सध्या काय वाचताय? - भाग २८
बऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते; एखादा दीर्घ लेख आवडतो; वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते; पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.
=========
हे ईबुक स्वरूपात मिळणार का
हे ईबुक स्वरूपात मिळणार का असा प्रश्न वारंवार विचारूनही उत्तर नाही. मराठी नियतकालिकं आणि ई-फॉरमॅट यांची काही खानदानी दुश्मनी आहे का? सध्या मराठीत चालणाऱ्या (उरलेल्या?) मोजक्या नियतकालिकांना विचारून पाहिलं - 'महाअनुभव' वगळता प्रत्येकाने अश्वारोपण केलं. हे विनोदी अनुभव हा खास लेखाचा विषय आहे.
मराठी नियतकालिक नावाचा जांगडगुत्ता
हे ईबुक स्वरूपात मिळणार का असा प्रश्न वारंवार विचारूनही उत्तर नाही. मराठी नियतकालिकं आणि ई-फॉरमॅट यांची काही खानदानी दुश्मनी आहे का?
स्पष्टच सांगायचं तर कारणं अनेक आहेत. एक म्हणजे - मराठीत ई-फॉरमॅटला अजूनही प्रतिष्ठा नाही. हे चांगलं असोनसो पण ही वस्तुस्थिती आहे. दुसरं म्हणजे मराठी वाचकाचा फुकट्या स्वभाव. त्याला सगळं काही फुकट हवं असतं. त्यामुळे वर्गणीदारांना पीडीएफ दिली तर फुकटे लोक वाटूनवाटून वाचतात आणि त्यामुळे वर्गणीदार मिळत नाहीत. डीआरएम वगैरे करायचं तर लोकांकडे योग्य डिव्हाइस हवं किंवा एखाद्या प्लॅटफॉर्मशी (अमेझॉन / गूगल प्ले स्टोअर वगैरे) जोडून ते वितरित करायला हवं, पण त्यात प्रमाणीकरण नाही. म्हणजे एकीकडे चालकांना अधिकची गुंतवणूक करावी लागते (डिआरएम, प्लॅटफॉर्मला द्यावा लागणारा कट वगैरेसाठी) पण परतावा मिळत नाही. थोडक्यात, ई-फॉरमॅट अद्याप मराठीत व्यवहार्य नाही. गंभीर मराठी नियतकालिक चालवून हात पोळलेले किमान अर्धा डझन लोक माझ्या व्यक्तिगत ओळखीत आहेत. तो आतबट्ट्याचाच व्यवहार ठरतो. आता जी चालू आहेत तीदेखील एकचालकानुवर्ती आणि कुणाच्या तरी पैशावर चालतात; वर्गणीदारांच्या आधारावर नव्हे. (झी वगैरे यात अंतर्भूत नाहीत हे उघड आहे.)
स्पष्टच सांगायचं तर कारणं
स्पष्टच सांगायचं तर कारणं अनेक आहेत. एक म्हणजे - मराठीत ई-फॉरमॅटला अजूनही प्रतिष्ठा नाही. हे चांगलं असोनसो पण ही वस्तुस्थिती आहे. दुसरं म्हणजे मराठी वाचकाचा फुकट्या स्वभाव. त्याला सगळं काही फुकट हवं असतं. त्यामुळे वर्गणीदारांना पीडीएफ दिली तर फुकटे लोक वाटूनवाटून वाचतात आणि त्यामुळे वर्गणीदार मिळत नाहीत. डीआरएम वगैरे करायचं तर लोकांकडे योग्य डिव्हाइस हवं किंवा एखाद्या प्लॅटफॉर्मशी (अमेझॉन / गूगल प्ले स्टोअर वगैरे) जोडून ते वितरित करायला हवं, पण त्यात प्रमाणीकरण नाही. म्हणजे एकीकडे चालकांना अधिकची गुंतवणूक करावी लागते (डिआरएम, प्लॅटफॉर्मला द्यावा लागणारा कट वगैरेसाठी) पण परतावा मिळत नाही. थोडक्यात, ई-फॉरमॅट अद्याप मराठीत व्यवहार्य नाही. गंभीर मराठी नियतकालिक चालवून हात पोळलेले किमान अर्धा डझन लोक माझ्या व्यक्तिगत ओळखीत आहेत. तो आतबट्ट्याचाच व्यवहार ठरतो. आता जी चालू आहेत तीदेखील एकचालकानुवर्ती आणि कुणाच्या तरी पैशावर चालतात; वर्गणीदारांच्या आधारावर नव्हे. (झी वगैरे यात अंतर्भूत नाहीत हे उघड आहे.)
निळ्या ठशाशी असहमत. Kindle Direct Publishing पूर्णपणे फुकट आहे. माझ्या माहितीप्रमाणे :
०) वर्ड फाईल चढवूनही Kindle Direct Publishing करता येतं.
१) किंडल पुस्तकं त्यांच्या ॲपशिवाय वाचता येत नाहीत.
२) ॲप फुकट आहे.
३) Kindle Direct Publishing पुस्तकं त्यांच्या स्टोअरशिवाय डाऊनलोड करता येत नाहीत.
४) भारतात रु. ९९ पेक्षा जास्त किंमत ठेवल्यास किमतीच्या ७०% रॉयल्टी किंडल देतं.
____________________
समजा, छापील नियतकालिक घेऊन वाचणारे १०० वाचक आहेत. (छापीलवाचक)
ई-प्रत विकत घेऊन वाचू इच्छिणारे आणखी ५० आहेत. (ईवाचक)
फुकट वाचू इच्छिणारे आणखी ५० आहेत. (फुकटे)
प्रतीची किंमत रु. १०० प्रत्येकी. (सध्या छापील आणि ईप्रतीची किंमत सारखीच धरूया.)
नियतकालिकाचा कमाल वाचकसंख्या (यूजरबेस) झाली १००+५०+५० = २००.
पर्याय ० : फक्त छापीलप्रती विकणे
छापीलवाचक १०० गुणिले रु १०० = उत्पन्न रु. १०,०००
ईवाचक उत्पन्न रु ०
फुकटे उत्पन्न रु ०
एकूण उत्पन्न = रु १०,००० | वाचकसंख्या १००
पर्याय १ : पीडीएफ देणे
फुकट्यांची सोय होईल, उत्पन्न ५० फुकटे गुणिले रु. ० = रु. ०
अर्धे छापीलवाचक फुकट्यांत सामील होतील. उत्पन्न वरीलप्रमाणेच रुपये ०.
अर्धे ईवाचक फुकट्यांत सामील होतील. उत्पन्न वरीलप्रमाणेच रुपये ०.
उरलेले अर्धे ईवाचक विकत घेतील २५ गुणिले रु १०० = २,५००
उरलेले अर्धे छापीलवाचक विकत घेतील ५० गुणिले रु १०० = ५,०००
एकूण उत्पन्न = रु. ७,५०० | वाचकसंख्या २०० | वाचक कमावले (+१००%) पैसे घालवले (-२५%)
पर्याय २ : किंडल डायरेक्ट
छापीलवाचक विकत घेतील १०० गुणिले रु १०० = १०,००० (ते ईवाचक झाले तरी हरकत नाय. आपल्या उदाहरणात किंमत सारखीच आहे.)
ईवाचक विकत घेतील. उत्पन्न ५० गुणिले रु १०० = ५,०००. किंडल त्यातले ३०% ठेवेल, म्हणजे उत्पन्न झालं रु ५००० गुणिले ७०% = रु ३,५००
फुकट्यांना काहीही मिळणार नाही, उत्पन्न ५० फुकटे गुणिले रु. ० = रु. ०
एकूण उत्पन्न = रु. १३,५०० | वाचकसंख्या १५० | वाचक कमावले (+५०%), पैसेही कमावले (+३५%)
हे ढोबळ आकडे आणि गृहितकं घेऊन झालं. प्रॉपर फायनान्शियल मॉडेलिंग करून त्यात अनेक गोष्टी अंतर्भूत करता येतील (उदा० छापीलवाचकांचा 'डिमांड स्टिकीनेस' - अर्थात वाट पाहीन पण छापीलच वाचीन; किंवा पोस्टाने पाठवायचे पैसे, इ.)
हा पर्याय का घेत नसावेत?
