलाही पटत नाही. केवळ किळसवाणे, बिभत्स वर्णन केले की भयकथा झाली असे नक्कीच नाही. त्याकरता तशी वातावरण निर्मिती व्हायला लागते.

वातावरण निर्मिती, गूढ, उत्सुकता आणि शेवटची कलाटणी हे कथेचे मुख्य भाग आहेत. तशी कथा निर्माण झाली का, किंवा त्यात कोणत्या त्रुटी राहिल्या हे जाणून घेणे मला आवश्यक वाटते.
होय. तुम्हाला अपेक्षीत असलेल्या या सर्व गोष्टी कथेत आढळल्या. शेवट कलाटणीयुक्तच होता... फक्त तो मला रुचला/झेपला नाही इतकंच! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

वातावरण निर्मिती, गूढ, उत्सुकता आणि शेवटची कलाटणी हे कथेचे मुख्य भाग आहेत.

अगदी अगदी. आपल्याला तर आवडली ब्वॉ कथा. ही कथा गुढकथा आहे हे आधीच स्पष्टं केल्याने त्यात भितीदायक काही असेलच असं वाटलेल नव्हतं. 'आता पुढे काय?' ही उत्सुकता शेवटपर्यंत ताणून ठेवण्यात लेखिका नक्कीच यशस्वी झाली आहे, आणि ह्यात्च गढकथेचे यश आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

कथा वाचनीय आहे. आवडली. पहिले भाग यथावकाश सवडीने पण नक्कीच वाचेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी तुमच्या पूर्वीच्या कथा वाचल्या आहेत पण ही नक्कीच जरा वेगळी होती. शेवट तुमच्या स्टाईल ने झाला असा वाटला नाही. पहिले चारी भाग अतिशय उत्कंठापूर्ण होते. शेवट वेगळा होईल असे वाटले होते. पण जिथे शेवट केला आहे तो शेवट होता असे वाटले नाही (अपुर्ण वाट्ला). शिवाय नायिकेला सुटकेसाठी आणखी थोडे प्रयत्न करू द्यायला हवे होते असे वाटते.

पण कथेची मांडणी आणि वेग दोन्ही आवडले. तुमच्या कथा नेहमी आवडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा आवडली. पाचही भागांत राखलेला कथेचा ओघ, बांधणी आणि गूढ वातावरणनिर्मिती मस्तच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नंदनशी सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चक्रपाणि

कथा वाचायला मजा आली.
हे म्हणजे 'आकाशदिव्याच्या जागी पोखरलेला भोपळा';)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भयानक गोष्ट होती.
आधी डॉक्टर यात सामील दाखवल्याने वैतागले होते.
पण नंतर आमच्या गावातच एक एम डी भानामतीकर आहेत त्यांची आठवण झाली,सो अ‍ॅक्सेप्टेड गं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भानामतीकर म्हणजे काय? डॉक्टर भानामती वगैरे करायचे का? नवीन लेखाला विषय मिळेल म्हणून विचारते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डॉक्टर भानामती वगैरे करायचे का?

मग? तुला काय वाटलं? डॉक्टर करतात त्यालाच भानामती म्हणतात.
पळा, आता ही साती धरून हाणणार मला. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रियालीतैच्या सगळ्या कथापेक्षाही वेगळा शेवट
सुरुवातीलाच गूढकथा म्हटल्याने भीती वगैरे वाटली नाही
पण शेवटपर्यत उत्सुकता टिकून राहली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

पहिला भाग उत्सुकतेपोटी वाचला असला तरी उरलेले चार भाग आत्ता एकत्र वाचून काढले, कंटिन्युइटीसाठी.

कथा खूपच सुंदर जमलेली आहे. गूढकथा हा प्रकार हाताळायला कठीण असतो, कारण कथेत खूप पात्र निर्माण करायला वेळ मिळत नाही. बऱ्याच वेळा व्हीलन कोण आणि नक्की काय होणार आहे याचा अंदाज येतो. कलाटणी दिलीच तर तीही काय असू शकेल हेही ताडता येतं.

या कथेत मात्र गूढ शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यात यशस्वी झालेला आहात. कथा मोठ्या काळापर्यंत घडते. त्यामुळे अनेक प्रसंग येतात. या सर्वांत अनेक रोचक, चित्तवेधक बारकावे भरलेले आहेत. त्यांनी कथेचा पोत छान झालेला आहे.

ऐसी अक्षरे वर इतकी दमदार कथा आली हे पाहून बरं वाटलं. असंच लेखन चालू ठेवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज वेळ काढून सलग ५ भाग वाचून काढले. क्था मस्त फुलवलीये मात्र...एखाद्या प्रसिद्ध गोष्टीवर आधारीत गोष्ट तुझ्या स्वतःच्या गोष्टींपेक्षा डावी आहे Sad
तुझ्या आधिच्या वरजिनल गोष्टी अधिक आवडल्या होत्या!
असो वरजिनल गोष्टींसाठी शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

रूपांतर आवडले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झकास

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मस्तय. पण मी वाचलेल्या प्रियालीच्या गोष्टीँमधे सगळ्यात बेश्ट गबाळ्या आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0