साजन चले ससुराल........

या घटेनेला आता दिड दोन वर्षं होतं आली. आजतागत हे गुपीत माझ्या बायको आणि मेव्हणी व्यतिरिक्त कुण्या चवथ्या व्यक्तीस माहित नाही. तेव्हा तुम्हाला कळकळीची विनंती आहे की ह्या घटनेची कृपया बाहेर कुठेही वाच्यता करु नका.

मागच्या सुट्टीत एका भल्या पहाटे तांबड फुटायच्या आत अस्मादिकांच विमान मुंबापुरीत येऊन दाखल झाल. संपुर्ण विमान प्रवासात कधी नव्हे ते यावेळी राम नामाचा जप चालू होता. (कर्टसी गवि.) पुर्वी विमानतळावर जाताना वा तिथुन येताना नातेवाईक सहकुटुंब सोडायला/घ्यायला येत. पुढे पुढे माझ येण्या जाण्याच प्रमाण इतकं वाढलं तस रोज मरे त्याला कोण रडे. फक्त बाबा तेवढे घ्यायला आणि सोडायला येत असत. (नातेवाईक न येण्याचं खर कारण म्हणजे मी नंतर नंतर भेटवस्तु आणायची टाळा टाळ करु लागलो. Wink अहो पुर्वी ठिक होतं, आपल्याकडे बाहेरच्या वस्तु आजसारख्या सर्रास मिळत नसत. आता चायनाचा आणि आपल्याकडचाच माल परदेशातुन दुप्प्ट किमतीला आणुन भेट म्हणुन देण्यात काही अर्थ आहे का?) हल्ली हल्ली तर मी बाबांनाही विमानतळावर येऊ देत नाही. उगाच त्यांची झोप मोड करुन विमानतळावर ताटकाळत उभ करण मला पटत नाही. शेवटी विमानतळावरचे सगळे सोपस्कार आटोपून मी एक काळीपीवळी बुक केली. टॅक्सीवाल्या भय्याशी शिळोप्याच्या गफ्फा हाणत घराच्या दिशेने कुच केल. मुंबईच्या वाहतुक कोंडीतुन मजल मारत मारत एकदाचा दहिसरला पोहोचलो.