आबा, हे पुस्तक JCB literary
आबा, हे पुस्तक JCB literary award च्या long list मध्ये होते. टाटा लिट फेस्टमध्ये बेस्ट फिक्शनचा पुरस्कारदेखिल मिळाला आहे.
हे द हिंदूमधले परिक्षण आणि https://youtu.be/gR6gOByBhFM या दोन ठिकाणी ऐकलं कौतिक.
?
पिंगळावेळ बरेच दिवस आऑप्रिं होते, फार दिवस शोधत होतो, शेवटी मिळाले अक्षरधारामध्ये.
जी ए एकेकाळी खूप आवडत. आता त्यांची पुस्तके कंटाळवाणी वाटतात. नुकताच काजळमाया वाचण्याचा प्रयत्न केला पण एकही कथा पूर्ण झाली नाही.
एकंदरीत आयुष्याकडे पाहण्याचा एक रडका, सीनिकल दृष्टिकोण. प्रत्येकच कथेची - आपल्या अंगावर बोटे पुसणारी - एक अत्यंत निराशाजनक थीम. हे सगळं आता नको वाटतं.
एका 'उबर' चालक इकॉनॉमिस्टची नीरीक्षणे
https://www.gsb.stanford.edu/insights/what-economist-learning-driving-u…
हा लेख रोचक आहे. एका 'उबर' चालक इकॉनॉमिस्टची नीरीक्षणे. मूळातुनच लेख वाचा.
_______________
फास्ट फूड कल्चर एकंदर 'पैसे अविचाराने खर्च करण्यास' पोषक आहे का?
https://journals.sagepub.com/stoken/rbtfl/ngm307oFS34qo/full
_______________________
ओके क्युपिड वरती गणिती सूत्रांनी कसे मॅचमेकींग होते ते -
https://www.ted.com/talks/christian_rudder_inside_okcupid_the_math_of_o…
_______________
कॉफीच्या निमित्तमात्रे 'कृतद्न्यतेचे महत्व' सांगणारा हा टेडटॉक अफलातुन आहे-
https://www.ted.com/talks/aj_jacobs_my_journey_to_thank_all_the_people_…
"अल् तमीर"
विश्राम गुप्ते यांनी, सौदी अरेबियातल्या अनिवासी भारतीयांच्या आयुष्यावर आधारलेली कादंबरी "अल् तमीर". कादंबरीतली नावं लक्षांत घेतली तर हे जवळजवळ पारदर्शक वाटावा इतपत झिरझिरीत असलेल्या - thinly veiled - बुरख्याआडचं आत्मनिवेदन आहे हे कळून येईल. कादंबरीचा लेखक विश्राम गुप्ते, तर कादंबरीच्या नायकाचं नाव विक्रम गुप्ता. लेखकाच्या पत्नीचं खरं नाव डॉ. शीला तर कादंबरीनायकाच्या पत्नीचं नाव डॉ. शैला. कादंबरीनायक हा, लेखकाच्या लौकिक आयुष्याप्रमाणेच साहित्यातला पदवीधर तर त्याची पत्नीही खर्या आयुष्यातल्याप्रमाणेच डॉक्टर. खुद्द गुप्ते कुटुंबही सौदी अरेबियामधे अल्पकाळ वास्तव्य करून आल्यानंतर गोव्यात स्थायिक झालेलं असणं सर्वज्ञात आहे.
कादंबरीच्या उपोद्घात-वजा प्रकरणात सौदीतल्या अल् तमीर नामक मध्यम आकाराच्या शहरात घडलेल्या एका मल्याळी माणसावर झालेल्या अन्यायाचं आणि त्यामुळे त्या मल्याळी कुटुंबाला स्वतःवर अन्याय झालेला असूनही दहशतीच्या वातावरणामधे कायमचं देश सोडून भारतात परत जाण्याच्या प्रसंगाचं वर्णन येतं. त्यानंतर आलेला कादंबरीचा ९० टक्के भाग विक्रम-शीला गुप्ता यांच्या अल् तमीरमधल्या आगमनापासून ते वर्षभरात त्यांनाही देश सोडून जावं लागलेल्या परिस्थितीपर्यंतच्या वर्णनाचा आहे. एकंदर कादंबरी आत्मचरित्रात्मक मानली तर ज्या परिस्थितीमधे "गुप्ता" कुटुंबीयांना देश सोडावा लागतो त्या भीषण परिस्थितीतून लेखकाला नि कुटुंबीयांना जावं लागलेलं असणं याची कल्पना करणं थरकाप उडवणारं आहे.
सौदी अरेबियातल्या उघडउघड चालणार्या वंशवर्चस्ववादाचं आणि इस्लामिक राज्यव्यवस्थेचं चित्रण कादंबरीमधे येणं अपरिहार्य होतं. ते तसं आलेलं आहे. एकंदरीतच जगाच्या अन्य भागात स्थलांतर केलेल्यांच्या आणि सौदी अरेबियामधे स्थलांतर केलेल्यांच्या अनुभवामधे तीव्र तफावत असणं याचा अनुभव कादंबरीमार्फत पुन्हा एकदा घेता येतो.
या अर्थाने सौदी अरेबियामधे एक स्थलांतरित म्हणून राहाणं ही लिटमस टेस्ट आहे. ज्यांना आर्थिक उन्नतीखेरीज अन्य आयुष्याचे कुठलेच आयाम लागू असण्याची फिकीर नाही (किंवा आयुष्याचे अन्य कुठलेही पैलू हे आर्थिक प्रगतीच्या वेदीवर ज्यांना बळी देता येतात) त्यांनीच सौदीमधे राहावं हे सूत्र कादंबरी चांगल्या अर्थाने अधोरेखित करते. जगाच्या अन्य भागांमधे केलेल्या स्थलांतरांमधे निश्चितच आपल्या ओळखीचा शोध, जागतिकीकरणाचे आणि विश्वात्मकतेचे एकमेकांशी असलेले - प्रसंगी परस्परविरोधी असलेलेही - संबंध तपासायला वाव आहे. सौदीतलं अन्यायकारक आणि शेकडो शतकं बुरसटलेलं वातावरण अशा प्रकारच्या आत्मशोधाला किंवा चिंतनाला कायमचं वजा करतं. या न्यायाने, सौदीमधे जायचा - राहायचा निर्णय आर्थिक उन्नती विरुद्ध आयुष्याची एकजात सर्वं अंगं अशा लिटमस टेस्टरूपी ठरतो.
"टिकून राहाणं विरुद्ध मानवतेची कुठलीही निशाणी यातली निवड" हे सौदीविषयक सूत्र विशद करताना कादंबरीकार वृथा उपहास दाखवत नाही. एक प्रकारचा अलिप्तपणा त्याच्या वर्णनात आहे. ही बाजू कादंबरीच्या बाबत एक चांगली जमेची बाजू असं मला वाटलं. जो उपहास आहे तो नक्कीच हिंसक नाही. एक प्रकारचा सिनिकल टोन त्यात आहे आणि तो सर्वथैव योग्य वाटतो.
कादंबरीतल्या, सौदी व्यवस्थेने दिलेल्या वागणुकीच्या वर्णनाचं नातं काफ्काच्या सुप्रसिद्ध "ट्रायल"शी लागतं यात अजिबात संदेह नाही. ट्रायलमधे नायकाला जे भोगावं लागतं त्याची कारणीमीमांसा शेवटापर्यंत त्याला समजत नाही. सौदीमधल्या माणसाला ती महिती असते हा फरक महत्त्वाचा. एका अर्थाने सौदीत जाण्यचा - राहाण्याचा आतापर्यंत लक्षावधी स्थलांतिरांनी घेतलेला निर्णय हा विलास सारंगांच्या "एन्कीच्या राज्यात" मधल्या नायकाच्या इराकमधे राहाण्याच्या निर्णयापेक्षा अधिक टोकाचा आहे. "एन्कीच्या राज्यात"ला विद्वान, प्रोफेसर नायक " मानवी संस्कृतीचा पाळणा" समजल्या गेलेल्या युफ्राटिस-तायग्रीस नदीकाठच्या संस्कृतीच्या ओढीने गेलेला आहे. तो एकटा आहे. त्याला काही "लैंगिक" स्वरूपाचे अनुभवही येतात. शेवटी त्याचा भ्रमनिरास होतो. सौदीत जाणार्या माणसाला अशा स्वरूपाचं काहीही "गाजर" मुळातच अस्तित्त्वात नाही. आपण केवळ आणि केवळ आर्थिक गुलाम म्हणून जायचं आहे हे त्याला माहिती आहे. ज्यांना ते माहिती नाही, they are in for a rude awakening. या अर्थाने सौदी हा लिटमस कागद हे अगदी नक्की.
