Skip to main content

वै. विष्णुबुवा जोग महाराज

विष्णुबुवा जोग महाराज यांची आज पुण्यतिथी (गुरुप्रतिपदा)
त्यांना भावपूर्ण आदरांजली.

ते नाशिकला रामकुंडावर स्नानासाठी गोदावरीमध्ये उभे राहिले. तीरावरील
तीर्थोपाध्याय संकल्प सांगू लागला -
" पापोहं पापकर्माहं पापात्मा पापसंभव: ॥
बुवा एकदम त्याच्यावर खेकसले.
"मी पापीही नाही, पापकर्मीही नाही ! दुसरे काय म्हणायचे असेल ते म्हणा,
एवढा हा संकल्प उच्चाराल, तर खबरदार !"
कोण होते हे बुवा ? या दुर्लभ संत पुरुषाला विष्णुबुवा जोग या नावाने
ओळखतात. त्यांचा हा अल्प परिचय -

विष्णु नरसिंह जोग (जन्म : १४ सप्टेंबर १८६७, मृत्यू ५ फेब्रुवारी १९२०)
हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे कार्य पद्धतशीरपणे पुढे नेण्याचे प्रयत्न करणारे
संतपुरुष होते. विष्णुबुवा जोग म्हणून हे सर्वपरिचित आहेत.
ते आळंदीतील वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार
आणि लेखक होते. विष्णुपंत जोग हे अत्यंत निरिच्छ होते आणि
लोकमान्य टिळक यांचे स्नेही व चहाते होते. ते स्वदेशी वस्तू वापरीत
आणि टिळकांना यथाशक्ती मदत करीत.

विष्णुबुवांचा जन्म पुण्यात झाला. त्यांच्या आ‌ईचे नाव सरस्वती होते.
त्यांना तीन मोठे भा‌ऊ होते. त्यांतील एक पांडोबा महाराज हे मल्ल होते.
विष्णुबुवांनाही लहानपणापासून मल्लविद्येचा नाद होता. पांडोबांप्रमाणे तेही
आजन्म ब्रह्मचारी राहिले. विष्णुबुवा पुण्यातील नगरकर तालमीचे वस्ताद होते.

पांडोबा महाराजांबरोबर विष्णुबुवा आळंदीला जा‌ऊन लागले. हळुहळु ते
ज्ञानेश्वर माऊली व पांडुरंगाचे नि:स्सीम भक्त झाले.
त्यांनी तुळसिची माळ ज्ञानेश्वरांच्या समाधीवर ठेवली. ती माळ स्वतःच
आपल्या गळ्यात घालून घेतल्री आणि ते वारकरी झाले.

विष्णुबुवा जोगमहाराज हे वारकरी संप्रदायाचे प्रसारक होते.
विष्णुबुवा फारसे शिकलेले नव्हते. त्याना स्वत:ची सही करायलाही दोन मिनीटे
लागत असत. पण संत कृपेने मराठी संतवाङ्मयाचे अनेक ग्रंथ त्यांनी
टिपा-प्रस्तावना-अन्वयार्थ लावून प्रसिद्ध केले.
तुकाराम महाराजांच्या अभंगांचा अर्थ लावून सार्थ गाथा तयार करण्याचे काम
पहिल्यांदा जोगमहाराजांनीच केले. इ.स. १९०१ साली त्र्यंबक हरि आवटे
यांनी प्रकाशित केलेली हीच ती तुकारामाची आद्य सार्थ गाथा.
जोग महाराजांनी संपादित केलेली अन्य पुस्तके
सार्थ अमृतानुभव (इ.स. १९०५).
निळोबा महाराजांचा व ज्ञानेश्वर महाराजांचा वर्गीकृत गाथा ( १९०७)
सार्थ हरिपाठ आणि चांगदेव पासष्टी
एकनाथी भागवतादी सहा ग्रंथ (१९११)
वेदान्तविचार (१९१५)
महीपतीकृत ज्ञानेश्वरीतील वेचे (सार्थ) (१९१७)

जोग महाराजांनी गावोगावी फिरून कीर्तने-प्रवचने दिली आणि आपल्या
अमोघ वाणीने संत वाङ्‌मयाचा प्रचार आणि प्रसार केला. भजन, कीर्तने,
ज्ञानेश्वरी आणि तुकारामाची गाथा यांची पारायणे आणि पंढरीची वारी हा
त्यांचा दिनक्रम बनला. कीर्तन-प्रवचनांनी त्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला.

