’असलेपणा’तला बोर्हेस!

"आपण जागेपणी ठरवून पाहतो ती स्वप्नं म्हणजे आपलं लिखाण!"
ह्या वाक्यावर प्रथम ’ह्यॅट! काहीतरीच काय!’ अशीच प्रतिक्रिया होते. मग आपण मान वाकडी करकरुन डोकं खाजवत पुन्हा-पुन्हा ते वाक्य वाचतो, ’हे वाटतंय तेव्हढं साधं नाही’ म्हणत त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करतो. मग सरतेशेवटी आपल्याला या वाक्यात केव्हढा मोठा गर्भितार्थ दडलेला आहे हे उमजतं आणि त्यात तथ्य आहे हे मान्य करायलाच लागतं. बोर्हेसच्या कविता वाचताना अशी मान डोलवण्याची वेळ अनेकदा येते.

होर्हे ल्युईस बोर्हेस हा अर्जेंटेनियन कवी, निबंधकार आणि कथालेखक. याची संपूर्ण साहित्यनिर्मिती ही स्पॅनिशमध्ये असून त्याची अनेक भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत.

आपल्याला जे जे काही म्हणायचं किंवा म्हणायचं नसतं, जे काही वाटत असतं किंवा आपल्याला वाटतंत नेमकं तसंच वाटतंय का याची खात्री नाही ते, ते बरंच काही बोर्हेस आपल्या कवितांमधून सांगतो. आपण जगायचं जगायचं म्हणतो पण ते राहूनच जातं ते जगणं बोर्हेस आपल्या कवितांमधून आपल्या पुढ्यात ठेवतो. कित्येक जाणिवा अशा असतात की ज्यांची आपल्याला फ़क्त चाहूल लागलेली असते पण नीटसं दिसत नाही, भिडेल इतकं जाणवत नाही, जाणव्ल्याच कधी तर त्या धूसर असतात की त्या आहेत की नाहीत याचा पत्ता शेवटपर्यंत लागत नाही, त्या जाणिवा बोर्हेसच्या कवितांमधून मूर्त रुप घे‌ऊन येतात. साध्यासुध्या गोष्टींवर सुद्धा तो इ‌तकं काही वेगळं बोलून जातो की अरे! असा विचार आपण कसा केला नाही? असा प्रश्न आपल्याला पडतो.

र्हा तोदो ता लो मिल रेफ़्लेहोस
केंन्तेर्लो र्होक्रेपू कूलोर्हल्दिया
कू र्होत्रो फ़ु‌उलेहान्नोलो सेपेहोस
इल किरादेहांदो तोलाविया

सर्व गोष्टी दिवसभरातल्या पूर्वघटीत असतात
आपण पाहतो ते त्यांच्या प्रतिमा फ़क्त.
आरशातून आजचा चेहरा नाहीसा होत असताना
पूर्वीचे कित्येक चेहरे तिथेच असतील मात्र.

किती वेगळा विचार!

त्याच्या कवितेतून अनेक शक्यतांना वाव असतो, त्या शक्यतांमधून त्यांना नवनवीन अर्थांचे धुमारे फ़ुटतात, मग त्या अर्थांवर लहरत लहरत आपल्या काही नव्या जाणिवांचा प्रवास करुन येतो. आपण कोण आहोत आणि आपल्या मर्यादा काय आहेत आपला आवाका काय आहे याची पुरेपूर जाणीव असलेला तो माणूस होता त्यामुळे तो किमान त्याच्या जाणिवांना न्याय दे‌ऊ शकायचा/ शकलाय आणि म्हणूनच त्याच्या कविता जाणीवश्रीमंत आहेत. "तुझ्याबरोबर असताना आणि तुझ्याबरोबर नसतानाचा- काळ मोजण्याची ही एकमेव पद्धत आहे माझी" असं काहीतरी हळवं बोलून जाणारा बोर्हेस दुसरयाच क्षणी "वास्तव हे असेलच असे नाही आणि असतंच असंही नाही" असं काहीतरी चमकवून टाकणारं बोलून जातो.

त्याचे अनेक मित्र त्याला सांगायचे की त्याच्या कथा त्याच्या कवितांपेक्षा कितीतरी पटीने सरस आहेत म्हणून. पण कविता लिहीताना एक वेगळाच आनंद होतो असे बोर्हेस म्हणायचा. बोर्हेस खरंतर त्याच्या कथा आणि निबंधाकरता प्रसिद्ध! पण कवितांवर त्याचा कोण जीव. डोळे कायमचे अधू झालेले असताना आणि दृष्टी गेल्यावर क्लिष्ट निबंधांपेक्षा कविता जसजशी डोक्यात येते तशी लक्षात ठेवायला सोपी पडते असं म्हणायचा. अधू असली तरी बोर्हेसकडे सामान्य दृष्टीपेक्षाही वेगळी दृष्टी होती हे सांगायला त्याच्या कविता आहेतच.

इला पुरतासे सि‌एरानातुपासो
सोलो देलोत्रोलादो देलोकासो
व्हेरा लोसारर्तेतीपो‌इ‌आ लेंदोरेस.