गुप्त्यांची ही पहिली कादंबरी असणार असा मला संशय आहे. चूकभूलदेणेंघेणें. हे लिखाण प्रत्ययकारी, एकंदर डोळे उघडणारं झालेलं आहे.
"सोन्याच्या धुराचे ठसके"
अशाच जातीचं आणखी एक पुस्तक " सोन्याच्या धुराचे ठसके". अर्थात हे पुस्तक सरळसरळ आत्मकथन आहे, कादंबरी नाही. पुस्तक परिचयाचा दुवा :
५० दूरदर्शी स्त्रिया आणि त्यांचे 'स्त्री-पुरुष समानता'
५० दूरदर्शी स्त्रिया आणि त्यांचे 'स्त्री-पुरुष समानता' या विषयावरील विचार -
https://qz.com/work/is/how-well-win/
आतिशय सुंदर कंपायलेशन लेख आहे.
अतिशय योग्य सल्ला -
आपण आपल्या मुलींना परफेक्ट (परिपूर्ण) बनवायच्या मागे असतो तर मुलांना धाडसी बनविण्याच्या मागे असतो. बहुसंख्य मुलींना रिस्क घेण्यापासूनच परावृत्त केले जाते. मुलांना मात्र - हो पुढे! लढ, रिस्कस घे असे सांगीतले जाते.. By the time boys are adults, whether they’re negotiating a raise or even asking someone out on a date, they’ve been habituated to take risk after risk. And they’re rewarded for it.
Reshma_Saujani (The founder of Girls Who Code:)
आज खालील पुस्तकाचे वाचन परत
आज खालील पुस्तकाचे वाचन परत चालू करेन.
.
बहुते एरॉटिक बिरॉटिक नाहीये (अर्थात वाचल्यावरच कळेल) तर इंग्लंडमधील पंजाबी इमिग्रंटच्या दुसऱ्या पीढीने केलेले लेखन आहे. मला इमिग्रंटस च्या मुलामुलींच्या कथा नेहमीच फार रोचक वाटतात.
_______________
प्रत्येक प्रसंगाचे खूप बारकावेदार(डिटेल्ड) वर्णन येते. वेगवेगळी पात्रे आहे पण मधे मधे एरॉटीक स्टोरिज येतात त्या डोक्यात जाताहेत. वाचण्याचा प्रयत्न करते आहे.
काही आठवलं तर नक्की सांगते.
काही आठवलं तर नक्की सांगते.
वरचं साची कौलचं पुस्तक आणि आता हे ही दोनच माझ्या माहीतीतली.
"द स्पाय हू केम ईन फ्रॉम द कोल्ड"
"द स्पाय हू केम ईन फ्रॉम द कोल्ड" : जॉन ल कारेची १९६२ सालची कादंबरी. तिच्या महत्तेबद्दल वाचून होतो. वाचायचा योग अलिकडे आला. शीतयुद्धाच्या काळातली गुप्तहेरजगताविषयीची कादंबरी. ब्रिटिश लेखक. कथानक इंग्लंड आणि तत्कालीन ईस्टर्न ब्लॉक मधील देशांतर्गत घडतं.
गुप्तहेर कादंबर्यांमधे अर्थातच वैविध्य आहे. ढोबळमानाने बोलायचं तर इयन फ्लेमिंगच्या जेम्सबाँडीय कादंबर्यांच्या बरोबर विरुद्ध बाजूला ल कॅरेच्या या कादंबर्या येऊन पडतील. जेम्स बाँड म्हणजे आज पॅरीस, उद्या रोम, परवा अमेरिका, नंतर आफ्रिकेत जाणारा. घड्याळाचे स्क्रू पिळून समोरच्या रशियन व्हिलनच्या डोळ्यात क्ष किरण सोडणारा आणि मार्टीनी पितापिता मदालसेंबरोबर शृंगार करणारा. चटपटीत वन-लायनर मारणारा. सदैव लबाड स्मितहास्य करणारा. ( सिनेमापुरता २००५ नंतर हा स्टिरिओटाईप बदलला खरा. जेसन बोर्नपट आले आणि जेम्स बाँडलाही एकदम सिर्यस व्हावं लागलं. नाहीतर त्याचा विदूषकी पचका होणं अटळ होतं. आताचा सिनेमातला बाँड ज्याम सिर्यस असतो. हसत नाही. चक्क प्रेम करतो आणि त्याचा प्रेमभंग इत्यादिही होतो. (पहा : क्वांटम ऑफ सॉलेस. ) तर ते असो. बाँडला कूस बदलावी लागली ती बदलत्या परिस्थितीमुळे एरवी इयन फ्लेमिंगचा जेम्स बाँड म्हणजे चमत्कार करणारा आणि स्त्रियांबरोबर लीला करणारा साक्षात भगवान कृष्णच. )
ल कॅरेचे ब्रिटीश नायक गंभीर आणि गंभीर म्हणजे धीरगंभीर, उदात्त आणि आदर्श पुरुष या अर्थाने नव्हे तर वास्तवाशी बांधले गेलेले. त्यांची हेरगिरी अद्ययावत यंत्रांची नव्हे तर ओल्ड-फॅशन्ड, कंटाळवाण्या आयुष्याचे सरकारी नोकर म्हणून काम करणार्या प्रौढ निबर माणसांची. आपली पेरलेली माणसं उघडी पडणार नाहीत आणि "त्यांची" जमतील तशी मिळवून त्यांना पकडण्याची. सरकारी दप्तरांतून, सर्वसामान्य कारकुंड्यांमार्फत परराष्ट्रखात्यातल्या, एंबसीमधल्या हालचालींमधून अंदाज घेत काम करणारी. इंग्रजीत ज्याचं वर्णन "प्रोसीज्युअरल" असं करता येईल त्या प्रकारची कथानकं.
""द स्पाय हू केम आऊट ...." ही त्याला अपवाद नाही. कथानक म्हण्टलं तर सरळसोट आहे. (स्पॉईलर अलर्ट : सुरवात) ईस्ट जर्मनीमधे पाठवलेले ब्रिटनचे अनेक हेर मोठ्या प्रमाणात पकडले/मारले जात आहेत. ईस्ट जर्मनीतलं समस्त हेरखातेविभाग सांभाळणार्या अॅलेक लीमसकरता ही शोचनीय परिस्थिती आहे. या टोकाच्या परिस्थितीवर मात करण्याकरता काही टोकाच्या उपाययोजना केल्या जातात. लीमसची "गच्छंति" झालेली आहे असं चित्र रंगवलं जातं. नोकरीमधे "अधोगती" झालेला लिमस हेरखात्याच्याच बँककारकूनवजा जागेवर आलेला आहे. तिथे त्याच्याबद्दल कामचुकार, फ्रस्ट्रेट झालेला, दारू पिणारा अशी अपकीर्ती झालेली आहे. बँकेतल्या एका तरुण मुलीशी जरा प्रेमाचे संबंध वगळतां सर्व आनंदी आनंद आहे. लीमसची ही अवस्था हेरून शत्रूपक्षाच्या हेरखात्यातून त्याच्याशी संपर्क केला जातो. त्याला बर्या पैशाची लालूच दाखवून ईस्ट जर्मनीला नेलं जातं. तिथे तो संवेदनशील वाटेल अशी माहिती पुरवतो - जी माहिती योग्य वेळी खरी वाटेल म्हणून आधीच पेरून ठेवण्यात आलेली आहे. लीमसच्या केलेल्या गुंतागुंतीच्या उलटतपासणीतून, त्याला खोदून खोदून विचारून झाल्यावर त्याने दिलेल्या माहितीतून ईस्ट जर्मनच्या बाजूच्याच बॉसवर संशयाची सुई येईल अशी परिस्थिती निर्माण होते. त्यानंतर झालेल्या गुंतागुंतीच्या कोर्टमार्शलवजा कारवाईनंतर ईस्ट जर्मनच्या सर्वात मोठा बॉस वर गंडांतर येतं. लीमसचा "प्लान" यशस्वी ठरतो. मात्र हे सर्व उलगडत असताना स्वतःच्या देशातल्याच हेरखात्याबद्दल भ्रमनिरास व्हावा, उरलासुरला विश्वासही संपावा अशी परिस्थिती ओढवते. "कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे" अशी भावना झालेला लीमस - त्याचं काय होतं? त्याच्या त्या मैत्रीणीचं काय होतं? नक्की काय प्रकारच्या ज्ञानाने तो एकाच वेळी शहाणा आणि त्याचवेळी आशानिराशेच्या पलिकडे जाऊन एक अंतिम निर्णय घेतो? (स्पॉईलर अलर्ट : शेवट) असं एकंदर कथानक.
