पण कधीतरी
anant_yaatree
उल्कापाताच्या आतषबाजीने
दिपून जातोय मी आज
पण कधीतरी
चंद्रमाधवीच्या अद्भुत प्रदेशात
अंतर्बाह्य उजळायचंय मला
शब्दांच्या समृद्ध अडगळीत
हरवून जातोय मी आज
पण कधीतरी
शब्दापल्याडच्या घनघोर निबिडात
निरुद्देश भटकायचंय मला
लवलवत्या रंगरेषा
रेखाटतोय मी आज
पण कधीतरी
अमूर्ताचं असीम अवकाश
अनवट रंगांनी भरायचंय मला
त्रिमितींच्या अभेद्य पिंजर्यात
घुसमटतोय मी आज
पण कधीतरी
स्थलकालाचं
वितान व्यापून
मग थोडं उरायचंय मला
ब्राव्हो!
त्रिमितींच्या अभेद्य पिंजर्यात
घुसमटतोय मी आज
पण कधीतरी
स्थलकालाचं
वितान व्यापून
मग थोडं उरायचंय मला
हे जब्राट आहे. मितींच्या पलिकडलं विश्व म्हणजे हजार डोळ्यांनी अनुभवलेलं जग असं काहीसं असेल. (जाहिरात - थ्री बॉडी प्रोब्लेम लोकहो, वाचा!)
अनंत यात्री - लेबलं लावणं ठीक नाही, पण विज्ञान_कविता हा प्रकार तुमच्या लेखणीतून निर्माण होतो आहे :)
छान
कविता खूपच आवडली. असेच लिहीत रहा.