Skip to main content

प्रिय शुचिमामीस,

स. न. वि. वि.

मी इथे प्रतिसाद फार देत नसले तरी रोज किमान चार वेळा येऊन नवीन काय आलंय हे पाहात असते. खरडीचं नोटिफिकेशन येत नसल्याने आठवड्यातून दोनदा माझ्याच खरडवहीमध्ये डोकावून येते. दर दोन दिवसांनी बोर्डावर किंवा प्रतिसादांत नवीन नांव दिसतं आणि लोक त्या आयडीशी प्रेमाने गप्पाही मारत असतात. मग 'कोण असावं?' हे कुतुहल, इतरांच्या खरडवह्यांची उचकपाचक, असे करताना शंभरातल्या नव्व्यान्नव वेळा* ती तूच असतेस. कधी हर्मिट क्रॅब, वामा, कधी नावच्या अलिकडे-पलिकडे दहा-पंधरा ठिपके, आणि काय न काय!! आता तुलाच तुझे किती आयडी आहेत आणि कोणत्या आयडीने काय लिहिलेयस हे आठवत नाहीय, तर ही मज पामरास कसे ठाऊक असावे?

तर, मला तुझ्या आयडी बदलत राहण्यावर आक्षेप नाही. पण असे का करतेस याबद्दल कुतूहल आहे. म्हणून खास तुझ्यासाठी हा उघड पत्र-प्रपंच. (अनावृत्त (शुद्धीपत्र-अनावृत) असे लिहिण्याची पद्धत आहे, पण मला तो शब्द भयंकर अश्लील वाटतो. म्हणून साधा सोपा शब्द.)

एकंदरीत टोपणनावाने लिहिण्याची प्रथा काही नवीन नाही. मीही टोपण नावाने लिहिते. पण मग अमकं नांव व त्यामागची ढमकी व्यक्ती असं एक नातं तयार होतं आणि माझ्यापुरतं मला लोकांनी मस्त कलंदर्/मकी या नावाने ओळखावं आणि माझं लेखन माझ्या खर्‍या किंवा खोट्या नावाशी जोडलं जावं असं मला वाटतं. माझीही काही संस्थळांवर एकाहून अधिक टोपणनावं आहेत. पण त्याचा हेतू एक वेगळी लेखनशैली किंवा लेखनविषय असा आहे. माझ्या ओळखीच्या काही लोकांनीही अशा कारणासाठी अशी एकाहून अधिक नांवे घेतली आहेत आणि त्यातली काही जगजाहीर देखील आहेत. त्यामुळे एकाहून अधिक आयडी असू शकतात. आता मला तुझे नक्की किती आयडी आहेत हे माहित नाही. इथेच किमान दोन-तीन असावेत. त्यातल्या एका आयडीने तू लग्नासाठी वैशालीमध्ये भेटायला गेलेल्या मुलीची कथा लिहिली होतीस इतपत माहित आहे. परंतु नंतरची वाटचाल तशी जाणवली नाही.

तर बाई (तुझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पूर्ण मान ठेवून) मला तुला असं विचारायचं आहे की
१. तू अशी दिवसागणिक नांवं का बदलतेस?
२. सगळ्या आयडींनी तेच ते लिहायचं असेल तर वेगवेगळी नांवं आणि आयडीज घेतल्यानं नक्की काय साध्य होतं?
३. तुझ्या मुलीला घासकडवींनी ओलिस ठेवून 'तुझ्या नांवं आणि आयडी बदलण्यावर नक्की काय प्रतिक्रिया येतात' याचे आलेख काढण्यासाठी ते तुला असं करायला भाग पाडताहेत का?
४. तुला घासकडवींच्या आलेखांचं अजीर्ण होऊन त्यांचं तोंड एकदाचं बंद करण्यासाठी या मानसशास्त्रीय प्रयोगाचं बाड त्यांच्या संस्थळावर (आभासी जगात तोंडावर मारता येत नाही)मारायचं आहे का?
५. त्या ठिपक्यांच्या नांवात नक्की अलिकडे-पलिकडे किती ठिपके द्यायचे हे तू कसं लक्षात ठेवतेस?
६. तुझा आयडी, नावं बदलण्याचा अल्गोरिदम नक्की काय आहे?
७. तूझा आत्तापर्यंतचा नावांचा आणि आयडींचा स्कोर काय?
८. तुझ्या सतत नांवं बदलण्याचा लोकांना त्रास होतो याबद्दल तुला गवि(यांना त्रास होतो असं हे कधीच दाखवत नाहीत , सगळीकडे पॉझिटिव्ह एनर्जी पसरवत असतात) ते बॅटमॅन (याला ओढून ताणून सगळं आपल्यावरच आहे असं म्हणायचं असतं) या स्केलवर नक्की कसा फीडबॅक मिळतो?
९. माझ्या रेफरन्ससाठी म्हणून तरी , सध्याच्या सगळी 'चालू' आयडींच्या नावांची यादी देत्येस का? किमान या धाग्यातले तरी प्रतिसाद कुणाचे आहेत हे कळायला मदत होईल.