आपल्यामागून दारं बंद करत येणारे आपण मात्र
यातलं अद्भुत आणि सौंदर्य पाहू शकू
या सर्वाच्या पल्याड पोहोचू तेव्हाच.

अंधत्वामुळेच त्याच्या कामोएस, स्पिनोझा अशा नंतरच्या बरयाच कवितांमध्ये कल्पनेतून जन्माला आलेल्या प्रतिमांचा प्रभाव दिसतो.

त्याची कविता आडवळणाने काहीच सांगत नाही. जे काही आहे ते थेट मांडणे हा बोर्हेसच्या कवितांचा फ़ॉर्टे! त्याच्या कवितांमध्ये धुरकर, गूढ असे काही आहे आणि भावुकता पार ओसंडुन वा्हतेय असं कधीच व्हायचं नाही. एकसंध कविता लिहीण्यापेक्षा चार-चार-तीन-तीन ओळींचे चरण लिहीण्याकडे त्याचा जास्त ओढा होता. ’द गोलम’ सारखी बॅलड्स त्याने अशाच प्रकारे लिहीलीयेत. ’ल लुविया’ नावाची ही कविताच पाहा.

ल लुविया (पा‌ऊस)

ब्रुस्कमेंतेलातार्द से हाक्लारादे
पूर्क या कालेलुविया मिनिसु‌ओसा
काय ओ कायो. ला लुवियेसुनाकोसा
के सिनदोदा सुसेद एनेल पासाद

आताशी कुठे दुपारी पावसाने उघडीप दिलीये
पण पा‌ऊस अधूनमधून रिमझिमतो आहे
पा‌ऊस पडतोय की पडून गेलाय?-कोणाला त्याचं काय
आता याक्षणी जे असतं, तेव्हढंच नेमकं खरं आहे

की ला ओये कायेल रेकोब्रादो
एल तियांपो‌एनक ला सुवेर्त व्हेंतुरोसा
ले रव्हाले यून फ़्लोर एलामादारोसा
येल कुरि‌ओसो कुलेर देल कोलोरादो

पावसाची रिपरिप ऐकताना मिळतो
प्रिय, आल्हादक आठवणींना उजाळा
कसे हिरीरीने बोलत बसायचो रंगांवर
मग ते गुलाब असो वा कोलोराडोतला उन्हाळा

इस्ता लुविया के सि‌एगा लोस क्रिस्तालेस
अलेगारेम्पार्दिदोसाराबालेस
लास्नेग्रासुवोस्देना पारा एन सि‌एर्तो

तावदानावर पा‌ऊस तडतडतो आहे
शहरही कसं हरवल्यासारखं झालंय
वारुणीतल्या द्राक्षांची चव जितकी खरी
(तसं पावसातल्या हरखवणारया आठवणींचं झालंय.)

पातियो के‌एन्नो एक्झिस्ते.ला मोहादा
तार्दे मे त्रायला वोस, ला वोस देसियादा
दे मी पाद्रे कम्यु‌एले इल्केनो मा‌एर्तो

पाण्यात चिंब अंगण आणि उजळणारी दुपार
यांच्या निगडीत आहेत खूप सारया आठवणी
माझ्या बाबांच्या-हे आता हयात नाहीत पण
(खरंतर मला सोडून गेलेच नाहीत कधी..)

--

सृष्टीच्या चलनवलनाबद्दल, तिचं आखीव मार्गावरुन परिक्रमा करणं याबद्दल बोर्हेसला खूप कुतूहल होतं असं दिसतं. त्याच्या बरयाच कवितांमध्ये त्याबद्दलचे उल्लेख येतात. उदाहरणार्थ त्याच्या ’एव्हरनेस’ कवितेत तो म्हणतो तसं-

सोलो यूनाकोसा न्वाय एसोलोल्विदो
दि‌ओ, के साल्वेल्मेताल साल्वालेकोरिया
इ सिफ़्रसुपरोप्रोफ़ेतिका मेमोरिया
ला लुना केसेरान एला क्यानसिदो

निर्मात्याने धातू बनवताना मळी ही बनवलीच
तेव्हा विस्मृतीत जावी अशी एकही गोष्ट नसते
त्याच्या अनादी, थांग न लागणारया स्मृतीत
कितीदा चंद्र उगवला आणि मावळला याचा हिशोब आहे

किंवा

इ तोदो सुनापार्त देल्दिव्हेर्सो
क्रिस्ताल देसाममोरिया, एल युनिव्हेर्सो
नो तिनेन्फ़िन सुसार्दो कोरेवोरेस

विश्वाच्या त्या बहुरंगी कॅलिडोस्कोपमधून
या सर्व गोष्टी जन्म घेताना पाहणं आणि
त्या उलगडताना पाहणं याला अंत असा नाहीच

--

अमेरिकन, ब्रिटीश, रशियन साहित्याचा वरचष्मा असलेल्या साहित्यिक जगतात बोर्हेसचा प्रवेश झाला तो गाब्रि‌एल गार्सिया मार्केसची ’सि‌एन आन्योस दे सोलेदाद’ (वन हंड्रेड यियर्स ऑफ़ सॉलिट्यूड) प्रसिद्ध झाली तेव्हा. लॅटीन अमेरिकन साहित्याबद्दल लोकांना कुतुहल वाटायला लागलं आणि नेमक्या याच वेळी बोर्हेसच्या कविता प्रकाशझोतात आल्या.