विष्णुबुवा अत्यंत नियमशील वारकरी होते. आचरण विशुद्ध, सत्यप्रियता,
देशभक्ती अशा अनेक गुणांनी जोगमहाराजांना समाजात मान होता, प्रतिष्ठा
होती. अनेकांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना होती.

जोगमहाराजांचे शिष्योत्तम वै. प्राचार्य सोनोपंत (मामा) दांडेकर यांनी
जोगमहाराजांचे चरित्र लिहून प्रसिद्ध केले आहे. मामांबरोबरच
वै. बंकटस्वामी, वै. लक्ष्मणबुवा इगतपुरीकर, वै. मारुतीबुवा गुरव,
वै. पांडुरंग शर्मा, वै. लक्ष्मणबुवा कुंडकर असे अनेक कतृत्ववान शिष्य
जोग महाराजांनी तयार केले. त्यांनी वारकरी सांप्रदायाचा मोठा प्रसार
केला. तसेच प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार वै. डॉ. दत्तोपंत पटवर्धन हे देखिल
जोग महाराजांचेच शिष्य होत.

जोग महाराजांच्या जीवनातील काही प्रसंग -
(वै. मामा दांडेकर यांनी लिहिलेल्या चरित्रच्या आधारे)

हरिकीर्तन करुन कुणी पैसे घेवू लागला की ते त्याच्यावर संतापत.
"तर मग पोट भरण्यासाठी मी काय करु ?" या प्रश्नावर ते लगेच
उत्तर करीत, "-वाटेल ते कर! हमाली केलीस तरी चालेल. पण
हरिनाम असे विक्रिस काढू नकोस."

इंग्रजांची (सरकारी) नोकरी करणे या गोष्टीचा ते अतिशय तिटकारा करित.

तुकाराम महाराजांच्या म्हणण्या प्रमाणे -
आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत । करावे फजीत चुकती ते ॥
असे त्यांचे वर्तन होते. कुणी चुकीच्या मार्गाने जाऊ लागला, की
त्यांनी त्याला धरुन चमकावलाच. जाऊ दे, आपल्याला काय करायचे आहे,
अशी चालढकल त्यांच्याजवळ अजिबात नव्हती, ढोंग दिसले की आपली
काठी घेऊन ते त्याच्यावर तुटून पडलेच !
विदर्भातील एक तथाकथित साधू पुण्यास आले. त्यांनी अंतर्दुष्टीने एका
भल्या माणसाची विधवा ही गेल्या जन्मी आपलीच पत्नी होती, असे
ओळखले होते म्हणे ! पुण्यातील एका सत्प्रवृत्त देशभक्तांनीच त्यांचे
प्रस्थ वाढविण्यास प्रारंभ केला. बुवा उठले आणि दण्डा घेऊन त्या
साधूच्या मुक्कामी जाऊन उभे राहिले. त्यांनी त्या साधूला असे खडसावले,
की लगेच गाशा गुंडाळून तो जो पळाला, तो बुवा असे पर्यंत पुन: पुण्यास
आला नाही.

आपली सर्व संपत्ती बुवांनी वारकरी शिक्षण संस्थेला दिली.

बुवा स्वत: पत्र लिहीत नसत. कधी लिहिण्याचा प्रसंग आला तर
दुसऱ्याला सांगत. एकादा मामांवर पत्र लिहिण्याचा प्रसंग आला.
ते लिहीत असताना नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे पत्राच्या शेवटी ’आपला’
असे मामांनी लिहिले आणि बुवांपुढे सहीकरता कागद केला. बुवा
म्हणाले हे ’आपला’ खोड. आम्ही फक्त ज्ञानदेवाचे आणि देवाचे !
पुन: कधी मामांनी ’आपला’ असे बुवांच्या पत्रात लिहिले नाही.