घरी अर्धांगीनी वाटच पहात होती. लेकीला माझ्या येण्याची कल्पना दिली नव्हती. ती अजुनही साखर झोपेतच होती. हात-पाय धुवून सरळ तिच्या पांघरुणात शिरलो. नेहमी प्रमाणे तिचे पापे घेत साखरझोप मोडु लागलो. डोळे उघडताच क्षणात तिच्या चेहर्‍यावरचे क्रमाक्रमाने बदलत जाणारे वैताग-आश्चर्य-अत्याआनंद आदी भाव टिपुन घ्यायला मला फार आवडतात.
आई बाबा गावालाच होते म्हणुन संध्याकाळ्च्या गाडीनेच गावाल जायचं ठरल होतं. रात्र थोडी नी सोंगं फार अशी अवस्था होती. थोड्या वेळात बरीच काम आटोपायची असल्याने जास्त वेळ न दवडता चहा फराळ करुन घरा बाहेर पडलो. थोडी बँकेतली आणि ईतर कामं आटोपली आणि १०-१०:३० च्या सुमारास सासरी निघायची तयारी केली. संध्याकाळी सासुरवाडीहुनच पुढची गावाला जाणारी गाडी पकडायची होती. एक मोठी सॅक सोडली तर बाकी दुसरं काही सामान नव्हत.
मला रेल्वेचा प्रवास आवडतो. मग कितीही मरणाची गर्दी का असेना. तिकिटं काढुन फलाटावर आलो. गर्दीच्या उलटा प्रवास (दहिसर ते विरार) असला तरी पण ती वेळ ऐन कामाची असल्याने फलाटावर बर्‍यापैकी गर्दी होती. थोड्या वेळात गाडी आली. दसर्‍याला सोनं लुटायला निघावं त्या त्वेशाने लोकं तुटुन पडली. पण आश्चर्य म्हणजे आम्ही जिथे उभे होतो तिथे प्रथम दर्जा नसुनही फारशी गर्दीच नव्हती. थोडं आश्चर्य वाटलं पण ते व्यक्त करत बसण्या इतका वेळ नव्हता हाताशी. काही बाया बापडे त्या डब्यात शिरत होते आम्ही पण शिरलो पटकन. आत जरा नेहमी पेक्षा वेगळीच आसन व्यवस्था होती. मग बायकोची ट्युब पेटली की हा विकलांगांचा डबा आहे. पुढल्या स्थानकात डबा बदलायचा विचार केला होता पण आजु बाजुला नजर टाकली तर अर्ध्याहुन अधिक डबा धडधाकट माणसांनी भरलेला होता. त्यामुळे थोडी भीड चेपली.
दरवाज्यात उभ राहुन हवा खायची जुनी सवय उफाळुन आल्याने बसायला जागा असुनही मी सॅक घेउन दारा जवळच्या जागेत (दारात नव्हे) उभा होतो. भाईंदर स्थानकात गाडी शिरली आणि तितक्यात दोन इसम आत शिरुन सरळ माझ्या जवळ आले. एकान हळुवार माझ्या खांद्यावर हात दिला दुसर्‍यानं मनगट पकडलं आणि अत्यंतीक प्रेमाने म्हणाले "चलिये." म्हटल टिकिट तपासनीस असतील. मी तिकिट दाखवायचा प्रयत्न केला पण ते ऐकेनात. गाडी सुटायला आली होती. लेकी समोर तमाशा नको म्हणुन मी गप गुमान उतरलो आणि बायको लेकीला घेउन गाडी मार्गस्थ झाली. फलाटावर उतरल्यावर त्या दोघा इसमांनी मला एका गणवेशातल्या हवालदाराकडे सोपवलं आणि ते दोघे नवं पाखरू हुडकण्याच्या कामगिरीवर रवाना झाले.
बायको लेकीची तिकीटं माझ्याकडेच होती. त्यामुळे त्या दोघींना परत पुढे कुणी पकडल तर काय? याची काळजी वाटायला लागली. अश्या परिथितीत एखादा सर्वसामान्य माणुस जे करतो तेच करायचं ठरवलं. मामाला हे प्रकरण तिथल्या तिथेच मिटवायची गळ घातली. पण तो पण राजा हरिश्चंद्राची अवलाद निघाला. खर तर त्या अवस्थेतही मला त्याचा आदरच वाटला. मग म्हटल हव तर रितसर पावती फाडा मी दंड भरतो. माझी बायको मुलगी पुढे गेल्या आहेत आणि त्यांची तिकिटं माझ्याकडेच आहेत. पण तो बधला नाही. "सहाब के पास चलो." म्हणत माझी वरात काढत निघाला. मागाहुन कळलं की तो रेसुबवाला (रेल्वे सुरक्षा बल) मामा होता. मग माझी थोडी तंतरली. हे प्रकरण काही साध दिसत नाही. कारण हे लोक कुणाच्या बापाला घाबरत नाहीत. आमची वरात स्थानका बाहेर आली. आजु बाजुचं पब्लीक "साला कपड्यावरुन तर झंटलमन दिसतोय" अश्या नजरेने पहात होते. माझी ही पहिलीच खेप असल्याने निर्ढावल्याचे भाव प्रयत्न करुनही चेहेर्‍यावर आणता येत नव्हते. पुढे काय वाढुन ठेवलय या चिंतेने आतल्या आत गुदमरत होतो. रेल्वेपुलाच्या जिन्या खालच्या पोकळीत लोखंडाचे गज बसवून त्यात काही पाखरं कोंडुन ठेवलीली दिसली. तितक्यात एक दुसर्‍या मामाला त्या छोटेखानी तुरंगाच दार उघडुन एकाला आत ढकलताना पाहिलं. मी त्या प्राण्याकडे भुतदयेने पाहील.
मला मामाने एका खोली बाहेर उभ केलं आणि दुसर्‍याला माझ्यावर लक्ष ठेवायला सांगुन स्वतः आत गायब झाला. पाच मिनिटाने तो बाहेत आला. मला म्ह्णाला 'चलो'. मी मी मुकाट त्याच्या मागे चालु लागलो. आता माझ्याकडे भुतदयेने पहाण्याची इतरांची पाळी होती. मला त्या जिन्या खालच्या कुबट जागेत कोंडून मामा पसार झाला.