बोर्हेसच्या इतर समकालिनांच्या झळझळीत वैयक्तिक आयुष्यांशी तुलना करता बोर्हेसचं आयुष्य तुलनेत फ़ारच एकसुरी. तो अत्यंत एकांतप्रिय माणूस होता. ब्युनास आयर्स मधल्या काळोख्या खोलीत तासनतास एकट्याने घालवत त्याने हे कागदावरचं अद्भुत विश्व निर्माण केलंय. बोर्हेस हा एकाच वेळी दोन विश्वांत जगणारा होता. प्रत्यक्षातला बोर्हेस एकलकोंडा, केवळ गंमत म्हणून राजकारणात लुडबुड करणारा, लायब्ररीयन असं थोडंथोडकं बरंच काही होता पण कागदावरचा बोर्हेस मात्र खर्राखुरा किंवा त्याला ज्या बोर्हेसची आस होती तसा होता.

एल सुसिदा (आत्महत्या)

नो केयराय एला नोश नेस्त्रेया
नो केयराय ला नोच
मोरिरेय कॉन्मिगो ल सुम्मा देलिन्तोराब्ल युनिवेर्स

चमकायला आकाशात एकही तारा उरणार नाही
मी रात्रच विझवुन टाकणारेय
मी मरेन तेव्हा मी माझ्याबरोबर विश्वाचा पसारा गुंडाळून जाणारेय

बोरारेल लास्पिरामिदेस लास्मेदालियेस
लोस कॉंतिनेंतेस सिलेस्कारेस
बोरारे लाकमुलास्यो डेल पासाद
हारे पोल्वो लेस्तोरिया, पोल्वो ए पोल्वो

मी पिरॅमिड्स नाहीसे करणारेय, आणि मेडॅलियन्सही
मी खंड पुसून टाकणारेय आणि चेहरेही
शेवाळलेला, तुंबलेला भूतकाळ बुजवून टाकणारेय
इतिहासाची धूळदाण उडवून त्या धुळीचीही धूळ करणारेय

इस्तोया मिरांदो एलुल्तीमो पोनी‌एंते
ओ‌इगो एलुल्तीमो पाहारो
लेगो ला नादा अ नादी.

हा समोर आहे तो शेवटला सूर्यास्त
पक्षी गाणे म्हणतोय-तेही शेवटचे.
माझ्या नसण्याला मी कोणालाच न देता चाल्लोय.

--

बोर्हेसचं वाचन अफ़ाट आणि पुस्तकांबद्दल प्रचंड वेड! त्याची स्वर्गाबद्दलची कल्पना ’स्वर्ग लायब्ररीसारखाच असेल’ अशी होती. त्याचं हे वेड जपणं त्याला दुरापास्त व्हायचं ते त्याच्या डोळ्यातल्या अधूपणामुळे. पण त्याने त्याच्या आवडीपायी नेटाने जमवून घेतलं असावं बहुतेक. वयाच्या तिसाव्या वर्षापासून त्याची दृष्टी अधू अधू होत गेली ते उतारवया्त त्याला थेट अंधत्वच आलं. नेमक्या त्याच वेळी त्याला नॅशनल लायब्ररीचं प्रमुख पद देण्यात आलं. अंधत्व आणि ८००००० पुस्तकं, (पुस्तकांच्या गराड्यात बसलोय हे त्याचं स्वप्न प्रत्यक्षात आलं होतं) एकाच वेळी बहाल करण्यामागच्या दुर्दैवविलासाबद्दल तो काय म्हणतोय पाहा,

नादीयरेवाज्लाग्रिमो रेत्रोच
एतदिक्लरास्यो देला मेत्रीय
दे दि‌ओस क कॉन्माग्निफ़िकैरोनिया
मे दियो आ ला वेस लो लिब्रोस ला नोच

परमेश्वर ना हळहळतो ना बोल लावतो
ठरवल्यासारखा खेळतो एक विचित्र खेळी
त्याची उपरोधाची हद्दच पाहताय ना
फ़ट म्हणता पुस्तकही दिली आणि दृष्टीही नेली.

--

सर्व जगाकडे, चराचराकडे पाहायची इतकी साधी, सरळ, सुंदर नजर असलेल्या, ती वाचकाला विनासायास बहाल करणारया या जगप्रसिद्ध कवीला साहित्याचं नोबेल मात्र मिळू शकलं नाही त्याबद्दल हळहळ तर वाटतेच. ज्यांना नोबेल मिळायला हवं होतं असं सर्वांनाच ठामपणे वाटतं अशा निवडक साहित्यिकांत त्याची गणना होते. पण त्याने त्याच्या चाहत्यांना काही फ़रक पडत नाही. तो जरी आत्ता, इथे आपल्यात नाही तरी तो जे कवितांचे देणं दे‌ऊन गेलाय त्याबद्दल त्याचे वाचक हेच म्हणतील..

