द अंडरटेकर!

बास! शिर्षक वाचल्यावरच अनेकांचा थरकाप उडेल. अनेकांना आश्चर्य वाटेल. अनेकांना उत्साह वाटेल. आणि अनेकांना विचित्रही वाटेल. मात्र 'कोण हा अंडरटेकर?' असा प्रश्न कुणालाच पडणार नाही. रेसलींग या नावानं प्रसिद्ध असलेली कुस्ती तुम्हाला आवडत असेल अथवा नसेल, आणि डब्ल्य़ुडब्ल्य़ुएफ (किंवा आता डब्ल्य़ुडब्ल्य़ुई) अनेक वर्षांपासुन पाहिले असेल अथवा नसेल; परंतु 'अंडरटेकर' हे नाव आणि हे व्यक्तीमत्त्व याबद्दल काहिच कल्पना नाही; असा माणुस सापडणे विरळाच! आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्रालाच आपल्या नावानं ओळखलं जाण्याचं सौभाग्य एखाद्याच सचिन तेंडुलकरला मिळतं आणि एखाद्याच अंडरटेकरला!

मार्क विल्यम कॉलॉवे. हे नाव फारसं कुणाला माहिती असण्याचं काही कारण नाही. १९९० मध्ये, वयाच्या साडेचोविसाव्या वर्षी डब्ल्य़ुडब्ल्य़ुएफ रेसलींगच्या रिंगमध्ये 'द अंडरटेकर' या नावाने पाय ठेवल्यापासुन मार्क कॉलॉवेनं जगाला सगळंकाही विसरायला लावलंय, अगदी स्वतःचं खरंखुरं नावही. रेसलींग न बघणा-यांसाठी तो एक 'भयावह पहेलवान' आहे. फॅन्ससाठी तो सर्वात मोठा 'ईंटरटेनर' आहे, आणि व्यावसायिक रेसलींगच्या क्षेत्रात आज 'द अंडरटेकर' हे दैवत आहे. जगभर 'व्यावसायिक रेसलींग' जाणणा-या आणि ना जाणणा-या आबालवृद्धांकरिता या क्षेत्राचा शुभंकर बनलेल्या 'अंडरटेकर' ने कालच (२४ मार्च) आपला छेचाळीसावा वाढदिवस साजरा केला.
खरं म्हणजे अंडरटेकरचा 'बि-लेटेड' हॅपी बर्थडे हा एप्रिल महिन्याच्या पहिल्या रवीवारी होणा-या डब्ल्य़ुडब्ल्य़ुईच्या वर्षातल्या सगळ्यात मोठ्या 'रसलमेनिया' नावाच्या स्पर्धेमध्ये दरवर्षी आपोआपच साजरा होत असतो. कारण गेल्या एकोणविस वर्षापासुन या स्पर्धेत अंडरटेकरने पराजय पाहिलेला नाही. या वर्षीच्या रसलमेनियामध्ये जेव्हा स्टेडिअम अंधारात बुडून जाईल, दूरवरच्या स्मशानातलं मोठठं घड्याळ एकामागुन एक बारा ठोके देइल, गुढ निळसर प्रकाशकिरणांनी आसमंत भारला जाईल, आणि पांढ-या धूराच्या लोटांमधून काळे कपडे घातलेला सहा फुट दहा ईंचाचा, एकशे छत्तीस किलोचा 'द अंडरटेकर' धिम्या गतीने एक एक पाऊल टाकत रिंगमध्ये पदार्पण करेल तेव्हा त्याच्या खांद्यावर स्मशानातल्या हाडं गारठवीणा-या थंडीपासुन बचाव करणारा काळा कोटच नव्हे, तर आपल्या विजयामालीकेमध्ये आणखी एका वर्षाची बेरीज करून २०-० असा स्वतःचाच विश्वविक्रम करण्याची महाजबाबदारीही असेल. त्याचा खेळ आणि त्याचा विजय पाहू ईच्छीणा-या जगभरातील कोट्यावधी चाहत्यांच्या अपेक्षांचं ओझंही असेल. आणि त्याच्या खेळावर कोट्यावधी डॉलर्सची गुंतवणुक केलेल्या व्यावसायिक रेसलींग जगताच्या आर्थीक उलाढालीचा सगळा खेळही असेल. 'द अंडरटेकर' अर्थात मार्क कॉलोवे गेल्या पंचवीस वर्षांपासुन हा सगळा 'खेळ' समर्थपणे खेळतोय.