कुठल्याही उत्तम लेखकाच्या महत्त्वाच्या लक्षणांनुसार, कादंबरी जी घडते, उलगडते ती कथानायकाच्या डोक्यातल्या "माईंड गेम्स" मधून. कटु वास्तवाशी पक्कं नातं असलेल्या, कुठल्याही स्वप्नील कल्पनांनी किंवा हेरगिरीच्या रम्य फाल्तूपणाशी कसलाही संबंध नसलेला हा कथानायक. त्याच्याइतक्याच थंड डोक्याने करणारे त्याचे शत्रू. बुद्धीबळाच्या खेळासारखं घडत गेलेलं कथानक. कुठे ठो ठो गोळीबार नाही. धोके आणि पारितोषिकं यांची कल्पना सर्वांना आहे. एकमेकाचा अदमास घेऊन सर्व वागत आहेत. कादंबरीचा शेवट कुठेही गोड गोड नाही. एक पक्ष जिंकला नाही दुसरा हरला नाही. एकमेकांना पायात पाय घालून पाडण्याची प्रक्रिया अव्याहतपणे चालू राहील. वाचकवर्गाला कुठेही स्वप्नरंजनात गुंगवणं नाही, गूढ-अतर्क्य अशा गोष्टींची भानगड नाही. मात्र कथेची मांडणी बंदिस्त. आणि लिहिण्याची शैली अल्पाक्षरत्वाची. वर्णनांचा फापटपसारा नाही. नेमकी, मर्माची वर्णनं. "दु:ख ना आनंदही, अंत ना आरंभही".
एकंदर हे वाचन बुद्धीला चालना देणारं, त्या अर्थाने गुंगवणारं, पकड घेणारं. पण कुठेच पळवाट शोधणारं नव्हे. ही अट मान्य असली तर जरूर आवडेल असं.
'द स्पाय हू डाइड ऑफ बोअरडम' (सवांतर)
आता स्पाय, जेम्स बाँड वगैरेंचा विषय काढलाच आहात, तर जमल्यास जॉर्ज मिकॅशचे (George Mikes) 'द स्पाय हू डाइड ऑफ बोअरडम' वाचून पाहाच, इतकेच सुचवितो. (बाँडकथा मी वाचलेल्या नाहीत, आणि बाँडपटही मी फारसे पाहिलेले नाहीत, परंतु, त्यांच्याबद्दल जे काही थोडेफार बरेवाईट वाचलेऐकलेले आहे, त्यावरून) बाँडकथांवरील हे उत्तम स्पूफ मानावयास हरकत नसावी.
फक्त, ही एक्झॅक्टली बाँडकथा नाही, तर रादर 'रिव्हर्स बाँडकथा' मानता यावी. बोले तो, आपला हीरो हा सोविएत संघाने ब्रिटनवर हेरगिरी करावयास पाठविलेला रशियन हेर आहे. (स्पॉयलरे देऊ इच्छीत नाही, परंतु) त्याचे ब्रिटनमधील हेरगिरीचे 'मिशन'सुद्धा आत्यंतिक अशक्य चमत्कारिक (आणि, अर्थातच, ट्रिव्हियल) आहे. शिवाय,
मार्टीनी पितापिता मदालसेंबरोबर शृंगार करणारा.
(मार्टिनी पितापिताचे एक वेळ जाऊ द्या, परंतु) 'खऱ्या' बाँडच्या कॅरेक्टरमधला अधोरेखित भाग हे स्पूफचे मुख्य टार्गेट असावे. बोले तो, आपल्या हीरोचे जे काही 'मिशन' आहे, त्यातून त्याला जी काही माहिती मिळवायाची आहे, ती मिळविण्याकरिता जास्तीत जास्त बायकांबरोबर झोपणे, ही त्याची 'असाइनमेंट' आहे. मात्र, ती साध्य करतानासुद्धा, दर खेपेस आयत्या वेळेस त्याचा येनकेनप्रकारेण पचका होऊन त्याची एकही असाइनमेंट सिद्धतेस पोहोचत नाही, त्याचे वर्णन हा कथेचा गाभा मानता यावा.
पुस्तक (सदर लेखकाच्या इतरही अनेक पुस्तकांप्रमाणे) अनेक वर्षांपासून औटॉफ्प्रिंट आहे. मात्र, ॲमेझॉनवर त्याच्या सेकंडहँड कॉप्या मिळविणे अशक्य नसावे.
अस्तित्वविषयक गुप्तहेरकथा
एकंदर हे वाचन बुद्धीला चालना देणारं, त्या अर्थाने गुंगवणारं, पकड घेणारं. पण कुठेच पळवाट शोधणारं नव्हे. ही अट मान्य असली तर जरूर आवडेल असं.
सहमत. मला ल कारे आवडतो ते त्याचसाठी. ग्रॅहम ग्रीनही एम. आय. ५साठी काम करत असे. त्याच्या काही कादंबऱ्या गुप्तहेरविश्वाशी संबंधित आहेत. त्यांत मानवी अस्तित्वविषयक प्रश्न आहेत. उदा. द क्वाएट अमेरिकन. द ह्युमन फॅक्टर, अवर मॅन इन हवाना, द कॉन्फिडेन्शियल एजंट.
ॲमेझॉनच्या AI चा घो...
मराठीतली ॲमेझॉनवरची इ-बूक्स बघत असताना लोकप्रिय मराठी लेखकांच्या यादीत हे लोक दिसले -
१. वशिवास पाटील
२. व. पू. काळे
३. ऑर्थर कॉनन डोयल
४. रंजित देसाई
५. वी. एस. खांडेकर
जर कुणाला ॲमेझॉनच्या किंडल अनलिमिटेड ह्या विभागात काम करणारे सहकारी ठाऊक असतील तर त्यांना -
क्रुपया हे सूधारून घ्यायला सांगाल का?
जर कुठला अल्गोरिथम ही नावं निर्माण करत असेल तर मग कठीण आहे. असलं मराठी त्या इ-बुक्समधे नसावं अशी आशा आहे.
स्क्रीन काळा मोठ्ठा गोळा
गवि लिखित, 'स्क्रीन काळा मोठ्ठा गोळा' वाचते आहे, नर्मविनोदी आणि नीरीक्षणातून मानवी स्वभावातिल विनोद, विसंगती टिपणारे लेख खूप आवडत आहेत. उदाहरणार्थ - वाणीसामानाच्या दुकानात, नेहमीचं दृष्य आहे स्त्रिया सिन्सिअरली खरेदी करत असतात आणि नवरे या पोत्यात हात घाल , त्या पोत्यात हात घाल, बचकभर मसूर आख्खी डाळ्च उचलून परत पोत्यात झरझर सोड. हे असले निरुद्योगी चाळे चाललेले असतात. बरं विचारलं की अमका गहू घेउ की तमका तर त्यावर स्वत:चं असं मत नसतं काहीतरी ठोकून देतात - या साध्याशा प्रसंगाचे इतके मार्मिक टिपण केले आहे.
आणि
इतर कथांचाही बाज असाच. म्हणजे असं मला तरी वाटतं की लेखकाने आपला मेंदू/मन च हॅक करुनच् हे पुस्तक लिहीले आहे की काय.
.
शेवटची बी पी ओ कथा फार थ्रिलिंग आहे. ती वाचल्यानंतर माझा घसा भितीने आत ओढला गेला होता.
