Skip to main content

इये मराठीचिये नगरी - अरूण खोपकर

इये मराठीचिये नगरी

मराठी लिहिताबोलताना माझ्या भोवताली सतत होणारा इंग्रजी शब्दांचा वापर मला अनेक वर्षे त्रास देतो आहे.

माझ्या लहानपणी रसाळ, अर्थपूर्ण आणि साधे पण नेटके मराठी लिहिणारे आणि बोलणारे माझ्या वडिलांच्या पिढीतले कितीतरी लोक होते. त्यातले अनेक इंग्रजीही सफाईने बोलत व लिहीत. माझ्या वडिलांचे मराठीचे शिक्षक आणि वसंत कानेटकरांचे वडील कवी गिरीश आमच्या घरी अनेकदा उतरत असत. ते आल्यानंतर साहित्याशी जवळचे किंवा दूरचे संबंध असणारे कितीतरी जण घरी येत असत. अशा अनेक वेळी चूप बसण्याच्या अटीवर मला चर्चा ऐकायची परवानगी मिळत असे. रा. ग. गडकऱ्यांच्या आणि इतरांच्या कविता एकामागून एक म्हणायची चढाओढ होत असे. कवी गिरीश, यशवंत हे कविता सुंदर गात असत.

वामन मल्हार जोशांच्यामुळे माझ्या बहिणीचे नाव रागिणी ठेवले होते. मी त्यांना पाहिले नाही. पण त्यांच्या सोप्या भाषेत मांडलेल्या तर्कशुद्ध विचारांबद्दल वडिलांनी मला कितीदा तरी सांगितले होते.

प्र. के. अत्र्यांचा आचरटपणा वगळला तर त्यांचे अग्रलेखही वाचनीय असत - विशेषत: नेहरूंवरची 'सूर्यास्त' ही लेखमाला वाचताना लहानांपासून मोठ्यांचे डोळे सहज पाणावतील अशी त्यांची लेखणी स्रवली होती. त्यांनी लिहिलेल्या 'नवयुग वाचन माले'तल्या नादमधुर आणि सरळ मराठीचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही.

कॉलेजमध्ये मला मराठी शिकवणारे म. वा. धोंड, रा. ग. जाधव, विजयाबाई राजाध्यक्ष यांनी कधी इंग्रजीची ठिगळे लावली नाहीत. अशोक केळकरसारखा गाढा विद्वान मित्र, ज्याने हार्वर्ड, येल इ. जगप्रसिद्ध विद्यापीठात अध्यापन केले, तोही किती सुरेख, अर्थवाही आणि नेमके मराठी बोलत असे. अशोक जर्मन, उर्दू, फ्रेंच ह्या भाषा जाणत होता. त्यातून मराठीत अनुवाद करत होता.

माझा अनेक दशकांचा दुसरा बहुभाषिक मित्र म्हणजे गोविंद पुरुषोत्तम देशपांडे. चिनी भाषा शिकलेला, काही दशके जवाहरलाल नेहरू विद्यापीठात चिनी संस्कृती, इतिहास व राजकारण शिकवणारा, जर्मनीत काही काळ अध्यापक असलेला गोविंद जी कोणती भाषा बोलत असे तिचे गुण जाणून ती बोलत असे. त्याचा संस्कृतचा अभ्यास सखोल. संस्कृत काव्ये मुखोद्गत. तो एकाद्या भाषेतले संपूर्ण अवतरण देऊन पुन्हा तिहाई घेतल्याच्या सफाईने मराठीतले संभाषण सुरू करीत असे.

अरूण कोलटकरबरोबरचे संवाद सहजपणे एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जात. पण सांधे बदलताना खडखड होत नसे.

आमच्यापैकी कुणीही देशीवादी नव्हते. भाषाशुद्धीबद्दल संकुचित विचार नव्हते. पण भाषेच्या सौंदर्याची जाण होती. तिचे आंतरिक भान होते. तिचा तोल न जाऊ देता, तिचा रेखीवपणा आणि सुरेलपणा यांचा मान राखून प्रत्येक जण भाषेचा / भाषांचा वापर करत असे.

आता चाळिशीच्या खालच्या पिढीचे लेखन जेव्हा वाचतो, त्यांची वक्तव्ये ऐकतो तेव्हा अंगावर शहारा येतो. यांना न इंग्रजी येते न मराठी. व्यावहारिक साक्षऱता म्हणावी इतकीच भाषेची जाण. एकाद्या संस्कृतीत जन्माला येतो म्हणजे तिची भाषा येते असे नाही. सुराप्रमाणे लिहिण्याची भाषा, बोलण्याची भाषा कमवायला लागते. तिचा रियाज करावा लागतो. तिच्या श्रुतींतली अंतरे कानांना कळावी आणि जिभेतून वळावी लागतात. लिखाणात वैचारिक व सांस्कृतिक खांब आणि तुळया झेलाव्या लागतात. ध्वनीच्या वेलबुट्‌ट्या साधाव्या लागतात. प्रासांच्या लालित्याशी लडिवाळपणा करायला लागतो. शेलक्या शब्दांचे लफ्फे झोकात फेकावे लागतात. भाषा कुठलीही असो. तिच्यावर प्रेम करायला लागते. तिचा अनुनय करावा लागतो.

भाषांचा योग्य मिलाप होतो तेव्हा खानदानी अरबी घोडे जन्माला येतात. ते वेगाने अर्थाला वाहून नेतात आणि त्यांच्या ध्वनीच्या नालबंद टापांनी दरीखोरी दुमदुमत रहातात.

एरवी जन्माला येतात त्यांना म्हणतात भाषिक खेचरे. त्यांना भाषेला पुढच्या पिढीपर्यंत नेता येत नाही. आपल्या भाषिक आडमुठेपणामुळे ती जन्मताच खच्ची झालेली असतात.

मी सुमारे दहा भाषांचा अनेक वर्षे अभ्यास केला आहे आणि करतो आहे. त्यानंतर नशापाणी न करता, संपूर्ण शुद्धीवर असताना, शरीराने आणि मनाने ठणठणीत असलेल्या स्थितीत माझ्या मराठी भाषिक मित्रांना आणि मैत्रिणींना माझे कळकळीचे सांगणे आहे. जग फिरून आल्यावर मला अंगणातल्या दंवाच्या थेंबावर झळाळलेला पहिला सूर्यकिरण दिसल्यावर जे काही दिसले ते मी तुम्हाला फक्त मराठीतच सांगेन. आणखी काय सांगणार? प्रभाकर शाहिराच्या एका ओळीची आठवण करून देतो. "आम्ही जातो. तुम्ही रंग करा आपुला".

- अरूण खोपकर. वय वर्षे बहात्तर.
(फेसबुकवरून साभार.)

अरविंद कोल्हटकर Wed, 18/04/2018 - 23:30

हे अगदी माझ्या मनातीलच विचार आहेत.

मला एकूण पाच भाषा कमीअधिक बोलता-वाचता येतात आणि त्या सर्वांवर माझे प्रेम आहे तरीहि इंग्रजीची कुबडी न वापरता मी शुद्ध मराठी बोलू आणि लिहू शकतो ह्याचा मला विशेष अभिमान आणि आनंद आहे. पण आसपास मला असे दिसते की इंग्रजी माध्यमाच्या अतिरेकामुळे १९७५-८० नंतर जन्मलेल्या मराठी भाषिकांच्या पिढ्यांना घरगुती पातळीवरच्या मराठीपलीकडे मराठीचा गंधहि नसतो. त्यांवे मराठी वाचन नसते आणि त्यांना चहापाण्याच्या गप्पापलीकडील कसलाहि विचार शुद्ध मराठीत लिहिता येत नाही.

हा प्रश्न आहे खरा पण त्याला उत्तर काय? संचारसाधनांमुळे आणि प्रवासाच्या सुकरतेमुळे जग लहानलहान होत चालले आहे आणि तितक्या प्रमाणात इंग्रजीचे आपल्या जीवनातील वर्चस्व वाढत चालले आहे आणि ह्यालाहि काही उत्तर नाही.

