शब्द वेध
श्री मृगेंद्र कुंतल यांचा पसारा वरील आणि श्री कुमार यांचा शब्दकोशांवरील हे सुंदर धागे वाचुन मला शब्दवेध या नावाने एक धागा काढण्याची कल्पना सुचली.
अर्थात मी भाषा विषयाचा अभ्यासक नाही व वरील लेखकांप्रमाणे माझा सखोल व्यासंग नाही. माझे फक्त शब्दांवर प्रेम आहे आणि त्यांचा धांडोळा घ्यायला मला आवडते. कदाचित मला माहीत असलेले काही शब्दांचे अर्थ बरृयाच जणांना नविन नसावेत पण माझ्यापुरते मला जे रोचक शब्द वाटले अर्थपुर्ण वाटले ते मला इथे तुमच्या बरोबर शेअर करावेसे वाटतात इतकेच. माझ्याप्रमाणे जे इतरही शब्दप्रेमी इथे असतील त्यांना या धाग्याची ही एक हक्काची खुंटी मिळाल्यास आवडलेला रोचक शब्द टांगायला सोपे होइल असे मला वाटते. शब्द बरेचदा नविन भेटतात तेव्हा डोक्यात फिरत राहतात कधी अर्थ शोधले जातात कधी स्मृतीतुन निघुन जातात कधी एकदम वीज चमकल्यासारखा त्यांचा अर्थ दिसु लागतो कधी कोणी नेहमीच्या अतीपरीचीत शब्दांचा अनोखा वापर करतांना दिसतो. या सर्वांची मजा असते. एक एक शब्द आनंद देउन जातो समृद्ध करुन जातो, शब्दांना लगडलेले संदर्भ काळ त्यांचा उगम इतिहास नेहमी खुणावत राहतो कधी धागा सापडतो कधी काहीच गवसत नाही पण मागोवा घेण्यात त्यांच्च्याशी खेळण्यात भरपुर आनंद मिळतो इतके नक्की आणि इतकेच पुरेसे आहे.
असा धागा काढतांना शब्दवेध हा आवडलेला शब्द पहील्यांदा आठवला तो चंद्रकांत काळे यांच्या संचाच नाव शब्दवेध होत त्यामुळे. याच नावाच एक पुस्तक विद्युल्लेखा अकलुजकर यांनी लिहीलेलं आहे अस कुणीतरी सांगितल म्हणुन हे पुस्तक बुकगंगावर शोधतांना ( मी अजुन वाचलेले नाही ) याच्या पानावर फार सुंद र ओळ रेडीमेड सापडली जी माझ्या भावना अचुक व्यक्त करते. ती अशी.
शब्द-वेध म्हणजे शब्दांचा मागोवा. भाषेच्या घनदाट जंगलात घुसून केलेला नादाचा/शब्दांचा/अर्थांचा पाठपुरावा.
तर सुरुवात करतो व नंतर जमेल तसे प्रतिसादातुन एकेक शब्द घेत पुढे सरकतो
खस्ता
एक दिवस विदर्भातील कुठल्याशा गावातुन एस टी महामंडळाच्या बसने जात होतो. शेजारचा माणुस गप्प बसलेला. मला गप्पा मारायची सवय गप्प बसता येत नाही. मी हळु हळु काडी टाकत टाकत संवाद वाढवु लागलो. गडी खवय्या होता गप्पा खाण्यावर आल्या म्हणाला "अरे शेगाव कचोरी भुल जाएंगे आप ये ये यहॉ की कचोरी खाओ " मी सहज विचारलं कैसी है वो कचोरी ? तो म्हणाला " अरे बहोत बढीया एकदम खस्ता " खस्ता ??? कचोरी खस्ता ? माझ्या डोक्यात हा शब्द दोन ठिकाणी आदळलेला होता.
एक गालिब चा प्रसिद्ध शेर माहीत होता
'ग़ालिब"-ए-ख़स्ता के बग़ैर कौन से काम बन्द हैं
रोइये ज़ार-ज़ार क्या कीजिये हाय-हाय क्यूँ
यातला खस्ता हाल ट्रॅजीक गालिब माहीत होता. दुसरा " संसारासाठी मी इतक्या खस्ता (?) खाल्या आणि शेवटी हे नशिबी आलं " हे डायलॉग खुप वेळा ऐकलेले. पण खस्ता कचोरी पहील्यांदाच ऐकली ( खाल्ली नाही ) मग अर्थ शोधला खस्ता चा तिथे रीतसर पहीला अर्थ होता. दुर्दशाग्रस्त जो आपला वरील शेर मधला गालिब. पण हा खस्ता म्हणजे कुरकुरीत क्रिस्पी खस्ताच्या विरोधी अर्थाने कडक कचोरी कोणाला आवडेल. तोंडात सहज तुडवली जाईल अशी खस्ता कचोरी किंवा असा कोणताही खाद्यपदार्थ जो ही क्वालिटी बाळगतो तो.