.
आक्षेप एकच - बी पी ओ कथेच्या मूडवरती, वाचक पुस्तकाचा निरोप घेतात, पुस्तक अतिशय हलकेफुलके आहे, पण या मूडवरती निरोप घ्यायला नको होता. अर्थात हे झाले माझे मत.
.
बाकी पुस्तक अतिशय, खूप खूप आवडले. 'खारट खारट" - सिम्प्ली मार्व्हलस स्टोरी!!!
.
अनेक लेखांवरती, डोळ्यातून पाणी येइपर्यंत हसले.
आठवणींचं कोलाज - पिंपळपान
आठवणींचं कोलाज - पिंपळपान
लीना माटे यांचे ‘पिंपळपान' हे ललितलेखांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. `सुकृत प्रकाशन'ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. लेखिका/कवयित्री अनुराधा नेरूरकर यांची प्रस्तावना ह्या पुस्तकाला लाभली आहे.
ह्यापूर्वी लीना माटे यांचा `विखुरलेल्या चांदण्या' हा कवितासंग्रह आणि `िचऊची सफर' हा बालकवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. `विखुरलेल्या चांदण्या' कवितासंग्रहास दोन राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत.
` पिंपळपान ' हे त्यांचे तिसरे पुस्तक. ह्या पुस्तकातील लेखांची धाटणी ही काहीशी कथेच्या अनुषंगाने जाणारी असल्यामुळे हे लेख वाचत असताना आपण लघुकथा वाचत आहोत असे वाटते. भारतीय मध्यम वर्गाच्या संस्कारांमध्ये असणारी मानसिकता, बदलांशी जुळवून घेणं, शिक्षणाच्या माध्यमात झालेले बदल, नोकरीतील कामाचं बदललेलं स्वरूप, सोशल मिडियाची रुजवात ह्या सगळ्या अनुभवांचं, आठवणींचं कोलाज म्हणजेच ह्या पुस्तकातील ललित लेख, ललित लेखांना विषयाचं बंधन किंवा चौकट नसते. कोणत्याही विषयावर त्यात मुक्तपणे व्यक्त होता येतं. भोवतालच्या जगण्याचा, लोकांच्या मानसिकतेचा शोध लेखिका प्रांजळ वृत्तीने घेते हे त्यांच्या लेखातून जाणवतं. आठवणी आणि त्या अंगाने अनुभवांचं उलगडणं हे पुस्तकातील सर्वच लेखांचं वैशिष्ट्य आहे. यात लेखिकेच्या मनावरील संस्कारांचा पगडा, तिची कुटुंब आणि संपर्कात येणाऱया प्रत्येकाविषयीची कळकळ, समाजाविषयीची आस्था जाणवते.
पिंपळ पान या शीर्षक कथेत लहानपणापासून जिवलग मैत्रिणीसोबत हितगुज करण्यासाठीचा एक भावनात्मक दुवा म्हणजे पिंपळपान ! त्याच्या माध्यमातुन एकेक आठवण मोरपिसासारखी जपलेली आहे आणि काळानुरूप बदलत्या विश्वात सामील होत आज त्याच मनमोकळ्या सुसंवादासाठी आलेल्या व्हाट्स अँप या माध्यमाकडे सुद्धा त्याच भावनात्मकतेने पाहत नव्या तंत्रज्ञानाला सुद्धा त्याच सहजतेने आत्मसात करून बदलत्या काळाशी हातमिळवणी करणाऱ्या जुन्या तरीपण नव्यासोबत असणाऱ्या पिढीचा एक चांगला सकारात्मक कंगोरा हा लेख सांगतो.
पुस्तकातील पहिला लेख `गच्ची' आजच्या ज्येष्ठ पिढीचं गच्चीशी असलेलं नातं, गच्चीबद्दल वाटणारा आपलेपणा ह्या लेखात व्यक्त झाला आहे. `पिंपळपान ' या लेखात नेटवर्किंगच्या जमान्यात व्हॉटस्ऍप मुळे कित्येक वर्ष संपर्क विरहित असलेल्या जुन्या मित्र-मैत्रिणींचा शोध लागल्याने झालेला आनंद दिसतो. तर `पूल' ह्या लेखात बहिणीशी चॅट होत असताना अनुभवत असलेली मजा प्रत्यक्ष भेट झाल्यावर मात्र गायब होताना दिसणं याचं वैषम्य चांगल्या रीतीने दर्शवलं आहे. नव्या माध्यमातून नाती नव्याने गवसतात, पण अति व्यस्ततेमुळे ती काहीशी दुरावतात का हा प्रश्न `फेसबुक' ह्या लेखात आपल्यापुढे उभा राहतो. हल्लीच्या पीढीचा आत्मकेंद्रित दृष्टिकोन कमलमावशींच्या मुखातून `रोबोट' ह्या लेखात बोलका झाला आहे. `बटाटेवडे' ह्या लेखात आजी-आजोबांचं नातीवरील प्रेम आणि नातीलाही असलेलं त्याचं अप्रूप दिसून येतं.
दोन पिढ्यांमधील झपाट्याने वाढत असलेलं अंतर `पिढीतील बदल' ह्या लेखात लेखिकेने अचूक पकडलं आहे. आपलं गृहिणीपद सिद्ध करताना सदैव सोबत असलेली गॅसची शेगडी तिला आपली `सखी' वाटते. गॅसच्या शेगडीवर इतका सुंदर लेख लिहिता येऊ शकतो हे लेख वाचत असताना त्यातील बारकाव्यांमधून जाणवतं. आपला सुगरणपणा दाखवून सासरच्या लोकांच्या पोटात शिरून त्यांचं प्रेम मिळवायला तिच्या सखीनेच तिला मदत केली होती. तिच्या विविध पाककृती अंगावर मिरवून घ्यायला ह्या सखीलाही आवडत होतं. अशा नेमक्या शब्दात त्या गॅसच्या शेगडीचं वर्णन करतात तेव्हा गॅसची शेगडी हे स्त्रीचं रूपक आहे हे आपण उमजून जातो. `नॉट जस्ट इंक... थिंक' ह्या लेखात गेल्या काही वर्षातील बदलत्या लेखन माध्यमांचा आढावा घेताना पर्सनल आणि सोशल मधील सीमारेषा लेखिका अधोरेखित करते. मुलांना वाढवताना आपण खूप काही त्यातून शिकत जातो, आपला दृष्टिकोन विस्तारत जातो. `तो तिच्या नजरेतून' या लेखात याचं खूप छान विश्लेषण करताना ती म्हणते,`मला माझ्या बुरसटलेल्या चाकोरीबद्ध विचारांपासून तू असं वेळोवेळी बाहेर काढत होतास. आयुष्याकडे, जगाकडे पहाण्याचा माझा दृष्टिकोन विस्तारत होता. माझ्याही नकळत तू माझी वाटचाल प्रगल्भतेकडे नेत होतास.'
`रेसचा घोडा आणि त्याची आई' ह्या लेखात स्पर्धेच्या जगात मुलांचे आईवडिलच कसे मुलांना `आय ऍम दि बेस्ट'च्या दुष्टचक्रात ओढतात हे दाखवलंय. तिच्या मनातली ही खंत कागदावर उतरवताना लेखिका उपदेशाचे डोस न पाजता तिच्यातलि सुजाण आई-आजि म्हणते,`असे पालक घडत गेले तर उद्याची भावी पिढी निकोप-निरोगी निपजणं खरंच कठीण आहे. स्वतचं आत्मपरिक्षण करण्याची शक्तीच ही मुलं हरवून बसणार नाही का? आणि याला जबाबदार कोण?'