"ग्रासियास सिन्योर होर्हे ल्यु‌ई बोर्हेस पारा सु एव्होरनेस!"
"तुमच्या ’असलेपणात’च खूप काही आहे"

field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (4 votes)

प्रतिक्रिया

बोर्‍हेसविषयी धागा पाहून आनंद झाला. मला स्पॅनिश येत नाही, पण कवितांचं भाषांतर पाहून त्याविषयी काही प्रश्न पडले. एका कवितेपुरते ते इथे देत आहे. अधिक संवाद होईल तसे आणखी विचारेन.

तुम्ही दिलेल्या एका कवितेचं इथे इंग्रजीत भाषांतर सापडलं. ते पाहून मूळ कवितेच्या भावाविषयी पडलेले प्रश्न खाली देत आहे.

इंग्रजी भाषांतरः

Not a single star will be left in the night.
The night will not be left.
I will die and, with me,
the weight of the intolerable universe.

तुमचं भाषांतरः

चमकायला आकाशात एकही तारा उरणार नाही
मी रात्रच विझवुन टाकणारेय
मी मरेन तेव्हा मी माझ्याबरोबर विश्वाचा पसारा गुंडाळून जाणारेय

'चमकायला' हा शब्द इंग्रजीत नाही; निव्वळ 'तारा उरणार नाही' एवढंच आहे. शिवाय, इंग्रजीतला रात्रीचा उल्लेख तुम्ही गाळला आहे. पुढच्या ओळीत 'रात्र उरणार नाही' असा अर्थ इंग्रजी भाषांतरात येतो आणि आधीच्या ओळीतल्या 'एकही तारा उरणार नाही' याच्याशी ते सुसंगत वाटतं, कारण 'रात्र' आणि 'उरणार नाही' या दोहोंची पुनरुक्ती होते. पण तुम्ही ही पुनरुक्ती गाळून त्याऐवजी 'मी रात्र विझवून टाकणार' असं म्हणताय. या दोहोंमध्ये अर्थाचा/लयीचा फरक जाणवतो आहे. तो तुम्हाला अभिप्रेत आहे का? तसंच weight आणि intolerable बद्दल म्हणता येईल. weight मध्ये वजन आणि ते intolerable विश्वाचं असल्यामुळे ओझं असा काहीसा भाव येतो. पसार्‍यामध्ये अगडबंब विस्तार जाणवतो; पण 'विश्वाच्या पसार्‍या'त intolerable मधला विकल भाव जाणवत नाही. तुमचं भाषांतर हे मूळ स्पॅनिशशी अधिक जवळ आहे का?

तशाच या ओळी:

Now I am looking on the final sunset.
I am hearing the last bird.
I bequeath nothingness to no one.

तुमचं भाषांतरः

हा समोर आहे तो शेवटला सूर्यास्त
पक्षी गाणे म्हणतोय-तेही शेवटचे.
माझ्या नसण्याला मी कोणालाच न देता चाल्लोय.

इंग्रजी भाषांतर वाचून असं वाटलं की 'मी' सूर्यास्त पाहतोय तो शेवटचा आणि पक्ष्याचं गाणं ऐकतोय ते शेवटचं हा भावार्थ महत्त्वाचा असावा, पण तो तुम्ही गाळला आहे. ते मूळ स्पॅनिशच्या अधिक जवळचं आहे का? त्याउलट I bequeath nothingness मध्ये nothingness माझा नाही तर एकंदरीत वाटतो आहे त्यामुळे ते 'माझं नसणं' नसून 'काहीच नसणं' (म्हणजे सूर्यास्त, पक्ष्याचं गाणं वगैरे) असं अभिप्रेत असावं असं वाटलं. तुम्हाला काय वाटतं ते ऐकायला आवडेल.

असो. या निमित्तानं बोर्‍हेसची आठवण निघाली म्हणून तुम्हाला धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आत्मघातकी
- - -
ना राहील एकही तारा रात्रीत,
रात्रच नाही राहाणार.
मरेन, आणि माझ्याबरोबर
अवघे असह्य चराचर.
खोडेन पिरॅमिडे, पदके
भूखंडे आणि चेहरे.
खोडेन साचलेला भूतकाळ.
इतिहासाची धूळ करेन, धुळीचीही धूळ.
बघतो आहे मी अखेरचा अस्त.
ऐकतो आहे अखेरचे पाखरू.
मी ठेवून जातो ना काही, ना कोणासाठी.
- - -

शेवटची ओळ मराठीत (किंवा इंग्रजीतही) प्रासादिक रीत्या भाषांतरित करता येत नाही. पण त्यातील मिताक्षर अर्थगर्भतेची खुबी इंग्रजीत समजावून सांगता येईल असे वाटते.