वि० [फा०खस्तः] १. बहुत थोड़ी दाब में टूट जानेवाला। भुरभुरा। २. जो कान में मुलायम तथा कुरकुरा हो। जैसे– खस्ता कचौड़ी, खस्ता पापड़। ३. टूटा-फूटा। भग्न। ४. दुर्दशा-ग्रस्त
कल्लोलिनी
श्री माधव ज्युलियन यांचे छंदोरचना हे सुंदर पुस्तक आहे. यात पहिल्यांदा हा शब्द माझ्या वाचनात आला. यात एके ठिकाणी ते म्हणतात " गद्यातही रमणीय आंदोलन असते. एखाद्या गद्यगंगाधराच्या ( हा पण रोचक शब्द आहे मराठीतले गद्यगंगाधर गाडगीळांचे नाव गंगाधर आहे हा योगायोग म्हणावा का ? ) भाषेत जेव्हा लेखन एकप्रकारच्या जेव्हा समाधीतच झाले असावे असे वाटते आणि भाषा ही कल्लोलिनीप्र्माणे भरपुर ओढाळ आणि नादवती होते तेव्हा तीत एक प्रकारचे श्रेष्ठ गुढ आंदोलन प्रत्ययास येते."
कल्लोलिनी म्हणजे अशी नदी ज्यात भरपुर लाटा तरंग उठतात किंवा अशा लाटा तरंगाचा कल्लोळ करत वाहणारी कल्लोलिनी नदी. नदी किंवा सरीता या नेहमीच्या गरीब शब्दांना किती सुंदर नादमय पर्यायी शब्द आहे हा. आणि हा असा प्रचाराबाहेर का गेला असावा ? माहीत नाही. मग हा शब्द जेव्हा अजुन शोधला तेव्हा श्री रुद्राष्टकम मध्ये सापडला तो असा
तुषाराद्रि संकाश गौरं गम्भीरं। मनोभूत कोटि प्रभा श्री शरीरं।
स्फुरन्मौलि कल्लोलिनी चारु गंगा। लसद्भालबालेन्दु कण्ठे भुजंगा॥3॥ याचा दिलेला अर्थ खालील प्रमाणे होता
व्याख्या - जो हिमाचल समान गौरवर्ण व गम्भीर हैं, जिनके शरीर में करोड़ों कामदेवों की ज्योति एवं शोभा है, जिनके सर पर सुंदर नदी गंगा जी विराजमान हैं, जिनके ललाट पर द्वितीय का चंद्रमा और गले में सर्प सुशोभित है ॥3॥
इथे कल्लोलिनी शब्दावरुन हलकल्लोळ शब्द आठवुन माझ्या मनात विचारांचा कल्लोळ माजला. मला अजुन ऑनलाइन मराठी डिक्शनरी अजुन नीट शोधता येण्याची प्रॅक्टीस नाही. नबाच्या प्रतिसादावरुन आता दाते त शब्द थोडा थोडा शोधता येतो पण अजुन ते व्यवस्थित जमत नाही. म्हणजे मराठी टायपुन मग शोधावा की कसे म्हणुन सध्या गुगलुनच शोधतो तर इथे हिंदी अर्थात कल्लोलिनी चा अर्थ अधिक स्पष्ट करणारे विवरण असे आढळले
जल का वह प्राकृतिक प्रवाह जो किसी पर्वत से निकलकर निश्चित मार्ग से होता हुआ समुद्र या किसी दूसरे बड़े जल प्रवाह में गिरता है
तर मोठा सुंदर नादमय शब्द आहे मला खुप आवडला.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
डांबरट व डॅम्बीस चा उगम
या दोन शब्दांच्या उगमाविषयी मी कुठेतरी वाचले होते ते खालीलप्रमाणे आहे. याची खात्री देता येत नाही पण ते असे आहे.
नेटीव्ह साहेब मराठी कारकुनास कामात कसुर केल्यास
You Damned Rat ,
You Dumb ass
असे झापत असे तर त्याच्या आवर्तनाने आणि ते सतत ऐकुन त्याच्या अपभ्रंश झालेल्या उच्चाराने त्याचे
डांबरट डांबरट
डॅम्बीस डॅम्बीस्
असे झाले असे वाचलेले आहे
खरे खोटे देव जाणे.
...
'पॅटीस' कोठून आले असावेत? (आणि, त्याचबरोबर, 'रगडा पॅटीस' हा पूर्णपणे वेगळ्या जातीतला पदार्थसुद्धा?)
आपल्यात ज्यास 'पॅटीस' म्हणतात, त्यास (किंवा तद्सदृश पदार्थास) इंग्रजीत (गेला बाजार अमेरिकनमध्ये तरी) 'पफ' म्हणतात. उलटपक्षी, 'Patties' (एकवचनी: 'Patty') या शब्दावरून आला म्हणावे, तर 'पॅटी' हासुद्धा पूर्णत: विजातीय प्रकार आहे. बर्गरमध्ये कोंबलेला जो मांसखंड (किंवा सोयाखंड) असतो, त्यास 'पॅटी' म्हणतात. (शब्दकोश तपासल्यास 'बारीक तुकडे केलेल्या अन्नाचा (विशेषत: मांसाचा) थापून केलेला चपटा खंड' असा काहीसा अर्थ मिळतो.) आपल्यात ज्याला 'पॅटीस' म्हणतात, तो प्रकार या कॅटेगरीच्या जवळपाससुद्धा जात नाही.