या संग्रहात किंबहुना संग्रहातून लेखिका अगदी शेजारी बसून चहा पितपीत आपल्याशी कितीतरी विषयावर गप्पा मारतेय नेमकेपणाने बोट ठेवत आजूबाजूचे किस्से सांगतेय असं आपल्याला वाटत राहतं आणि एकदा सुरू केलेलं वाचन शेवटच्या कथेपर्यंत केव्हा आलं ते ही कळत नाही.मनसोक्त गप्पा मध्ये बऱ्याच वेळा बऱ्याच भावना मनात आणत डोळ्याच्या कडा ओल्या करत अंतर्मुख व्हायला होतं
जवळ जवळ सर्वच लेखांमधून प्रत्येकाला आयुष्यात आलेले वेगवेगळे अनुभव, वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसे, त्या माणसांच्या आयुष्यात घडलेले प्रसंग ह्या सगळ्याकडे प्रगल्भतेने पाहण्याचा लेखिकेचा दृष्टिकोन विशेषत्वाने जाणवतो . लेखतील घटना आपल्याच जवळपास घडत आहेत असं वाटत रहातं. त्यामुळेच हे लेख म्हणजे लेखिकेने केवळ लेखातील पात्रांशीच नव्हे तर आपल्याशीही केलेला संवाद वाटतो. लेखिकेकडे लेखनाची सुंदर हातोटी आहे. सगळं कसं अगदी सहज अलवार! नेमकं आणि हेच या कथा संग्रहाचं यश आणि म्हणूनच भविष्यात लिहिताना त्यांनी आपल्या अनुभवाचा आणि अभिव्यक्तीचा परीघ आणखी विस्तारायला हवा. त्यांनी वेगवेगळे विषय व साहित्य प्रकार हाताळायला हवेत. त्या ते यशस्वीरित्या करू शकतील याची खात्री वाटते. त्यांच्या पुढील लेखनाला मनपूर्वक शुभेच्छा!
पुस्तक - पिंपळपान
लेखिका - लीना माटे
प्रकाशन - सुकृत प्रकाशन
पृष्ठसंख्या - 168 किंमत –
दोनशेतीस रुपये.
प्रकाशराव आंबेडकर
यांच्या विषयीचा "जत्रेतल्या आरशातले प्रकाशराव" हा वायर मराठी वरती आलेला एक लेख.
लेखाच्या शेवटी "अगस्ती चापेकर, घरंदाज राजकीय विश्लेषक असून, लेखात व्यक्त केलेली मते त्यांची स्वतःची आहेत." असं आहे!
घरंदाज? wtf?
'धट्टीकट्टी गरिबी आणि लुळीपांगळी श्रीमंती'...
...चा स्रोत सापडला! (युरेका!!!)
https://archive.org/download/in.ernet.dli.2015.484484/2015.484484.Marat…
(पान २७ पाहा.)
ना-पुस्तकी काळातले पुस्तकपाळ
मराठीतल्या खूप वाचणाऱ्या लोकांचा आणि पुस्तकांबद्दलच्या पुस्तकांचा आढावा -
ना-पुस्तकी काळातले पुस्तकपाळ - पंकज भोसले
मीरा जेकब
इथे कुणी मीरा जेकबचं काही वाचलं आहे का? विशेषतः अमेरिकेत राहणारे लोक कदाचित तिच्या पुस्तकांशी अधिक रिलेट करू शकतील, पण महानगरात राहणारे उदारमतवादी मध्यमवर्गीयही रिलेट करू शकतील. तिच्या 'गुड टॉक' ह्या ग्राफिक नॉव्हेलमधला एक भाग इथे वाचता येईल -
Are we racist? A family's conversation, illustrated
Everybody Lies
गूगलवर आपण काय-काय शोधतो, ह्यातून संशोधकांना समाजाच्या वर्तनाबद्दल काय समजतं; 'बिग डेटा'च्या व्याख्येच्या तपशिलात न शिरता, तो वापरून छोट्या समूहांच्या वर्तनातला फरक कसा शोधता येतो; त्या संदर्भात खाजगीपणा anonymity ह्याची कडंकडंनं चर्चा आहे.
पुस्तकाची शैली गमतीशीर आहे; थोडा स्वतःला खिजवणारा विनोद आहे; हा-थोर-ती-वाईट अशी मूल्यं लादण्याचा प्रयत्न नाही. विदाविज्ञान चार उपयुक्त गोष्टी करू शकतं आणि कधीकधी त्यातून चुकाही होतात. त्यांतल्या सध्याच्या तीन गोष्टी पुस्तकात सापडतील.
ट्रंप निवडून येण्यामागचं मोठं कारण वंशवाद होतं, हे आकडेवारीसकट दाखवून देणारा संशोधक पुस्तकाचा लेखक आहे.
मोडी लिपीचा प्रवास
मोडी लिपीचा प्रवास - कागदापासून कागदापर्यंत
वाचनीय लेख (नावावरूनतरी लेखक अमराठी वाटतोय!)
कुरूंदकर आणि इतर
आनंदाचा दिवस आहे यारो.
कुरूंदकरांची २ नवी पुस्तकं आलीत .
धार आणि काठ
शिवरात्र.
अशोक शहाणेंचं नपेक्षा
नंदा खरेंची "बखर अंतकाळची" पण मिळाली. आता दोहो पुस्तकं {अंताजी +अंतकाळ} एकत्र वाचीन.
इतर आणखी काही.
बेसिकली पुढले काही आठवडे मज्जानू लाईफ. मग इथे परत लिहितो त्याबद्दल.
कुरुंदकर
जरूर लिहा.
निवडक कुरुंदकर ही पुस्तके वाचलेली जास्त चांगली कारण धार-आणि-काठ सारख्या पुस्तकात आता खंप्लेट अनोळखी असलेले आणि टोट्टल विस्मरणात गेलेले लेखक आणि त्यांच्या कादंबऱ्यांच्या अॅनालायसिसने जांभया येतात. शिवाय ती पुस्तके वजनदार सुद्धा आहेत.
बाय द वे, कुरुंदकर वाचताना कधीतरी त्यांनी "भालचंद्र महाराज कहाळेकर" या त्यांना गुरुतुल्य असलेल्या महाराजांशी साम्यवाद, राजकारण, इतिहास, अध्यात्म, समीक्षाशास्त्र?. भरत वगैरे विषयांवर केलेल्या 'डीप' चर्चांचा उल्लेख केलेला आहे.
त्यावरून भालचंद्र महाराज कहाळेकर हे एक "ओन्ली लव्हर्स लेफ्ट अलाईव्ह" या पिच्चरमधल्या Marlowe या कॅरेक्टर प्रमाणे व्हॅम्पायर असावेत आणि ते अजूनही जिवंत राहून नवीन कुरुंदकर तयार करत असावेत अशी कथा डोक्यात आली होती. कहाळेकरांचे काहीच संदर्भ न लागल्याने अजूनही ती विचाराधीनच आहे.
गळतगेकर नव्हे...
...गळतगे.
(कानडी सीमारेषेवरील आडनावांत कर नसते बहुतेक. चूभूद्याघ्या.)
आणि अद्वैतानंद नव्हे, अद्वयानंद.
पण मुद्दा लक्षात आला.
(बाकी, 'गळतगे'ची (उगाच, काही कारण नसताना) फोड करताना काहीतरी भयंकर अश्लील असल्यासारखे वाटून गेले. असो चालायचेच.)
----------
(कदाचित हे भालचंद्रमहाराज कहाळेकर प्रकरण एखादा लोकल साधूबिधू असू शकेल काय? ग्रामीण/निमशहरी महाराष्ट्रात हे सहज शक्य आहे. कुरुंदकरांच्या काळात तर निश्चितच. (कुरुंदकर मराठवाड्यातले ना?))
अद्वयानंद गळतगे
हे वाचा.http://naadigranthbhavishyamarathi.blogspot.com/2009/12/blog-post.html
https://www.misalpav.com/node/43419
शहाण्या माणसाने यांच्या नादी लागू नये
जुगाड : किरण गुरव
जुगाड : किरण गुरव
काही दिवसांपूर्वी 'मराठी साहित्यातल्या कर्त्या व्यक्तींची यादी' करावी असा विचार मनात आला होता. (हा उद्योग वि० का० राजवाड्यांनी १९१३ साली केला होता.) तर ते होईल तेव्हा होईल, पण केलेल्या कच्च्या यादीत किरण गुरवांचं नाव होतं. त्यांचे "राखीव सावल्यांचा खेळ", "बाळूच्या अवस्थांतराची डायरी", आणि "श्रीलिपी" हे कथासंग्रह वाचून त्यांच्या कथनातल्या ताकदीचा अंदाज आला होता. कथेमध्ये निवेदकाचा आवाज मध्येमध्ये कडमडू शकतो, बटबटीतपणे समोर येऊ शकतो. पण गुरवांच्या कथेत तो आवाज जवळजवळ अदृश्य असतो. तसंच, अनेक कथाकार क्राफ्टकडे दुर्लक्ष करतात, पण गुरव त्याकडे कटाक्षाने लक्ष देतात हे जाणवतं.