आपला देह आळंदी येथेच अखेर ठेवायचा हा बुवांचा निर्धार होता.
त्याप्रमाणे ते आदल्या दिवशी निघून मामा दांडेकर व लक्ष्मणबुवा इगतपुरीकर
यांचेबरोबर पुण्याहून घोडा गाडीने आळंदीस आले. घांसवालेंच्या धर्मशाळेत
ते उतरले. मामांना इंद्रायणींचे व ज्ञानोबा माऊलींचे तीर्थ आणावयास
सांगितले. ते तीर्थ आणल्यावर जोग महाराजांनी ते प्राशन केले. जोग महाराज
उत्तरेकडे तोंड करुन मांडी घालून बसले. मामांना हाक मारली व डोळे
मिटून मी जातो असे म्हटले. माऊलीच्या चिंतनात ते अनंतात विलीन झाले.
ज्ञानेश्वरीत वर्णन केल्याप्रमाणे त्यांनी देह ठेवला.
का झांकलीये घटीचा दिवा । नेणिजे काय जाहला केव्हां ।
या रिती तो पांडवा । देह ठेवी ॥ ज्ञा. ८-९८ ॥

- देवदत्त परुळेकर मो. ९४२२०५५२२१

Node read time
4 minutes
4 minutes

ऋषिकेश Wed, 04/02/2015 - 09:43

विष्णुबुवा जोगांचे किर्तन अत्यंत रसाळ असे, असे माझे एक वयोवृद्ध परिचित सांगत ते आठवले.
त्या परिचितांचे आजोबा त्यांना या किर्तनाला लहानपणी घेऊन जात

अस्वल Wed, 04/02/2015 - 12:26

गोनिदांच्या स्मरणगाथेत जोग महाराज आणि सोनोपंत दांडेकरांबद्दल लिहिलेलं आठवतं.

तीरावरील तीर्थोपाध्याय संकल्प सांगू लागला -" पापोहं पापकर्माहं पापात्मा पापसंभव: ॥
बुवा एकदम त्याच्यावर खेकसले. "मी पापीही नाही, पापकर्मीही नाही ! दुसरे काय म्हणायचे असेल ते म्हणा,एवढा हा संकल्प उच्चाराल, तर खबरदार !"

हे समजलं नाही.

अरविंद कोल्हटकर Thu, 05/02/2015 - 02:53

In reply to by अस्वल

'पापोऽहं पापकर्मोऽहम्' म्हणजे 'मी पाप आहे आणि पाप करणारा आहे.'

विष्णुबुवा जोग हे वर्णन स्वतःला लावून घ्यायला तयार नव्हते. उपाध्याय जेव्हा पूजा किंवा तसाच काही धार्मिक आचार चालवत असतात तेव्हा यजमानाच्या वतीने तेच शब्दांचे उच्चारण करीत असतात. ते सर्व प्रथमपुरुषामध्ये असते. 'धूपं समर्पयामि. दीपं समर्पयामि - उदबत्ती निरांजन लावा' असे जेव्हा उपाध्याय सांगतात तेव्हा 'मी धूप अर्पण करतो, मी दीप अर्पण करतो' असे यजमानाच्या वतीने त्याचेच शब्द ते बोलत असतात. हे संस्कृत शब्द यजमानाने स्वतः चुकतमाकत म्हणण्यापेक्षा उपाध्यायच त्याच्या वतीने ते म्हणतात. 'पापोऽहं पापकर्मोऽहम्' असे शब्द आपल्या तोंडी उपाध्यायाने घालावेत हे विष्णुबुवांना पटले नाही इत्यर्थः.

गवि Thu, 05/02/2015 - 11:07

In reply to by अस्वल

सर्वच धर्मात आपण सर्वजण पापी आहोत असं धरुन बोलणं चालतं.

असु आम्ही अति पतित दुरा चा आ आ आ आ SS री ई ई ई.

घाटावरचे भट Thu, 05/02/2015 - 13:32

In reply to by गवि

असहमत.

'तुम्ही पापी? तुम्हाला पापी म्हणणारा महापापी होय. तुम्ही अमृताचे अधिकारी आहात....' वगैरे अर्थाची वाक्ये - इति स्वामी विवेकानंद.

हारुन शेख Wed, 04/02/2015 - 12:52

विष्णुबुवा जोगांचं अन्वयार्थ आणि अर्थविवरण असलेलं 'अमृतानुभव' माझ्याकडे आहे. अत्यंत सुबोध आणि संदर्भमूल्य असलेलं पुस्तक आहे. ह्या पुस्तकाशिवाय अमृतानुभव मला ५०% तरी कळला असता काय (म्हणजे पूर्ण कळला आहे हे म्हणायचं धाडस मुळीच करत नाहीये ) अशी शंका वाटते.

मन Wed, 04/02/2015 - 17:55

विष्णूबुवा जोग ह्यांचा "पहिले हिंदू मिशनरी " असा उल्लेख ऐकला होता हिंदुत्ववाद्यांशी गप्पा मारताना.