मात्र पंचविस वर्षापुर्वी मार्कला हा खेळ मुळीच खेळायचा नव्हता. अमेरिकेल्या प्रत्येक उंचपु-या आणि धिप्पाड मुलाचं जे एकमेव स्वप्न असतं तेच त्याचंही होतं - बास्केटबॉल! ह्युस्टन (टेक्सास) मधल्या कॅथरीन आणि फ्रॅंक कॉलॉवे या उच्च मध्यमवर्गीय दाम्पत्याच्या पाच मुलांपैकी मार्क हे शेंडेफळ. बास्केटबॉलचं जीतकं वेड तीतकंच कौशल्यही भारीच. ल्युफकिनमधील सन्मानाच्या ऍजेलीना कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला तोच मुळी बास्केटबॉलच्या शिष्यवृत्तीच्या भरवश्यावर! मात्र नियतिच्या मनात वेगळंच काही होतं. कॉलेजमध्ये एक एक पराक्रम करणा-या मार्कचा मैदानातच भयंकर अपघात झाला. टोंगळा असा काही दुखावला, की मैदानातून बाहेरच जावं लागलं. पुढची अनेक वर्षे या दुखापतीतून सुटका होणार नव्हती. मग दूसरं काहीतरी करायचं ठरलं.

त्या वेळी रॉड्रीक मॅकमॅहॉन यांनी अमेरीकेत सुरू केलेल्या व्यावसायिक रेसलिंगचं चांगलंच पेव फुटलेलं होतं. बॉक्सींग, मिक्स्ड मार्शल आर्ट, आणि बेबंद मारामारी या सगळ्यांचा संगम असलेली ही विचित्र स्पर्धा. त्यातही ग्लॅमर, अभिनय, माईंड गेम ईत्यादी यायला हवं अशी व्यवस्था केलेली. आपल्या नावाने लढता यायचं नाही. कुठलंतरी पात्र रंगवा. त्या पात्राच्या रूपाने लढाई करा. त्याला जींकवा, त्याला हरवा, असा हा खेळ. एकोणीस वर्षाच्या मार्कने या क्षेत्रात पाउल ठेवलं. अनेक नावं आणि अनेक पात्रं रंगवली. काही लढती जिंकल्यादेखील. व्यावसायिक रेसलींगचे सामने घेणा-या अनेक कंपन्या त्याने बदलवल्या.

१९८०-९० चा तो काळ होता. 'डब्ल्युडब्ल्युएफ' या सगळ्यात मोठ्या कंपनीशी पहिला करार झाला. व्हिन्सेन्ट मॅकमॅहॉन त्या वेळला आपल्या वडिलांची कंपनी सांभाळत होता (आजही सांभाळतो आहे.) त्याच्या सुपिक डोक्यातून उंचपु-या मार्कसाठी एका पात्राचा जन्म झाला. आजवर असं पात्र रेसलींगच्या रिंगमध्ये आलंच नव्हतं. जुन्या काळातील ख्रिश्चन स्मशानभुमीमध्ये राहणारा, तीथली कबर खोदण्यापासुन सगळी व्यवस्था पाहणारा म्हणजे अंडरटेकर! मुळात कल्पनाच भयावह. थेट स्मशानातून, ते रहस्य, ते गुढ, आणि त्या कपड्यांसह आलेला, तांत्रीक, अघोरी शक्तींनी परिपुर्ण असा अंडरटेकर! रिंगमध्ये पहिली एन्ट्री घेतल्या दिवसापासुन ते आजतागायत 'द अंडरटेकर' ची हीच ओळख कायम आहे. त्याच्या अनेक दंतकथा बनल्या. तो मरून परत आलाय. त्याला जीवंत गाडलं तरीही तो परतला. त्याला जाळल्यावरही तो जीवंत राहिला. तो अचानक प्रगट होतो. अचानक गायब होतो. आणि ईतरही अनेक! अर्थात हे सगळं लोकांनी रेसलींग पहावं म्हणुन विणलेलं जाळं. अगदी त्याचं मुळही 'ह्युस्टन' नसुन 'डेथ व्हॅली' असल्याचं सांगुन, त्याच्या शेवटच्या वाराला 'लास्ट राईड' आणि 'टॉम्बस्टोन' अशी नावं देऊन, त्याच्या व्यक्तीमत्त्वाभोवतीचं मृत्युचं मळभ आणखीच दाट करण्यात आलं.