मग हा शब्द कोठून आला असावा बरे?
(नाही म्हणायला, जमैकन पॅटी हा प्रकार थोडासा आपल्या पॅटीससारखा असतो खरा. परंतु, (१) 'पॅटी'चा असा अर्थ फक्त जमैकन इंग्रजीत१ होतो, सर्वसाधारण इंग्रजीत नव्हे, तथा, (२) जमैकन पॅटीचे आवरण आपल्या पॅटीससारखे (किंवा इंग्रजी पफसारखे) फ्लेकी नसते, आणि काहीसे पिठूळ असते.)
----------
१ तसे पाहायला गेले, तर जमैकन इंग्रजीत 'बुल्ला' या शब्दाचा अर्थ '(गरिबांचे अन्न असलेला) एका प्रकारचा अत्यंत स्वस्त परंतु अत्यंत सुका पाव' असा काहीसा होतो. (हा पाव लोणी लावून खातात. म्हणजे, जमैकातले गरीब सकाळीसकाळी बुल्ल्याला लोणी लावून खातात१अ, असे कोणी म्हटल्यास त्यात वावगे नसावे.) त्यामुळे, जमैकन इंग्रजी हा काही विशेष ग्राह्य प्रकार असावा, आणि त्यातून मराठी माणसांनी (सामान्य इंग्रजीत काही वेगळाच अर्थ होणारा) एक शब्द१ब उचलला असू शकेल, हे पटत नाही.१क
१अ एकदा (केवळ खाज म्हणून) हा प्रकार मी स्वत: करून पाहिला आहे. (बोले तो, स्थानिक ग्रोसरी ष्टोअरात इंटरनॅशनल सेक्शनमध्ये जमैकन उपविभागात बुल्ला(पाव) सापडला, तो विकत घेऊन घरी आणून लोणी लावून खाऊन पाहिला.) झेपला नाही. (तोंड प्रचंड सुके पडले.) जमैकन गरिबांनाच तो लखलाभ होवो.
१ब पॅटी. बुल्ला(पाव) नव्हे.
१क उलट्या बाजूने पाहावयास गेले, तर जमैकन लोकांनी मात्र हिंदी लोकांचा 'गोट करी' हा प्रकार जवळपास जसाच्या तसा उचलला. (सूक्ष्म फरक म्हणजे, जमैकन गोट करीत हिंदी गोट करीच्या तुलनेत हळदीचे प्रमाण किंचित अधिक असते. परंतु बाकी डिट्टो सेमने सेम.) असो चालायचेच.
पण...
डोक्यात तो अर्थ माहीत असल्याने
अंमळ विचीत्र संवेदना उत्पन्न झाली.
हो, ते काहीसे अपेक्षित होते.
त्याचा अर्थ पुरुषाचे लिंग
हो, पण गंमत म्हणजे...
पण ते तूर्तास असो. त्याहून महत्त्वाचा प्रश्न: त्या पॅटीस, रगडा पॅटीस वगैरे मंडळींचे काय ठरले मग? कोठून आली ही मंडळी? (संदर्भ)
----------
हां, तर गंमत सांगत होतो.
बुल्ला (मराठीत: पुरुषाचे जननेंद्रिय), पुच्ची (मराठीत: स्त्रीचे जननेंद्रिय) या शब्दांचे अर्थ मराठीत भले काहीही होत असोत, परंतु हिंदीत मात्र या दोन्हीं शब्दांचे अर्थ फारच सोज्वळ, निरागस, तथा वडीलधाऱ्या मंडळींसमोर (झालेच तर, कौटुंबिक वातावरणात, लहान मुलांसमोर वगैरे) हे शब्द निःसंकोचपणे उच्चारता यावेत, अशा प्रकारचे आहेत.
हिंदीत 'बुल्ला' म्हणजे बुडबुडा. (इथे पाहा.)
बाकी, लहान मुलांची आपण पप्पी घेतो (किंवा, लहान मुले आपल्याला पप्पी देतात), म्हणतो, तद्वत चुंबनाच्या देवाणघेवाणीस हिंदीत 'पुच्ची लेना/देना(/करना)' म्हणतात. (याला शब्दकोशाचा दाखला (अद्याप) सापडला नाही, परंतु, कॉलेजात असताना एका उत्तरप्रदेशी सहाध्यायाच्या तोंडून हा वाक्प्रचार ऐकला होता, नि हादरलो होतो, नि का हादरलो, हे त्या प्राण्याच्या गावीही नव्हते, एवढे जरूर आठवते. शिवाय, 'चुम्मा' वेगळा, नि 'पुच्ची' वेगळी, याचे विवेचन करणारा हा एक ब्लॉगही शोधाअंती सापडला. बोले तो, चुंबन घेताना तोंडाने 'पुचूक' असा ध्वनि काढल्यास ती 'पुच्ची', अन्यथा, (सायलेंट ट्रीटमेंट दिल्यास) तो 'चुम्मा', असे काहीसे. शिवाय, 'पुच्ची' आणि 'चुम्मा' यांतील सूक्ष्म भावनिक अर्थच्छटांचेही ढोबळ का होईना, परंतु विवेचन त्या ब्लॉगावर केलेले आहे; इच्छुकांनी अवश्य लाभ घ्यावा.)