मन Wed, 04/02/2015 - 18:46

In reply to by अनुप ढेरे

@अनुप :-
तुझ्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकावा की जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल काही क्लेम ठोकता येत असेल तर तसा दावा ठोकावा असा विचार करतोय. ;)

अरविंद कोल्हटकर Thu, 05/02/2015 - 03:31

In reply to by मन

'पहिले हिंदु मिशनरी' म्हणून विष्णुबुवा ब्रह्मचारी (विष्णु भिकाजी गोखले - १८२५-१८७१) ह्यांची ख्याति आहे, अलीकडच्या काळातील विष्णुबुवा जोगांची नाही.

डॉ.विल्सन ह्यांच्या फळीतील मिशनरी जागोजागी भाषणे देऊन हिंदु धर्माहून ख्रिश्चन धर्म उजवा आहे अशी प्रवचने करीत असत. विष्णुबुवा ब्रह्मचारी तशीच उलटी भाषणे देऊन त्यांचा प्रतिवाद करत त्यावरून त्यांना ही उपाधि प्राप्त झाली. ह्यांच्यावर बरीच माहिती जालावर मिळेल. विकिपान येथे पहा.

धर्मराजमुटके Thu, 05/02/2015 - 23:21

या धाग्यावर अवांतर आहे पण लिहिल्याशिवाय राहवत नाहीये. काही काही शब्दांची लघुरुपे नेहमी बघण्यात आल्यामुळे ओळखीची वाटतात. उदा. कै. (कैलासवासी), स्व. ( स्वर्गवासी), वै. (वैकुंठवासी), पै. (पैगंबरवासी) इत्यादी. कालच कामानिमित्ताने चाकणला जाणे झाले तर एका ठिकाणी पै. गणेशबुवा अमुकतमुक असा मोठा फ्लेक्स बॅनर लावलेला. आता नाव तर गणेशबुवा आणि हे पैगंबरवासी केव्हा झाले ? आणि जर पैगंबरवासी झाले तर गणेशबुवा नाव कसे यावर बराच वेळ डोके खाजविले पण काही उलगडा झाला नाही. शेवटी देहबोलीवरुन हे साहेब पै फॉर पैलवान असावेत असा गैर ? (समज) करुन घेत मनाचे समाधान करुन घेतले.

अरविंद कोल्हटकर Fri, 06/02/2015 - 00:31

In reply to by धर्मराजमुटके

मुस्लिम मृत व्यक्तींच्या बाबत 'पैगंबरवासी' असा शब्दप्रयोग मुळात चुकीचा आहे. तेच 'ख्रिस्तवासी' ह्या शब्दाबद्दल. वै. कै. स्व. ह्या हिंदु पठडीतील शब्दांना अर्थ आहे कारण वैकुंठ, कैलास, स्वर्ग ही स्थाने आहेत आणि म्हणून 'तेथे वास करण्यासाठी गेलेला' हे सार्थ आहे. त्या मार्गाने 'पैगंबर' आणि 'ख्रिस्त' ह्या काही जागा नव्हेत, जेथे कोणी वास करू शकेल.

इस्लामी (आणि ख्रिश्चनहि) श्रद्धेनुसार प्रत्येक व्यक्ति मृत्यूनंतर 'अखेरच्या निर्णयदिवसाची' वाट पहात पडून असतो आणि त्या दिवसानंतरच त्याने केलेल्या पापपुण्याचा हिशेब होऊन तो स्वर्ग वा नरकात जातो. त्यामुळे इस्लाम अथवा ख्रिश्चन धर्म पाळणारा कोणीहि मेला की त्याला लगेच अल्लाच्या किंवा ईश्वराच्या उजव्या हाताला जागा मिळते असे मानता येत नाही. पुण्यावानांनाच हे भाग्य लाभणार आहे आणि तेहि 'अखेरच्या निर्णयदिवसानंतर'. बाकीचे नरकात ढकलले जातात. साहजिकच मृत्यु झाल्याझाल्या कोणीच पैगंबरवासी अथवा ख्रिस्तवासी होत नाही.

मिकेलअँजेलोच्या सिस्टीन चॅपेलच्या भित्तिचित्रात हे स्पष्ट दाखविले आहे.

