हिवाळ्यातल्या संध्याकाळी स्नो वितळतांना
कविता म्हणजे
काय असावे
-प्रश्नचिन्हं नसलेला प्रश्न समजून
दुर्लक्ष करण्याजोगा प्रकार-
किंवा 'न समजू शकलेली कविता'
तर काय धागा असावा. हा प्रामाणिक
पूर्णविराम
तर शब्द असतांना
चिन्हांची काय गरज?
हा न समजलेला प्रश्न
'वरच्या दहा ओळी दुर्लक्ष करण्याजोग्या का नाहीत?' या विषयावर निबंध लिहायचा असल्यास
कवितेबद्दल विचार करतांना सूचलेले
किंवा साचलेले.
नकळत
'संध्याकाळचा राग येणे'
'रागावण्याबाबत काही संकेत नसणे'
'कशाचाही राग येऊ शकतो'
'फक्त न कळलेल्या गोष्टींचा राग येत असेल'
'संध्याकाळ आणि पाठीवरचा अलैंगिक बलात्कार थांबल्याप्रमाणे
वाळक्या पानांसारख्या तरल दु:खी मनाने प्रवास करणार्या मुंग्या, त्यांच्या राणीमुंग्या
ऑफिसातुन परतणारी फेसाळ
पण मुक्त बापुडवाणी लोकजत्रा'
'न आठवणार्या गायी आणि सूर्यास्त'
व्हॉट इज धिस प्लेस
काही मुद्दे
माणसे वेगळी आहेत
मग संवाद कसा शक्य आहे
म्हणजे संवादाचा अर्थच संघर्ष असेल तर
तर वरील शब्दांपासून अर्थापर्यंत पोचण्यासाठी तुम्ही
काय काय
कराल
तर
गाळलेल्या जागा भरा
हा प्रश्न
मठ्ठपणा आहे (घरवापसी)
किंवा
प्रत्येक मनुष्य
एका स्वतंत्र विश्वात जगत आहे
कवितेचा अर्थ काय असावा?
अर्थ किंवा सौदर्य
कालसापेक्ष अर्थ किंवा कालातीत सौंदर्य
संदर्भहीन कालसापेक्ष अर्थ किंवा इनव्हिझिबल कालातीत सौंदर्य
काळवंडलेला संदर्भहीन कालसापेक्ष अर्थ किंवा पारदर्शक इनव्हिझिबल कालातीत सौंदर्य
विकिवर फुकोबद्दल वाचतांना
सूचलेले
किंवा आठवलेले