तर आहे हे असे आहे; तथास्तु|
वेळणी आणि विदग्ध
ह्या धाग्यात आठ दहा दिवसांपूर्वी वेळणी आणि विदग्ध हे शब्द आले आहेत. त्यातली वेळणी म्हणजे ताटली. खास भात वेळण्यासाठी पातेल्यावर झाकण म्हणून वापरायची. वेळताना भाताची शिते निवळाबरोबर वाहून जाऊ नयेत म्हणून ती ताटली पातेल्यावर समान तऱ्हेने, मोठी फट न राहाता बसणे हे आवश्यक. म्हणून ती ताटली शक्यतो सपाट असणे, तिच्या कडा बाहेर वळलेल्या नसणे हेही आवश्यक. ह्या स्वरूपातल्या ताटलीला वेळणी म्हणत. भात वेळणे इतिहासजमा झाल्यावर वेळणी हा शब्द नावापुरताच उरला आहे.
'विदग्ध' हा शब्द भर्तृहरीच्या वैराग्यशतकातील एका सुप्रसिद्ध संस्कृत श्लोकामुळे अनेकांच्या परिचयाचा असतो.
" सा रम्या नगरी महान स नृपति: सामन्तचक्रं च तत्
पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत् ताश्चंद्रबिंबानना:
उद्विक्त: स च राजपुत्रनिवहस्ते बन्दिनस्ता कथा:
सर्वं यस्य वशात् अगात् स्मृतिपथं कालाय तस्मै नम:
वाटलेच मला!
वेळणी म्हणजे ताटली. खास भात वेळण्यासाठी पातेल्यावर झाकण म्हणून वापरायची. वेळताना भाताची शिते निवळाबरोबर वाहून जाऊ नयेत म्हणून ती ताटली पातेल्यावर समान तऱ्हेने, मोठी फट न राहाता बसणे हे आवश्यक. म्हणून ती ताटली शक्यतो सपाट असणे, तिच्या कडा बाहेर वळलेल्या नसणे हेही आवश्यक. ह्या स्वरूपातल्या ताटलीला वेळणी म्हणत.
नेमके!
आमची आजीसुद्धा टिपिकली ज्या छोट्या झाकणीवजा ताटल्यांना 'वेळणी' म्हणून संबोधत असे, त्यांचा उपयोग ती भाताच्या भांड्यावर झाकणी म्हणूनच करीत असे. (मग भले ते भात शिजविण्याचे कुकरचे भांडे असो, वा पातेले. आणि भले ते शिजविताना असो, की उरलेला भात रेफ्रिजरेटरमध्ये ठेवताना.)
आणि, वेळणीचा विळीशी (किंवा, खोबरे खवण्याकरिता वापरता येऊ शकेल, अशा कोणत्याही उपकरणीशी) काहीही संबंध नाही, याचीही खातरजमा या निमित्ताने झाली. आभार.
'विदग्ध' हा शब्द भर्तृहरीच्या वैराग्यशतकातील एका सुप्रसिद्ध संस्कृत श्लोकामुळे अनेकांच्या परिचयाचा असतो.
भर्तृहरीशी (आणि/किंवा त्याच्या कृतींशी) आमचा परिचय नाही. (खोटे कशाला बोला?) तसेच, त्या श्लोकातील सुरुवातीची 'सा रम्या नगरी' आणि शेवटचा 'कालाय तस्मै नम:' वगळल्यास उर्वरित श्लोकही ठाऊक नव्हता. त्यामुळे, 'विदग्ध'शी जानपहचान अशी खाशी नव्हती.
त्याउपर, या क्षणापर्यंत माझी प्रामाणिक समजूत, 'विदग्ध' म्हणजे 'जळलेले' अथवा 'जळके' असे काही असावे, अशी होती. ('पवन' म्हणजे 'जानवे' फेम.) शिवाय, लोकांना 'विदग्ध' का म्हणत असावेत, हा प्रश्न आम्ही, कोणास ठाऊक, कदाचित त्यांनी आपापले हात अगोदर कधीतरी कोठेतरी पोळून घेतले असतील१, म्हणून असेल, म्हणून अधिक विचार न करता सोडून दिला होता. असो चालायचेच.
----------
१ हिंदूसमाजात याकरिता संधी मुबलक. स्वत:चेच डोके फोडून घ्यायला दगड, आणि स्वत:चे हात पोळून घ्यावयास संधी, यांची कमतरता त्रिकालात भासायची नाही. असो.
ऋतुपर्ण आणि अभिराम
ऋतुपर्ण घोष हे विख्यात बंगाली दिग्दर्शक
नावाचा अर्थ सुस्पष्ट आहे फार सुंदर शब्द आहे अधिकचा संदर्भ म्हणजे हे प्राचीन अयोध्येच्या एका राजाचे नाव होते ( सर्वकर्मा चा मुलगा ) याच्याकडे नळ दमयंती तल्या नळाने ( की नल ) ने नोकरी केली होती.