गुरवांची कादंबरी वाचण्यासाठी उत्सुक होतो. बहु प्रयत्नांनंतर 'जुगाड' हाती पडली. वाचायला घेतली आणि त्यात गुंतून गेलो. 'शशा' या मेकॅनिकल इंजिनियरिंगचा डिप्लोमाधारक असलेल्या कथानायकाची गोष्ट आहे. साधारणपणे पहिल्या अर्ध्या भागात शशाचा 'शहर पुणे'मधला वावर; आणि दुसऱ्या अर्ध्या भागात त्याचा राधामाई कारखान्यातला वावर अशी ढोबळ रचना आहे. एका शिक्षित तरुणाच्या स्ट्रगलचं वर्णन आहे. शशाचं पात्र इतक्या सहृदयतेने रेखाटलं आहे, की 'त्याचं आयुष्यात चांगलं होवो रे बाबा' असा भावुक विचार मनात आला. (ते तसं होतं की नाही हे स्पॉयलरभयामुळे सांगत नाही.) 'शहर पुणे'मधला पहिला भाग हुबेहूब वठला आहे. पेठांतले राहायचे लॉज, जेवायच्या मेसेस, पुण्याभोवती कडं केलेले औद्योगिक झोन्स आणि तिथले कारखाने, या सगळ्याशी जवळून परिचय आहे.
आक्षेप नोंदवायचा झाला तर तो कादंबरीतल्या स्त्रीपुरुषसंबंधावर आहे. अस्फुट/अव्यक्त प्रेमभावना दाखवताना 'प्रेमात पडण्याचा क्षण' नजाकतीने दाखवला पाहिजे. (प्रेमात पडून झालेल्या व्यक्तीला 'त्या क्षणा'च्या नजाकतीचं महत्त्व लक्षात येईल अशी आशा आहे.) भाषेची नजाकत गुरवांकडे आहे, पण कथानकात हा क्षण डिझाईन करताना 'नायिका (तिच्या कामात) काही घोळ घालते, आणि नायक आपल्या हुशारीने त्यातून तिची सुटका करतो' असा चंद्रकांता-संगीत-नाटक-छाप केला गेला आहे. डॅमसेल इन डिस्ट्रेस आता बोर झाली आहे.
दुसरा आक्षेप म्हणजे साधारण मध्यभागापासून पुढे मुद्रितशोधन नीट झालेलं नाही. चकाचक कपडे घातलेल्या नवरदेवाची झिप उघडी राहावी तसा प्रकार वाटतो. असो.
आवर्जून वाचावी अशी कादंबरी आहे हे भरतवाक्य.
प्रवास लेख
प्रवास लेख
Why I don’t sugarcoat travelling the world any more Indian Express article
In Vienna, a friend and I got
In Vienna, a friend and I got locked in at a cemetery on a rainy evening with no help in sight.
मी इथे चुकून In Vienna, a friend and I got locked in in a coffin on a rainy evening with no help in sight.
असं इम्याजिन केलं.
प्रवासातले एंजोयेबल त्रास आणि खरे त्रास ह्यातला फरक.
सजग नियतकालिक
'सजग' नियतकालिकाविषयी ह्याच धाग्यावर पूर्वी माहिती दिली होती. आता पहिला अंक उपलब्ध झाला आहे. अंकाचे मुखपृष्ठ इंद्रजित खांबे यांचे आहे :
श्रेयनामावली :
अनुक्रमणिका :
ऐसीच्या वाचकांना अनेक ओळखीची नावे त्यात दिसतील. वर्गणीसाठी तपशील :
ह्या नियतकालिकांसाठी वार्षिक वर्गणी रु. ४०० /- ( रुपये चारशे मात्र ) एवढी राहील
वर्गणी भरल्यावर अंक पाठवण्याचा पत्ता इथे मेल करा watermarkpublication@gmail.com
================================================
ह्या नियतकालिकाची निर्मिती , वितरण ह्या जबाबदाऱ्या अभिजित वैद्य ह्यांच्या ' वॉटरमार्क पब्लिकेशन ' ह्यांनी स्वेच्छेने स्वीकारल्या आहेत .
आणि सोयीच्या दृष्टीने हे नियतकालिक त्याच बॅनर खाली प्रकाशित करण्याचे ठरवले आहे. तर ह्या नियतकालिका साठी वर्गणी /देणगी , असे जे काही आर्थिक योगदान असेल ते भरण्यासाठी वॉटरमार्कच्या खात्याचा तपशील असा :
Watermark publication
current A/C 62426108546
SBI Kothrud Pune Branch
IFSC : SBIN0020734
ज्या कुणाला चेकने / मनी ऑर्डरने पैसे पाठवायचे असतील , त्यांच्यासाठी हा पत्ता:
Watermark Publication
C/o Abhijit Vaidya
Plot No 26, Nav Vinayak Society,
Next to Mahatma Society Exit,
Behind Gandhibhavan,
KOTHRUD, Pune - 411038
Ph: 94220 16044
==
============================
नक्की प्रकाशक कोण?
ह्या नियतकालिकाची निर्मिती, वितरण ह्या जबाबदाऱ्या अभिजित वैद्य ह्यांच्या 'वॉटरमार्क पब्लिकेशन' ह्यांनी स्वेच्छेने स्वीकारल्या आहेत. आणि सोयीच्या दृष्टीने हे नियतकालिक त्याच बॅनर खाली प्रकाशित करण्याचे ठरवले आहे.
ह्यातून वॉटरमार्क पब्लिकेशन हे "खरे" प्रकाशक नसावेत असे ध्वनित होत आहे. वॉटरमार्क पब्लिकेशन प्रकाशक आहे की नाही? नसल्यास प्रकाशक कोण आहे आणि निर्मिती, वितरण सोडून त्या प्रकाशकाचे नक्की काय काम असणार आहे? जर वॉटरमार्क पब्लिकेशनच प्रकाशक असतील तर अशी आडवळणी वाक्यरचना का केली आहे?
सहभाग / हस्तक्षेप
मराठीत पुस्तक प्रकाशन संस्था नियतकालिक काढतात असे पुष्कळ दाखले आहेत. त्यात आपल्या प्रकाशनांची प्रसिद्धी करणारी ‘हाउस मॅगझिन’ सर्वाधिक असावीत. (उदा. राजहंस, पॉप्युलर, इ.) इथे ते तसे नसून केवळ निर्मिती, वितरण वगैरे बाबींव्यतिरिक्त संस्थेचा सहभाग / हस्तक्षेप त्यात नाही हे सूचित करण्यासाठी तशी रचना केली असावी.
अभिनंदन आणि शंका
अभिनंदन!
अंकाचं मुखपृष्ठ पहिलाच अंक असण्याला अनुसरून आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. खांबेंचं काम आवडतंच. हेही आवडलं.
--
शंका :
'सजग'चं स्वागतमूल्य ₹१०० दिलं आहे. वार्षिक वर्गणी ₹४०० आणि हे त्रैमासिक असल्याने एका वर्षात ४ अंक. म्हणजे अंकापाठी ₹१००च झाले. मग त्याला स्वागतमूल्य कसं म्हणणार? सामान्यत: स्वागतमूल्य म्हणजे नेहमीच्या दरात दिलेली किंचित सवलत असते ना? अर्थात वार्षिक ₹४०० हीच स्वागतवर्गणी असेल तर ठीक.
King Leopold's Ghost: A Story of Greed, Terror and Heroism in Co
King Leopold's Ghost: A Story of Greed, Terror and Heroism in Colonial Africa
सर्वसाधारणपणे ब्रिटिश वसाहतवादाच्या बऱ्याच पैलूंबद्दल बऱ्यापैकी लिहिले, वाचले, चर्चिले गेले असावे.
परंतु इतर युरोपीय देशांनी केलेल्या वसाहतवादातील अत्याचार व इतर पैलूंबद्दल फारशी माहिती, समीक्षा, किमान आपल्याकडे झाली नसावी.