असाहि विचार करायला हरकत नाही की जे होते आहे त्यात वाईट किंवा अनैसर्गिक काय आहे? प्रागैतिहासिक काळापासून भाषांच्या बाबतीत 'उत्पद्यन्ते विलीयन्ते' हे चक्र चालूच आहे. गेल्या दोनअडीच हजार वर्षांंचा इतिहास आपणास ठाऊक आहे. तत्पूर्वीच्या लाखो-कोटि वर्षात किती भाषा जन्मल्या आणि काळाच्या ओघात विलयाला गेल्या हे आपणास माहीतहि नाही आणि माहीत नसल्याने आपल्याला त्या त्या भाषा नष्ट झाल्याचे दु:खहि नाही. गाथासप्तशतीच्या गाथा निर्माण होत होत्या त्या काळात आपले महाराष्ट्रातील पूर्वज महाराष्ट्री प्राकृत भाषा वापरत होते. हळूहळू यादवकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन, पंडित-कवि कालीन अशी वळणे घेत घेत तिची जागा आपल्या आजच्या मराठीने घेतली. महाराष्ट्री प्राकृत आज वापरात नाही ह्याचे आपणास काही विशेष दु:ख असते काय? तशीच आत्ताची मराठीहि हळूहळू वापरातून जाऊन इंग्रजीशब्दमिश्रित काही वेगळीच भाषा अजून ५०० वर्षांनी येथील लोक बोलत असतील आणि आजची मराठी ही एक इतिहासकालीन भाषा म्हणून केवळ विद्वानांचाच प्रान्त उरेल. आपण आज आजची मराठी बोलतो म्हणून आपणास तिच्या मागे पडण्याची चिन्ता आणि दु:ख वाटते पण ५०० वर्षांनंतरच्यांना ते तसे वाटणार नाही, जसे आपणास आज महाराष्ट्री प्राकृत विलयाला गेली म्हणून वाटत नाही..

(योगायोग म्हणजे आत्ताच 'मिसळपाव'वर 'उपकार इंग्रजांचे' अशा शीर्षकाचा खालील धागा चर्चेत आहे.

इंग्रजांनी या देशाला गुलाम केले. ही गोष्ट खरी असली तरीसुद्धा इंग्रजांनी काही चांगल्या, वरदान म्हणाव्यात अशा गोष्टी भारताला दिल्या. त्यातली एक म्हणजे इंग्रजी भाषा. इंग्रजी भाषेमुळे आपल्याला जगाचे दरवाजे खुले झाले.

इंग्रज या देशातून जाऊन आता 70 वर्षे झाली पण त्यांची इंग्रजी भाषा आणि तिची उपयुक्तता मात्र आम्ही विसरलेलो नाही. त्यामुळे आजही अनेक मराठी पालक आपल्या मुलांना आवर्जून इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच घालतात.

घरात बोलायला, गप्पा मारायला वगैरे मराठी ठीक आहे पण शिक्षणासाठी माध्यम म्हणून इंग्रजीच ! अनेक पालक मुलांना मराठी साहित्याची घरच्या घरीच ओळख करून देतात पण माध्यमाचा दर्जा मात्र इंग्रजीलाच देतात.

इंग्रजांनी बाकी कुठलेही अन्याय केलेले असले तरीसुद्धा इंग्रजी भाषेचे माध्यम भारतीयांना देऊन आपल्यावर अनंत उपकार करुन ठेवलेले आहेत !

निदान या बाबतीतले इंग्रजांचे उपकार तरी आपण विसरता कामा नये.)

अरविंद कोल्हटकर, वय वर्षे पंचाहत्तर.

चिंतातुर जंतू Thu, 19/04/2018 - 00:00

In reply to by अरविंद कोल्हटकर

इंग्रजी भाषेचे माध्यम भारतीयांना देऊन आपल्यावर अनंत उपकार करुन ठेवलेले आहेत !

हे बरोबरच आहे. अनेक भाषा शिकाव्यात, पण त्या धड लिहिता-बोलता याव्यात. आणि त्यासाठी कष्ट घेण्याचीही तयारी असावी. त्यामुळेच खोपकरही 'मी देशीवादी नाही' असं म्हणतात.

गब्बर सिंग Thu, 19/04/2018 - 01:15

In reply to by अरविंद कोल्हटकर

प्रणाम काकाश्री. प्रतिसाद एकदम आवडला. अनेक भाषा बोलता, वाचता, लिहिता याव्यात - हे मस्त.

पिऱ्या मांग Thu, 19/04/2018 - 03:34

वडील
परवानगी
कॉलेज
रियाज
खानदानी
नालबंद
नशापाणी
फक्त
शाहिर

हे काय मराठी शब्द आहेत कारे पोट्या! लोकां सांगे...
अरेबिक शब्द मराठीत चालतात तर इंग्लिश शब्दानी काय घोडं मारलय.
साला तुझा मराठीचाच बिझनेस आहे मग तुला लफ्फेदार मराठीच्या गफ्फा करायला काय जातं? तुला बिल्डिंग बांधता येते का? मग खरोखर खांब आणि तुळया झेलणाऱ्या एखाद्या सिव्हिल इंजिनियरला 'लिखाणात वैचारिक व सांस्कृतिक खांब आणि तुळया झेलायला' नाही जमल्या तर काय झालं

पिऱ्या मांग, वय वर्षं अडीच.

Aditya Korde Thu, 19/04/2018 - 21:32

In reply to by पिऱ्या मांग

पटलं बुवा ....आपण आज जी मराठी भाषा बोलतो ती ५० वर्षापूर्वी वापरात होती काय? आणी १०० वर्षांपूर्वी? तेव्हा काय होतं? आज किती जणांच्या बायका पंजाबी ड्रेस नाही तर पंजाबी पोशाख किंवा पेहेराव घालतात? साडी ऐवजी लुगडे किंवा पातळ कोण नेसते? आपण मोटार सायकल वरून(सांप्रत काळी तर बाईक वरून) नव्हे तर स्वयंचलित दुचाकीवरून कितीवेळा जातो? पेट्रोल टाकणे, स्पार्कप्लग बदलणे, पंक्चर काढणे हे मराठीतून कसे सांगणार? आणि ज्याला ते सांगू त्याला समजेल काय? जुनेच पण रोजच्या वापरातले शब्द सुद्धा मराठी नसतात.,जबाब,जबाबदारी, हरकत,घड्याळ, हे शब्द काय मराठी आहेत कि संस्कृत? पण ते वापरताना आज आपल्याला उष्टावाल्यासारखे वाटत नाही. अस्खलित मराठी वापरून आज आपण कुणाशी संवाद साधू शकू? ते सोडा आजच्या विषयांवर तर आपण मराठीत बोलूच शकणार नाहि. मोबाईल, सीडी, पेन ड्राईव,digital, Analogue यांना पर्यायी शब्द मराठीत नाहीत. ते मराठीत नव्याने जन्माला घालायची गरज नाही. फार कशाला ज्या इंग्रजीच्या मराठीतील संसर्गाने हे लोक शहारतात, त्या इंग्रजीच्याच सोवळेपणाबद्दल काय? दरवर्षी ह्या भाषेत साधारण ८५० नवे शब्द सामावले जातात आणि त्यातले फार थोडे इंग्रजी असतात. साधी atomic theory हा शब्द आपण अस्खलित इंग्रजीत वापरुं शकणार नाही atom हा लाटिन आहे तर theory ग्रीक आहे.सरसकट वापरला जाणारा “सामान्यत: एकत्र जमण्याची जागा” अशा अर्थाचा Rendezvous हा शब्द मूळ फ्रेंच आहे. भाषा जिवंत असते म्हणजे तिच्यात सतत बदल घडत असतो आणि तिचा एकूण तोंडावळा तोच राहिला तरी स्वरूप मात्र बदलत असते. नव्हे तोंडावळा सुद्धा बदलतोच.

मराठी वर अतिक्रमण(!) करणाऱ्या भाषांमध्ये इंग्रजीचा जितका दु:स्वास केला जातो तितका इतर कुठल्याही भाषेचा केला जात नाही. जणू मराठीवर अतिक्रमण फक्त इंग्रजीचेच झालेले आहे. बटाटा, टोमाटो, पगार, चावी, हरकत, इस्त्री, आजार इ. शब्द इंग्रजी नाहीत आणि ते मराठीही नाहीत. मुळात इंग्रजी हा शब्दच इंग्रजी नाही तर फारसी आहे.गेल्या १००-१५० वर्षात मराठीच नव्हे तर सर्वच भारतीय भाषांचा इंग्रजीशी संबंध आला म्हणून मराठीवर इंग्रजीचे अतिक्रमण होते असा समज रूढ झाला आहे. कोणत्याही दोन भाषांचा संनिकर्ष अनेक प्रकारांनी होतो. इंग्रज जगभरात अनेक ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणच्या भाषा , संकल्पना शब्द त्यांनी आपल्या भाषेत सामावून घेतले आणि ती भाषा समृद्ध केली आज त्याच्या भाषेतले बहुतांश शब्द परकीय आहेत पण त्यामुळे इंग्रजी मृतप्राय न होता उलट अधिक समृद्ध झाली आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 20/04/2018 - 02:50

In reply to by Aditya Korde

आज किती जणांच्या बायका पंजाबी ड्रेस नाही तर पंजाबी पोशाख किंवा पेहेराव घालतात?