Rutuparna was a master mathematician and profoundly skilled in dice Kali (Demon). Nala, as Bahuk (one with a hump) became a minister and later the charioteer in King Rituparna's court on the advice of the King of Snakes (Nagas) to learn from him the skills of dice.
कली हे ऋग्वेदकालीन जुगारींच्या जुगारातील टाकलेला सर्वात वाईट फासा या अर्थाने अंदाजे आहे.
अजुन डिटेल आठवत नाही एकेकाळी लक्षात होते आता विस्मरण झाले.
त्यानंतर अयोध्येचा राजा राम आला पण राम हा ही फारच साधा मिळमिळीत शब्द त्यापेक्षा हा
अभिराम सुंदर शब्द आहे.
अभिराम भडकमकर हे विख्यात मराठी दिग्दर्शक लेखक
अर्थ अत्यंत सुदर आकर्षक हा इथे एक उपयोग्
जीवन क्या है जीवन जिसमे रहे काम और केवल काम.
हमें भान भी हो न सके यह धरती है कितनी अभिराम.
सुन्दर बाला के नयनों के सब बाण अकारथ चले गये,
हम उसके पैरों की झांझर, न नृत्य कला से छले गये.
इतनी फुरसत कहां कि देखें उसके मुख की आकृतियां,
फूटेगी जिनसे मुसकाने, नयनों से झरेंगी फुलझड़ियाँ.
निर्धन है वह जीवन जिसमे रहे काम और केवल काम,
हमें भान भी हो न सके यह धरती है कितनी अभिराम.
डोंबल
‛डोंबल तुझं!’ असं मराठीत खूप लहानपणापासून ऐकत आलो आहे; पण नेमका इथं डोंबल कशाला उद्देशून आहे, ते मात्र कळत नव्हते. अन् आताही फारसे कळते असंही नाही. नंतर हळूहळू ते डोक्यासंदर्भातच असले पाहिजे असे नेणिवेच्या पातळीला तरी पुसटसे आकळायला लागले. पण अजूनही डोंबल म्हणजे नेमके काय, असा प्रश्न पडतोच. त्यासाठी काही शब्दकोश चाळून अर्थ बघितले. ते असे :
मराठी साहित्य व संस्कृती मंडळाच्या आणि दाते-कर्वे यांच्या ‛मराठी शब्दकोशा’त ‛डोंबल’ हा शब्द ‛
१. (निंदार्थी किंवा थट्टेने) डोके; डोकसे. २. सौम्य शिवी ’ असा दिलेला आहे.
या अर्थाला जोडूनच ‛वा. गो. आपटे’ यांच्या ‛विस्तारित शब्दरत्नाकर’ने-देखील ‛डोंबल’ म्हणजे ‛
डोके (तुच्छार्थी) ’ असं म्हटलंय. एवढंच नव्हे, तर ‛मोल्स्वर्थ शब्दकोशा’नुसार-ही ‛डोंबल’ हा शब्द ‛ डो(स)क्या ’संदर्भातच दाखवला आहे.
मात्र, ‛कृ. पा. कुलकर्णी’ यांच्या ‛मराठी व्युत्पत्ति कोशा’त ‛डोंबल’ म्हणजे ‛ पोट, ढुंगण, शरीर, डोके (शिवीप्रमाणे वापरतात.) ’ असे विविध अर्थ सांगितलेले दिसतात.
त्यामुळं इथं नेमका अर्थ कुठला हे अजूनही स्पष्ट होत नाही. निदान असं मानायला जागा आहे. मात्र, वाक्यार्थानुसार अर्थ कळूनही वळत नसल्याने एक वेगळीच गंमत तयार होते, हे मात्र खरे.
ता.क. - ‛प्र. न. जोशीं’चा ‛आदर्श मराठी शब्दकोश’ यासंदर्भात चाळायचा होता. पण तो तूर्त चाळायला मिळाला नाही. त्यामुळे किंचित हळहळ.
आतंक
श्री विलास सारंग यांचा एक " आतंक " नावाने विलक्षण असा कथासंग्रह आहे. याच्या प्रस्तावनेत मला आतंक हा शब्द अस्सल मराठी आहे असे पहिल्यांदा कळले. याच्या प्रस्तावनेत या शब्दाविषयी " विलास सारंग" असे म्हणतात्
" या संग्रहातील शीर्षककथेला मुळात " टेररीस्ट" असे शीर्षक दिलेले होते. त्या कथेला... आणि म्हणुन संग्रहाला.......आता " आतंक" असे शीर्षक दिले आहे. "टेररीस्ट" या शब्दाला पर्याय म्हणुन " आतंकवादी" हा शब्द हिंदिमध्ये वापरला जातो. भाषासंकरा ची ज्यांना धास्ती वाटते त्यांना मी दिलासा देऊ इच्छितो की " आतंक" हा अस्सल मराठी शब्दही आहे. हा मुळ संस्कृत शब्द महाभारतात, रघुवंशात वगैरे वापरला गेला आहे. तसेच प्राचीन मराठीतही वापरला गेला आहे ( दाते- कर्वे यांच्या " महाराष्ट्र शब्दकोश " मध्ये तो सापडतो.)