तुझी कृपाभिलाषी,
-मस्त कलंदर

तळटीप- वाहत्या गंगेत हात म्हणून इतरांनीही त्यांच्या मनातले प्रश्न विचारलेत तरी हरकत नाही. काय ते एकदाचे होऊन जौ दे.

*- श्रेयअव्हेर- नांव सगळ्यांना माहित आहे.

adam Fri, 15/05/2015 - 10:15

In reply to by गवि

फक्त शरदिनी तै सोडून.
त्यांच्याबाबतीत कोणताच वॉटरमार्क शिल्लक नव्हता.
त्यांनी स्वतःच अवतारकार्याची महती जालिंदर जलालाबादी प्रकरणामधून दिली तेव्हा कुठे पब्लिकला समजलं.

गवि Fri, 15/05/2015 - 10:32

In reply to by adam

क्रिप्टिक कवितेच्या नेमक्या मोजक्या ओळींवर न थांबता त्यांनी चार वाक्यं जरी गद्यात लिहिली असती किंवा टिप्पण्या केल्या असत्या तरी कोणी ना कोणी ओळखलं असतं.

तिरशिंगराव Thu, 14/05/2015 - 12:39

मग, आता , तोतया पण तुमचाच आयडी आहे का, हे सांगून टाका.

अनुप ढेरे Fri, 15/05/2015 - 10:16

In reply to by रोचना

मिपावर सध्या माईसाहेब कुरुसुंदीकर म्हणून आयडी आहे एक, तसाच म्हातार्‍या बाईचं बेअरिंग घेतलेला.

गब्बर सिंग Fri, 15/05/2015 - 11:26

In reply to by रोचना

त्या मीमराठीवर सुद्धा होत्या.

बादवे - कुठंशिक आलं म्हणायचं हे कुरुसुंदी ? पश्चिम महाराष्ट्रात, खानदेशात, वर्‍हाडात, विदर्भात, कोकणात की मध्यप्रदेशात ? मराठवाड्यात?

आदूबाळ Fri, 15/05/2015 - 13:57

In reply to by गब्बर सिंग

दक्षिण महाराष्ट्र / उत्तर कर्नाटक सीमाभाग. लंपनकथांमध्येही कुरसुंदीकरांचा उल्लेख आहे. नेमका काय आहे ते आठवत नाहीये.

बॅटमॅन Fri, 15/05/2015 - 14:37

In reply to by आदूबाळ

होय तिथेच उल्लेख आहे. लंपनच्या आज्जीआजोबांकडे रहायला म्हणून कुरसुंदीकर आणि त्यांची मुले/नातवंडे येतात, नीट वागत नाहीत, यजमानांवरच दाब दाखवतात, इ.इ. लंपनला जिलबी खिलवतो असे म्हणून नुस्ते इकडून तिकडे फिरवणारे आणि जिलेबी न देणारे कुरसुंदीकर. ती भुवई उडवून बोलणारी कुणी हिरा नामक मुलगीही त्यांच्याबरोबरचीच.