मार्क कॉलॉवे मात्र त्यात चपखल बसला. विस वर्षांच्या वाटचालीत सगळ्याच चॅंम्पियनशिप्सचे बेल्टस त्याने आपल्या कंबरेभोवती गुंडाळले, जवळपास सर्व मोठमोठ्या लढवैय्यांना धूळ चारली. अगदी आपल्या भारतातून तीकडे गेलेल्या महाकाय ग्रेट खलीलाही हरवलं. या सर्व चॅम्पीअनशिप्सपेक्षा 'द अंडरटेकर' हे नाव केव्हाच वरच्या पातळीवर पोचलं. तो त्याच्या खेळाचा राजदूत बनला.

मात्र या भितीदायक पात्राचा कधीकधी कंटाळाही येऊच नये का? तसा तो मार्कलाही आला. खासकरून दोन गोंडस मुलींचा बाप झाल्यावर असले डोळे पांढरे करणे, भुताचे खेळ करणे त्याला नकोसे वाटू लागले. म्हणुन मग त्याने अमेरिकन बॅड ऍस नावाचं एक पात्र जगायला सुरूवात केली. मोटरसायल चालवण्याची त्याला भारी आवड. मोटरसायलचं एक मोठं कलेक्शनच त्याच्याकडे आहे. त्यातूनच एक गाडी काढून थेट गाडीवर बसुनच त्याने रिंगमध्ये जाणं सुरू केलं.

मात्र जुन्या अंडरटेकरची आठवण कुणालाच पुसता आली नाही. २००४ मध्ये आपल्या जुन्या रूपात त्यानं पुनरागमन केलं. त्यानंतर आजपर्यंत 'डेडमॅन' रेसलींग जगतावर राज्य करतो आहे. रेसलींगच्या चाहत्या तरूण वर्गासाठी 'अंडरटेकर' म्हणजे स्फुर्ती, शक्तीचं स्थान आहे. अमेरिकेच्या स्थलसैन्यामधील सैनिकांना प्रोत्साहन म्हणुन त्यांच्याबरोबर थेट छावणीत जाऊन राहणारा; महाविद्यांलयांमध्ये जाऊन बास्केटबॉलचे धडे देणारा, आणि रेसलींगच्या रिंगच्या बाहेर आल्यावर वाचन, सिनेमा, बॉक्सींग, रेसिंग ईत्यादींची आवड बाळगणारा, अतीशय नर्मविनोदी आणि हसतमुख व्यक्तीमत्त्वाचा अमेरिकन मध्यमवयिन माणूस ही मार्क कॉलॉवेची खरी रूपं आहेत. रेसलींगव्यतीरिक्त स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीचा त्याचा व्यवसायही आहे. अर्थात भागीदारीमध्ये. कारण सेलीब्रिटी असल्यामुळे मार्क स्वतः डिल फिक्स करायला जाऊ शकत नाही. मात्र मागे एकदा एंजेलीना जॉली आणि ब्रॅड पिट यांना एक अपार्टमेन्ट विकलं, तेव्हा तो स्वतः कागदपत्रं घेऊन गेल्याचं अमेरिकेल्या नियतकालिकांनी प्रकाशीत केलं होतं.

शरीर साथ देतंय तोवर रेसलींग रिंगची मजा आहे, हे मार्कला ठाऊक आहे. त्यामुळेच त्याचा फिटनेस कमालीचा आहे. आजही दिवसातले सहा तास तो जीममध्ये असतो. ज्या वयात अनेकजण या जीवघेण्या खेळातून निवृत्ती पत्करून समालोचक किंवा मॅनॅजर होतात, त्या वयात तो त्याच्या करिअरच्या सर्वात देदिप्यमान शिखरावर पोचलेला आहे. कदाचित येत्या रवीवारी २०-० चा विश्वविक्रम काबीज करून तो शतकांची शंभरी पुर्ण करणा-या सचिनसारखा 'आभाळाएवढा'ही होउन बसेल.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अंडरटेकरची तेंडुलकरशी ( सचिनशी नव्हे, सच्याशी तर नव्हेच नव्हे!) केलेली तुलना वाचून हसू आले. डब्ल्य़ुडब्ल्य़ुएफ, रोलर कोस्टर ही मनोरुग्णांची मनोरंजनाची साधने आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