"आतंक" या शब्दाच्या वेगवेगळ्या अर्थांमध्ये भयाकुल , चिंतीत मनोवस्था, " काहितरी अनिष्ट घडणार" ही आशंका, हा एक प्रमुख अर्थ आहे.
"ढोलाचा वा डमरुचा आवाज" असाही एक अर्थ आहे. तो मला विशेष लक्षणीय वाटतो. असा हा सुंदर, नादमय, अर्थवाही शब्द मराठी नाहीच असे वाटण्याइतपत दुर्लक्षित झालेला आहे. या संग्रहाचे शीर्षक म्हणुन वापरल्याने हा शब्द पुन्हा मराठीमध्ये चलनात येण्यास थोडाफार हातभार लागला तर मला आनंद होइल "
बाय द वे या पुस्तकाचे मुखपृष्ठ नितिन दादरावाला यांचे आहे जे रोचक आहे ते मिळाल्यास डकवतो
परचुरन
ह्या शब्दावर ऐसीवर दोन तीन वर्षांपूर्वी चर्चा झाली आहे. मला वाटते अरविंद कोल्हटकर यांनी जुन्या काळच्या हिशोबाच्या / जमाखर्चाच्या वह्यांवर आणि त्यातल्या भाषेवर लेख लिहिला होता त्यात हा शब्द होता. परचुरन अथवा परचुटन म्हणजे किरकोळ, फुटकळ, सटरफटर. हा शब्द अजूनही वापरात आहे. गुजरातीत तर आहेच. आपल्याकडे मेस्त्री, गवंडी, सुतार, रंगारी इत्यादी लोकांच्या बोलण्यात हा शब्द असतो.
Sawbones
Lost English - Words & Phrases that have vanished from our language- Chris Roberts. हे एक मजेदार पुस्तक आहे. यात चलनातुन बाद झालेल्या अनेक इंग्रजी शब्दांविषयी किंवा चलनात असलेले मात्र मुळ अर्थ वा एखादा प्रमुख अर्थ वापरातुन संपलेल्या शब्दांविषयी आहे. यात हा शब्द वाचला.
Sawbones हा शब्द डॉक्टर साठी वापरला जात असे. त्यातही स्पेसीफीक म्हणजे सर्जन साठी हा शब्द वापरला जात असे मात्र तो सध्या चलनातुन पुर्णपणे बाद झालेला आहे. Saw आणि Bones या दोन शब्दांच्या संयोगाने हा शब्द बनलेला होता. ऑर्थोपेडीक सर्जन च्या कामावरुन कदाचित हा शब्द बनला असावा असे अंदाजपंचे आपले मत. पुस्तकात तसे काही दिलेले नाही. संदर्भ म्हणुन पुस्तकात स्टारट्रेक मधल्या शिप वरील डॉक्टरला लिओनोर्ड बोन्स संबोधले जाण्याचा उल्लेख आहे. गुगलल्यावर या नावाचे एक संस्थळ सापडले ज्यात मुखपृष्ठावर Sawbones means precision hand craftsmanship असे दिलेले आढळले.
https://www.sawbones.com/
मुलीला, माहेरुन बोलावणे
मुलीला, माहेरुन बोलावणे आल्याच्या प्रसंगाचे वर्णन करताना, भोंडल्यामध्ये हे गाणे ऐकलेले होतेच -
सासूबाई सासूबाई मला आले मूळ,
मला काय सांगतेस, बरीच की दिसतेस, सांग जा आपल्या सासऱ्याना सासऱ्याना,
मामंजी मामंजी मला आले मूळ,
मला काय सांगतेस, बरीच की दिसतेस, सांग जा आपल्या दीराला दीराला.
भावजी भावजी मला आले मूळ,
मला काय सांगतेस, बरीच की दिसतेस, सांग जा आपल्या नवऱ्याला नवऱ्याला.
पतीराज पतीतराज मला आले मूळ,
आणा फणी, घाला वेणी, जाऊ द्या राणी माहेरा माहेरा,
आणली फणी , घातली वेणी, गेली राणी माहेरा माहेरा
त्यामुळे मूळ याचा अर्थ बोलावणे/निमंत्रण असा असावा हे लक्षात आले होते. मध्यंतरी रामविजय वाचताना परत खात्री पटली. जनक राजाकडून विश्वामित्रांना, राम-लक्ष्मणाला सीतास्वयंवराचे आमंत्रण येते तेव्हा 'मूळ' हा शब्द येतो.
अगदी अचूक
त्यामुळे मूळ याचा अर्थ बोलावणे/निमंत्रण असा असावा हे लक्षात आले होते.
सही पकडे हैं! ‛मराठी व्युत्पत्ति कोशा’त पहिल्या ‛मूळ’चा अर्थ ‛झाडाचे मूळ’ तर दुसऱ्या ‛मूळ’चा अर्थ ‛
आमंत्रण, बोलावणें, पाठवणी. Invitation, escort. ’ असाच दिला आहे. सोबत संस्कृत शब्द ‛मूल’ असा दाखवला असून त्यापुढे कंसात नक्षत्रनाम असे लिहिले आहे. तसेच यादवकालीन मराठीत ‛मूळ’ असा शब्द असल्याचा उल्लेखदेखील आहे.
