Skip to main content

प्रेम

तव नयनांचे गहिरे काजळ जेव्हा बनते धुंद सुरा
अन् ओठांचे थरथरणे ते, त्या चषकाचा भास खरा
बुडून जातो स्वप्नामध्ये तुझ्या मिठीच्या, प्राणसखे!
नकोस स्पर्शू हलकेही मज उठवाया तू, थांब जरा!

आकर्षक ते गोंदवणाचे फूल जणू मज खुणावते
हनुवटीस त्या स्पर्शुनि माझी तुजवर प्रीती दुणावते
ह्या केसांच्या वादळात मी योग्यासम संयत राहू?
वाट पाहतो साखरकळिच्या स्पर्शाची, तू दे मजला




इतरत्र पूर्वप्रकाशित

राजन बापट Wed, 05/12/2012 - 21:06

कविता आवडली. पुढचा प्रकार थोडा मजेत घ्याल अशी आशा आहे.

बोरकरांच्या शैलीमध्ये उमटे ऐसा काव्यठसा
छंदमुक्त अन् स्वैर कवींवर जणु जालीम उपचार जसा
ज्यूलियनादि पूर्वसूरींच्या आत्म्यांना सद्गती मिळते
"प्रेमा"दिक विषयांवर जेव्हा छंदबद्ध कविता सुचते !

डांबिस Fri, 07/12/2012 - 02:57

कविता आवडली. आणखी थोडी मोठी असती तर छान झाले असते. पण ही देखील छानच आहे. अभिनंदन आणि पुलेशु.

अजित विश्वनाथ भागवत Sat, 08/12/2012 - 20:29

छानच!
छन्दात शब्दान्ची गति अतिशय मोहक. पु.ले.शु.

मुक्तसुनीत यान्च्याशी सहमत आहे.
आणि माफ करा, ".., तू देच जरा" आवडले नाही.

राजेश घासकडवी Sun, 09/12/2012 - 03:47

आवडली. मुक्तसुनीत यांच्याशी सहमत.