आपापली मतं आहेत! सगळ्यांचं स्वागतच आहे. सचिन आपल्या क्षेत्रातला देव आहे. अंडरटेकर त्याच्या क्षेत्रातला. निकाल ठरवलेले असोत, किंवा कुणी किती मार खायचा हे देखील ठरवलेलं असो, पण ती त्या खेळाची नियमावली आहे. या सर्वांमध्ये चपखल बसत अंडरटेकर गेल्या २० वर्षापासुन खेळतो आहे. राज्य करतो आहे. म्हणुन ही तुलना. बाकी काहीही नाही!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डब्ल्य़ुडब्ल्य़ुएफ, रोलर कोस्टर ही मनोरुग्णांची मनोरंजनाची साधने आहेत

आम्हाला दिलेल्या पदव्यांबद्दल आभार! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उत्तम परिचय. असली कित्येक आडदांड माणसे वैयक्तिक आयुष्यात सरळ साधी(कित्येक नम्र्,हसतमुखही) असू शकतात हेच कुणाला पटत नाही. त्यांनी घेतलेल्या मेहनतीचं, रंगवलेल्या पात्राचं कौतुक वाटत. पण..........
पण मुळात तेलुगु सुपरस्टार महेशबाबू,शक्तीमान व डब्लू डब्ल्यू एफ(विशेषतः अंडरटेकर) असल्या खेळांचे बहुतांश चाहते काहीसे विचित्र(बर्‍याचदा अर्धवट डोक्याचे,खुनशी,माथेफिरु, रामन राघवनची मानसिक औलाद) असेच का असतात कुणास ठाउक.
शक्तीमानची लोकप्रियता शिगेला होती तेव्हा चांगले १४-१५ टोणगेसुद्धा स्वतःला जाळून घेत, "शक्तिमान" वाचवायला येइल ह्या भरवशाने!
इकडे ह्या फ्रीस्टाइल कुस्तीवाल्यांचे तर काय कवतिक सांगावे? स्वतःचा मुळात जीव सशाहूनही लहान असला तरी "वन्ना किल यू मॅsssन",
"इट्स डेस्ट्रक्टिव", "आय एम गोन्ना फ** हिज अ‍ॅ*" हे असलं काहिसं बडबडत, नक्कल करीत वय वर्ष पाच ते एकोणीस असं कुणीही कॉलनीत दिसायचं, आणि वर पोरगं इंग्लिश बोलतय म्हणून नवश्रीमंत पालकांना झुरळाला घाबरून चड्डित मुतणार्‍या खुनशी पोराचं आणि नव्वदच्या दशकात नवीनच घेतलेल्या रंगीत टीव्हीचं कृत कृत्य वाटायचं; ते आठवलं.
उन्हाळ्याच्या सुट्टीत ही कार्टी कधी मैदानात खेळली नाहित, पोहायलाही गेली नाहित, काही वाचले असायची शक्यताच सोडा.
मग ह्या सगळ्यात त्या कुस्तीवीरांचा काय दोष? असा स्वाभाविक प्रश्न येतो. त्याचे थेट उत्तर टाळतोय.
पण हा प्रकार सरळ सरळ काही लोकांची हिंस्त्र्पणाची मानसिक गरज पूर्ण करणारा असा काहिसा आहे; थोडक्यात ही मंडळी स्वेच्छेने आधुनिक रोमन राज्यातील "ग्लॅडिएटर्स" बनलीत.
सदर कार्यक्रमात कित्येकदा उडणार्‍या रक्ताच्या चिळकांड्या* बघून कुणाला चिंता वाटत नसेल (किंवा आनंद होत असेल) तर खरच चिंतेचा विषय आहे.
ह्या प्रकाराच्या आहारी गेलेल्यांचे रोल मॉडेल असलेच रॉक, ट्रिपल एच, हल्क हॉगन,स्टोन कोल्ड स्टीव ऑस्टिन असतात. पण ते त्यांच्या मजबूत बांध्याचा आदर्श ठेवण्यापेक्षा दाखवल्या जाणार्‍या हिंस्त्रपणाचाच ठेवतात. अशा नगासमोर चुकून एकदा जुन्या काही आवडत्या चित्रपटांबद्दल बोलत असताना "तेव्हाच्या हिरोंना अ‍ॅब्स नव्हते. भुक्कड साले.आता बघ साला इम्रान(हाश्मी)चेही कसले लुक्स आहेत. नाय तर तुझे मरतुकडे अमिताभ अन् दिलीप." असली कमेंट मिळून आमचे थोबाड बंद झाले. पुढे पु ल, बाबा आमटे ही नावे आमच्या कॉलनीतील माकडांना आधी ठाउकही नव्हती.(नंतर "अ‍ॅप्टी" आणि "इंटरव्यू" साठी तोंडी लावण्यापुर॑ती पाठ झाली.)