अजूनही मराठीत बायकांना लग्न आणि नवऱ्याशिवाय स्वतंत्र अस्तित्व नाही का? असो.

तुमच्या बायका बहुतेक जुन्या वळणाच्या आहेत; मी कॉलेजात असताना ड्रेस घालायचे; पंजाबी ड्रेस नाही, फक्त ड्रेस. पाश्चात्त्य देशांत राहताना ड्रेस म्हणजे झगा. आता पाश्चात्त्य देशांतही फ्रॉकला ड्रेस म्हणतात, फ्रॉक हा माझ्या लहानपणचा शब्द तिथेही मागे पडला.

मला समजलं त्यानुसार, खोपकर अशा खाचाखोचांबद्दल बोलत आहेत.

'न'वी बाजू Sat, 21/04/2018 - 18:58

In reply to by Aditya Korde

नाही म्हणजे, प्रतिसादाचा एकंदर आशय किंवा रोख पटण्यासारखा आहे; त्याबद्दल वाद नाही. (किंवा, वाद त्याबद्दल नाही.) परंतु,

आज किती जणांच्या बायका पंजाबी ड्रेस नाही तर पंजाबी पोशाख किंवा पेहेराव घालतात?

'पंजाबी ड्रेस' हा मुळात ('दिल्ली राइस'प्रमाणे) मराठी शब्द आहे. मराठमोळ्या मातीत जन्मलेला, अडाणचोट मराठीजनांनी प्रसवलेला. त्याकरिता 'परभाषिक' शब्द 'सलवार-कमीज़' असा आहे. (आणि 'दिल्ली राइस'करिता 'बासमती'.)

मांसाहाराकरिता 'नॉनव्हेजिटेरियन (फूड)' अथवा 'नॉनव्हेज' हा जसा हिंदूइंग्रजी शब्द आहे, तद्वत.

मराठी वर अतिक्रमण(!) करणाऱ्या भाषांमध्ये इंग्रजीचा जितका दु:स्वास केला जातो...

'मराठी वर' नव्हे. 'मराठीवर'. (परंतु कदाचित हा टायपो असावा, हिंदीचे मराठीवरील जाणूनबुजून अतिक्रमण नव्हे, म्हणून सोडून देतो. कारण उर्वरित परिच्छेदात तुम्ही सर्वत्र 'मराठीवर' असे लिहिले आहेत.)

(बाकी,

साडी ऐवजी लुगडे किंवा पातळ कोण नेसते?

बायकांनी साडी नेसण्यावरील नक्की आक्षेप समजला नाही. असो.)

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 21/04/2018 - 20:13

In reply to by 'न'वी बाजू

त्याकरिता 'परभाषिक' शब्द 'सलवार-कमीज़' असा आहे. (आणि 'दिल्ली राइस'करिता 'बासमती'.)

नबा, माझ्या वयाच्या, सुस्थित, उत्तर भारतीय स्त्रिया कॉलेजवयीन असताना पंजाबी ड्रेसला सलवार म्हणत; त्यांचा पूर्ण शब्द सलवार सूट. पण सोयीकरता फक्त सलवार. मला सुरुवातीला शंका वाटायची की या कुडत्याशिवाय फक्त सलवारच घालतात का काय. पण तसं कुठेच दिसलं नाही; सलवारीत ओढणीचाही समावेश होत असे. हल्ली कुडता हा शब्द फारसा भेटत नाही; कुर्ती असते. सलवारही मागे पडत चालली आहे, तिथे लेगिंग येत आहेत. तो फॅशनचा फरक. कुर्ती म्हणजे उंचीला १५-२० वर्षांपूर्वी असायचा त्या कुडत्यापेक्षा जरा आखूड, तंग आणि बहुतेकदा ओढणीशिवाय वापरण्याचं उत्तरीय. लेगिंग म्हणजे पायाला चिकटून बसणारी सलवार. तशी एक पतियाळाही असते, अगदी घोळदार सलवार म्हणजे पतियाळा.

मला बायका नसल्या तरी इतपत माहिती मीही बाळगून आहे हो! :प

बायकांनी साडी नेसण्यावरील नक्की आक्षेप समजला नाही. असो.)

साडी हा शब्द हिंदीतून काही काळापूर्वी मराठीत आला, असं समजतात. त्याआधी मराठी बायका पातळ नेसायच्या. त्याआधी लुगडं - ते बहुतेक नऊवारी असायचं.

मात्र हल्ली साडी घालतात. तेच धोतर आणि लुंगीबद्दलही. आणि त्यावर साडी नेसतात; ब्लाऊज घालतात. शिवलेले कपडे घालतात आणि न शिवलेले कपडे नेसतात, असं सांगत बसावं लागतं. मूळ प्रतिसादात 'साडी नेसण्या'चा उल्लेख करून मराठीचं सौंदर्य जपण्याचा अंशतः प्रयत्न केल्याबद्दल प्रतिसादकर्त्यांचे आभार.

'न'वी बाजू Sat, 21/04/2018 - 20:25

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

साडी हा शब्द हिंदीतून काही काळापूर्वी मराठीत आला, असं समजतात. त्याआधी मराठी बायका पातळ नेसायच्या. त्याआधी लुगडं - ते बहुतेक नऊवारी असायचं.

परंतु मुळात साडी/पातळ/लुगडे ही (एकाच कॅटेगरीतील परंतु) विभिन्न वस्त्रे नाहीत काय?

उदा., (मला वाटते) पातळ नि लुगडे/साडी यांत टेक्श्चरचा फरक आहे. (चूभूद्याघ्या.)

शिवलेले कपडे घालतात आणि न शिवलेले कपडे नेसतात, असं सांगत बसावं लागतं.

शंका: रॅपअरौण्ड स्कर्ट नेसतात की घालतात?

'न'वी बाजू Sun, 22/04/2018 - 03:44

In reply to by पिऱ्या मांग

(च्यायला, मराठमोळ्या गोष्टींसंदर्भात टोपीकराची साक्ष काढावी लागते. इथेच मराठीच्या पराभवाची सुरुवात आहे. पण असो.)

नेसणें (p. 270) nēsaṇēṃ v c To put on (the garments which pertain to the middle part of the body) the धोतर, पंचा, लुगडें, लंगोटी &c. See TO PUT ON in Eng. and Mar. Dict.

किंवा,

नेसण or णें (p. 270) nēsaṇa or ṇēṃ n The dress or clothing of the middle region of the body. 2 Putting on (i. e. the act or the art) of clothes. v कर.

(पण पँट किंवा विजार नेसत नाहीत. म्हणजे, शरीराच्या मध्यभागाभोवती - सरळसरळ 'गांडीभोवती' म्हणायला काय जाते रे तुझे, मोरेश्वरभटा? आँ? - गुंडाळण्याची वस्त्रे तेवढी 'नेसत' नि बाकीची 'घालत' असावेत काय?)

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 22/04/2018 - 09:12

In reply to by 'न'वी बाजू

शंका: रॅपअरौण्ड स्कर्ट नेसतात की घालतात?

साडी, ऱ्यापअराऊंड स्कर्ट आणि असल्या सगळ्याच प्रकारांचं मी जे काही करते, त्याची संभवित दखल 'गुंडाळणं' या शब्दातून घेतली जाते. मलाही तेच सोयीचं वाटतं.

चिंतातुर जंतू Sun, 22/04/2018 - 15:25

In reply to by 'न'वी बाजू

'पंजाबी ड्रेस' हा मुळात ('दिल्ली राइस'प्रमाणे) मराठी शब्द आहे. मराठमोळ्या मातीत जन्मलेला, अडाणचोट मराठीजनांनी प्रसवलेला. त्याकरिता 'परभाषिक' शब्द 'सलवार-कमीज़' असा आहे. (आणि 'दिल्ली राइस'करिता 'बासमती'.)

दिल्ली राईस म्हणजे बासमती नव्हे. ज्यांना बिर्याणी-पुलाव वगैरेंमध्ये बासमती परवडत नसे त्यांच्यासाठी शिजवल्यावर दाणा-दाणा मोकळा होणारा तो एक पर्याय होता (कदाचित अजूनही असेल). त्याला बासमतीचा गंध नसे.