अन कुरसुंदीचं माहिती नाही, पण सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यात खरसुंडी नामक एक गाव आहे.

http://en.wikipedia.org/wiki/Kharsundi

आदूबाळ Fri, 15/05/2015 - 17:39

In reply to by बॅटमॅन

ओह् येस! कथेचं नाव "परचक्र".

मला लय आवडते ही कथा. लंपनच्या वयाची आणि बालसुलभ भाव (अजून) न हरवलेली सोना. नटमोगरी हिरा*. इरसाल बारागंड्याचा बंक्या**. चोरट्या आणि बढाईखोर कुरसुंदीकर मामी. लोकांना टोप्या घालणारे आणि आपल्या पोराबाळांना आमिषं दाखवून शेवटी अतृप्त ठेवण्यात विकृत समाधान मानणारे इनामदार कुरसुंदीकर. जबरदस्त कथा.

__________________________
*जवळजवळ हिरासारखाच नटमोगरेपणा एका वेगळ्या कथेत हिंडलगेकर अण्णांची थोरली मुलगीही करते. पुढे ती सैन्यातल्या एका अधिकार्‍याशी लग्न वगैरे होऊन सुखी इ. होते. हिराचं पुढे काय होतं ते संतांनी सांगितलं नाहीये, पण हिंडलगेकरांच्या थोरल्या मुलीसारखं नसणार असं उगाचच वाटून जातं.

**या बंक्याचं क्यारेक्टर उच्च आहे. "सप्तपोपडे अष्टजिंकिले नऊनऊ किल्ले" किंवा "अकलकराठा बाळूमराठा" असले गोट्या किंवा विटीदांडू खेळताना म्हणायचे महान मंत्र तो शिकवतो. एकदा येष्टीच्या प्रवासात हे पुस्तक वाचत होतो, आणि सहज मोठ्याने त्यातला एक मंत्र म्हणून पाहिला. शेजारच्याने जो काय लुक दिलाय मला!

बॅटमॅन Fri, 15/05/2015 - 17:44

In reply to by आदूबाळ

आहा, अगदी अगदी!

बाकी मंत्र खरंच एकच नंबर जबरी आहे. अलीकडच्या बाळपिढीत असे मंत्र नक्की असतील, पण त्यांची जातकुळी कशी असेल ते बघायला हवं. बहुधा चेंज झालेली असेल.

बॅटमॅन Fri, 15/05/2015 - 18:12

In reply to by अजो१२३

ते कळालं हो, पण बाकी डिस्कशन न पाहता, पॉसिबल ओरिजिन चे उदा. देऊनही मराठवाडाच का आणला हे कळेना, दॅट्स ऑल.

रोचना Fri, 15/05/2015 - 14:28

मला वाटलं होतं श्रावण मोडकांनी गंमत म्हणून घेतलेला डु-आयडी असावा. "अरे चिंतातुरा, अरे संजोपा" वगैरे वाक्य वाचून हसू यायचं. ते आता नाहीत, आणि रमाबाई सुद्धा बरेच दिवस फिरकल्या नाहीत, म्हणून माझा आपला एक अंदाज. पण मीपावर असाच आयडी अजूनही कार्यरत असला तर माझा अंदाच चुकीचा असावा.

वरच्या पोस्टमधे "पोस्ट करणं बंद झाल्यावर" असे लिहायला हवे होते. गैरसमज नसावा.

गवि Fri, 15/05/2015 - 14:46

In reply to by रोचना

हो..असं कधी लक्षात आलं नव्हतं.

. त्या दुर्दैवी घटनेनंतर आजतागायत नेमका एकही प्रतिसाद नाहीये रमाबाई कुरसुंदीकरांचा. आवर्जून पाहिलं तेव्हा लक्षात येतंय.

हा निव्वळ योगायोगच असो अशी इच्छा..

:(

बॅटमॅन Fri, 15/05/2015 - 14:36

ऐसीवरचा आयडी = रमाबाई कुरसुंदीकर.
मिपावरचा आयडी = माईसाहेब कुरसुंदीकर.

मिपावरचा आयडी अजूनही सुरू आहे. त्याच्या प्रतिक्रिया तशा सेन्सिबल असतात, आणि म्हातारीचं बेअरिंगही मस्ताड असतंय एकदम.