संपूर्ण प्रतिसाद असंबद्ध वाटतोय? हो नक्कीच. पूर्णतः ताळतंत्र सोडलेल्या पब्लिकमध्ये दोनेक दशके काढल्याने माझेही टाळके अर्धाअधिक वेळ सटकलेलेच असते. उगीच सुसंबद्धता शोधत बसू नये.

*उदाहरणे शेकडो आहेत; गाजलेली उदाहरणे:- ब्रॉक ने मिस्टर अमेरिका बनून आलेल्या हल्क हॉगनला मरेस्तोवर बदडल्याचे दाखवले, शेवटी त्याला रक्ताची उलटी होताना पब्लिक "किल हिम" असे फलक दाखवत जल्लोष करत होती.
मिक फॉली ऊर्फ कॅक्टस जॅक ह्याला ट्रिपल एच ने फोडला,हाणला तो असा काही की पूर्ण चेहरा फुटला. पब्लिक आनंदाने बेहोष होत टाळ्या पिटतानाही दिसली. हे सर्व तुम्हाला चालत असेल तर मात्र कशातच काहिच चूक नाही हे मान्य आहे; पूर्ण प्रतिसाद मागे घ्यायला तयार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

थोडक्यात ही मंडळी स्वेच्छेने आधुनिक रोमन राज्यातील "ग्लॅडिएटर्स" बनलीत.

सचिन तेंडुलकरलाही राजू परुळेकरने ही पदवी दिलेली आहे हे आठवले.
बाकी सगळ्या प्रतिसादाशी नसलो तरी त्यातल्या भावनेशी सहमत आहे. ही असली कार्डे घरी आणल्यावरून धाकट्या भावाशी अनेकदा खटके उडलेले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्ताच IPL ची कुठल्याशा चॅनलवर जाहिरात पहात होतो, त्यात खरोखरिच IPL स्टार्सना (गौरवाने) ग्लॅडिएटर म्हटलय.
बाकी परुळेकरचा तो लेख शोधला, त्यातले वाद प्रतिसादही पाहिलेत. परुळेकर सारख्या दिग्गज्,थोर, सदैव शुद्धीवर असणार्‍या माणसाबद्दल अधिक काय लिहिणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आमच्या शालेय जीवनापासून 'अंडरटेकर' या नावाचं गारूड कायम आहे. त्याचे स्टीकर्स, कार्डे जमवणे, ट्रम कार्ड मधे त्याने जिंकवणे वगैरे अनेक गोष्टी रुंजी घालतात!
गेले अनेक वर्षांत हा खेळ बघितला नसला तरी अंडरटेकर अजूनही खेळतो हे वाचून गंमत+आश्चर्य वाटलं.
त्याच्या फिटनेसला मानायला हवं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ह्या सगळ्याशी संबंध बंधूराजामुळे आला
"काय रे हे" अस विचारताच श्या तुला एवढही माहीत नाही असे लुक्स दिले गेले
त्यामुळे शक्य तेवढे भाग पाहिले
बाकी या कुस्तीकम नाटकामुळे चांगल मनोरंजन होत
जाँनसिना डेडमँन अंडरटेकर अशा काही व्यक्ती या जगात आहेत हे समजलं
यांची कार्डेही असतात म्हणे
मुलांमधे जोरात एक्सचेँज चालतं
मला तर एकाने बर्थडे गिफ्ट म्हणून हेच दे सांगितल

बाकी तेँडुलकरशी केलेली तुलना पाहून भरुन आलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

इसवीसन २००२ पासून मी डब्ल्यू डब्ल्यू ई चा पंखा आहे. नावातील 'एफ' त्यांना सोडावा लागला कारण वर्ल्ड वाईड फंड ने केस केली होती.