सामान्यपणे स्पॅनिशमध्ये म्हणतील :
Lego nada a nadie
I-bequeath nothing to no-one
(प्रमाण स्पॅनिशमध्ये अशा ठिकाणी डबल-निगेटिव्ह व्याकरणशुद्ध आहे. एकच निगेटिव्ह व्याकरणशुद्ध नाही. प्रमाण इंग्रजीमध्ये मात्र बाब उलट आहे. बोर्हेसने त्याच्या भाषेतल्या सामान्य नकाराच्या द्वित्वाचा कवितेत फायदा करून घेतला आहे. नकारघंटा इंग्रजीत भाषांतरित होत नाही. किंवा अप्रमाण वाटते.)

स्पॅनिशमध्ये शेवटची ओळ आहे :
Lego la nada a nadie.
I-bequeath the nothing तो no-one
"nada" शब्दापुढे la घातल्यामुळे "शून्यत्व" असा अर्थ प्राप्त होतो. इंग्रजीत "the nothing"ने सुद्धा असा अर्थ प्राप्त होतो, पण थोडेसे कृत्रिम वाटते. म्हणूनच वर कोणीतरी "the nothingness" असे भाववाचक नाम योजले आहे.
पण स्पॅनिशमध्ये सामान्य बोलण्याच्या अगदी जवळ, नुसता "la" हा शब्द अलगद घातलेला आहे.
- - -
भाषांतरकार मॅसोकिस्ट असतो, म्हणून हा छळवादी आटापिटा करतो.
"weight" हे मुळात नाही "suma" (इंगजीत "sum") आहे. हे इंग्रजी भाषांतरकाराने का बदलले असावे? इंग्रजीत या अर्थाने "sum" सर्रास वापरतात...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अफलातून अनुवाद! आवडलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Escoge un amante que te mire como si quizás fueras magia!

चि.जं,
सविस्तर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
मूळ कविता ही आहे:
No quedará en la noche una estrella.
No quedará la noche.
Moriré y conmigo la suma
del intolerable universo.
Borraré las pirámides, las medallas,
los continentes y las caras.
Borraré la acumulación del pasado.
Haré polvo la historia, polvo el polvo.
Estoy mirando el último poniente.
Oigo el último pájaro.
Lego la nada a nadie.

आपण वाक्य बाय वाक्य जाऊयात.

No quedará en la noche una estrella याचं सरळ सरळ भाषांतर म्हणजे म्हणजे रात्री एकही तारा नसणारेय
No quedará la noche. रात्र नसणारेय
Moriré y conmigo la suma मी मरणारेय आणि माझ्याबरोबर गोळाबेरीज
del intolerable universo हे असह्य विश्व

..

..
Estoy mirando el último poniente मी शेवटचा सूर्यास्त पाहतो आहे
Oigo el último pájaro. शेवटला पक्षी ऐकतो आहे
Lego la nada a nadie. कोणालच काहीच न देता चाल्लोय.

सरळसोट भाषांतरानंतर मला कविता ज्याप्रमाणे समजली तशीच दिलेली आहे अर्थात.

<<मी' सूर्यास्त पाहतोय तो शेवटचा आणि पक्ष्याचं गाणं ऐकतोय ते शेवटचं हा भावार्थ महत्त्वाचा असावा,
मी केलेल्या अनुवादामध्ये
हा समोर आहे तो शेवटला सूर्यास्त
पक्षी गाणे म्हणतोय-तेही शेवटचे.

तो जाणवत नाही का?

आंतरजालावर इंग्रजी भाषांतरं अनेक आहेत. काही ट्रान्स्लेटरमधून रेडीमेड आलेली आहेत. त्यांनीही त्यांना घ्यायचाय तोच अर्थ घेतलाय, त्यांना जसं मांडावंसं वाटलंय तेच मांडलंय.

जो जसा घेईल तसा अर्थ. मला कळलेला अर्थ अंतिम असा माझा दावा नक्कीच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Escoge un amante que te mire como si quizás fueras magia!

आणखी एक उदाहरण देते.
बोर्हेसची 'Tankas, de El oro de los tigres' नावाची कविता आहे जिच्यातल्या काही निवडक stanzas गौरीच्या 'उत्खनन'मध्ये वाचायला मिळतात.
तर,
या कवितेतला 'उत्खनन'मध्ये उद्धृत केलेला एक stanza असा आहे-'
" ला अहेना कोपा
ला एस्पादा के फुए एस्पादा
एनोत्रा मानो,
ला लूना द ला काल्ये
दिमे, अकासो नो बास्तान?"

आंतरजालावर असलेल्या अनेक भाषांतरांपैकी एक भाषांतर असं आहे-
The outside cup
The sword was sword
in one hand,
the moon of the street
tell me, perhaps not enough?

याचं गौरीने केलेला अनुवाद असा आहे-

ही अजबच वाटी
ही तलवार-कुण्या दुसरया हाती
तलवार होती ती-
चांदणं गल्लीतलं-
सांग, पुरेसं नाही हे सारं?

तिने 'कप'ला 'वाटी' केलं, 'एका हाती' ला 'दुसरया हाती' केलं,
'मून' ला 'चांदणं' केलं आणि 'रस्त्या'ला 'गल्ली'.