धनंजय Thu, 19/04/2018 - 05:09

सहमतीचा भाग :
एक शैक्षणिक तत्त्व म्हणून योग्य वाटते. शाळेत जर अनेक भाषा-विषय शिकवत असतील, तर प्रत्येक भाषेतील खास अर्थछटांचा प्रयोग धड्यांत शिकवावा. असे करण्यात योजनाबद्ध धडे बनवायची, चाचण्या करायची मोठीच सोय होईल, आणि कधीकधी त्या-त्या एकाच भाषेत निपुण असलेले वेगळे शिक्षक असले, तर अशा शिक्षकांकरवी वेगवेगळ्या तासांत कार्यक्षम रीतीने धडे देववता येतील.
परीक्षेत अर्थछटांचा योग्य वापर करणाऱ्या लेखनाला अधिक गुण मिळावेत, हेसुद्धा या तत्त्वानुसार ठीक राहील.
---------------------
असहमतीचा भाग :
पण खोपकरांचा अनुरोध सुविद्य लोकांच्या सहजसंवादाबाबत आहे. त्याबाबत मी तितकासा सहमत नाही. ते म्हणतात : "आता चाळिशीच्या खालच्या पिढी...ची वक्तव्ये ऐकतो तेव्हा अंगावर शहारा येतो."
त्यांनी त्यांच्या पिढीतली जी नावे घेतली, त्या तोडीचे (किंवा वर्धिष्णू) कुशल, विशेषज्ञ आणि कलात्मक लोक आजही आहेतच, ना -- अशा मित्रमंडळातली चर्चा घ्या. अशा संवादातही लोक एकमेकांना अर्थांचे बारकावे पोचवू शकतात, असा माझा कयास आहे.

माझी अशी शंका आहे, की खोपकर आपल्या आठवणीतील पूर्वीच्या काव्यशास्त्रविनोदाची तुलना आजच्या टपोरी गप्पांशी करत आहेत, आणि त्यांना तुलनेत आज अर्थदारिद्र्य जाणवत आहे. परंतु आजच्या अर्धशिक्षित गप्पांची तुलना मागच्या पिढीतल्या अर्धशिक्षित गप्पांशी करावी. आजच्या काव्यशास्त्रविनोदाची तुलना मागील पिढीतील काव्यशास्त्रविनोदाशी. अर्थांमध्ये भकास गरिबी, श्रीमंती अनुक्रमे तुल्य असेल, असा माझा कयास आहे.

खोपकर असेही म्हणतात : >>आता चाळिशीच्या खालच्या पिढीचे लेखन जेव्हा वाचतो .... तेव्हा अंगावर शहारा येतो. यांना न इंग्रजी येते न मराठी. व्यावहारिक साक्षऱता म्हणावी इतकीच भाषेची जाण.
येथेसुद्धा ते कामचलाऊ लेखनाबाबत बोलत असावेत, काळजीपूर्वक केलेल्या लेखनाबाबत नव्हे. सध्याच्या इंग्रजी-मराठी मिश्र लेखनाचे उदाहरण घ्यावे, तर गणेश मतकरी यांनी लिहिलेल्या शहरी उच्च वा मध्यमवर्गाच्या पार्श्वभूमीवरील लिहिलेल्या काही कथा तशा बोलीत लिहिलेल्या आहेत. तरी त्या कथांमध्ये घटनांची आणि भावनांची गुंतागुंत चांगलीच उकलून दाखवलेली आहे. असे लेखन म्हणजे नुसती व्यावहारिक साक्षरता नव्हे. इंग्रजी कळणे आणि मराठी कळणे, हे दोन्ही मुद्दे निःसंदर्भ आहेत. लेखनातसुद्धा आजच्या जाहिरातीतील निकृष्ट लेखनाची तुलना त्या काळच्या जाहिरातींशी, आणि गुंतागुंतीच्या कादंबऱ्यांची तुलना तशाच कादंबऱ्यांशी केली पाहिले. लेखनातही पूर्वीच्या आणि सध्याच्या काळात अर्थांमध्ये भकास गरिबी, श्रीमंती अनुक्रमे तुल्य असेल, असा माझा कयास आहे.

माझ्या कयासाकरिता आधार भाषाविज्ञानातील क्रियोलीकरणाचा आहे. गुलामगिरी किंवा तत्सम स्थलांतरानंतर वेगवेगळ्या मायबोलींचा मिश्र समाज कामचलाऊ पण अर्थदरिद्री पिजिन बोली बोलतात. पण एखाददोन पिढ्यांत त्यांपासून गुंतागुंतीच्या क्रियोल बोली प्रचलित होतात.

माझे असे प्रतिपादन आहे : समाजाचा काही भाग स्थिर, काही भाग विस्थापित अशा भारतीय/मराठी समाजात काय परिस्थिती उद्भवेल? एकाच वेळी काही क्षेत्रांत किमान संवाद साधणाऱ्या पिजिन बोली, तर काही क्षेत्रांत बहुपदरी अर्थवाही क्रियोल बोली प्रचलित असतात. पिढीपिढीची तुलना करायचीच, तर तुल्याची तुल्याशी करावी.

---
असा काही निराश विचार मनात येता पतञ्जलीचे हे म्हणणे जरूर आठवावे :

घटेन कार्यम् करिष्यन् कुम्भकारकुलम् गत्वा आह कुरु घटम् । कार्यम् अनेन करिष्यामि इति । न तद्वत् शब्दान् प्रयोक्ष्यमाणः वैयाकरणकुलम् गत्वा आह । कुरु शब्दान् । प्रयोक्ष्ये इति । तावति एव अर्थम् उपादाय शब्दान् प्रयुञ्जते ।

घड्याने कार्य करू बघणारा कुंभाराकडे जाऊन म्हणतो "घडा बनव." या घड्याने मी कार्य करीन. शब्द वापरू बघणारा त्याप्रमाणे व्याकरणकाराकडे जाऊन म्हणत नाही की "शब्द बनव, ते वापरीन." लगेच अर्थानुसार शब्द वापरतो.

पतञ्जली सांगतो आहे, की अर्थ सांगायचा असेल, तर बोलणारा काही ना काही आंतरिक युक्तीने शब्द योजेल आणि अर्थ सांगेलच. त्यापुढे माझे म्हणणे आहे, की नुसतेच कामचलाऊ अर्थ सांगणे आवश्यक असेल, तर पिजिन मिश्रबोलींच्या साध्या युक्त्या पुरतील. गुंतागुंतीचे पदर असलेले अर्थ सांगायचे असतील, तर क्रियोल मिश्रबोलींच्या वेगळ्या युक्त्या वापरणे भाग पडेल.
अमुक काही भाषाप्रयोग अर्थदरिद्री आहे, की श्रीमंत? हे ठरवण्याकरिता त्या-त्या संवादाचे वास्तव जोखावे -- त्याची पार्श्वभूमी आणि श्रोत्यावरील परिणाम निरखावे. भाषा मिश्र आहे, ही इतकीच खूण मानून तेवढ्यावरून अर्थदारिद्र्याचा निष्कर्ष काढू नये.

चिंतातुर जंतू Thu, 19/04/2018 - 13:56

In reply to by धनंजय

माझी अशी शंका आहे, की खोपकर आपल्या आठवणीतील पूर्वीच्या काव्यशास्त्रविनोदाची तुलना आजच्या टपोरी गप्पांशी करत आहेत, आणि त्यांना तुलनेत आज अर्थदारिद्र्य जाणवत आहे.

खोपकर असेही म्हणतात : >>आता चाळिशीच्या खालच्या पिढीचे लेखन जेव्हा वाचतो .... तेव्हा अंगावर शहारा येतो. यांना न इंग्रजी येते न मराठी. व्यावहारिक साक्षऱता म्हणावी इतकीच भाषेची जाण. येथेसुद्धा ते कामचलाऊ लेखनाबाबत बोलत असावेत, काळजीपूर्वक केलेल्या लेखनाबाबत नव्हे.