व्योमित्रा
ताज्या बातमीनुसार इसरो ने नविन humanoid robot आपल्या गगनयान प्रकल्पासाठी बनवलेला आहे. या लेडी रोबोट चे नाव त्यांनी ठेवलेले आहे " व्योमित्रा"
हे सुंदर नाव जमलेले आहे.
व्योम चा अर्थ आकाश असा होतो आणि त्याची मित्र व्योमित्रा
व्योम चा चटकन आठवणारा मराठीतला वापर म्हणजे बालकवीच्या फुलराणी त ही ओळ
तो व्योमीच्या प्रेमदेवता – वार्यावरती फिरता फिरता
हळूच आल्या उतरुन खाली – फुलराणीसह करण्या केली
परस्परांना खुणवुनी नयनी – त्या वदल्या ही अमुची राणी
त्यांच्याच एका कवितेत " व्योमपटी जलदांची झाली दाटी " अशी ओळ येते कुठे ते नेमके आठवत नाही पण ही ओळ आहे.
दुसर उदाहरण म्हणजे फेमस बंगाली डिटेक्टीव्ह "व्योमकेश बक्षी " यातील व्योमकेश हे नाव शंकराचे आहे कारण का तर शंकराचे मोठे मोकळे केस आकाशत उडत असतात म्हणून असे केस असणारा व्योमकेश शंकर
अजुन एक शब्द आहे " व्योमचारी " त्याचा अर्थ पक्षी चिमणी जे आकाशात विहार करतात बाय द वे कवि ग्रेस यांनी पक्ष्यांना दिलेले एक सुंदर नाव आठवले
ते म्हणतात पक्षी म्हणजे " आभाळछंदाचे प्रवासी "
हा अर्थ माहीत नव्हता मग विभा म्हणजे काय ?
नभ चा हा अर्थ माहीत नव्हता. मग विभा म्हणजे काय ? विभावरी या नावाचा अर्थ काय ?
दुसरा प्रश्न म्हणजे जर आभाळ या शब्दाचा अर्थ आभायुक्त असा असेल तर ग्रेस यांच्या एका कवितेची ओळ्
काही धारा माझ्या पोरी काही तुझ्या धारा
पावसाळी आभाळात एखादाच तारा
याचा अर्थ कसा लावता येइल म्हणजे आभा असलेले आभाळ आहे आणि त्यात तारा ?
थोडा कन्फ्युजन है भाई
हम्म्म्म्... रोचक!
नभ = आभा नसलेले आकाश. म्हणूनच सावरकरांनी "स्वतंत्रते" कवितेत " परवशतेच्या नभात तूची आकाशी होते..." असं लिहिलंय.
नभ आणि आकाश यांच्यात हे डिस्टिंक्शन असल्याचे ठाऊक नव्हते. आणि 'स्वतंत्रते'तील 'नभात' हा 'तमात'चा (आकाशवाणी गायकवृंदाने पर्पेच्युएट केलेला) टायपो (बहुधा कागदावर उतरवणाऱ्याच्या घाणेरड्या हस्ताक्षरामुळे झालेला) आहे, अशी आजवर समजूत होती. (कारण, पाहा ना, आकाश आणि नभ जर एकच असेल, तर 'परवशतेच्या आकाशात तू आकाशात आहेस' याला काय मतलब आहे? रादर, 'परवशतेच्या अंधारात तू (दिलासा द्यायला?) आकाशात आहेस' मेक्स बेटर सेन्स, नाही का?)
आता, या डिस्टिंक्शनच्या प्रकाशात त्या पंक्तीकडे पुन्हा पाहावयास हवे.
----------
यावरून आठवले. 'रेडिओ'ला मराठीत 'नभोवाणी' म्हणण्याचा प्रघात आहे, तर स्पेसिफिकली 'ऑल इंडिया रेडिओ'ला 'आकाशवाणी'. म्हणजे, जिच्यात आभाळात ढग असल्यासारखी खरखर येते, ती 'नभोवाणी', आणि निरभ्र आकाश असल्यासारखी बिनाखरखरीची सुस्पष्ट ती आमची (एकमेवाद्वितीय) 'आकाशवाणी', असा फरक असावा काय? परंतु मग तसे पाहावयास गेले, तर या संज्ञा जेव्हा पाडल्या, त्या काळात तर ऑल इंडिया रेडिओवरसुद्धा मुबलक खरखर येत असे. या प्रकाशात 'आकाशवाणी' हे नामाभिधान केवळ 'स्टेटमेंट ऑफ इंटेंट' म्हणून पाहावे काय?
----------
पण काय हो, 'नभ' आणि 'आकाश' यांच्यातले हे डिस्टिंक्शन तरी खरे, की ('हत्या' आणि 'वध' यांच्यातील डिस्टिंक्शनप्रमाणे) कोणाच्यातरी अर्धचड्ड्यावृत सुपीक डोक्यातून प्रसवलेली (आणि 'बौद्धिकां'तून वगैरे प्रसृत होऊन पर्पेच्युएट झालेली) कपोलकल्पित, नितंबनिष्कसित१ नागरआख्यायिका२?