हिंदुधर्म ह्या बाबतीत अधिक उदार आहे. अजामीळाने आयुष्यभर भरपूर पापाचरण केले पण म्रूत्यूच्या क्षणाला त्याने आपल्या आवडत्या मुलाला 'नारायण' अशी हाक घातली. तेव्हढयाने विष्णुदूत तेथे अवतरले आणि अजामीळामधील अंगुष्ठमात्र पुरुषाला पाशांनी बांधून ओढून नेणार्‍या यमदूतांना हाकलून देऊन त्यांनी अजामीळाला वैकुंठात प्रवेश दिला अशी कथा भागवतपुराणामध्ये आहे

'न'वी बाजू Fri, 06/02/2015 - 18:05

In reply to by अरविंद कोल्हटकर

स्वर्ग ही स्थाने आहेत आणि म्हणून 'तेथे वास करण्यासाठी गेलेला' हे सार्थ आहे. त्या मार्गाने 'पैगंबर' आणि 'ख्रिस्त' ह्या काही जागा नव्हेत, जेथे कोणी वास करू शकेल.

नेमके!

आणि, त्या अनुषंगाने, 'ख्रिस्तवासी', 'पैगंबरवासी' या संज्ञा तद्दन अश्लील वाटू लागतात.

धर्मराजमुटके Fri, 06/02/2015 - 23:12

In reply to by अरविंद कोल्हटकर

मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसार भारतात झाला तसा त्यांनी इथल्या काही संज्ञा उचलल्या. जरी कैलासवासी, वैकुंठवासी या संज्ञामधे स्थानाचा उल्लेख आहे तो केवळ स्थानमहात्म्य म्हणून नाही तर शिवशंकराचे निवास म्हणजे कैलास. मग शिवभक्त कैलासधामात जातात, श्रीविष्णूचे निवास धाम वैकुंठ म्हणून वैष्णव जन वैकुंठात जातात असा समज आहे. थोडक्यात जो ज्या देवतेस भजतो तो तो त्या दैवताच्या जवळ निवास करण्यास जातात. त्या अर्थाने पैगंबरवासी किंवा ख्रिस्तवासी हे स्थानाचे नाव नसून त्यांना भजणारे लोक त्या त्या दैवताच्या / प्रेषिताच्या जवळ जातात असे मानतात.

अजामीळाला वैकुंठात प्रवेश दिला अशी कथा भागवतपुराणामध्ये आहे

हो ही कथा आहे खरी पण तिचा मूळ भावार्थ वेगळा असावा. भागवतात असेही म्हटले आहे की 'अंते या मति सा गति:' म्हणजे अंत:काळी मनुष्याची जशी मती असेल तशी त्याला गती प्राप्त होईल. पण ज्याप्रमाणे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही त्याचप्रमाणे ज्याने आयुष्यभर देवाचे नाव घेतले नाही त्याच्या तोंडात अंतःकाळी ते नाव यायची शक्यता नाही. म्हणूनच चांगली गती प्राप्त करण्यासाठी आयुष्यभर रामनामाचा ( किंवा आपल्या आवडत्या दैवताचा) जप करत रहावा असे धर्मग्रंथ सांगतात.

अजामिळ काय किंवा सत्यवान सावित्री काय, अशा क्वीक ट्रीक करुन देवाला फसवल्याच्या घटना (किंवा देवांनी मानवाला, दैत्यांना फसविल्याच्या घटना) पुराणात खंडीभर सापडतात. हिंदूधर्म एकाच वेळी साधा सरळ वाटतो तितकाच तो सु़क्ष्म विचार करायला लावतो हे पण खरेच.

अतिशहाणा Fri, 06/02/2015 - 23:19

In reply to by धर्मराजमुटके

पैगंबरवासी, ख्रिस्तवासी अशा शब्दांमुळे हे मूळचे कर्मठ धर्म थोडे भारतीय- लोकलाईझ होत असतील तर तसे करुन स्वीकारायलाच पाहिजे. आपणच धार्मिक लोकांना 'तुमच्या पुस्तकात असे नाही' हे सांगून कशाला कट्टर करायचे. माझा एक १ पिढीपूर्वी कन्वर्टेड ख्रिश्चन मित्र आहे. त्याच्या घरी साग्रसंगीत उदबत्ती, दिवा (मेणबत्ती नव्हे तर पणती), हार वगैरे घालून येशूच्या फोटोची प्रार्थना करतात. शेजारी गणपतीचाही फोटो आहेच.