खोपकरांनी तुलना कशाशी केली आहे, ते मी सांगू शकत नाही. पण माझ्या वाचनानुभवातून एवढं मात्र नक्की सांगू शकतो, की अगदी साहित्याला वाहिलेल्या प्रतिष्ठित नियतकालिकांतली आजची भाषा किंवा प्रतिष्ठित प्रकाशनांनी प्रकाशित केलेल्या आणि साहित्याचे पुरस्कार मिळालेल्या पुस्तकांमधली आजची भाषा ही खूपशी बेढब आहे. मी हे केवळ इंग्रजीमिश्रित असण्याविषयी म्हणत नाही, तर आशयाला अनुरूप विशिष्ट शैली आणि शब्दकळा हेतुपुरस्सर आणि सातत्यानं त्यात वापरली आहे, असं क्वचितच जाणवतं. म्हणजे खोपकरांच्या लेखातल्या भाषेच्या अनुनयाच्या मुद्द्याला अनुषंगून मी हे म्हणतो आहे.

धनंजय Thu, 19/04/2018 - 15:43

In reply to by चिंतातुर जंतू

बेढबपणा हा वेगळा मुद्दा आहे. आणि स्वतंत्रपणे चर्चिण्यालायकसुद्धा आहे. परंतु द्वैभाषिक मिश्रणाशी संबंधित नसेल, तर या धाग्यावर चर्चा फारच सैल होईल असे वाटत नाही का?

"अनुनय" हे शीर्षक मला पटलेले नाही. शिक्षकांचा विद्यार्थ्यांचे (कमी गुण देऊन, वगैरे) अनुशासन करण्याचा अवसर असतो. पहिल्या परिच्छेदात मी त्याबाबत सहमती दिली आहे. लेखकाला थेट शिस्त लावण्याकरिता मी फारतर काय करू शकतो? पुस्तक विकत न घ्यावे. गेल्या दहाबारा महिन्यात मी एकही मराठी पुस्तक विकत घेतलेले नाही. ... माझ्या विश्लेषणाचा आणि लेखकांपुढे फाजिल नमते घेऊन त्यांना शिस्त न लावण्याचा काही संबंध नाही.

चिंतातुर जंतू Thu, 19/04/2018 - 15:52

In reply to by धनंजय

द्वैभाषिक मिश्रणाशी संबंधित नसेल, तर या धाग्यावर चर्चा फारच सैल होईल असे वाटत नाही का?

माझ्या मते खोपकरांनी त्यांच्या लेखात लावलेला संबंध असा आहे : इंग्रजी शब्द वाटेल तसे मिसळणं ह्यात एक भाषिक निष्काळजीपणा आहे. म्हणजे ते एका बेपर्वा प्रवृत्तीचं लक्षण आहे. तो रोग नाही.

'अनुनय' हा शब्द ते appeasement या अर्थानं नव्हे, तर courtship किंवा courting या अर्थानं वापरत आहेत. म्हणजे भाषेवर प्रेम करावं आणि प्रेमाचा एक भाग म्हणून भाषारूपी प्रियकराचा/प्रेयसीचा अनुनय करावा.

धनंजय Thu, 19/04/2018 - 21:55

In reply to by चिंतातुर जंतू

>>इंग्रजी शब्द वाटेल तसे मिसळणं ह्यात एक भाषिक निष्काळजीपणा आहे. म्हणजे ते एका बेपर्वा प्रवृत्तीचं लक्षण आहे.

सावध होण्याकरिता भाषिक लकबी लक्षणे म्हणून वापरावीत, हे तर चांगले धोरण आहे. "Politics and the English Language" निबंधात जॉर्ज ऑर्वेलने असेच केले आहे. परंतु नुसत्या भाषिक लकबींकडे निर्देश न करता ऑर्वेल सोदहारण दाखवून देतो, की अर्थाचा ऱ्हास होतो. शब्दबंबाळ वाक्यांत कधी-कधी अंतर्गत तर्कदुष्टता/आत्मखंडन येते. एखाद्या दुष्ट घटनेचा निषेध करताना समर्थन केल्यासारखे होते, वगैरे.
खोपकरांच्या लेखात मला ते पुढचे पाऊल घेतलेले दिसत नाही. लक्षणामुळे सावध झाल्यानंतर आपण मराठीत तपासावे, की संवादक खरोखर बेपर्वा आहेत का? संवादक एकमेकांत करत असलेल्या अर्थांची देवाणघेवाण अकार्यक्षम असेल, गैरसमज होत असतील, तर बेपर्वाई सिद्ध होईल. नाहीतर एवढेच सिद्ध होईल, की लक्षण संदिग्ध आहे, हमखास बेपर्वाई दाखवत नाही.
---
'अनुनय'बाबत खोपकरांचे वाक्य नजरचुकीने वाचायचे राहून गेले होते -- त्याचा अर्थ बरोबर आहे. मला चुकून वाटले, की उपप्रतिसादाच्या शीर्षकात तो शब्द पहिल्यांदा आला, या गैरसमजुतीतून मी "पटले नाही" म्हटले, क्षमस्व.

चिंतातुर जंतू Fri, 20/04/2018 - 13:55

In reply to by अमुक

'अनुनय'ला विविध अर्थच्छटा आहेत. विश्वकोश परिभाषा कोशात courtshipसाठी मराठी प्रतिशब्द म्हणून 'अनुनय' आणि 'प्रियाराधन' दिले आहेत. मला courtship खोपकरांच्या आशयाच्या जवळ जाणारी अर्थच्छटा वाटली.

राही Sun, 22/04/2018 - 17:35

In reply to by धनंजय

खोपकरांनी पूर्वीचे आणि आताचे जे भाषक गट निवडले आहेत ते समतुल्य नाहीत. एकाच भाषेतल्या समकालीन विभिन्न भाषक गटांची बोली भाषासुद्धा कधीच समान नव्हती. प्राचीन संस्कृत नाटकांतही वेगवेगळ्या पात्रांची भाषा वेगवेगळी असे.

घाटावरचे भट Thu, 19/04/2018 - 11:21

मराठी आता इतकी मिश्रभाषा झाली आहे की कोणाला जर अजूनही जुन्या वळणाच्या मराठीतून संभाषण ऐकायचं असेल तर भूतकाळातच जावं लागेल. शिवाय हे बदल आता एखाद्या फेसबुक पोस्टमुळे रिसेट बटन दाबल्यासारखे अदृष्य होतील ही अपेक्षाही भाबडी आहे.

बाकी

सुराप्रमाणे लिहिण्याची भाषा, बोलण्याची भाषा कमवायला लागते. तिचा रियाज करावा लागतो. तिच्या श्रुतींतली अंतरे कानांना कळावी आणि जिभेतून वळावी लागतात.

ही दोन वाक्ये भलतीच आवडली

बॅटमॅन Thu, 19/04/2018 - 13:19

पूर्ण लेखच आवडला. फेसबुकावर अर्थातच नावासकट शेअर केलेला आहे. मराठीप्रेमी असलो तरी देशीवादी अर्थात अडाणचोटवादी आणि अनेक उत्तम गोष्टींबद्दल अज्ञानजन्य तुच्छतावादी मी नाही.

अनुप ढेरे Thu, 19/04/2018 - 14:23

आता चाळिशीच्या खालच्या पिढीचे लेखन जेव्हा वाचतो, त्यांची वक्तव्ये ऐकतो तेव्हा अंगावर शहारा येतो. यांना न इंग्रजी येते न मराठी. व्यावहारिक साक्षऱता म्हणावी इतकीच भाषेची जाण.

एवढी पण जाण नसावी अनेकांना. गेल्या काही महिन्यात मला जाणवलेली एक छोटी गोष्ट. रिक्षावाले किंवा क्याबवाले यातल्या अनेकांना डावीकडे/उजवीकडे हे शब्द समजत नाहीत. लेफ्ट/राईट असं सांगावं लागतं. हा अनुभव इतर कोणाला आला आहे काय?

बॅटमॅन Thu, 19/04/2018 - 17:31

In reply to by अनुप ढेरे

अतिसहमत ढेरेशास्त्री. डावंउजवं "बोललेलं" कैकांना कळत नाही.

म्हणणे या क्रियापदाची जागा सांप्रत काळी बोलणे या क्रियापदाने घेतलेली आहे.