या कार्यक्रमावरानेक प्रौढ व परिपक्व लोक टीका करताना अथवा त्याची थट्टा करताना दिसतात. थांबा. सर्वांनाच माहीत आहे की तो एक स्टेज्ड, एक स्क्रिप्टेड शो आहे. Smile अगदी लहान मुलांनाही माहीत असते. खरे तर मॅचेसचा रिझल्ट काय लागावा हेही अनेकदा ट्विटरचा कल वाचून ठरवले जाते.

यात ग्लॅमर आहे आणि हा एक लहान मुलांचा शो आहे असे बोलून दूर होणे का योग्य होणार नाही याची काही गंभीर कारणे आहेत व ती मी खाली देत आहे.

===========================

सर्व मारामार्‍या व फटके खोटे असतात. खोटे म्हणण्यापेक्षा जसे दिसतात तसे नसतात. मुठीने पोटात मारल्यासारखे दिसले तर प्रत्यक्षात फोर आर्म ने पोटात मारले जाते व आविर्भावांपेक्षा खूपच कमी जोरात मारले जाते. हे झाले बहुतांशी पारंपारिक डावांबाबत.

मात्र आपटणे, पडणे, रक्त येणे हे प्रकार अक्षरशः खरे असतात. रिक फ्लेअर , शॉन मायकेल्स, ट्रिपल एच, हल्क होगन व स्वतः अन्डरटेकर यांना कित्येकदा रक्तबंबाळ व्हावे लागले आहे. त्याचेही एक तंत्र असते. कपाळामध्ये सर्वाधिक ब्लड फ्लो असतो. तेथे जखम केल्यास सर्वाधिक रक्त वाहते. यामुळे बहुतेकवेळा कुस्तीगीरांचे चेहरे रक्तबंबाळ झालेले दिसतात. मात्र रॅन्डी ऑर्टन या सुप्रसिद्ध कुस्तीगीराला स्वतःची पाठही रक्तबंबाळ करून घ्यावी लागलेली आहे.

मॅट हार्डी, एज, रे मिस्टिरिओ व बहुतेकांना स्वतःची हाडे मोडून घ्यायला लागली आहेत. सर्जरी व नंतर सहा सहा महिने काम करता येत नाही अशा अवस्थेत कित्येक जण गेलेले आहेत. 'एज' नावाचा प्रख्यात कुस्तीगीर तर ऐन भरात असताना निवृत्तीकडे झुकला ते याचमुळे. त्याच्या महिम्यामुळे तो अर्थातच हॉल ऑफ फेम या क्लबमध्ये गेला.

शरीर पिळदार होण्यासाठी दहा दहा बारा बारा तास व्यायाम असतो. ग्लॅमर आणि पैशासकट जबरदस्त वेदना येतात. मी स्वतः पाहिलेल्या अनंत मॅचेसपैकी:

१. एका मॅचमध्ये व्हिन्स मॅकमेहॉनचा मुलगा केन या अजस्त्र राक्षसावर जवळपास चाळीस फुटांवरून उडी मारतो. केन हालल्यामुळे तो लोखंडाच्या प्लॅटफॉर्मवर पडतो आणि कित्येक महिने अ‍ॅक्शनच्या बाहेर जातो. हे चेअरमनच्या मुलाचे सांगितले.

२. मॅट हार्डीने एकदा 'टेबल्स, चेअर्स, लॅडर्स' या प्रकारच्या मॅचमध्ये जवळपास पन्नास फुटांवरून एका कुस्तीगीरावर उडी मारली. तो कुस्तीगीर एका तरंगत्या शिडीवर आडवा पडलेला होता व आधीच बेशुद्ध झालेला होता. मॅट हार्डी पडल्यानंतर अर्थातच दोघेही शिडीचे तुकडे होऊन खाली पडले व मॅट हार्डीही बेशुद्ध झाला.

३. रॅन्डी ऑर्टनने एकदा मिक फॉली या प्रख्यात कुस्तूगीराबरोबर कुस्ती खेळताना स्वतःची व मिकची अशा दोघांच्याही पाठी खिळ्यांनी टोचून घेतलेल्या होत्या.