तिकडे बायकोला मला कुणी आणि का पकडलय त्याचा काहीच अंदाज लगेना. ती बिचारी घाबरी घुबरी झाली होती. नजाणो लग्ना आधीच मी केलीली लफडी आता उफाळुन वर आली असावीत असाही एक विचार चाटुन गेला असेल. लेकीची फरफट नको म्हणुन तिला माहेरी सोडुन यावं की आधी नवर्‍याच काय झालय ते पहाव ते तिला क्षण भर सुचेना.

ईथे मी माझ्या परीने त्या मामाला, साहेबाशी निदान दोन शब्द बोलायची परवानगी तरी द्या म्हणुन नाना परीने विनवण्या केल्या. साहेब बाहे गेलेत आणि अर्ध्या तासाने येतील अस कळल. आता सरकारी अर्धा तास म्हणजे दिड दोन तासांना मरण नाही. आजु बाजुला नजर फिरवली. बरीच कळकट्ट मळकट्ट अवतारातले गर्दुल्ले मंडळी दिसत होती. काही वेठबिगार दिसत होते. माझ्या सारखा झंटलमन कुणीच दिसेना. एका दोघांनी विचारणा केली 'क्या रे? क्या किया?' म्हटलं चुकुन अपंगाच्या डब्यात शिरलो होतो. 'बांस इतनाईच. फिर इतना डरता कायकु? शाम को कोरट मे लेके जायेंगे. उधर बेल होजायेगी. फिकर मत करो. बस घरसे किसीको बुलवालो.' माझ्या एका सेलमेट वकिलाने विना मोबदला सल्ला कम धिर दिला. आयला आता आलीका पंचाईत. हे कोर्ट प्रकरण वगैरे माझ्यासाठी नवीनच होतं. 'शहाण्याने कोर्टाची पायरी चढु नये' या ऐकिव सल्ल्याला जागुन आजतागत कधी कोर्टाच तोंड पाहिलं नव्हत. (हा मागे एकदा एका मित्राला मदत म्हणुन पळुन जाउन कोर्टात लग्न करायला मदत केली होती, पण ते वायलं.) परत वर जामिन म्हणुन कुणाला बोलवावे? हाही प्रश्न होताच. बायको-लेकी समोर फरफट होऊ नये अस मनापासुन वाटत होतं. बाबा तर गावाला होते. सासरेबुवा !!! बापरे नकोच. साला सासरी इज्जत नाय गेली पाहिजे. बर माझ्याकडे भारतातला भ्रमणध्वनीही नव्हता, की जेणे करुन मामाला (माझा सख्खा मामा) बोलवता येईल. त्यात आठवड्यातला मधलाच वार असल्याने लगेच कुणाची मदत मिळेल का ही शंका होतीच.
शेवटी माझ्याकडे असलेल्या मोबाईलवरुन बायकोला आंतरराट्रिय कॉल लावला. माझी रवानगी भाइंदरच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या कोठडीत झाल्याच कसबस कळवलं आणि तितक्यात माझ्या भ्रमणध्वनीने मान टाकली. बोलण अर्धवटच राहिल. माझा परत फोन न आल्याने बायको अधिकच काळजीत पडली. तिने फोन लावायचा प्रयन केला पण माझा भ्रमणध्वनी बंद असल्याचा संदेश मिळाला.
इथे माझी पंचाईत अशी झाली होती की चुकुन सॅक तपासली तर काय करायच? माझ्या सॅकमध्ये (सप्रेम भेट म्हणून द्यायला आणलेल्या) ३ बाटल्या होत्या. त्यांची ही येवढी काळजी नव्हती म्हणा. पण माझ्याकडे थोडी वाजवी पेक्षा जास्त रक्कम होती. (स्वतःच्या घामाचा पण नडीमुळे काळा झालेला पैका होता.) जर तपासात ती रक्कम हाती लागली तर मग माझं काही खरं नाही. एक साहेबवजा दिसणारा माणुस कोठडीच्या बाहेर उभा होता. त्याला परत विनवणी केली. बहुतेक माझा अवतार पाहुन त्याला दया आली असावी. त्याने बाहेर काढले. माझं म्हणण ऐकुन घेतल. चिंता करु नका आता अडिचच्या लोकलने तुम्हाला वसईला कोर्टात घेउन जाऊ. तिकडे तुमचा निकाल लागेलच. अस म्हणुन माझी विकेट काढली... बाबौ डायरेक्ट निकाल???

