Skip to main content

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर...त्यांच्या ताकतीचा विनोद पुन्हा निर्माण झाला नाही

आज, जून २९ २०१६, श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांची १४५वी जयंती. दोन-तीन गोष्टी लिहाव्याश्या वाटतात...

त्यांची सर्व नाटक आता वाचायला भिकार वाटतात पण त्यांच्या ताकतीचा विनोद (मराठी गद्यात) पुन्हा निर्माण झाला नाही. मी कधी कधी कल्पना करत असतो की आज कोल्हटकरांनी कशा कशा वर लिहलं असत... वेळ पुरला नसता त्यांना...

त्यांच्या पत्रांची दोन पुस्तके मी वाचली आहेत. त्यातून त्यांचे जे विलक्षण व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभ राहत ते मला एकीकडे हसवत असत आणि एकीकडे खिन्न करत. ती पत्र वाचून वाटत त्यांच्याशी जाऊन गप्पा माराव्यात...त्यांना आणखी बोलत करावं!

हा मनुष्य खूप दूरदर्शी होता. हरि नारायण आपटेंच्या 'पण लक्षात कोण घेतो?', १८९० कादंबरीचे परीक्षण लिहताना ते म्हणतात:
"रा. आपट्यांनी स्त्रियांच्या दुःखाची कहाणी सांगितली आहे तशी मागासलेल्या जातीच्या दुःखाची सांगितल्यास ती मिसेस स्टौच्या 'टॉम काकाची कोठडी' या कादंबरीच्या खालोखाल क्रांतिकारक होईल अशी खात्री वाटते. "

त्र्यंबक शंकर शेजवलकर , र. धों कर्वे अशा प्रचंड ताकतीच्या पण दुर्लक्षीत अशा व्यक्तींना त्यांनी नेहमी प्रोत्साहन दिल. 'समाजस्वास्थ्य' मध्ये आलेला एकमेव मृत्युलेख म्हणजे त्यांच्यावरचा!

पण आपण कोल्हटकरांना जवळ, जवळ विसरलो आहोत. एखाद्या भाषेत त्यांचे विनोदी लेख सुद्धा रंगभूमीवर आले असते... आज बाजारात त्यांचे (किंवा त्यांच्याबद्दलचे) एकच पुस्तक मिळते- 'सुदाम्याचे पोहे' आणि ते सुद्धा abridged....

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

चिंतातुर जंतू Wed, 29/06/2016 - 17:33

काही वर्षांपूर्वी त्यांच्या 'मरणोत्तर' लेखाचं पारायण करायला लागलं होतं. त्यात हिंदू धर्मातल्या मरणोत्तर कर्मकांडावर आणि मृत्युपश्चात जीवनाविषयीच्या कल्पनेवर इतकी परखड टीका होती, की आज ते असते तर बहुधा तुरुंगात असते आणि त्यांच्या पुस्तकांवर बंदी असती. मग चिं.वि. जोशींबद्दल तुमचं मत काय आहे?

अनिरुद्ध गोपाळ… Wed, 29/06/2016 - 18:14

चिं.वि. जोशीं हे जवऴ जवळ त्याच योग्यतेचे होते...मला ते तितकेच आवडतात...पण ते श्रीकृको ना बघत लिहते झाले...शिवाय श्रीकृ़कों च्या लेखनाचा आवाका मोठा वाटतो...मार्क ट्वेन सारखा...

अरविंद कोल्हटकर Wed, 29/06/2016 - 18:48

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे माझे चुलतचुलत आजोबा. माझ्यापूर्वी तीन पिढ्यांचे वाईचे कोल्हटकर घराणे एकमेकांना पुष्कळसे धरून होते आणि त्यामुळे माझे आजोबा हरि गणेश (मृत्यु १९६२) ह्यांना त्यांचा - आणि अच्युत बळवंत कोल्हटकरांचा - पुष्कळ सहवास त्यांच्या तरुण वयापर्यंत मिळाला होता आणि त्यांच्या तोंडातून ह्या दोघांबद्दल मी पुष्कळ ऐकलेले आहे.

श्रीपाद कृष्ण ऊर्फ तात्यासाहेब खामगावात व्यवसायाने वकिली करत असत, त्यांनी अनेक संगीत नाटके - आता स्मृतिप्राय - आणि विनोदी लेखन केले, अर्धांगवायूसारखा काही विकार त्यांना काही काळ जडल्यामुळे ते बरेचसे अबोल होते वगैरे बाबी बहुतेकांस ठाऊक आहेत त्यामुळे ती उजळणी पुनः करीत नाही. राम गणेश गडकरी त्यांना फार मानत असत आणि गडकरींची 'तात्या ती तलवार एक तुमची, बाकी विळेकोयते' ही ओळ प्रसिद्ध आहे. 'बहु असोत सुंदर' हे श्रीपाद कृष्णांचे महाराष्ट्रगीतहि सर्वश्रुत आहे.

त्यांचे एक छोटेखानी चरित्र गं.दे.खानोलकर ह्यांनी १९२७ साली 'श्रीपाद कृष्ण कोल्हटकर - चरित्र व वाङ्मय परिचय' ह्या नावाने प्रसिद्ध केले होते. तसेच श्रीपाद कृष्णांनी स्वतःचे आत्मवृत्तहि १९१९ साली लिहून ठेवले होते आणि ह.वि.मोटे ह्यांनी १९३५ साली श्रीपाद कृष्णांच्या मृत्यूनंतर प्रकाशित केले होते.

नाटककार आणि विनोदी वाङ्मयाचे लेखक ह्यापलीकडे त्यांची अजून एक ओळख आहे, ती आता बहुतेक विसरली गेली आहे. त्यांना काही कारणाने भारतीय ज्योतिर्गणित - आर्यभट, भास्कराचार्य इत्यादींच्या लेखनातील भारतीय पद्धतीने ग्रहतार्‍यांच्या भ्रमणाचा अभ्यास - ह्या विषयामध्ये नंतरच्या काळात स्वारस्य निर्माण झाले आणि तो विषय आपल्याला पूर्ण समजावा म्हणून त्याचा बराच स्वाध्याय करून त्यावर 'भारतीय ज्योतिर्गणित' नावाचे एक पुस्तक त्यांनी १९१३ साली प्रसिद्ध केले. त्या काळात पंचांगशोधन हा प्रश्न बर्‍याच चर्चेत होता. टिळक, केरूनाना छत्रे, शंकर बाळकृष्ण दीक्षित असे जाडे विद्वान ह्या वादामध्ये भाग घेत असत. श्रीपाद कृष्णांनी ह्या विषयात संपादिलेला अधिकार ओळखून १९२० सालच्या सांगली येथे भरलेल्या ज्योतिषसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते.

माझे दुसरे आजोबा चिंतामणराव कोल्हटकर ह्यांच्या 'बहुरूपी' नावाच्या काहीशा आत्मकथनात त्यांचा नाटककार म्हणून चिंतामणरावांशी जो संबंध आला त्यावर बरेच लिहिले आहे.

कोल्हटकरांतर्फे मी परवानगी देते =))
सॉरी :) गंमत करायचा मोह आवरला नाही. .................. लॉन्ग वीकेंडच्या मूडची नांदी ;)

अनिरुद्ध गोपाळ… Wed, 29/06/2016 - 20:40

In reply to by अरविंद कोल्हटकर

'बहुरूपी' हे मराठीतील अतिउकृष्ट पुस्तकांपैकी एक. मी ते पुन्हा पुन्हा भागशः वाचतो. त्यातील श्रीकृकोंवरचा लेख आसाधारण आहे.