रमलखुणांची भाषा
जरी तुटले आतून काही,
तरी नकोस ओळख देऊ
जाताना थांबून थोडे,
तू नकोस मागे पाहू
दिसतील अनाहूत इथल्या,
सावल्या गडद होताना
हुरहुरत्या संध्याप्रहरी,
पावलांत घुटमळताना
पारावर तेवत असता,
फडफडेल इथली दिवली
मग उरेल काजळमाया,
शोषून स्निग्धता सगळी
ते वादळ येईल फिरुनी,
पण सावर तोल जरासा
ओठींचे स्मित लपवूदे,
श्वासातील खोल उसासा
ते विसर उमाळे इथले,
पुसताना प्राक्तनरेषा
उलगडेल अवचित अवघी,
मग रमलखुणांची भाषा.....
काजळमाया, जीए आणि लॉर्ड वॉल्डेमॉर्ट
कविता जमली आहे.
अश्या कविता पाडायची रेसिपी तशी फारशी अवघड नाही. ग्रेसभूल आणि जी.ए.भूल पडलेले रसिकजन वाहवा म्हणतील अशा कविता कुणी पाडू लागले की मला हटकून डार्कलॉर्ड जिवंत करायची रेसिपी आठवते.
दोन ओळी संध्या*** (छाया, माया, काया, ओंजळ)
दोन ओळी आदिमाय
दोन ओळी प्राक्तन नशीब ललाट रमल
स्वादानुसार आठवण उसासा आवंढा
(ग्रेस चाहत्यांसाठी) थोड्याश्या भावल्या, कावळे
इत्यादी इत्यादी.
भ्रष्ट नक्कल
तुमची बरीचशी प्रतिमासृष्टी कुसुमाग्रजांच्या प्रतिमांसारखीच आहे, आता त्यात जी.ए., ग्रेस वगैरेंची भर पडत चाललीय. म्हणजे हे आत्ताचं नाहीये तुम्हीच एकदा 'भवताल निनादत होते' हि तुमची कविता वाचून बघा. ‘नि:शब्द खोल मी उरलो’, ‘जखमी भवताल’, ‘गडद डोह’ ,’पैंजणाचे गूढ नाद इत्यादी -- जी एंच्या कथेतून या प्रतिमा उपसून बळेच एक कविता लिहिल्यासारखी लिहली आहे. वरती निल लोमस यांनी दिलेला प्रतिसाद खरंतर सूचक आहे तुमच्यासाठी. स्वतंत्र कवी म्हणून कविता लिहीत असाल तर तुमची स्वतःची एक प्रतिमासृष्टी, शब्दकळा, शैली दिसू द्या अन्यथा तुमच्या कवितांना कुसुमाग्रजांच्या कवितांची भ्रष्ट नक्कल याखेरीज वेगळं काही अस्तित्व उरणार नाही.
तुमची पहिलीच ‘ब्रह्माण्डाचे ऑम्लेट’ हि कविता वेगळी होती आणि ती कविता चांदण-चुऱ्याचे लवण, अणु-गर्भाचे सोलीव कांदे, आदि-स्फोटाचा अग्नी, गुरुत्व कालथे अश्या चमत्कारिक उपमांनी ठासलेली होती. प्रसरणशील विश्वाची कल्पना तुम्ही ब्रह्माण्डाचे ऑम्लेट कल्पून कवितेतून मांडलेली. चिवित्र होती ;) हे ब्रह्माण्डाचे ऑम्लेट तुम्ही आकाशगंगेच्या तव्यावर परतत होतात ही सूक्ष्मशी खगोलीय अडचण लक्षात आलेली पण एकंदर ' जे ना देखे रवि' असे म्हणून कविता आवडून घेतली होती. हि कविता लिहिण्यामागे कुसुमाग्रजांच्या ‘पृथ्वीच्या प्रेमगीता’ची प्रेरणा असेल असा माझा चुकू शकेलसा अंदाज होता/ आहे.
छान्
छान्