४. हेल इन अ सेल या प्रकारच्या मॅचमध्ये लोखंडी पिंजर्‍यात दोन किंवा अधिक (टॅग टीम मॅच असल्यास) कुस्तीगीर एकमेकांना पिंजर्‍यावर फेकतात. यात अनेक जखमा होतात.

हे सर्व खोटे नसते. फक्त एकमेकांवर लाथाबुक्क्यांनी केलेले प्रहार काहीसे फसवे असतात इतकेच. लार्जर एरिआ हिट्स लार्जर एरिआ या तत्वाप्रमाणे वेदना कमीत कमी होतील अशा पद्धतीने मारले जाते. मात्र इतर सर्व घटना, जसे रक्तबंबाळ होणे, हाडे मोडणे, आयुष्य व करीअर बरबाद होणे, सर्जरी हे सर्व खरेखुरे असते.

या स्पर्धेला इतके ग्लॅमर का?

याचे सोप्पे कारण म्हणजे सत्प्रवृत्तींविरुद्ध दुष्प्रवृत्ती यात सत्प्रवृत्ती जिंकताना पाहणे हे फक्त लहानग्यांनाच नाही तर मोठ्यांनाही आवडतेच. याच तत्वावर एकसे एक स्टोरीलाईन बनवली जात्यात. यामुळे एखादा चांगला वागतो असे दाखवला जाणारा पहिलवान हा अल्पावधीतच लोकांच्या गळ्यातील ताईत होतो. वाईट वागणार्‍याची जाहीर निंदा होते.

दुसरे कारण म्हणजे हा शो जगभरात सातत्याने व नियमीतपणे अनेक विभागांत प्रत्यक्ष व टीव्हीवर अब्जावधी लोकांसाठी होत असतो. अर्थातच त्याचे लोण प्रचंड प्रमाणात पसरते.

तिसरे कारण म्हणजे पहिलवान यात गंमत म्हणून येत नाहीत. अन्डरटेकर हा स्वतः वीस बावीस वर्षे या शो मध्य आहे. तो जणू एक ब्रॅन्डच आहे. या रेसलमेनियामध्ये तो हारण्याची शक्यता आहे याचे कारण त्याला आता निवृत्त होण्याची इच्छा आहे. त्याचे हातपाय आता पूर्वीसारखे चालत नाहीत. मात्र त्याला अगदी हारलेले दाखवले तरी असे हारलेले दाखवतील की ट्रिपल एच हा त्याचा प्रतिस्पर्धीही हारलाच किंवा शॉन मायकेल्स या सुविख्यात कुस्तीगीराने - ज्याला या मॅचसाठी रेफ्री नेमण्यात आलेले असून प्रत्यक्ष आयुष्यातही तो ट्रिपल एचचा सर्वात चांगला मित्र तरीही सर्वात मोठा करीअर शत्रू आहे - त्याने ट्रिपल एचला जिंकून दिले व प्रत्यक्षात अन्डरटेकर हारलाच नसता असे काहीतरी दाखवतील. याचे कारण लोकांना अंडरटेकर हारलेला पाहवणार नाही. ज्या माणसाच्या शैलीने आज दशके लोकांना भुलवले आणि जो अजिंक्य ठरला तो हारला तर बिझिनेसवर प्रचंड प्रभाव पडेल.

चौथे कारण म्हणजे या प्रकारातील स्टोरीलाईन्स अक्षरशः अप्रतिम असतात. चॅम्पियनशीपसाठीचा लढा, शत्रूचा शत्रू तो मित्र , इगो, राजकारण, प्रेयसी / प्रियकर, तत्वाने खेळणे या घटकांना कथेत इतके प्रभावीपणे ओवले जाते की माणूस आपोआप गुंतत जातो. पुढचा शो पाहण्याची उत्सुकता निर्माण करण्याची त्यांची हातोटी व दर महिन्यातून एक स्पेशल शो वर वर्षाअखेरीस रेसलमेनिया (द ग्रॅन्डेस्ट स्टेज ऑफ देम ऑल) ही आकर्षणे मोठ्यांनाही भुरळ पाडतात.

हे सर्व झाले त्या क्रीडेबद्दल.

पण डब्ल्यू डब्ल्यू ई गाजण्यामागे सर्वात मोठा हात आहे तो सहभागी पहिलवानांचा व कुस्तीगीर महिलांचा, तसेच रेफ्रीज, आयोजक, व्यवस्थापक या सर्वांचा अक्षरशः लाजवाब अभिनय!