वृन्दा Mon, 09/02/2015 - 19:57

In reply to by धर्मराजमुटके

अजामिळ काय किंवा सत्यवान सावित्री काय, अशा क्वीक ट्रीक करुन देवाला फसवल्याच्या घटना (किंवा देवांनी मानवाला, दैत्यांना फसविल्याच्या घटना) पुराणात खंडीभर सापडतात. हिंदूधर्म एकाच वेळी साधा सरळ वाटतो तितकाच तो सु़क्ष्म विचार करायला लावतो हे पण खरेच.

वा! आवडले.

अरविंद कोल्हटकर Mon, 09/02/2015 - 22:33

In reply to by धर्मराजमुटके

"मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसार भारतात झाला तसा त्यांनी इथल्या काही संज्ञा उचलल्या. जरी कैलासवासी, वैकुंठवासी या संज्ञामधे स्थानाचा उल्लेख आहे तो केवळ स्थानमहात्म्य म्हणून नाही तर शिवशंकराचे निवास म्हणजे कैलास. मग शिवभक्त कैलासधामात जातात, श्रीविष्णूचे निवास धाम वैकुंठ म्हणून वैष्णव जन वैकुंठात जातात असा समज आहे. थोडक्यात जो ज्या देवतेस भजतो तो तो त्या दैवताच्या जवळ निवास करण्यास जातात. त्या अर्थाने पैगंबरवासी किंवा ख्रिस्तवासी हे स्थानाचे नाव नसून त्यांना भजणारे लोक त्या त्या दैवताच्या / प्रेषिताच्या जवळ जातात असे मानतात."

पैगंबरवासी किंवा ख्रिस्तवासी ह्या संज्ञा मुस्लिम वा ख्रिश्चन आपल्या मृत सहधर्मीयांसाठी वापरतात असे तुम्हास सुचवायचे आहे काय? मला असे वाटते की ह्या संज्ञा आपण बिगरमुस्लिम वा ख्रिश्चन अशा हिंदूंनी समान्तर हिंदु संज्ञांवरून (वैकुंठवासी, कैलासवासी) बनविलेल्या आहेत. ह्या अज्ञानजनित संज्ञा आपण हिंदूच मुस्लिम आणि ख्रिश्चनांच्या संदर्भात वापरतो. मुस्लिम वा खिश्चन लोक आपल्या मृत सहधर्मीयांना पैगंबरवासी अथवा ख्रिस्तवासी म्हणत नसावेत असे मला वाटते.

अरेबिक भाषेचे आणि मुस्लिम रिवाजांचे काही ज्ञान नसल्यामुळे त्यांच्या संज्ञा शोधण्यासाठी मी जालाकडे गेलो आणि मला पुढील उतारा येथे सापडला:

"Muslims address dead people with polite expressions which are part of the social and religious sense. These honorifics imply respect to dead people and function as pre-modifiers of the noun such as 'ًغادٌا' (the deceased), ' (the martyr) ' اٌشٙ١ض ' (the blessed) ' اٌّغدَٛ ' ,(the forgiven) ' اٌّغفٛع ٌٗ"

येथे कोठेहि मृतास 'पैगंबरवासी' किंवा काही तत्सम विशेषण लावावे असे सुचविलेले नाही कारण, मी वर लिहिल्याप्रमाणे, मृत मुस्लिम व्यक्ति लगेच पैगंबराजवळ वास करण्यास जातात हे मुस्लिम धर्माला अमान्य आहे.

इंग्रजीमुळे ख्रिश्चन लोक मृतांचा कसा उल्लेख करतात हे आपणास थोडे अधिक ठाऊक आहे. The Late, Departed, Lamented अशा शब्दांपलीकडे ते जातांना दिसत नाहीत. 'ख्रिस्तवासी' अशा अर्थाचा काही इंग्रजी शब्द मला माहीत नाही.

"One short sleep past, we wake eternally
And death shall be no more; Death, thou shalt die."
John Donne from 'Death Be Not Proud'.

गवि Mon, 09/02/2015 - 23:20

In reply to by अरविंद कोल्हटकर

मला असे वाटते की ह्या संज्ञा आपण बिगरमुस्लिम वा ख्रिश्चन अशा हिंदूंनी समान्तर हिंदु संज्ञांवरून (वैकुंठवासी, कैलासवासी) बनविलेल्या आहेत.

:)

राही Mon, 09/02/2015 - 23:09

मुस्लिम मृत व्यक्तीसाठी 'मरहूम' हे संबोधन वापरलेले वाचले/ऐकले आहे.