वरचं सरळसोट इंग्रजी भाषांतर आणि गौरीचा ग्रेसफुल अनुवाद यांत फरक आहेच ना? अर्थाला धक्का न पोहोचवता मूळ कवितेतला ennui घालवायचा असेल तर अनुवादात इतके बदल करणं गरजेचं वाटतं कधीकधी. सरळ-सरळ, कंटाळवाणं भाषांतर करता येईलही पण मी ते केलं नाही एव्हढंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Escoge un amante que te mire como si quizás fueras magia!

उत्खनन मध्ये (अर्णव हे मला आवडणारे पात्र) बोर्हेसची चांगली ओळख करून देते. कदाचित त्याला बोर्हेस आवडतो, म्हणून मला ते पात्र आवडत असेल. गौरी देशपांडे यांची कडवी कादंबरीच्या प्रवाहाला आणि कथानकाला अतिशय पोषक आहेत.*

मात्र वरील इंग्रजी भाषांतर धडधडीत चुकलेले आहे. त्यामुळे थेट इंग्रजी भाषांतराच्या लंगडेपणाकरिता हे उदाहरण चालणार नाही.
ajenoचे भाषांतर outside अकुशल आहे.
otra manoचे भाषांतर another hand (संदर्भामुळे another's hand) असायला हवे, त्याच्या ऐवजी one hand ???

माझ्याकडे (शोधून बघतो) बोर्हेसच्या हयातीत बोर्हेसच्या आशीर्वादाने इंग्रजी झालेले भाषांतर आहे. सापडल्यावर देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चला, अणू आवडणारा कोणीतरी सलामीलाच भेटला. चांगला शकुन आहे.
गौरीचे सर्वच अनुवाद अत्यंत उत्तम आहेत. 'एकेक पान' मध्ये तिने इलियटच्या कवितेचा केलाय तो अनुवादही किती सुरेख आहे.

आगगाडीत बसलेले तुम्ही
हे स्टेशनवरचे तुम्ही नसता
किंवा पुढच्या स्टेशनवरचे तुम्ही नसाल
आगबोटीच्या कठड्यावर वाकताना
मागचा रस्ता लाटांनी रुंदावलेला बघताना
तुम्ही म्हणणार नाही की हा
टाकला मागे मी माझा भूतकाळ
आणि हा मी सामोरा भविष्याला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Escoge un amante que te mire como si quizás fueras magia!

अहा! स्पॅनिश येत नाही मात्र एकेक कविता (भाषांतरातील संभाव्य, न टाळता येणारी इ. गाळणी सोडली तरिही) म्हंजे मेजवानी आहे..
जरा शांत-संथपणे वाचाव्या लागतील तरच वेगवेगळे पदर उलगडतील
या मेजवानीबद्दल अनेक आभार!!

असे लेखन ऐसीला श्रीमंत करते आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान रसग्रहण. पुन्हा वाचून घेतले पाहिजे.

(पण स्पॅनिश उच्चार पटले नाहीत. तुम्ही स्पॅनिशपूर्वी सुरुवातीला फ्रेंच किंवा पोर्तुगीज शिकला होता काय? प्रमाण स्पॅनिश उच्चार मराठीभाषकाला थेटच सोपे जातात, असे माझे मत आहे :
No quedará en la noche una estrella.
No quedará la noche.
नो केदारा एन ला नोचे उना एस्त्रेया*
नो केदाराला नोचे.
इ. इ.
*आर्जेंटिनियन उच्चार म्हणून "एस्त्रेश्या" चालेल, स्वरसंधी म्हणून "उनैस्त्रेया" चालणार नाही, पण खपेल... पण "नेस्त्रेया" हे खपत सुद्धा नाही. स्पॅनिश कवितांत तरी शक्यतोवर स्वरसंधी करू नये. संधी केल्यास पुष्कळदा मात्रांचे गणित गंडते.

)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धनंजय,
स्पॅनिश म्हटल्यावर तुमची प्रतिक्रिया अपेक्षितच होती. बोर्हेसच्या निबंधांची भाषांतरं वाचलीत मी Smile
खालचे आणि वरचे धनंजय तुम्हीच असाल तर तुमचा' एल सुसिदा' चा अनुवाद प्रचंड आवडलाय.
हो, मी स्पॅनिशच्या आधी फ्रेंच शिकलेय. फ्रेंचमध्ये हा संधीप्रकार वारंवार होत असला स्पॅनिशमध्ये बोलीभाषेतही संधी होतातच की. त्यात अन-स्पॅनिश असं काही आहे असं मला कधी सांगीतलं गेलेलं नाहीये. आणि मी लिहीण्याआधी नेटीव्ह स्पीकर्सची नॅरेशन्स ऐकलीत आणि माझ्या उच्चारांशी पडताळून बघितलियेत.
फ्रँकली, मात्रांची गणित वगैरेचा विचार डोक्यात आला नाही, त्यासाठी हा भावानुवाद नाहीये. माझा अनुवाद एव्हढा काँपिटेटीव्ह नसावा कदाचित. कवितेतला मला माझ्यापुरता कळलेला 'इसेन्स' आला पाहिजे एव्हढं बघते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Escoge un amante que te mire como si quizás fueras magia!