----------
'नभ' जर अगोदरच ढगाळ असेल, तर 'नभ मेघांनी आक्रमिले' हे कसे काय बुवा? अगोदरच ढगाळ असलेल्या नभावर मेघ आणखी आक्रमण काय करणार डोंबल? हे जास्तीचे मेघ ॲकोमोडेट करायला त्या अगोदरच ढगाळ नभात जागा कोठे आहे?
----------
'तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी'... भर चैत्रात ढगाळ आकाश??? सकाळीसकाळी सिमला ऑफिस३ चावले काय?
----------
यावरून आठवले. किंचित अवांतर आहे.
'मुहब्बत ही न जो समझे, वो ज़ालिम प्यार क्या जाने' या पंक्तीतल्या 'मुहब्बत' आणि 'प्यार'मध्ये नक्की डिस्टिंक्शन काय?
==========
तळटीपा:
१ Pulled out of one's ass या अमेरिकन वाक्प्रचाराचा स्वैर अनुवाद.
२ अर्बन लीजंड.
३ पुण्याच्या ऑब्झर्वेटरीस स्थानिक परिभाषेत 'सिमला ऑफिस' म्हणून नक्की का संबोधतात, हे त्या एका जगन्नियंत्यासच ठाऊक!
तोच चंद्रमा नबात तेच चांदणं प्रतिसादात !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
लय म्हणजे लयच भारी प्रतिसाद आहे नबा एक नंबर !!! मार्मिकच्या पलीकडला प्रतिसाद आहे.
'मुहब्बत ही न जो समझे, वो ज़ालिम प्यार क्या जाने' या पंक्तीतल्या 'मुहब्बत' आणि 'प्यार'मध्ये नक्की डिस्टिंक्शन काय?
वरती एक मुहब्बत क्लीअर होइल अशा सात पायऱ्या दिलेल्याच आहेत.
बाकी फरक माहीत नाही मात्र मी प्यार चिल्लर मोहब्बत गंभीर वगैरे समजत होतो ( उगा आपला एक गैरसमज हो हजारोंपैकी एक ) पण वरील ओळीत प्यार हे ॲडव्हान्स लेव्हलवर दाखवलेले दिसतेय. म्हणजे आशिक अजुन मुहब्बत च समजत नाही तर पुढच्या प्यार ची पायरी काय चढणार,
आता हे बॉलिवुडच ओल्ड व्हर्जन नव्यात मुहब्बत च्या सात पायऱ्या पार मौत पर्यंत जातात मग त्यानंतर प्यार असेल म्हणजे जुन्या व्हर्जन प्रमाणे प्यार मुहब्बत च्या वरती आहे असे मानले व मुहब्बत च्या सात पायऱ्या मोजल्या तर हे जे काय प्यार आहे ते मौत के पार वाला प्यार असावं बहुधा ( एक आपला अंदाज )
पण बॉलिवुड फार कन्फ्युजींग आहे इथपर्यंत होत तर दोन्ही व्हर्जन आपण एका ऑर्डर मध्ये लावु शकतो आता एक अलीकडच्या गाण्यात बॉलिवुड कवि म्हणतो
इश्क वाला लव्ह
आता याचा काय अर्थ लावणार ?
त्यापेक्षा आपापल्या प्रेमाला धरुन गप्प बसावे उसासे टाकावे वगैरे वगैरे
पुण्याचे सिमला ऑफिस
पुण्याच्या ऑब्झर्वेटरीस स्थानिक परिभाषेत 'सिमला ऑफिस' म्हणून नक्की का संबोधतात?
India Meteorology Department मुळात कलकत्त्यामध्ये होते. तेथून १९०५ साली ते सिमल्यास हलले आणि तेथून १९२८ साली पुण्यामध्ये आले. सिमल्याहून आल्यामुळे त्याला 'सिमला ऑफिस' असे म्हणू लागले आणि तेच नाव लोकांच्या तोंडी रुळले. (https://en.wikipedia.org/wiki/India_Meteorological_Department)
झणुतकझिङ्किणुझणुतत्किटतकशब्दैर्नटसि
काल परवा आदि शंकराचार्यांनी लिहीलेल्या शंकराच्या सुवर्णमालास्तुतीमधे एक अतिशय नादपूर्ण शब्द सापडला - झणुतकझिङ्किणुझणुतत्किटतकशब्दैर्नटसि
झणुतकझिङ्किणुझणुतत्किटतकशब्दैर्नटसि महानट भो
साम्ब सदाशिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् ॥
_______________
हे असे नादमय शब्द शंकराच्या स्तोत्रात खूपदा येतात. उदा - जसे रावणकृत शंकरस्तुती.
दुलाली नाव असलेल्या मायक्रो
In reply to ते कळले, पण... by 'न'वी बाजू
दुलाली नाव असलेल्या मायक्रो ब्रूअरी आऊटलेट्स झाली आहेत पुण्यात (आपल्या वेळचं पुणं नाही राहिलं न बा)