आपल्याकडील कित्येक अभिनेते तोंडात बोटे घालतील असा अभिनय हे पहिलवान करताना दिसतात. ही बाब खरोखर शिकण्यासारखी आहे. जे प्रत्यक्ष लाईफमध्ये मित्र आहेत त्यांना बडवणे, जखमी व रक्तबंबाळ करणे, त्यांच्याशी बोलताना त्वेषाने बोलणे, प्रत्येक क्षणाला अभिनय असतो, ठासून अभिनय असतो.

या प्रकारामध्ये प्रेक्षकांनाही भरपूर वाचास्वातंत्र्य असते. जसे एखाद्या अप्रियाला बू करणे, शिव्या देणे, काहीही!

फिजिकल फिटनेसची सर्वोच्च पातळी आणि अभिनयाचा उत्कृष्ट दर्जा, अत्यंत प्रभावी एन्ट्रन्स म्युझिक्स आणि एकंदरच सादरीकरण आणि अप्रतिम स्टोरीलाईन्स या क्रीडाप्रकाराला एन्टरटेनमेन्टवरून एका अद्वितीय व अनेक दशके चाललेल्या जगभराने नावाजलेल्या टीव्ही सिरियलप्रमाणे बनवतात.

धन्यवाद

-'बेफिकीर'!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरील प्रतिसादाशी बहुतांश सहमत. मी ही अनेक वर्षे WWF/E पाहतो आहे. अगदी स्टेडियममध्ये जाऊनही पाहिला आहे. Smile अनेक वर्षांपासून हा स्क्रिप्टेड शो आहे हे मलाही माहित आहे.

एखादा सिनेमा पाहतो तसा हा शो पहायला हवा हे खरे. म्हणजे एक स्टोरी, अभिनय इ. अनेक जखमा खर्‍या खुर्‍या होतात. स्क्रिप्ट ही ढोबळ असते, प्रत्येक ठोसा काही स्क्रिप्टेड नसतो. तिथे रेसलरचे कौशल्य दिसते. अनेकदा रक्तही खोटं असतं, रेफ्री कौशल्याने खोटं रक्तही लावतो. वगैरे.

असा एक शो म्हणून मला हा प्रकार बघायला आवडतो, पण बहुसंख्य रेसरल हे अभिनय कौशल्यात मार खातात. शॉन मायकल, एकेकाळचा केन आणी अंडरटेकर, ब्रेट हार्ट, ट्रीपल एच, रॉक वगैरे खरंच अभिनयात उत्तम होते. मॅच पाहताना स्क्रिप्टेड आहे हे माहित असूनही उत्सुकता ताणून ठेवली जात असेल. गेल्या काही वर्षात मात्र एकूण शो खालावला आहे असे माझे मत आहे. मुख्य कारण म्हणजे नव्या तार्‍यांचा अभाव. रॅन्डी ऑर्टन सोडला तर नव्यांमध्ये चमकलेला कोणीही नाही. म्हणूनच की काय, शॉन मायकल, अंडरटेकर, रॉक, जॉन सीना, स्टोनकोल्ड वगैरेंना पुन्हा पुन्हा आणून ग्लॅमर मिळवायचा सातत्यानं प्रयत्न होतो आहे. या लोकांना (वयामुळे) आता उत्कंठावर्धक मॅचेस देण्यात अर्थातच यश येत नाही. शॉन मायकल आम्हाला आवडला ते त्याच्या चपळ आणि फास्ट मुव्हमेंटसने चकित करणारा म्हणून वगैरे. आता या वयात तो किती करणार?

एक शो म्हणून हा शो बरा आहे, पण तो ओव्हर हाईपड आहे असे माझे मत आहे. सद्ध्यातर शोची पातळी अजून घसरली आहे.

-रॉयल रंबल प्रेमी निळ्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

तुमचे म्हणणे खरंच बरोबर आहे

स्वॅगर, शेमस, ट्रूथ, मिझ या सगळ्यांमधून ती जादू नाही निर्माण होत... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://bleacherreport.com/articles/1127825-wwe-wrestlemania-28-results-c...

शेवटी अंडरटेकर जिंकलेला दिसतोय रेसलमेनिअ‍ॅ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0