यूट्यूबवर बोर्हेसच्या कवितावाचन/कथाकथनाचा खजिना सापडला (दुवा):

पैकी "पाऊस" कविता (लेखात आलेली). बोर्हेस ही कविता आर्जेंटिनियन हेलात वाचतो. (अन्य काही तुकडे "आंतरराष्ट्रीय" हेलात वाचतो. तरुणपणाची कित्येक वर्षे बोर्हेसने युरोपात घालवली. त्यामुळे त्याच्या लेखनात दोन टोकाचे प्रकार दिसतात : कधीकधी तो अगदी प्रादेशिक आर्जेंटिनियन - त्यातल्या त्यात बुएनोस आएरेसच्या प्रांतातली - बोली आणि लकबी मुद्दाम, अभिमानाने वापरतो. तर कधीकधी अवघे युरोपच आपली परंपरा आहे, अशा आंतरराष्ट्रीय प्रमाणबोलीत लिहितो.)

http://www.youtube.com/watch?v=U-S1Ozr7hQI

(कुठल्याही बोलण्यात संधी होतातच. इंग्रजीतसुद्धा. पण प्रत्येक भाषेचे अ‍ॅक्सेंट-स्ट्रक्चर वेगळे असल्यामुळे जुळलेले संधी वेगवेगळे होतात. याबाबत सखोल व्याकरण-विश्लेषण बहुधा फक्त संस्कृतात झालेले आहे. म्हणून फक्त संस्कृतातच झालेला प्रत्येक संधी लिहायची पद्धत आहे. फ्रेंच/पोर्तुगीज/इटालियन प्रमाण लेखनात काही थोडेच संधी लिहितात. बाकीचे संधी लिहिले तर वाचकाचा घोटाळा होतो. बहुतेक भाषांच्या प्रमाण लेखनात बहुतेक शब्द सुटेच लिहितात, आणि वाचक वाचताना आपल्या अनुभवाच्या व्याकरणातून अशा प्रकारे संधी करून बोलतो, की ध्वनी ऐकणार्‍याला मात्र नि:संदिग्ध शब्द ऐकू येतात.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(काही शब्दांची भाषांतरे हुकलेली आहेत, म्हणून...)

पाऊस
- - -
अगदी अवचित आहे दुपार उजळली
कारण पाऊस भुरभुरतोच आहे.
पडतो आहे वा पडून झाला. पाऊस आहे
भूतकाळतली वस्तू, शंकाच नाही.
पाऊस ऐकणार्‍याला आहे आठवली
ती वेळ : जेव्हा सुफळ नशिबाने होते
गुलाब नावाचे फूल त्याला दाखवले -
आणि लाल रंगाच्या लालीची जाणीव दिली.

असा हा पाऊस, जो तावदाने झाकोळतो,
हसवणार हरवल्या उपनगरात तो
काळ्या द्राक्षांना, कुठल्याशा वेलीवरती,
आता नाहिशा आंगणातल्या. ही ओलेती
दुपार आणते आवाज, हवाहवासा आवाज,
वडलांचा - वारलेच नाहीत, परतलेत आज.

- - -
La lluvia
- - -
Bruscamente la tarde se ha aclarado
Porque ya cae la lluvia minuciosa.
Cae o cayó. La lluvia es una cosa
Que sin duda sucede en el pasado.
Quien la oye caer ha recobrado
El tiempo en que la suerte venturosa
Le reveló una flor llamada rosa
Y el curioso color del colorado.

Esta lluvia que ciega los cristales
Alegrará en perdidos arrabales
Las negras uvas de una parra en cierto
Patio que ya no existe. La mojada
Tarde me trae la voz, la voz deseada,
De mi padre que vuelve y que no ha muerto.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेचे सदस्यत्व वसूल.
परिचय आणि त्यासंबंधी झालेली चर्चा अतिशय आवडली...
अनेक धन्यवाद.
मणिकर्णिका, तुमचे ईतरही लेखन वाचावयाला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपूर्ण प्रतिसादाशी १००% सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अनुवाद - शंका - उत्तरे - प्रतिअनुवाद आणि चर्चा. मेजवानी आहे. अजून येऊ द्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

>>अर्थाला धक्का न पोहोचवता मूळ कवितेतला ennui घालवायचा असेल तर अनुवादात इतके बदल करणं गरजेचं वाटतं कधीकधी.<<

मला वाटतं माझ्या शंका तिथूनच सुरू होत आहेत. उदा:

No quedará en la noche una estrella.
No quedará la noche.