इतक्यात तो मोठा साहेब आला. त्याला परत माझी हरीकथा ऐकवली. म्हटलं आजच सकाळी बाहेर गावाहुन आलो. आणि दुपारच्या गाडीने गावाला चाललोय. गडबडीत चुकुन अपंगांच्या डब्यात शिरलो.
गावच्या गाडीच रिझर्वेशन वैगरे आधिच झालय. काही दंड वगैरे असेल तर तो मी आत्ता इथे भरायला तयार आहे. मला सोडा. गाडी चुकेल. पण साहेबही कच्चा गुरुचा चेला नव्हता. त्याने गावाच नाव आणि रिझर्वेशन दाखवायला सांगीतल. गावाच नाव सांगायच मी खुबीनं टाळलं. (तिकडेच पितळ उघडं पडलं असत) माताय आता आली का थाप अंगाशी. पण एकदा खोटं बोललो की मग त्यातुन सुटका नाही. मी परत थाप मारली की, मला पकडलं त्याच ट्रेनने बायको पुढे गेली आहे. तिकिटं तिच्याकडे आहेत. पण साहेब काही बधला नाही. माझी रवानगी पुन्हा कोठडीत झाली.

येव्हाना तिथे अजुन काही नविन मेंबरांची भर झाली होती. त्यातले दोघं माझ्या सारखे बावरलेले झंटलमन दिसत होते. त्यांनी माझ्याकडे संवाद साधला 'भाईसाब, मै तो सिर्फ पटरी पार कर रहा था. तो ईन्होने धर दबोचा. अब आगे क्या होगा? ये लोग क्या करंगे?' म्हटलं "बेट्या कुठ वशिला-बशिला असेल तर तो आजमावयाची हीच संधी आहे. नाही तर मग जमानतीची सोय करुन घे." येव्हाना निगरगट्ट झालेलो मी माझी सॅक उराशी कवटाळुन गजां पल्याडची सृष्टी निहाळु लागलो. 'चल उडजा रे पंछी..' 'आकाशी झेप घे रे पाखरा...' ही आणि अशीच गाणी नकळत ओठांवर यायला लागली.