अभ्या.. Thu, 19/04/2018 - 17:46

In reply to by बॅटमॅन

अगदी अगदी शास्त्री.
ह्या अनुभवासाठी पैसे पण घालवायची वेळ आलेली आहे पुण्यात.
मान्य आहे माझे मॅपिंग गंडलेले आहे पण सरळ सांगितलेला पत्ता (सरळ चौकात या, डाव्या हाताला वळा, २० मीटरवर छोट्या चौकात वळून सरळ ५० मीटर या. स्टेटबँकेच्या एटीएम समोर मी लाल शर्ट घालून थांबलो आहे.) हापण कॅबवाल्यांना कळत नाही. त्यांची समजून घ्यायची प्रवृत्तीच नसते की ऐकलेले कळत नाही की फक्त लिमिटेड मराठी येते हेच कळत नाही. बऱ्याच वादावादीनंतर त्यांना पत्ता सापडत नाही. ओलावाले कॅन्सल्ड बुकींगची रक्कम दुसऱ्यावेळी कापून घ्यायला आहेतच.
तरुण पोरांची(हो, आम्ही काका लोक्स आता) वापरभाषा पाहता फक्त काही मराठीतले चमकदार शब्द आणि बबन घरी जा अशा टाईपची मराठी समजते. कित्येक शब्दांचा अर्थ, वापर कसा करायचा हेही कळत नसते. सांगायला गेले की एकतर हसण्यावर नेले जाते अन्यथा समजले ना तुम्हाला, आम्हाला काय म्हणायचेय ते इतक्यावर काम भागवले जाते.

धनंजय Thu, 19/04/2018 - 20:15

In reply to by बॅटमॅन

"बोलणे"चा या अर्थाने उपयोग संतवाङ्मयातही दिसतो ना? (असा सोदहारण उल्लेख कुठेतरी वाचला होता. संदर्भ धुंडाळावा लागेल.)

राही Sun, 22/04/2018 - 17:50

In reply to by बॅटमॅन

सांप्रतकाळी ' बोलणे' या शब्दाचे पुनरुज्जीवन होते आहे. जुन्या मराठीत अगदी यादवकाळापासून पंडित कवींपर्यंत हा शब्द पुष्कळ वेळा आढळतो. " येरु बोले पाहीन पिता माझा, माय बोले ' मारील राजभाजा' , " बोलावा विठ्ठल, स्मरावा विठ्ठल", " बोल बाई बोल ग, तुझ्या बोलाचे काय वानू मोल ग" , " बोला, अमृत बोला", " बोला पुंडलीकवरदे हरी विठ्ठल" वगैरे. 'भणितले' ('भण' - संस्कृत ज्यावरून म्हण हे क्रियापद आलेले असू शकते,) हे क्रियापद लीळाचरित्रात अधिक वेळा येते. बाकी फार कुठे आढळत नाही.

घाटावरचे भट Fri, 20/04/2018 - 09:54

In reply to by अनुप ढेरे

ह्या लोकांना, म्हणजे मुख्यत: ओला/उबरवाले आणि ॲमेझॉन/फ्लिपकार्टचे लोक यांना उजवं-डावं समजत नाही. त्यांना 'चौकात पुढे आल्यावर फस लेफ्ट मग सेकंड राईट, लेफ्ट साईटची पिवळी बिल्डिंग' अशीच भाषा समजते.

चिमणराव Thu, 19/04/2018 - 14:24

मला आवडतात भाषा शिकायला. पर्यटनात उपयोग होतो. सामान्य जनतेशी संपर्क करण्यासाठी बोलता यावी, मोठी भाषणं करायची नसतात.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 19/04/2018 - 20:14

गणेश मतकरींच्या कथांबद्दल दिलेलं उदाहरण मला गमतीशीर वाटलं. त्यांची स्वतःची व्यक्त होण्याची भाषा मिश्र असावी, असाही माझा अंदाज आहे.

मला स्वतःला भाषा विषयांत फार गती नाही; मराठी आणि इंग्लिशपेक्षा दीड वर्षांपूर्वी शिकायला घेतलेली पायथन सोपी वाटते. पण मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषांचं ऋण मला मान्य आहे.

काही वर्षांपूर्वी एक खगोलशास्त्री-जोडपं भेटलं. दोघांनीही आमच्या संस्थेत स्वतंत्र व्याख्यानं दिली, इंग्लिशमध्ये. त्यांचं इंग्लिशही चांगलं होतं. ते दोघे फ्रेंच आणि जर्मन; गेली अनेक वर्षं नेदरलँड्समध्ये राहतात. त्यांची मुलं नेदरलँड्समध्येच जन्माला आली. मला फारच कुतूहल वाटलं, म्हणून विचारलं, "तुम्ही घरात कोणत्या भाषेत बोलता?" त्यांचं उत्तर असं काहीसं, "आम्ही एकमेकांच्या भाषा शिकलो. विद्यापिठात असताना इंग्लिश सुधारलं होतंच. पण मुलं झाल्यावर घरात नियम केला, वाक्य ज्या भाषेत सुरू केलं त्या भाषेतच संपवायचं. आम्हांला सगळ्यांनाच आता चार भाषा - फ्रेंच, डच, जर्मन, इंग्लिश - बऱ्यापैकी येतात." (मध्यंतरी फेसबुकवर एका ठिकाणी हाच संवाद लिहिला होता; त्याचं कारण मतकरींची मिश्र भाषा हेच होतं.)

मला तो नियम फारच आवडला. कितीही भीषण मराठी आणि इंग्लिश बोलले तरीही ज्या भाषेत वाक्य सुरू केलं त्याच भाषेत संपवायचा प्रयत्न करते. अमेरिकेत राहत असताना इंग्लिश वाक्यं इंग्लिशमध्येच संपवण्याला पर्याय नसतो. तरीही बोलताना कधीमधी 'grass leaves' असे प्रयोग होतात (grass blades हे योग्य इंग्लिश.) मात्र मराठी बोलताना फक्त मराठीच बोलायचं, याची अशी सक्ती नसते.

माझ्या आजूबाजूचे लोक 'वॉक घ्यायला जातात', त्यांना 'संडेला सुट्टी असते' आणि ख्रिसमस किंवा उन्हाळी सुट्ट्यांत 'इंड्या ट्रिप करतात'. रिक्षावाले लेफ्ट-राईटला वळतात हे ठीकच; पण हे शिकले-सवरलेले, आणि ज्यांचं अनुकरण करायला इतर समाजगट उत्सुक आहेत असे लोकही मिश्र भाषा वापरतात. अशी भाषा वापरण्याबद्दल त्यांना 'जरा बरं बोला की!' असं सुचवून बघण्याचा ट्रोलीय लुत्फ लुटता आला तर पाहा बुवा! मागे एका ठिकाणी 'तुम्ही अभ्यास न करता, बेमुर्वतपणे भाषा कशीही वापरता आणि मी त्याला पाठिंबा देऊ शकत नाही' असं लिहिलं होतं. त्यातून संस्थळचालकांच्या भावना दुखावण्याचा लुत्फ मला लुटता आला.

मात्र 'पटलं तर शेअर करा' किंवा 'आवडलं तर लाईक हाणा' अशी भाषा मला आवडते; त्यांतला विचार मला अप्रिय वाटतो आणि ती भाषाही माझी नाही. दोन नकारांतून होकार तयार व्हावा तसा हा डांबरट प्रकार मला आवडतो.

धनंजय Thu, 19/04/2018 - 20:52

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

"ब्लेड्स ऑफ ग्रास" हा सध्याचा प्रचलित उपयोग निवडणे, हे धोरण योग्य आहे, तरी हे प्रसिद्ध पुस्तक मनातल्या मनात आठवले तर चालेल :
Leaves of Grass

मारवा Mon, 14/05/2018 - 20:49

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तरीही बोलताना कधीमधी 'grass leaves' असे प्रयोग होतात (grass blades हे योग्य इंग्लिश.)
पण हे आठवल
https://en.wikipedia.org/wiki/Leaves_of_Grass
म्हणजे Walt Whitman हा थोर कवी असुनही अमेरीकन होता म्हणून हे नाव ही चुकलेल्यातच गणले जाते का ?
एक सहज प्रश्न.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 30/05/2018 - 07:32

In reply to by मारवा

इंग्लिश ही माझी मातृभाषा नाही; मी इंग्लिश बोलणाऱ्या समाजात वाढले नाही; त्यामुळे ती संस्कृतीही मला नीटशी समजते असा माझा दावा नाही. (हल्ली येताजाता 'फॉरीनर कार्ड' वापरून समजून घेण्याचा प्रयत्न करते.)

कदाचित धनंजय याबद्दल आणखी सांगू शकेल (त्यानं आधीच विटमनच्या 'लीव्ह्ज ऑफ ग्रास'चा दुवा दिलेला आहे.) विटमननं असा उल्लेख मुद्दाम केला का, त्यामागे काय कारण होतं, वगैरेंत मला रस आहे. विटमनचं नाव 'ब्रेकिंग बॅड'मुळे ऐकलं इतपत मी सांस्कृतिक-गरीब आहे.