यामध्ये No quedará आणि la noche यांच्या पुनरुक्तीमुळे काही नादमाधुर्य निर्माण होतं असं जाणवतं. तर -

चमकायला आकाशात एकही तारा उरणार नाही
मी रात्रच विझवुन टाकणारेय

यातल्या 'मी रात्रच विझवुन टाकणारेय'मध्ये वाक्याचा कर्ता 'मी' झाल्यामुळे आणि 'न उरणे' ऐवजी 'विझवणे' हे क्रियापद आल्यामुळे ती पुनरुक्ती नाहीशी होते. तसंच 'उरणार नाही' मधला पॅसिव्ह व्हॉईस (कर्मणी?) 'मी विझवुन टाकणारेय' मध्ये अ‍ॅक्टिव्ह (कर्तरी?) झाल्यामुळे अर्थच्छटा बदलते असं वाटतं.

कवितेच्या सुरुवातीला येणार्‍या या पॅसिव्ह 'उरणार नाही'च्या उलट शेवटी 'मी शेवटचा सूर्यास्त पाहतो आहे; मी शेवटला पक्षी ऐकतो आहे; मी कोणालाही काहीही न देता चाललोय' यामधला कर्ता 'मी' आपला आत्मघाताकडे चालू असलेला प्रवास लक्षात यावा इतका अधोरेखित करतो आहे असं वाटतं. पण -

हा समोर आहे तो शेवटला सूर्यास्त
पक्षी गाणे म्हणतोय-तेही शेवटचे.

यामध्ये हा आत्मघातकी आलेख अदृश्य झाला असं वाटलं म्हणून ते मूळ कवीला अभिप्रेत अर्थापेक्षा काहीसं वेगळं होतंय असं जाणवलं. अशा जाणवण्यातून माझ्या शंका आल्या. असो. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

लेख आणि अनुवादावरून झालेली चर्चा अतिशय आवडली. नुकत्याच वाचलेल्या 'वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड'मधल्या काही प्रतिमा/थीम्स ह्या कवितांतून डोकावतात, असं वाटून गेलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुवादावरची चर्चा आणि कविता पुन्हा पुन्हा वाचल्या, खूप आवडल्या. एके काळी स्पॅनिश शिकून बोर्हेस, मार्केज, गालियानो, नेरुदा, सगळ्यांना वोरिजिनल वाचावे अशी खूप इच्छा होती....

मणिकार्णिका & धनंजयः नेरुदांच्या कवितांवर असाच धागा वाचायला फार फार आवडेल...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेरुदाची "me gustas cuando te callas":
"अशी गुमसुम आवडतेस मला"

(ध्वनिफीत)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त!!! ध्वनिफित अजून ऐकली नाही, घरी गेल्यावर ऐकीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतरांना समृद्ध करणार्‍या माणसांच्या साहीत्यावर असेच अनेकानेक सुंदर लेख येवोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"बोर्हेस" याच लेखकाचा आज जन्मदिवस आहे ना? हा सुंदर लेख वर काढते आहे.
___
http://shabd-pat.blogspot.com/ - हा अतिशय सुंदर ब्लॉग मी केव्हाचा मिस करते आहे. मणिकर्णिका यांनी तो सर्वांकरता खुला ठेवलेला होता जो काही काळापासून फक्त निमंत्रितांकरताच ओपन आहे.
.
असो मग फेसबुकवर जाऊन त्यांच्या पोस्टस मी वाचत असते बरेचदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्लॉग आता सर्वांसाठी खुला आहे. मी आत्ता पाहून आले. धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अफाट आवडलेली आहे- समीक्षा, चर्चा, सगळंच. _/\_

मणिकर्णिका ह्या नावामुळे, गौरीचा उल्लेख येणारच, अशी आशा होतीच. बोर्हेजची ओळन ''उत्खनन' मधून च झाली होती तेव्हापासूनच जो ४ ओळीच्या भाषान्तरात इतका प्रभावित करून जातो तो मुळात काय असेल हा विचार डोकावून गेला.
मराठी भाषांतरांचे पुस्तक असेल तर नाव सांगू शकाल काय? मिळवून वाचायचा प्रयत्न करीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद, शुचीताई.आमच्या सारख्या नवीन मंडळींना जणू पर्वणीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।

ह्या, आणि फक्त ह्या अशाच्च धाग्यांसाठी ह्या साईटचं व्यसन लागतं.

चिंतातुर जंतू ह्यांनी फारच कष्ट घेतलेले आहेत, आशयघन अनुवादांसाठी. धनंजय ह्यांचेही अनुवाद खूप आवडले. कुठल्याही भाषेतल्या साहित्यकृतीत जे 'between the lines' असतं, ते तसंच्या तसं दुसर्‍या भाषेत आणणं जवळपास अशक्य असतं असं माझं मत आहे. मग त्यामागचं कारण (बरेचदा) मोठा सांस्कृतिक फरक असो, किंवा रुपके-उपमेय-उपमा इ. ह्यांचा अभाव.

गौरी देशपांडे ह्यांचा तो अनुवाद डबल फिल्टर झालेला आहे. मूळ इन्ग्रजी अनुवादाचा (मला तरी) काहीही अर्थ लागत नाही. त्यांनी त्याचं अनुवादापेक्षा 'अलंकारिक भाषांतर' केलंय म्हणावं लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.