बेल्जीयमचा तत्कालीन राजा लिओपोल्ड याने १८८० ते १९२० पर्यंत कॉंगोमधे घातलेल्या हैदोसाबद्दलचे हे पुस्तक जरूर वाचावे .
( आपल्या आत्ते , मामे भावंडांप्रमाणे , म्हणजेच जर्मनी आणि इंग्लंडची राजघराणी ) आपल्याकडे एकही वसाहत नाही या न्यूनगंडाने पछाडलेल्या लिओपोल्डने , योगायोगाने कॉंगो नदीचा मार्ग शोधलेल्या ( तितक्याच न्यूनगंडीत ) हेन्री मोर्टन स्टॅनली ( तोच तो , Dr. Livingstone , I presume हे सुप्रसिद्ध वाक्यवाला स्टॅन्ली ) ला वापरून स्वतःची वसाहत कशी 'घेतली 'आणि आधी हस्तिदंत व नंतर नैसर्गिक रबराच्या व्यापारावर त्याने कशी अ मा प संपत्ती जमा केली , हे करताना एका खंडप्राय देशातील माणसांची हाल हाल करून कशी वाट लावली याबद्दल हे पुस्तक आहे .
अमानवी अत्याचार म्हणजे काय हे , या पुस्तकात कळते .
त्यानंतर नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध कॉंगो अजूनही या प्रकारच्या शोषणातून बाहेर निघालेला नाहीये.
जरूर वाचावे असे पुस्तक .
कालखंडात कॉंगोमधे कामानिमित्त प्रवास करून नंतर त्या कालखंडात रचलेले 'Heart of darkness ' हे जोसेफ कॉनरॅड लिखित फिक्शन प्रसिद्ध आहेच.
'ब्लड रिव्हर' हे टीम बुचर लिखित कॉंगोमधे प्रवास करून लिहिलेले , काँगोची सद्यस्थिती दाखवणारे पुस्तकही जरूर वाचावे .
'विजय तेंडुलकरांचा' ललित
'विजय तेंडुलकरांचा' ललित संग्रह - ते वाचते आहे.
.
पहीलीच कथा - 'राज कपूर' यात राज कपूरचे एक दिग्दर्शक व एक शोमॅन, व्यक्तीमत्व पूर्ण ताकदीनिशी साकारले आहे. अजुन पुढील गोष्टी वाचायच्या आहेत. वानगीदाखल ही पोच. अजुन जशा कथा येतील तशा प्रतिक्रियेमधून मांडत जाइन.
____
पहीलीच कथा - 'राज कपूर' यात राज कपूरचे एक दिग्दर्शक व एक शोमॅन, व्यक्तीमत्व पूर्ण ताकदीनिशी साकारले आहे.
'तीसरी कसम' सिनेमा तेंडुलकरांनी लागोपाठ २ दा पाहीलेला इतका त्यांना आवडलेला होता.'अर्धसत्य' सिनेमाचा शेवट निहलांनीच्या आग्रहानुसार बदलण्यात आलेला ज्यात पोलिस अधिकारी, वेलणकरची हत्या करतो. मूळ शेवट होता वेलणकरची आत्महत्या. मुख्य राज कपूरला भेटल्यानंतर राजजींचे अतिशय भारवून टाकणारे अगत्य, तेंडुलकरांना तर राजजींची ऑफर स्वीकारायची नाहीये पण नाही म्हणता येत नाहीये. ही द्विधा मनस्थिती फार उत्तम रीतीने मांडलेली आहे. त्म्हणतात्या ललितात, तेंडूलकर सतत म्हणतातधंदात्या चित्रपटाने जो काही भरघोस धंदा केला त्यात माझे निमित्त (=योगदान, शेअर) फार कमी होते.
_____________
तीसरी 'माझा ज्योतिषी' ललित. छान आहे हे. एक बडा ज्योतिषी 'सुखटणकर' म्हणुन गांधीजींच्या खूनाचे भविष्य वर्तवितात पण त्यांचे ते भविष्य लिहायला वर्तमानपत्रे राजी होत नाहीत आणि दुसर्या आठवड्यात गांधी हत्या घडते. पुढे याच ज्योतिषाची आर्थिक वाताहात होते व शेवटी तर कपाळाला खोक असलेल्या अवस्थेत ते भीक मागताना आढळतात इथे तेंडुलकर लिहीतात - "काळाच्या पडद्या आड डोकावून, कुणाचे तरी भविष्य जाणण्याचे प्रयत्न करणार्याला, नियती त्याची जागा दाखवत असावी." इथे ते त्यांना भेटलेल्या एका ज्योतिषाबद्दल लिहीतात. पण किती अभ्यासू, चिकीत्सक आणि संवेदनशील मनाने! ते वाचण्यासारखे आहे. त्यांचा ज्योतिषावर विश्वास नाहीये पण तो ज्योतिषीच यांना बळजबरीने काही सांगू पहातो व पुढेपुढे त्यांच्यातला लेखक त्या व्यक्तीरेखेत गुंतत जातो असे काहीसे.
नवे नियतकालिक
सतीश तांबे आणि काही इतर जणांनी मिळून एक नवं नियतकालिक सुरू करायचा विचार मांडला आहे. त्याविषयी अधिक माहिती -
नव्या नियतकालिकाचे सभासद व्हा!
नमस्कार
२१ आणि २४ डिसेंबर रोजी 'फक्त लेखांना स्थान देणाऱ्या एका नियतकालिकाचे वर्गणीदार व्हायला किती जण तयार असतील ह्या संबंधात ज्या फेसबुक पोस्ट्स टाकल्या होत्या त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला त्यामुळे हुरूप वाढून असे नियतकालिक एप्रिल महिन्यापासून सुरु करण्याचे योजत आहोत.
ह्या नियतकालिकाचे स्वरूप ढोबळमानाने असे असेल
१) ६ x ९ आकाराचे १२८ पानांचे त्रैमासिक
( जे वर्गणीदारांना हमखास मिळण्यासाठी कुरियरने पाठवले जाईल )
२) ह्यामध्ये कविता / कथा -एकुणातच फिक्शन/ ललित लेखन नसेल .
( एखाद्या लेखाचा भाग म्हणून ते अपवादाने येऊ शकेल, तेवढेच )
३) ह्यामध्ये निखळ राजकारण / समाजकारणावर लेख नसतील
४) हा अंक केवळ लेखांसाठी असेल
('लेख' हा शब्द इथे मुलाखत/निबंध / शोधनिबंध/ भाषांतरित लेख/टिपणे/ चौकटी/ रिपोर्ताज वगैरेना सामावून घेणारा असेल.)
५) ह्यामध्ये साहित्यावर भर असला तरीही नाटक-चित्रपट-चित्रकला-संगीत वगैरे दृक्-श्राव्य कलांवरील मजकूरही असेल. त्याचप्रमाणे जाहिराती, पोस्टर्स, पुस्तकांची मुखपृष्ठे, मांडणी इत्यादि उपयोजित आनुषंगिक विषयांवरील लेखनाचेही त्यात स्वागत असेल.
६) ह्या लेखांचा महत्त्वाचा हिस्सा समीक्षा / भाष्य स्वरूपाचा राहील. ज्यामध्ये जागतिक पातळीवरच्या समीक्षा व्यवहारालाही स्थान दिले जाईल.
तसेच योग्य जागेअभावी मराठीत इतरत्र प्रकाशित न होऊ शकणारे आणि समाजमाध्यमातून वाचकांसमोर नेणे अस्थानी ठरू शकते, असे वाटणारे महत्त्वाचे लेख आपल्याला अभिप्रेत आहेत.
ह्या नियतकालिकासाठी वार्षिक वर्गणी रु. ४०० /- ( रुपये चारशे मात्र ) एवढी राहील. वर्गणी भरण्यासाठी खात्याचा तपशील असा :
Watermark Publication
Current A/C No. 62426108546
State Bank of India Kothrud, Pune Branch
IFSC : SBIN0020734
वर्गणी भरल्यानंतर ट्रान्सफर डिटेल्स आणि पत्ता watermarkpublication@gmail.com वर इमेलने पाठवावा किंवा 9422016044 वर whatspp करावा.
धन्यवाद
वॉटरमार्क पब्लिकेशन