'न'बागिरी - जॉर्जिया ओ'कीफचं नावही मी ब्रेकिंग बॅडमुळेच पहिल्यांदा ऐकलं. मात्र तिची बरीच चित्रं प्रत्यक्षात बघितली; आणखी बरीच जालावर बघितली; आणि तिच्याबद्दल थोडं वाचनही केलं.

धनंजय Wed, 30/05/2018 - 21:52

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विकी म्हणे की "Leaves of Grass" श्लेष आहे :
>>The title Leaves of Grass was a pun. "Grass" was a term given by publishers to works of minor value, and "leaves" is another name for the pages on which they were printed.
https://en.wikipedia.org/wiki/Leaves_of_Grass

मला हा श्लेष असल्याचे ठाऊक नव्हते -- कवी स्वतःच्या प्रतिभेच्या आत्मविश्वासाने नेहमीच्या वापरापेक्षा वेगळे शब्दप्रयोग कधीकधी करतात, त्यांच्यामुळे वाचकांना त्या शब्दांपाशी थबकून अधिक विचार करावासा वाटतो, रसग्रहणाकरिता अवसर मिळतो... असे इतकेच माझ्या मनात आले.

भटक्या कुत्रा Fri, 20/04/2018 - 00:47

भाषा ही नावीन्यतेने विकसित होत जाते. आता जर तुम्हाला कोणी
लिळाचरित्र वाचायला दिले तर?समजेल का लगेच? खुद्द महाराजांच्या पत्रात किती व्याकरण चूकिच* आहे?
जसे मराठी/संस्कृत शब्द Oxford dictionary मध्ये जातात, फारसी-अरबी शब्द मराठीत आलेत ना.
करावी भाषाशुद्धी नवीन कसोटीवर जशी शिवाजी महाराजांनी(राजव्यवहारकोष) आणि सावरकरांनी केली तशी, पेनड्राईव्ह साठी पर्यायी शब्द द्या पहिले*.

भ कु
वय वर्ष २२
&*आजच्या व्याकरण वर आधारीत

'न'वी बाजू Sat, 21/04/2018 - 18:21

In reply to by भटक्या कुत्रा

भाषा ही नावीन्यतेने विकसित होत जाते.

भाषा कशाने विकसित होते ते तूर्तास सोडा, परंतु 'नावीन्यता' या शब्दाने भाषा विकसित झाली, की तिची अधोगती झाली, हा मूलगामी प्रश्न आहे.

एक तर 'नावीन्य' म्हणा, नाहीतर 'नवीनता' म्हणा. 'घोडा' आणि 'चतुर' दोन्ही म्हटल्याने स्मार्ट घोडा पैदा होत नाही.

खुद्द महाराजांच्या पत्रात किती व्याकरण चूकिच* आहे?

&*आजच्या व्याकरण वर आधारीत

महाराजांच्या पत्रातील व्याकरण तूर्तास सोडा. 'चूकिच' (झालेच तर 'आजच्या व्याकरण वर') हे आजच्या व्याकरणाच्या आधारावर चुकीचे आहे की बरोबर, हे ठरवायला मुळात आजच्या व्याकरणाचे नियम नक्की काय आहेत, ते सांगा, म्हणजे तपासता येईल. (तसेच, 'आधारीत'मधील शुद्धलेखन तपासण्यासाठी आजच्या शुद्धलेखनाचे नियम.)

करावी भाषाशुद्धी नवीन कसोटीवर जशी शिवाजी महाराजांनी(राजव्यवहारकोष) आणि सावरकरांनी केली तशी, पेनड्राईव्ह साठी पर्यायी शब्द द्या पहिले*.

देणार नाही.

शिवाजीमहाराजांचे माहीत नाही, परंतु सावरकरांना नव्हते उद्योग, म्हणून नाही नाही त्या शब्दांना उगाच पर्यायी शब्द देत सुटले. पेनड्राइव्ह हा माझ्या लेखी (आजमितीस तरी) मराठी शब्द आहे, सबब त्याकरिता 'मराठी' प्रतिशब्द पुरविण्याची गरज मला भासत नाही. (बटाट्याप्रमाणेच पेनड्राइव्हसुद्धा महाराष्ट्रात उद्भवली नाही. त्यामुळे, त्या चीजवस्तूबरोबरच ज्या लोकांमार्फत त्या चीजवस्तूची ओळख आम्हांस झाली, त्यांनी त्याकरिता आणलेले नावसुद्धा बटाट्याप्रमाणेच आमच्या मगदुरानुसार जसेच्या तसे किंवा अपभ्रष्ट स्वरूपात उचलण्यास आम्हांस अडचण आली नाही. आणि, तसेच सहज सुचले असते आणि रुळले असते, तर आगगाडी किंवा झुकझुकगाडीप्रमाणेच आम्ही त्या चीजवस्तूस नाव दिलेच असते. परंतु, नाही दिले तर मुद्दाम कष्ट घेऊन ते देण्याची गरज आम्हांस भासत नाही; त्यात काही गैर किंवा अनिष्ट आहे, असे आम्हांस वाटत नाही.)

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 21/04/2018 - 19:58

In reply to by 'न'वी बाजू

शिवाजी महाराजांचे पूर्वज सिसोदिया म्हणजे राजस्थानी होते, अशाही गोष्टी अधूनमधून कानावर येतात. त्यामुळे मुळात शिवाजी महाराजही मराठी नव्हते, पण तरीही ते मराठीच; असंही म्हणता येईल. आणि पुरेसं भूतकाळात जायचं तर आपण सगळेच आफ्रिकी लोक.

योग्य मराठी-प्रतिशब्द सुचवण्याच्या कामाला 'चोळी शिवायला टाकली आहे', असं काही मैत्रमंडळात, खाजगीत म्हटलं जातं. अशा वाक्‌प्रचारांसाठी सावरकर स्वप्नांत येण्याची गरज नसते.

'न'वी बाजू Sat, 21/04/2018 - 20:16

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

योग्य मराठी-प्रतिशब्द सुचवण्याच्या कामाला 'चोळी शिवायला टाकली आहे', असं काही मैत्रमंडळात, खाजगीत म्हटलं जातं.

हल्ली बायका चोळी घालत नाहीत, हे लक्षात घेता, अतिशय चपखल वाक्प्रचार आहे. बोले तो, उगाच काही जुने उकरून काढून आजच्या परिस्थितीला बसवायचे. (तेच ते, संस्कृतातून वगैरे.) अर्थात रेट्रोफिटिंग.

(अय्या! म्हणजे सावरकर चोळी शिवायचे?)

तिरशिंगराव Sat, 02/06/2018 - 15:53

In reply to by 'न'वी बाजू

हा शब्द टिकवून ठेवलाच पहिजे. नाहीतर पुढच्या पिढ्यांना, दादा कोडक्यांचे विनोद कसे समजतील ?

मारवा Mon, 14/05/2018 - 20:51

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि पुरेसं भूतकाळात जायचं तर आपण सगळेच आफ्रिकी लोक.

आणि पुरेसं नितीत जायचं तर आपण सगळेच बहीण भाऊ !

चिंतातुर जंतू Fri, 20/04/2018 - 14:07

लेख केवळ इंग्रजीमिश्रित मराठीविषयीचा त्रागा व्यक्त करतो असा समज करून घेतल्यामुळे काहींचा गोंधळ उडताना दिसत आहे. उदा. ज्या कोलटकरांबद्दल खोपकर बोलतात त्या कोलटकरांनी 'डेंजर वारा सुटलाय' अशी कविता लिहिली आहे. त्यात अनेक इंग्रजी शब्द आहेत. खोपकरांचा त्याला आक्षेप नाही, कारण तिथे कवितेच्या आशयाला खुलवण्यासाठी इंग्रजी शब्दांची निवड हेतुपुरस्सर आहे, हे अगदीच स्पष्ट आहे.

शिवाय, लेखात भाषेसाठी वापरलेली अनेक विशेषणंही ह्याची ग्वाही देतात. उदा. 'रसाळ, अर्थपूर्ण आणि साधे पण नेटके मराठी', 'नादमधुर आणि सरळ मराठी', 'सुरेख, अर्थवाही आणि नेमके मराठी', '[भाषेचा] तोल न जाऊ देता, तिचा रेखीवपणा आणि सुरेलपणा यांचा मान राखून वापर' वगैरे. आणि अर्थात -

भाषांचा योग्य मिलाप होतो तेव्हा खानदानी अरबी घोडे जन्माला येतात.

त्यामुळे मिलाप होऊच नये असा काही तरी हा हेकट आग्रह आहे, असं मी तरी मानत नाही.