फलाटावरच्या चेहेर्‍यांत मला माझे आई, बाबा आणि इतर आप्तस्वकिय दिसु लागले. एक तर चक्क माझ्या बायकोसारखीच दिसत होती. म्हणुन टक लावून पाहिल तर ती बायकोच निघाली. सोबत लेकही होती. (शेवटी बायकोची नवर्‍यावरची माया दिसुन आली. ;)) बायकोची भिरभिरती नजर माझा शोध घेत होती. माझ्या नशिबान लेकीच माझ्याकडे लक्ष गेल नाही. माझ्या अश्या अवस्थेत तिन मला पाहु नये अस वाटत होत. Sad
बायकोने भाईंदरला येई पर्यंत काही ओळखी पाळखी काढत फोना फोनी केली होती. एक बोरिवलीचे ओळखीचे स्टेशन मास्तर निघाले. पण बेट्यानं नेमका त्या दिवसाचाच मुहुर्तसाधुन रजा टाकली होती. फोनही लागत नव्हता. पोलिस मामाला विनवणी करुन सॅक बायकोकडे देण्याची सोय केली. सॅक तिच्या हाती जाताच म्हटलं की तु आता घरी जा लेकीला आणि सॅक घरी ठेव आणि मग वसईला कोर्टात ये. पण बायको काही इतक्यात हार मानायला तयार नव्हती. म्हटल अगं दंड वैगरे भरू पण ही जोखिम जवळ नको. उगा प्रकरण वाढलं तर मग सगळी सुट्टी चक्की पिसण्यात जायची. बायकोने मदतीला तिच्या सख्ख्या बहिणीला बोलवूण घेतलं होतं. तिच ऑफिस जवळच असल्याने ती आली होती. तीनही इथुन तिथुन ओळखी काढायला सुरवात केली. दोघींची फोना फोनी चालुच होती.
बहुतेक साहेबांना दोन चार फोन पोहोचले असावेत. त्यांनी माझं गाठोडं कोठडीतुन बाहेर काढलं. पण अजुन सुटके बद्दल कसलीच शाश्वती नव्हती. तितक्यात मामाने एक एक करुन कोठडीतल्या सगळ्यांना बाहेर काढुन कसल्याश्या अर्जावर त्यांच नाव, गाव-पत्ता इत्यादी नोंदी भरायला सुरवात केली. मी रांगेतल्या माझ्या मागच्या सगळ्यांना कधी नव्हे ते उदार मनाने पुढे जायची संधी देत होतो. पण शेवटी रांग संपलीच. माझा नंबर आला. सरकार दफ्तरी माझ्या नावाची नोंद होऊ नये म्हनून मी चालवलेली टाळा टाळ काही टळेना. शेवटचा प्रयत्न म्हणुन एकदा परत मोठ्या साहेबांना भेटायला त्यांच्या खोलीत शिरलो. तितक्यात साहेबाचा भ्रमणध्वनी खणाणला. त्याने संभाषणा दाखल केवळ चार पाच हुंकार भरले. मामाला हाक मारुन मला परत बाहेरच्या बाकड्यावर नेऊन बसवायला सांगीतल. येव्हाना लेकीलाही काही तरी बिनसलय हे समजल, तिन मला मिठी मारुन आधी मुसमुसुन आणि नंतर मोठ्ठ्यान गळा काढला. साहेबही दचकून काय झाल म्हणुन बघायला बाहेर आला. मामा करवी निरोप धाडला की अजुन फक्त थोडा वेळ बसावं लागेल. बाकीच्यांची 'नावळ' निघणार आहे. सर्वांच्या समक्ष सोडता येणार नाही. थोडी कळ सोसा.

सगळी मंडळी निघुन गेल्यावर साहेबांनी अस्मादिकांची पेश्शल शाळा घेतली. पुन्हा असली घोडचुक करणार नाही असं माउलीच्या रेड्यावाणी माझ्या कडुन दहा दहा वेळा वदवून घेतलं. आणि (माझ्या खर्‍या सासुरवाडीला जायला) मी सुटलो.

field_vote: 
3.4
Your rating: None Average: 3.4 (5 votes)

प्रतिक्रिया

हसून हसून खल्लास! काय एकेक वाक्य पेरली आहेस, भाजीवरच्या कोंथिंबीरीसारखी! त्यातली इथे थोडी चिकटवायची तर अर्धा लेख डकवावा लागेल. पण हे सगळ्यात जास्त आवडलं:

एक तर चक्क माझ्या बायकोसारखीच दिसत होती. म्हणुन टक लावून पाहिल तर ती बायकोच निघाली

तरीही गणपाचा निषेध. दोन वर्षांतून एकदा लिहीतो म्हणून!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खुसखुशीत लेख. एक तर चक्क माझ्या बायकोसारखी दिसत होती वगैरे वाक्यं भारीच. कपड्यांवरून तर झंटलमन दिसतोय हे सांगून चेहऱ्यावरून कसा वाटतो हे सांगायचं खुबीने टाळलेलं आहे Smile

गजांच्या पलिकडे जाताजाता अलिकडेच राहिलात हे वाचून बरं वाटलं. चला, नाहीतर मराठी आंतरजाल छान लेखांना काही महिने मुकला असता.