धनंजय Sat, 21/04/2018 - 08:30

In reply to by चिंतातुर जंतू

खोपकरांनी उदाहरणे दिलेली नाहीत ही बाब त्यांच्या लेखाला अकार्यक्षम बनवते. ... तुम्ही आजकालची बेढब उदाहरणे स्वतःहून आठवून त्यांचे म्हणणे मान्य करता. मी डौलदार आधुनिक उदाहरणे आठवून त्यांच्या मुद्द्यांबाबत शंका व्यक्त करतो. ... त्यांनी त्या पूर्वसूरींची तुलना नेमकी कोणाशी केली आहे? ... मर्ढेकरांच्या भाषेला त्या काळात बेढब म्हणणारे, आणि सोलंकींच्या भाषेला आज बेढब म्हणणारे यांच्या धारणेतला काय मूलभूत फरक आहे? खोपकरांना आजच्या लेखकांत एकही चांगला/ली सापडू नये? सापडला, तर या चांगल्या लेखकाची तुलना त्या काळच्या चांगल्या लेखकांशी करावी. आज जर त्यांना एकही चांगला/ली लेखक सापडत नसेल, तर त्यांनी स्वतःला मर्ढेकरांच्या भाषेला बेडौल म्हणणाऱ्यांचा आधुनिक अवतार मानून आशावाद जागवावा, की त्यांना ओळखू सुद्धा न येणारा डौल ओळखू शकणारे लोक पुढल्या पिढीत उपजत आहेत.

चिंतातुर जंतू Sat, 21/04/2018 - 12:04

In reply to by धनंजय

खोपकरांनी उदाहरणे दिलेली नाहीत ही बाब त्यांच्या लेखाला अकार्यक्षम बनवते. ... तुम्ही आजकालची बेढब उदाहरणे स्वतःहून आठवून त्यांचे म्हणणे मान्य करता. मी डौलदार आधुनिक उदाहरणे आठवून त्यांच्या मुद्द्यांबाबत शंका व्यक्त करतो.

खोपकरांना आजच्या लेखकांत एकही चांगला/ली सापडू नये? सापडला, तर या चांगल्या लेखकाची तुलना त्या काळच्या चांगल्या लेखकांशी करावी.

खोपकर विदा देत नाहीत हे ठीक आहे. ती त्यांची पद्धत / शैली नाही, असं वादापुरतं मान्य करू. मात्र, भाषा डौलदार असावी असा आग्रह एके काळी लेखक, संपादक, प्रकाशक इथपासून ते शाळाशिक्षकही धरत असत. असे पुष्कळ सापडतात - 'मौज', 'सत्यकथा'पासून ते अगदी आकाशवाणी आणि वर्तमानपत्रांसारख्या प्रसारमाध्यमांपर्यंत हे दिसत असे. आज मात्र असा आग्रह धरताना (खोपकरांसारखे काही 'त्या काळात रमलेले म्हातारे' सोडता) कुणी दिसत नाहीत; तसा तो धरला, तर चेष्टाच अधिक होते, हे अगदी उघड आहे. हा वातावरणातला फरक आहे. अशा वातावरणात एखादा चांगला लेखक सापडतच नाही, असं नाही; मात्र, सापडला, तर तो अपवाद ठरतो. त्याच्या असण्यामुळे वातावरण बदलत नसतं. ते वातावरण रोज एफएम रेडिओवरून, वर्तमानपत्रातून, ते साहित्याला वाहिलेल्या मराठी नियतकालिकांपर्यंत सगळीकडून आदळत असतं. त्यात साहित्य अकादमी किंवा इतर प्रतिष्ठित पुरस्कारप्राप्त साहित्यिकही आहेत.

फूलनामशिरोमणी Tue, 24/04/2018 - 19:01

_/\_ इथली चर्चा वाचून माझं मराठी नक्कीच अधिक समृद्ध होत आहे, त्यामुळे, सर्वप्रथम, अनेक धन्यवाद!

माझं वय आज आत्ता चाळिशीच्या खाली आहे, आणि वाचन/लेखनही बेताचंच आहे. पण, मराठी भाषेवर माझं प्रेम आहे, आणि भाषा बेढब आहे, की डौलदार? इतपत जाण असावी, कारण, खूप वाचायला, खूप आवडतं.

स्वत: डौलदार लिहायलाही आवडेलच, पण बरेचदा नवीन अनुभव, नवीन तंत्रज्ञानाबद्दल मराठीतून लिहितांना अडचण येते. आधुनिक, अर्थवाही, तरीही डौलदार भाषा लिहिणं फारच कठीण आहे असं लक्षात येतं, आणि ज्या 'संकल्पनांचा' आपण सहसा इंग्रजीतून विचार करायला शिकलो आहोत, त्यांना मराठीतून व्यक्त करण्याच्या प्रयत्नात कुठेतरी डौल/सहजता निसटून जाते, कारण कधीकधी नवीन आशय मांडण्यासाठी वाक्यरचनाच वेगळी असावी लागते. वाक्यांची लांबी/क्लिष्टता, यामुळेही डौल कमी होतो.

अशा परिस्थितीत, अर्थ 'पोचवण्याला' अर्थातच जास्त प्राधान्य मी देते, कारण आम्ही 'चाळिशीच्या आतले' मराठीभाषिक सतत करायची कामं आणि वेळ, यांच्या व्यस्त प्रमाणाला सामोरे जात असतो.

आपण जी भाषा ऐकतो/वाचतो, तिचा थेट प्रभाव आपल्या लेखनावर/ व्यक्त होण्यावर होत असतो, म्हणून, जर कुठे 'डौलदार मराठीत' आधुनिक जीवनानुभवाविषयी लिहिलं गेलं असेल तर ते मला वाचायला नक्की आवडेल.

प्रतिसाद लिहायचं कारण की, केवळ 'चाळिशीच्या खालच्या' मराठी लेखकांवर आग पाखडण्यापेक्षा, जे प्रयत्नशील आहेत त्यांना प्रोत्साहन देणे, शिकवणे, ही जबाबदारी जाणत्या लेखकांनी घ्यायलाच हवी. लेखन रसाळ/वाचनीय व्हावं, यासाठी जर काही साधनं/शब्दकोश/उपलब्ध असतील, तर त्यांची चर्चाही घडावी.

चिंतातुर जंतू Tue, 24/04/2018 - 19:14

In reply to by फूलनामशिरोमणी

लेखन रसाळ/वाचनीय व्हावं, यासाठी जर काही साधनं/शब्दकोश/उपलब्ध असतील, तर त्यांची चर्चाही घडावी.

जी साधनं उपलब्ध आहेत, ती फार तर शब्दांचा योग्य वापर, वाक्यरचना सुधारणं, व्याकरण, प्रमाण भाषेचा वापर, अशा काही गोष्टींसाठी उपयोगी पडतील. उदा. माधुरी पुरंदरेंची 'लिहावे नेटके' ही पुस्तकमाला, आणि अरुण फडक्यांचं 'शुद्धलेखन ठेवा खिशात' हे अॅप, वगैरे. वर 'ऐसी'च्या लोगोवर क्लिक केलंत तर आंतरजालावर मोफत उपलब्ध असलेली काही साधनं सापडतील. मात्र, केवळ हे सगळं करून तुमचं लिखाण रसाळ होऊ शकणार नाही. त्यासाठी खूप वाचन करायला हवं. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या शैलीतल्या मराठीचं हवं. आणि मग तुम्हाला त्यातलं जे लिखाण रसाळ वाटेल, तशा लिखाणाचा रियाझ करायला हवा.

फूलनामशिरोमणी Tue, 24/04/2018 - 20:12

In reply to by चिंतातुर जंतू

तसंच, मला वाटतं, आजकाल मराठी वापरणारेच कमी झालेयत, त्यामुळे जे वापरू इच्छितात, त्यांना तरी भाषा जशी हवी तशी वाकवायची संधी मिळाली पाहिजे. वापरली, तरज रियाज होईल, आणि हळूहळू आजच्या काळाला 'कमावलेला आवाज' देणारेही निर्माण होतीलच.

१४टॅन Tue, 29/05/2018 - 10:49

कीर्तनेंची प्रतिक्रिया ह्या लेखास आहे. ती डकवायला इथला शोधत असताना मध्येच दुसरा लेख वर आल्यामुळे तिथे डकवली गेली.
मूळ लेख, लेखकाच्या प्रकाशचित्रासहित thinkमहाराष्ट्रवर प्रसिद्ध झाला असल्याची नोंद घ्यावी. ;)