कुठच्यातरी लय फेमस गावरूपी संकुलात प्रापर्टी खरेदी केली हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न लक्षात आला हो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख खुसखुशीत झाला आहे, पण अशा वेळी काय तंतरते त्याचीही चुणूक दिसते यातून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता सुखरुप सुटलात म्हणून हसतोय नाहीतर सहानुभुती दाखवावी लागली असती. Wink

मागे एकदा मी असाच चुकुन पकडला गेलो होतो ते आठवलं. नेहमी नगरहुन पुण्याला आल्यावर मी (रेल्वे)स्टेशनपाशी उतरायचो, तिथून पुढची बस सोयीस्कर पडायची म्हणून. पण नगरच्या बसा स्टेशनला आत जात नाहीत, मागे थांबून तुम्हाला उतरता येतं. रेल्वेवरचा पुल ओलांडून पलीकडे गेलं की स्टेशन. असंच एकदा पुलावरून उतरत होतो तर टीसीने पकडला. ती नेमकी झेलमची का काय तरी वेळ होती. तो सगळ्यांचीच तिकिटं तपासत होता. मी त्याला म्हणलं अरे बाबा मी एस. टी. नं आलो, ही पहा तिकिटं. मी फक्त पुल ओलांडतोय तर कसलं काय! दिल्ली पासूनचं तिकिट दंड पडेल म्हणाला. एरवी विनातिकिट आम्हीही प्रवास केला आहे हो, पण च्यायला न केलेल्या प्रवासाचा दंड म्हणजे फारच झालं! पैसे नाहीएतचा जप सुरु ठेवला. दोन तीन तास तिथल्या बाकड्यावर बसवलं. पण इथं काही मिळणार नाही असं कळल्यावर मात्र सोडून दिलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

ती नेमकी झेलमची का काय तरी वेळ होती.

झेलमची वेळ???

झेलम चोवीस तासांत कधीही येते/सुटते, असा एके काळचा अनुभव होता.

अलीकडे परिस्थिती सुधारली आहे काय?

दिल्ली पासूनचं तिकिट दंड पडेल म्हणाला.

जम्मूपासूनचे नाही म्हणाला, नशीब.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झेलम चोवीस तासांत कधीही येते/सुटते, असा एके काळचा अनुभव होता.

आम्ही फारतर कोयनेनं प्रवास करणारी लोकं, आम्हाला त्या झेलमचं काय माहित हो? पण झेलम यायला अन बकरा सापडायला... असं त्या टीसीला वाटलं असेल!

जम्मूपासूनचे नाही म्हणाला, नशीब.

म्हणलाही असेल ब्वॉ. ज्याला दंड द्यायचाच नाही तो कशाला तपशील लक्षात ठेवेल? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

लेख पूर्ण आवडला.
लेकीला माझ्या येण्याची कल्पना दिली नव्हती. ती अजुनही साखर झोपेतच होती. हात-पाय धुवून सरळ तिच्या पांघरुणात शिरलो. नेहमी प्रमाणे तिचे पापे घेत साखरझोप मोडु लागलो.
गल्ली चुकला की हो गणपाभौ. पहाटेची वेळ, आई-बाबा गावाला, कुठल्या पांघरुणात शिरावे हे आम्ही तुम्हांस सांगावे काय? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

कथनाची शैली आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खुसखुशीत लेख. अतिशय आवडला. असेच आणखी येऊ देत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हा हा हा...
चटपटीत वाक्ये, ताज्या कल्पना, चव बिघडणार नाही इतपत दर्जेदार विनोद... वा वा वा गणपाची ही रेशिपीही फक्लास जमलीये!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मस्त

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे, गणपा भौ तुम्ही आजवर निव्वळ बल्लवगिरीवरच आम्हाला का बरं टोलवत राहिलात ? पेनगिरी पण उत्कृष्ट करता की राव !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0